सुमित्राताई आजारी असल्याचे गेले एकदोन महिने माहीत होते पण इतक्या लगेच त्यांच्या निधनाची बातमी ऐकावी लागेल असे मात्र अजिबात वाटले नव्हते. अजून निदान दहाएक वर्षे तरी त्या असणार आहेत असे माझे मन कुठेतरी धरून चालले होते. त्यांचा आणि माझा जो काही संपर्क होता त्याला जवळीक नक्कीच म्हणता येणार नाही पण त्यांच्याविषयी मनात प्रेमाची, आपुलकीची आणि आदराची भावना होती.
काही माणसे अशी असतात की, ज्यांचा आणि आपला रोजचा किंवा घनिष्ठ म्हणावा असा संबंध नसतो पण आपण ज्या काळात जगत असतो त्या कालखंडात आपल्या सामाजिक भावविश्वात त्यांचे असणे आपल्यावर खोलवर परिणाम पाडून जात असते. त्यांच्या जाण्याने आपले जवळचे काही आपण गमावले आहे अशी भावना निर्माण होते. माझे सुमित्राताईंशी असलेले नाते हे या प्रकारचे होते. सुमित्राताईंच्या निधनानंतर समाजमाध्यमांवर व्यक्त होणाऱ्या लोकांच्या प्रतिक्रिया वाचल्यावर मला असे लक्षात आले की, माझ्यासारखे त्यांच्याशी नाते असलेले खूप लोक आजूबाजूला आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या माझ्याशी आलेल्या संबंधांच्या अनुषंगाने मी विचार करू लागलो आणि त्यांच्या स्वभावाच्या आणि विचारप्रक्रियेच्या अनुषंगाने आपल्याला शिकता येतील अशा काही महत्त्वाच्या गोष्टी आठवू लागल्या.
साधारण चार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. ‘डिप्रेशन' या मानसिक आजाराच्यासंदर्भाने असलेला ‘कासव’ हा त्यांचा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला होता आणि आमच्या परिवर्तन संस्थेसाठी त्या मानसिक आरोग्यावरच्या दोन शॉर्टफिल्म्स करत होत्या. त्याविषयी बोलत असताना मी त्यांना विचारले की, या सिनेमासाठी ‘कासव’ हे नाव तुम्ही का निवडले? तेव्हा त्यांच्या टिपिकल पद्धतीने त्या म्हणल्या, ‘‘अरेऽ तुला माहीत आहे का... की, कासव हे कधीच कुणावर हल्ला करत नाही आणि म्हणूनच ते उत्क्रांतीमध्ये इतकी हजारो वर्षे नष्ट न होता टिकून राहिले आहेत! डायनासोरसारखे कितीतरी मोठे आणि ताकदवान प्राणी लढून नष्ट झाले पण कासव टिकून राहिले आहे याचे महत्त्वाचे कारण म्हणजे जेव्हा हल्ला होतो किंवा अडचणीची परिस्थिती निर्माण होते तेव्हा कासव आपले कवच अंगावर ओढून घेते आणि परिस्थिती पूर्ववत झाली की पुन्हा आपल्या कामाला लागते.”
त्यांनी मला सांगितलेल्या या गोष्टीचा प्रभाव एखाद्या दृष्टांतासारखा माझ्या मनावर पडला. आमचा हा संवाद झाला त्या वेळी माझे वडील नरेंद्र दाभोलकर यांचा खून होऊन साधारण तीन वर्षे झाली होती. मारेकरी अजून पकडले जात नव्हते. आम्ही सगळे रस्त्यावरची आणि कोर्टातील लढाई लढून दमलो होतो, हताश झाले होतो. अशा परिस्थितीमध्ये हे उदाहरण मला एक जीवनविषयक दृष्टी देऊन गेले.
अंनिसच्या कामाशीदेखील त्या अगदी जवळून जोडल्या गेल्या होत्या. बाबांचा खून होण्याच्या आधी साधारण वर्षभर अंधश्रद्धा निर्मूलनाविषयी समाजाला प्रबोधनात्मक ठरतील अशा काही फिल्म्स तयार करायची योजना ते आखत होते. ती अर्धवट राहिल्याची खूप मोठी खंत सुमित्राताईंना आणि सुनील सुकथनकर सरांना होती. बाबांचे मारेकरी पकडण्यासाठीच्या आमच्या अनेक आंदोलनांत त्या स्वतः न चुकता उपस्थित असत.
दोघी, बाधा हे त्यांचे सिनेमे आणि काही अंशी देवराईदेखील अंधश्रद्धा निर्मूलनाविषयी कुठेही प्रचारकी न होता अगदी हळुवार आणि कलात्मक भाष्य करतात. मानसिक आरोग्याविषयी महाराष्ट्रातील सगळे मनोविकार तज्ज्ञ आणि स्वयंसेवी संस्था यांनी मिळून गेल्या काही दशकांत केले नसेल इतके महत्त्वाचे प्रबोधनाचे काम त्यांनी आपल्या सिनेमाद्वारे आणि शॉर्टफिल्मद्वारे केले आहे.
त्यांनी आणि सुनील सुकथनकर यांनी केलेल्या बाधा (अंगात येणे), देवराई (स्किझोफ्रेनिया) अस्तु (स्मृतिभ्रंश) कासव (डिप्रेशन) अशा चार अत्यंत महत्त्वाच्या फिल्म्स आणि ‘मन की आँखे’, ‘जागृती’सारख्या उपचारांच्या अनुषंगाने मांडणी करणाऱ्या शॉर्टफिल्म्स या अजून काही दशके तरी केवळ भारतातच नाहीत तर जागतिक पातळीवर मानसिक आरोग्य प्रबोधनामधील महत्त्वाचे साधन म्हणून राहणार आहेत याविषयी माझ्या मनात जराही शंका नाही...पण या फिल्म्स आणि त्यांच्या इतर इतक्याच महत्त्वाच्या फिल्म्सच्या पलीकडे जाऊन एक अर्थपूर्ण आयुष्य कसे जगावे याविषयी त्या जे आपल्याला सांगून गेल्या आहेत ते खूप महत्त्वाचे आहे असे मला वाटते.‘अर्थपूर्ण' जगण्यासाठी आपले स्वतःचे म्हणून काहीतरी छोटे-मोठे उद्दिष्ट असले पाहिजे आणि आपण परिस्थितीला दोष देत न बसता प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहिलो तर ते आपल्याला 'गवसते’ हा एक मोठा विश्वास त्यांच्या जीवनाकडे बघून गांभीर्याने जीवन जगू पाहणाऱ्या कोणालाही मिळू शकतो.
सोशल वर्कर म्हणून प्रशिक्षण झालेले असताना वयाच्या चाळिशीच्या आसपास त्यांना सिनेमा आणि दिग्दर्शन हे माध्यम गवसले. अत्यंत आनंदाने आणि तरीदेखील कष्टपूर्वक त्यांनी ते फुलवले आणि अगदी शेवटपर्यंत जपले. ही त्यांची कारकिर्द अगदी लांबूनदेखील बघणाऱ्या व्यक्तीच्या देखील लक्षात येऊ शकते. आपल्या आयुष्यात घडलेल्या कुठल्याही प्रसंगाला किंवा स्त्री म्हणून मिळालेल्या वागणुकीविषयी बोल लावणे यांमध्ये त्या कधीच अडकल्या नाहीत. आपल्याला जे गवसले आहे ते साजरे करणे हे त्यांच्या दृष्टीने इतके महत्त्वाचे होते की, असल्या फिजूल गोष्टींसाठी त्यांच्याकडे जणू वेळच नव्हता!
स्वतःमधील शक्तिस्थाने आणि स्वतःच्या मर्यादा या दोन्ही गोष्टी त्यांना अगदी चोख माहीत होत्या आणि त्याचे भान त्यांनी कधीही सोडले नाही. सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा संदेश कलात्मक पद्धतीने देणारे चित्रपट करणे हे ते शक्तिस्थान होते. त्याला त्यांनी पुरेपूर न्याय दिला. आता हे केलेच आहे तर काहीही करून लोकांपर्यंत पोहचवायचेच म्हणून उरस्फोड केली नाही. ‘ते करणे हे आपले काम नाही, ज्यांना ते करायचे त्यांनी करावे’ हे त्या अगदी सहज आणि अलिप्तपणे म्हणू शकत होत्या. ‘आपले कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नका!’ अशा स्वरूपाचा आध्यात्मिक म्हणावा असा हा गुण! इंग्लीशमध्ये एक खूप छान शब्द आहे ‘कन्सर्न्ड डिटॅचमेंट’ म्हणजे आपल्याला त्या गोष्टींविषयी भावनिक गुंतवणूकदेखील आहे पण त्याच वेळी अलिप्ततादेखील आहे असा भाव. हा त्यांना साधला होता असे वाटते.
जे काही करायचे ते निगुतीने करायचे हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य. लोकसत्तामधील एका लेखात त्यांनी किंवा सुनील सरांनी लिहिलेला कासव सिनेमाच्या चित्रीकरणाच्या वेळेचा प्रसंग या संदर्भात एकदम बोलका आहे. सिनेमामध्ये मोहन आगाशे हे जेवणासाठी घरी आले आहेत आणि त्यांच्यासाठी माशाचे कालवण केले आहे असा प्रसंग होता. शॉटमध्ये ‘माशाचे कालवण’ असलेले भांडे हे झाकूनच ठेवलेले असणार होते... त्यामुळे नियोजन करणाऱ्या टीमने सहज मिळेल अशी पनीरची डीश आणून झाकून ठेवली. हे जेव्हा सुमित्राताईंच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी ती पनीरची डीश बदलून माशाचे कालवण तिथे ठेवायला सांगितले! यावर ‘नाही तरी ते सिनेमात दिसणार नाहीये नाऽऽ मग कशाला वेळ वाया घालवा?’ असे सांगणाऱ्या सहायकाला त्यांनी तितक्याच शांतपणे ‘‘मला ते दिसते आणि मला फरक पडतो! मी पहिल्यांदा सिनेमा माझ्यासाठी करते आणि मग प्रेक्षकांसाठी!’’ असे काहीसे उत्तर दिले. ते माशाचे कालवण आणून ठेवल्यावरच चित्रीकरण केले. असा हा प्रसंग.
म्हटले तर दिग्दर्शकाचा आडमुठेपणा म्हणून आपण तो सोडून देऊ शकतो पण आपण करत असलेले काम हे आपण पहिल्यांदा आपल्या स्वतःच्या समाधानासाठी करतो आहोत याचे भान आपल्यातील बहुतेकांचे सुटते आणि मग स्वतःसाठी जगण्याऐवजी एक स्पर्धा आणि तुलना यांच्या चक्रात आपण अडकू लागतो. त्या पार्श्वभूमीवर सुमित्राताईंचे हे निगुतीने जगणे खूप मोलाचे वाटते.
मागच्या वर्षी लॉकडाऊन सुरू झाला आणि करोनाची साथ जोरात होती तेव्हा अचानक एक दिवस मला त्यांचा फोन आला. त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने त्या म्हणाल्या, ‘अरेऽ या करोनाचा आणि लॉकडाऊनचा खूप खोल परिणाम आपल्या सगळ्यांच्या आयुष्यावर होत आहे आणि मानसिक आरोग्यावर तर खूपच होतो आहे. त्याच्याविषयी आपण छोटे-छोटे एपिसोड करू या का... तुझे काही विचार असतील तर लिहून काढ आणि मला पाठव. आपण बोलू या.’ सुमित्राताई असे काही आपल्याला सांगत आहेत यानेच मी खूप हरखून गेलो होतो. स्वाभाविकच मी ‘हो’ म्हणालो.
...पण माझा एकदम व्यावहारिक प्रश्न होता की, सुमित्राताई यासाठी पैसे कुठून आणायचे? हा त्यांच्या दृष्टीने एकदम क्षुल्लक प्रश्न होता. विचारल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘पैशाचे एवढे काही नाही! माझी बहुतांश कामे मी अशीच केली आहेत!’’ मग मला म्हणाल्या, ‘‘आपण या गोष्टींची एक मालिकाच करू आणि तिचे नाव ‘सुखी माणसाचा सदरा’ असे ठेवू. सध्याच्या युगात सुखी जीवन जगण्याची आस असलेल्या लोकांना पडणारे प्रश्न आणि त्याविषयी काही भाष्य असे करू या! फिल्म नाही झाली तर ओटीटीसाठी करू! पुढे एकदोन वेळा त्यांच्याशी याविषयी बोलणे झाले आणि मग ते सगळे राहून गेले ते कायमचेच....
आज सुमित्राताई आपल्यात नाहीत. त्यांना गवसलेला हा सुखी माणसाचा सदरा त्यांना बहुतेक या करोनाच्या पार्श्वभूमीवर सगळ्यांशी त्यांच्या आवडत्या सिनेमाच्या माध्यमातून शेअर करायचा होता असे सारखे मला वाटत राहिले आहे. बहुतेक आता या गोष्टी कधीच पुढे येणार नाहीत पण त्यांचे आयुष्य आणि कामे बघून असे ‘सुखी माणसाचे खूप सदरे’ आपण स्वतःसाठी आणि इतरांसाठी शोधत राहू अशी बेगमी आपल्यासाठी करून ठेवून सुमित्राताई आपल्यातून गेल्या आहेत. आता ते सुखी सदरे शोधण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.
- डॉ. हमीद दाभोलकर, सातारा.
hamid.dabholkar@gmail.com
(लेखक मानसोपचार तज्ज्ञ आहेत. ते परिवर्तन संस्था आणि महाराष्ट्र अंनिस या संस्थांसोबत काम करतात.)
डॉ. हमीद दाभोलकर यांचा हा लेखही वाचा :
कोरोनाच्या साथीचे मानसिक संसर्ग रोखण्यासाठी...
Tags: मराठी व्यक्तिवेध डॉ. हमीद दाभोलकर सुमित्रा भावे सिनेमा चित्रपट मराठी चित्रपट सुनील सुकथनकर कोरोना मानसिक आरोग्य Dr. Hamid Dabholkar Sumitra Bhave Cinema Movie Marathi Cinema Sunil Sukathankar Corona Mental Health Load More Tags
Add Comment