‘चिद्गगनाचे भुवनदिवे’- लेखकाच्या भावविश्वातील दीप्ती

मिलिंद बोकील यांच्या व्यक्तिचित्रसंग्रहाविषयी...

साधना साप्ताहिकाच्या 77 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने, मराठीतील आघाडीचे लेखक मिलिंद बोकील यांच्या साहित्यावरील एक दिवसीय चर्चासत्र काल, 16 ऑगस्ट रोजी पार पडले. एकूण चार सत्रांमध्ये मिळून दहा वक्त्यांनी बोकील यांच्या ललित आणि ललित वैचारिक साहित्याविषयी विविध अंगांनी अभ्यासपूर्ण विश्लेषण केले. मिलिंद बोकील यांच्या दीर्घ मुलाखती असलेला साधनाचा वर्धापनदिन विशेषांक यावेळी प्रसिद्ध झाला. तसेच बोकील यांच्या 'गोष्ट मेंढा गावाची' या पुस्तकाची सुधारित व वाढवलेली आवृत्ती साधना प्रकाशनाकडून आली. यथावकाश या संपूर्ण चर्चासत्राचा व्हिडिओ साधनाच्या यूट्यूब चॅनलवर प्रसिद्ध होईलच. मात्र याच उपक्रमाचा पुढील भाग म्हणून मिलिंद बोकील यांच्या साहित्याच्या संदर्भातील काही अन्य मान्यवरांचे लेख तसेच व्हिडिओज येत्या काही दिवसात कर्तव्यवरून प्रसिद्ध करत आहोत. त्यातील हा पहिला लेख.

1985 च्या सुमारास लेखनाकडे वळलेले मिलिंद बोकील हे आजचे एक मान्यताप्राप्त साहित्यिक आहेत. व्यवसायाने काही काळ तंत्रज्ञ असलेल्या बोकील यांनी समाजशास्त्रात पीएच.डी. ही पदवी संपादन केली आहे. त्यांच्यातील कथालेखकाला समृद्ध करण्यात त्यांच्यातील काही व्यक्तिवैशिष्ट्यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी आधुनिक तंत्रविज्ञान, पर्यावरण आदींचे ज्ञान प्राप्त केले आहे. तसेच भारतीय विद्याशास्त्राचे परंपरागत संचितही आत्मसात केले आहे. समाजशास्त्र या त्यांच्या अभ्यासविषयाबाबत ते एके ठिकाणी म्हणतात - ‘समाजशास्त्र ह्या शास्त्राची मौज अशी आहे की ते मानवशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र एवढेच नाही तर, इतिहास आणि पुरातत्त्वशास्त्र ह्यांच्या संगमावर उभे आहे.’ (‘अंतर्नाद’, ऑक्टोबर, 2001, पृ.17) त्यांच्या या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीचे प्रभावस्रोत ठरणाऱ्या काही व्यक्तींविषयी त्यांनी लिहिलेले लेख ‘चिद्गगनाचे भुवनदिवे’ या पुस्तकात समाविष्ट आहेत.

पुस्तकाचा गाभा

या पुस्तकात आठ व्यक्तींवर लिहिलेले लेख आहेत. मराठीत व्यक्तिचित्रण हा वाङ्मयप्रकार चांगलाच रुजलेला आहे. व्यक्तींची अर्कचित्रे, व्यक्तिचित्रण, व्यक्तींची स्मृतिशिल्पे, काल्पनिक व्यक्तिरेखाचित्रे, व्यक्तिविमर्श, व्यक्तित्वदर्शन अशा वेगवेगळ्या बाजाचे लेखन मराठीत झाले आहे. या पुस्तकातील आई आणि वडील यांच्याविषयीचे लेख वगळता इतर व्यक्ती या लेखकाच्या भावविश्वाशी नाते असलेल्या, एक प्रकारे त्याच्या बृहत कुटुंबाच्या घटक आहेत. याचे कारण तरुण वयात जयप्रकाशजींच्या सामाजिक परिवर्तनाच्या प्रभावाने भारलेले लेखकाचे व्यक्तिमत्त्व व्यक्तिगत मध्यमवर्गीय चौकट ओलांडून विकसित होत गेले आहे. स्वयंसेवी संस्थांशी असलेला संबंध, ग्रामीण सामाजिक विकासप्रक्रियेविषयी असलेली कृतिशील आस्था आणि स्वत:तील ऊर्जा नि अनुभव कलात्मक शब्दरूपांत व्यक्त करण्याची आंतरिक ओढ यांमुळे मिलिंद बोकील यांचे व्यक्तिमत्त्व बहुपेडी झाले आहे. त्या व्यक्तिमत्त्वाला समृद्ध करणारा सहवास त्यांना यातील व्यक्तींनी दिला आहे.

लेखकाने यात ‘वाघिणीचे दूध’ या लेखात आईविषयी लिहिले असून ‘स्थितप्रज्ञस्य का भाषा...’ या लेखात वडिलांचे व्यक्तिचित्रण केले आहे. बोकीलांमधल्या लेखकाला वाङ्मयीन प्रवासात दिशादर्शक ठरलेल्या श्री.पु.भागवतांचे व्यक्तिचित्र ‘साहित्याचा भूमिपुत्र’ या शीर्षकाखाली आले आहे. इतर पाच व्यक्ती या लेखकाच्या सामाजिक विकासप्रक्रियेच्या कृतिशील सहभागाशी प्रत्यक्षाप्रत्यक्षरीत्या निगडित आहेत. त्या व्यक्ती आहेत - स.ह.देशपांडे (समाजअर्थाचा ‘सह’योग), डॉ.कमल रणदिवे (सायंटिस्ट आजी), अशोक सासवडकर (समाजकार्याचे अशोकवन), डॉ.जयंतराव पाटील (किनाऱ्यावरचा कल्पवृक्ष) आणि शरद कुलकर्णी (सोशल डेव्हलपमेंट कुलकर्णी).

लेखकाशी आंतरिक नाते

शीर्षकातून सुचवल्याप्रमाणे या व्यक्तींनी लेखकाच्या मनाचे आकाश उजळून टाकले आहे आणि त्या अनुभवाचे कवडसे यातील लेखांमधून परावर्तित झाले आहे. पोस्टात नोकरी करणारे, शीत आणि स्वीकारशील वृत्तीचे परमार्थमार्गी वडील जाणून घेताना लेखकाला यश आले आहे. वडील आणि आई यांच्यातील विजोड वृत्ती, मुलाला चित्रपट दाखवता आला नाही; या अनुभवातली त्यांची तगमग आणि त्यांचा मिश्कीलतेचे अस्तर असलेला आनंदी स्वभाव अशा बारकाव्यांमुळे हा लेख वाचनीय झाला आहे. बोकील जेव्हा आपल्या पुस्तकांना ‘उदकाचिया आर्ती’, ‘चिद्गगनाचे भुवनदिवे’ अशी ‘ज्ञानेश्वरी’तील प्रतिमांची शीर्षके योजतात, तेव्हा त्यांचे पारमार्थिक वृत्तीच्या वडिलांशी असलेले ह्रद्य नाते ‘काव्यात्म’ अस‌ल्याचे जाणवते. आईच्या संस्कारांना लेखकाने ‘वाघिणीचे दूध’ म्हटले आहे. (‘वाघिणीचे दूध’ हा शब्दप्र‌योग प्रथम विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी इंग्रजी भाषेबाबत केला आहे.) आईची कणखर, साहित्यप्रेमी आणि काही बाबतीत ‘कंडिशनिंग’ झालेली व्यक्तिरेखा जाणून घेताना लेखकाला लिंगभावाचे खरे आणि स्पष्ट आकलन झाले. निखळ वाङ्मयीन निष्ठेने संपादनाचे काम करणाऱ्या श्री.पु.भागवत यांच्यासारख्या प्रतिभावान व्यक्तीशी झालेल्या आव्हानात्मक चर्चांमुळे लेखकामधली कलात्मक ऊर्जा सजग बनायला वाव मिळाला.

समाजकार्याशी निगडित यातील व्यक्तिरेखाटनांमुळेही लेखकाला ‘स्व’ शोधायला मदत आलेली दिसते. कॅन्सरवर संशोधन करणाऱ्या डॉ.कमल रणदिवे यांच्या रूपाने लेखकाला मायाळू आजी या स्वरूपात विज्ञानानेच जणू दर्शन दिले. स.ह.देशपांडे या पारंपरिक अर्थशास्त्रज्ञ, स्त्रीवादी विचारवंत आणि ग्रामीण समाज विकासप्र‌क्रियेच्या अभ्यासकामुळे लेखकाला भिन्न विचारधारेच्या माणसाला जाणून घेण्यासाठीची लवचीकता अंगी बाणता आली. ‘जनाचे अनुभव पुसता’ या बोकीलांच्या पुस्तकाला त्यांनी मार्मिक आणि मार्गदर्शनपर प्रस्तावना लिहिली; ही त्या नात्याची ठळक खूणच आहे. ज्ञानलालसा या त्यांच्या सहज प्रेरणेचा प्रभावही लेखकावर झालाच! युसुफ मेहेरअली सेंटरमध्ये भेटलेल्या, पुढे ‘निर्मिती’ या न्यासाची स्थापना करणाऱ्या अशोक सासवडकरांमुळे लेखकाला स्वतःच्या ‘ट्रायल अँड एरर’ या भूमिकेत, सामाजिक संस्थांमध्ये काम करण्यासाठी धडपडणाऱ्या अवस्थेत, स्वयंसेवी संस्थांचे विश्व जीव ओतून बांधणारा कार्यकर्ता जवळून अनुभवता आला. लेखकाला कुतूहल असणाऱ्या विश्वाचे अंतर्बाह्य दर्शन होणे; हा अनुभव बोकीलांमधल्या परिवर्तनशील लेखकालादेखील मोलाचा होता. यातले शरद कुलकर्णी हे आदिवासी प्रश्नांचे अभ्यासक, कार्यकर्त्यांना ज्ञानाचा आधार पुरवणारे, जाणीवजागृतीचे काम करणारे महत्त्वाचे नाव होय. त्यांच्या सहवासात लेखकाला समाजकार्याचा बदललेला पोत कळला, स्वयंसेवी चळवळीसाठीच्या फंडिंगबाबतच्या प्रश्नाची जटिलता कळली. मुख्य म्हणजे सामाजिक कार्य करतानाही स्वीकारायचा अनासक्तीयोग जवळून कळला. कृषीशास्त्रज्ञ डॉ.जयंतराव पाटील यांचे कार्य आणि कार्यशैली पाहताना झालेल्या संस्कारांमुळे लेखकाला विनोबांविषयीचे पूर्वग्रह झटकून टाकता आले. तसेच जीवनसन्मुख दृष्टीचे रहस्य जाणता आले.

रूपबंध आणि लय

‘व्यक्तिचित्रण’ या स्वरूपातील या लेखांमध्ये त्या रूपबंधाची आणि भाषेची लय लेखकाला कशी सापडली आहे, हे पाहण्याजोगे आहे. श्री.पु. यांच्या वरील लेखात अनुभव, चर्चा (क्वचित वादही), प्रसंगवर्णन यामुळे त्यांचे व्यक्ति‘दर्शन’ घडले आहे. स.ह.देशपांडे यांच्याबाबत लिहिताना लेखकाचा वैचारिक संघर्ष आणि मूलभूत मानवी संवेदन यांच्या स्पर्शामुळे लेख प्रत्ययकारी झाला आहे. कमल रणदिवे यांच्याविषयी लिहिताना लेखकाने त्यांच्या माहितीच्या स्रोताचे अनेक पदर एकत्र गुंफले आहेत; तर अशोक सासवडकरांविषयीचा जिव्हाळा त्यांच्याविषयीच्या लेखात ओतप्रोत भरला आहे. डॉ.जयंत पाटील यांच्या कार्यकर्तृत्वाचे दर्शन घडवताना लेखकाने त्यांची सामाजिक पार्श्वभू‌मीही बारकाईने टिपली आहे. आईच्या स्वभावाचे आकलन करून घेण्यासाठी लेखकाने जात, लिंग, वय, प्रदेश आणि वर्ग अशा सर्व अक्षांवरून तिचा समाजशास्त्रीय दृष्टीने धांडोळा घेतला आहे. त्यासाठी तिच्या पिढीजात जीवनशैलीचा संदर्भही लक्षात घेतला आहे. तिच्यातील रसरशीतपणा आणि वयपरत्वे झालेला बदल यामुळे तिचे व्यक्तिमत्त्व ठसठशीतपणे जाणवते. तिच्यामध्ये मातृत्वाचे सूत्र सापडल्याचा लेखकाचा अनुभव हा त्याच्या स्वत:तील बदल दर्शवणारा आहे. वडिलांबाबत असे आंतरसंबंधांचे-ताणतणावाचे-नाते नाही; कारण ते स्थितप्रज्ञ वृत्तीचे होते. त्यामुळे त्यांच्याविषयीची कहाणी ही खरोखरच कथनप्रधान ‘गोष्ट’ झाली आहे. शरद कुलकर्णी यांच्या बोलण्याची एक ठळक लकब वगळता त्यातही ‘स्थिरचित्रण’च जास्त प्रमाणात आहे. अशी वेगवेगळ्या पोताची ही व्यक्तिचित्रणे तरीही वाचकांच्या मनावर ठसा उमटवतात. त्याची काही कारणे आहेत.

एक तर, या लेखांमधून लेखकाला त्या-त्या व्यक्तीच्या जगण्याची नस पकडायची आहे. त्यामागची लेखकाची भूमिका वृत्तिगांभीर्याची आणि आत्मीयतेने भरलेली आहे. लेखक बाह्यचित्रणात फारसा गुंतत नाही. क्वचित दोन-चार वाक्यांमध्ये काहींचे ठळक रूप ते रेखाटतात. मात्र त्यांचे लक्ष अधिक सखोलतेने शोध घेण्याकडे असते. त्यामुळे त्यांच्या आईचे स्वतःशी पुटपुटणे ते (कथाकाराच्या कानाने) अचूक टिपतात. काहींच्या हसण्याचे बारकावे यात आले आहेत. ‘गंभीर वाटणाऱ्या श्री.पु. यांचे प्रसन्न खळखळून हसणे’, ‘कमल ताईंचे अंगातून भरभरून वाहणारे हसू’, ‘अशोक सासवडकरांचे आसमंत उजळवून टाकेल असे हसणे’, अशा काही जागा आठवतात. लेखकाला त्या-त्या व्यक्तींच्या जीवनप्रेरणेचा शोध घेण्यात रस दिसतो. त्यामुळे यातील लेखनामागची दृष्टी प्रगल्भ राहते. जिथे व्यक्ती आणि लेखक यांच्या नात्यातील चढ-उतार किंवा विकासप्रक्रिया यांचा अंतर्भाव होतो, त्या लेखांमध्ये व्यक्तिचित्रण या रूपबंधाची लय नेमकी पकडली जाते. लेखक अलंकरण, किस्से याकडेही वळत नाही. स.ह. यांच्याविषयी बोकील यांनी म्हटले आहे, “सहंच्या रूपाने महाराष्ट्राच्या सामाजिक-सांस्कृतिक जीवनाचे एक समग्र दर्शनच घडायचे. त्या जीवनाची एक अखंड खाप समोर यायची आणि ती उन्हाळ्यातल्या कलिंगडासारखीच मधुर आणि रसरशीत असायची!” कायम असा एखाद-दुसरा मार्मिक दृष्टांत अधूनमधून येतो नि कायम लक्षात राहतो.

मुख्य म्हणजे या आठ व्यक्तींविषयी लिहिताना त्यातून आणखी एका व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडते. ते स्वतः मिलिंद बोकील यांचे असते!

वाचकांच्या अपेक्षांचे क्षितिज

बोकील यांचे इतर लेखन वाचल्यानंतर, तसेच हे पुस्तक नीट वाचताना वाचकांच्या अपेक्षा वाढत जातात. उदाहरणार्थ, ‘श्री.पु.भागवत व स.ह.देशपांडे हे आधुनिक वृत्तीचे आणि गुणसंपन्न असूनही त्यांना रूढ अर्थाने ‘पुरोगामी’ म्हणता येणार नाही’; असे भाष्य यात येते तेव्हा प्रश्न पडतो की, आपल्याकडची रूढ असलेली ‘पुरोगामी’ ही संज्ञा पुरेशी प्रसरणशील नाही की काय? तसेच लेखकाने आई-वडिलांविषयी लिहिताना एकाही भावंडाची आठवण का बरं सांगितली नाही? अशा आणखीही काही जागा असू शकतात. मात्र या पुस्तकामुळे वाचकांच्या जाणिवांचे क्षितिज व्यापक करणारा आशय अधिक प्रभावी आहे; हे महत्त्वाचे आहे.

ग्रामीण, वंचित समाजाविषयी आस्थापूर्वक काम करणाऱ्या व्यातील व्यक्ती, स्वतःच्या जीवननिष्ठांशी प्रामाणिक राहिलेले विचारवंत, संशोधक आणि स्वतःच्या मर्यादांचा कधी भार वाहत, तरी स्वीकार करत जगणारे आई-वडील अशा यातल्या व्यक्तिरेखांना स्वतंत्र परिमाणे आहेत. मुख्यतः प्रसंगी विचारांच्या तटभिंती ओलांडून, सामाजिकतेचा गाभा जपत, मानवी सौहार्दाचा कंद शोधणारा हा लेखक स्वत:च्या वृत्तीचा अमीट ठसा वाचकांवर उमटवून जातो. हेच या पुस्तकाचे श्रेय आहे.

- डॉ. नीलिमा गुंडी, पुणे
nmgundi@gmail.com 
(मराठीच्या प्राध्यापक, भाषाभ्यासक, कवयित्री आणि लेखिका)


'चिद्गगनाचे भुवनदिवे' या मॅजेस्टिक प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या पुस्तकासह मिलिंद बोकील यांची इतर पुस्तके (एकूण वीस टायटल्स) साधना मिडिया सेंटर, पुणे येथे सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत. मागवणेसाठी संपर्क : +91 70582 86753

Tags: milind bokil Load More Tags

Add Comment