`कर्मयोगी बसवण्णा` हे पुस्तक राजाभाऊंच्या प्रवासाचं मूर्तरूप आहे. त्यांच्या निधनानंतर हार न मानता मीनाताईंनी मोठ्या कष्टाने राजाभाऊंच्या लिखाणाला ग्रंथरूप दिलं. साहित्य संस्कृती मंडळाने ते अल्पदरात म्हणजे अवघ्या 134 रुपयांत उपलब्धही करून दिलं. अल्पावधीत त्याला जोरदार प्रतिसादही लाभलाय. राजाभाऊंच्या चिंतनाचं सार या पुस्तकात आहे. बसवण्णांवर आलेल्या मराठीतल्या पुस्तकांतलं सर्वात महत्त्वाचं पुस्तक असं त्याचं वर्णन करायला हवं, इतकं ते महत्त्वाचं आहे. दिवाळीत 19 ऑक्टोबरला कोल्हापुरातल्या शाहू स्मारक सभागृहात डॉ. बसवलिंग पट्टदेवरू यांच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालं. राजाभाऊंचे अनेक मान्यवर मित्र आवर्जून उपस्थित होते. उद्या 1 नोव्हेंबरला राजाभाऊंच्या गावात म्हणजे आजऱ्यालाही त्याच्या प्रकाशनाचा कार्यक्रम होतोय.
2012 पासून दर आषाढी एकादशीला रिंगण नावाचा अंक करत आलोय. त्यात दरवर्षी एका संतांचा सामाजिक सांस्कृतिक अंगाने सांगोपांग मागोवा घेण्याचा प्रयत्न करत असतो. यात आतापर्यंत 13 वारकरी संतांवर अंक आलेत. वारकरी संतांशिवाय इतर संतपरंपरा, त्यातही महाराष्ट्राबाहेरच्या संतांचा शोध घेण्यासाठी आषाढी अंकाबरोबरच दरवर्षी कार्तिकी एकादशीचाही अंक काढावा असं ठरलं. मागच्या वर्षी पहिला कार्तिकी अंक महात्मा बसवेश्वरांवर केला. यंदा महानुभाव मार्गाचे प्रवर्तक सर्वज्ञ चक्रधरांवर अंक करायचं ठरवलंय. पण तो अंक यंदाच्या कार्तिकी एकादशीला म्हणजे परवा २ नोव्हेंबरला काही प्रकाशित होत नाहीय. कारण त्यासाठीचा अभ्यासच पूर्ण झालेला नाही. अजून बेसिक वाचनच सुरू आहे. काम झालं की तो अंक येईलच आणि तो येईल ती आपली कार्तिकी एकादशी, असं स्वतःचं समाधान मानायचं ठरवलंय.
वाचनामुळे वारकरी संतांची पार्श्वभूमी माहीत होती, त्यामुळे फारशी अडचण कधी आली नाही. पण आता चक्रधर स्वामींच्या अंकाच्या वेळेस जो उशीर होतोय, तसा खरंतर गेल्या वर्षीच बसवण्णांच्या अंकाला व्हायला हवा होता. तसं काहीच झालं नाही. अगदी एका बैठकीत अंकाचा आराखडा तयार झाला आणि दोनेक महिन्यांत अंकही. आता विचार करताना लक्षात येतं, त्याचं कारण होते राजाभाऊ शिरगुप्पे. बसवण्णांच्या लिंगायत परंपरेविषयी त्यांनी इतकं पेरून ठेवलं होतं की सगळी पार्श्वभूमी तयारच होती. म्हणूनच रिंगणचा पहिला कार्तिकी विशेषांक राजाभाऊंना अर्पण केला होता. त्यात राजाभाऊंचा एक जुना लेखही शोधून घेतला होता. अंक छान झाला. उत्तम प्रतिसाद मिळाला. पण हा अंक बघायला राजाभाऊ असायला पाहिजे होते, अशी कायमची रुखरुख लागून राहिली.
आज 31 ऑक्टोबर. राजाभाऊंना जाऊन दोन वर्षं झाली. 63-64 हे राजाभाऊंचं वय तसं जाण्याचं नव्हतं. मनस्वी जगण्यामुळे तब्येतीकडे दुर्लक्ष झालं होतं. डायबिटीसने हळूहळू शरीर पोखरल्याचं आजऱ्याला झालेल्या शेवटच्या दोन भेटींमध्ये जाणवलं होतं. तेव्हा त्यांना नीट दिसत नव्हतं. त्यांच्या पत्नी प्रा. मीनाताई मंगळूरकर या त्यांच्या आधार बनल्या होत्या. तरीही राजाभाऊ जातील, असं चुकूनही मनात आलं नव्हतं. त्यांचं जगण्यावरचं प्रेमच तितकं अफाट होतं. आणि बसवण्णांवरचं त्यांचं पुस्तकही शेवटच्या टप्प्यात होतं.
प्रत्यक्ष किंवा फोनवर त्यांच्याशी बोलणं व्हायचं तेव्हा या बसवण्णांच्या पुस्तकाचा विषय असायचाच. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ हे पुस्तक करणार, याचा आनंद होताच. डॉ. बाबा भांड यांनी साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष असताना हा प्रकल्प राजाभाऊंना दिला होता. आताचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी त्याला मुदतवाढही दिली होती. राजाभाऊ एका दशकापेक्षा जास्त काळ या पुस्तकावर काम करत होते. त्यात रस असणार्या माझ्यासारख्यांशी भरभरून बोलत होते. त्यांच्या स्वभावाप्रमाणे पुस्तक रखडलं होतं. पण मीनाताईच राजाभाऊंचे डोळे आणि हात बनल्या होत्या. पुस्तक लिहिण्याचं काम जवळपास संपलंय असं राजाभाऊ सांगत होते.
राजाभाऊ गेल्याची बातमी आली, तेव्हा त्याचा मोठा धक्का बसला. बराच वेळ सुन्न झालो. काळाने आपल्या जगण्यातूनच काहीतरी कायमचं काढून घेतलंय, अशी भावना होती. एकीकडे अस्वस्थ असतानाच पुस्तकाचं काय झालं असेल, असा प्रश्नही त्याच क्षणी समोर आला. कारण माझ्यासारख्या राजाभाऊ आणि बसवण्णा दोघांवरही प्रेम करणाऱ्यांसाठी हे पुस्तक फारच महत्त्व होतं. हे पुस्तक मराठी संस्कृतीतली एक पोकळी भरून काढणार होतं. बसवण्णांच्या कर्तृत्वाचा समग्र मागोवा घेणारं पुस्तक मराठीत यायलाच हवं होतं आणि ते फक्त राजाभाऊच लिहू शकत होते.
बसवण्णांवर मराठीत लिहिलं गेलेलं नाही, असं नाही. बसवण्णांवर मराठीत बरीच छोटी मोठी पुस्तकं आलीत. त्यांच्या वचनांचे अनुवादही झालेत. तरीही राजाभाऊंचं बसवण्णांवर स्वतंत्र चिंतन होतं. त्यांच्यापाशी देशभरातल्या सांस्कृतिक वर्चस्ववादाच्या विरोधात झालेल्या सर्व संघर्षांचं सम्यक आकलन असल्यामुळे हे पुस्तक बसवण्णांचा आजच्या संदर्भात शोध घेईल, याची खात्री होती.
शोधयात्रा हा राजाभाऊंचा स्थायीभाव होता. ईशान्य भारत किवा ग्रामीण महाराष्ट्राची त्यांची शोधयात्रा पुस्तकरूपाने आली. पण त्यांनी न लिहिलेल्याही अनेक शोधयात्रा होत्या. ते चांगल्याचा शोध घेत झपाटल्यासारखे भटकत राहत. कधी विदर्भात, तर कधी बिहारमध्ये. एकदा घुसले की पुढे पुढे जात राहत. मग त्यांना कसलीच तमा नसे, स्थळकाळाची नाही, आणि घरदाराचीही नाही. ते एकदा कर्नाटकात गेले. तिथे बसवण्णांनी त्यांना भारावून टाकलं. ते बसवण्णांच्या शोधात गावोगावी फिरले. अनेकांना भेटत राहिले. त्यात धारवाडला एम.एम. कलबुर्गी सरांपासून कोल्हापूरच्या बी.एम. पाटील सरांपर्यंत अनेक तपस्वी अभ्यासक होते. ते कर्नाटकातून परत आले बसवण्णांचा विद्रोह सोबत घेऊनच. अर्थात हा इतकाच प्रवास नव्हता. ती एक प्रोसेस होती.
राजाभाऊ बर्थ सर्टिफिकेटच्या रूढ अर्थाने लिंगायत. पण चळवळीतल्या माणूसपणाच्या शोधात जात धर्म स्वाभाविकपणे सुटलं. राजाभाऊ लिहितात तसं ते वयाची पन्नाशी गाठेपर्यंत प्रस्थापित धर्माच्या अनुभवातून कट्टर धर्मविरोधी झाले होते. आधी कॉ. कृष्णा मेणसे यांचं `बसवेश्वर ते ज्ञानेश्वर` हे पुस्तक आणि नंतर कलबुर्गी सरांची भेट यामुळे बसवण्णा त्यांच्या जाणीव नेणीवेचा भाग बनले. `बसव चिकटला पारंबीला.` ते विद्रोही चळवळीतल्या आपल्या मित्रांना सांगू लागले, बसवण्णांचा विचार समजून घेतला नाही, तर आपला विद्रोह पूर्णच होणार नाही.
मग ते हट्ट करून मित्रांना बसवण्णांच्या गावांमध्ये घेऊन गेले. लिंगायत चळवळीचं वाङ्मय वाचवण्यासाठी बसवण्णांच्या सहकाऱ्यांनी – शरणांनी – बसवकल्याण ते उळवी असा प्रवास केला होता. त्या प्रवासात केलेला सशस्त्र संघर्ष राजाभाऊंना कायम आकर्षून घेत असे. त्याला ते मानवी इतिहासातला पहिला लाँग मार्च म्हणत. त्याचा शोध घेत ते मित्रांसह त्या वाटेवरून अनेकदा फिरले होते. चळवळीतल्या मित्रांना घेऊन त्यांनी यात्रा काढल्या. शिबिरं घेतली. त्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी या सगळ्याचं सार विद्रोहीच्या बसवण्णा विशेषांकात मांडलं. भालकीच्या हिरेमठ संस्थानचे प्रमुख डॉ. बसवलिंग पट्टदेवरू आणि डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या उपस्थितीत त्याचं प्रकाशन झालं. तोवर बसवण्णांचं चरित्र आणि साहित्य काही प्रमाणात मराठीत आलं होतं. मात्र त्यातला विद्रोह मराठीत आला नव्हता. ही एका अर्थाने त्या प्रवासाची सुरवात होती.
`कर्मयोगी बसवण्णा` हे पुस्तक राजाभाऊंच्या प्रवासाचं मूर्तरूप आहे. त्यांच्या निधनानंतर हार न मानता मीनाताईंनी मोठ्या कष्टाने राजाभाऊंच्या लिखाणाला ग्रंथरूप दिलं. साहित्य संस्कृती मंडळाने ते अल्पदरात म्हणजे अवघ्या 134 रुपयांत उपलब्धही करून दिलं. अल्पावधीत त्याला जोरदार प्रतिसादही लाभलाय. राजाभाऊंच्या चिंतनाचं सार या पुस्तकात आहे. बसवण्णांवर आलेल्या मराठीतल्या पुस्तकांतलं सर्वात महत्त्वाचं पुस्तक असं त्याचं वर्णन करायला हवं, इतकं ते महत्त्वाचं आहे. दिवाळीत 19 ऑक्टोबरला कोल्हापुरातल्या शाहू स्मारक सभागृहात डॉ. बसवलिंग पट्टदेवरू यांच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालं. राजाभाऊंचे अनेक मान्यवर मित्र आवर्जून उपस्थित होते. उद्या 1 नोव्हेंबरला राजाभाऊंच्या गावात म्हणजे आजऱ्यालाही त्याच्या प्रकाशनाचा कार्यक्रम होतोय. साधनाचे संपादक विनोद शिरसाठ, कवी आणि कादंबरीकार प्रवीण बांदेकर उपस्थित असणार आहेत.
या पुस्तकाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे राजाभाऊ हे कार्यकर्ता असूनही त्यांनी संशोधक म्हणून अत्यंत तटस्थपणे केलेली मांडणी. कार्यकर्ता लिहिताना बहुतेक वेळेस चळवळीसाठी आपलं लिखाण कसं उपयुक्त ठरेल, याचाच विचार करतो. त्यात तथ्यांची तोडमोड होते. चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी लिखाणात आवेश भरला जातो. विशेषणांची खैरात होते. पण राजाभाऊ या मोहापासून कटाक्षाने दूर राहिले आहेत. हे पथ्य फारच कठीण होतं. बसवण्णांच्या आय़ुष्यात दोन प्रसंग असे आहेत की जेथे भलेभले वाहून जातात. पहिला प्रसंग बालपणी मुंज नाकारण्याचा. दुसरा उत्तर आयुष्यातला कल्याणमध्ये अनुभव मंटपात आंतरजातीय लग्न घडवून आणण्याचा. दोन्ही घटना काळाच्या प्रचंड पुढच्या आहेत. पुरोगामी दृष्टीने बसवण्णांचं चरित्र लिहिताना या दोन्ही घटनांना फारच रंगवून सांगितलं जाणं सहाजिक आहे. पण राजाभाऊ फक्त संदर्भसाधनांची शहानिशा करत तथ्याशी इमान राखतात.
या पुस्तकात मुख्य पाच प्रकरणं आहेत. पहिल्या तीन प्रकरणांत बसवण्णांचा काळ समजावून सांगितला आहे. माणूस हे एका अर्थाने सभोवतालच्या परिस्थितीचं अपत्य असतं. त्यामुळे बसवण्णांच्या उदयाच्या आधीची सगळी परिस्थिती, त्या काळाचा इतिहास, समाजस्थिती, राज्यव्यवस्था आणि प्रस्थापित सांप्रदायिक तत्त्वज्ञान याची चर्चा या तीन प्रकरणांत केलेली आहे. राजाभाऊंनी बारकाईने सामाजिक परिस्थितीचे कंगोरे बारकाईने मांडले असल्यामुळे पुढे बसवण्णांच्या कार्याचं मोठेपण आपल्याला नीट उमगत जातं.
चौथं प्रकरण बसवण्णांचं चरित्र सांगतं. या प्रकरणाचं उपशीर्षक आहे, ‘पौराणिकतेच्या धुक्यात दडलेला इतिहास’. वारकरी संतपरंपरेत संतांची स्वतंत्र चरित्रं लिहिण्याची परंपरा जवळपास नाहीच. त्या तुलनेत लिंगायत आणि महानुभाव परंपरेत ती आहे. बसवण्णांच्या आत्मसमर्पणानंतर आणि चक्रधर यांच्या उत्तरपंथे गमनानंतर काही दशकांतच त्यांची चरित्रं आलेली दिसतात. पण बसवण्णा आणि त्यांच्या शरण सहकाऱ्यांची चरित्रं पुराणं म्हणून आलेली आहेत. त्यातून साकल्याने इतिहास शोधण्याचं काम राजाभाऊंनी केलंय. पण हे प्रकरण अधिक सविस्तर असायला हवं होतं. विशेषतः कल्याणमधल्या प्रतिक्रांतीचा इतिहास मराठी माणसाला राजाभाऊंनी समजावून सांगण्याची गरज होती.
पाचवं प्रकरण महत्त्वाचं आहे. त्यात बसवण्णांच्या शरण तत्त्वज्ञानाचा सामाजिक अंगाने परिचय करून दिला आहे. कलबुर्गी सरांनी केलेल्या मांडणीचा यावरचा प्रभाव अगदी उघड आणि स्वाभाविक आहे. राजाभाऊंची वैचारिक मांडणी अनेकदा क्लिष्ट असायची. अगदी त्यांच्या कवितेतली वैचारिक मांडणीही नव्या वाचकासाठी अवघड आहे. पण इथे मात्र ते बसवण्णांचा विचार सोप्या शब्दांत समजावून सांगतात. लिंगायत तत्त्वज्ञानातल्या संकल्पना उलगडून सांगतात. त्यामुळे बसवण्णांविषयी माहिती नसलेल्या वाचकांबरोबरच लिंगायत परंपरेचे पाईक असणाऱ्यांसाठीही हे प्रकरण महत्त्वाचं आहे.
हेही वाचा - प्रिय राजाभाऊ, (सतीश देशपांडे लिखित राजा शिरगुप्पे यांच्याविषयीचा स्मरणलेख)
चर्मकार हरळय्यांचा मुलगा आणि ब्राह्मण मंत्री मधुवरसाची मुलगी यांचा आंतरजातीय लग्न अनुभवमंटपात लावल्यानंतर सनातन्यांनी राजसत्तेला शरणांच्या कत्तली करायला लावल्या. त्यानंतरचा संघर्षाचा इतिहास हा प्रेरणादायी आहेच. तेव्हापासून आतापर्यंतचा लिंगायत चळवळीच्या ब्राह्मणीकरण – वैदिकीकरण – वीरशैवीकरणाचा इतिहास डोळ्यांत अंजन घालणारा आहे. शिवाय विसाव्या शतकात झालेलं पुनर्जागरण आणि त्यापाठोपाठ लिंगायत स्वतंत्र धर्म मान्यतेसाठी झालेला संघर्षही महत्त्वाचा आहे. याविषयी राजाभाऊंचा स्वतंत्र अभ्यास आणि चिंतन होतं. मात्र हा विषय पुस्तकात कसाबसा दीड पानांत येतो. त्यांचा आवडता शरण लाँग मार्चही एका परिशिष्टापुरताच येतो. राजाभाऊंना पुस्तक लिहिताना तब्येतीमुळे आलेल्या अडचणींमधून हे घडलं असावं.
या पुस्तकातली परिशिष्टं आणि आमुख हे मनोगतही त्यातल्या मुख्य प्रकरणांइतकंच महत्त्वाचं आहे. या पुस्तकात राजाभाऊंनी बसवण्णांची 432 वचनं मराठीत दिलेली आहेत. या पुस्तकात ती असणं फारच मोलाचं आहे. पुस्तकातली सगळ्या मांडणीला त्यामुळे एक भक्कम वैचारिक अधिष्ठानच मिळालेलं आहे. बसवण्णांच्या सहकाऱ्यांची यादी, बसवण्णांच्या जीवनातल्या गावांची माहिती आणि त्याचे फोटो परिशिष्टातून येतात.
ब्लर्बमध्ये राजाभाऊंनी पुस्तकाचं सार मांडलं आहे. ते असं, `मध्ययुगामध्ये पारंपरिक लोकमानसाची जाणीव ठेवून, लोकांच्या भाषेत पारंपरिक पद्धतीने आलेली उदाहरणे घेऊन, गौतम बुद्ध आणि कार्ल मार्क्स या दोघांचे विज्ञाननिष्ठ वैचारिक सेतुबंधन एका महामानवाने केले ते म्हणजे कर्मयोगी बसवण्णा! हे सेतुबंधन भूतकाळ व भविष्यकाळ यांना जोडणारे होते. या माणसाचे विचार बाह्यतः पारंपरिक भाषेत मांडले असल्यामुळे चुकीच्या पद्धतीने आकलन करून घेऊन त्यांना गैरसमजुतीच्या कक्षात ढकलले जायची शक्यता आहे आणि तसे बऱ्याच वेळा झालेलेही आहे. पण बसवण्णा समजून घ्यायचे म्हणजे विचारवंत जेव्हा लोकहिताच्या दृष्टीने आपल्या भूमिकेची मांडणी करतो, तेव्हा तो कशी करतो आणि कशा पद्धतीने लोकांना संघटित करतो, आणि आपल्या विचारांकडे प्रगतशील करतो, हे अनुभवणे. ते अतिशय कौतुकाचे आणि अभ्यासनीय आहे.`
राजाभाऊंनी बसवण्णा आणि त्य़ांच्या सहकारी शरणांनी लिहिलेल्या काव्याचा परिचय करून देताना म्हटलंय की, वचनसाहित्यामध्ये वचन आणि रचना असे दोन शब्दप्रयोग आढळतात. कवीचं आचरण कसंही असो, त्यांची काव्यनिर्मिती सुंदर असेल तर त्याला रचना म्हणतात. परंतु सुंदर आचरण असणाऱ्याची सुंदर रचना म्हणजे वचन होय. याच संदर्भात सांगायचं तर राजाभाऊंचं पुस्तक ही फक्त एक साहित्यरचना नाही. जात, पात, धर्म, लिंग याच्या सगळ्या ओळखी ओलांडून राजाभाऊ एक मनस्वी माणूस म्हणून जगण्याचा प्रयत्न करत होते. चांगुलपणाविषयीचं त्यांचं कुतुहल कायम त्यांच्यातल्या निरागस हट्टीपणाला जिवंत ठेवत होतं. त्यांचा विद्रोह न पेटलेल्य़ा दिव्यांविषयीच्या करुणेतून जन्माला आलेला असल्यामुळे तो कोरडा झाला नाही, तर सतत सर्जनशील राहिला. त्यांच्या विचारांची लोकाभिमुखता कधीही ओसरली नाही. त्या सगळ्याचं प्रतिबिंब 'कर्मयोगी बसवण्णा' या पुस्तकात सापडतं. वचनांमधल्या तत्त्वज्ञानाचं पुस्तक स्वतःच बसवण्णांचा विचार सांगणारं एक वचन बनतं.
- सचिन परब, मुंबई
ssparab@gmail.com
(लेखक पत्रकार असून आषाढी कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने प्रसिद्ध होणाऱ्या 'रिंगण' या संतसाहित्यविषयक वार्षिक अंकाचे संपादक आहेत.)
राजा शिरगुप्पे यांनी कर्तव्यसाधना साठी लिहिलेले सर्व लेख येथे वाचा.
Tags: राजाभाऊ शिरगुप्पे महाराष्ट्र राज्य साहित्या संस्कृती मंडळ बसवेश्वर बसवण्णा लिंगायत कर्मयोगी बसवण्णा शरण मीना शिरगुप्पे विनोद शिरसाठ सचिन परब रिंगण संत साहित्य कार्तिकी आषाढी Load More Tags
Add Comment