आम्हाला घडवणारे 'लवटे सर'

डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या नागरी सत्काराच्या निमित्ताने...

साहित्य, संशोधन, संपादन, प्रशासन आणि समाजकार्य इ. क्षेत्रांत समर्पणशील वृत्तीने कार्यरत असणारे डॉ. सुनीलकुमार लवटे यांचा भव्य नागरी सत्कार रविवारी (9 ऑक्टोबर रोजी) कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने हा लेख प्रसिद्ध करत आहोत.

गुरुवर्य डॉ. सुनीलकुमार लवटे सर यांच्या सानिध्यात जेव्हा मी आलो ते वर्ष होतं सन 2001 चं. कोल्हापुरात शिक्षणासाठी गेलो तेव्हा सरांची भेट झाली. तब्बल 20 वर्षांपेक्षा अधिक काळ त्यांचा सहवास, संवाद, त्यांच्यासोबतचा प्रवास अनुभवत आलो आहे. आजवर त्यांच्यावर विपुल लिहिलं गेलं आहे, स्वतः सरांनीदेखील खूप अंगाने लेखन केलं आहे. साने गुरुजींचा विचार घेऊन पुढं जाताना ते अहर्निश काम करीत राहिले. सरांचा सहवास लाभल्यानंतर काय होतं हे सांगणारी कित्येक माणसं महाराष्ट्रभर भेटतील, याच साखळीतील मी एक आहे.

बार्शीतून कोल्हापुरात गेलो तेव्हा माझी शैक्षणिक प्रगती घरातील सर्वांना काळजीत टाकणारी होती. जबाबदारी, कर्तव्यपरायणता अशा जाणिवासुध्दा फारशा तीव्र नव्हत्या. अशा स्थितीत कोल्हापुरच्या शिवाजी विद्यापीठात हिंदी विभागात माझा प्रवेश झाला. दुसऱ्याच आठवड्यात आम्हा विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी लवटे सर वर्गात आले. उंच शरीरयष्टी, डोक्यावरील पांढरे केस, बोलण्यातील संयतपणा तसेच प्रेरणा, उर्जा व जीवनाला आकार देणारं मार्गदर्शन हे सारं विलक्षण होतं. समुद्राच्या लाटांवर भरकटणाऱ्या जहाजाला होकायंत्र सापडावं असा तो माझ्यासाठीचा अनुभव होता. ते मंतरलेले दिवस आजही मी मनाच्या कुपीत जपून ठेवले आहेत. तेव्हापासूनच त्यांच्याकडे मी आकर्षित झालो आणि कायमचा जोडला गेलो.

लहानपणी चौथीच्या वर्गात एखादा धडा शिकताना वाटायचं की, लेखक किती ग्रेट असतात. आपणही मोठं झाल्यावर लेखकच व्हायचं. कौतुकानं सांगावंसं वाटतं की, शाळेतील माझी ही इच्छा पूर्ण झाली ती लवटे सरांच्या सान्निध्यात आल्यानंतरच. सरांमुळंच ‘बार्शीची नाट्यपरंपरा’, ‘भाषण कला’ व ‘पत्रकारिता : शोध आणि बोध’ ही पुस्तकं माझ्या हातून लिहिली गेली. यातील पत्रकारितेचं पुस्तक सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठांतर्गत कौशल्य विकास अभ्यासक्रमाला लावण्यात आलं. सरांच्या मार्गदर्शनाखाली आणखी तीन पुस्तकं येत्या काही महिन्यात प्रकाशित होतील. (माझं कौतुक म्हणून हे सांगत नाही, तर सरांच्या सहवासात, त्यांच्या विचारांच्या प्रवाहात आल्यानंतर त्याचा माझ्यावर झालेला परिणाम लक्षात यावा म्हणून हा उल्लेख जाणीवपूर्वक केला.)

एकाच आयुष्यात किती अफाट काम करता येतं, लिहिता येतं हे साने गुरुजी, वि.स.खांडेकर यांनी दाखवून दिलं. या विचारवंतांचा, साहित्यिकांचा विचार पुढे घेऊन जाणं म्हणजे त्यांच्याइतकंच काम करण्याचा प्रयत्न करणं असा अर्थ लावून सर कार्यरत राहिले. इतरांनाही सामाजिक योगदान देण्यासाठी मार्गदर्शन करीत आले. मागील आठ वर्षांपासून बार्शीच्या वेश्या वस्तीत महिलांसाठी मी जे काम करतोय त्यापाठीमागची मूळ प्रेरणा त्यांचीच. “सचिन, एक लक्षात ठेव. स्वत:साठी जगता जगता इतरांसाठी आणि विशेष करून वंचितांसाठी जगण्याचा नेहमी प्रयत्न कर. असं केलंस तर रात्री नक्कीच तुला शांत झोप लागेल.” हा त्यांचा मंत्र मी आजतागायत जपला आहे. 

एकदा बार्शीत आल्यानंतर ते वेश्यावस्तीत आले तेव्हा तेथील महिलांनाही मोठा आधार वाटला. एकदा तर भर कार्यक्रमात त्यांनी एका ज्येष्ठ वेश्या महिलेचे चरणस्पर्श केले. एवढ्या लिनतेनं अन् लहान होऊन जगणं हे भाषणात बोलण्याइतकं सोपं नसतं, मात्र सरांच्या जगण्यात, वागण्यात ते ठळकपणे दिसत राहिलं. मागील महिन्यात त्यांच्या सूचनेनंतर बार्शीत मी सर्व वेश्या महिला-भगिनींना बोलावलं होतं. सर जेव्हा बोलायला माईकसमोर उभे राहिले तेव्हा त्यांचं भाषण ऐकूण अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. कार्यक्रम संपल्यानंतर त्यांचा चरणस्पर्श करण्यासाठी महिला अक्षरश: रांगेत उभा होत्या, पाया पडून घेणं त्यांना आवडत नव्हतं, पण यानिमित्ताने सरांच्या हाताचा स्पर्श आमच्या डोक्याला झाला तरी आम्ही धन्य झालो, असा सूर या महिलांचा होता. बोलणं, वागणं आणि जगणं एकसमान असलं तरच हे घडतं याची जाणीव मला आणखी एकदा झाली. 

जन्म दिल्यानंतर मातेनं पाठ केली अन् ती निघून गेली. पंढरपूरच्या नवरंगे अनाथाश्रमात व तिथून रिमांड होममध्ये सर वाढत राहिले. ते बोलताना एकदा असं म्हणाले, “आई-वडिलांशिवायचं माझं बालपण इतकं वेदनादायी होतं की, ‘बालपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा’ हे गाणं कधीच मला गुणगुणावंसं वाटलं नाही.” खरं तर ही रिमांड होम आणि अनाथाश्रम ही दोन्ही ठिकाणं म्हणजे समाजाच्या दृष्टीनं हेटाळणीचीच! तिथं राहूनही तिथल्या चार भिंतीच्या आतून जगाकडं पाहण्याची खिडकी सरांनी शोधली. सर्व समस्या, परिस्थिती, प्रश्नांवर मात करत स्वसामर्थ्यावर एक उंची गाठली. राज्याच्या, देशाच्या सीमा लांघत प्रबोधनाचं काम अविरत सुरु ठेवलं. वाट्याला दु:ख आलं तर कुरकुरत जगणारी अनंत माणसं पावलोपावली भेटत राहतात, अशा माणसांनी डॉ. सुनीलकुमार लवटे याचं ‘खाली जमीन वर आकाश’ व ‘आत्मस्वर’ ही चरित्रात्मक पुस्तकं नक्कीच वाचावीत.


हेही वाचा : राज्याच्या सांस्कृतिक धोरणाचे पुनर्वाचन करा...! - सुनीलकुमार लवटे


बारसं नाही, अनाथ असल्यानं हट्ट करायला आई आणि वडिलही नाहीत. क्रिकेट, लपाछपी, सुरपारंब्या असं काहीही वाट्याला न आलेलं बालपण जेव्हा तरुणपणाकडं झुकलं तेव्हाही तीच स्थिती. अशाही स्थितीत स्वत:ची ओळख, अस्तित्व निर्माण करत सुरु राहिलेला सरांचा जीवनप्रवास वरील दोन्ही आत्मकथनात वाचताना वाचकांना कमालीचा प्रभावित करत राहतो. आपल्या आत्मकथनाच्या मनोगतात ते म्हणतात, “माझ्या जीवनात आक्रोश, आक्रस्ताळेपणा, आरोप यांना बगल देत नेहमीच मी रचनात्मक मार्ग धरत आलोय.” जन्मानंतर माणूस धर्म, जात, वर्ण घेऊनच जगात येतो. मात्र या जगात प्रवेश केला तेव्हा त्याला धर्म, जात ज्ञात नसल्यानं या मनोगतात ते पुढे म्हणतात, “माझं जगणं सवर्ण-अवर्णतेच्या पलिकडचं आहे. हे आत्मकथन रक्तसंबंध, जातपंचायत, धर्मसभा, संस्कारादि पारंपारिकतेस भेदून घेतलेला माणूसपणाचा वेध आहे.”

आज अनेक ठिकाणी भावंडांमध्ये वाटणी होते, या वाटणीत संपत्तीचा वाटा कमी आला म्हणून हा वाद कोर्टात जातो. सरांच्या वाट्याला तर आई, वडिलच नव्हते, तरीही आयुष्याला कधीच नावं ठेवत ते जगले नाहीत. जन्म दिल्यानंतर काही क्षणातच आपल्यापासून कायमचं तोडून निघून जाणाऱ्या मातेबद्दल आजतागायत त्यांच्या तोंडून एकदाही रागानं वा त्राग्यानं शब्दोच्चार झाला नाही. याउलट ते असं म्हणतात, “जन्म देणारी माता एकदा तरी भेटायला हवी होती, तिच्या चरणाला मला स्पर्श करता आला असता.” किती हा मोठेपणा, उदात्त भाव! माझे मार्गदर्शक डॉ. गिरीश काशिद सर परवा भेटले, तेव्हा एक प्रसंग त्यांनी सांगितला, तो मुद्दामच वाचकांसमोर ठेवतो... लेखक उत्तम कांबळे व लवटे सर हे खूप जुने मित्र व स्नेही. कांबळे सरांनी ‘आई समजून घेताना’ हे पुस्तक लिहिलं. सवयीप्रमाणं ते पुस्तक त्यांनी लवटे सरांकडे पाठवलं, आणि त्यांनी पुस्तकावर लिहावं अशी अपेक्षा व्यक्त केली. तेव्हा लवटे सर त्यांना इतकंच म्हणाले की, “उत्तम, आई नसलेल्या माणसाला आईवर लिहायला लावतोयस तू.” यात त्रागा नव्हता पण हे वाक्य विलक्षण वेदनादायी होतं. पोटी मतिमंद मुलगी असतानाही उमाताईंनी लवटे सरांना छातीशी कवटाळलं, आईची माया दिली. एक आई मुलासाठी जे जे काही करते ते सारं उमाताईंनी अगदी मनापासून केलं. अखेरपर्यंत या आईची सेवा करण्यातही ते कुठेच कमी पडले नाहीत. 

शिक्षण, साहित्य, संशोधन, वस्तुसंग्रहालय निर्मिती, भाषांतर, संपादन, महिला व बालविकास, मानवाधिकार व सामाजिक न्याय आदि क्षेत्रांत डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी केलेलं काम थक्क करणारं आहे. या जगात वरचं ‘आभाळ’ आणि खालची ‘जमीन’ या शिवाय कोणीही जवळचं नसतानादेखील स्वत:च्या आयुष्याचा कुंभार स्वत:च होत त्याला आकार देण्याचं काम त्यांनी केलं. सोबतच कितीतरी माणसांच्या, माझ्यासारख्या कितीतरी विद्यार्थ्यांच्या जीवनात ध्येयवाद निर्माण करण्याचं महत्त्वाचं कर्तव्य पार पाडलं.

जाता जाता एक आठवण सांगेन आणि हा लेखनप्रपंच विरामाकडं नेईन. वाचन कर असं सतत सांगत असताना सर मला एकदा असं म्हणाले होते की, ‘भवतालाची निरीक्षणं करत राहा. तुझं लेखन, तुझी भाषा आणखी परिपक्व होण्यासाठी पुस्तकांसोबत काही चांगली मासिकंसुध्दा वाचत राहा. सर्व प्रकारचं वाचन कर.’ त्यांनी सुचवल्यामुळेच मी ‘साधना’चा वर्गणीदार झालो. त्यांचा सहज संवादसुद्धा दिशादर्शक राहिला आहे. 

आजपर्यंत जे काही दिलं ते या समाजानं दिलं हा विचार कधीही त्यांनी अडगळीला पडू दिला नाही. म्हणूनच जेवढे काही रोख रकमेचे पुरस्कार मिळाले ते स्वतःकडे ठेवले नाहीत. राज्यातील ग्रंथालये, अनाथाश्रम, सामाजिक संस्था आदिंना या रोख रकमा देऊन ते रिकामे झाले. पुरस्कार, रकमा व रॉयल्टी हे समाजसंकल्पित असतात असं त्यांचं म्हणणं आहे. 

‘असे जे आपणापाशी असे, जे वित्त वा विद्या सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे’ साने गुरुजींच्या या कवितेप्रमाणे ते जीवनाला आकार देत गेले. 

वर्ग अन वर्णभेदाच्या काळात एका अनाथ मुलाने असं उभं राहणं सोपं नाही. मात्र लवटे सरांनी ते सोपं करून दाखवलं, कारण मागून येणाऱ्याला पुन्हा ते अवघड वाटू नये. जीवन जगण्याची विजिगीषु वृत्ती असली की, संकटाची भीती कमी होऊन जगण्याबद्दलचं आकर्षण वाढतं याचं स्मरण त्यांनी कायम ठेवलं. 

हिंदी, मराठी साहित्यवर्तुळात आज डॉ. सुनीलकुमार लवटे यांचा असलेला नावलौकिक अभिमान वाटावा असा आहे. माणसाची वृत्ती स्वार्थी असण्यापेक्षा ती निवैर व उदात्त मनोवृत्तीची असावी, हा सरांचा विचार घेऊन माझ्यासारखी कितीतरी माणसं आजपर्यंत घडत राहिली, पुढं आणखी घडत राहतील.

- सचिन म. वायकुळे, बार्शी
sachinwaykule1000@gmail.com 

Tags: सुनीलकुमार लवटे मराठी साहित्य भाषा साहित्यिक वि. स. खांडेकर लक्ष्मणशास्त्री जोशी संपादन प्राज्ञ पाठशाळा Load More Tags

Comments:

Shrikant Kamble

आदरणीय सुनीलकुमार लवटे सरांचे व्यक्तीमत्व, त्यांचं बालपण, कौटुंबिक जीवन ते समाज जीवनातील त्यांचा विस्तार लेखातून चितारला आहे. सरांचा सहवास मलाही लाभला. सरांची संवादशैली, संवादातील ओलसरपणा मी अनेकदा जाणला. सचिन सरांचा लेख वाचताना सरांचा संघर्षशील जीवनाची पायवाट अधिकच भावली. ज्येष्ठ संपादक अरुण खोरे सर व कोल्हापूरचा मित्र विवेक वैजापूरकर यांच्यामुळे लवटे सरांकडे मी आकर्षित झालो. कोल्हापूर लोकमतमध्ये असताना १९९९ मध्ये सरांची माझी पहिली भेट झाली. १९९५ मध्ये शिवाजी विद्यापीठात शिकत असताना काही हिंदी विषयाच्या अभ्यासक मित्रांकडून त्यांच्या कामाची ओळख झाली. सोलापुरात सर आल्यानंतर त्यांना ऐकणं. त्यांचे समाज विशेषता मुलांच्या प्रश्नांविषयीचे विचार जाणून घेणं म्हणजे बौध्दिक पर्वणीच. सरांचे कोल्हापूरच्या बालगृहातील काम बालगृहात प्रत्यक्ष भेट देऊन जाणून होतो. त्यांच्यामुळेच विशेष मुलांच्या प्रश्नांना माध्यमातून आवाज देण्याचा प्रयत्न केला. सरांना खूप खूप शुभेच्छा....

प्रसन्न देशपांडे

आदरणीय व्यक्तीवर उत्तम लिखाण.

Add Comment

संबंधित लेख