‘बगळा’ आणि ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोर्या’ या दोन कादंबर्या आणि ‘अतीत कोण? मीच’ या लेखसंग्रहानंतर प्रसाद कुमठेकर यांचा ‘इत्तर गोष्टी’ हा कथासंग्रह अलीकडेच प्रकाशित झाला. सामान्यत: लेखक आधी कथा लिहितात आणि नंतर कादंबरीचा मोठा पट मांडतात. प्रसादच्या बाबतीत नेमके उलट घडले आहे. कदाचित कादंबर्या लिहीत असताना कादंबरीच्या पटातून सुळकन निसटून गेलेल्या या गोष्टी असाव्यात. नंतर चिमटीत सापडता सापडता त्यांच्या पंखांवर, तत्त्वज्ञान, समाजातील घटना, साहित्य, कला यांच्या अनुषंगाने ‘स्व’चा शोध घेण्याच्या लेखकाच्या वृत्तीचे हलके हलके रंग सांडले गेले असावेत असे मला ह्या कथा वाचताना वाटले.
कथा-कथासंग्रह असे सवयीने म्हटले तरी ह्या संग्रहाला गोष्टींचा संग्रह म्हणायला हवे असे त्यांतील दहाही गोष्टींचे रूप आहे. त्यांत कथानक आहेच. परंतु ते कथानक वाचकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रसादने जी कथात्म क्लृप्ती योजली आहे, तीमुळे कथेतील शब्द लेखक-वाचक हे नाते बदलून टाकतात व कथक-श्रोता असे नाते निर्माण करतात. इथे लेखक ‘स्टोरी टेलर’ होतो आणि ‘वाचक-श्रोत्या’चे अवधान ढळू नये, याची पुरेपूर काळजी घेतो.
प्रस्तुत संग्रहात एकूण दहा गोष्टी आहेत. त्या सर्व गोष्टींत निवेदक ‘मी’ आहे आणि तो गोष्टीतले एक पात्रही आहे. ‘आडगावचे पांडे’, ‘जमवाजमव’, ‘जुते दो पैसे लो’, ‘पैलं... जे आसन ते’, ‘फळशोभन’ व ‘माचो, ये तो बडा टॉईंग है’ या गोष्टींतील निवेदक ‘मी’ तरुण आहे. वय सरासरी विशी ते पस्तिशीपर्यंतचे. तो ‘मी’चीच गोष्ट सांगतो. त्याला नायक म्हणा किंवा प्रोटोगॉनिस्ट म्हणा. तो सांगतो त्या गोष्टींचे स्वरूप काहीसे गजालींचे आहे. अनुभवकथनाचे आहे. त्या गोष्टींचा गर्भित श्रोता देखील त्याच वयाचा, ‘मी’चा दोस्त असावा; असे अनुमान करता येते. हा ‘मी’ मराठवाड्यातील गावाकडे एकत्र कुटुंबात वाढलेला आहे. त्याची वयात आल्यापासून (पैलं... जे आसन ते) तर लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीपर्यंतची (माचो, ये तो बडा टॉईंग है) शरीर-मनाची गुपिते दोस्तांमध्ये ‘शेअर’ करण्याची एक भावावस्था या सर्व गोष्टींत सारखेपणाने पसरून राहिली आहे. ‘जमवाजमव’, ‘जुते दो पैसे लो’, ‘फळशोभन’ आणि ‘माचो ये तो बडा टॉईंग है’ या चार गोष्टी म्हणजे मीलनोत्सुक ‘मी’च्या मनाचे तरंग आहेत. पन्नास वर्षांपूर्वी पु. भा. भावे यांनी ‘सतरावे वर्ष’ या कथेमधून पौगंडावस्थेतील मुलग्याच्या मनात उदित होणार्या लिंगभावनांचे अतिशय हळूवारपणे चित्रण केले होते, त्याचे इथे स्मरण होते. परंतु त्या अभिव्यक्तीपेक्षा प्रसादच्या गोष्टींतील अभिव्यक्ती पूर्णपणे वेगळी आहे व त्याचे कारण प्रथमपुरुषी निवेदनपद्धती हे जसे आहे तसे लेखकाने केलेली तरुण गर्भित वाचकाची निर्मिती; हेही आहे.
त्यामुळे काय घडते? गोष्टींतील ‘मी’ पुष्कळच मोकळेपणाने आपल्या तारुण्यसुलभ लैंगिक भावना व्यक्त करतो. त्या ‘मी’च्या असल्यामुळे त्यांच्या अभिव्यक्तीत उथळपणा येत नाही. दुसरे म्हणजे त्याची ओढ पत्नीच्या भेटीची आहे, तसेच पहिल्या रात्री तिच्यासमोर आपले पुरुषत्व कमी पडू नये यासाठीची आहे. त्यामुळे सहजच त्या भावनांच्या अभिव्यक्तीला कौटुंबिक व सामाजिक नीतिबंधनांची एक चौकट आहे. ‘मी’च्या मीलनोत्सुक भावनांविषयी कथन करता करता लेखक गावाकडच्या कुटुंबसंस्थेविषयीही विधान करत जातो.
ही गावाकडची कुटुंबपद्धती शहरी जीवनपद्धतीपेक्षा वेगळी आहे, आपले सनातनपण टिकवून धरणारी आहे. ‘मी’च्या बालपणापासून ते आता त्याच्या वयाच्या पस्तिशीपर्यंत आपल्या कुटुंबातले चार भाऊ कसे हमरीतुमरीवर येत भांडतात, तरी एकत्र राहतात हे तो पाहत आला आहे. (आडगावचे पांडे). आताही भांडणे होतात तेव्हा शहरात गेलेली, काकांची नव्या पिढीची मुले गावाकडेही फिरकत नाहीत. ‘मी’ आणि त्याचा दादा जातात खरे पण ‘मी’ ने एक निर्णय घेऊन टाकला आहे, “दाद्या बघतोय नं तू, हे सुधरणार नाहीत. यांचं हज्जार वर्षं हेच चाललंय. तुला कंड असेल तर तू ये आडगावात ऊठसूट. पण आपण असं विकेंडला सुट्टी टाकणार नाही म्हणजे नाही.” कंपनी त्याला न्यूझिलंडला पाठवतेय अन त्यालाही ह्या जगापासून दूर जायचेय.
‘मी’चे हे गावाकडचे जग पुरुषसत्ताक वृत्तीचे आहे. इथे मुलाच्या विवाहानंतर गर्भाधान हा विधी आवश्यक मानला जातो, त्यासाठी मुहूर्त काढायला भटजीला बोलावले जाते आणि त्याविषयीची चर्चा बैठकीच्या खोलीत होते, तिथे घरातल्या बायका फारशा नसतात. तरुण मुलगा आपल्या आयुष्यातल्या अत्यंत खाजगी गोष्टीची होणारी सार्वजनिक चर्चा फक्त ऐकत राहतो. त्याला त्याशिवाय पर्याय नसतो. (फलशोभन)
इथे अजूनही तरुण मुलग्याला ‘चिमन्या’ म्हटले जाते आणि ‘आनंदिता’ किंवा ‘आभा’ अशी सुंदर नावे असलेल्या मुलीला ‘चिक्की’ म्हटले जातेय. आता मुलगा शहरात जाऊन कमवायला लागला असला तरी त्याचे लग्न वडिलांनी आधी पाहून, पसंत करून ठरवलेल्या मुलीशीच होते. लग्नानंतरही ‘फळशोभना’चा विधी होईपर्यंत नवर्यामुलाने बायकोशी बोलणे देखील ‘उंडगे’पणाचे ठरते. तरुण मुलगा शहरात गेल्यानंतर त्याला ‘आपण नव्या पिढीचे रिप्रेझेंटेटिव्ह’ आहोत असे वाटू लागते. ‘लग्नाआधी, होणार्या बायकोशी बोलायला मिळाले पाहिजे, लग्नात हॅपीनेस वाहिला पाहिजे’ अशा ‘मी’च्या साध्यासुध्या अपेक्षा आहेत. त्याच्या ह्या ‘नव्या पिढी’च्या कल्पना ‘हम आपके हैं कौन’सारख्या चित्रपटांनी घडवल्या आहेत. आपले बूट वधूपक्षाकडून चोरले जाणे, मेहुण्यांना पैसे द्यावे लागणे हे त्याला फार रोमॅंटिक वाटते. त्याच्या लग्नात वरपक्षाकडे देण्याघेण्यावरून चर्चा चालू राहतात, बूट परत करण्यासाठी वधूपक्षाकडून मागितलेल्या पैशाच्या आकड्यांवरून शब्दाला शब्द वाढत जातो, गोंधळ वाढतो, ‘मी’ तो गोंधळ थांबवू शकत नाही. पण दाजी येतात आणि गुपचूप त्यांचे आतल्या खोलीत लग्न लावून देतात. तेच त्याला इतके रोमॅंटिक वाटते की, ‘एका कुचाडीत, कोण्या कोपर्यातल्या कोठीघरात झालेल्या माझ्या लग्नात निस्ता हॅपीनेस भरभरून वाहूलालता..’ म्हणून तो सुखावतो.
शहरात आलेल्या ‘मी’च्या तारुण्यसुलभ भावना व संवेदना, पहिल्या शारीर मीलनाच्या कल्पना ह्या यूट्यूब, नेटफ्लिक्सवरचे हिंदी, इंग्रजी, कोरियन चित्रपट, जाहिराती, काही पॉर्नचे व्हिडिओज आणि मित्रांचे अनुभव यातून घडल्या आहेत. पहिल्या रात्री बायकोशी काय बोलायचे (जमवाजमव) इथपासून तर तिच्याबरोबरच्या शृंगारात आपण फेल तर होणार नाही ना, याचे ‘परफॉर्मन्स प्रेशर’ (माचो, ये तो बडा टॉईंग है) आपल्यावर कसे आले होते, हे तो काहीशा उत्कटतेने व काहीशा खेळकरपणे कथन करतो.
वर उल्लेखिलेल्या गोष्टींपेक्षा अगदी वेगळ्या बाजाच्या गोष्टीही या संग्रहात आहेत. ‘इन्सल्टेड सेल्स’ मधल्या ‘मी’ने एका कंपनीत अतिशय प्रामाणिकपणे आणि शिस्तीने तीस वर्षे नोकरी केली आहे. त्याच्या शिस्तप्रिय स्वभावामुळे तो ऑफिसातल्या कुठल्याही कळपात सामील झाला नाही. आज जेव्हा तो काही कामासाठी कंपनीत येतो आणि त्याच्याकडे जेव्हा प्रत्येकजण दुर्लक्ष करतो तेव्हा त्या काळातील आपल्या शिस्तप्रिय, कठोर भूमिकेमुळे आपल्याकडून काही व्यक्ती दुखावल्या गेल्या आहेत; याची त्याला जाणीव होते. ‘आस्मानी, सुल्तानी हौर गाढवलाला’ ही फॅंटसीच्या अंगाने जाणारी गोष्ट! ‘मी’ आणि ‘गाढवलाला’ यांच्या संवादातून १९७९मधली, विदर्भातल्या एका खेडेगावातली गोष्ट इथे उलगडली जाते. ‘शेवटी गाव सुखी-समाधानी झाले’ असा गोष्टीचा शेवट करून व गोष्ट पूर्ण करून गाढव तर ‘झुर्र्र्र्र्र्र्र्र्र्र’ निघून गेलेले असते पण ‘मी’इतका आनंदित होतो, की त्याचा आनंद तो असा व्यक्त करतो, “माळ जाळणार्या या कार्या उन्हात सुद्धा बाभळीला जो काय पिवळा धम्मक बहर आलता तो नादर दिसलालता. पिवळी गोल फुलंच फुलं अन् फांदीला लटकलेला सुगरणीचा खोपा!” गावाने जाती-पातीच्या कल्पनांतून मुक्त हऊन सुखी व्हावे; हे खरेतर लेखकाचे ‘विशफुल थिंकिंग’ आहे. म्हणूनच तो म्हणतो, “गाढवलालाने सांगितली का माझी मीच रचली? मनात होती? आसंल तर मायच्यान! ही करोडो मोलाचीच गोष्टय!” गोष्टीतला विरोधाभास असा की ही गोष्ट गाढव माणसाला ऐकवते. एरवी ‘गाढवापुढे वाचली गीता अन कालचा गोंधळ बरा होता’ ही माणसांच्या जगातली म्हण, परंतु इथे करोडोमोलाचा विचार माणसाला न सुचता गाढवाला सुचतो. माणूस कोण आणि गाढव कोण, अशा विचाराचे बीज लेखक वाचक-श्रोत्याच्या मनात पेरतो.
ह्या संग्रहातील पहिली गोष्ट ‘क्ष ची गोष्ट’ ही एकीकडे मानवी उत्क्रांतीचा इतिहास सांगते आणि दुसरीकडे अतिप्राचीन काळापासूनच्या सामान्य माणसाच्या जगण्या-मरण्यातील अबोल वेदनांना शब्दरूप देते. या गोष्टीसाठी लेखकाने, व्यक्तीच्या मृत्यूनंतर काही समाजात ‘वर्णुका’ गातात, तसा वर्णुकाचा रूपबंध स्वीकारला आहे. या गोष्टीच्या निवेदनपद्धतीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या गोष्टीचे निवेदन प्रथमपुरुषी परंतु स्त्रीमुखी आहे. तरी निवेदनाच्या पूर्वार्धात लेखकाने वाक्यरचना अशा पद्धतीने केली आहे की निवेदक स्त्री आहे की पुरुष हे समजू नये. किंबहुना त्या निवेदनातील भाषेचा पोत पुरुषभाषेचा राहिला आहे.
कथक स्त्री मेलेल्या ‘क्ष’ची युगानुयुगीची सहचरी आहे. ती ‘क्ष’च्या मृत्यूनंतर केवळ त्याच्या वर्णुकाच गात नाही तर त्याची कैफियत मांडत जाते. इथे तिच्यासाठी वाचक हा ‘मिलॉर्ड’ होतो (ती ‘क्ष’ची बायको मात्र नाही, गोष्टीत ‘क्ष’च्या बायकोचा वेगळा केवळ उल्लेख येतो.) ती त्याच्या युगानुयुगाच्या प्रवासाची साक्षी आहे आणि ‘मी साक्षी आहे’ हे वाक्य ती पुन्हापुन्हा उच्चारत राहते व आपले ‘क्ष’बरोबरचे अस्तित्व जणू हेतूपूर्वक आजच्या वाचक-श्रोत्याच्या लक्षात आणून देत राहते. आपले त्याचासह असणे अधोरेखित करत राहते. ‘क्ष’ची गोष्ट सांगताना, ‘मी साक्षी आहे’ हे वाक्य ती ध्रुवपदाप्रमाणे आळवत राहते. गोष्टीत एकूण तेरा वेळा हे वाक्य पुनरावृत्त होते. ‘क्ष’ माणूस म्हणून उत्क्रांत होता होता नेहमी किडामुंगीसारखा कसा मरत गेला याची प्रत्येक वेळा ती साक्षीदार आहे. तशीच त्याने शेतीचा शोध लावला, हत्यारांचा शोध लावला, मंदिरे बांधली... त्याने मानवी संस्कृती घडवली परंतु इतिहासाने ‘क्ष’ला मोजले नाही; याचीही ती साक्षी आहे. ‘क्ष’ तर पुलावरच्या गर्दीतील चेंगराचेंगरीत मेला तर ‘क्ष’चा मुलगा ‘क्ष’ही पूल कोसळून मेला. त्यालाही ‘मी’ म्हणजे ‘क्ष ची सहचरीच साक्षी आहे. ती म्हणते, “समोर छोट्या ‘क्ष’च्या आईच्या हृदयफोड वर्णुका सुरू आहेत. मी साक्षी आहे. बाईची साक्ष न मानल्या जाणार्या काळापासून...” या अखेरच्या एका वाक्यात लेखक स्त्रीजीवनाच्या उपेक्षेचा इतिहासही अत्यंत परिणामकारक शब्दांत व्यक्त करतो.
संग्रहातील अखेरची गोष्ट ‘हॅमार्शिया’. ही एका कोवळ्या वयाच्या पत्रकाराची गोष्ट! गावाला हादरवून टाकणारी एक सामूहिक बलात्काराची घटना गावात घडून गेली आहे. तिचे वार्तांकन करण्यासाठी गेलेला पत्रकार दिवसभर ही घटना अनेकांगांनी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. ज्या सतीवर नवर्यादेखत अतिप्रसंग झाला ती सती एक अवखळ बंगाली नववधू होती. नीटनेटकी राहणारी, नवर्याबरोबर मंदिरात जाऊन नंतर बोरबनात फिरायला गेलेली, वातावरण बघून सहज गाणं म्हणणारी. तिच्यावर बलात्कार करणार्या तरुण मुलांना ‘मी’ ओळखत होता. त्यांतला प्रमुख मुलगा हुशार, शिकलेला पण प्रयत्न करूनही नोकरी न लागलेला बेकार तरुण. मंदिराचा पुजारी या मुलांना बोरबनात बसून पैसे लावून पत्ते खेळताना बघत होता. मंदिरात आलेल्या शंकर-सतीला तो सावधही करणार होता पण तोवर दुसरी व्यक्ती दक्षिणा द्यायला येते अन हे जोडपे नजरेआड होते. गुन्हेगार आरोपीचे कुणीही वकीलपत्र घेऊ नये, असा गावाने ठराव केलाय; हे सारेच या कोवळ्या पत्रकाराला समजलेय. शंकरचा आक्रोश त्याने ऐकलाय. सवयीने तो बातमी तर खरडतो. तो म्हणतोच, “तारीख, वार, स्थळ, नाव सोडलं तर बातमी तशीच होती जशी राहतीय.” पण या एका घटनेमागे समाजातले अनेक घटक कारणीभूत असल्याचे त्याला जाणवते. त्यांत खरेतर कुणाचीच चूक नाही असे त्याला विचारांती वाटते. निरागस मनाच्या ह्या पत्रकार मुलाच्या मनाची तगमग त्याच्याच मुखाने लेखकाने अत्यंत प्रत्ययकारी शब्दांत व्यक्त केली आहे, “मला आतून वाटलालंय सतीनं यानंतरही तसंच राहावं, तसंच वागावं कारण तिची काही चूकच नाही. आता आतमध्ये काही अडकल्यासारखं वाटलालतं. असं वाटलालतं की गवरू गवरू रडावं. रडू काढायचा काटोकाट प्रयत्न केला पण अवघड राहातंय. येवढ्यात मागून आई आली. “आज गिळला नाहीस रे,” म्हणून डोक्यावरून हात फिरवला अन् तसं मला रडू फुटलं.... मोठ्यानं. अन् मी गवरू गवरू रडूलालो. अख्ख्या गावाला ऐकू जाईल असं”
‘क्ष’ची गोष्ट, ‘आस्मानी, सुल्तानी हौर गाढवलाला’ आणि ‘हॅमार्शिया’ या तिन्ही गोष्टींचे शेवट गोष्टींनुरूप भिन्न भिन्न असले तरी या गोष्टींमधील ‘मी’च्या मागे उभ्या असलेल्या लेखकाचा मानवी जीवनाविषयीचा एक मूल्यभाव सूचित करणारे आहेत. तो मूल्यभाव कुठल्याही विशिष्ट विचारसरणीला बांधलेला नाही. ‘मी’ ह्या पात्राच्या अनुषंगाने, लेखक स्वतःच्याच मनातील नैतिक जीवनमूल्यांचा इथे अस्फुट उच्चार करतो.
प्रसादच्या कथेत स्त्रीचित्रणे ठळक नाहीत किंबहुना त्यांच्या सावल्या वावराव्यात अशा ह्या स्त्रिया दिसतात. पण ज्या आणि जेवढ्या दिसतात त्यांतून त्यांची शहाणीव जाणवल्याखेरीज राहत नाही. ‘क्ष’च्या गोष्टीतली ‘मी साक्षी आहे’ म्हणणारी स्त्री त्याची अनंतकाळाची सहचरी आहे. ‘आडगावचे पांडे’ मधले भाऊ एकमेकांच्या जीवावर उठल्यासारखे भांडायला लागतात तेव्हा घरच्या बायका ‘सुशीला’ बनवून ‘आधी खाऊन घ्या’ म्हणून त्यांना खायला लावतात. ‘माचो, …’ मधील ‘मी’ने लग्नानंतरच्या पहिल्या शारीरमीलनाची अनेकप्रकारे तयारी केली आहे, तरीही तो नेमक्या क्षणी ‘फेल’ होतो. अपराधी भावनेने रडू लागतो तेव्हा त्याची पत्नी त्याच्या डोक्यावर हात फिरवत त्याला जवळ घेते आणि त्याला आश्वस्त करते. ‘हॅमर्शिया’ मधील ‘मी’ गावातील सामूहिक बलात्काराच्या प्रकरणाचा शोध घ्यायला तहानभूक हरपून दिवसभर फिरत राहतो आणि घडलेल्या घडामोडींचा ताण त्याला असह्य होतो. त्यावेळी त्याची आई त्याची अवस्था ओळखते. त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवून ‘आज गिळला नाहीस रे’ म्हणते तेव्हा तिच्या स्पर्शाने त्याच्या मनाचा बांध फुटतो आणि तो हमसून हमसून रडू लागतो. या सगळ्यांत सती वेगळी आहे, अर्थात तिच्यावर कोसळलेला प्रसंगही वेगळाच आहे. त्यानंतर पोलीस कम्प्लेंट करण्याइतकी ती हिंमत दाखवते.
ह्या 'गोष्टी' खर्या, परंतु कधीकधी ह्या गोष्टींत घटनाच घडत नाहीत. (जमवाजमव, इन्सल्टेड सेल), कधी घटना आधी घडून गेलेली असते. (‘क्ष’ची गोष्ट, हॅमर्शिया). प्रत्यक्ष घटनेचे चित्रण करण्यात लेखकाला फारसा रस नाही. तसेच प्रसादच्या गोष्टींमध्ये ठळक अशी व्यक्तिचित्रेही येत नाहीत. परंतु एखाद्या व्यक्तिरेखेची एकच कृती त्याचा व्यक्तिविशेष उजळून टाकतात. उदा. ‘आडगावचे पांडे’ मधील दादा बैठकीतील चहाचे कप मागीलदारी आणून ठेवतो अन ‘वाळल्यावर डाग निघत नीत बायांना तकलीफ!’ म्हणून कपांत पाणी घालतो. ही त्याची लहानशी कृती, पुरुषप्रधान कुटुंबातला स्त्रियांकडे बघण्याचा त्याचा समंजस दृष्टिकोन व्यक्त करते. ‘हॅमार्शिया’तील गोविंद पुजारी यांची पापभीरू वृत्ती त्यांच्या पुन्हापुन्हा डोक्यावर पाणी ओतून घेण्यातून जाणवते.
गोष्टींचे निवेदक मराठवाड्याकडचे असल्याने गोष्टी स्वाभाविकपणे त्याच बोलीत आहेत. ‘तोटा, खारीक-खोबरं’ देणे घेणे, ‘भंजाळ तोंड घेऊन दादाचं पटमन्या येणे’, ‘घरची शिनेर मानसं’, ‘झंगडपंगड होनं’, ‘गवरू गवरू रडणं’ अशा कितीतरी शब्दप्रयोगांची उदाहरणे देता येतील.
या गोष्टी उद्गीरच्या असल्या तरी गोष्टींमागील लेखक नव्या जगातला सजग रहिवासी आहे याची साक्ष अनेकदा मिळते. तो ‘क्ष’ची गोष्ट सांगताना आत्म्याच्या वजनाबद्दल बोलतो, डोंगरावरच्या कोसळून नाहीशा झालेल्या माळीण गावाबद्दल बोलतो. ‘जुते दो पैसे लो’मध्ये दोन युवाई ‘काय ही पोरं... काय हे लग्न... काय माणसं... सगळं ओकेच’ म्हणतो तेव्हा त्यातला राजकीय संदर्भ लपून राहात नाही. आणि आडगावच्या पांड्यांच्या घरातील भांडणाच्या सुरुवातीचे तो “दक्षिणावर्ती, वामावर्ती शंख बाहेर निघाले होते. सख्ख्या भावांची पक्की भावकी झालती. प्रत्येकजण बेंबीच्या देठापासून आपापला पांचजन्य, देवदत्त, पौंड्र, अनंतविजय, सुघोष’, मणिपुष्पक फुंकण्यावर होता.” असे वर्णन करतो तेव्हा महाभारतकालीन युद्धाचे स्मरण होते. मौशुमी चटर्जीपासून अनेक नटनट्यांचे उल्लेख त्याच्या कथनात येतात. या ओझरत्या उल्लेखांतूनही लेखकाची बहुश्रुतता व संवेदनशीलता लक्षात येते.
जाता जाता, प्रसादने दोन गोष्टींना दिलेल्या लक्षवेधक शीर्षकांविषयी. ‘इन्सल्टेड सेल्स’ ही वैद्यकशास्त्रातील संज्ञा त्यांच्या एका गोष्टीचे शीर्षक आहे. तिचे स्पष्टीकरणही लेखकाने गोष्टीच्या ओघात अखेरीस दिले आहे. ते गोष्टीच्या आशयासाठी चपखल वाटते. दुसरे ‘हॅमर्शिया’ हे शीर्षक. हॅमर्शिया ही संज्ञा-संकल्पना पाश्चिमात्य साहित्यशास्त्रातील आहे. ग्रीक शोकांतिकेच्या संदर्भात अॅरिस्टॉटलने ही संज्ञा वापरली आहे. नाटकातील सर्वगुणसंपन्न (नोबल) नायकाची शोकांतिका खलनायकामुळे होत नाही, तर त्या नायकाच्या एखाद्या चुकीमुळे होते; असे या शब्दांतून तो सुचवतो. मग मात्र इथे प्रश्न पडतो की, ही शोकांतिका सतीची मानायची तर तिने नवर्याबरोबर बोरबनात फिरतांना गाणे म्हणणे, ह्या तिच्या कृतीला ‘हॅमर्शिया’ म्हणायचे का? गोविंदपुजारी दुसर्या दक्षिणेच्या मोहात पडले आणि त्यांच्याकडून या जोडप्याला सावध करता करता राहून गेले, ही हॅमर्शिया म्हणायची? लेखकाला सुचवायचे आहे की, सतीची शोकांतिका व्हायला विविध घटक कारणीभूत झाले. त्यात खरेतर चूक कोणाचीच नव्हती. हे मान्य होणे काहीसे अवघड आहे. असो.
‘बगळा’ पासून ‘इत्तर गोष्टी’ पर्यंतच्या लेखनातून प्रसादने मराठवाड्यातील जीवनाचा पोत अगदी जिव्हाळ्याने, तरीही निर्लेपपणे उलगडून दाखवला आहे. त्याच्या या जगण्याकडे बघण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण दृष्टीमुळे त्याचे ललित व ललितेतर लेखन अनोखे व ताजे वाटते. परंतु केवळ तेच भावविश्व हा प्रसादचा ‘कंफर्ट झोन’ होऊ नये. त्याच्या लेखनात असलेल्या अनेक क्षमतांची झलक त्याच्या कथनातून निश्चितच जाणवते. त्याच्या गोष्टीतला ‘मी’ न्यूझीलंडला जायचे स्वप्न बघतो आहे. ते लेखकाच्या दृष्टीने प्रतीकात्मक ठरावे व लेखकाकडून नवे भावविश्व ह्याच ताकदीने रेखाटले जावे, यासाठी त्याला अनेक शुभेच्छा!
- डॉ. प्रतिभा कणेकर
(लेखिका ज्येष्ठ कथाकार आणि समीक्षक आहेत.)
इत्तर गोष्टी
लेखक : प्रसाद कुमठेकर
प्रकाशक : पपायरस प्रकाशन
किंमत : ३४० रुपये
Tags: book review प्रसाद कुमठेकर इत्तर गोष्टी पुस्तक परिचय Load More Tags
Add Comment