मुंबईच्या काही घटना...

फोटो: कर्तव्य साधना

पन्नास आणि साठच्या दशकामध्ये ज्या बंडखोर लेखकाला आणि त्याच्या कथांना तरुण पिढीने डोक्यावर घेतले होते, त्या 'विवादित' लेखकाचा काल (11 मे) जन्मदिवस होता. हा लेखक म्हणजे सआदत हसन मंटो. बू, खोल दो, ठंडा गोश्त सारख्या लघुकथा आणि टोबा टेकसिंह सारख्या चर्चित कथांमुळे मंटोने तत्कालीन समाजात खळबळ उडवून दिली. उर्दू हिंदीतील कथाकार म्हणून प्रसिद्धी पावलेले मंटो सिनेमा व रेडियो  पटकथा लेखक आणि पत्रकारही होते. 11 मे 1912 ते 18 जानेवारी 1955  अशा अवघ्या बेचाळीस वर्षांच्या आयुष्यात मंटो यांनी बावीस लघुकथा संग्रह, एक कादंबरी, रेडियो नाटकांचे पाच संग्रह, तीन निबंधसंग्रह आणि दोन व्यक्तीचित्रणाचे संग्रह इतके विविधांगी लेखन केले.

विवादित आणि अश्लील लेखनाच्या आरोपावरून मंटोवर सहा वेळा (स्वातंत्र्यापूर्वी तीनवेळा आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पाकिस्तानात तीनवेळा) खटले दाखल झाले आणि सगळ्यांमधून त्यांची सुटका झाली. 1942 मध्ये लाहोरमधून प्रकाशित झालेले 'मंटो के मज़ामिन' (मंटोचा लेखसंग्रह) हे त्यांच्या अगदी सुरुवातीच्या पुस्तकांपैकी एक पुस्तक. यामध्ये त्यांच्या विविध विषयांवरील लेखांचा समावेश होता. याच संग्रहातील 'बातें' हे शीर्षक असलेला व मुंबई, हिंदू- मुसलमान संबंध, तत्कालीन राजकारण यांवर कटाक्ष टाकणाऱ्या लेखाचा हा अनुवाद.

मुंबईला आलो होतो. वाटलं काही दिवस जुन्या मित्रांसोबत घालवूया आणि थकलेल्या मेंदूला थोडी विश्रांती देऊया, पण इथे आल्याबरोबर मला असे काही धक्के बसले की माझी रात्रीची झोपही हराम होऊन गेली.  

राजकारणात मला काडीचा रस नाही. नेते आणि औषधनिर्माते मला एकाच माळेचे मनी वाटतात. नेतागिरी आणि औषधनिर्मिती हे दोन्ही व्यवसाय आहेत. नेते आणि औषध निर्माते, दोघेही एक दुसऱ्याच्या उपायांचा उपयोग करत असतात. असो. मला सांगायचे हे आहे की राजकारणात मला तितकाच रस आहे जितका गांधीजींना सिनेमामध्ये. गांधीजी सिनेमा बघत नाहीत तर मी वर्तमानपत्र वाचत नाही. खरं तर आम्ही दोघेही चूक करतोय. गांधीजींनी सिनेमा जरूर पाहायला हवा आणि मी वर्तमानपत्र जरूर वाचायला हवे.

असो. तर मी मुंबईला पोहोचलो. बाजार तेच होते, गल्ल्याही त्याच होत्या, ज्या मातीवर पाच वर्षे माझी पाऊले उमटत होती. मुंबईसुद्धा तीच होती, जिथे हिंदू- मुसलमानांच्या दोन दंगली मी पाहिल्या होत्या. हे तेच सुंदर शहर होते, ज्यामध्ये मी कित्येक निष्पाप मुसलमानांच्या आणि हिंदूंच्या रक्ताच्या चिळकांड्या उडताना पाहिल्या होत्या. ही तीच जागा होती जिथे कॉंग्रेसने दारूबंदीचा कायदा पास करून ताडी काढणाऱ्या त्या हजारो मजुरांना बेरोजगार केले होते. बारा-बारा तास पाण्यात राहून काम करणाऱ्या व रात्री अंगात उर्मी यावी म्हणून विषारी स्पिरीट पिणाऱ्या धोब्यांना मी पाहिले ते इथंच... ही तीच नगरवधू होती जिच्या पदराची एक बाजू मखमलीची तर दुसरी गोणपाटाची होती. ही तीच मुंबई होती जिथे उंच उंच सुंदर इमारतींच्या पायाशी असलेल्या पदपथांवर हजारो जीव रात्री निजत असत.

मी एका बाईला बसमध्ये चढताना पाहिलं, पुन्हा पाहिलं... यावेळी जरा निरखून पाहिलं. आह, त्या पाणीदार डोळ्यांभोवती तयार झालेल्या वर्तुळांच्या रूपाने सत्यच माझ्या समोर होते. मी तिला विचारलं (तिचं नाव मात्र सांगणार नाही) ‘हे काय झालंय तुला...?’ मी त्या मुलीला दिल्लीमध्ये पाहिलं होतं. मुघलांच्या दिल्लीत ज्यांना मकबरे (थडगी) बनवण्याचा भलताच शौक होता. किती भोळी-भाबडी होती. केवळ दहाच महिन्यांपूर्वी ती किती निरागस होती. मी इतका घाबरायचो की तिच्याशी बोलूही शकायचो नाही. तिला पाहताच माझ्या मनात एक प्रकारचा आदरभाव उत्पन्न व्हायचा. मात्र यावेळी मी तिला पाहिलं तेव्हा तिच्याबद्दल माझ्या मनात अशी कोणतीच भावना उत्पन्न झाली नाही. मी अगदी बेधडकपणे तिच्या खांद्यावर हात ठेवत तिला विचारलं, “सांग. कसं सुरुये आयुष्य.” तिच्या डोळ्यात अंधुक तेज पाहिलं आणि माझ्या लक्षात आलं की एकेकाळी कुठल्याशा मंदिरात तेवत असलेला हा दिवा आता बऱ्याच काळापासून कुण्या वेश्येच्या घरी जळतो आहे. बऱ्याच... अगदी बऱ्याच काळापासून. या मुंबईने किती मुलींना बायांमध्ये परावर्तीत केलं असेल? पावित्र्य जपणं गरजेचं असलं तरी पोटाची भूक भागवणंही आवश्यकच आहे. इथं मुंबईत आल्यावर कळतं की स्त्रियांना भूकही लागते.

या शहरात दोन दंगली पाहून झाल्या आहेत. दंगलीचं कारण तेच जुनं, मंदिर आणि मस्जिद... गाय आणि डुक्कर. मंदिर आणि मस्जिद विटांचा खच, तर गाय आणि डुक्कर, मांसाचा खच... यावेळी मात्र एक नवाच विवाद पाहायला मिळाला. हिंदू-मुस्लीम वाद नव्हे, गाय आणि डुकराचा वाद नव्हे, एका नव्या प्रकारचा वादंग, एक नवेच वादळ जे मुंबईवर तब्बल सहा दिवस घोंगावत होते.

एके दिवशी टेलीफोनवरून एका महाशयांनी मला सांगितले की रात्री कॉंग्रेसच्या सर्व नेत्यांना अटक करण्यात आली आहे, त्यात गांधीजींसमवेत कॉंग्रेसचे सदस्यही आहेत. मी म्हणालो, ठीक आहे बंधू, अटक केली गेली आहे तर ठीक आहे, या मंडळींची अटक आणि सुटका तर होतच असते. मी या घटनेने चकित वगैरे झालो नव्हतो. मात्र काही वेळाने आणखी एका मित्राने फोन केला तर शहरभर अराजक माजल्याचे कळले. पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे, गोळ्यांच्या फैरी झाडल्या आहेत. सेनेलाही पाचारण करण्यात आले आहे. बाजारात रणगाडे फिरत आहेत... दोन-तीन दिवस मला घरातून बाहेरही निघता आले नाही. मी वर्तमानपत्र वाचत आणि लोकांकडून याविषयीच्या बारीकसारीक गोष्टी ऐकत बसलो.

मुस्लीम लीग मस्जिद आहे तर कॉंग्रेस मंदिर आहे. लोकांना तरी असेच वाटते. वर्तमानपत्रंही असंच म्हणतात. स्वराज्य कॉंग्रेसला हवंय आणि मुस्लीम लीगलाही, दोघांचे मार्ग मात्र भिन्न आहेत. दोघे मिळून मिसळून काम करत नाहीत. कारण बांधणीचा विचार करता मंदिर आणि मस्जिद या दोहोंमध्ये कोणतेच साम्य आढळत नाही. मला वाटलं होतं की हा जो वाद सुरु आहे, त्यामध्ये हिंदू आणि मुसलमान एकमेकांच्या बोकांडी बसतील आणि यांच्या रक्ताचे मिलन जे मंदिर आणि मस्जीद यांमध्ये झालं नाही, ते मोऱ्या आणि गटारांत होईल. मात्र मी चकित झालो, जेव्हा माझा हा अंदाज साफ चुकीचा ठरला.  

माहीमकडे एक लांब रस्ता जातो. रस्त्याच्या शेवटच्या टोकाला मुसलमानांची एक प्रसिद्ध दर्गा आहे. हे थडगे पूजक मुसलमान तसे प्रसिद्धच आहेत. दंगा सुरु झाला आणि शहरातील या भागाकडे पसरू लागला तेव्हा मुलांनी आणि लहानग्यांनी पदपथावरील झाडं तोडून बाजारात  ठेवायला सुरुवात केली, अडथळा म्हणून. तेव्हा एक मजेदार किस्सा घडला. काही हिंदू मुलं एक लोखंडी खिडकी दर्ग्याच्या दिशेने ओढत घेऊन जाऊ लागले. त्यावेळी काही मुसलमान त्यांच्याकडे आले आणि अगदी सौम्यपणे त्यांना म्हणाले, ‘ऐका मित्रांनो, इथून पाकिस्तान सुरु होतो.’ रस्त्यावर सीमा आखली गेली, त्यामुळे ती दंगाप्रेमी मुलं तो लोखंडी सापळा घेऊन निमूटपणे दुसरीकडे निघून गेली. म्हटलं जातं की ‘पाकिस्तान’कडे त्यानंतर एकाही ‘काफिराने’ नजर टाकली नाही.  

भेंडी बाजार मुसलमानांचा इलाका आहे. मात्र तिथं काहीच गडबड झाली नाही. हिंदू मुसलमान दंगलीत सगळ्यांत पुढे असणारे मुसलमान आता हॉटेलमध्ये चहाचे कप समोर ठेवून दंग्याच्या गप्पा करत आणि सुस्कारे टाकत असत. मी माझ्या एका मुसलमान मित्राला बोलताना ऐकले, ‘आमचे जिन्ना साहेब बघू आम्हाला कधी आदेश देतात ते.”

याच दंग्यांतील एक विनोद ऐका,  

एका रस्त्यावरून इंग्रज आपल्या मोटारीतून प्रवास करत होता. काही मंडळींनी त्याची मोटार थांबवली. इंग्रजाची भीतीने गाळण उडाली. त्याला वाटलं हे माथेफिरू लोक त्याच्यासोबत निर्दयीपणे काय करतील आणि काय नाही. मात्र त्याला धक्का बसला जेव्हा त्या मंडळींपैकी एकजण त्याला म्हणाला, ‘हे बघ, तुझ्या ड्रायव्हरला मागे बसव आणि तू स्वतः गाडी ड्राईव्ह कर... तू नोकर बन आणि त्याला तुझा मालक बनव.’  

इंग्रज मुकाट्याने पुढच्या सीटवर जाऊन बसला. गोंधळून गेलेला तो ड्रायव्हरही मागच्या सीटवर येऊन बसला. दंगेखोर एवढ्याशा गोष्टीने खुश झाले. तर स्वस्तात सुटलो म्हणून इंग्रजाचा जीवही भांड्यात पडला.   

मुंबईतील उर्दू भाषिक फिल्मी वर्तमानपत्राचे संपादक एके ठिकाणी चालत निघाले होते. बिलांची वसुली करायची म्हणून त्यांनी अंगात सूट वगैरे घातलेला होता. डोक्यावर हॅट होती. गळ्यात टाईसुद्धा होती. काही दंगेखोरांनी त्यांना अडवून विचारलं, ‘ ही हॅट आणि टाई आमच्या हवाली करा.’ घाबरून एडिटर साहेबांनी दोन्ही गोष्टी त्यांच्या हवाली केल्या आणि त्या लागलीच शेजारी भडकणाऱ्या आगीत फेकल्या गेल्या. यानंतर एकाने एडिटर साहेबांच्या सुटाकडे बघत म्हटलं, ‘हा सुद्धा इंग्रजीच आहे की, हा तरी का ठेवावा.’ आता काही खरं नाही या विचाराने एडिटर साहेबांची बोबडी वळाली आणि विनवणी करत ते लोकांना म्हणाले, ‘माझ्याकडे इतकाच एक सूट आहे जो घालून मी फिल्मी कंपन्यांमध्ये जातो आणि त्यांच्या मालकांना भेटून त्यांच्याकडून जाहिराती मिळवतो. तुम्ही हा सूट जाळून टाकला तर मी उध्वस्त होऊन जाईल. माझा सगळा बिजनेस बंद पडेल.   

एडिटर साहेबांच्या डोळ्यांतील अश्रू पाहून त्या लोकांनी पँट आणि कोट त्यांच्या अंगावर शाबूत राहू दिले.

मी ज्या मोहल्ल्यात राहतो, तिथे ख्रिस्ती अधिक संख्येने आहेत. प्रत्येक रंगाचे ख्रिस्ती. काळ्या फाम ख्रिस्तींपासून ते गोऱ्या चिट्ट्या ख्रिस्तींपर्यंत प्रत्येक शेड इथे मिळून जाईल. मी इथे जांभळ्या रंगाचे ख्रिस्तीही पाहिलेत, जे स्वतःला हिंदुस्तानातील फातिह वंशाचे म्हणजे इंग्रज समजतात.    

या दंगलीत या मंडळींची अवस्था वाईट झाल्याचं मी पाहिलं. दंग्याच्या बातम्या यायच्या तेव्हा पँटमध्ये पुरुषांचे आणि स्कर्ट्समध्ये स्त्रियांचे पाय लटलट कापायचे. जीवाच्या भीतीने पुरुषांनी हॅट वापरायचे बंद केले. टाई गळ्यापासून दूर केली. स्त्रियांनी स्कर्ट आणि फ्रॉक घालणे बंद केले आणि त्यांनी साड्या घालणं सुरु केलं.     

हिंदू- मुसलमान दंगलीच्या काळात जेव्हा काही कामानिमित्त आम्हाला बाहेर पडावे लागायचे तेव्हा आम्ही सोबत दोन टोप्या ठेवायचो. एक हिंदू टोपी, तर दुसरी रुमी टोपी. मुसलमानांच्या मोहल्ल्यात जाताना आम्ही रुमी टोपी घालायचो, तर हिंदू मोहल्ल्यात जाताना हिंदू टोपी घालायचो. यावेळी दंगलीत आम्ही गांधी टोपी खरेदी केली. या टोप्या आम्ही खिशातच ठेवायचो, आणि गरज पडताच लगेच डोक्यावर घालायचो. पूर्वी धर्म हृदयात असायचा, आता टोप्यांत असतो. राजकारण ही आता टोप्यांवर आले आहे... टोप्या जिंदाबाद!  

माझ्यासमोरील भिंतीवर एक घड्याळ लटकलेले आहे. इतक्यात त्याने बारा वाजवले आहेत. याचा अर्थ आता चार वाजले आहेत. चारची वेळ झाली की यात बारा वाजतील. यात बिघाड नक्कीच झाला आहे. आता विचार करू लागल्यावर मला या घड्याळात आणि आपल्या समाजात शंभर टक्के साम्य दिसू लागले आहे. घड्याळाप्रमाणेच त्यांच्या अंगातही काही बिघाड नक्कीच झाला आहे. घड्याळातील काट्यांप्रमाणे ते हालचाल तर अगदी व्यवस्थितपणे करत असतात, मात्र त्यांचे कृत्य आणि त्याचे बाह्य परिणाम यांमध्ये प्रचंड तफावत आढळते. अगदी या घड्याळाप्रमाणेच, जो ठीक बारा वाजता चार वेळा टन-टन करतो आणि चार वाजले की बारा वेळा टन-टन करतो.

(अनुवाद- समीर शेख)
- सआदत हसन मंटो

मूळ उर्दू लेखाचे शीर्षक: बातें
पुस्तक: मंटो के मज़ामिन
प्रकाशक: मक़तब ए उर्दू, लाहोर
प्रकाशन वर्ष: 1942

Tags:Load More Tags

Comments: Show All Comments

Dattaram Jadhav

ही कथा लहान असली तरी विचार करायला लावणारी नक्कीच आहे. मंटो सायबांचे पुस्तक पुन्हा वाचेन.ननक्कीच.

मदन शेलार

स्पष्टं मांडले आणखीन त्यांचं लिखाण वाचायला मिळावं

वासुदेव पाटील

मार्मिक लिखाण असते. काही वर्षांपूर्वी साधना साप्ताहिक मध्ये चंद्रकांत भोंजाळ यांनी अनुवाद केलेल्या मंटो च्या कथा आल्या होत्या .या कथा पुस्तकरूपाने यायला हव्यात .मं टो चे लिखाण मराठीत अनुवाद रूपाने यायला हवे .खूपच वास्तववादी, तथाकथीत स्वतःला सभ्य समजणाऱ्या लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारे कालातीत लेखन आहे.

डॉ अनिल खांडेकर

सआदत हसन मंटो यांच्या कथा वेगळा अनुभव , विचार , द्रुष्टीकोन देतो. या भेटी बद्दल धन्यवाद. मंटो आणि ऊर्दू तील अजूनही कथा वाचायला मिळाव्यात , ही विनंती.

Renu Jadhav

एका ठिकाणी मंटो म्हणतो. असंही होऊ शकतं की सआदत हसनं मरेल आणि मंटो जिवंत राहील .. खरंच आहे आपण मंटोला अमरत्व बहाल केलयं...

दीपक पाटील

इतकं सरळसोट अन् प्रभावी की ते प्रसंग अनुभवल्याप्रमाणे वाटते. समस्येला नेमक्या शब्दांत मांडण्याचे कसब आणि धैर्य मंटोनी दाखवले.

Arun A.Kakade.

Very good story s of manto. I am a fan of MANTO since 1974.I have manto caletion

Add Comment

संबंधित लेख