एकत्र येऊन वाचण्याच्या या उपक्रमाला वाचनाची आधी फारशी आवड नसलेलेही अनेक जण जोडले गेले आहेत. स्वतःचा वेळ हवा म्हणून येणाऱ्या गृहिणी असतील किंवा मोबाईलची सवय सुटावी म्हणून आणली गेलेली लहान मुलं - प्रत्येक जण हे दोन तास वाचनाला देतोय.
नऊवारी नेसलेल्या ८७ वर्षांच्या आजी पारावर बसून हातात झेरॅाक्स वजा कागद हातात घेऊन ते वाचण्यात तल्लीन झाल्या आहेत. त्यांच्या शेजारी आहेत जेन झी मधली हूडी घाललेली मुलं. पलीकडे अंथरलेल्या सतरंज्यांवर काही आई-बाबा आपल्या लहान मुलांसह वाचनात दंग झाले आहेत. हुडहुडी भरेल अशा थंडीत सकाळचं कोवळं ऊन अंगावर घेत अशी जवळपास ३०० हून अधिक मंडळी आपापला कोपरा शोधून बसली आहेत. सगळ्यांच्या हातात पुस्तक आहे. आणि ते सगळे जण आपापल्या हातातील पुस्तक शांतपणे वाचत आहेत. ते दोन तास कोणीही कोणाशी बोलत नाही, ना कोणाच्या हातातला मोबाईल सहज स्क्रोल करण्यासाठी बाहेर निघतोय.
हे दृश्य काल्पनिक नाही. पुण्यात, मुंबईत, बंगलोरमध्ये, जयपूरमध्ये दर रविवारी सकाळी ८ ते १० च्या वेळात हे घडतंय. पुणे, मुंबई, बंगलोर, जयपूर ‘बुकीज’मुळे. ‘बुकीज’ म्हणजे पुस्तकप्रेमी मंडळी. या मंडळींनी एकत्र येण्याचा हा कट्टा. संकल्पना अगदी साधी – आपापली पुस्तकं घेऊन यायची आणि दोन तास एकत्र बसून वाचन करायचं. नुसतं वाचायचं. काही चर्चा नाही की गप्पा नाहीत. या दोन तासांमध्ये मोबाईलचा वापर मात्र शक्यतो नको. त्यासाठी अगदी सकाळी ८ लाच हजर राहण्याचीही आवश्यकताही नाही. तुमच्या सोयीने ८ ते १० च्या दरम्यान कधीही यायचं आणि सोयीच्या वेळी निघून जायचं. अट एकच- इतर कोणाच्याही वाचनात तुमच्यामुळे व्यत्यय यायला नको.
ही पिढी वाचत नाही किंवा वाचन संस्कृती लयाला जातेय अशी बोंब ज्यांच्या नावाने सुरू असते अशा मिलेनियल्सनीच हा उपक्रम सुरू केला आहे. मुळात असं काही करावं याची संकल्पना सुचली ती शंतनू नायडूला. (हो, हा तोच शंतनू जो रतन टाटांचा मित्र म्हणून प्रसिद्ध झालाय). शंतनू सांगतो, “मला वाचन सुरू करायचं होतं. आणि ते एकट्याने नाही, तर बाहेर कोणासोबत तरी वाचावं अशी इच्छा होती. अशा स्वार्थी हेतूने खरंतर हा उपक्रम सुरू झाला.”
कल्पना सुचल्यावर शंतनूने आधार घेतला तो नव्या पिढीच्या समाज माध्यमांचाच. आधी त्याने एक साधी पोस्ट टाकत असं वाचण्यासाठी एकत्र यायला कोणाला आवडेल असं विचारलं. काही लोक तयार झाले. मग दर रविवारी भेटायचं ठरलं आणि त्यातून जन्म झाला ‘मुंबई बुकीज’चा. मुंबईतल्या एका बागेत दर रविवारी ठरवून ही मंडळी भेटतात. पुढे पुढे हा ग्रुप इतका मोठा झाला की आता फक्त रविवार नव्हे तर शनिवार-रविवार असे दोन दिवस हे बुकीज चालतं.
आधी शंतनूने स्वतचं इन्स्टाग्राम अकाऊंट वापरलं, तरी नंतर त्याने बुकीजचं स्वतचं इन्स्टाग्राम हॅण्डल सुरू केलं. कोणाला प्रवेश द्यायचा आणि काय उपक्रम चालतात याची माहिती याच हॅण्डलवर दिली जाते. संवादाची भाषा आहे ती फोटो आणि रील्सची.
मुंबई बुकीज बद्दलची ही पोस्ट शंतनूसोबत काम करणारी त्याची पुणेकर मैत्रीण तन्वी लेलेने वाचली आणि असंच काही पुण्यात करावं का असं त्याला विचारलं. मुंबई बुकीजच्याच हॅण्डलवरून पोस्ट करण्यात आली. अर्थात ठिकाण कोणतं हा प्रश्न होताच. सुरुवातीला ज्यांना विनंती केली त्यांनी या आठवड्यापुरतं करा असं म्हणत परवानगी दिली. आणि मुंबईपाठोपाठ पुढच्याच आठवड्यात पुणे बुकीजलाही सुरुवात झाली.
सप्टेंबर महिन्यात सुरू झालेल्या बुकीजच्या पहिल्याच भेटीत ७० लोक सहभागी झाले होते. आज हा आकडा दर आठवड्याला ४०० ते ५०० लोकांच्या घरात गेला आहे. पण नुसतेच भारंभार बघे किंवा टाइमपास करणारे गोल होऊन इतरांच्या वाचनाचा आनंद बिघडू नये म्हणून हे ठिकाण जाहीर मात्र केलं गेलं नाही. तुम्हांला जायचं असेल तर बुकीजच्या इन्स्टाग्राम हॅण्डलवरून एक फॉर्म भरावा लागतो. त्यात सहभागी का व्हायचंय याचं उत्तर देणंही अपेक्षित असतंच. हे फॉर्म पाहून अॅडमिन निर्णय घेतात. आणि नंतर त्या व्यक्तीला एका व्हॉट्सअॅप ग्रुप वर अॅड करतात. या व्हॉट्सअॅप ग्रुपवरच इतर सगळी माहिती दिली जाते. सध्या फक्त पुण्याचेच असे तीन व्हॉट्सअॅप ग्रुप भरून सदस्य झाले आहेत. लोकांचा उत्साह बघून ठिकाणाचा प्रश्नही जवळपास कायमचा सुटलाय.
पुण्यात बुकीजची पूर्ण जबाबदारी तन्वी आणि तिच्या मित्रमैत्रिणींवर आहे. ३१ वर्षांची तन्वी मुळात एच आर प्रोफेशनल म्हणून काम करते. पण बुकीजने तिच्याही आयुष्यात बदल आणल्याचं ती सांगते. ९-५ च्या आपल्या रूटीनमध्ये वाचन मागे पडत असल्याची जाणीव तिला होती. तन्वी सांगते, “मला लहानपणापासूनच वाचायची आवड आहे. थ्रिलर, क्राईमची अनेक पुस्तकं मी वाचली आहेत. पण माझ्यासोबतच्या मित्र मैत्रिणींना अशी वाचनाची खास आवड नव्हती. त्यात मोबईलचं कारण नसताना तासंतास स्क्रोलिंग सुरू होतं. माझा अॅव्हरेज स्क्रीन टाईम दिवसाला जवळपास १० तासांचा होता. त्यात मी काही महत्वाचं बघत होते असं नाही. किंवा काही बघायचंय म्हणूनही मोबाईल हातात येत होता असं नाही. नुसतं मसल मेमरी आहे म्हणून फोन हातात घेतला जात होता. ही सवय तोडणं गरजेचं होतं. बुकीज सुरू झालं आणि त्या दोन तासांनी ही सवयही मोडली”
ही कल्पना आपल्याला सुचली ती एका बुक क्लबमधूनच असं शंतनू प्रांजळपणे कबूल करतो. पण मग या बुक क्लबमध्ये असं वेगळं काय? तन्वी सांगते, “बहुतांश बुक क्लब हे ठरवून पुस्तकं वाचतात आणि त्यावर चर्चा करण्यासाठी भेटतात. इथं मात्र तसं नाही. इथं प्रत्येक जण त्यांना वाचायचं आहे ते पुस्तक घेऊन येतो आणि वाचतो.”
एकत्र येऊन वाचण्याच्या या उपक्रमाला वाचनाची आधी फारशी आवड नसलेलेही अनेक जण जोडले गेले आहेत. स्वतःचा वेळ हवा म्हणून येणाऱ्या गृहिणी असतील किंवा मोबाईलची सवय सुटावी म्हणून आणली गेलेली लहान मुलं - प्रत्येक जण हे दोन तास वाचनाला देतोय.
येणाऱ्यांच्या प्रतिक्रियाही बोलक्या आहेत. सलोनी मिस्त्री सांगते, “पूर्वी महिनोन् महिने एखादं पुस्तक वाचलं जात असायचं. मोबाईल आणि कामाच्या धबडग्यात वाचन मागे पडत होतं. मी बुकीजमध्ये यायचं ठरवलं ते त्यामुळेच. आता सलग वाचत पुस्तक हातात रहातंय आणि पूर्णही होतंय”
पण बुकीजने स्वतःला फक्त एवढ्या पुरतंच मर्यादित ठेवलं नाही. वाचनसंस्कृतीचा प्रचार प्रसार यातून काही चांगले उपक्रमही घेतले जातात. डिसेंबर महिन्यात असाच शाळांसाठी लायब्ररी तयार करण्याचा उपक्रम राबवला गेला आणि मुंबईत जवळपास ५ हजारांहून अधिक तर पुण्यात ३ हजारांहून अधिक पुस्तकं गोळा झाली. यातून आता वेगवेगळ्या संस्थांशी जोडून महापालिका आणि जिल्हा परिषद शाळांमध्ये त्यांची ग्रंथालये उभारली गेली. अशी आणखी ग्रंथालयं जोडण्याचा आपला मानस असल्याचं शंतनू सांगतो
याशिवाय कोण काय वाचतंय, ते पुस्तक कसं वाटलं, याचीही चर्चा नेमाने गटांवर होतेच. यातून सारखी आवड-निवड असेल किंवा दुसऱ्याचं पाहून एखादं पुस्तक वाचायची इच्छा होत असेल तर त्याची देवाणघेवाणही केली जाते.
हे एवढं वाढेल याचा अंदाज नसल्याची मात्र कबुली शंतनू देतो. त्याच्या मते “सुरुवात केली तेव्हा काही मिलेनियल्सचा हा उपक्रम होईल असं मला वाटत होतं. इथं एवढा वेगवेगळा वयोगट एकत्र येतोय.”
आजच्या काळात ही पिढी वाचतेय. नव्या पिढीलाही वाचायला शिकवतेय. आठवड्याला दोन तासांचं निमित्त – पण यातून वाचन चळवळ मात्र वाढत जातेय.
- प्राची कुलकर्णी
kulkarnee.prachee@gmail.com
Tags: वाचन चळवळ वाचन संस्कृती बुकीज पुणे बुकीज शंतनू नायडू Load More Tags
Add Comment