पौर्वात्य आणि पाश्चिमात्य जगाला ज्यांनी आपल्या सतारीच्या संगीताच्या सेतूने जोडले आणि भारतीय शास्त्रीय संगीताची पताका पाश्चिमात्य जगात डौलाने फडकाविली त्या भारतरत्न पंडित रविशंकर यांचा 7 एप्रिल हा जन्मदिवस. त्यानिमित्ताने त्यांच्या सांगीतिक कारकीर्दीचा आढावा घेणारा हा दीर्घलेख दोन भागांत प्रसिद्ध करत आहोत.
पंडित रविशंकर यांचा जन्म 7 एप्रिल 1920ला बनारसमधल्या तिलभांडेश्वर भागात झाला. त्यांचे वडील श्यामशंकर चौधरी हे मूळचे बंगालचे. रविशंकर यांचं मूळ नाव होतं, रोवीन्द्रों शौनकोर चौधुरी. स्थळकाळानुसार या नावाच्या 'रवीन्द्र', 'रोवीन्द्रा' अशा आवृत्या झाल्या. ते वीस-एकवीस वर्षांचे झाल्यावर त्यांनी स्वतःच स्वतःचं नाव बदलून ‘रवि’ असं केलं. त्यांचे वडील वकील, लेखक, तत्त्वज्ञ, संगीतप्रेमी होते. झालवाड या राजस्थानातल्या एका राजघराण्यात 1905पासून मुख्य दिवाण म्हणून ते काम पाहत होते. त्यापूर्वीच हेमांगिनी, म्हणजे रविशंकर यांची आई यांच्याशी त्यांचं लग्न झालेलं. त्यांनाही संगीताची चांगली जाण होती. त्या गायच्याही. हेमांगिनी याही बनारसमधल्या समृद्ध घराण्यातल्या होत्या. पण रविशंकरांच्या जन्माच्या वेळी ही समृद्धी नव्हती. रविशंकर यांचा मोठा भाऊ त्यांच्यापेक्षा वीस वर्षांनी मोठा आणि इतर भाऊ त्यांच्या पाठचे.
हेमांगिनी यांच्याशी विवाहबंधनात असतानाच श्यामशंकर यांनी मिस मॉरेल नावाच्या एका इंग्रजी महिलेशी विवाह केला आणि रविशंकर व त्यांच्या भावंडांच्या खडतर आयुष्याला सुरुवात झाली.
त्यांची आई आपल्या मुलांना घेऊन बनारसला आली होती. रविशंकरांचे मोठे भाऊ उदयशंकर शिकायला लंडनला आधीच गेले होते. त्यांची सावत्र आई लवकरच मरण पावली. त्यानंतर त्यांचे वडील परदेशात निघून गेले. झालवाड संस्थानातून येणारी पेन्शन बनारसला या कुटुंबीयांना पाठवायची असं ठरलं होतं, म्हणून त्यांचे वडील हेमांगिनी आणि मुलांना वेगळे पैसे पाठवत नसत. ही रक्कम 200 रुपये ठरली होती. खरं तर त्या वेळच्या मानानं ही रक्कम खूप होती. पण ती या कुटुंबापर्यंत पोचेतो तिला पाय फुटत! प्रत्यक्षात ते पैसे पोचत तेव्हा ते 60 रुपये असत. पण त्यांच्या स्वाभिमानी आईनं कधीही नवऱ्याकडं हात पसरले नाहीत. शिवणकाम करून, दागिने किंवा राणीकडून पूर्वी मिळालेल्या इतर भेटी गहाण टाकून ती कुटुंब चालवत असे. बनारसमध्ये त्या वेळी ‘संगीत समिती’ नावाची एक सामाजिक-सांस्कृतिक संस्था होती. रविशंकरांचे एक भाऊ मेजदा हे त्या संस्थेचे सदस्य होते. या संस्थेची बरीच वाद्यं होती, कॉर्नेट, हार्मोनियम, दिलरुबा, इसराज आणि सतार... त्यातली बरीचशी वाद्यं रविशंकर यांच्या घरीच असायची. त्या वयात रविशंकरांची ही आवडती खेळणी होती. सतार तर फारच आवडीची. जेव्हा जेव्हा संधी मिळेल, तेव्हा ते सतार वाजवत असत. आपल्या भावाच्या मित्राकडून ते रवींद्र संगीत शिकत असत. जितकं जमेल तितकं गाणं वाजवणं असं सुरू झालं. दुसरीकडे अभ्यासाचं वेड लागलं होतं. अक्षर ओळख व्हायची खोटी की हाताला लागेल ते वाचण्याचा सपाटा त्यांनी लावला.
वयाच्या पाचव्या वर्षीच पुस्तक वाचनाला रीतसर सुरुवात झाली होती. रवींद्रनाथ टागोर, विजेंद्र लाल राय, शरच्चंद्र चटर्जी यांचं लेखन रविशंकरांना विशेष आवडायचं. पौराणिक कथांचं त्यांना विशेष आकर्षण होतं. आई घरकामात मग्न, भावंडं शाळा नाही तर कॉलेजात. अशा वेळी रविशंकर आरशासमोर उभं राहून वाचलेल्या कथांमधली पात्रं होत असत. नायक, नायिका, खलनायक सगळं स्वतःच! एक प्रकारे स्वतःच स्वतःचं मनोरंजन करून घेण्याचा तो मार्ग होता.
रविशंकर साधारण आठ वर्षांचे होते तेव्हा शाळेतला एक व्रात्य मुलगा त्यांना म्हणाला, "आम्ही घर बांधतोय आणि तिथे वीज असणार आहे. तू आलास तर तुला दाखवीन." त्या मुलाचं बोलणं ऐकून ते वीज बघायला गेले आणि त्या मुलानं त्यांना उघड्या तारेला हात लावायला सांगितला. त्यांनी तसा हात लावला. संबंध शरीर हललं. दुःख, राग, हतबलता, घृणा हे सगळं एकाच वेळी ते अनुभवत होते. पण त्या वेळी ते वाचले होते.
काही दिवसांनी एका मित्रानं, प्रत्यक्ष शंकर-पार्वती एका घरी आल्याचं सांगितलं. पौराणिक कथांमुळं या सर्व व्यक्तिरेखा माहीत होत्याच. त्यांना या देवाला बघण्याची ओढ लागली. ते त्या घरी गेले आणि खरंच एक तेजस्वी जोडपं त्यांना दिसलं. पुढे काही वर्षांनी त्यांना समजलं की, त्या बाई म्हणजे योगी आनंदमयी होत्या आणि त्यांचे पती त्यांचे शिष्य होते. नंतरच्या काळात रविशंकर त्यांचे भक्त झाले.
मोठे भाऊ उदयशंकर 1929 साली भारतात आले, ते भारतीय कलाकारांना परदेशात घेऊन जाण्याचं स्वप्न घेऊनच. एक वर्ष भारतीय नृत्य, चित्रकला यांचा शक्य तितका अनुभव व शिक्षण घेऊन 1930मध्ये पॅरिसला परत गेले. यावेळी रविशंकर हेही आई आणि भावासह त्यांच्याबरोबर होते. या बोटीतल्या प्रवासात एक गोष्ट फक्त रविशंकर यांच्या आवडीची नव्हती, ती म्हणजे परदेशी पद्धतीने तयार केलेलं अन्न. पण त्यांच्या भावाला वाटायचं की, या सर्वांनी पश्चिमेतल्या सर्वच सवयी लवकर आत्मसात कराव्यात. पॅरिसला पोचेपर्यंतचा त्यांचा प्रवास स्वप्नवत होता. स्वच्छ, सुंदर, सुगंधी वातावरण ते पहिल्यांदाच अनुभवत होते.
शिवाय संगीताचं अद्भूत वातावरणही त्यांच्या आजूबाजूला होतं. भारतात राहूनही जी भारतीय वाद्यं त्यांनी कधी बघितली नव्हती ती सर्व त्यांना इथे बघायला मिळाली. उदयशंकर यांनी भारतभर फिरून दीडशेच्या आसपास वाद्यं तिकडे नेली होती. यांत लोक वाद्यं, शास्त्रीय वाद्यं, आदिवासी ढोल असं सर्व काही होतं. पॅरिस हे कलेचं माहेरघर. देश-विदेशातून कलाकार ही वाट तेव्हाही धरत असत. इथे आल्यावर रविशंकर यांना चित्र, संगीत, नृत्य यांचं अनोखं विश्व खुलं झालं. पण ते रमले ते मात्र शास्त्रीय संगीतात, या संगीताची जाण उपजतच त्यांच्यात होती. लहान वयात कलेचं मिळणारं हे वातावरण त्या वेळी त्यांना सहज वाटत होतं. पण ते किती दुर्मिळ वातावरण होतं, याची जाणीव पुढे मोठेपणी त्यांना झाली. दुसरीकडे पॅरिसमधल्या एका कॅथलिक शाळेत त्यांनी आपल्या वयाच्या खालच्या वर्गात प्रवेश घेतला. कारण भाषेचा प्रश्न होता. खरं तर बनारसमध्ये त्यांची दोन वर्षं शाळा झाली होती. पण ती शाळा सुटल्यावरच त्यांचं शिक्षण जास्त वेगानं झालं असं ते सांगतात. मोठ्या भावांकडून गणित, विज्ञान आणि इतर विषय ते शिकले. पण ते त्यांच्या स्वतःच्या मर्जीनं, वेगानं.
पॅरिसमधल्या या शाळेचा त्यांना एक मोठा फायदा झाला. तो म्हणजे फ्रेंच भाषेचं ज्ञान. फ्रेंच भाषा समजायला लागल्यामुळं फ्रेंच चित्रपट पाहणं आता सोपं झालं होतं. पॅरिसच्या या सांगीतिक गटामध्ये अगदी सुरुवातीपासूनच रविशंकरांनी गायला, वाजवायला आणि नृत्य करायला सुरुवात केली. नृत्य ते अर्थातच त्यांच्या भावाकडून शिकत होते. त्यांच्या या गटाचे कार्यक्रम संपूर्ण युरोपात होत असत. फ्रान्स, स्वित्झर्लंड, इटली, जर्मनी, हॉलंड, बेल्जियम, चेकोस्लोव्हेकिया, ऑस्ट्रिया, हंगेरी, युगोस्लाव्हिया, रुमानिया, बल्गेरिया, एस्टोनिया, लिथुएनिया, लाविया या देशांतून त्यांनी कार्यक्रम केले. प्रत्येक देशाचं वेगळेपण टिपलं. नुसतंच देशाचं बाह्यरूप नाही तर तिथल्या नागरिकांची सांस्कृतिक, वैचारिक घडणही अनुभवता आली.
चेकोस्लोव्हेकियाला ते गेले तेव्हा तिथल्या लोकांना महाभारत, भगवद्गीता माहीत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. पहिल्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर जगभर झालेले बदल दिसत त्यांना होते. रविशंकर जसे या दौऱ्यांना नियमित जायला लागले, तशी त्यांची आई भारतात परत आली आणि बनारसला भाड्याच्या घरात एकटी राहायला लागली. फ्रेंच भाषा समजू लागल्यामुळे रविशंकरांना आता त्या साहित्याचं नवं दालन खुलं झालं होतं. एकंदरीतच भावांकडून शिकलेला ऐवज आणि इथल्या शाळेत शिकलेली फ्रेंच भाषा याशिवायचं त्यांचं सगळं शिक्षण जीवन जगतानाच झालेलं. प्रत्यक्ष शाळेबाहेर! उदयशंकरांच्या या कार्यक्रमाला इतकी अमाप प्रसिद्धी मिळत होती, की तीस ते चाळीसच्या दशकात गांधीजी आणि टागोरांच्या खालोखाल त्यांचं नाव होतं, असं रविशंकरांनी म्हटलं आहे.
त्यांची उठबस आता हॉलिवुडमधील प्रसिद्ध व्यक्तींमध्ये होत असे. रविशंकर सर्वांच्या आवडीचे होते. इतके की, मेरी ड्रेसलर या प्रसिद्ध अभिनेत्रीनं रविशंकरांना दत्तक घेण्यासाठी उदयशंकरांकडे विचारणा केली होती, त्यांनी ती तत्काळ नाकारली. तो नकार रविशंकरांना आवडला नाही. त्यांना त्या वेळी त्या चंदेरी दुनियेचं आकर्षण वाटत होतं आणि ही आयती संधी होती असा त्या लहान वयातला विचार होता.
लहान वयात रविशंकरांना वडिलांविषयी विशेष प्रेम वाटत नव्हतं, फार पूर्वीच ते परदेशात स्थायिक झाले होते. पण वाढत्या वयात आपल्या वडिलांची विद्वत्ता, त्यांचं कर्तृत्व त्यांना समजून आलं. रविशंकर स्वतः परदेशात गेल्यावर त्यांना ते जवळून पाहता आलं. जिनिव्हा इथल्या चर्चमध्ये वडिलांनी केलेलं सामवेदातील मंत्रांचं पठण त्यांनी प्रत्यक्ष पाहिलं. स्पष्ट आणि मधुर वाणीतल्या त्या उच्चारांनी रवि भारावून गेले. त्यांचे वडील श्यामशंकर हे 1931 मध्ये जिनिव्हा विद्यापीठात डॉक्टरेट करणारे पहिले भारतीय होते. भारतीय तत्त्वज्ञानावरची त्यांची दोन पुस्तकं युरोपात प्रकाशित झाली होती. भारतीय कलांवर आधारित अनेक कार्यक्रम ते तिकडे आयोजित करत असत. अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये भारतीय दर्शनांवर त्यांची व्याख्याने होत असत.
वडिलांचं हे कर्तृत्व त्यांना वडिलांकडे आकर्षित करत होतं. वडिलांविषयी जितकं जास्त कळत गेलं, त्यांच्यावरचा राग कमी कमी होत गेला आणि आदर, श्रद्धा वाढत गेली.
रविशंकर लहान वयात जगभर फिरल्यामुळे वेगवेगळे विषय, त्यातले वेगवेगळे तज्ज्ञ, त्यांचं काम या सगळ्याचा आवाका त्यांना समजत होता. रवींद्रनाथ टागोरांचं व्यक्तिमत्त्व पाहून ते प्रभावित झाले होते. नोबेल पारितोषिक मिळालं असलं तरी त्यांच्या गुणवतेला न्याय देणारा असा त्यांचा स्वीकार झाला नाही अशी खंत रविशंकरांनी व्यक्त केली आहे.
चार वर्षं परदेशात घालवून जेव्हा ते भारतात आले तेव्हा त्यांनी पहिल्यांदा त्यांचे गुरु प्रख्यात सरोदवादक उस्ताद अल्लाउद्दीन खां यांना बघितलं, ऐकलं, संगीत समारोहासाठी ते कलकत्याला आले होते. अल्लाउद्दीन खां यांनी स्वतः काही वाद्यं तयार केली होती. ते कडक शिस्तीचे होते. बऱ्याच जणांना ती जाचक वाटायची. पण रविशंकरांना मात्र त्यांनी वडिलांची माया दिली. त्याला कारणही तसंच घडलं. रविशंकरांचे वडील एका न्यायालयीन केससंदर्भात इंग्लंडमध्ये असताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. ही घटना घडली तेव्हा उदय आणि रविशंकर त्यांच्या कार्यक्रमासाठी सिंगापूरमध्ये होते. त्यांना हे समजल्यावर त्यांनी पुढचा दौरा रद्द केला आणि ते भारतात आईजवळ आले. काही दिवस तिच्याजवळ राहून पुन्हा त्या दौऱ्याचे नियोजन केले. या वेळी त्यांच्याबरोबर अल्लाउद्दीन खां परदेश प्रवासात असणार होते. या सर्वांना निरोप द्यायला त्यांची आई बोटीपर्यंत आली होती. ही मुलं जेव्हा बोटीवर चढत होती, तेव्हा आईला भरून आलं. जणू ती आपल्या मुलांचा अखेरचा निरोप घेत होती. ती रविशंकरांना 'रोबू' म्हणायची. तिने खांसाहेबांना सांगितलं, "रोबू थोडा चंचल आहे. आता त्याचे वडीलही नाहीत. आणि मी तुमच्यासोबत येऊ शकत नाहीये. त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलाप्रमाणे त्याच्याकडे लक्ष द्या." असं म्हणून त्यांच्या आईनं आपल्या या चंचल मुलाचे हात असामान्य प्रतिभेच्या अल्लाउद्दीन खां यांच्या हातांमध्ये सोपवले. हा अतिशय भावूक क्षण होता. सर्वांच्याच डोळ्यात पाणी होतं. खांसाहेब आईला म्हणाले, “तू रत्नगर्भा माता आहेस. आजवर मला अकबर अली हा एकच पुत्र होता.. आजपासून मला दोन मुलं आहेत.” रोबू आणि खांसाहेब यांचा अन्य कलाकारांच्यासह प्रवास सुरू झाला....
खांसाहेब रोबूला सरोद आणि थोडी सतार पण शिकवत असत तरीही रविशंकरांचा कार्यक्रमातला मुख्य भर अजूनही नृत्यावरच होता. थोड्याच दिवसांत त्यांनी स्वतः साडेचार मिनिटांची कथ्थक शैलीतल्या एका नृत्याची रचनाही केली होती. रविशंकरांना वयाच्या अठराव्या वर्षीच प्रसिद्धी, पैसे, प्रशंसा सगळं काही मिळत होतं. पण या मुलाची प्रतिभा किती उच्च आहे हे खांसाहेब जाणून होते. गायन, वादन, नृत्य या सगळ्या गोष्टी एकाच वेळी करत राहण्याऐवजी रविशंकरांना एकाच गोष्टीवर लक्ष एकाग्र करायला त्यांनी सांगितलं आणि त्यातही सतार, कारण रविशंकरांना सतार वाजवताना त्यांनी पाहिलेलं होतं. रविशंकरांना आता एका मार्गाची निवड करायची होती. संगीताची आंतरिक ओढ त्यांना नव्या मार्गाकडे आकृष्ट करत होती. खांसाहेबांचे आकर्षण तर होतेच, त्यांनी मनाचा कौल ओळखला. शास्त्रीय संगीताची तालीम घेण्याचं नक्की झालं. पण अल्लाउद्दीन खां यांचा शिष्य होणं हे मोठ्या जबाबदारीचं काम होतं. रविशंकरांना आजवरच्या विलासी जीवनशैलीचा त्याग करावा लागणार होता. कारण खांसाहेबांनी युरोप दौऱ्यात रविशंकरांचं श्रीमंती राहणीमान जवळून पहिलं होतं आणि ते खांसाहेबांच्या वृत्तीशी मेळ खाणारं नव्हतं हे रविशंकरांनी अचूक हेरलं होतं. त्यामुळे खांसाहेबांकडे, मैहरला जायचं ठरल्यावर त्यांना वेगळी खरेदी करावी लागली. हातमागावरच्या जाड्या-भरड्या कापडापासून शिवलेले कपडे, साधी चादर वगैरे. रविशंकर मैहरला पोचले तेव्हा नुकतीच त्यांची मुंज घरातल्या इतर मुलांबरोबर विधिवत केली होती. त्यामुळे डोक्यावरचे केसही काढलेले होते. त्यामुळे मैहरला ते पोचले तेव्हा ते अगदीच वेगळे दिसत होते. खांसाहेबांनी त्यांना पाहिलं आणि ते म्हणाले, “ही काय दशा करून घेतलीस?” वरवर जरी ते असं म्हणत असले तरी आतून त्यांना आनंदच झाला असणार हे रविशंकर ओळखून होते.
आणि रविशंकरही आपल्या गुरुला खुश करण्यासाठीच तर हे करत होते. अल्लाउद्दीन खां यांनी आपल्या जुन्या घरी रविशंकरांची राहण्याची सोय केली. हे घर त्यांच्या राहत्या घराच्या जवळच होते. आणि रविशंकरांची इच्छा होती की, आपला भार त्यांच्यावर पडू नये. त्या दृष्टीने स्वतंत्र राहणंच त्यांना आवडणार होतं. या बंद घरात राहायला सुरुवात केल्यानंतर आपण कोणत्या गोष्टी स्वीकारल्या आहेत हे लवकरच त्यांना कळून चुकलं. परदेशातल्या पंचतारांकित हॉटेल्समध्ये असणारे बेड्स सोडून नारळाच्या काथ्यापासून बनवलेल्या बाजेवर आता त्यांना झोपावं लागत होतं. जमिनीवर मखमली गालिच्यांच्या जागी साप आणि विंचू संचार करताना दिसत होते. डास, पाली यांचं तर आधीपासूनचंच हे घर. कानावर पडणाऱ्या कर्णमधुर संगीताची जागा आता लांडग्यांच्या आवाजानं घेतली होती. इथे एकटं वाटण्याबरोबर भीतीही वाटत होती. या वातावरणाबद्दल रविशंकरांनी कधी तक्रार केली नाही. उलट, परदेशात राहिल्यामुळे माझ्या सवयी बिघडलेल्या होत्या अशी टिपणी त्यांनी केली आहे. पुढची सात वर्षं ही त्यांची जीवनशैली असणार होती. समर्पण या एकमेव भावनेने, खांसाहेबांवरच्या अद्वितीय श्रद्धेने ते संगीत आत्मसात करत राहिले. हा गुरुशिष्य संबंध व्यवहारापेक्षा आध्यात्मिक पातळीवरचा होता. युगानुयुगे समृद्ध होत आलेली ही सांगीतिक परंपरा शिकून घेणं म्हणजे अहंकाराला थारा नाही, जे शिकवलं जाईल त्याचा फक्त आणि फक्त स्वीकार; शंका, प्रतिप्रश्न नाही....
मैहरला आल्यावर तीन-चार महिन्यांनी खांसाहेब रविशंकरांना एक राग वाजवायला शिकवत होते. त्या वेळी रविशंकरांच्या मनगटातली ताकद कमी पडते आहे हे खांसाहेबांच्या लक्षात आलं. त्यांनी आपल्या या शिष्याला फटकारलं. “एखाद्या लहान मुलीसारखा आहेस तू. तुझ्या हातात भरायला बांगड्या आण.” रविशंकरांनी आयुष्यात प्रथमच असं काही ऐकलं होतं. त्यांनी सतार उचलली आणि ते तडक तिथून बाहेर पडले. बास झालं हे! असा विचार करून मैहर सोडून जायचं पक्कं ठरलं. दुसऱ्या दिवशी खांसाहेबांचा निरोप घ्यायला ते गेले. तेव्हा खांसाहेबांनी आठवण करून दिली, “तुझ्या आईला मी दिलेलं वचन तू विसरलास का? तुला माझ्या मुलाप्रमाणे वागवेन...” प्रत्यक्षात तर ते त्यांच्या स्वतःच्या मुलाला - अली अकबर खां यांना – ‘छळ’ म्हणता येईल अशी वागणूक देत होते. अली अकबर खां यांनी झोकून देऊन वादन शिकावे यासाठीचा तो मार्ग होता. त्या तुलनेत त्यांच्या तोंडून आलेलं हे वाक्य म्हणजे काहीच नाही. पुढे ते म्हणाले, "तुला जायचं असेल तर तू जाऊ शकतोस. पण मला दुःखी करून जातो आहेस एवढं लक्षात ठेव." हे बोलताना त्यांचा आवाज भरून आला होता. त्यांचे हे शब्द ऐकून रविशंकरांना अपराधी वाटू लागलं. गुरु-शिष्यांमधलं प्रेम व्यक्त व्हायला डोळ्यातल्या पाण्याने वाट करून दिली. आणि रविशंकरांचा सोडून जाण्याचा निर्णय विरघळून गेला.
या दिवसापासून पुन्हा कधी असा प्रसंग उद्भवला नाही. शिकवताना खांसाहेबांना कधी राग आला तरी ते बाहेर पडून इतर कुणाला तरी मारून आपला राग शांत करायचे. कुणी सापडलं नाही तर रस्त्यावरच्या बेवारस कुत्र्याला ते मारत असत, पण आपल्या या शिष्याला मात्र त्यांनी अतिशय प्रेमानं सांभाळलं. जेव्हा त्यांच्यातल्या रागाचा स्फोट होऊन जात असे, तेव्हा ते जगातले आत्यंतिक नम्र आणि दयाळू व्यक्ती बनत असत.
रविशंकरांसाठी त्यांनी खास सतार तयार करून घेतली होती. सतार शिकणं सुरु होतं... आणि 1939 वर्ष संपत आलेलं. रीतसर तालीम घ्यायला लागून दीड वर्ष होत आलं होतं. अलाहाबाद इथं एका संगीत परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. उत्तर भारतातले दिग्गज संगीतकार पहिल्या ओळीत बसलेले. उस्ताद फैयाज खां, उस्ताद मुश्ताक हुसैन, पंडित ओमकारनाथ असे महान कलाकार सभेत होते आणि मंचावर आपली कला सादर करत होते. शास्त्रीय संगीताचा रविशंकरांचा हा पहिलाच कार्यक्रम होता आणि भारतातलाही... हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाला.
(संदर्भ : ‘रागमाला’ - पं. रविशंकर यांच्या आत्मचरित्राचा हिंदी अनुवाद)
या लेखाचा उत्तरार्ध उद्या प्रसिद्ध होईल.
- वर्षा उदयन कुलकर्णी, कराड
varshaukul@gmail.com
Monterey Pop या 1968 मधील अमेरिकन कॉन्सर्ट फिल्ममधील रविशंकरांच्या वादनाचे ध्वनीचित्रमुद्रण (त्यांना तबला साथ केली आहे उस्ताद अल्लारखां यांनी)
Tags: संगीत शास्त्रीय रागसंगीत सतार आंतरराष्ट्रीय भारतीय संगीत संगीतकार रविशंकर सतारीये Load More Tags
Add Comment