कोरोनानंतर आयुष्य पूर्वपदावर येऊ पाहत असताना प्राधान्यक्रमात कला-कलाकार-नाट्यगृहं ही जेव्हा सगळ्यात शेवटी होती, तेव्हा, या समाजात मी करत असलेल्या कामाचं नेमकं स्थान काय, कलाकार म्हणून माझ्या अस्तित्वाला खरंच काही महत्व आहे का, असे प्रश्न मला पडू लागले. पण मग मला आठवला फ्रेडी हिशे. ऑशविट्झच्या छळछावणीत फ्रेडी हिशे नावाच्या एका तरुण शिक्षकाने तिथल्या मुलांसाठी एक वेगळं जग निर्माण केलं होतं जिथे त्या मृत्यूच्या छायेत असलेल्या मुलांना तो कविता, गाणी, नाटक शिकवत असे.
विचारमंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित श्रोतेहो,
महाराष्ट्र साहित्य परिषदेसारख्या, १२० वर्षांची मोठी परंपरा असलेल्या संस्थेने मला इथे बोलण्याची संधी दिली-मी कृतज आहे. पुण्यातल्या मसापच्या मातृसंस्थेशी मी गेली काही वर्षे जोडले गेले आहे. या संमेलनाच्या निमित्ताने सावेडी-उपनगरच्या शाखेशी माझा परिचय झाला याचा आनंद वाटतो.
राज्यस्तरीय युवा साहित्य नाट्य संमेलन अहिल्यानगर मधे होणं खरोखर औचित्यपूर्ण आहे. साहित्य, नाट्य, संगीत, अभिनय अशा सर्वच कलांचा समृद्ध वारसा या शहराला लाभला आहे. बालकवी ठोंबरे, सदाशिव अमरापूरकर, मधुकर तोरडमल, श्रीराम रानडे, मिलिंद शिंदे असे कितीतरी दिग्गज कलाकार नगरने आपल्याला दिले. हा वारसा पुढेही समर्थपणे पुढे चालू ठेवण्यात नगरचे तरुण कलाकार सुद्धा यशस्वी ठरतायत. नगरच्या एकांकिकांनी किती तरी स्पर्धा गाजवल्या आहेत. स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण अशी सांस्कृतिक ओळख असलेल्या या शहरात, कला आणि कलाकार यांचं मूल्य जाणणाऱ्या साहित्य-नाट्यप्रेमींच्या सहवासात हे दोन दिवस मला घालवता येणार आहेत याचा मनापासून आनंद होतो आहे. हे संमेलन शिक्षण देणाऱ्या वास्तूमध्ये होणं, हा आणि एक विशेष!
युवा साहित्य नाट्य संमेलन - यातला प्रत्येक शब्द किती महत्वाचा आहे!
“अनंत आमुची ध्येयासक्ती, अनंत अन् आशा, किनारा तुला पामराला...” असं समुद्राला म्हणण्याची धमक असणारे आपण युवा - तरुण. वेगवेगळ्या व्याख्यांनुसार समाजाची शक्ती असणारे, समाजामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याची क्षमता असणारे आपण तरुण.
साहित्य, कला या आपल्या माणूसपणाच्या खुणा आहेत. फक्त एवढंच नाही तर “जिवंत असणं” आणि “जगणं” यातला महत्वाचा फरक आहेत या गोष्टी. मंगेश पाडगावकरांनी म्हटलंय,
दगडांना स्वप्नं कधीच पडत नाहीत
आणि दगड, कधी सुद्धा रडत नाहीत
दगड कधी थुई थुई नाचत नाहीत
दगड कधी कविता वाचत नाहीत
जावेद अख्तर एकदा म्हणाले की “साहित्य, नाट्य, कला म्हणजे समाजाचे vocal cords - स्वरतंतू आहेत.” म्हणजेच समाजाचा आवाज आहेत आणि समाजाला आवाज नसेल तर काय होईल हे मी वेगळं सांगायला नको...
आणि सगळ्यांत महत्वाचा शब्द संमेलन. एकमेकांच्या साथीने, एकत्र येऊन आपण हे दोन दिवस, वेगवेगळी सादरीकरणं, कलेविषयक-नाट्यविषयक विचारांची देवाण घेवाण करणार आहोत, या बाबतीतल्या भविष्यातल्या योजना आखणार आहोत. कलाकार आणि कलाप्रेमी यांची एकत्रित ऊर्जा अनुभवणार आहोत. “माणूस असा का वागतो?” या अंजली चिपलकट्टी यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या ब्लर्बवर एक वाक्य आहे - “स्वतःचं सांस्कृतिक पर्यावरण घडवण्याची क्षमता असलेला एकमेव प्राणी म्हणजे माणूस.” या संमेलनाच्या मंचावरून आज आपण एक सांस्कृतिक पर्यावरण घडवायला सुरुवात करणार आहोत, असा संकल्प आपण करूया.
कोरोनानंतर आयुष्य पूर्वपदावर येऊ पाहत असताना प्राधान्यक्रमात कला-कलाकार-नाट्यगृहं ही जेव्हा सगळ्यात शेवटी होती, तेव्हा, या समाजात मी करत असलेल्या कामाचं नेमकं स्थान काय, कलाकार म्हणून माझ्या अस्तित्वाला खरंच काही महत्व आहे का, असे प्रश्न मला पडू लागले. पण मग मला आठवला फ्रेडी हिशे. ऑशविट्झच्या छळछावणीत फ्रेडी हिशे नावाच्या एका तरुण शिक्षकाने तिथल्या मुलांसाठी एक वेगळं जग निर्माण केलं होतं जिथे त्या मृत्यूच्या छायेत असलेल्या मुलांना तो कविता, गाणी, नाटक शिकवत असे. तिथपासून ते आज Music therapy, theatre for education पर्यंत वेळोवेळी साहित्य- नाट्य- संगीत यांचं आपल्या आयुष्यातलं महत्व सिध्द होत आलंय. या सगळ्याशी माझं नातं कधी जुळलं याचा विचार करताना मला दोन गोष्टी आठवतात. पहिल्यांदा मला आठवते शाळेतली गौरी. जिचं शालेय जीवन कथाकथन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, शाळेतल्या कार्यक्रमांची निवेदनं, नाटुकल्या, झालंच तर नाचाचा क्लास या सगळ्यांनी अगदी व्यापून टाकलेलं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे साधारण सहा वर्षांपूर्वी, पूर्णवेळ अभिनयक्षेत्रात काम करण्याचा मी निर्णय घेतला, तो क्षण. मी एक श्रवण-तज्ज्ञ आणि भाषा-वाचा-तज्ज्ञ आहे. (Audiologist and speech language pathologist). पण थोडीशी हिंमत आणि इच्छा एवढ्याच भांडवलावर मी या क्षेत्रात उडी मारली. माझ्या सुदैवाने मला नेहमीच गजानन परांजपे, डॉ. वंदना बोकील कुलकर्णी, अनिरुद्ध खुटवड यांच्यासारखे शिक्षक मिळाले आणि मी त्यांचं बोट धरून पुढे जात राहिले.
सादरीकरणाचे जेवढे म्हणून प्रकार आहेत तेवढे जवळ जवळ सगळे मी आजमावून बघण्याचा प्रयत्न केला आहे – अजूनही करत असते. मालिका, चित्रपट, लघुचित्रपट, लहान मुलांसाठी कथाकथन, जाहिराती, सगळंच. पण माझ्या आजवरच्या कामातला सगळ्यांत मोठा भाग हा अभिवाचनाचा राहिला आहे. मगाशी उल्लेख केला त्या डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी, प्रसिद्ध लेखिका, संपादक, मराठी साहित्याच्या अभ्यासक आणि अध्यापक आहेत. त्यांच्याबरोबर मी अभिवाचनाचे अनेक कार्यक्रम करते. त्यांच्याचमुळे माझी साहित्याशी आणि साहित्यक्षेत्राशी नव्याने ओळख झाली. तशी मी लहानपणापासून पुस्तकं वाचत आले आहे. माझ्या मनात पुस्तकांविषयी प्रेम निर्माण करण्याचं श्रेय माझ्या आईला जातं. लहानपणी काही चांगले सिनेमे आणि नाटकंही तिच्यासोबत पाहिल्याचं मला आठवतं. हा एक कल्चरल प्रिव्हिलेज आहे. मी ज्या घरात जन्मले, ज्या प्रकारे घडले, तशी घडले नसते तर मी हे सगळं आपणहून करेन एवढी अंतःप्रेरणा माझ्यात नसती असं मला वाटतं. तर, पुस्तकं वाचणं आवडत होतंच पण अभिवाचनाच्या कार्यक्रमांमुळे. त्यांच्याकडे बघण्याचा एक सखोल, सजाण आणि काहीसा प्रगल्भ (mature) म्हणता येईल असा दृष्टीकोन तयार होऊ लागला आहे. गदिमांच्या साहित्यावर आधारलेल्या “गदिमायन” पासून, डॉ. सरोजिनी बाबरांनी संपादित केलेल्या लोकसाहित्यावरच्या “रानजाई” पर्यंत अनेक कार्यक्रम केले. प्रत्येक वेळी वेगळा विषय, वेगळा आशय, वेगळ्या कविता-उतारे, पण हे सगळं वैभव पाहून माझं थक्क होणं मात्र प्रत्येकवेळी तसंच! किती उशिरा हा खजिना आपल्या हाती लागलाय असं वाटतं.
या प्रत्येक कार्यक्रमागणिक माझ्यात बदल होऊ लागले आहेत. अभिनेत्री म्हणून माझा सराव होतोच आहे पण माझ्या असण्यातही एक ठहराव येतो आहे. मी थोडी शांत, गंभीर होत चालले आहे असं जाणवतं. मी जगत असलेल्या या विश्वाची इतकी वेगवेगळी रूपं मला मी वाचत असलेल्या कथा-कादंबऱ्यांमधून भेटतात की ती बघून मी कधी अचंबित होते, कधी भारावून जाते, रडते, हसते, अस्वस्थ होते. आधी या भावना अनुभवताना गंमत वाटायची. पण आता रोजच्या अतिवेगवान जगण्यात, कित्येकवेळा आपल्यात काही संवेदना उरल्याच नाहीत की काय अशी शंका येते, तेव्हा कवितेची एखादी ओळ वाचून उचंबळून आलेलं रडू ही फक्त गंमत नाही तर गरज आहे हे प्रकर्षाने जाणवलंय मला. हेही कळू लागलंय की प्रत्येक वेळी वाचलेल्या ऐकलेल्या शब्दाचा अर्थ समजायलाच हवा असं नाही. आनंद नुसतं “जाणवण्यात” सुद्धा आहे. त्याचा “feel” घेण्यातसुद्धा आहे. हेच साहित्याकडून मला मिळालेलं सगळ्यात मोठं देणं- आपल्या आत खोलवर आपल्याला काहीतरी वाटतं ही जाणीव. आपल्याला जे वाटतं तेच इतरांनाही वाटतं आपण एकटे नाही आहोत हा दिलासा. आपलं वाटणं जे आपल्याला कधी मांडताच आलं नाही ते चपखलपणे दुसऱ्या कोणीतरी मांडल्यावर मिळणारा आनंद, कधी थकून गेले शरीराने-मनाने तर क्षणभराचा विसावा, एकटेपणाला एकांतात बदलण्याचा मार्ग असं बरंच काही. नीलिमा पालवणकरांची एक फार सुंदर कविता आहेत. त्यातल्या काही ओळी अश्या -
पुस्तकं गच्च भरलेलं आभाळ असतात
तेव्हा आपण जमीन व्हावं लागतं,
आणि मुरवावं लागतं त्यांना,
आपल्या आत.
पुस्तकांना स्पर्श असतो, वास असतो
पण त्यासाठी मनाला फुटाव्या लागतात,
संवेदनांच्या लक्ष पाकळ्या
मग पुस्तके उधळून टाकतात,
वसंतातले सगळे रंग.
पुस्तकांना कळते सगळे, सगळे.
आपल्याला कळते का?
पुस्तकांचे आभाळमन?
पुस्तकांचे हे आभाळमन वयाच्या अनुभवाच्या प्रत्येक टप्प्यावर जास्त जास्त समजत जातं किंबहुना ते तसं व्हावंच. आपल्या “मोठं” होण्याची ती litmus test असते. जी. एनच्या “मुग्धाची रंगीत गोष्ट” मधला मोर तिला म्हणतो, “तुझं चित्र तुलाच काढावं लागेल, त्याप्रमाणे तुझे रंगही तुलाच निवडावे लागतील. तरच मग ते चित्र हुबेहूब स्वतःचं, तुझं होईल. नाहीतर तुझ्या चित्राचा मोर होऊन बसेल.” हे आज वाचताना वाटतं - उंहूं! फक्त लहान मुलांसाठीची नाही ही गोष्ट!
ही गोष्ट अजून ठळकपणे मला जाणवली साधारण तीन वर्षांपूर्वी जेव्हा मला एक अजरामर पुस्तक खूप वर्षांनी पुन्हा भेटलं तेही एका खास कारणासाठी. ”श्यामची आई” या चित्रपटासाठी ऑडिशन देण्यापासून चित्रीकरणापर्यंतचा आणि नंतर प्रदर्शनापर्यंतचा प्रवास हा संस्मरणीय होता. प्रदर्शनादरम्यान झालेल्या मुलाखतींच्यावेळी श्यामची आई, साने गुरुजी आणि ही कादंबरी यांविषयी माझ्याकडून अजून विचार केला गेला आणि माझ्या लक्षात आलं की ज्यांची आपण हळवे, अतिसंवेदनशील अर्थात दुबळे कमकुवत म्हणून कुचेष्टा करत आलो ते साने गुरुजी खऱ्या अर्थी सामर्थ्यवान होते कारण ते सातत्याने मैत्रीची, सहृदयतेची, सहवेदनेची, मानवतेची आणि प्रेमाची भाषा बोलत होते. समाजमाध्यमांवर द्वेषपूर्ण शब्दयुद्ध करण्यापेक्षा हे कैक पटींनी अवघड आहे. समाजमाध्यमांवरची ही क्रूर शेरेबाजी रोज बघताना, कळवळून “खरा तो एकाची धर्म, जगाला प्रेम अर्पावे” असं सांगणारे साने गुरुजी आठवल्याशिवाय राहत नाहीत.
तसं तर सगळे शब्दच! पण काहीजण ते वापरतात प्रेम रुजवण्यासाठी, तर काहीजण द्वेष पसरवण्यासाठी! शब्द जपून वापरायला हवेत, जबाबदारीने वापरायला हवेत हेच खरं.
जसजसा माझा या क्षेत्रातला वावर वाढू लागला, माझ्या मित्रमंडळाची संख्या आणि (गुणवत्तादेखील) वाढू लागली तसं मला कळू लागलं की केवळ मन रिझवण्यासाठी, मनोरंजनासाठी नाहीय शब्द, साहित्य, नाट्य, कला.
जसिता केरकट्टा या झारखंडमधल्या आदिवासी कुटुंबात जन्मलेल्या तरुण पत्रकार कवयित्रीला व्यक्त होण्यासाठीचं हक्काचं ठिकाण आहे कविता म्हणजे. दिशा पिंकी शेख या पारलिंगी कवयित्रीला स्वतःची माणूस म्हणून ओळख मिळवण्याची संधी आहे तिची लेखणी म्हणजे. Theatre of the Oppressed आणि Invisible Theatre या नाट्यकलेच्या अश्या शाखा आहेत, ज्या नाटकाद्वारे शोषितांच्या प्रश्नांवर प्रकाश टाकण्याचं काम करतात. अशी अनेक उदाहरणं देता येतील जिथे कलेने साहित्याने चांगल्या कारणांसाठी आपण स्वरूप बदललं. हे सगळे प्रयोग आज करणारी अनेक तरुण” मुलं मुली भारतात आहेत.
बाकी, “काय ही आजकालची तरुण पिढी” हे वाक्य पूर्वापार चालत आलेलं आहेच. व्याख्येत म्हणू देत काहीही पण आज मात्र आम्ही जरा गोंधळलेले आहोत. दिखाव्याच्या नादात वास्तवापासून दूर जात आहोत. जीवघेण्या स्पर्धेत स्वतःला हरवून बसतो आहोत. आमच्या साठी सगळं जग खूप जवळ आलंय.
समाजमाध्यमांमुळे कितीतरी वेगवेगळ्या प्रकारच्या जीवनशैलींशी ओळख होऊ लागलीय. मग तशीच जीवनशैली हवी असणं हे आमच्या आयुष्याचं उद्दिष्ट झालंय. ते सफल झालं तर ठीक पण नाही झालं तर “आपण आयुष्यात हरलो” असं वाटून नैराश्य येऊ लागलंय. “सेटल” होण्याचा बार दिवसेंदिवस उंचावतच जातोय. आम्ही कुठेच पुरेसे पडत नाहीत आहोत. तंत्रज्ञानाच्या दृष्टीने, विज्ञानाच्या दृष्टीने झपाट्याने होणाऱ्या बदलाचा वेग आणि आमच्या सामाजिक नैतिकतेच्या निकषांमध्ये होणाऱ्या बदलांचा वेग यात इतकी तफावत आहे! स्वतःची individuality जपावी-त्यासाठी झगडावं की समूहाचा भाग राहून स्वतःला सुरक्षित ठेवावं? रोज अनेक विचार, मतं, उपदेश यांचा भडिमार होतो आहे. दोन विरुद्ध टोकांच्या विचारांशी आमच्या स्वतःच्या अनुभांशी सांगड घालावी कशी? मुळात स्वतंत्र विचार करण्याची आमची क्षमताच कमी होत चाललीय. किंबहुना आम्ही कशाचा विचार करायचा, कोणते प्रश्न आम्हाला पडावेत हे दुसरंच कोणीतरी ठरवतय. रोज झुंजावं लागतंय या आणि अश्या अनेक मुद्द्यांशी !
हे सगळं पूर्णपणे टाळता येणार नाही कदाचित. पण बंद पडलेलं विचारचक्र पुन्हा सुरू करायचं बळ जेवढं साहित्य आणि कलेमध्ये आहे तेवढं इतर कशातही नाही! म्हणूनच हवा एखादा छंद, जोपासावी एखादी कला-आपल्या असण्याचं भान मिळवण्यासाठी. दुरापस्त झालेला आनंद - मग तो instant नसेल कदाचित- पण दीर्घकाळ टिकणारा असेल – तो मिळवण्यासाठी.
त्यापलीकडे जाऊन माझ्यासारख्या कोणाला आपलं कार्यक्षेत्र म्हणून निवडावी वाटते कला. आणि मग मात्र काही गणितं बदलतात. अभिनय क्षेत्रात यायचं, टिकून राहायचं हे अवघड आहेच. आव्हानं आहेत, खूप स्पर्धा आहे. आपली निवड एखाद्या व्यक्तिरेखेसाठी होणार किंवा नाही यासाठी “अभिनय” सोडून इतरही निकष आहेत. पण शेवटी आपल्या कौशल्यावर काम करत राहणं एवढंच आपल्या हातात आहे हे माझ्या लक्षात येऊ लागलंय. अर्थात सहा वर्ष म्हणजे या क्षेत्राच्या दृष्टीने फारच कमी आहेत त्यामुळे माझा अनुभव मर्यादित आहे.
‘श्यामची आई’मुळे ज्या अनेक चांगल्या गोष्टी माझ्या आयुष्यात घडल्या त्यांपैकी एक म्हणजे साधना साप्ताहिकाशी माझा संबंध जोडला जाणं. साधनेचे संपादक विनोद शिरसाठ सर, यांनी मला नेहमीच प्रोत्साहन दिलं - विचार करायला, चांगलं वैचारिक साहित्य वाचायला, नवीन काहीतरी करायला. केवळ प्रोत्साहन नाही तर त्यांनी तशी संधीसुद्धा मला दिली आणि मी लिहिलेलं काहीतरी साधनेत छापून आलं. केवढी मोठी गोष्ट ही! सध्या मी दैनिक सकाळच्या “सप्तरंग” पुरवणीमध्ये “मायबोलीपलीकडील अक्षरे” या नावाचं एक सदर लिहिते आहे. त्या सदरात इतर भाषांमधून मराठीत अनुवादित झालेल्या, लहान मुलांच्या पुस्तकांचा अनौपचारिक परिचय करून देते. मूलभूत मानवी मूल्यांचा अतिशय तरलपणे समावेश केलेल्या या संवेदनशील गोष्टी. या गोष्टींच्या खाली मुलांसाठी तयार असं एका ओळीचं तात्पर्य लिहिलेलं नाही. कोणताही विचार मुलांवर लादलेला नाही. अशी वेगळी वैशिष्ट्यपूर्ण पुस्तक आई-बाबा, शिक्षक यांच्यामार्फत मुलांपर्यंत पोहोचावीत हा या सदरामागचा माझा उद्देश आहे. पुस्तकं-नाटकं यांचं एक्सपोजर मिळालेल्या मुलांचा भाषा-वाचा-विकास, कल्पनाशक्तीचा विकास जास्त चांगला होतो शिवाय त्यांच्यामध्ये संवेदनशीलता आणि सहवेदना तयार होऊ लागते. मग अशा मुलांतूनच तर घडेल उद्याचा तरुण वर्ग जो त्या व्याख्येतल्यासारखा समाजाला सर्वांगाने आणि सर्वार्थाने पुढे घेऊन जाईल !
या भाषणाची तयारी करताना काही ठिकाणी मला इंग्रजी शब्दांसाठी मराठी प्रतिशब्द सुचेनात पटकन. थोडंसं अपराधी वाटून गेलं. आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळून एक वर्ष होईल पुढच्या महिन्यात. आता आपल्या भाषेला जगवत राहणं, फुलवत राहणं ही आपल्या आणि आणखी नवीन पिढीची जबाबदारी आहे. पूजा भडांगे, प्रदीप कोकरे, सुमेधकुमार इंगळे, प्राजक्त देशमुख अशी कितीतरी नावं घेता येतील ज्यांचं साहित्य क्षेत्रातील काम बघता आपल्या मराठी साहित्य- नाट्याची समृद्ध परंपरा समर्थपणे पुढे चालत राहील असा विश्वास वाटतो.
मराठी शाळा, मराठी पुस्तकं, मराठी चित्रपट, मराठी नाटकं यांना प्रेक्षक-वाचक म्हणून आपण जाणीवपूर्वक उत्तेजन द्यायला हवं. शिवाय मराठी ही आपल्या दैनंदिन व्यवहाराची भाषा व्हायला हवी. आपली मराठी - अनेक बोलीभाषा, अनेक रूपं असणारी. या प्रत्येक रूपात साहित्य-नाट्य घडावं. ते आपण उचलून धरावं. मराठी साहित्य इतर भाषांमध्ये आणि दुसऱ्या भाषेतलं साहित्य मराठी भाषेत असा सकस आशयाचा दुहेरी प्रवास जास्तीत जास्त प्रमाणात व्हावा.
पुढचे दोन दिवस, आयोजित कार्यक्रम बघायला मी खूप उत्सुक आहे. आता आपल्या सर्वांची रजा घेते. आपण स्वप्न बघत राहू. व्यक्त होत राहू. व्यक्त होण्यावर बंधनं आली तर आपली कलाच आपल्याला त्यातून मार्ग दाखवेल हा विश्वास बाळगू. “ते” आणि “आपण” यात नेहमी माणूसपणाला निवडू. आपल्या असण्याचा अर्थ शोधत राहू. एकमेकांवर प्रेम करत राहू!
- गौरी देशपांडे
gaurisdeshpande1294@gmail.com
(मराठी चित्रसृष्टीतील अभिनेत्री)
पुणे महाराष्ट्र साहित्य परिषदेची सावेडी उपनगर शाखा आणि अहिल्यानगर येथील न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाच्या वतीने याच महाविद्यालयाच्या परिसरात 11 -12 सप्टेंबर 2025 हे दोन दिवस युवा साहित्य नाट्य संमेलन आयोजित करण्यात आले. युवा अभिनेत्री गौरी देशपांडे संमेलनाध्यक्ष होत्या. त्यांचे हे बीजभाषण आहे.
Tags: gauri deshpande ahilyanagar marathi sahitya parishad मराठी साहित्य परिषद अहिल्यानगर गौरी देशपांडे संमेलन अध्यक्ष बीजभाषण युवा साहित्य नाट्य संमेलन साधना डिजिटल Load More Tags
Add Comment