‘दत्ता गांधी’ : आमच्या आयुष्याला सुवर्णमुद्रा लावणारी चार अक्षरे

दत्ता गांधी यांच्या जीवनकार्याची झलक दाखवणारा माहितीपट उद्या (13 जून) पुणे येथे प्रदर्शित होतो आहे.

15 मे 1923 रोजी, रायगड जिल्ह्यातील पोलादपूर या लहान गावात जन्माला आलेल्या अप्पा उर्फ दत्ता गांधी यांनी 15 मे 2022 रोजी वयाची 99 वर्षे पूर्ण केली आहेत. वयाच्या विशीत त्यांनी ‘चले जाव’ चळवळीत भाग घेतला आणि तुरुंगवास भोगला. तेव्हापासूनची आठ दशके ते सार्वजनिक कार्यात सक्रिय आहेत. ते व त्यांच्या पत्नी आशा गांधी यांनी साडेतीन दशके शिक्षक म्हणून काम करताना शेकडो विद्यार्थी घडवले. निवृत्तीनंतरही ते शिक्षणाच्या क्षेत्रांत कार्यरत राहिले. दरम्यानच्या या सर्व काळात राष्ट्र सेवा दल, साधना साप्ताहिक व अन्य समविचारी सामाजिक संस्था व संघटना यांच्या कामात ते विविध प्रकारे सहभाग देत राहिले. अशा या अप्पा गांधी यांच्या जीवनकार्याची झलक दाखवणारा 62 मिनिटांचा माहितीपट उद्या (सोमवार, 13 जून 2022) प्रदर्शित होतो आहे. तसेच त्यावरील चर्चा व मनोगते असा कार्यक्रम सायंकाळी 5.30 ते 8 या वेळेत एस. एम. जोशी फाउंडेशनचे सभागृह, पुणे येथे होतो आहे. त्यानिमित्ताने, अप्पांच्या कार्यकर्तृत्वाचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थीदशेपासून लाभलेल्या ईशान संगमनेरकर यांचा हा लेख. 

दत्ता गांधी ही फक्त चारच अक्षरं आमच्या आयुष्याला सुवर्ण मुद्रा लावणारी आहेत. कारण त्याचं सबंध आयुष्य हे साधी राहणी आणि उच्च विचार या तत्त्वाला समर्पित राहिलेलं आहे. अंधेरी (प.) विद्या विकास मंडळ विद्यालयात ते आम्हाला इतिहास शिकवत. त्यांनी शिकवलेला इतिहास सनावळ्यांमध्ये कधीच बंदिस्त नसायचा, त्याला सामाजिक संदर्भ असायचे, जे आम्हाला जवळचे वाटायचे. जागतिक इतिहासाचे दाखले देताना फ्रेंच राज्यक्रांती, चीनमधील माओची लाँग मार्च, अमेरिकेतील कृष्णवर्णियांचा लढा, क्युबाची क्रांती, दक्षिण आफ्रिकेतील वर्णद्वेषी राजवट इत्यादी विषय अभ्यासक्रमात नसतानाही ते आम्हाला त्यांच्याविषयी सांगून एक कॅलिडोस्कोप दाखवायचे. बर्‍याच वेळा आम्हाला वाटायचं की, हे पुस्तकात नाही, परीक्षेत येणार नाही, मग सर का शिकवतात? पण विद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर त्याची महती आम्हाला पटली. इतिहास हा विषय सोपा वाटावा म्हणून सर त्या वेळी दुर्मिळ असणार्‍या इंग्रजी मासिकांतल्या फोटोंची पोस्टर्स बनवून आम्हाला समजावत.

आमच्या शाळेत प्रत्येक वर्गाचं एक हस्तलिखित निघत असे, त्यात गांधी सर, कांदळगावकर सर, रारावीकर सर यांचा नेहमी पुढाकार असे आणि विद्यार्थ्यांकडून ते चित्रं, कथा तसेच इतर लेख लिहून घेत आणि प्रकाशित करत. कबड्डी, खो-खो या खेळांत ते विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत, त्यांच्याकडून कवायती करून घेत. स्वत: गांधी सर दररोज त्या वेळी व्यायाम करत आणि विलेपार्ले (पू.) येथून भवन्स कॉलेजजवळील (अंधेरी प.) आमच्या शाळेत घंटा व्हायच्या आधी पोहोचत. ते उशिरा आले, असं कधीच होत नसे.

‘साधना’ वाचायची सवय गांधी सरांनी शाळेतील विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांनाही लावली होती. वर्तमानपत्रांत येणार्‍या बातम्या शाळेतील व्हरांड्यात असणार्‍या फळ्यावर ते नियमित लिहीत आणि आम्हालाही लिहायला लावत. गांधी सरांचं वैशिष्ट्यच असं होतं की, ते फक्त उपदेश करत नसत तर प्रथम स्वत: काम करत आणि नंतर ते विद्यार्थ्यांना करायला लावत, म्हणून ते विद्यार्थीप्रिय शिक्षक झाले होते.

एकदा शाळेचे मुख्याध्यापक द. बा. यादवडकर सर यांची नेहमीप्रमाणे एक नोटीस आली - ‘सर्व विद्यार्थ्यांना सूचना करण्यात येत आहे की, प्रत्येकाने आपल्याकडे येणार्‍या वर्तमानपत्राच्या एक महिन्याच्या प्रती शाळेत श्री. दत्ता गांधी यांच्याकडे आणून देणे. आपण या रद्दी विक्रीतून बाबा आमटे यांच्या ‘गोकुळ’ प्रकल्पाला मदत पाठवणार आहोत. अधिक माहितीसाठी गांधी सरांशी संपर्क करावा.’

आम्हा विद्यार्थ्यांमध्ये चुळबुळ सुरू झाली. “कोण बाबा आमटे?”, “आपण रद्दी का आणायची?” वगैरे वगैरे. नवा विचार लगेच स्वीकारायचा नाही, फाटे फोडायचे असली आमची मध्यमवर्गीय मानसिकता! म्हणून गांधी सरांशी आम्ही काही विद्यार्थ्यांनी संपर्क साधला. त्यात प्रकाश पंडीत हेही होते. गांधी सरांनी बाबा आमटेंबद्दल तर सांगितलंच, पण ‘समाजाचं आपण काही तरी देणं लागतो’, हा मंत्र आम्हाला दिला आणि आमच्यात चैतन्य निर्माण झालं. त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याने वर्तमानपत्रांची इतकी रद्दी आणली की, गांधी सर दररोज शाळा ते विलेपार्ले (पू) अशा सायकलच्या 3-3, 4-4 फेर्‍या मारत, घामाघुम होत. त्यांनी कधीच या कामाचा ताण आपल्या दैनंदिन शिकवण्यात येऊ दिला नाही. चिडचीड व्यक्त केली नाही, अगदी आनंदाने हसून सारं केलं. विलेपार्ले (पू), रामानंद सोसायटीत तर व्हरांडा भरला, घरातील जागा भरली, घराच्या मागच्या मोकळ्या जागेत रद्दी ठेवावी लागली, घर जणू रद्दीचं गोडाऊन झालं.

स्वातंत्र्य आंदोलनात अथक काम करणाऱ्या म. गांधींप्रमाणेच सरांचं काम आम्हाला वाटायचं. ते ही रद्दी पाहून थकलेले आम्हाला दिसले नाहीत. शाळा सुटल्यावर घरी जाऊन अंधार पडेपर्यंत भेंडोळ्या झालेली वर्तमानपत्रं उलगडून ते त्यांच्या व्यवस्थित घड्या घालीत, बंडलं बांधत आणि रद्दीवाल्याकडे स्वत: घेऊन जात. चांगला भाव मिळावा म्हणून घासाघीस करत, व्यवस्थित घड्या घातलेली बंडलं बघून रद्दीवालाही चांगला भाव देत असे. कारण त्याचा बराच व्याप कमी झालेला असे. हे रद्दी विक्रीचं काम जवळजवळ पंधरा दिवस चाललं. आणि एक मोठी रक्कम शाळेमार्फत ‘गोकुळ’ प्रकल्पाला पाठवली गेली. असं सामाजिक भान गांधी सर आमच्यात रुजवत होते, सामाजिक जाणिवा पेरत होते आणि हे सगळं कसलाही आविर्भाव न आणता आमच्या नकळत ते करत होते.

असं म्हणतात, शिक्षक देश घडवतात, मातीच्या गोळ्याला सुबक आकार देतात. गांधी सरांच्या बाबतीत हे शंभर टक्के सत्य आहे. शिक्षकांच्या एका संपात जेव्हा आमच्या शाळेतील शिपाई आर्थिक संकटात होते, तेव्हा गांधी सरांनी शाळेतीलच इतर सहकारी शिक्षकांकडून पैसे गोळा केले होते आणि तो निधी त्यांना सुपूर्द केला होता. राजा मंगळवेढेकर यांनी लिहिलेलं ‘साने गुरुजी जीवन गाथा’ हे चरित्र साधना प्रकाशनाने प्रकाशित केलं होतं, आमच्या शाळेत गांधी सरांनी या चरित्राचं महत्त्व सांगून ते विकत घ्यायला प्रत्येकाला प्रवृत्त केलं होतं.

एक प्रसंग आठवतो. अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय स्व. पंतप्रधान इंदिरा गांधींच्या विरोधात गेल्यानंतर देशात आणीबाणी लादली गेली. राजकीय पक्षांच्या विरोधी नेत्यांना अटकसत्र सुरू झालं. वर्तमानपत्रांवर सेन्सॉरशीप लादली गेली, ट्रेड युनियनचं संपाचं हत्यार काढून घेतलं गेलं. विरोधी पक्षांच्या सभांना बंदी घातली गेली. सगळीकडे बेबंदशाही माजली होती, आपल्या देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू झाल्याप्रमाणे परिस्थिती होती. जॉर्ज फर्नांडिस, मधु लिमये, मधु दंडवते, बाबा आढाव, अटल बिहारी वाजपेयी, जयप्रकाश नारायण आदी कर्तबगार नेत्यांना अटक करण्यात आली होती. जे नेते तुरुंगाबाहेर होते, ते भूमिगत झाले. काहीच कळेना, काय करावं? कार्यकर्ते, सामान्य जनता यांना मार्गदर्शन करणारं कुणीच नव्हतं. वर्तमानपत्रं/ रेडिओ यांच्यावर एकतर्फी बातम्यांचा रतीब चालू होता. त्यांच्याविषयीची विश्वासार्हता कमी झाली होती. मात्र एक गोष्ट झाली होती, ती म्हणजे आदरणीय एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे आणि यदुनाथ थत्ते यांना अटक झालेली नव्हती. तोच एक आशेचा किरण होता.

पण अशा वेळी गप्प राहतील ते दत्ता गांधी कसले? त्यांनी विलेपार्ले येथे बर्‍याच भूमिगत राजकीय नेत्यांना आश्रय दिला होता. त्यात एक होते पन्नालाल सुराणा. पन्नालालजींची दररोज वेगवेगळ्या ठिकाणी राहण्याची सोय, जेवण-खाण पाहणं; तसंच कुणाला संशय येऊ नये आणि सर्व कामं सुरळीत व्हावीत म्हणून पन्नालालजींनी लिहिलेली पत्रं मुंबईतील निरनिराळ्या पोस्ट ऑफिसमध्ये पोस्ट करणं, पत्ते लिहिणं, कोरी पोस्टकार्डं/ पाकिटं विकत घेणं आणि ती पोस्ट करणं अशी असंख्य कामं गांधी सर करत होते. प्रकाश पंडीत आणि मी त्या काळात बर्‍याच वेळा पत्ते लिहिणं, पत्रं पोस्ट करणं, पत्रं-कार्डं घेणं यासाठी त्यांच्यासोबत असायचो. याच काळात राष्ट्र सेवा दलाच्या सदानंद बंदरकर सरांच्या मदतीने आणि गांधी सरांबरोबर आम्ही, जे राजबंदी इंदिरा सरकारने जुलमाने तुरुंगात कोंडून ठेवले होते, त्यांना कोर्टात भेटून त्यांना वकील मिळावा यासाठी, त्यांच्या सुटकेसाठी, जामिनासाठी प्रयत्न करत होतो. राजबंद्यांना निरोप देणं, त्यांना त्यांच्या घरचं क्षेमकुशल सांगणं, घरच्यांसाठी निधी गोळा करून तो पोहोचवणं अशी कामं करत होतो.

समाजवादी, राष्ट्र सेवादल कार्यकर्त्यांचं निशाण म्हणजे ‘शबनम बॅग’ ऊर्फ ‘झोळी’ वापरायला त्यांनी मनाई केली होती आणि त्यांनीही ती वापरणं सोडलं होतं. त्या काळात त्यांच्या घरी जे कार्यकर्ते येत त्यांच्यासाठी त्यांच्या पत्नी आशा गांधी न कंटाळता चहा-अल्पोपहार करत. राष्ट्र सेवा दलाची शिबिरे आणि साने गुरुजी कथामालेमार्फत विद्यार्थी आणि सर्वसामान्यांशी संपर्क करण्याचा आटोकाट प्रयत्नही त्या करत. त्यांच्या मुलींनीही ही परंपरा सुरू ठेवली. पत्नी आशा गांधी आणि तीन मुली असा गांधी सरांचा परिवार. त्या वेळी शिबिराला लीलाधर हेगडे, वसंत बापट, सुधाताई बोडा, अनु वर्दे येत असत. शिबिरात ते रुपकात्मक गोष्टी सांगत, उत्साहवर्धक गाणी, देशभक्तीपर गीतं म्हणत आणि म्हणवून घेत. साने गुरुजी विद्यालय, सांताक्रूझ येथे ही शिबिरं होत.

याच काळात विद्या विकास माजी विद्यार्थी सभेतर्फे राष्ट्र सेवादलाचं शिबिर पवई (मुंबई) येथे प्रकाश पंडीत यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलं होतं; एस. एम. जोशी, माधव गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली ते झालं होते, गांधी सरांनी त्याचं नियोजन केलं होतं.

आणखी एका प्रसंगाचा उल्लेख इथे केला पाहिजे. आणीबाणीच्या काळातच गाजलं होतं, ते कराड येथील अखिल भारतीय साहित्य संमेलन. त्याच्या अध्यक्षा होत्या प्रसिद्ध विदुषी दुर्गाबाई भागवत आणि स्वागताध्यक्ष होते भारत सरकारचे परराष्ट्र मंत्री मा. श्री. यशवंतराव चव्हाण. याच संमेलनात प्रा. ना. धों महानोर यांनी शेरवानी घालून कविता सादर केली होती. अनेक टाळ्या पडल्या होत्या त्यांना. पु. ल. देशपांडे पूर्वाध्यक्ष होते आणि ऋषितुल्य साहित्यिक वि. स. खांडेकर यांची त्या संमेलनाला विशेष उपस्थिती होती. त्याच दरम्यान लोकनायक जयप्रकाश नारायण हे मुंबईतील जसलोक रुग्णालयात अत्यवस्थ होते.

मी स्वत: एका मोठ्या पत्र्याच्या ट्रंकेत आणीबाणीविरोधी पत्रकं घेऊन त्या संमेलनाला हजर होतो. आज याचं महत्त्व कदाचित वाटणार नाही, परंतु घरी मी एवढंच सांगितलं होतं की, मी कराडला साहित्य संमेलनाला जात आहे. घरच्यांना आमचे हे आणीबाणीविरोधी उपद्व्याप माहीत नव्हते, नाही तर त्यांनी मला जाऊच दिलं नसतं. ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच’, ‘राजबंद्यांना सोडा’, ‘लोकशाही संकोच’, ‘युनियनच्या हक्कासाठी, ‘कामगारांच्या संपाच्या अधिकारासाठी’ असं छापलेली; त्याचप्रमाणे वर्तमानपत्रावरील सेन्सॉरशीप विरोधी आशयाची विविध आकाराची पत्रकं माझ्याकडे होती. ती सर्व आम्हाला दिली होती गांधी सर, कांदळगावकर सर, रारावीकर सर आणि बंदरकर सर यांनी. संमेलन सुरू झाल्यावर मी स्वत: प्रत्येक रांगेत जाऊन पास-पासच्या धर्तीवर पुढे पुढे करून ती पत्रकं वाटत होतो. काही जण ती घड्या करून ठेवत होते, तर काही जण वाचत होते. काही जण तर चक्क शीर्षक पाहून टाकून देत होते, भेदरल्यासारखे वागत होते.

स्वागताध्यक्ष म्हणून यशवंतराव भाषणासाठी उभे राहिले, तेव्हा एक महिला ‘आणीबाणी मुर्दाबाद’, ‘प्रेस फ्रिडम झिंदाबाद’, ‘ट्रेड युनियन झिंदाबाद’, ‘इन्कलाब झिंदाबाद’, ‘इंदिरा गांधी मुर्दाबाद’, ‘तानाशाही मुर्दाबाद’ अशा घोषणा देऊ लागल्या, त्यामुळे तिथे काहीसा गोंधळ निर्माण झाला. त्या माझ्या रांगेतच बसल्या होत्या. सार्‍या मंडपाचं, व्यासपीठाचं लक्ष त्यांच्याकडे गेलं. स्वागताध्यक्षांनी भाषण थांबवलं. पोलिसी हस्तक्षेप झाला. त्या महिलेला अटक झाली. नंतर मला कळलं की, त्या लोहियावादी ‘इंदूमती केळकर’ होत्या. ‘तुमच्या आणीबाणीला आम्ही घाबरत नाही, भीत नाही’ असा बाणा दाखवून त्यांनी निर्भिडपणे भारत सरकारपुढे आव्हान उभं केलं होतं. भारत सरकारचे कॅबिनेट मंत्री, परराष्ट्र मंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासमोर सरकारविरोधी निषेध करणं, हे सोपं काम नव्हतं. जे इंदूमतीजींनी त्या वेळी केलं होतं. त्यांच्या अटकेमुळे संमेलनात बरीच कुजबूज सुरू झाली होती आणि यशवंतराव चव्हाणांचा चेहरा पांढराफटक पडलेला त्या वेळी उपस्थितांनी आणि मी स्वत: पाहिला होता.

दुसरा एक प्रसंग याच संमेलनात घडला. तो असा की, वि. स. खांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली जो परिसंवाद चालला होता, त्याच्या सुरुवातीलाच त्यांनी, ‘जयप्रकाश नारायण हे जसलोक रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. त्यांच्या आरोग्यासाठी आपण दोन मिनिटे प्रार्थना करू या’ असा ठराव मांडला. त्या वेळी दुर्गाबाई भागवत, पु. ल., यशवंतराव - सारेच व्यासपीठावर हजर होते. संमेलनातील सर्व प्रेक्षक उभे राहिले. व्यासपीठावरील सारेच साहित्यिक उभे राहिले. स्वत: यशवंतरावजीसुद्धा उभे राहिले होते. जयप्रकाश नारायण यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून प्रार्थना, आणि तीही आणीबाणीच्या काळात, काँग्रेसचा गड असणार्‍या कराडमध्ये आणि भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या उपस्थितीत व्हावी आणि मंत्री महोदयांना प्रार्थनेसाठी उभे राहावे लागावे हे दृश्य आम्ही पाहिलंय, अनुभवलंय. ते दृश्य अनुभवताना अंगावर शहारे आले होते. हे सविस्तर लिहायचं कारण - जर गांधी, रारावीकर, कांदळगावकर, बंदरकर यांच्यासारखे शिक्षक नसते, तर हे आम्हाला अनुभवता आलं असतं का? आयुष्यात असं काही घडेल असं वाटलं नव्हतं, पण ते घडत गेलं, योग्य मार्गदर्शकांमुळे ते आम्ही अनुभवू शकलो.

आणीबाणीच्या काळातच एस. एम. जोशी मुक्त होते, ते खेड्यापाड्यात पदयात्रा काढत, जनजागृती करत, आणीबाणीविरोधी चर्चा करत, लोकांना भेटत. बंदरकर सर आणि गांधी सर यांनी मला आणि प्रकाश पंडीत यांना एक चिठ्ठी दिली की, तुम्ही पुण्याला जा आणि ‘साधना साप्ताहिका’च्या ऑफिसमध्ये यदुनाथ थत्ते यांना भेटा, ते अण्णांचा कार्यक्रम तुम्हाला सांगतील. मी आणि प्रकाश पंडीत आपलं नेहमीचं सामान घेऊन पुण्याला गेलो, ‘साप्ताहिक साधना’च्या ऑफिसमध्ये आम्हाला यदुनाथजींनी अण्णा म्हणजे एस. एम. जोशी यांच्या ‘पुरंदर पदयात्रे’ची माहिती दिली. स्वारगेटमार्गे आम्ही अण्णांसोबत निघालो. आमच्यासोबत तेव्हा ‘सर्वोदय’चे का. गो. गरुड, गोविंदराव शिंदे आदी लोक होते. वाल्हे, पुरंदर, नारायणपूर, सासवड अशी आमची पदयात्रा दहा दिवस सुरू होती.

अण्णा स्थानिकांशी सहज चर्चा साधून प्रश्नोत्तरं करत. वीस कलमी कार्यक्रम तुमच्यापर्यंत आला का हे विचारत. सभेत गरीब, वंचित, मागास समाजाचा तसेच गावातील स्थानिक मंडळींचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असे. काही भटके, विमुक्त यांनी आपलं गार्‍हाणं अण्णांपुढे मांडलं - ‘पोलिसांनी आमच्या पालावर धाड टाकून आम्हाला बायका-पोरांसह बदडून काढलं आहे. आमची भांडी, सामान जप्त केलं आहे.’ अण्णांनी हे फक्त ऐकूनच घेतलं नाही, तर त्यांना ते सासवड पोलिस स्टेशनला घेऊन गेले. पोलिसांशी सर्वांसमक्ष चर्चा करून भटक्यांना त्यांचं सारं सामान मिळवून दिलं. आणि पोलिसांना सांगितलं की, ब्रिटिश कायद्यानुसार या माणसांची गुन्हेगारी जात होती, पंडित नेहरूंनी त्यांना भारतीय नागरिक करून त्यांची चोरीची बेडी तोडली आहे, तुम्ही तरी त्यांना न्याय द्या. जगू द्या! त्या वेळी सर्व पोलीस कर्मचारी, अधिकारी आणि आम्ही फक्त ऐकत होतो. हा शिडशिडीत अंगकाठीा माणूस जो बोलतोय यात कायदा आहे, भारतीयता आहे. बंधुता आहे. कर्तव्य आहे, दु:ख आहे, विनवणी आहे अशी आमची भावना होती.

दहा दिवसांच्या या पदयात्रेत आम्हाला जे मिळालं, ती आयुष्यभराची शिदोरी होती. परतीच्या प्रवासात अण्णांसोबत स्वारगेटला उतरल्यावर तिथल्या टॅक्सी चालकाने स्वत: अण्णांची बॅग उचलली आणि डिकीत ठेवली. व्हिआयपी सेवा देतात तसं टॅक्सीचं दार स्वत: उघडलं. अण्णा आत बसल्यावर आम्ही बसलो. कुठे जायचं, भाडं किती, काहीच ठरलं नाही; बोललं गेलं नाही. आम्ही अण्णांच्या घरासमोर उतरलो. पुन्हा तोच सन्मान आणि आदर. अण्णांनी पैशांसाठी खिशात हात घातला, तेव्हा तो टॅक्सी ड्रायव्हर दोन्ही हात जोडून म्हणाला, “अण्णा एवढं तरी मला करू द्या. पैसे द्यायला खूप लोक आहेत, तुमच्याकडून पैसे कसे घेऊ मी?”
अण्णा म्हणाले, “तुझी मेहनत, गाडीचा घसारा.”
पण त्याने ऐकलं नाही आणि तसाच हात जोडत तो निघून गेला. असे होते अण्णा!

ताराबाईंनी आमची आस्थेवाईक चौकशी केली. चहा दिला. त्यांच्या सूनबाई आणि मुलाने पदयात्रेची माहिती विचारली. आमचे पत्ते घेतले. जेवण झाल्यावर आम्ही मुंबईकडे निघालो.

‘चले जाव’ चळवळ ही महात्मा गांधींनी 1942 मध्ये सुरू केली. ‘करो या मरो’, ‘जेल भरो’, ‘अहिंसात्मक सत्याग्रह’ करून इंग्रजांना हैराण करून सोडलं. त्या 1942 च्या चळवळीत दत्ता गांधी यांनी महाड येथे भाग घेतला होता, ब्रिटिश सरकारविरोधी घोषणा देऊन सत्याग्रह केला होता आणि अटक करून घेतली होती. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गांधी सरांचा स्वातंत्र्यसैनिक म्हणून ताम्रपट देऊन गौरव करण्यात आला. शासकीय पातळीवर त्यांना सांगण्यात आलं की, ‘तुम्ही स्वातंत्र्यसैनिक पेन्शन योजनेसाठी पात्र आहात! संबंधित फॉर्म भरा. कागदपत्रे जोडा...’ सर म्हणाले, “मी स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतला, तो देशाला ब्रिटिशांच्या जुलमापासून बाहेर काढण्यासाठी, मुक्त करण्यासाठी. त्याचा मोबदला मिळावा म्हणून मी हे केले नव्हते. स्वातंत्र्य चळवळीसाठी माझे योगदान हे माझे कर्तव्य होते. मला पेन्शन नको.” मारुतीच्या शेपटीसारख्या लांबणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या पेन्शन यादीत आपलं नाव यावं म्हणून धडपडणाऱ्यांची गर्दी पाहिली की, गांधी सर ‘धृवतार्‍या’सारखे उठून दिसतात. 

सर्वसामान्य माणसं नेहमी एकच रडगाणं गातात की, ‘आम्हाला मदत करायची आहे, पण कुणाला करावी? सारेच चोर आहेत.’ माझ्यामते, ही सारी माणसं ढोंगी असतात. वास्तविक त्यांना कधीच कुणाला मदत करायची नसते. बहाणेबाजी करून वेळ मारून न्यायची असते. आपण कसे शहाजोग आहोत, हे समाजात ठसवायचं असतं. वर्तमानपत्रात आलेल्या एखाद्या फसवणुकीचा दाखला ते देतात.पण खरंतर समाजात चांगले आणि वाईट असे दोन्ही प्रकारचे लोक सभोवती असतातच. माध्यमांमध्ये ‘कुत्रा माणसाला चावला’ ही बातमी येतच नाही, ती सर्वसामान्य घटना असते. पण ‘माणूस कुत्र्याला चावला’ ही विचित्र बाब / घटना असते, ती ठळकपणाने येते! वर सांगितलेली माणसं जे सोईचं आहे, तेच सारखं मांडून खोट्याचा प्रसार करतात आणि सत्य लपवतात. आज समाजात प्रामाणिकपणे, सचोटीने सामाजिक काम करणार्‍या अनेक संस्था आहेत, त्या आपलं काम कोणत्याही जाहिरातीविना करत राहतात. ‘नर्मदा बचाव आंदोलन’, ‘नर्मदा शाळा’ ही त्याचीच उदाहरणं. गांधी सर आणि आशा गांधी मॅडम यांनी 2010 च्या सुमारास विलेपार्ले येथे ‘नर्मदा बचाव आंदोलना’ला चाळीस हजार रुपये मेधाताई पाटकर यांच्याकडे सुपूर्द केले होते. नर्मदा बुडित क्षेत्रात ज्या आदिवासी शाळा आहेत, त्या शाळांसाठी गांधी दाम्पत्य कपडे आणि शालेय साहित्य, जीवनावश्यक वस्तू गोळा करून नियमितपणे पाठवत असतात.

कोरोना आपत्ती काळात लहान-थोर सारेच गरीब-श्रीमंत सारे जगण्याच्या चिंतेत होते. व्यवसाय, नोकर्‍या संकटात असल्यामुळे प्रत्येक जण खर्च नियंत्रित करीत होता. पण दत्ता गांधी आणि आशा गांधी दाम्पत्याने त्यांच्या वयाच्या अनुक्रमे 97 व्या आणि 90 व्या वर्षी चाळीस हजार रुपयांची पेन्शनची रक्कम ‘मुख्यमंत्री कोरोना केअर सहायता फंडा’ला दान केली. या दातृत्वाला काय म्हणावं? एरवी निवृत्तीनंतरचं आयुष्य म्हणजे आरोग्य तपासण्या, औषध-गोळ्यांची प्रिस्क्रिप्शन्स वाचणं, रक्तदाब तपासणं हेच उद्योग असणारे लोक आपण पाहतो.

‘आम्हा दोघांची तब्येत बरी आहे, फारशा तब्येतीच्या कुरबुरी नाहीत. तिन्ही मुली काळजी घेत असल्याने पैसे साठवण्याची गरज नाही.’ हे आत्मविश्वासपूर्ण बोलणारे गांधी सर पाहून बहुधा दुखण्यांनी त्यांच्यापासून दूर पलायन केलं असावं. नव्वदीनंतरचं वय म्हणजे ध्यानधारणा, देवपूजा, निवृत्ती वेतन, हयातीचा दाखला हे समीकरण ठरलेलं! पण गांधी दाम्पत्य म्हणजे काही तरी अजब रसायन आहे, हे आपण मान्य करायला हवं.

दादा धर्माधिकारी, एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, यदुनाथ थत्ते, बाबा आढाव, वसंत बापट, लीलाधर हेगडे, चंद्रशेखर धर्माधिकारी, मेधाताई पाटकर, मृणालताई गोरे, अहिल्याताई रांगणेकर, प्रभूभाई संघवी, मधु दंडवते, मधु लिमये, कुमार सप्तर्षी, सुधाताई बोडा, जॉर्ज फर्नांडिस, पन्नालाल सुराणा, ग. प्र. प्रधान, नरेंद्र दाभोलकर, सुधाताई वर्दे, अनु वर्दे, कमल देसाई, माधव गडकरी अशा ऋषितुल्य माणसांचा सहवास आम्हाला दत्ता गांधींमुळे लाभला.

‘दत्ता गांधी आणि आशा गांधी ही माणसं आमच्या आयुष्यात आली नसती तर...’ हा विचार मनात आला तर वाटतं की, त्यांच्याशिवाय आम्ही सामाजिक, सांस्कृतिक जीवनात करंटे झालो असतो, श्रमाची भाषा न समजता वैभवसंपन्न मध्यमवर्गीयांमध्ये वैचारिक नग्न म्हणून वावरलो असतो. मी + माझी बायको + मुले अशा गणिती बेरजा-वजाबाक्या करत बसलो असतो. शेजारी कुणी उपाशी आहे याची जाणीव झाली नसती. मस्तवाल जगलो असतो. खूप पैसे कमावले असते. नैतिकतेला पायदळी तुडवून श्रीमंत झालो असतो. सुदृढ समाजात, सूज आलेल्या मंडळींमध्ये वावरलो असतो. आपलं खोटं स्टेट्स निर्माण केलं असतं.

सरांच्या साध्या राहणीने, वैचारिक उत्तुंग भरारीने आम्ही नेहमीच दिपून जात असू. त्यांनी कधीच राणाभीमदेवी थाटात भाषणं करून, आवाज चढवून आपलं वक्तृत्व दाखवलं नाही, ते नेहमीच मृदुभाषी राहिले. त्यांची देहबोली विनम्रतेकडे झुकलेली राहिली. आणि हेच सारं आम्हाला गांधी सरांकडे, आशाताई गांधींकडे आजही आकर्षित करत आलं आहे.

- ईशान संगमनेरकर


Tags: दत्ता गांधी शताब्दी आशा गांधी समाजवाद समाजशिक्षक आणीबाणी स्वातंत्र्य चळवळ स्वातंत्र्य सैनिक Load More Tags

Comments:

Smita Gandhi

छान लेख. सविस्तर व प्रवाही लेखन. गांधी सर वा आशाताई गांधी यांच्याजडून काय शिदोरी मिळाली याच उत्तर अनेक प्रसंगातून रंगवलं आहे. पसरट असलं लेखन तरी व्यक्तीचित्रण चांगलं उतरल आहे.

Add Comment