पी. व्ही. (नरसिंहराव) पी.एम. कसे झाले

नरसिंहराव यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने...

फोटो सौजन्य: HT File Photo

व्ही. पी. सिंग व चंद्रशेखर यांच्या औटघटकेच्या पंतप्रधानपदानंतर मे 1991 मध्ये सार्वत्रिक लोकसभा निवडणुका झाल्या. त्या निवडणुकांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना 21 मे रोजी राजीव गांधींची हत्त्या झाली. निवडणुकीचे निकाल काँग्रेसच्या बाजूने लागणार हे उघड होते, त्यामुळे आता पंतप्रधान कोण होणार, असा प्रश्न निर्माण झाला होता. त्या वेळी, म्हणजे बरोबर 29 वर्षांपूर्वी काय घडले हे सांगणारा 'How PV Became PM' या शीर्षकाचा लेख, के. नटवरसिंग यांच्या 'Walking with Lions' या  2013 मध्ये प्रकाशित  झालेल्या पुस्तकात आहे, त्या लेखाचा हा अनुवाद... हा लेख वाचल्यावर नरसिंहराव पंतप्रधान कसे झाले या प्रश्नाचे उत्तर तर मिळतेच; पण मनात प्रश्न येतो, तेव्हा सोनिया राजकारणापासून दूर राहिल्या याला काही अंशी तरी बेनझीर कारणीभूत ठरल्या का, आणि 2004 मध्ये सोनियांनी पंतप्रधानपद नाकारले याला काही अंशी तरी शंकर दयाळ कारणीभूत ठरले का?


जवाहरलाल नेहरू आणि पी.व्ही. नरसिंहराव हे दोघेही बुद्धिवंत होते, यापलीकडे त्या दोघांत कोणतेही विशेष साम्य नव्हते. नेहरूंचा बुद्धिवाद हॅरो, केंब्रिज, लिंकन इन येथे आकाराला आला होता... बर्नाड शॉ, बर्ट्रांड रसेल आणि फेबियन सोसायटी यांच्या सहवासातून. नेहरूंना स्वप्नही कदाचित इंग्लिशमध्येच पडत असावीत. ‘द डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हे त्यांच्या पुस्तकाचे शीर्षक, त्यांना आपल्या जन्मभूमीचा शोध घेण्याची गरज वाटली, याचा खुला कबुलीजबाब आहे.

नरसिंहराव हे एका सामान्य कुटुंबात जन्माला आले. त्यांच्या बुद्धिमत्तेचे केंद्र भारत हेच होते. त्यांचे संस्कृत भाषेतील ज्ञान सखोल होते, नेहरूंचे तसे नव्हते. नरसिंहरावांनी 11 मे 1995 रोजी युनेस्कोमध्ये महात्मा गांधी यांच्यावर दिलेले भाषण ‘मास्टरपीस’ म्हणावा असे होते. प्रगाढ ज्ञानी, विद्वान, बहुभाषाकोविद आणि पहिल्या दर्जाचे विचारवंत अशी त्यांची ओळख होती. याचा थोडक्यात पडताळा घ्यायचा असेल तर, नरसिंहरावांनी ऑस्ट्रियातील अलपाक येथे केलेले भाषण वाचावे. त्या भाषणाचा विषय होता: India's Cultural Influence on Western Europe since the Age of Romanticism. भारताच्या धार्मिक व आध्यात्मिक भूमीत नरसिंहरावांची मुळं खोलवर रुतलेली होती, त्यामुळे त्यांना ‘भारताचा शोध’ घेण्याची गरज पडली नाही.

1990 च्या सुरुवातीला नरसिंहरावांनी राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला होता. दिल्ली सोडून आपल्या राज्यात हैदराबादला कायमचे स्थायिक होण्यासाठीची सर्व तयारीही त्यांनी केली होती. जिथे दोन शब्द वापरण्याची गरज भासावी तेथे ते एका शब्दात भागवीत असत. त्यांनीच एकदा मला सांगितले होते की, काही गोष्टी न बोलताच सोडून द्यायला हव्यात. प्रसन्न शांतता हा त्यांचा स्थायीभाव होता; पण याचा अर्थ ते संत होते असा नाही. त्यांचे खाजगी जीवन उत्कटता व भोगासक्ती यांच्या बाजूला झुकलेले होते. त्यांच्या या खाजगी जीवनाची कल्पना फार थोड्या लोकांना होती. ते हुशार, धूर्त आणि संयमी होते. झोंबणारे टोमणे मारण्यात पटाईत होते. ते आपले हास्य चेहऱ्यावर दाखवत नसत. तापटपणा हा नेहरूंच्या स्वभावात होता, तर नरसिंहरावांच्या प्रवृत्तीत होता.

21 मे 1991 रोजी प्राणघातक व विध्वंसात्मक त्सुनामी आली आणि राजीव गांधींचा बळी घेऊन गेली. त्या वेळी ते जीवनातील बहराच्या कालखंडात होते. 16 मे 1991 रोजी सुमन दुबे या जवळच्या मित्रासोबत राजीव गांधी भरतपूर या माझ्या मतदारसंघात निवडणूक प्रचारासाठी येऊन गेले होते. इतका नितळ व ‘स्व’च्या पलीकडे गेलेला माणूस क्वचितच पाहायला मिळतो. दुसऱ्या दिवशी आम्ही आगऱ्याला जाऊन आलो, राजीव गांधींचे मला झालेले ते दर्शन शेवटचे. त्यांच्या हत्त्येनंतर दोन दिवसांनी मी एक लेख लिहिला, त्यात लिहिलं होतं- ‘देश अश्रू ढाळतोय. जग शोक करतेय. मला आतल्या आत भयानक एकाकीपण जाणवतेय आणि या दु:खाला शमवण्याचा कोणताही उपाय नाही. या क्षणाला सांत्वन करावे असे थोडे आणि यातना देणारे जास्त आहे. जेव्हा अश्रू सुकलेले असतील, राग निवळलेला असेल, भय नाहीसे झालेले असेल, तेव्हा व्रण मात्र राहिलेले असतील. त्यामुळे मनाचे दु:ख कायम राहील.’’

राजीव गांधी यांच्या अंत्ययात्रेसाठी जगभरातील अनेक मोठे नेते दिल्लीत आले होते. अमेरिकेचे उपाध्यक्ष डन क्वायल, ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स, पॅलेस्टाईनचे यासर अराफत, पाकिस्तानचे बेनझीर भुत्तो व नवाझ शरीफ, भूतानचे राजे, रशियाचे उपपंतप्रधान, चीनचे परराष्ट्रमंत्री आणि असे अनेक...

दिल्ली सोडून जाण्यापूर्वी अनेक व्हीआयपी नेत्यांना सोनिया गांधींनी 10, जनपथला बोलावले होते. त्यावेळच्या अनेक बैठकांना मी हजर होतो. सोनिया गांधींचे जग उद्‌ध्वस्त झाले होते. लोकांसमोर त्यांच्या भावनांचा बांध फक्त एकदाच फुटला. ते दु:ख सामान्य दु:ख नव्हते. मला चांगले आठवतेय, सोनिया गांधींना व त्यांच्या दोन मुलांना बेनझीर भुत्तो सांगत होत्या, ‘अशा शोकांतिकेनंतर सोनियांनी राजकारणापासून दूर राहिले पाहिजे आणि दोन्ही मुलांकडे लक्ष दिले पाहिजे.’ सोनिया गांधी दु:खद अंतकरणाने शांतपणे बसून होत्या. त्यांची दोन्ही मुले म्हणाली, ‘अशा विषयावर चर्चा करण्याची ही वेळ नाही.’ तेव्हा बेगम बेनझीर यांनी तो मुद्दा पुन्हा एकदा थोड्याशा अवघडलेपणाने मांडला. म्हणून मी बेनझीर यांना म्हणालो, ‘तुम्ही आता जे सांगत आहात त्याचे पालन तुम्ही स्वत: मात्र केलेले नाही. तुम्ही तुमच्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकले. गांधी घराण्याचीही एक परंपरा आहे, देशकार्य हा त्यांचा वारसा आहे. तो वारसा ते सोडू शकत नाहीत.’’ माझ्या बोलण्यावर बेनझीर म्हणाल्या, ‘‘हे शब्द मोहक आहेत; पण वास्तव लपवणारे आहेत.’’ बेगम बेनझीर यांच्याशी शाब्दिक चकमक करण्याची ती वेळ नव्हती, त्यामुळे ती बैठक ‘सोबर नोट’वर संपली.

देशविदेशांतील सन्माननीय पाहुणे मार्गस्थ झाले आणि अतिशय तीव्र राजकीय हालचाली उघडपणे सुरू झाल्या. राजीव गांधी यांची जागा घेऊ इच्छिणाऱ्यांमध्ये अर्जुन सिंग, एन.डी. तिवारी, शरद पवार आणि माधवराव शिंदे हे प्रमुख होते. सोनिया गांधींना याची पूर्ण जाणीव होती. मी त्यांना सांगितले, काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी त्यांनी आपली पसंती प्राधान्यक्रमाने सांगितली पाहिजे. कारण आता काँग्रेसचा अध्यक्ष होणारा माणूस आपोआपच पंतप्रधानांवर जाणार आहे. मी त्यांना असेही सुचवले की, काही महत्त्वाच्या निर्णयांसाठी त्यांनी पी.एन. हक्सर यांचा सल्ला घ्यायला हवा. त्या म्हणाल्या, ‘मी तुम्हाला विचार करून कळवते.’ दरम्यान, एम. एल. फोतेदार व अनेक लोकांशी त्यांनी संवाद साधला होता.

दुसऱ्या दिवशी सोनियांनी मला सांगितले, पी.एन. हक्सर यांना ‘10 जनपथ’ला बोलवा. हक्सर आले आणि त्यांनी सल्ला दिला की, उपराष्ट्रपतिपदावर असलेल्या शंकर दयाळ शर्मा यांना काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती करावी. हक्सर यांनी असेही सुचवले की, शंकर दयाळ शर्मा यांच्या भेटीसाठी अरुणा असफ अली व नटवर सिंग यांना पाठवावे. (काही अतिउत्साही मध्यस्थांनी असे चित्र निर्माण केले की, त्यांना उपराष्ट्रपतींची भेट घेण्यास सांगितले होते. त्यांतले एक ठळक नाव म्हणजे टी. एन. कौल). मी असफ अली यांच्या सोबत गेलो. शर्मा यांना असफ अली म्हणाल्या, ‘‘तुम्ही काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारावे, अशी विनंती करण्यासाठी आम्हांला पाठवण्यात आले आहे. वेगळ्या शब्दांत, तुम्ही भारताचे पंतप्रधान होणार आहात.’’

शंकर दयाळ शर्मा यांनी आमचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. आणि मग ते म्हणाले, ‘‘सोनियांनी माझ्यावर इतका विश्वास दाखवला आहे, हा माझा मोठाच सन्मान आहे, मी भारावून गेलो आहे.’’ पण त्यानंतर शर्मा जे काही म्हणाले ते ऐकून असफ अली आणि मी स्तंभितच झालो. शर्मा म्हणाले, ‘‘भारताचे पंतप्रधानपद हे पूर्ण वेळेचे पद आहे. माझे वय आणि तब्येत पाहता मी देशातील  या सर्वोच्च पदाला न्याय देऊ शकणार नाही. कृपया, सोनियाजींना हे समजावून सांगा.’’ त्यांचे हे उत्तर आम्हांला अगदीच अनपेक्षित होते. देशाच्या पंतप्रधानपदाकडे पाठ फिरवण्याची ताकद, प्रचंड आत्मविश्वास आणि देशाविषयीची बांधिलकी यातूनच येऊ शकते. त्यांच्याकडून निघाल्यावर अरुणा असफ अली आणि मी गाडीत एकमेकांशी एखादाच शब्द बोललो असू, कारण शंकर दयाळ शर्मा यांच्या प्रतिसादाने आम्ही भारावून गेलो होतो.

‘10, जनपथ’ ला आल्यावर आम्ही सोनिया गांधींना शंकर दयाळ शर्मा यांचा प्रतिसाद सांगितला... देश पंतप्रधानाशिवाय होता. असे निर्णय लोंबकळत ठेवता येत नाहीत. शिवाय, माध्यमांनी सभ्यतेला सोडून आणि उथळपणाला धरून चर्चा सुरू केली होती... पुन्हा एकदा, सोनियांनी पी.एन. हक्सर यांना बोलावले. त्यांनी सल्ला दिला, ‘‘नरसिंहराव यांच्याकडे निरोप पाठवा.’’ पुढचा इतिहास सर्वांना माहीत आहे.

(अनुवाद : विनोद शिरसाठ)

- नटवर सिंग

(नटवर सिंग भारताचे माजी परराष्ट्र मंत्री आहेत.)

Tags: नटवर सिंग पंतप्रधान सोनिया गांधी राजीव गांधी पी. एन. हक्सर बेनझीर भुत्तो P V Narnimha Rao Narasimha Rao Natwar Singh Prime Minister Sonia Gandhi Rajiv Gandhi P N Haksar Benazir Bhutto Load More Tags

Comments:

नवगिरे संदीपान

राजकीय परिस्थिती,व्यक्ती, समकालीन घटना ,प्रसंग यांचा परीघ असलेले लेखन हे बऱ्याचदा बखर लेखनासारखे असते,त्याचे ऐतिहासिक मर्म व मूल्य व्यक्तीसापेक्ष असते. भारतासारख्या व्यक्तीपुजक देशामध्ये बरेच लोक न्यायाच्या बाजूने उभे राहण्यापेक्षा जातीच्या , धर्माच्या बाजूने उभे राहतात, सत्यापेक्षा स्वतःला अधिक उजळ करत सुटतात,असे करणाऱ्याचे चलती राजकारण काही काळ चालते सुद्धा हे कळून जाते.

डॉ. संजय रत्नपारखी

भारतीय राजकारणात राजकीय पक्ष आणि मतदार यांच्यापेक्षाही नियती ही कधीकधी अधिक गतिमान होते. नरसिंहराव यांची निवड हा यातील एक प्रकार वाटतो.

अरुण कोळेकर ,सासवड

नेमकी वस्तुस्थिती आणि नरसिंहराव यांच्या स्वभाव व गुणवैशिष्टयांवर प्रकाश टाकणारा हा लेख वाचनीय ठरला आहे.राजकीय घटना घडामोडी सगळ्याच वाचकांसमोर येत नसतात. पण सरकार मध्ये उच्यपदस्थ व्यक्ती , अधिकारी यांनी अशा घटना ,प्रसंग ,व्यक्ती जवळून पाहिलेल्या , अनुभवलेल्या असतात.त्यामुळे नटवर सिंह जेव्हा लिहितात तेव्हा त्याला काही एक संदर्भ आणि विश्वसनियता प्राप्त होते. पडद्यामागे असे बरेच काही घडलेले असते. कालांतराने जेव्हा हे देशासमोर येते तेव्हा त्या परिस्थितीचे अन्वयार्थ लावले जातात. भारतीय राजकारणात ज्या ज्या पंतप्रधानांनी योगदान दिले त्यामध्ये नरसिंहरावांचे वेगळेपण उठून दिसतो. हे भारतवासी जाणून आहेत. भारतीय अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी त्यांनी आपल्या मंत्रीमंडळात अर्थतज्ज्ञ असणाऱ्या डॉ. मनमोहनसिंग यांची केलेली निवड किती सार्थ होती हे संपूर्ण देशाने पाहिले ,.अनुभवले आहे .भाषाकोविद ही उपाधी तर फार कमी पंतप्रधानाना मिळाली आहे. सातारच्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी केलेले भाषण मराठी साहित्य प्रेमींना आजही स्मरणात आहे. मराठी वरील प्रेम व्यक्त करतानाच मराठी भाषेतील साहित्य किती भाषेत अनुवादित झाले आहे , याविषयी विचारलेला सवाल मला आजही चांगला आठवतो आहे. यानिमित्ताने त्यांच्या , अनेकविध गुणवैशिष्ट्ये यालेखातून समोर आणण्यात लेखक आणि अनुवादक ही यशस्वी ठरले आहेत. संपादकीय व्यस्ततेतूनही लेखन आणि अनुवादन करणाऱ्या अनुवादक विनोद शिरसाठ सरांचे अभिनंदन. लेखनाला एक प्रवाहीपणा , सहजता लाभलेला अनुवादित लेख वाचल्याचे साध्यसमयी समाधान वाटले.

Ramesh Donde

नेटवर सिंग सारखी व्यक्ती जेव्हा आपल्या आठवणी लिहिते तेव्हा स्वत:ची फुशारकी मारण्याचा उद्देश असतो. या छोट्याशा लेखावरुन दिसते. सोनिया गांधी सर्व बाबतींत म्हणे यांचा सल्ला घेत असत, बेपाझिर भुत्तोना यांनी सुनावले, यावर कोण विश्वास ठेवणार ?नेटवर सिंग, यांची मिक्सर म्हणजे नेहरुंना भारताचा इतिहास माहीत नव्हता म्हणून त्यानी आपल्या पुस्तकाचे नाव डिस्कवरी ऑफ इंडिया ठेवले ! नशिबी, त्यांनीच नेहरूना पुस्तक लिहिण्यासाठी गायडंस दिला,असे लिहिले नाही. - रमेश दोंदे

Mahebub Sayyad

इजिप्तचे यासर अराफत हे चुकीचे आहे. यासर अराफत हे पॅलेस्टाईन लिबरल ऑर्गनायझेशन अर्थात पी एल ओ या संघटनेचे नेते होते. ( इस्राएलच्या निर्मिती नंतर इस्राएलने मूळ पॅलेस्टाईन लोकांना इस्राएल मधून हाकलून दिले होते, त्या निर्वासित लोकांच्या संघटनेचे नाव पी. एल. ओ. आहे. ) भारताने पी एल ओ संघटनेला / त्यांच्या स्वातंत्र्य आंदोलनाला नेहमीच पाठिंबा दिला. यासर अराफत हे इंदिरा गांधींना बहिण मानत. असो, युरोपीय साम्राज्यवाद विरोधात आफ्रो आशियाई देशाच्या बाजूने भारत नेहमीच उभा होता. तात्पर्य यासर अराफत हे इजिप्तचे नेते नाही. कदाचित मूळ लेखात चूक असू शकते पण साधना कडून हे अपेक्षित नाही म्हणून प्रतिक्रिया दिली. धन्यवाद।

Add Comment