अस्पृश्यतानिवारणातील शिलेदाराचे लक्षणीय चरित्र

कर्तव्य साधना

प्रत्येक मुलुखाचे काही निसर्गसिद्ध आणि काही सामाजिक-सांस्कृतिक वैशिष्ट्ये असतात. कोकणातील देवरूख या छोट्या गावाचे नैसर्गिक वैशिष्ट्य हे हिरवाईने नटलेलं टेबल-लँड म्हणून आहे. सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्राचा या गावाचा लौकिक वाढवण्यात ‘मातृमंदिर’ संस्थेच्या मावशी हळबे, मुद्रण-प्रकाशनातील ‘मौज’कार भागवतबंधू यांचा वाटा फार मोठा आहे.

या मालिकेतील आणखी एक महत्त्वाचे नाव म्हणजे ‘झुणका-भाकर’चे प्रणेते अनंत हरी उर्फ समतानंद गद्रे. अस्पृश्यतानिवारणाच्या कामामध्ये सर्वस्वी झोकून देणारे समतानंदांचे योगदान फारच मोठे आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील या प्रचंड धडपड्या अन् बहुआयामी व्यक्तीचे सविस्तर चरित्र लिहिले गेले नव्हते. त्यामुळे आजच्या पिढीला त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि कार्यविस्ताराचा विशेष परिचय नाही. ही उणीव नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका पुस्तकाने भरून निघाली आहे.

सुप्रसिद्ध सिद्धहस्त लेखक-संपादक भानू काळे यांनी लिहिलेला ‘समतेच्या लढ्यातील अनाम शिलेदार ‘समतानंद’ अनंत हरी गद्रे’ हा चरित्र ग्रंथ नुकताच प्रकाशित झाला आहे. त्यामुळे, सामाजिक क्षेत्रात अपूर्व कामगिरी केलेल्या पण काहीशा अलक्षित राहिलेल्या या व्यक्तीला त्यांच्या शतकोत्तर रौप्य वर्षानंतर न्याय मिळाला आहे. ‘हाऊसफुल्ल’ या शब्दाच्या या जनकाला आता एखाद्या समाजप्रेमी अभ्यासकाच्या हाऊसमध्ये स्थान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

एकंदर सात प्रकरणांमध्ये लेखकाने चरित्रनायकाच्या कार्यविस्ताराचा परिचय करून दिला आहे. देवरूख व गद्रे परिवाराबद्दल थोडक्यात माहिती सांगून समतानंद यांची पत्रकारिता, संपादन कामगिरी, नाटिकालेखन, जाहिरातकौशल्य यांवर एक प्रकरण लिहिले आहे. लेखकाने विशेष भर दिलेला आहे तो त्यांच्या सामाजिक कामावर.विशेषत: त्यांच्या ‘झुणकाभाकर प्रसाद सत्यनारायण महापूजे’च्या अभिनव प्रयोगाबद्दलही लेखकाने विस्ताराने लिहिले आहे. 

हिंदू समाजातील अस्पृश्यता ही अमानवी प्रथा नष्ट झाली पाहिजे ही समतानंदांची आंतरिक तळमळ होती. या संदर्भात डॉ. आंबेडकरांनी केलेल्या एका विधानामुळे आपण खडबडून जागे झालो आणि अस्पृश्यता निवारणाच्या कामाला वाहून घेतले असे त्यांनी म्हटले आहे. त्याप्रमाणे गावोगावी फिरून त्यांनी महार दांपत्याच्या हस्ते महापूजा आयोजित केल्या आणि प्रसाद म्हणून झुणकाभाकर वाटली, शिवाय त्या दांपत्याच्या पायाचे तीर्थ सर्वांसमोर प्राशन केले. 

अस्पृश्यता निवारणाच्या प्रयत्नात ‘झुणका-भाकर सत्यनारायण पूजा’ असे उपक्रम हे पापविमोचनाचे प्रभावी माध्यम आहे, असे समतानंदांचे सुस्पष्ट मत होते. ते म्हणायचे, “स्वत: जन्माने ब्राह्मण असल्याने माझ्या पोटातील अहंकाराचे पाप मारून टाकण्यासाठी मी हरिजनांच्या पायाचे तीर्थ प्राशन करतो. जातीजातींतील भेदभाव नष्ट होऊन सर्व समाजात समताभाव नांदो अशी त्या वेळी हरीजवळ शुद्ध मनाने प्रार्थना करतो. या तीर्थप्राशनाबद्दल मी इतकेच सांगतो की, फक्त ब्राह्मणांनीच हरिजनांच्या पायाचे तीर्थ घ्यावयाचे आहे. कारण त्यांनीच पूर्वी सगळ्यांना स्वत:च्या पायाचे तीर्थ पाजलेले आहे!”

पापक्षालनाचा हा धाडसी प्रयोग सुमारे शंभर वर्षांपूर्वी झाला ही मोठीच सामाजिक क्रांती होती. तिचा ऊहापोह करावा तेवढे थोडेच आहे. समतानंदांच्या ‘कर्ते सुधारक’पणाची ती मोठी खूण होती, याचे भान लेखकाने ठेवले आहे. म्हणून ‘समतेच्या लढ्यातील अनाम शिलेदार’ असे उचित उपशीर्षक या चरित्रग्रंथाला देण्यात आले आहे. ‘समतानंद’ या गौरवपदवीची सार्थकता त्यामुळे स्पष्ट झाली आहे.

समतानंदांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. त्यांच्या काळातील नाटक-रंगभूमी, नव्यानेच सुरू झालेला चित्रपट उद्योग, ‘केसरी’ किंवा ‘काळ’सारखी जाज्वल्य पत्रकारिता, उपहासगर्भ लेखनशैलीतील खमंग चुरचुरीत स्तंभलेखन असो, कल्पक आणि लक्ष्यवेधी जाहिरातविश्व असो की सडेतोड सभासंमेलने, त्यांना या सर्वांचे आकर्षण तर होतेच पण त्यामध्ये गतीही होती. आचार्य अत्रे, सोहराब मोदी यांसारख्या दिग्गज मंडळींशी समतानंदांची मैत्री होती आणि ‘जाहिरात जनार्दन’ अशी त्यांची ख्याती होती. 

देशभक्तीने प्रेरित होऊन समतानंदांनी लोकमान्य टिळकांसोबत प्रवास करून त्यांच्या दौऱ्याचे वार्तांकन केले होते. त्यांनी स्वा. सावरकरांशी प्रत्यक्ष संवादही साधला होता. ‘संदेश’कार अ.ब.कोल्हटकर हे तर त्यांचे पत्रकारितेतील गुरू होते. शिवाय ते ‘मौज’ साप्ताहिकाचे आद्य संपादक होते. नंतरच्या काळात ‘निर्भीड’चे चालक-मालक-संपादक अशा सर्व जबाबदाऱ्या त्यांनी लीलया पेलल्या. पत्रकारितेतील त्यांची कामगिरी ही अशी ठसठशीत होती. समकालीन मंडळींनी त्यांची थोरवी ओळखली होती.

रंगभूमीच्या ओसरत्या काळात तीन अंकी सुटसुटीत नाटके आणि प्रबोधनपर नाटके-नाटिका लिहून त्यांनी त्याचे प्रयोग घडवून आणले होते. समाजप्रबोधनाच्या कळकळीने त्यांनी असे अनेक उद्योग केले होते. संसाराकडे दुर्लक्ष करून नि:स्वार्थी वृत्तीने त्यांनी हे सर्व केले. व्यापारात यशस्वी झालेल्या त्यांच्या दोन्ही बंधूंनी त्यांना नेहमी सांभाळूनच घेतले.

‘व्यक्तिमत्त्व आणि वारसा’ या समारोपाच्या प्रकरणात समतानंदांच्या एकंदर कार्यकर्तृत्वाचे मूल्यमापन लेखकाने अतिशय सहानुभूतीने, संक्षेपाने आणि साक्षेपाने केले आहे. ते मुळातूनच वाचण्यासारखे आहे. त्यात लेखक म्हणतो, ‘त्यांनी निर्विष, निरागस, निर्मळ मनाने नियतीचे अनंत टक्केटोणपे सोसले आणि ते सारे पचवूनही होताहोईतो इतरांना सतत काही ना काही देत राहिले. त्यांचे आयुष्य म्हणजे एक तारेवरची कसरत होती.’ प्रत्येक संवेदनशील व्यक्ती भवताल आत्मसात करीत नवी पायवाट घडवीत जाते, मेळा अन् गोतावळा जमवते. स्वत:च्या अंतर्नादाला जाणवले तसे पावलापावलावर नवं शिंपित जाते. पुढच्या पिढीने ती पावलं ओळखून त्यांचं मूल्यमापनच केलं पाहिजे. सदर चरित्रग्रंथ त्या दृष्टीने कौतुकास पात्र आहे.

आजच्या पिढीतील एक पुरोगामी लेखक, नाटककार अतुल पेठे यांनी म्हटले आहे, “माझ्या आजोबांच्या कार्याविषयी त्यांच्या झपाटल्याविषयी वाचताना मी अनेकदा गलबलतो आणि दर वेळी त्यांच्यावर अधिकच प्रेम करू लागतो. हे माझे आजोबा कधीच गंध लावून, अत्यंत तर्कट वागणारे व पोथ्या-पुराणांना चिकटून सोवळे-ओवळे पाळणारे नव्हते. त्यांच्या डोक्यात सतत कुठला ना कुठला तरी किडा वळवळत असे. एक स्वर गुणगुणत असे, एक नाद असे. मात्र एकच एक ताल त्यांनी कधीच शेवटपर्यंत धरला नाही. जे नवं, ते हवं. कुठल्याही एका ठिकाणावर ते कधीही स्थिर राहिले नाहीत. एका मध्यमवर्गीय माणसाने स्वत:च शरीर इतकं घुमवावं, इतक्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात आणि त्याहीपेक्षा इतकी नवी नवी साहसं करावीत हे खरं तर रिवाजाला सोडून होतं. आणि म्हणून त्या रिवाजाला अनुसरून जगणाऱ्या आजूबाजूच्या नातेवाईकांहून ते आर्थिकदृष्ट्या दुर्बल होत गेले आणि पर्यायाने उपेक्षिले गेले. अनंत हरी हे खरं तर एका शोकात्म नाटकात शोभावं असं पात्र आहे. अद्भुततेचा ध्यास असणारं कमकुवत ताकदीचं ते एक खेळणं आहे. आजोबांच्या पदरात आयुष्यभर ‘धडपड’ हा शब्द राहिला. तरीही मला माझ्या आजोबांचं रूप या पार्श्वभूमीवर अधिक लोभसवाणं वाटतं.”

एका नातवानं आपल्या आजोबांचं केलेलं हे वास्तवदर्शी मूल्यमापनच समाजपरिवर्तनाचा प्रवाह निखळपणे पुढे वाहता ठेवण्यास मदत करतो. समाजपरिवर्तनाच्या विशुद्ध तळमळीने प्रत्यक्ष कृती करणाऱ्या या एकमेव समतानंदांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करणारे भानू काळे लिखित समतानंद अनंत हरी गद्रे हे पुस्तक त्यामुळेच महत्वाचे आहे. 
    
- सुरेश जोशी

समतानंद अनंत हरी गद्रे
लेखक : भानू काळे
प्रकाशक: डायमंड पब्लिकेशन, पुणे
किंमत : 225 रुपये

 

Tags: समतानंद अनंत हरी गद्रे मौज प्रकाशन पत्रकार डॉ आंबेडकर भानू काळे अतुल पेठे अस्पृश्यता ब्राह्मण नवे पुस्तक समाज सुधारणा Samatanand Anant Hari Gadre Mauj Prakashan Journalist Dr Ambedkar Bhanu Kale Atul Pethe Untouchability Brahmin New Book Book Review Social Reform Load More Tags

Comments:

Pramod Joshi

It's really something which compelled me to think and rethink on the subject in focus. Salute to the unsung hero Late Mr. Samatanand. Thanks to writer Mr. Kale & Dr. Suresh Joshi for throwing light on the noble subject.

बि.लक्ष्मण

लेख उत्तम . समाजसुधारणेच्या अशा विविध आधुनिक पिढीला माहिती होणे आवश्यक आहेतच.

मदन शेलार

आजच्या विशेष करून ब्राम्हण समाजातील व बहुजन समजतील तरुणांच्या डोळ्यात अंजन घालणारा लेख

Add Comment