समाजातल्या खटकणाऱ्या गोष्टींचे 'सट्टक उतरवणाऱ्या' कविता

भालचंद्र नेमाडे यांच्या नव्या कवितासंग्रहाचा परिचय

अनेक गोष्टींचा पाणउतारा करणारी सट्टकमधील कविता नेहमीपेक्षा वेगळी असली तरी स्त्रीजीवन व मृत्यू यासंबंधीचं तिच्यातील चित्रण अतिशय वेधक असं आहे. गद्यलेखनात अग्रेसर असलेले नेमाडे कवितेत तर त्याच्याही पुढे आहेत. कवितेच्या लांबच लांब आणि अनपेक्षित ठिकाणी तुटणाऱ्या ओळी, विरामचिह्नांचा अनियमित वापर यामुळे कवितेचा अर्थ काळजीपूर्वक समजून घ्यावा लागतो, आणि ‘नेमाडे वाचल्याचा’ अपेक्षित अनुभव मिळतो.

नेमाडे खानदेशातील सांगवी बुद्रुक या खेडेगावचे. बहुतांश शेतकऱ्यांची वस्ती असलेलं, खानदेशात कोणी केली नाही अशी अंडरग्राउंड गटरची कार्यवाही करणारं गाव. अशा गावचं पाणी प्यायलेले भालचंद्र नेमाडे. त्यांनी साहित्याच्या क्षेत्रात काहीतरी वेगळं नाही केलं तरच नवल! त्यांच्यावर साने गुरुजी, चिं. वि. जोशीं यांच्या लेखनाचा आणि भजन, कीर्तन, वही-गायन, पोथीवाचन आणि त्याचबरोबर तमाशे, लावण्या आशा लोकसाहित्याचाही प्रभाव आहे. मॅट्रिकपर्यंतच्या मराठी पाठ्यपुस्तकातील कविता आणि सिनेमातली गाणी त्यांना तोंडपाठ होती. या सर्व पार्श्वभूमीच्या खाणाखुणा सट्टकमधील कवितांवर कडवोकडवी दिसून येतात.

खानदेशी लेवागण बोलीतील शब्दांशिवाय नेमाड्यांची कविता पुरी होत नाही. त्याचा प्रत्यय या काव्यसंग्रहाचे ‘सट्टक’ हे नावच आणून देते. लेवागण बोलीभाषेत सट्टक म्हणजे पाणउतारा. संग्रहातल्या कविता समाजातल्या खटकणाऱ्या गोष्टींचे 'सट्टक उतरवणाऱ्या'च आहेत. सट्टकमध्ये कवितांचे तीन स्वतंत्र विभाग आहेत.

विभाग १ – सरवा
‘सरवा’ म्हणजे शेतातले पीक कापून हंगामाचा शेवट झाल्यावर इकडेतिकडे मातीत सांडलेले धान्य वेचणे. हे वेचन पुष्कळदा उत्तम दर्जाचे असते. फक्त ते उशिरा शेतकऱ्यांच्या घरात जाते. या भागातील कविता अशाच जुन्या पण पुस्तकात आधी प्रसिद्ध न झालेल्या आहेत. त्यामुळे या विभागाचे शीर्षक सार्थ ठरते.

यात सुरुवातीलाच मर्ढेकर, बालकवी, मुक्ताई, बहिणाबाई यांचे ऋण व्यक्त केले आहे. या कवींच्या कवितांवर बेतलेल्या कविता यात आहेत. कृषिजीवन, निवडणुकीतील धामधूम, तमाशे, निसर्ग, भैरोबाला बळी दिला जाणारा बोकड इत्यादी लोकजीवनातील विषयांवर नेमाडे व्यक्त होतात. ‘ओव्या’ नावाच्या कवितेत ते कुणब्याच्या खडतर आयुष्याचे वर्णन करतात, तर कधी “चक्रांनो, चक्कर केला माणूस!” असे म्हणत वैज्ञानिक प्रगतीवर उपरोधाने भाष्य करतात, आणि त्याच वेळी ‘स्वप्नांच्या बांधावर फळलेल्या फुलखोर गुंजेच्या वेलीचं’ सुरम्य वर्णनही करतात. ‘बंड्या कुत्रा’, ‘गोंदण’, ‘अंजन’ या तीन ‘साधनेत’ प्रसिद्ध झालेल्या कवितांचा आशय सामान्य असला तरी त्यांतून नेमाडेंची भाषेवरील हुकूमत सहज दिसते. ‘प्रिय कोसला’ या कवितेत नेमाडे आपल्याच कोसला कादंबरीला म्हणतात, “कैकांच्या कादंबऱ्या त्यांच्याबरोबर सती जातात. तू, माय, मला पुरून उर!” 

‘आरती स्त्रीची’ ही आरतीचा लहजा असलेली पण स्त्रियांची कैफियत मांडणारी कविता आहे. ‘वंदे मातरम्’ मधील उपरोध, ‘मुम्बाआई’ मधील वाईट गोष्टी, ‘महाराष्ट्र संस्कृतीचा ओनमा’ मधील कवी-कवयित्रींचे स्मरण या कविता लक्षणीय आहेत. 

‘लालन पालन’ या एका कवितेत बालगीतांवर आधारलेल्या चार उपकविता आहेत. प्रथम ‘चांदोमामा चांदोमामा भागलास का’ या बालगीताचा मुखडा आधाराला घेऊन हल्लीच्या शहरी समाजजीवनाचे चित्रण आहे, तर दुसऱ्या भागात लहान मुलाच्या चित्रणासाठी मजेशीर शब्दयोजना आहे, तिसऱ्या – चौथ्या भागात शहरी मध्यमवर्गातली नोकरदार आईवडिलांची लाडावलेली, निसर्गापासून दुरावलेली, मोबाईलला सोकावलेली मुले भेटतात. ‘मोत्या शीक रे एबीसी’ ही कविता इंग्रजी माध्यमाच्या धोरणावर कोरडे ओढते, तर ‘बाराखडी’ ही कविता बाराखडीचे एका वेगळ्याच पद्धतीने चित्रण करते. 

विभाग २ : अस्तुरीमृग 
‘मांडो’ या कवितेने सुरू होणारा हा भाग स्त्रीजीवनातील अगतिकता वर्णन करतो. “त्याचं नाव, त्याचीच जात, त्याचंच गोत, सातबारा वारसा, कूस तेवढी आपली, माय, पहिल्यापासून चालत आलंय हे, बाईल म्हणजे बैल भाड्याचा, करती काय?” ह्या ओळी म्हणजे जणू काही या भागाचे सूत्र आहेत. ‘खेड्यातला वर’ ही कविता ‘आजकाल उपवर मुलींना शहरात शिकलेला वर पाहिजे, खेड्यातला वर नको’ या वस्तुस्थितीचे चित्रण करते.

भ्रूणहत्येशी संबंधित ‘नखुशी – नकोशी’ ही कविता हृदयद्रावक आहे. ‘नखुशी’ म्हणजे छोटीशी. ‘नकोशी’ म्हणजे नको असलेली. मुलगी जिवंत राहिली तरी पुढे सासूचा त्रास, हुंडा वगैरे असतोच आणि मुलीला मारून टाकलं तरी धरतीच्या पोटात तिची जागा असतेच, असे नेमाडे म्हणतात. ‘मी होच म्हणेन’ ही कविता आई-बाप नसलेल्या अभागिनीच्या दुःखी जीवनाचे चित्रण करते. स्त्रीच्या आयुष्याची इतिकर्तव्यता ठरवणाऱ्या पुरुषी संस्कृतीचे उपरोधिक चित्रण ‘जा मुली जा दिल्या घरी तू सुकी रहा’ या कवितेत आहे. ‘जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी रहा’ या लोकप्रिय गीताच्या ओळीत ‘सुकी’ असा अर्थपूर्ण बदल ते करतात.
“सासुरवास, कडू घास, गिळावा मुकाट्यानं, सारं जग वैरी होवो, धनी फक्त सांभाळणं.
.... भरू नवसाची ओटी, येवो पोटी तुह्या छबुकडा बाळकृष्ण ...
लिहिलं कप्पाळी सासर, सोडायासाठीच माहेर, यावं उभ्याने उंबऱ्या आत, निघावं आडव्याने बाहेर”

‘मातृका’ या कवितेत ‘कुठल्याही अवस्थेत स्त्री असली तरी तिच्यात आई असते’ असे नेमाडे म्हणतात. ‘मातृसत्ताक ताई’ ही कविता नाट्यछटेसारखी वाटत असली, तरी दारुडा नवरा पदरी पडलेल्या एका स्त्रीची ती शोकांतिका आहे.
“ताई, लग्नाच्या खडकावर आपटून कुमारिकांची गलबतं फुटतात.... 
... जैविक शक्तीवर वंश संवर्धना पायी लटांबरं वाढवतात,
शुभमंगल सावधान”

ह्यासारखे शब्द अंगावर येतात. स्त्रियांचे आयुष्य अवघड करणाऱ्या पुरुषसत्ताक समाजातील एक संवेदनशील पुरुष म्हणून ते “मी तुझा सहोदर आपल्या पितृसत्ताक घराचा कुलदीपक कुचकामी” असे म्हणत स्वतःकडे आणि पुरुषांकडे दोष घेतात.

विभाग ३ : मृत्यू 
‘चिमा काय कामाची?’ ही कविता आईच्या वेड्या मायेचं चित्रण करते. बालगीताच्या चालीवर आधारलेली ही कविता असून मुलीच्या मृत्यूनंतरही आईला ती जिवंत असल्याचा भास होतो, असे चित्रण त्यात आहे. ‘आत्महत्यारा’ या कवितेत शिक्षणव्यवस्थेचे बाजारीकरण आणि बेरोजगारी यामुळे तरुणांना येणाऱ्या अडचणींचे, नैराश्याचे चित्र आहे.
“मजुरी करुनी मायबाप शिकविति, किती लाख मागती कॅश शिक्षण अध्वर्यू
 उलटली तिशी तरी कमाई न काही कुठे तोंड दावू हे तव शल्यही मोठे
उच्चशिक्षणी हुच्च पुढारी बट्ट्याबोळ बिनकामाच्या ह्या पदव्या नेट आणि सेट...
... जगण्यावर रुसू नको घूस. नसू नको अस. तग. हक्काने जग.”

‘जळ देखे जाळ’ ही कविता ‘वही’च्या चालीवर असून देह आणि आत्मा एकमेकाला मृत्यूकाळी सोडत नाहीत हे सत्य ती आपल्यासमोर ठेवते. ‘स्मरण’मध्ये ब्रह्मपुत्राच्या रूपकाचे चित्रण आहे. ‘सुनीत’१४ ओळींच्या ‘सुनीत’ या काव्यप्रकारात लिहिलेली आहे. ‘विलाप’ ही कविता नेमाड्यांनी विरामचिन्हांना हद्दपार केले त्यासंबंधी विवेचन करते. ‘मृत्यो’ या एका कवितेत ‘मरणखूण’, ‘प्रतिबिंब’, ‘घटस्फोट’, ‘नाही आहे’ अशा चार उपकविता आहेत. ‘मरणखूण’ या कवितेत कवी मृत्यूला म्हणतो,
“तुझी अक्का जिवती बाई आहे साजरी, सगळ्यांना जगवणारी कष्टाळू
चितेवर जाईपर्यंत पाठराखी, तरी आहे ती मतलबी,
तिनंच आमच्या जीवनात देवादिकांची तस्करी, प्रारब्ध, कर्म, धुडूगुस वाढवला.
जुगवून प्रसवणं, जगवून फसवणं, चेकाळवते प्रत्येक पिढीला
उफाळून आम्हाला असं कामचेटूक करते, शेवटपर्यंत कळूही देत नाही डाव.
देहाड्याची नाटकं – डोळे, भुवया, केस, गाल, छाती, मचाड संगमोत्सुक स्राव,
वरतून अपत्य प्रेम पान्हा, मुख टाळून पाळून पोसून घेते, आगामी उत्पादक.
एक माझी प्रार्थना : मी माणूस म्हणून मरतोय पण माणूस म्हणून पुन्हा जन्मणार नाही, हे बघ”

‘प्रतिबिंब’ हा दुसरा भाग वाचकाला विचार करायला लावतो. सुरुवातीलाच कवी म्हणतो, “आम्ही मरणाराचे डोळे उघडे राहू देत नाही कधी, तुझं भेसूर बिंब मरतांना तरी दृष्टिआड करावं म्हणून? की आपल्याच मरणाचा अनुपम सोहळा ह्याचि देहीं ह्याचि डोळां न दिसण्यासाठी?” मृत्यूचं विश्वरूप दर्शन घडवताना नेमाडे अशा काही ओळी लिहून जातात, की वाचक पाणावलेल्या डोळ्यांनी मृत्यूदर्शन वाचत जातो. उदाहरणार्थ
“लाडे लाडे इवलाली मुलांना खेळवणारी मनीमाऊची चपळ पिल्लं गोजिरी मोठी झाल्यावर पोत्यात टाकून डोहात बुडवतांनासुद्धा मालकाचे हात इवलाल्या मऊ गुलाबी जिभांनी चुटूचुटू चाटत लाडिकपणे काय सांगतात?”

‘घटस्फोट’ या तिसऱ्या कवितेत नेमाडे देहाला ‘सौ. काया’ असे नाव देऊन मृत्यूची पत्नी म्हणतात. संकटाच्या प्रसंगी ज्या संकटप्रसंगी जीव वाचला, तगला ते “भेटीचे प्रसंग चुकले” असं वर्णन करतात. ‘नाही आहे’ नावाच्या चौथ्या भगत जीवनमरणासंबंधीचा शब्दच्छल आहे. या काव्यसंग्रहात शेवटची ‘स्व’ नावाची कविता आहे. या कवितेत स्वतःसंबंधीचं आयुष्याच्या अखेरीला केलेलं चिंतन आहे.

अनेक गोष्टींचा पाणउतारा करणारी सट्टकमधील कविता नेहमीपेक्षा वेगळी असली तरी स्त्रीजीवन व मृत्यू यासंबंधीचं तिच्यातील चित्रण अतिशय वेधक असं आहे. गद्यलेखनात अग्रेसर असलेले नेमाडे कवितेत तर त्याच्याही पुढे आहेत. कवितेच्या लांबच लांब आणि अनपेक्षित ठिकाणी तुटणाऱ्या ओळी, विरामचिह्नांचा अनियमित वापर यामुळे कवितेचा अर्थ काळजीपूर्वक समजून घ्यावा लागतो, आणि ‘नेमाडे वाचल्याचा’ अपेक्षित अनुभव मिळतो.

सट्टक (काव्यसंग्रह)
लेखक: भालचंद्र नेमाडे
प्रकाशक: पॉप्युलर प्रकाशन, मुंबई
पृष्ठसंख्या: १६२
किंमत: रु. ५००
- श. रा. राणे, पुणे
मोबाईल नंबर : 9673790848
(लेखक फैजपुर (जिल्हा जळगाव) येथील धनाजी नाना महाविद्यालयातले मराठीचे निवृत्त प्राध्यापक आहेत.)

Tags: भालचंद्र नेमाडे नेमाडे सट्टक कविता कवितासंग्रह Load More Tags

Add Comment

संबंधित लेख