दिलशाद मुजावर आणि संजय मुंगळे. पेशानं दोघंही वकील. वकील म्हटलं की आपापल्या पक्षकारांची बाजू घेऊन लढणं आलंच! पण ही लढाई मात्र काही वेळा दोघांमध्ये कोर्टाबाहेरचं ‘भांडण’ म्हणून उभी राहिली. भांडणाचं मूळ ही पेशाशी संबंधितच. दोघांचाही स्वतःच्या वकिली अभ्यासावर आणि कौशल्यावर गाढ विश्वास. असं एकमेकांविरुद्ध लढता-भांडता दोघं मात्र हळुवारपणे एकाच पक्षात येऊन पडले... प्रेम! दोघंही प्रेमाच्या एकाच पक्षाचे झाल्यानंतर दलीले कुणाविरुद्ध करणार? तशी अगदीच वेळ आली तर ते घरच्यांविरुद्ध आणि तेही एकत्रित येऊनच करावं लागणार होतं.
दिलशाद आणि संजय प्रेमात पडले तेव्हा त्यांनी वयाची तिशी ओलांडली होती. कामानिमित्तानं जग-व्यवहार पाहिलेला होता. आर्थिकदृष्ट्या दोघंही स्वावलंबी आणि कायद्याची पुरेपूर जाण असणारे होते... त्यामुळं घरच्यांचा विरोध असा झाला नाही मात्र पालकांची संमती मिळवण्यासाठी थोडं थांबून राहणं तेवढं वाट्याला आलं. घरचे राजी झाले. शेवटी कोर्टाच्या इमारतीखालून मैत्री-प्रेमाच्या वाटेवर निघालेल्या दोघांनी कोर्टाच्या साक्षीनं नोंदणी पद्धतीनं लग्न केलं. विशेष म्हणजे लग्नासाठी 30 ऑगस्ट 2002 ही तारीख निवडली... तीही अमावास्येची. अंधश्रद्धेला फाटा देणं हा त्यामागचा विवेकी विचार होता.
कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजी या गावी दिलशाद यांचं लहानपण गेलं. सुशिक्षित आईवडील, तिघी बहिणी आणि एक भाऊ असं त्यांचं कुटुंब होतं. वडील ईलाही माणिक मुजावर हे कारखानदार होते आणि सामाजिक कार्याशी जोडलेले तर आई बेबी अख्तर या गृहिणी. घरातल्या परिवर्तनवादी विचारांचा प्रभाव दिलशाद यांच्यावर राहिला. शाळा-महाविद्यालयात त्यांनी व्यासपीठ आणि क्रीडामैदानं, दोन्ही गाजवली आहेत. आठवीत असल्यापासून त्यांनी विविध वकृत्त्व-वादविवाद स्पर्धांमध्ये आपली मतं मांडायला सुरुवात केली. वैचारिक/तार्किक क्षमतेचा विकास, भाषेची जाण यांमुळं आणि भाषणकौशल्याच्या शाळेतच झालेल्या ओळखीनं त्यांना वकिली व्यवसायाकडं वळवलं. त्यांनी कोल्हापूरमधून शहाजी कॉलेजमधून एल.एल.एम. केलं. 1996पासून त्या इचलकरंजी, जयसिंगपूर, कोल्हापूर आणि वडगाव इथं सिव्हील, क्रिमिनल आणि सहकारी कोर्टांमध्ये वकिली करत आहेत. नागरी प्रश्न, मुलींचे शिक्षण, आरोग्य, महिलांच्या स्वच्छतागृहांचा प्रश्न, शाळा-महाविद्यालयीन वाटेत होणारी मुलींची छेडछाड अशा विविध प्रश्नांवर त्यांचं सामाजिक कार्य चालूच आहे. 2018मध्ये त्यांची बाल कल्याण समितीच्या सदस्यपदी निवड झाली.
तृतीयपंथी व्यक्तींना स्वावलंबी जीवन जगता यावं आणि सन्मान मिळावा यासाठी दिलशाद यांचे कार्य सुरू आहे. इचलकरंजीसारख्या छोट्या गावात 250 ते 300 तृतीयपंथी व्यक्ती राहतात आणि त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे हे माहीत झाल्यानंतर त्यांनी गावातल्या तृतीयपंथी समाजाशी संवाद साधायला सुरुवात केली. रेशनकार्ड, आधारकार्ड यांसारख्या कागदपत्रांच्या अभावामुळे योजनांचा लाभ घेता येत नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून ते मिळवून दिले. व्यावसायिक-उद्योजकांशी संपर्क साधून रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्या प्रयत्नशील राहिल्या. तृतीयपंथी व्यक्तींचे बचतगटही त्यांनी सुरू केले. या सगळ्याचा परिणाम असा झाला की, त्यांना शासकीय स्तरावरून काम करण्याची संधीही मिळाली आहे. जून 2020मध्ये महाराष्ट्र राज्य तृतीयपंथी कल्याणकारी मंडळाच्या सदस्यपदी (कायदा प्रतिनिधी) म्हणून त्यांची निवड झाली. महत्त्वाचे म्हणजे अशा तर्हेच्या मंडळाची स्थापना राज्यात पहिल्यांदाच करण्यात आली आहे.
संजय मुंगळे हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले या तालुक्याच्या गावचे. आईवडील आणि दोन भाऊ असं त्यांचं कुटुंब. त्यांचं लहानपण एकत्र कुटुंबात गेलं. वडलांचे चार भाऊ आणि त्यांचं कुटुंब. आजोबांची 40 एकर शेती... शिवाय आई बनूताई आणि वडील शिवलिंग दोघंही शिक्षक. घरात आर्थिक सुबत्ता होती मात्र शिक्षणाच्या निमित्तानं त्यांना बाहुबली, कोल्हापूर अशा ठिकाणी होस्टेलवर राहावं लागलं. घरचा उंबरठा ओलांडल्यानं व्यवहाराचं शहाणपण आलं. कोल्हापूरमधूनच त्यांनीही बी. ए., एल. एल. बी पूर्ण केलं. त्यादरम्यान शाहूनगरीतल्या ठिकठिकाणच्या व्याख्यानांना लावलेली हजेरी आणि आडवंतिडवं वाचन यांतून त्यांची वैचारिक बैठक पक्की होत गेली. समाजभानातून समाजकार्याकडं मन वळायला लागलं. 1995पासून ते इचलकरंजी, जयसिंगपूर, कोल्हापूर आणि वडगाव या ठिकाणी वकिली करत आहेत. 2020मध्ये कोल्हापूर जिल्ह्याच्या बाल कल्याण समितीत सदस्य म्हणून संजय यांचीही निवड झाली आहे.
घरी आणि आवडत्या कार्यक्षेत्रात दोघांचा एकत्र असा प्रवास सुरू आहे. याच प्रवासात स्वतःची वाट शोधत संजना ही त्यांची पंधरा वर्षांची मुलगीही सहभागी झाली आहे. त्यांच्या या प्रवासाविषयी दिलशाद आणि संजय यांच्याशी केलेला हा संवाद...
प्रश्न - तुम्हा दोघांच्या कौटुंबिक स्तरावरचं वातावरण कसं होतं?
दिलशाद - मी मुस्लीम आहे मात्र माझं कुटुंब पारंपरिक विचारांचा पगडा असलेलं नव्हतं. धर्माभोवतीच गुरफटलेलं असं कधीही नव्हतं. आईवडलांचं प्रेम आणि प्रेमातून येणारा धाक होता. बंधनं कधीच नव्हती. माझे वडील सामाजिक क्षेत्रात कार्यरत होते. ते स्वतः परिवर्तनवादी विचारांचे असल्याने मुलींवर पहारा ठेवणं, त्यांना दडपून टाकणं याच्या ते स्वतःच विरोधात होते. कुठल्याही प्रकारची रोकटोक नव्हती. तू अमुकच कर आणि ढमुकच कर, तुला शिकताच येणार नाही असा कुठलाच जाच नव्हता. उलट शिक्षणाच्या बाबतीतसुद्धा विशिष्टच काही शिकावं असाही घरात कुणाचा काही आग्रह नव्हता. तुमच्या आवडीचं, तुमची गती ज्यात आहे ते तुम्ही शिकावं असा घरच्यांचा विचार होता त्यामुळं शिक्षणाबाबतचे निर्णय घेताना कुठलीच अडचण आली नाही आणि मी एलएलएम करू शकले. वेगवेगळे इतरही कोर्सेस करू शकले कारण यात कुठंही आडकाठी नव्हती. आता माझी एक बहीण सायबरमध्ये एमबीए आहे, एक बीकॉम आहे. घरी शिक्षणाला महत्त्व देणारं वातावरण होतं.
शाळेत असताना मी मैदानी खेळातही चांगलीच तरबेज होते. आईवडलांना त्याचा फारच अभिमान होता. मी खेळात अजून प्रावीण्य मिळवावं असं वडलांना खूप वाटायचं. ते स्वतःच मला सकाळी उठवून धावायला लावायचे. व्यायाम करवून घ्यायचे. मी शाळेकडून कबड्डी खेळायचे. ते स्पर्धेच्या ठिकाणी कबड्डी पाहायला बर्याचदा यायचे. फार आनंदून जायचे. काही वेळा तर तेच सोबत घेऊन जायचे. वक्तृत्व स्पर्धांमध्येही माझा सहभाग असायचा. वडील त्याही स्पर्धांना आवर्जून नेत असत. माझं घर मुलींच्या वाढीच्या दृष्टीनं पुरेसं मोकळंढाकळंच होतं. आम्ही स्वतंत्र व्यक्ती आहोत अशाच तर्हेनं वाढवलं. माझ्या तर दुसर्या बहिणीचाही आंतरधर्मीय विवाह आहे.
संजय - मी लिंगायत कुटुंबात जन्मलो. वयाची विशी गाठेपर्यंत एकत्र कुटुंबात वाढलो. मला चार चुलते आहेत त्यामुळं नऊ भाऊ आणि सहा बहिणी असा आमचा भावंडांचा मोठा कबिला होता. आजोबांची 40 एकर शेती असल्यामुळं स्वयंपाकघरात लागणारे सगळे जिन्नस पिकवले जायचे. गायीम्हशी बकर्या अशी 16 जनावरं होती त्यामुळं दूधही घरचंच असायचं. फक्त खाद्यतेल तेवढं विकत आणत असू असं मला आठवतंय. भाकरीचा चंद्र, चांदण्याची रात्र, विहिरीच्या मोटीतून पाणी उपसणं या सगळ्या संकल्पना मी जवळून अनुभवल्या. मळ्यात तर लाईटही नव्हती. टेंभे, रॉकेलचे टेंभे असायचे... पण हे सारं सुखावणारं होतं. शिवाय आईवडील दोघंही शिक्षक. वडील मुख्याध्यापक म्हणून रिटायर्ड झाले. आज वडील हयात नाहीत... माझेही आणि दिलशादचेही पण वडलांनी कधी लाडावून ठेवलं नाही. घरचं सुस्थितीत होतं तरी पैशांची किंमत कळावी अशाच तर्हेची राहणी कुटुंबातल्या प्रत्येकाची होती. शाळेसाठी दिलेली एक छत्री, चपला वर्षानुवर्षं चालवायचे. वस्तू वाया घालवायच्या नाहीत असाच दंडक. साधारण 1986मध्ये माझे वडील एकत्र कुटुंबातून बाहेर पडले. मी तेव्हा 20 वर्षांचा होतो.
दहावीपर्यंत बाहुबली या गावी शिक्षण झालं. होस्टेलवर राहणं असल्यानं ताटात पडेल ते खाणं आणि सतरंजीवर अभ्यास व झोपणं असा दिनक्रम होता. तुमच्या गावी किती एकर शेती आहे त्यावरून तिथं तुमची ऊठबस होत नसे. सगळे विद्यार्थी समान. हे सगळं कुठंतरी बिंबत गेलं. पुढं अकरावी ते एलएलबी कोल्हापुरात शहाजी कॉलेजमध्ये होतो. तिथंही पुन्हा होस्टेलमध्ये राहणं आलं. त्या वेळी कोल्हापुरात वेगवेगळ्या मान्यवरांची बरीच भाषणं व्हायची. आज कॉम्रेड बोलला, उद्या काँग्रेसवाला, परवा समाजवादी, मग अजून कुणी. सर्व प्रकारचे विचार कानांवर पडत होते. त्यातून तावूनसुलाखून निघत होतो. जोडीला प्रचंड वाचन होतंच. त्यातून एक वैचारिक मानस तयार होत गेलं.
प्रश्न - दोघांनी वकिलीचं शिक्षण घेतलंय. शिक्षण घेताना कॉलेजातच भेट झाली का?
दिलशाद - नाही... नाही... आम्ही एकाच कॉलेजातून शिक्षण घेतलंय पण तिथं आमची ओळख झाली नव्हती. आमच्या बॅचेसही वेगळ्या आहेत. आम्ही पहिल्यांदा इचलकरंजी कोर्टातच भेटलो... अर्थात विरुद्ध पक्षाचे वकील म्हणून. साधारण 1996मध्ये. सुरुवातीला आमची एकमेकांविषयीची मतं फार काही बरी नव्हती. आपल्या केसमध्ये विरुद्ध बाजूचा वकील अशी सपक भावना होती. गंमत अशी होती की, आमचा वकिली बाणा केसपुरता मर्यादित नव्हता. आम्ही एकमेकांना खूप खुन्नस द्यायचो. आम्हाला दोघांनाही आमच्या ज्ञानाचा, हुशारीचा फार अभिमान होता म्हणजे अजूनही आहे... त्यामुळंच हा / ही कोण शहाणा अगर हुशार लागून गेलाय / गेलीय असंच मत होतं. मला वाटायचं, मी माझ्या कामात हुशार आहे आणि त्यालाही वाटायचं तो त्याच्या कामात हुशार आहे. आम्ही आमच्या केसमधल्या आपापल्या बाजू केसपुरत्या मर्यादित न ठेवता काहीसं ते आम्ही इगोवर घेतलेलं होतं. हीच कुठंतरी आमच्या दोघांनाही आकर्षित करणारी गोष्ट ठरली. आम्हाला कुठंतरी कळत होतं की, दोघंही आपापल्या कामात प्रामाणिक आहोत. दोघांनाही कामाबद्दल पॅशन आहे आणि ती दोघांचीही कमाल आणि समान पातळीवर आहे. याच गुणामुळं आम्ही एकमेकांकडं ओढले गेलो.
संजय - आम्ही भांडत होतो हे खरंय... पण त्यातूनच तिची जगण्याची, लढण्याची विजिगीषू वृत्ती दिसत होती आणि मला ते फार आवडत होतं. तोपर्यंत शाळा, कॉलेज, कोर्ट अशा विविध ठिकाणच्या बऱ्याच मित्रमैत्रिणी होत्या पण ही वृत्ती त्यांच्यापैकी कुणाकडेच दिसत नव्हती... म्हणूनही मला तिच्या त्या वृत्तीचं आकर्षण वाटायचं. कोर्टात आमची चांगली खडाजंगी व्हायची पण यातूनच हळूहळू आमचा संवाद वाढला. आमच्या दोघांमध्ये आणखी एक समान धागा आहे. तो म्हणजे वाचनाचा. दोघांनाही वाचनाची प्रचंड आवड त्यामुळंच आम्ही पुस्तकांबाबत भरपूर चर्चा करत राहायचो. त्यातूनच कुठंतरी खूणगाठ बांधली गेली. ती देखणी तर आहेच. एक गृहिणी, सखी, मैत्रीण, आई आणि समाजातल्या भल्याबुर्या गोष्टींसाठी पेटून उठणारं कार्यकर्तेपण हे सगळं तिच्यात आहे... जे मला प्रचंड आवडतं.
दिलशाद - आणि संजय माझ्या अगदी विरुद्ध स्वभावाचा आहे. त्याचा हळवेपणा, इतरांबद्दल असणारी संवेदनशीलता, काळजी घेण्याची तर्हा या गुणांनी मी इंप्रेस झाले. दोघांचीही वैचारिक बैठक तर पक्की होतीच... पण आम्ही दोघंही जाणीवपूर्वक एकमेकांच्या आवडीनिवडी, गुणदोष यांचा विचार करत असू. आमची मॅच्युअर्ड लव्हस्टोरी होती.
प्रश्न - मॅच्युअर्ड लव्हस्टोरी! म्हणजे नेमकं काय उलगडून सांगा ना...
दिलशाद - आम्ही प्रेमात पडलो तेव्हा वयाची तिशी ओलांडलेली होती. तिशी पार करता तेव्हा अनुभव आणि एकूणच बर्यापैकी अक्कल आलेली असते... त्यामुळं साहजिकच किशोर वयातल्या मुलांसारखं वाहवत जाणं नव्हतं. वयामुळं विचारांची प्रगल्भता आलेली होती आणि भावनिक स्पष्टताही होती. तरीही प्रेमाची प्रचिती, ती कुठल्याही वयात आली की सुरुवातीची हुरहुर किंचितसा वेडेपणा होताच. तशी आम्हीही थोडीफार मजा केलीच. कोर्टात काळेपांढरेच कपडे असायचे म्हणा पण रेनकोटचा कलर मॅच करणं किंवा शेजारी-शेजारी स्कुटर लावून एकमेकांवर इंप्रेशन टाकणं असं. काही वेळा चोरून सिनेमेही पाहिले. आमच्या कोर्टाबाहेर जवळच्या अंतरावरच कोल्ड्रिंकचं एक दुकान होतं. तिथेच आम्ही बर्याचदा भेटून गप्पा मारायचो. अशा बर्याच गोष्टी आम्हीही केल्या.
प्रश्न - पारंपरिक नसलं तरी ‘मुस्लीम’ कुटुंबातल्या एका मुलीची वयाची तिशी पार झाली म्हटल्यावर लग्नासाठी घरच्यांचा दबाब येत नव्हता?
दिलशाद - माझ्या कामांचा व्यापच इतका होता की, काही विचारायला नको. घरच्यांचं त्यांच्या स्तरावर पाहणं चालू होतं. विचारणाही व्हायची पण पहिल्यापासून स्वभावच स्वतंत्र बाण्याचा असल्यानं कुठलीही गोष्ट माझ्या मनाविरुद्ध होणार नाही याची खातरीही होतीच. अर्थात तरीही ते इतका काळ शांतपणे थांबून राहिले, माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले याचं कौतुकच करायला हवं. त्या वयात त्यांच्या वागण्याचा अर्थ उमगत नसला तरी आता लक्षात येतं ना की, ते तितकंसं सहज नव्हतंच.
प्रश्न - मग घरी सांगितल्यानंतर त्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या?
दिलशाद - आम्ही एकमेकांना पुरेसे ओळखायला लागल्यानंतर आणि एकत्र येण्याचा विचार पक्का झाल्यानंतर आम्ही घरी सांगितलं. माझ्या घरी संजय स्वतःच आला होता. घरी आपण असा काही निर्णय सांगितला की पहिली आणि विचारशून्य प्रतिक्रिया ही अस्वीकाराचीच असते. अजूनतरी कुठल्याही कुटुंबात आंतरधर्मीय वा आंतरजातीय विवाह आहे म्हटलं की लगेचच ते राजी होतील असं नाही. तसा विरोध असाही काही नव्हता. विरोधाला विरोध म्हणूनही नव्हता. त्यांचं एवढंच म्हणणं होतं की, विचार कर, पुढच्या गोष्टींची कल्पना आहे ना. असं न करता तसं केलंस तर... असं काही प्रमाणात परावृत्त करण्याचा प्रयत्न झाला पण तोही काही जोरकस नव्हता. खरंतर माझ्या आईवडलांचाही प्रेमविवाहच आहे. तो एकाच धर्मातला असला तरी प्रेमविवाहातले खाचखळगे त्यांना माहीत होते त्यामुळं मला त्याला सामोरं जायला लागू नये अशी एक भावना होती आणि दुसरी की, ते उलट अधिक चांगल्या प्रकारे प्रेमाची भावना समजू शकत होते.
बरंऽ आम्ही दोघंही वयाच्या अशा टप्प्यावर होतो की, आमचे निर्णय घ्यायला आम्ही स्वतंत्र होतो. मी तर तेव्हा न्यायाधीशपदाच्या परीक्षा देत होते. वकिलीमध्ये आठदहा वर्षं झाली होती शिवाय स्वतः वकील म्हणून आम्ही बर्याच जणांच्या सजातीय-आंतरजातीय, आंतरधर्मीय अशी लग्नं लावून दिलेली होती. कित्येकांचे वकील-साक्षीदार म्हणून आम्ही सोबत केली होती. कित्येकांच्या वैवाहिक जीवनातल्या समस्या समजून घेणं; त्यांना मार्गदर्शन, समुपदेशन आणि प्रसंगी केस लढणं हा आमच्या कामाचाच भाग होता... त्यामुळं लग्नाचा निर्णय घेतला तेव्हा आम्ही सर्वार्थानं पुरेसे सजग होतो. आम्ही लग्न करतोय म्हणजे जगावेगळं काही करतोय असा विचार आमच्या मनात तरी नव्हता. कुणाही दोन व्यक्तींप्रमाणे विवाहबद्ध होतोय असंच वाटत होतं. तरी आपल्या धार्मिक आणि सामाजिक चौकटींमध्ये हे वेगळ्या तर्हेचं आंतरधर्मीय असं लग्न असणार याचीही जाण होतीच. याउपरची गोष्ट म्हणजे विरोध होऊन आम्ही बाहेर पडलो तर उपाशी राहू, आमचं कसं होणार अशी कुठलीच भीती आमच्या मनात नव्हती. व्यावसायिकदृष्ट्या आम्ही सेटल होतो. तशी वेळच आली तरी आर्थिक स्वावलंबी होतो... पण तशी काही गरज पडलीच नाही. आम्ही ठाम होतो. आमच्या दोघांमधलं अंडरस्टँडिंग चांगलं होतं आणि सुदैवानं पालकांशीही... त्यामुळं त्यांनी खूप चांगल्या तर्हेनं समजून घेतलं आणि आमच्या निर्णयाचं स्वागत केलं. निभावून नेलं. आम्ही दोघांनीही स्पेशल मॅरेज अॅक्टनुसार लग्न केलं. सतत परिवर्तनाच्या वाटेवर चालणार्या आम्ही आणखी एक गोष्ट केली. लग्नाचा दिवसही ठरवून अमावास्येचा निवडला.
संजय - मी आधी माझ्या आईला ही गोष्ट सांगितली. दिलशादला घेऊनच गेलो आणि सांगितलं की, हिच्याशी लग्न करणार आहे. आईला थोडा धक्का बसला... शिवाय लहानपणापासून तिचा माझ्यावर खूप जीव होता त्यामुळं मी असं थेट मुलीलाच समोर उभं केल्यावर तिची स्वाभाविक प्रतिक्रिया धक्का बसणं अशीच होती... पण तिनं ते स्वीकारलं. वडलांना सांगण्याची जबाबदारीही घेतली. वडलांचा मूड तपासत सांगायचं म्हणून त्यात अगदी महिना गेला. दर थोड्या वेळानं आईला विचारायचं की, सांगितलंस का बाबांना... बरं आई ते कळवणारच होती तरीही माझी अशी उलघाल. शेवटी महिना दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर वडलांचाही होकार मिळाला. आमच्या दोघांचेही कुटुंबीय उपस्थित होते. त्यांचा आशीर्वाद बरोबर होता.
प्रश्न - मग नातेवाइकांकडून काही विरोध / त्रास झाला का?
दिलशाद - इतर लोकांचा मात्र त्रास झाला. सर्कशीतल्या एखाद्या प्राण्याकडं पाहावं तसं लोक आमच्याकडं पाहायचे. त्यांच्यासाठी कुतूहलाचा विषयही असू शकतो पण त्या नजरा डाचायच्या आणि एक होतं... मी सामाजिक कामांमध्ये असल्यानं ओळखी भरपूर होत्या त्यामुळं माझं लग्न हा त्यांच्यासाठी चर्चेचा विषय होता. लग्न केलं तेही वेगळ्या धर्मातल्या व्यक्तीशी अशा विचित्र गप्पा कानांवर यायच्या. ते मनावर कधी घेतलं नाही ते सोडा.
प्रश्न - तुम्ही आत्ता सांगितलं की, लग्नाचा दिवस अमावास्येचा निवडला. त्यामागचा विचार, भूमिका स्पष्ट कराल?
दिलशाद - चांगल्या गोष्टींची सुरुवात करताना चांगला दिवस बघावा, चांगला मुहूर्त पाहावा, सूर्य उगवतो तेव्हाचा असावा असं आपल्याकडं फार मानलं जातं... पण या सर्व गोष्टी अत्यंत निरर्थक आहेत. विज्ञानाच्या कसोटीवरही चूक ठरणार्या आहेत हे आम्हाला तर पटत होतंच... शिवाय म्हटलं आपण अमावास्येच्या दिवशी लग्न करून दाखवलं तर पुढे भविष्यात लोकांच्या हे लक्षात येईल की, अमाववास्येचा दिवस होता म्हणून आमचं काहीही बिघडलं नाही, काहीही वाईट घडलं नाही. कुणी म्हणालं दाखव बरं असं एकतरी उदाहरण तर आम्ही तयारच आहोत हेच आम्हाला आमच्या कृतीतून दाखवायचं होतं. चांगला मुहूर्त वगैरे निवळ अंधश्रद्धा आहे. लोक तर कुंडलीही पाहतात. माझ्या कित्येक मित्रमैत्रिणींची लग्नं कुंडली न जमल्यानं झाली नाहीत. काही वेळा अगदी ठरवून लग्नाच्या वेळेसही मुलगामुलगी एकमेकांना पसंत पडलेली असतात. काही जण तर प्रेमात पडतात पण घरच्यांचं म्हणणं असतं की, कुंडली पाहू, गुणदोष बघू. काही वेळा पालकांचाच विरोध असेल तर भटजींना सांगून कुंडली जुळत नसल्याची थाप मारतात. हे सगळं धादांत खोटं असतं. हे आम्हाला कुठंतरी दाखवायचं होतं. या अंधश्रद्धांना फाटा द्यायचा होता म्हणून ठरवून आम्ही हा दिवस निवडला.
प्रश्न - लग्नानंतर एकत्र कुटुंबात राहिलात?
संजय - नाही, एकत्र राहणं टाळलं... अगदी पहिल्या दिवसापासून. घरातच राहावं असा आग्रह आम्हाला कुणी केला नाही किंवा त्यांना कल्पना असेल आम्ही राहणार नसू. आम्ही भाड्यानं वेगळं घर घेतलं होतं. आमचं दोन कोटचं घर होतं. (हसत) दोन कोट म्हणजे वकिलीचे दोन काळे कोट. लग्न केलं तेव्हा आमच्याकडं आमचे हे दोन कोटच सोबत करायला होते. पुढं दोन वर्षांनी आम्ही स्वतंत्र, स्वतःच्या मालकीचं घर घेतलं.
दिलशाद - आमच्यामुळं त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये ही आमची भावना होती. लोक काय म्हणाले यानं आपल्याला फरक पडत नाही म्हणून सर्वांनाच पडत नाही असं नाही... शिवाय कुठल्याही गोष्टीनं आमच्यात संघर्ष व्हायला नकोत असंही वाटायचं आणि ते कसंय... आम्ही वकील आहोत. तो बाणा कुठंही थोडासा जागरूकच असतो. मग आपल्याला कुणी बोललेलं सहन होणारये का? नाही होणार... म्हटल्यावर गप्प वेगळं राहणं जास्त शहाणपणाचं.
प्रश्न - हळूहळू घरच्यांनी स्वीकारलं तर...
संजय - होऽ आमची ये-जा कायम राहिली ना... आम्ही तर चुलत्यांकडेही जातो. शेतावर जातो. सगळ्यांशी चांगले संबंध आहेत. माझ्या भावानंही प्रेमविवाह केलाय. वडलांचा त्याच्या प्रेमविवाहाला विरोध होता. मोठ्या मुलानं केलं तेच धाकट्यानं केलं. गावातले काय म्हणतील असं वाटून ते खरंतर नाराज होते. त्यांनी काही आम्हाला असं बोलून नाही दाखवलं पण त्यांची नाराजी याच गोष्टीसाठी होती हे कळत होतं. लग्न केलं तर घरात घेणार नाही असं सांगून ठेवलं होतं त्यांनी. मग हिनंच वडलांना समजावलं की, ‘सगळं चांगलं होईल. मी सांगते म्हणून तरी लग्नाला मान्यता द्या...’ असं वडलांना म्हणाली. शेवटी होय-नाही करत फक्त ही म्हणाली म्हणून वडलांनी लग्नाला मान्याता दिली आणि त्यांना घरात घेतलं. पुढं पुढं सगळं इतकं स्मूथ होत गेलं.
प्रश्न - धर्म वेगळे होते, त्याचा अर्थातच तुम्हाला फरक पडत नव्हता पण खानपानाच्या, राहणीमानाच्या सवयींचा...
संजय - लहानपणी घरातच पोल्ट्री होती. त्यामुळं लहानपणी अंडी-चिकन खात होतोच... त्यामुळं मांसाहाराच्या अनुषंगानं काही फरक पडला नाही. हे खरं आहे की, लिंगायत समाजात बहुतांश लोक मांसाहार करत नाहीत. माझ्याकडं तो प्रश्न नव्हता. मुळात खानपानाच्या सवयी हा इतकाही मोठा प्रश्न नाही की अडचण ठरावी. राहणीमानातही आम्ही हळूहळू एकमेकांना अॅडजस्ट करत गेलो. सणसमारंभ, प्रथा यांच्याबाबत असं होतं की, तिचं वाचन दांडगं आहे आणि निरीक्षणही... त्यामुळं तिला धर्म म्हणजे काय, वेद म्हणजे काय, आयते म्हणजे काय, कुराण म्हणजे काय या सगळ्याचा चांगलाच अभ्यास आहे. वक्तृत्वाला अशा तऱ्हेच्या वाचनाची जोड मिळाली की किमान छाप टाकायला तरी उपयोग होतो.
सणसमारंभ, प्रथा माझ्यापर्यंत येत नाहीत. आपली सामाजिक व्यवस्थाच तशी... त्यामुळं माझं त्याबाबत म्हणणं असायला जागाच नाही. खरंतर वस्तुस्थिती वेगळी असते आणि सत्य वेगळं असतं. वस्तुस्थिती हे सत्य मानायचं की नाही हेही पुन्हा वस्तुस्थितीवरच अवलंबून असतं. हे सारं तिला आणि मला दोघांनाही कळत होतं त्यामुळं कुठल्या गोष्टींचा बाऊ करावा आणि कुठल्या नाही हेही ठाऊक होतं. आवडीनिवडी, खाणंपिणं यांची कधीच कुणाला अडचण ठरता कामा नये. माणसं भिन्न तसं हेही भिन्न असणार हे स्वीकारून चालायचं. धर्माचं काय... धर्माच्या अनुषंगानं माणसाला एकत्रित करण्यासाठी धर्मगुरूंनी सुरू केलेली ती सिस्टम किंवा संकल्पना आहे असं माझं वैयक्तिक मत आहे... त्यामुळं ज्यांनी केली त्यांनी केली. त्याची अडचण आपल्याला का व्हावी?
दिलशाद - होऽ मुस्लीम पद्धतीचं, हिंदू पद्धतीचं माझ्या राहण्यावागण्यात अजिबात नाही. माझ्या सासूबाईंना तर माझ्या हातच्या भाज्या, रस्सा फार आवडतो. कोर्टचं आणि बालकल्याण समितीचं काम उरकून संध्याकाळी आम्ही थेट त्यांच्याकडं जातो. मी भाजी-कालवण करते. त्या चपात्या किंवा भाकरी करतात. आम्ही त्यांच्याकडेच जेवतो आणि मग आमच्या घरी परत येतो.
प्रश्न - हे सगळंच बेस्टंय! आणि तुम्ही नावही बदललेलं नाही ना...
दिलशाद - आपल्या समाजात आजही बहुतांश कुटुंबांत लग्न झालेल्या मुलीचं नाव हमखास बदललं जातं पण दिलशाद मुजावर या नावाची ओळख मला माझ्या कामामुळे मिळाली होती. ते मी स्वतःच्या कष्टानं कमावलं होतं त्यामुळेच संजयनं आणि त्याच्या कुटुंबीयांनीही नाव बदलण्याचा अट्टाहास केला नाही. मी आजही माझं नाव अॅड. दिलशाद मुजावर असंच लावते. ही अतिशय छोटी गोष्ट वाटत असली तरी मला असं वाटतं की, या छोट्या-छोट्या दिसणार्या रूढी परंपरांना नाकारतच आपण मोठ्या बदलांकडं पाऊल टाकत असतो.
प्रश्न - आणि तुम्हा दोघांच्या या नात्याकडं संजना कशा तर्हेनं पाहते असं वाटतं?
दिलशाद - संजना तिच्या वयाच्या मानानं फारच समजूतदार आहे. तिचे पालक भिन्नधर्मीय आहेत असं जर कुणी तिला म्हणालं तर तीच सहज म्हणते, ‘जमाना बदल चुका है यार...! मेरे मम्मीपप्पा को एकदूसरे से प्रॉब्लेम नहीं तो आप लोगों को क्यों?’ उलट तीच अशी लग्नं होत राहायला हवीत म्हणून त्यांची बौद्धिकं घेत राहते. घरातल्या वातावरणातूनच मुलं शिकत, समजत जातात. ती आम्हाला बघतच होती. ती लहान असताना माझ्या दौर्याच्या, व्याख्यानाच्या प्रत्येक ठिकाणी सोबत असायची. राष्ट्र सेवा दल असो किंवा अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्यक्रम अशा कार्यक्रमांना ती माझ्यासोबत असायचीच. लहानपणापासून तिच्या कानांवर विवेकी विचार पडत होते. चळवळींशी संबंध येत असल्यानं स्थानिक प्रश्नांची समजही तिला येत गेली. या सगळ्याचा परिणाम मुलांवर होतो. ती माझ्या माहेरी, बहिणींकडं जाते किंवा सासरी चुलत्याकडं किंवा अन्य नातेवाइकांकडं जाते तेव्हा जिथं जाते तिथली ती असते... शिवाय तिचं-तिचं स्वतःचं वाचन आहे. ती निरनिराळ्या अॅक्टिव्हिटी करत असते. लहानपणापासून आसपास आणि आपल्या बोलण्या-वागण्यातल्या खरेपणाला पाहत वाढत असले की बसवून वेगळं काही सांगावं लागत नाही. आम्हाला तरी लागलं नाही.
प्रश्न - सणवार साजरे करता?
दिलशाद - सणांच्या सेलिब्रेशनबाबत मी चांगलीच उदासीन आहे. पहिल्यापासूनच कामाचे व्याप इतके वाढवून ठेवलेले आहेत आणि अलीकडं तर अधिकच... त्यामुळं सणसमारंभ, प्रथापरंपरा या सगळ्यांबाबत मला दांडगा निरुत्साह असतो. मी हे काम वेगळ्या तर्हेनं सोप्पं केलंय म्हणजे ईदला मम्मींकडं जायचं आणि इतर सणांना सासूबाईंकडं. मी काही या सणांचा जास्त त्रास करून घेत नाही. सुदैवानं संजनाही त्याबाबत कसले हट्ट करत नाही त्यामुळं आमचं मस्त चाललंय.
प्रश्न - सुरुवातीला तुम्ही म्हणालात की, तुमची ओळख विरोधी पक्षकारांचे वकील म्हणून झाली. लग्नानंतर एकाच केसमध्ये दोघं विरुद्ध पक्षाकडून असा काही प्रसंग आला?
दिलशाद - प्रोफेशनचे आम्ही दोघंही पक्के आहोत. एकाच केसमध्ये दोन विरुद्ध पक्षांकडून असतो तरी आमच्या कामावर नात्याचा परिणाम कधी झालाच नसता. आमच्या दोघांची ऑफिसेसही वेगळी आहेत. आमची ओळख झाली तेव्हा तर हिंदूमुस्लीम संबंधित केसेसमध्ये आम्ही विरोधात होतो. त्यातही मी हिंदू पक्षकाराकडून आणि तो मुस्लीम पण तेव्हा गोष्ट वेगळी होती. लग्नानंतर पक्षकारांच्याच मनात आम्ही पतिपत्नी आहोत या गोष्टीची धाकधूक असायची. आतून एकत्र आहोत की काय अशी साशंकता असायची. हळूहळू पक्षकारांची ही भीती लक्षात आल्यानंतर आम्ही जाणीवपूर्वक एकच केस घेणं टाळायला लागलो.
प्रश्न - कायद्याचे अभ्यासक म्हणून तुम्हाला आंतरधर्मीय विवाहांचं किती महत्त्व वाटतं?
दिलशाद - आंतरधर्मीय विवाहही व्हायलाच पाहिजेत. ध्रुवीकरण वाढतंय वगैरे असा फार उदात्त हेतू ठेवून करायचं म्हणून नाही... तर माणूस म्हणून वाढण्यासाठी धार्मिक भिंती शक्य तितक्या धडका मारून तोडल्या पाहिजेत. खरं पाहता ध्रुवीकरण किंवा धार्मिक द्वेष हे राजकीय पातळीवर वाढत आहेत. जमिनीवर अजूनही माणसं खूप चांगली आहेत. एकमेकांच्या साथीनं उभी राहणारी आहेत. उलट जातिधर्मांच्या भिंती कमी होतायत. लोकांना जगणं महत्त्वाचं आहे कारण सध्या जगणंच अवघड होऊन बसलंय. मन कलुषित करून जगायला सवड कुणाकडं आहे?
द्वेषाच्या आणि तिरस्काराच्या भावना राजकारणात जास्त प्रबळ आहे आणि म्हणून आपल्याला वाटत राहतं की, हे सगळं ग्राउंड लेव्हललापण तितक्याच तीव्रतेनं आहे. उलट आजकालचे तरुण पाहते ना... त्यांना काही फरक पडत नसतो जातिधर्मानं. त्यांना हवं तसं छान करिअर करायचं असतं. त्यासाठी मोकळीक देणारा / देणारी समजूतदार जोडीदार हवा असतो / हवी असते. चांगला माणूस हवा असतो. त्यांचे प्राधान्यक्रमच भिन्न आहेत आणि त्यात जातिधर्म तर अजिबातच अग्रक्रमांत नाहीत. एकमेकांना समजून घेण्याची तयारी असेल तर असे विवाह होणं फार काही अवघड नाही. माझ्या पालकांनी प्रेम केलं तेव्हाचा, आमचा आणि आता येणारा काळ... यांत खूप फरक पडत गेलाय.
प्रश्न - तुमचं निरीक्षण योग्य आहे मात्र काही प्रमाणात का होईना अजूनही सर्वसाधारण स्त्रीपुरुषांच्या प्रेमाला आणि पुन्हा ते जर आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय असेल तर लग्नाला अजूनही विरोध होतो. उत्तरभारतात तर ऑनर किलिंग होतात. अलीकडं प्रेमविवाह रोखण्यासाठी कायदे आणले जात आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर तृतीयपंथीयांसारख्या अल्पसंख्य समाजात प्रेमाच्या आणि नातेसंबंधांच्या अनुषंगानं तुम्हाला काय दिसतं?
दिलशाद - प्रेमाची गरज तर त्यांना जास्त असते. बर्याचदा कुटुंबातून ते बाहेर पडलेले असतात. जनभीतीमुळे पालकांनी त्यांच्याशी संबंध ठेवलेला नसतो त्यामुळं ते अधिक एकाकी असतात... पण दुसरीकडं असं आहे की, त्यांचा पहिला संघर्ष हा जगण्याचा, पोटापाण्याचा असतो; अस्तित्वाचा असतो; लोकमान्यतेचा असतो आणि या सगळ्या ओढाताणीमुळं त्यांचं शोषणही भरपूर होतं. आर्थिक-शारीरिक दोन्ही पण अजून आपल्याकडं तरी लैगिंक अल्पसंख्याक असणार्या समजासाठी कायदे नाहीत. तृतीयपंथीयांना आपापसांत लग्न करता येण्यासंदर्भात एक रीट याचिका उच्च न्यायालयात दाखल आहे. त्यात भारत सरकारनं आपलं म्हणणं मांडलं आहे की, ‘अशा प्रकारचे विवाह हे भारतीय संस्कृतीला पुढं नेणारे नाहीत. अशा विवाहांना पाठिंबा दिला तर सांस्कृतिक मूल्यांचा ऱ्हास होईल.’ त्यामुळं या समाजानं अजूनतरी खुलेपणानं प्रेम करणं, विवाह करणं यांबाबत आपल्याकडं कोणतेही कायदे नाहीत, कुठलीही मार्गदर्शक तत्त्वं जाहीर नाहीत. माधुरी सरोदे-शर्मासारखे तृतीयपंथी विधिवत लग्न करतात मात्र अद्याप त्यांना लग्नाचं प्रमाणपत्र मिळालेलं नाही. त्यासाठी त्यांना फार मोठा संघर्ष करावा लागत आहे. आता बघू तृतीयपंथी कल्याणकारी महामंडळाची स्थापना तर झाली आहे. त्यातून प्रयत्नशील राहणं भाग आहे.
प्रश्न - हं... आता पुन्हा तुमच्या सहजीवनाकडं वळू. गेल्या अठरा वर्षांपासून आणि त्याआधी सहाएक वर्षं मैत्रीची अशी तुमची साथसोबत आहे. विशेष म्हणजे तुमचं कार्यक्षेत्रही समान आहे. तेव्हा कुठल्या गोष्टींमुळं तुमची ही दोन्हीकडची सोबत आनंददायी ठरत आहे असं वाटतं?
दिलशाद - सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही एकमेकांना दिलेलं स्वातंत्र्य. एकमेकांना दिलेली स्पेस, एकमेकांवरचा विश्वास आणि आपण समाजाचं देणं लागतो ही भावना. दोघांसाठी हे सगळं कायमच खूप महत्त्वाचं राहिलं. आम्ही निरनिराळ्या कामांमध्ये व्यग्र असतो. वकील आहोत तर जनसंपर्कही दांडगा आहे त्यामुळं दोघांचाही गोतावळा खूप आहे आणि त्यांनाही वेळ देणं, त्यांचाही आपल्या सहजीवनात विचार करणं आम्हाला महत्त्वाचं वाटतं. आम्ही तसं पाहता पूर्ण वेळ एकत्रच असतो. सकाळी कोर्टात सोबत जातो. तिथं आपापली कामं करून बालकल्याण समितीतही एकत्र जातो. सकाळी कोर्ट दुपारी समाजकार्य पण तरीही एकमेकांना कंटाळत नाही कारण एकमेकांच्या कामांत लुडबुड नसते. उलट दरदिवशी आम्ही वेगळेच असतो. ताजेतवाने होऊन नव्यानं एकेमकांची सोबत करतो. प्रेम ही अशीच गोष्ट आहे. ती एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे. संपून जात नाही ती आणि प्रेम म्हणजे जबाबदार्या पार पाडण्याची गोष्टसुद्धा. ती टाळून, चुकवून आणि त्यापासून पळून आपण पुढं जाऊ शकत नसतो. हे सगळं आमच्या नात्यात आहे... शिवाय गेल्या अठरा वर्षांतल्या आमच्या प्रवासात आम्ही दोघंही आजवर माणूस म्हणून जगत आलोय. आम्हाला भेटणार्या प्रत्येक माणसाला त्याच्या जातिधर्मानुसार न ओळखता तोही आपल्यासारखाच माणूस आहे अशीच त्याला ओळख देत आलेलो आहे. त्याच्याशी वागताना आपण माणूस म्हणूनच वागलं पाहिजे. याच विचाराला सोबत घेऊन आम्ही आमच्या सहजीवनाची वाट आजही तितक्याच आनंदानं चालतोय...!
(मुलाखत व शब्दांकन - हिनाकौसर खान)
greenheena@gmail.com
'धर्मरेषा ओलांडताना' या सदरातील इतर मुलाखतीही वाचा
विवेकी जोडीदाराची निवड म्हणजे सुंदर सहजीवनाकडं वाटचाल ! - समीना-प्रशांत
आंतरधर्मीय विवाह म्हणजे भारतीय समाजातल्या विसाव्याच्या जागा... - श्रुती - इब्राहीम
सहजीवनात संपूर्ण कुटुंब सोबत असल्यास ते अधिक अर्थपूर्ण ! - प्रज्ञा - बलविंदर
दोन्ही घरची (भारतीय) संस्कृती सारखीच! - अरुणा - अन्वर
Tags: मराठी प्रेम आंतरधर्मीय विवाह दिलशाद मुजावर संजय मुंगळे हिनाकौसर खान पिंजार हिंदू मुस्लीम धर्मरेषा ओलांडताना Dilshad Mujawar Sanjay Mungle Love Interfaith Marriage Hindu Muslim Couple Interview Heenakausar Khan Load More Tags
Add Comment