पंडित रविशंकर : विश्वसंगीताचे पितामह (उत्तरार्ध)

पं. रविशंकर यांच्या 102व्या जयंतीनिमित्ताने

पौर्वात्य आणि पाश्चिमात्य जगाला ज्यांनी आपल्या सतारीच्या संगीताच्या सेतूने जोडले आणि भारतीय शास्त्रीय संगीताची पताका पाश्चिमात्य जगात डौलाने फडकाविली त्या भारतरत्न पंडित रविशंकर यांचा 7 एप्रिल हा जन्मदिवस. त्यानिमित्ताने त्यांच्या सांगीतिक कारकीर्दीचा आढावा घेणारा हा दीर्घलेख दोन भागांत प्रसिद्ध करत आहोत.

अल्लाउद्दीन खां यांच्याकडून रविशंकर सतार तर शिकत होतेच. पण ते तितकंच नव्हतं. जसजसा खांसाहेबांचा सहवास वाढत गेला, त्यांच्यातल्या अन्य गुणांनी रविशंकर यांना मोहीत केलं होतं. जगदविख्यात सरोद वादक असताना कार्यक्रमाची गरज म्हणून त्यांनी इम, गाँग नावाचे वाद्य, झांझेसारखं सिम्बल अशी वाद्यंही निरहंकारीपणे वाजवली. हे रविशंकर यांना थक्क करणारं होतं. खांसाहेबांच्या अंगी असणारी धार्मिक सहिष्णुता ही केवळ दुर्मिळ होती. त्यांच्या घरात वावरताना ती सहज लक्षात येत होती. खांसाहेबांची मुलगी अन्नपूर्णा देखणी, बुद्धिमान सतारवादक. अन्नपूर्णा या सुरबहारदेखील वाजवत, तिच्याविषयी वाटणाऱ्या भावना, ती गुरुची मुलगी असल्यामुळे रविशंकरांनी वर येऊ दिल्या नव्हत्या. शिवाय सतार वादन हेच त्यांना केंद्रस्थानी ठेवायचं होतं. तरीही रविशंकर यांच्या वहिनीच्या पुढाकाराने अन्नपूर्णेशी लग्नाचा प्रस्ताव पुढे आला. तेव्हा खांसाहेबांनी तिला हिंदू धर्म स्वीकारण्यासाठी प्रेरित केलं. आपल्या गुरुच्या या रूपाने रविशंकर वारंवार स्तिमित होत असत. 15 मे 1941 या दिवशी हिंदू प्रथेनुसार हे दोन कलाकार विवाहबद्ध झाले. यथावकाश ‘शुभेन्द्र’चा जन्म झाला. पण काही कारणांनी हे वैवाहिक जीवन फार आनंदी नव्हतं.

रविशंकर यांचं सतार वादन आणि अली अकबर खां यांचं सरोद वादन हे एकाच मंचावरून सादर होऊ लागलं होतं. जुळ्या वाद्यांप्रमाणे हे वादन होतं असा उल्लेख पंडित रविशंकर यांनी केला आहे. त्या वेळी कोलकात्यात कनाईलाल नावाचे गृहस्थ सतार बांधणीचे कलाकार होते. त्यांच्यासारखी सतार बनवणं अन्य कुणाला जमत नसे. त्यांना रविशंकर यांनी विशिष्ट पद्धतीची सतार तयार करायला सांगितली. आजवर कनाईलाल यांनी अशी सतार तयार केली नव्हती. 1942मध्ये रविशंकरांनी या नव्या सतारीची ऑर्डर दिली होती. त्यांच्या अपेक्षेनुसार सतार तयार व्हायला 1944चं वर्ष उजाडलं. 'अद्भुत' असं या सतारीचं वर्णन रविशंकरांनी केलं आहे. लवकरच ही सतार ‘रविशंकर मॉडेल’ म्हणून ओळखली जाऊ लागली. पुढे अनेक कारागिरांनी अशा सतारी बनवल्या.

1944 सालच्या जून महिन्यात एका गंभीर आजाराने रविशंकर यांना गाठलं होतं. त्यातून ते सावरले खरे, पण भविष्यात त्यांना सावध राहावं लागणार होतं. राहत्या वातावरणात बदल हा त्यावरचा एक उपाय होता. त्यामुळे रविशंकर आता सहकुटुंब मैहर सोडणार होते. शिवाय त्यांची सतार वादनाची तयारी आता इतकी झाली होती की, खांसाहेबांनी त्यांना स्वतंत्र कार्यक्रम करण्याची परवानगी दिली होती. मुंबईतल्या वास्तव्यात त्यांना प्रतिभा आविष्काराच्या संधी मिळत गेल्या. संगीतप्रधान सांस्कृतिक कार्यक्रम, चित्रपटांना संगीत देणं या माध्यमातून त्यांनी अनेक प्रयोग केले. 1946 मध्ये आलेल्या ‘नीचा नगर’ आणि ‘धरती के लाल’ या दोन चित्रपटांना त्यांनी दिलेलं संगीत आहे. पार्श्वसंगीत म्हणून वाद्यांऐवजी तोंडातून आवाज काढणारे भारतातले ते पहिले संगीतकार. याच काळात ‘सारे जहासे अच्छा हिंदोस्ता हमारा..’ या पुढे लोकप्रिय ठरलेल्या गाण्याला रविशंकर यांनी प्रसन्न चाल दिली. राष्ट्रगीताच्या खालोखाल या गीताचा दर्जा आहे. (सारे जहां से अच्छा हे गीत गातानाची रविशंकर यांची ध्वनीचित्रफीत)

1945मध्ये रविशंकर यांनी पहिल्या प्रहरी गायल्या जाणाऱ्या नटभैरव रागाचं स्वतंत्र रागस्वरूप सिद्ध केलं. याच काळात त्यांनी पंडित नेहरू लिखित ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’च्या रंगमंचीय कार्यक्रमाची निर्मिती केली. पंडित नेहरूंनी हा कार्यक्रम पाहिल्यावर मूळ पुस्तकापेक्षा हे चांगलं झालं आहे. अशी टिप्पणी केल्याचं सांगितलं जातं. 1948च्या शेवटी दिल्ली इथं ऑल इंडिया रेडिओवर वयाच्या केवळ अठ्ठाविसाव्या वर्षी रविशंकर एका मोठ्या संगीत विभागाचे प्रमुख झाले. या कार्यकाळात त्यांनी भारतीय राष्ट्रीय वाद्यवृंद स्थापन केला आणि शास्त्रीय संगीत राष्ट्रीय पातळीवर नेण्याचं काम केलं. कसदार चित्रपटांना संगीत देणं हे तर त्यांना नेहमीच आकर्षित करत होतं.

भारतीय चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड ठरलेल्या सत्यजित राय यांच्या ‘पथेर पांचाली’ला रविशंकर यांनी संगीत दिलं आहे. बंगाली भाषेतल्या अनेक उत्तम चित्रपटांना त्यांचं संगीत लाभलं आहे. 1957 सालच्या बर्लिन चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट संगीत निर्देशक म्हणून रविशंकर यांचा सन्मान केला गेला.

चित्रपटाच्या माध्यमातून, रेडिओच्या माध्यमातून किंवा एखाद्या ‘शो’च्या माध्यमातून त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताचा वेगवेगळ्या प्रकारे आविष्कार केला. या संगीताचं पवित्र्य त्यांनी कसोशीनं जपलं. वादनाचा कार्यक्रम सुरू असताना श्रोत्यांनी बेफिकीरीने वागणं त्यांना खपत नसे. (परदेशातल्या संदर्भाने) मद्य, बिडी यांना तर परवानगी नव्हतीच. पण एकमेकांशी गप्पा मारणं, मध्येच उठून जाणं, खाद्यपदार्थ खात कार्यक्रम ऐकणं हे त्यांना मान्य नव्हतं. याला ते संगीताचा अपमान मानत असत.

रविशंकर यांनी प्रतिभावान तबलावादक किशनमहाराज यांच्यासोबत भारतात आणि भारताबाहेरही अनेक कार्यक्रम केले. त्यावेळी लोक त्याचं वादन ऐकायला यायचेच पण त्यांना पाहायलाही येत असत. 1956च्या अखेरीस त्यांनी 'ऑल इंडिया रेडिओ'ची नोकरी सोडली आणि भारतही.

पाश्चिमात्य जग त्यांना नवीन नव्हतं, पण आता बरेच संदर्भ बदलले होते. शास्त्रीय संगीताचे शिक्षण, अनेक कार्यक्रमांचा अनुभव, चित्रपटांना दिलेलं संगीत, ऑल इंडिया रेडिओवरची नोकरी अशा समृद्ध सांगीतिक पण खडतर जीवन प्रवासानंतरचा हा परदेश प्रवास होता. रविशंकर यांची असामान्य प्रतिभा, सर्जनशीलतेचा आविष्कार पाश्चिमात्त्य रसिकांना आकर्षित करत होता. या वेळी रविशंकर न्यूयॉर्कला गेल्यावर रॉजेट रेनशो नावाची महिला खास त्यांना भेटण्यासाठी आली होती, ‘पथेर पांचाली’चं संगीत तिच्या किती आवडीचं आहे हे आवर्जून सांगायला. ती हे सांगत असताना तिच्या डोळ्यांत पाणी होतं आणि रविशंकर यांच्या डोळ्यांत समाधान. याच महिलेने त्यांची ओळख कॅनडामधल्या नॉर्मन मेकालेन यांच्याशी करून दिली. ते एक प्रतिभावान चित्रपटनिर्माते होते. खास करून शॉर्ट फिल्म्सचे. त्यांनी ‘द चेअरी टेल’ या त्यांच्या दहा मिनिटे लांबीच्या चित्रपटाला संगीत देण्याची विनंती रविशंकरांना केली. या लघुपटामध्ये संवाद नाहीत. केवळ संगीताच्या माध्यमातून त्याचा श्राव्य अनुभव प्रेक्षकांना मिळणार होता. रविशंकरांनी सतार आणि झांज या वाद्यांचा अतिशय प्रभावी वापर या लघुपटात केला आहे. 1957-58 चा सर्वोत्तम लघुपट म्हणून याला सन्मानित करण्यात आलं. दोन वर्षं परदेशात घालवल्यावर 1958 मध्ये दिल्ली इथं एका अनोख्या सांगीतिक कार्यक्रमाची निर्मिती त्यांनी केली. यात साठ मुलामुलींचा समावेश होता. भारतीय आणि पाश्चिमात्त्य संगीताच्या एकत्रित सादरीकरणाचा तो एक नमुना होता, मंचावर वेगवेगळ्या उंचीवर बसून, उभे राहून ही मुले संगीत सादर करत होती. त्यांची वेशभूषाही वैशिष्ट्यपूर्ण होती. प्रकाशयोजनाही वेगळ्या धाटणीची होती. त्यामुळे एकूण कार्यक्रम रसिकांसाठी एक सुखद अनुभव होता.

या वेळच्या दिल्लीच्या मुक्कामात आणखी एक आश्चर्याचा धक्का रविशंकर यांना मिळाला. त्यांच्या दुसऱ्या एका कार्यक्रमाचा सराव पाहण्यासाठी संसदेतील काही महत्त्वाच्या व्यक्ती आल्या होत्या. त्यांच्याकडून रविशंकर यांना समजलं की, पंडित नेहरूंनी त्याच दिवशी संसदेत रविशंकर शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात करत असलेल्या कामाची चर्चा करून त्यांचा उल्लेख ‘सांस्कृतिक राजदूत’ असा केला होता.

यापुढचा दौरा होता, पूर्वेकडच्या जपानचा. पहिल्यांदाच या देशात आपलं स्वागत कसं होईल, अशी शंका रविशंकरांच्या मनात होती. पण जपानी लोकांनी अतिशय प्रेमानं त्याचं स्वागत केलं. भारतातल्या या वैशिष्ट्यपूर्ण संगीतावर त्यांनी मनापासून प्रेम केलं. या प्रेमाचा एक अद्भुत दाखला रविशंकरांना मिळाला होता, त्यांना एका जपानी महिलेनं लिहिलेलं एक पत्र मिळालं. पत्रात वापरलेली शाई जरा विचित्रच वाटत होती. ना धड निळी ना लाल, रविशंकरांचं वादन कसं आत्म्यापर्यंत पोचतं असं वर्णन त्यात होतं. त्यातल्या शेवटच्या वाक्यानं ते हलून गेले. तुमचं संगीत माझ्या मनात खोलवर पोचलं आहे. म्हणून हे पत्र मी माझ्या रक्तानं लिहिते आहे. या नंतर पुढे अनेकदा ते जपानला गेले. जपानी माणसाचं त्यांच्या हृदयात एक वेगळं स्थान कायमच राहिलं. ते म्हणतात, ‘जपानी माणसाकडे केवळ पाहून कधीच समजू शकणार नाही की त्याला कार्यक्रम आवडला आहे किंवा नाही. ते उघडपणे तसं बोलतही नाहीत. पण ते जगभरातलं संगीत मनापासून ऐकतात. सर्व तऱ्हेचे श्रोते जपानमध्ये पाहायला मिळतात.’

रविशंकर पुढे जेव्हा जेव्हा परदेशात जात होते. त्या प्रत्येक वेळी श्रोत्यांची संख्या आधीपेक्षा जास्त होती. 1960च्या दरम्यान भारतात आणि परदेशात कार्यक्रम सुरु होते. त्याही वेळी भारतात चित्रपटांना संगीत देणं सुरु होतं. विशेष करून कोलकात्यात तयार होणाऱ्या बंगाली चित्रपटांचा यात प्रामुख्याने समावेश होता. तरीही मुंबईत निर्मिती झालेला ‘अनुराधा’ चित्रपट विशेष होता. एक तर हा चित्रपट गीतप्रधान होता. आणि दुसरं, यातली गाणी विश्वविख्यात गायिका लता मंगेशकर यांनी गायिली होती. या चित्रपटाचं खूप कौतुक झालं. (अनुराधा चित्रपटातील गाण्यांची लिंक)

या वेळेपर्यंत कनाईलाल यांनी खास त्यांच्यासाठी केलेलीच सतार रविशंकर वापरत होते. त्यावर त्यांनी इतकं वादन केलं होतं की, आता ती साथ देत नव्हती. त्यामुळे दुसऱ्या सतारीची ऑर्डर त्यांनी नोडू मल्लिक यांना दिली. नोडू मल्लिक यांनी एकसारख्या दोन सतारी बनवल्या. एक रविशंकर यांच्यासाठी आणि दुसरी त्यांचे शिष्य अमिय दासगुप्त यांच्यासाठी. नोडू यांनी रविशंकरांना एक निवडायला सांगितली. जरी दोन सतारी एकसारख्या वाटत होत्या तरी प्रत्येक सतार वेगळीच असते. रविशंकर यांनी त्यातल्या एकीची निवड केली, थोडे दिवस त्यावर वादन केलं आणि पुन्हा अमिय दासगुप्त यांच्याशी सतारीची अदलाबदल केली. पुढे कायम ही सतार रविशंकर यांच्यासोबत होती. नोडू मल्लिक अगदी थोड्या सतारी करायचे. कारण सर्व काम ते एकटेच करत असत. कुणाचीही मदत घेत नसत. त्यांनी सबंध आयुष्यभर सतार निर्मिती आणि सतारीतून येणाऱ्या आवाजाच्या संशोधनावर काम केलं. त्यांनी लग्न केलं नाही की कधी त्यांना मुलींमध्ये रसही वाटला नाही. रविशंकर त्यांना ‘नो-डू’ म्हणून चिडवायचेही. काही ठिकाणी नोडूंची ओळख ते आपले सासरे म्हणून करून द्यायचे. लोक गोंधळून जात. मग रविशंकर याचा खुलासा करत, ते त्यांच्या सतारीला आपली पत्नीच मानत असत. आणि नोडूही जी सतार तयार करायचे ती त्यांच्या मुलाप्रमाणेच असल्याचं त्यांना अनुभवास येई. सतारीची देखभाल करण्यासाठी त्यांनी रविशंकरांसोबत अनेक दौरे केले.

1965मध्ये लॉस एंजिलीसमधल्या 'युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया'मध्ये रविशंकर यांनी लहान-मोठ्या कार्यशाळा घेतल्या. पण या व्यतिरिक्तही वेगवेगळे कार्यक्रम, परिषदा, रेडिओ, दूरदर्शन, मुलाखती, मासिकं आणि त्यांनी लिहिलेलं 'माय म्युझिक माय लाईफ' या पुस्तकातून शास्त्रीय संगीताबाबत ते लोकांना शिक्षित करतच राहिले. 1973 मध्ये त्यांनी आपले शिष्य हरिहर राव यांच्या साथीनं लॉस एंजिलीसमध्ये रविशंकर ‘म्युझिक सर्कल’ची स्थापना केली. खास भारतीय संगीतकारांसाठी केलेली ही सुविधा होती. आजही भारतातल्या शास्त्रीय संगीतातल्या कलाकारांना हा मंच खुला आहे. त्यांनी 1962मध्ये मुंबई इथं किन्नर या संगीत विद्यालयाची स्थापना  केली. पुढे 1997 मध्ये याचीच एक शाखा लॉस एंजिलीसमध्ये सुरू केली. एखाद्या मोठ्या कार्यक्रमाचं सादरीकरण करावं या हेतूनं 1964मध्ये 'नवरसरंग'ची निर्मिती झाली. यामध्ये नृत्य, जादू, कठपुतली बाहुल्या यांचाही समावेश होता. या शोमध्ये इतके कलाप्रकार होते की, ज्यांनी तो शो पाहिला आहे, त्यांच्या म्हणण्यानुसार अशा प्रकारचा भारतातला हा एकमेव कार्यक्रम होता. नवरसरंगच्या निर्मितीमध्ये श्रीलंकेतल्या गुणी पियानोवादक डॉ.पेनिलोप यांची मोलाची साथ होती. रविशंकर यांनी त्यांच्याबरोबर एक पुस्तकही लिहिलं. म्युझिक मेमरी या पुस्तकात, नव्यानं संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी माहिती आहे. भारतीय आणि पाश्चिमात्य संगीताचा यात समावेश आहे.

रविशंकर यांनी जी जी निर्मिती केली. ती सर्व त्या काळातली सर्वात प्रथम घडलेली गोष्ट होती. नवीन संगीतरचना असो, रंगमंचरचना असो किंवा चित्रपट संगीत असो.. पुढे काही लोकांनी त्याची नक्कल करून फुशारक्या मारल्या असं म्हटलं जातं. त्यांचा विचार काळाच्या बराच पुढचा होता. त्यामुळे त्याचं मोलही समीक्षकांना उशिरा कळलं. पाश्चिमात्य संगीताच्या प्रभावामुळे रविशंकर परंपरागत भारतीय संगीत खालच्या स्तरावर आणत आहेत, असे आरोपही त्यांच्यावर झाले. परंतु रविशंकर यांना आपल्या कामाचं पूर्ण भान होतं. संगीताच्या प्रांतात ते नेहमीच दोन रुपांत दिसतात. पहिलं प्रमुख रूप म्हणजे त्यांच्या गुरुंकडून शिकलेल्या शास्त्रीय संगीताची परंपरा कायम ठेवणारे सतारवादक आणि दुसरं रूप म्हणजे जगभरातल्या संगीताच्या अभ्यासाने, धाडसाने प्रयोग करत राहणारे संगीतकार. काही लोकांची ही टीका ऐकूनही ते आपल्या मार्गावर अविचल राहिले. त्यांच्या वयाच्या पन्नाशीत ते प्रसिद्धीच्या शिखरावर होते. ते इतके व्यस्त असायचे की आपण नेमकं कुठे काय करत आहोत याचा विचार करण्याइतकाही वेळ त्यांच्याकडे नव्हता. त्यांचे व्यवस्थापक तारखा घेऊन येत आणि कार्यक्रम निश्चित होत असे. जणू काही या व्यवस्थापकांनी ठरवलेलं आयुष्य ते जगत होते. पण वयाच्या पन्नाशीच्या टप्प्यावर हे सगळं सांभाळण्याइतकी परिपक्वता त्यांच्याकडे होती. लहान वयात हे निभावता आलं नसतं असं रविशंकर म्हणतात.

पश्चिमेकडे लोकप्रियता मिळत असतानाच भारतात मात्र टोकाची टीका वाट्याला येत होती. रविशंकर पैशांसाठी हे सगळं करत आहेत, शास्त्रीय संगीत अपवित्र करत आहेत असे आरोप केले गेले. या वयात पैशांचं प्रलोभन अर्थातच नव्हतं. पैसे तर आपोआपच मिळत होते. गरजेपेक्षा कितीतरी जास्त. खरं तर जितके पैसे त्यांना मिळत होते. त्याचा उपभोग घेण्यासाठी आवश्यक निवांतपणा रविशंकर यांना कधी मिळाला नाही. भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार हे त्यांचं जीवित कार्य झालं होतं. रविशंकरांमुळे भारतीय संगीतकारांना परदेशात कार्यक्रमाच दार उघडलं होतं. जे सुरुवातीला रविशंकरांवर टीका करत होते, तेही हळूहळू या संधीचा फायदा उठवत होते.

1968मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘माय म्युझिक माय लाईफ’ या पुस्तकात तोपर्यंत त्यांना आलेले अनुभव आणि त्यांची सांगीतिक जडणघडण याबद्दल विस्तृत लिहिलं आहे.

याच काळात म्हणजे 1971 मध्ये ‘राग’ हा रविशंकर यांच्यावरचा माहितीपट प्रसिद्ध झाला. या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी ते पुन्हा मैहरला (जिथे सुरुवातीला त्यांनी अल्लाउद्दीन खान यांच्याकडून तालीम घेतली) गेले होते.

1976 मध्ये पश्चिमेतील एकल वादनाच्या त्यांच्या कार्यक्रमाला 20 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त न्यूयॉर्क इथल्या ‘कॅथेड्रल ऑफ सेंट जॉन डिव्हाइन’च्या भव्य वास्तूमध्ये संध्याकाळपासून दुसऱ्या दिवशी उजाडेपर्यंत सहा हजार लोकांसमोर रविशंकर सतार वाजवत होते. कार्यक्रम संपताना रविशंकर अत्यंत तेजस्वी दिसत होते. श्रोत्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले होते, ते अद्भुत दृश्य होतं. नव्या दमाच्या कलाकारांना आपणहून शिकता यावं, भारतातल्या लोकांकडून त्यांच्या कलेला प्रोत्साहन, पाठिंबा मिळावा या हेतूनं रविशंकर यांनी ‘Research Institute for Music and Performing Arts’ची स्थापना केली. पुढे याच संस्थेकडून त्यांचं ‘रागमाला’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं.

1980 च्या दशकात रविशंकरांचा कार्यक्रम इटलीतल्या मिलान इथं आयोजित केला होता. नोडू मल्लिक या वेळी त्यांच्या बरोबर नव्हते. या वेळच्या विमान प्रवासात त्यांच्या सतारीचे दोन तुकडे झाले होते. सतारीबरोबर रविशंकरांचं मनही दुभंगलं. तो कार्यक्रम रद्द करण्यात आला. ते भारतात परत आल्यावर ही गोष्ट नोडू यांच्या कानावर घालण्याची त्यांची हिम्मत झाली नाही. या वेळी पहिल्यांदाच त्यांनी सतार एका वेगळ्या बॉक्समधून नेली होती. अन्यथा ते विमानाचं एक तिकीट काढून सतार आपल्या जवळ ठेवत असत. पण हळूहळू सुरक्षेच्या कारणावरून असं करणं अवघड होत होतं. सतारीमध्ये काही लपवलेलं नाही ना हे पाहण्यासाठी विमानतळावरचे लोक तिची तपासणी करत यामुळे तिची घडण बिघडत असे. म्हणून सतारीसाठी वेगळा बॉक्स तयार करून घेतला होता. पण तो लाभला नाही. त्यांनी नोडूंना न सांगताच ती सतार दुरुस्त करून घेतली, पण ती काही पहिल्यासारखी झाली नाही. या प्रसंगानंतर कार्यक्रमाच्या वेळी रविशंकर नेहमी दोन सतारी जवळ ठेवत असत. रविशंकर यांच्या कामाचा वेग अफाट होता. निर्मिती आणि सादरीकरण या दोन्ही थकवणाऱ्या गोष्टी करण्यासाठी लागणारी ऊर्जा त्यांच्या ठायी ओसंडून वाहत असे. भारतीय शास्त्रीय संगीत पश्चिमेतल्या लोकांपर्यंत पोचवणं, त्याला मान्यता मिळवून देणं हे महान कार्य त्यांनी केलं. पाश्चिमात्य संगीतात प्रामुख्याने बिट्सचा समावेश असतो. भारतीय शास्त्रीय संगीतात लय, ताल, आवर्तन असते. त्यातलं सौंदर्य शुद्ध रूपात जगभर पोचवण्याचं हे कार्य होतं. त्यामुळेच 'विश्वसंगीताचे पितामह' असा पंडित रविशंकर यांचा उल्लेख केला जातो.

जगभरातले सर्वोच्च सन्मान त्यांना मिळाले. जगातल्या वेगवेगळ्या विद्यापीठांच्या मिळून अकरा मानद डॉक्टरेट, भारतामध्ये इंडियन आर्मी स्पेशल अ‍ॅवॉर्ड, राजीव गांधी एक्सलेन्स अ‍ॅवॉर्ड, भोपालचा कालिदास सन्मान पुरस्कार एस्. टी. उद्योगाकडून दिला जाणारा ‘स्पिरीट ऑफ फ्रीडम पुरस्कार’, असे भारतातले अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. शिवाय स्वीडनचा ‘पोलर म्युझिक प्राइज’, जपानचा ‘प्रीमियम इंपिरीयल’, फ्रान्समधला सर्वोच्च नागरी फ्रेंच सन्मान, रेमन मॅगसेसे पुरस्कार आणि अजून किती तरी पुरस्कारांची मालिकाच त्यांच्या नावे आहे. संगीत क्षेत्रातला सर्वोच्च ग्रॅमी पुरस्कार सर्वाधिक वेळा मिळवणारे ते भारतीय कलाकार आहेत.

भारत सरकारचा पद्मभूषण, पद्मविभूषण हे पुरस्कार त्यांना मिळाले. आणि 1999साली ‘भारतरत्न’ या भारतातल्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने त्यांचा सन्मान केला गेला. 11 डिसेंबर 2012 या दिवशी लॉस एंजिलीस इथे त्यांची प्राणज्योत मालवली. विश्वसंगीतातला हा ‘रवि’ त्याच्या निर्मितीच्या माध्यमातून तरीही निरंतर प्रकाश देतो आहे.

(संदर्भ : ‘रागमाला’ - पं. रविशंकर यांच्या आत्मचरित्राचा हिंदी अनुवाद)

या लेखाचा पूर्वार्ध वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

- वर्षा उदयन कुलकर्णी, कराड
varshaukul@gmail.com


पंडित रविशंकर यांचा शेवटचा जाहीर कार्यक्रम 

 

Tags: शास्त्रीय रागसंगीत सतार आंतरराष्ट्रीय भारतीय संगीत संगीतकार रविशंकर सतारीये राग राग संगीत Load More Tags

Comments:

Dr. Bhagwat Shinde

डॉ. वर्षा , मनःपूर्वक अभिनंदन! तुमचे दोन्ही लेख वाचले. खूप छान आहेत. पंडित रविशंकर यांच्या जडणघडणी संदर्भातील महत्त्वपूर्ण अशा सर्व टप्प्यांचे अत्यंत चांगल्या पद्धतीने विवेचन केले आहे. शास्त्रीय संगीताचा विषय देखील अत्यंत चांगल्या पद्धतीने मांडता येतो हे तुमच्या या दोन्ही लेखावरून दिसून येते. खरंतर यापूर्वी शिक्षणशास्त्राच्या एक सुविद्य अभ्यासक म्हणून तुमची ओळख माझ्यापुरती मर्यादित होती. परंतु या दोन्ही लेखातून संगीता विषयीच तुमच प्रेम, संगीत विषयक तुमचं आकलन थक्क करून सोडणारे आहे. रविशंकर यांच्या चरित्र लेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

Add Comment