सिलोनमधील विद्योदय विद्यालय‌

साधना प्रकाशनाचे नवे पुस्तक गोव्यात प्रकाशित

64 व्या गोवा मुक्तीदिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 18 डिसेंबर 2025 रोजी मडगाव (गोवा) येथील गोमंत विद्यानिकेतन च्या सभागृहात, साधना साप्ताहिकाच्या 'गोवा ज्ञात आणि अज्ञात' या  विशेषांकाचे प्रकाशन झाले. त्याच कार्यक्रमात, गोव्याचे सुपुत्र धर्मानंद कोसंबी यांच्या 'निवेदन' या आत्मकथनात्मक पुस्तकाच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन बौद्ध तत्त्वज्ञानाचे अभ्यासक प्रणव आजरेकर यांच्या हस्ते  झाले.

धर्मानंद यांचे हे पुस्तक शंभर वर्षापूर्वी (1924 मध्ये) प्रकाशित झाले, आणि आता  त्यांचे 150 वे जयंती वर्ष सुरू आहे. ही दोन्ही निमित्तं साधून,  त्या पुस्तकाची नवी आवृत्ती साधना प्रकाशनाकडून आणली आहे. या पुस्तकातील 'सिलोनमधील विद्योदय विद्यालय‌' या प्रकरणाच्या समारोपाचा अंश येथे प्रसिद्ध करत आहोत.

निवेदन पुस्तकाचे गोव्यात प्रकाशन


विद्योदय विद्यालयात राहण्यास गेल्यावर दुसऱ्याच दिवशी मी सिलोनी लिपी शिकण्यास आरंभ केला. सगळा पाली ग्रंथसमुदाय सिंहली लिपीत लिहिला किंवा छापला असल्यामुळे तिचा परिचय असणे आवश्यक होते. एका आठवड्याच्या आतच सगळी अक्षरे मला वाचता येऊ लागली व हळूहळू मी त्या लिपीत छापलेली पाली पुस्तके वाचू लागलो. मार्च महिन्याच्या शेवटी किंवा एप्रिलच्या आरंभी श्रीसुमंगलाचार्य गाल्ले शहरी काही कारणाने जाणार होते. त्यांनी तिकडे जाण्याची माझी इच्छा आहे की काय, असा प्रश्न केला. सिंहलद्वीपची सृष्टिशोभा पाहण्यास मी फार उत्सुक झालो असल्यामुळे मी आचार्यांबरोबर जाण्यास तेव्हाच तयार झालो.

कोलंबोपासून गाल्लेपर्यंत समुद्रकिनाऱ्यानेच आगगाडीचा रस्ता आहे. आम्ही हा प्रवास दिवसासच केला. आगगाडीतून जात असताना, गोव्यात मुग्गाव आणि रामाचे भूशिर यांच्या दरम्यान जो सासष्ठ प्रांताचा समुद्रकिनारा आहे त्याची मला आठवण झाली. गाल्ले येथे आमचा दोन-तीन दिवस मुक्काम होता. येथे माझ्या पाहण्यात एक चमत्कार आला; तो हा की, गोव्याला जशी काजूची झाडे डोंगरावर उगवतात तशीच येथे पोफळीची झाडे पाटाचे पाणी न देता वाढतात. चौकशीअंत असे समजले की, या प्रांतात बारमाही पाऊस असल्यामुळे केळीला, पोफळीला व अशाच प्रकारच्या इतर झाडांना पाणी देण्याची यातायात पडत नाही. गाल्लेहून आम्ही आचार्यांच्या हिक्कडुवे गावी गेलो व तेथे एक दिवस मुक्काम करून पुनः कोलंबोस आलो. या प्रवासात पुष्कळ विद्वान भिक्षूंचा मला परिचय झाला व कित्येकांनी आपण शुद्ध करून छापलेले पाली ग्रंथ मला मोठ्या आदराने दिले.

ता. 22 मे 1902 रोजी वैशाखी पौर्णिमा होती. हा दिवस बौद्ध लोक फारच पवित्र समजतात. कारण असे की, या दिवशी सिद्धार्थ राजकुमार गयेजवळ नैरंजरा नदीच्या काठी एका पिंपळाच्या झाडाखाली बसला असता, त्याला खऱ्या धर्ममार्गाचा बोध होऊन तो बुद्ध झाला. पौर्णिमेच्या आधी दोन-चार दिवस विद्योदय विहारात हा दिवस साजरा करण्यासाठी बौद्ध उपासकांकडून जय्यत तयारी चालली होती. ध्वजपताका वगैरे उभारून सभामंडप, ग्रंथसंग्रहालय इत्यादी स्थाने शृंगारण्यात आली होती. या दिवशी म्हणण्यासाठी मी एक संस्कृत पद्य लिहिले व ते श्रीसुमंगलाचार्यांना दाखविले. त्यांना ते फारच पसंत पडले. ‘सिंहलसमय‌’च्या एडिटरांनी ते सिंहली लिपीत लिहून घेऊन आपल्या पत्रात छापले. त्यामुळे पुष्कळ लोकांना माझी माहिती झाली व संस्कृत भाषेचा थोडाबहुत परिचय असलेल्या गृहस्थांनी आणि भिक्षूंनी माझी फार तारीफ केली.

या सिंहली लोकांनी केलेल्या गौरवाचा आणि एकंदर परिस्थितीचा माझ्या मनावर इष्ट परिणाम झाला नाही. मनोवृत्ती जोराने प्रपंचमार्गाकडे वाहू लागल्या. संस्कृत भाषा शिकविण्याचा धंदा पत्करला असता तर दरमहा साठ किंवा सत्तर रुपये मला सहज मिळाले असते व तेवढ्यावर सिलोनमध्ये एखाद्या गावी माझ्या कुटुंबाचा निर्वाह मला करता आला असता. परंतु त्यामुळे पाली भाषेच्या अध्ययनास फाटा द्यावा लागला असता आणि पुन्हा स्वदेशी जाण्याचा बेत कायमचा सोडून द्यावा लागला असता.

पुण्याहून निघतेवेळी मी दोन निश्चय केले होते. पहिला, कुडीत प्राण असेपर्यंत बौद्ध धर्माचे ज्ञान संपादण्याचा प्रयत्न करावयाचा व दुसरा, जर या धर्माचे ज्ञान संपादता आले तर त्याचा आपल्या महाराष्ट्र देशबांधवांस फायदा करून द्यावयाचा. पण सिलोनमध्येच प्रपंच करून राहण्याच्या विचाराने या दोन्ही निश्चयांवर एकाएकी घाला घातला व अंतःकरण रणभूमीवर तुंबळ युद्ध सुरू झाले. या लढाईच्या बातम्या दृश्य युद्धाइतक्या रम्य नसल्यामुळे त्या समग्र देऊन वाचकांना कंटाळा आणण्याची माझी इच्छा नाही. पुण्यास केलेल्या निश्चयाचा जय झाला व प्रापंचिक विचाराचा पाडाव झाला, एवढी गोष्ट सांगितली म्हणजे पुरे आहे.

सिंहगडावर चढून गेल्यावर सूर्याजीने शिड्या कापून टाकल्या व आपल्या परत पळ काढू पाहणाऱ्या लोकांना औरंगजेबाच्या लोकांशी लढण्याशिवाय दुसरा मार्गच ठेवला नाही, ही गोष्ट सुप्रसिद्ध आहे. कृतनिश्चयापासून माघार घेऊ पाहणाऱ्या माझ्या मनोवृत्तींना अशा काही युक्तीने ताळ्यावर आणणे भाग होते. भिक्षू होण्याने हा प्रश्न सुटण्यासारखा होता व प्रपंचाकडे धावणाऱ्या मनोवृत्तीच्या शिड्या कापून टाकण्याला याशिवाय दुसरा उपाय नव्हता. भिक्षू झाल्यावर विहारात मोकळेपणे राहता येणे शक्य होते व विनयादी ग्रंथ शिकण्यास सुलभ पडणार होते. पण या कामी बऱ्याच अडचणी होत्या. आईची परवानगी लागते, ती मिळण्यासारखी नव्हती. मला ज्यांनी सिलोनला पाठविले त्यांचीही संमती पाहिजे होती. शेवटी, श्रीसुमंगलाचार्यांनी बाबू नरेंद्रनाथ सेन यांना पत्र लिहून या कामी त्यांची संमती विचारली. नरेंद्रबाबूंनी आपल्या पत्रात माझा फार गौरव करून आपली संमती दिली. आईच्या परवानगीसंबंधाने दुसरा एक शास्त्राधार काढून आमच्या आचार्यांनी मला श्रामणेराची दीक्षा दिली.

बौद्ध धर्मात आजन्म संन्यासव्रत पाळले पाहिजे असा नियम नाही. मात्र, जोपर्यंत भिक्षुभावाने राहील, तोपर्यंत त्याने संघाचे सर्व नियम पाळले पाहिजेत; त्यात कसूर करता कामा नये. सामणेराला अवघे दहा नियम पाळावे लागतात.  संघकृत्यांत जरी त्याला हात घालण्याचा अधिकार नसतो, तरी विहारात पुष्कळ सवलती मिळतात; अध्ययनाची विशेष सोय होते. सामणेर झाल्यावर दुसऱ्या कोणत्याही भानगडीत न पडता सर्व वेळ पाली ग्रंथ वाचण्यात घालवू लागलो. काही दिवसांनी संस्कृत शिकविण्याविषयी पुष्कळ भिक्षूंचा माझ्यामागे तगादा लागला. त्यांना मी रात्री एक किंवा दोन तास कौमुदी आणि तर्कसंग्रह शिकवीत असे व बाकी सर्व वेळ पाली भाषेच्या अध्ययनात घालवीत असे.

जेवणाखाण्याची व्यवस्था आश्रमात होत होती. इतकेच नव्हे, तर मला लागणारी पुस्तकेदेखील गृहस्थांकडून आणि भिक्षुकांकडून मिळत असत. पण याबाबतीत थोडा व्यत्यय आला, तो असा : मद्रास महाबोधी सभेचे सेक्रेटरी श्री. सिंगारावेलू काही कामानिमित्त विलायतेस गेले होते. ते जाताना की येताना एक दिवस कोलंबो येथे राहिले व आमच्या आचार्यांना भेटण्यासाठी विद्योदय आश्रमात आले. श्रीसुमंगलाचार्य त्यांना भेटले नसावेत; पण द्वितीय आचार्य देवमित्र स्थविर यांची त्यांनी भेट घेतली. त्यांच्याबरोबर इंग्रजी जाणणारा कोणीतरी सिंहली गृहस्थ आला असावा; नाहीतर देवमित्र स्थविरांशी त्यांचे संभाषण झाले नसते. इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्यावर देवमित्राचार्यांनी त्यांना माझे वर्तमान सांगितले. आपल्या भाषणात त्यांनी माझी फार स्तुती केली असावी. तेव्हा सिंगारावेलूंनी अशा अर्थाचे उद्‌गार काढले की, ‘हिंदुस्तानातील ब्राह्मण फार लबाड असतात. त्यांचा विश्वास नाही. हा मनुष्य जरी साधाभोळा दिसला, तरी याचा विश्वास धरू नका. तो ब्राह्मण आहे हे लक्षांत ठेवा.’ त्याच दिवशी देवमित्र स्थविराने हे सिंगारावेलूंचे महाबोधी सभेच्या सेक्रेटरीचे मत सर्वत्र जाहीर केले. श्रीसुमंगलाचार्यांवर त्याचा काही परिणाम झाला नाही, पण काही गृहस्थांचा मात्र माझ्यावरचा विश्वास उडाला.

ही गोष्ट जेव्हा माझ्या कानांवर आली, तेव्हा माझी यापुढे गैरसोय होणार याचे वाईट न वाटता, सिंगारावेलूंसारख्या सुशिक्षित हिंदी गृहस्थाचे हे आत्मघातकी वर्तन पाहून मला फार वाईट वाटले. ज्या गृहस्थाने मला मोठ्या आदराने जेवू घातले, ज्याने तुतिकोरिनच्या डॉ. मुदलियाराला पत्र देऊन माझी अडचण दूर केली, त्यानेच माझ्या संबंधाने केवळ ब्राह्मणत्वावरून सिंहली लोकांत गैरसमजूत उत्पन्न करण्यास तयार व्हाव याचे मला सखेदाश्चर्य वाटले. याच वेळी दुसरी एक गोष्ट घडून आली. जनरल पोकुशिमा हे प्रसिद्ध जपानी योद्धे जर्मनीहून स्वदेशी जात असता कोलंबोला आले. त्यांना आमच्या आश्रमात काही गरीब जपानी विद्यार्थी पाली भाषेचा अभ्यास करतात, हे वर्तमान समजले, तेव्हा मुद्दाम ते श्रीसुमंगलाचार्यांना भेटावयास आले. त्या वेळी विद्योदय विद्यालयात कौण्डिन्य नावाचा एकच जपानी विद्यार्थी होता. बाकी चार विद्यार्थी पश्चिम किनाऱ्यावरील निरनिराळ्या गावी राहत असत. पोकुशिमाने आचार्यांची भेट घेऊन गरीब जपानी विद्यार्थ्यांची काळजी घेतल्याबद्दल त्यांचे फार फार आभार मानले व आपण त्याच कामासाठी मुद्दाम आश्रमात आलो असे सांगितले. ज्याने मला मदत केली, ज्याला माझ्यासंबंधाने थोडीबहुत माहिती होती अशा हिंदी सुशिक्षित गृहस्थाने माझ्यासंबंधाने - एका हिंदी विद्यार्थ्यासंबंधाने - विनाकारण गैरसमज करावा व एका मोठ्या जपानी लष्करी अधिकाऱ्याने ज्यांचे जन्मात दर्शन घडले नाही अशा जपानी गरीब विद्यार्थ्याला उत्तेजन मिळावे म्हणून श्री सुमंगलाचार्यांची मुद्दाम भेट घ्यावी, या दोन गोष्टींची तुलना केली असता, आमच्या सुशिक्षितांच्या देशप्रीतीच्या आड जातिभेद कसा येत असतो हे तेव्हाच लक्षात येण्याजोगे आहे.

श्री. सिंगारावेलूंच्या आगमनानंतर काही थोड्या दिवसांनी विहारातील जेवणावर अवलंबून न राहता मी भिक्षेवर माझा निर्वाह करू लागलो. भिक्षूचे हे कर्तव्य असल्यामुळे आचार्य याच्या आड आले नाहीत. भिक्षेला शिजविलेेले अन्न- विशेषतः भातच मिळत असे. भाज्या वगैरे विहारातून देण्यात येत असत. शिवाय, सकाळी दूध, तांदळाची पोळी (हिला आप्प म्हणतात, गोव्यात पोळे म्हणून पदार्थ करतात त्यासारखी ही असते) व एक-दोन केळी विहारातूनच देत असत. पण सिंहली लोकांचे मुख्य अन्न उकडा भात, ते मला मुळीच पचेना. या जेवणामुळे माझा संधिवाताचा विकार फार वाढला व पुनः अन्नद्वेषाने उचल खाल्ली. मी अगदी कंटाळून गेलो. पुस्तके वाचणे हीच काय ती अशा प्रसंगी माझी विश्रांती होती. विहारात व्यायामाची सोय मुळीच नव्हती. त्यामुळेही माझ्या प्रकृतीला बराच धोका पोहोचला.

अशा स्थितीत असताच मी इंग्रजी शिकण्यास सुरुवात केली. मुंबईहून ‘सेल्फ टीचर‌’ नावाचे पुस्तक आणवून काही इंग्रजी शब्द पाठ केले व पुढे अभ्यास वाढावा या उद्देशाने सूर्यगोड सुमंगल भिक्षूच्या श्रीवर्धनारामात राहण्यास गेलो. सूर्यगोड भिक्षू मजपासून संस्कृत शिकत असत व मला इंग्रजी शिकवीत; परंतु हा क्रम एका आठवड्यापेक्षाा अधिक दिवस चालला नसावा. त्यांना कामे फार, त्यामुळे मला शिकविण्यास सवड नव्हती. दुसऱ्या एका इंग्रजी शिकणाऱ्या मुलाच्या मदतीने काही दिवस पुढे अभ्यास चालविला. परंतु आणखी एका आठवड्यापलीकडे या दुसऱ्या प्रयत्नाचीही मजल गेली नाही. दोन किंवा तीन महिने श्रीवर्धनारामात राहिलो. तेथे समुद्र जवळ आहे. काही दिवस समुद्रस्नान करून पाहिले. पण प्रकृती न सुधारता अधिक बिघडली. जवळच एक हिंदी वैद्यक जाणणारा भिक्षू राहत असे. त्याने एक अरिष्ट की आसव तयार करून दिले. पण त्यामुळे माझा रोग अधिकच बळावला. शेवटी, सिलोन सोडून एकदाचे कलकत्त्याला परत जावे, असा माझा बेत ठरला.

- धर्मानंद कोसंबी

(लेखक बौद्ध धर्म, तत्त्वज्ञान आणि पाली भाषा यांचे विशेषज्ञ होते)


Tags: साधना डिजिटल धर्मानंद कोसंबी कोसंबी सिलोन श्रीलंका विद्योदय प्रकृती इंग्रजी भाषा सिंहली अस्वास्थ्य नवे पुस्तक निवेदन Load More Tags

Add Comment