‘नेटफ्लिक्स’ या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर नुकताच (9 सप्टेंबर 2020ला) प्रदर्शित झालेला ‘कार्गो’ हा पहिला हिंदी Sci-Fi (Science Fiction) सिनेमा सध्या चर्चेत आहे. (या सिनेमाच्या लेखक-दिग्दर्शक आरती कडव यांची मुलाखत कर्तव्य साधनावरून कालच प्रसिद्ध करण्यात आली आहे.) या सिनेमात नितीग्या सर ही भूमिका साकारली आहे नंदू माधव यांनी. प्रहस्था (विक्रांत मेस्सी) या अंतराळवीराशी पृथ्वीवरच्या ऑफिसमधून संपर्कात असणारा अधिकारी म्हणजे नितीग्या सर. हा संपूर्ण सिनेमा अंतराळयानात घडत असल्यामुळे अंतराळयानातल्या एका छोट्या मॉनिटरवरच नंदू माधव आपल्याला पूर्ण वेळ दिसतात... मात्र नंदू माधव यांनी ते पात्र इतक्या ताकदीनं उभं केलेलं आहे की, नितीग्या सरांविषयी आपलेपणा तर निर्माण होतोच... शिवाय नितीग्या सर प्रहस्थाच्या बरोबरीनं आपल्यालासुद्धा सोबत करत आहेत असं वाटतं. नंदू माधव यांच्या ‘कार्गो’विषयीच्या अनुभवाविषयी त्यांच्याशी साधलेला हा संवाद...
‘कार्गो’ या पहिल्या हिंदी Sci-Fi सिनेमाविषयी काय सांगाल?
- Sci-Fiमध्ये) मिस्टर इंडियासारखे काही मोजके प्रयोग झाले आपल्याकडे... पण त्यांत काल्पनिक तंत्रज्ञान हे गमतीचा भाग म्हणूनच अधिक आलं. कार्गो हा अभ्यासपूर्वक आणि सगळ्या शक्यता तपासून त्यानुसार बनवलेला Sci-Fi सिनेमा आहे. परदेशांत Sci-Fi सिनेमांचे खूप प्रयोग झालेले आहेत. ‘ज्युरासिक पार्क’पासून ‘ग्रॅव्हिटी’पर्यंत... किंवा अलीकडच्या नेटफ्लिक्सवरच्या ‘ब्लॅक मिरर’पर्यंत... या परदेशी सिनेमांमध्ये कल्पना आणि काल्पनिक विज्ञान या संदर्भानं अनेक प्रयोग झालेले आहेत... पण आपली भारतीय संस्कृती, पुराणं, आपल्या कथा, आपली मानवीय वैशिष्ट्यं यांवर आधारित Sci-Fi सिनेमा आरतीनं केला... त्यामुळे मला ‘कार्गो’ अगदी मातीतला आणि तरी वैज्ञानिक असा सिनेमा वाटतो.
‘कार्गो’मधली नितीग्या सरांची भूमिका तुमच्यापर्यंत कशी आली?
- श्लोक शर्मा हा कार्गोच्या निर्मात्यांपैकी एक आहे. त्याच्यासोबत मी पूर्वी एक लघुपट केला होता. त्यानं मला फोन केला. आरतीची ओळख करून दिली... असा असा सिनेमा करायचा आहे वगैरे सांगितलं. मग आरती घरी आली एकदा... तिनं कथा सांगितली. ‘मी हा Sci-Fi सिनेमा करतीय. मी तुमची बरीच कामं पाहिलेली आहेत आणि मला या भूमिकेसाठी तुम्हीच हवे आहात.’ असं तिचं पालुपद तेव्हा होतं. खरं सांगायचं तर कथा-पटकथा ऐकल्यानंतर मला नितीग्याचं पात्र अपूर्ण वाटत होतं. भूमिका छोटी-मोठी हा सवाल नसतो... पण ते पात्र अपूर्ण वाटलं तर गंमत नाही. नितीग्या मला कथेत उपरा वाटत होता. मग तिच्या मूळ ढाच्याला न हलवता मी काही बदल सुचवले. फक्त नितीग्याचं पात्र नाही तर संपूर्ण कथा त्या मांडणीतून पूर्ण होते असं आरतीला वाटल्यामुळं तिनं ते बदल केले. मला कथा इंटरेस्टिंग वाटली होतीच. मग काय... मी ‘हो’ म्हणलं. शुटिंगच्या तारखा ठरल्या. एक दिवस आणि दुसऱ्या दिवशीचे दोनतीन तास असं दीड दिवसांत माझं सबंध शूट पूर्ण झालेलं आहे.
हो... आरतीनं मला ही गोष्ट सांगितली. हे सरांनी कसं जमवलं हे पण विचार म्हणाली...
- हो. फक्त कपडे बदलून दिवस बदलल्याचा दाखवणं इतकं सोपं नव्हतं ते! कथेत वेगवेगळ्या भावना, प्रसंग आणि ताणतणाव आहेत... ते सगळं दिसायला हवं होतं. कसं झालं... माझ्या शूटच्या आधी विक्रांतचं आणि श्वेताचं सगळं शूट झालेलं होतं त्यामुळं त्यातलं काही फुटेज आरती मला सेटवर दाखवत होती. माझ्या भूमिकेची खोली वाढवण्यासाठी मला त्याचा उपयोग झाला. मी श्वेताला तेच म्हणलं की, ‘मला काही बरं करता आलं तर त्याचं श्रेय तुम्हाला आहे... कारण तुम्ही करून ठेवलेलं होतं... त्याला मी फक्त रिअॅक्शन देत गेलो.’
मी त्याच प्रश्नाकडे येणार होते... सिनेमामध्ये जेव्हा तुम्ही बोलत नाही आहात किंवा जेव्हा त्या दोघांपैकी कुणीही तुमच्याशी बोलत नाहीय तेव्हासुद्धा तिथे जे काही घडतं आहे त्याला तुम्ही प्रतिक्रिया देत आहात आणि कदाचित त्यामुळं ती परिस्थिती, ते वातावरण जिवंत वाटायला, खरं वाटायला मदत झाली.
- आरती मला त्यांचं फुटेज दाखवत होती नाऽ त्यामुळं त्यांच्या बोलण्याकडे नितीग्याचं लक्ष आहे आणि तो नैसर्गिकरीत्या त्यावर रीअॅक्ट होतोय हे लक्षात घेऊन मी अभिनय केला, रिअॅक्शन दिल्या. माझ्या तोंडी भरपूर वाक्यं हवीत असं माझं म्हणणं नव्हतं... पण माझं पात्र कथेशी जोडलं जावं, उपरं वाटू नये असं मला वाटत होतं. नितीग्या स्वाभाविक वाटायला हवा होता आणि त्याच्या प्रतिक्रियांमधूनच तो तसा वाटू शकला असता. आरतीलाही ते पटलं होतं. तिनं ही भूमिका लिहिताना तसा सिक्वेन्स लिहिलेलाच होता.
कसंय... आधी कितीही चर्चा झालेल्या असल्या तरी शूट सुरू झाल्यावर माझ्यावर गोंधळून जाण्याची पाळी आली... कारण त्या दोघांचं शूट आधी झालेलं... त्यामुळं माझं असं व्हायचं की, ‘हा कुठला सीन म्हणतीयस तू आता? हे कधी घडतंय?’ पण तिला ती पूर्ण क्लॅरिटी होती आणि तिला माहिती होतं की, तिला काय हवंय.
तुम्ही ‘कार्गो’मध्ये एकदासुद्धा स्क्रीनभरून दिसलेले नाही आहात. पूर्ण वेळ तुम्ही एका छोट्या मॉनिटरवर दिसताय. त्यातही अर्धेच दिसताय. याचा विचार करून तुम्ही अभिनयात काही बदल केले का?
- अगंऽ खरं म्हणजे शुटिंग करताना मला ही गोष्ट माहितीच नव्हती. डायरेक्ट पहिल्या स्क्रीनिंगला मला ते समजलं. तेव्हा मी आरतीला म्हणलंसुद्धा की, ‘लेखक-दिग्दर्शक लबाड असतात. ते त्यांना हवं ते बरोबर आमच्याकडून काढून घेतात.’ शुटिंगच्या वेळी काय झालं... तिनं एकाच अँगलनं कॅमेरा लावला. मी म्हणलं, ‘अगंऽ तू अँगलपण बदलत नाहीयस’. मी विचार करत होतो, शिकणारी मुलगी आहे, विसलिंग वूडमधून बाहेर पडल्यानंतर पहिलीच फिल्म ही बनवती आहे... पण ती कॉन्फिडंट होती... कारण तिला माहिती होतं नाऽ काय दिसणार आहे आणि कसं दिसणार आहे ते.
..पण माझा एकही क्लोजअप किंवा फुलस्क्रीन शॉट नसतानाही माझं अस्तित्व सिनेमाभर जाणवतं हे मामी फेस्टिवलमध्ये आणि मग नंतर बऱ्याच लोकांकडून प्रतिक्रिया मिळाल्या तेव्हा अधोरेखित झालं आणि कसंय... मला पूर्ण वेळ असं मॉनिटरमध्ये दाखवल्यामुळं आकाशातलं अंतराळयान आणि जमिनीवरचं ऑफिस अशा दोन स्पेस छान तयार झाल्या.
हो. तुमच्या ऑफिसमध्ये तुमचा कॉम्प्युटर, टिफीन... आणि तुमच्या मागच्या टेबलवरसुद्धा एक मुलगा बसलेला आहे.
- हो... हो... म्हणजे मी त्या स्क्रीनवर आधीच एवढ्याशा मॉनिटरवर दिसतोय. त्यातही मागे बसलेला तो मुलगा एक चतुर्थांश भागात दिसतोय... पण त्यामुळं ते ऑफिसचं वातावरण चांगलं तयार झालं. ऑफिसला खोली आली चांगली.
नितीग्या सरांच्या पात्राविषयी एक आपलेपणा निर्माण होतो. म्हणजे प्रहस्था अंतराळातून खाली येतो तेव्हा नितीग्याची आणि प्रहस्थाची भेट व्हावी असं बघताना मला वाटलं.
- होऽ कारण तो प्रहस्थाचा सोबती आहे एका अर्थानं... आणि म्हणून युविष्का विचारते नितीग्याला की, तुम्ही प्रहस्थाला भेटला नाहीत का? तेव्हा तो सांगतो की, चार ते पाचची वेळ ठरली आहे तेव्हा भेटणार आहे. तर तसं पाहिलं तर तिनं ती भेट दाखवलेलीच आहे आणि गंमत म्हणून सांगतो की, खऱ्या आयुष्यात मी आणि विक्रम अजून भेटलेलोच नाही.
आरतीला मी विचारलं की, नंदू माधव सरांची उद्या मुलाखत करणार आहे तर काय विचारू त्यांना? ती म्हणाली, ‘आम्ही किती परेशान केलं त्यांना’ असं विचार.
- हे बघ आपल्याकडे अशा Sci-Fi कथेला सकारात्मक प्रतिसाद देणारा निर्माता मिळणं, हवं तेवढं बजेट मिळणं अवघड आहे. अर्थात बजेट हा सिनेमाचा एक भाग असतो फक्त... शेवटी गोष्ट चांगली असावी लागते आणि हा मुद्दा कार्गोमुळे पुन्हा सिद्ध झाला. एक-दीड दिवसात शूट करणं कठीण होतं... पण आरती इतकी मृदू भाषक आणि हसरी आहे, उत्साही आणि हुशार आहे... त्यामुळं ते करणं सोपं गेलं आणि एकदा काम सुरू झालं की मग तुम्हाला नाराज होऊन आणि चिडचिड करून चालत नाही. बजेट कमी आहे, एका दिवसात करायचं आहे, पटापट कपडे बदलायचे आहेत. ओके मग तिकडे सीनची तयारी होते आहे तोपर्यंत आरतीऽ तू मला पुढे काय होणार आहे सांग, फुटेज दाखव. हे करून बघू, अशी प्रतिक्रिया घेऊ. अशी सगळी क्रिएटिव्हिटी चालू असताना होणारा त्रास हा गरोदरपणाच्या त्रासासारखा आहे. तो छान आहे. आता मी जे काउंट डाऊन घेतले की ‘थ्री.. टू... वन... ओ’ तर हा शेवटचा ‘ओ’ सेटवरच्या तालमीतून आणि प्रयोगातून सापडला. बारा-चौदा तास शुटिंग करत होतो... पण मजा आली काम करताना.
‘कार्गो’च्या रसग्रहणाविषयी सांगायचं झालं तर ‘6 philosophies of cargo’सारखे व्हिडिओ प्रसिद्ध झाले आहेत. या सिनेमातले संवाद आणि घटना यांचे वेगवेगळे अर्थ लावले जाऊ शकतात असं म्हटलं जातंय... कार्गोमध्ये तुम्हाला काय तत्त्वज्ञान सापडलं?
- कार्गोमध्ये तशा open for interpretation करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. प्रेक्षकांनी ते पदर उलगडून पाहावेत. प्रेक्षक म्हणून मी कार्गोमधून काय घेतलं तर ‘प्रत्येक माणसाचं एक शक्तिस्थान असतं’. कार्गोमध्ये ते स्पष्ट दाखवलं आहे. प्रहस्थाकडे कोणतीही गोष्ट उचलण्याची ताकद आहे, युविष्का जखमा बऱ्या करते, मी अदृश्य होतो. तसंच मला आपल्याविषयी वाटतं की, जगाच्या कोपऱ्यातल्या खेड्यातल्या एका माणसापासून ते बड्या शहरातल्या खूप शिकलेल्या माणसापर्यंत प्रत्येकाकडे एक कौशल्य असतं. अगदी लाकूड तोडण्यापासून ते वैज्ञानिक शोध लावण्यापर्यंत. कुणी अंकगणित चांगलं करत असेल, कुणी चांगला हिशोब करेल, कुणी कलाकार असेल. जगाला आणि जगण्याला उपयोगी पडणारं असं कोणतं-ना-कोणतं शक्तिस्थान आपल्या प्रत्येकाजवळ असतं. ते आपण शोधलं पाहिजे आणि त्यानुरूप आपला जीवनप्रवास पुढे नेला पाहिजे.
कार्गोसाठी तुम्हाला मिळालेल्या प्रतिक्रियांविषयी सांगा...
- एकतर असा आपल्या मातीतला Sci-Fi हिंदी सिनेमा बघून लोक अचंबित झाले आणि दुसरं म्हणजे त्यांना भरून आलं होतं. आपल्या जीवनमरणाचा प्रवास एका अर्थानं कार्गोमध्ये दाखवलेला आहे. तो बघून त्यांना भरून येत होतं.
(मुलाखत आणि शब्दांकन- मृदगंधा दीक्षित)
Tags: नेटफ्लिक्स सिनेमा साय- फाय आरती कडव कार्गो विज्ञान मृदगंधा दीक्षित नंदू माधव Interview Arati Kadav Mrudgandha Dixit Nandu Madhav Cargo Netflix Sci-Fi Load More Tags
Add Comment