न्यायमूर्ती रानडे (१८४२ - १९०१) हे महाराष्ट्रातील अग्रगण्य समाजसुधारक, स्त्रीशिक्षणाचे पुरस्कर्ते, अर्थशास्त्रज्ञ व मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. त्यांच्या Religious and Social Reform, Essays On Indian Economics आणि Miscellaneous Writings या तीन इंग्रजी ग्रंथांचे मराठी अनुवाद साधना प्रकाशनाकडून येत आहेत. त्यांचे प्रकाशन येत्या १६ जानेवारीला पुणे येथे होत आहे. त्यापैकी 'धार्मिक व सामाजिक सुधारणा' या ग्रंथाला इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. अरविंद गणाचारी यांनी लिहिलेली ही दीर्घ प्रस्तावना आहे.
प्रस्तुत खंडात संकलित केलेले निबंध व भाषणे हे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या सामाजिक-धार्मिक तत्त्वज्ञानाचे सार आहे, आणि भारतातील सर्व पिढ्यांकरता ते उद्बोधक ठरणारे आहे. या लेखनातून रानड्यांच्या विचारांमधील स्पष्टता, आणि त्यांच्या ऐतिहासिक दृष्टीचा लांब जाणारा पल्ला व खोली, त्यांच्या युक्तिवादामधील निःसंदिग्धता, त्यांचा प्रामाणिकपणा आणि त्यांची निःस्वार्थी देशभक्ती प्रत्ययाला येते. त्यांच्या बुद्धिमत्तेमधील व अंतःकरणातील या गुणवैशिष्ट्यांमुळे समकालीनांना त्यांच्याविषयी ममत्व वाटत असे, आणि सर्व देशवासीयांच्या मनात त्यांच्याविषयी आदराची भावना होती. किंबहुना, 1901 साली त्यांचं निधन झाल्यानंतर सव्वाशे वर्षांनंतरही त्यांच्या या गुणांमधील नवचैतन्यदायी मूल्य टिकून आहे. या खंडाचे संकलन एम. बी. कोळस्कर यांनी केले. रानड्यांचे घनिष्ठ मित्र, विख्यात प्राच्यविद्या अभ्यासक शंकर पांडुरंग पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली कोळस्करांची जडणघडण झाली. कोळस्करांनी रानड्यांच्या सूक्ष्म देखरेखीखाली यातील मजकूर संकलित केला. पण दुर्दैवाने रानड्यांच्या अकाली निधनापूर्वी हा खंड प्रकाशित होऊ शकला नाही, त्यामुळे शेवटी 16 जानेवारी 1902 रोजी त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनी त्याचे प्रकाशन झाले. तेव्हापासून वामन बाळकृष्ण रानडे, गणपत अमृत मानकार, हरी नारायण आपटे, नरहर रघुनाथ पाठक, प्रा. जेम्स केलॉक, दत्तात्रेय गोपाळ कर्वे, त्र्यं. वि. पर्वते, रिचर्ड टकर, अशा अनेकांनी लिहिलेली रानड्यांची मराठीमधील व इंग्रजीतील चरित्रे प्रकाशित होत आली आहेत. परंतु, कोळस्करांनी 1902 साली प्रकाशित केलेला रानड्यांच्या मूळ निबंधांचा व भाषणांचा खंड मात्र केवळ इंग्रजीमध्येच उपलब्ध होता. आता हे संकलन मराठीत भाषांतरित झाले असून साधना प्रकाशनाचे श्री. विनोद शिरसाठ यांनी रानड्यांच्या 125 व्या स्मृतिवर्षामध्ये मराठी वाचकांकरता त्याचे प्रकाशन केले, ही अत्यंत प्रशंसनीय बाब आहे. भारतामध्ये एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात राजा राममोहन रॉय (1774- 1833) आणि उत्तरार्धात महादेव गोविंद रानडे (1842-1901) अशी दोन प्रचंड बुद्धिमान व्यक्तिमत्त्वे होऊन गेली. या दोघांकडेही 'सॉक्रेटिससदृश दृष्टी' होती आणि त्यांच्या जीवनकाळामध्ये देशाच्या मानसिक जीवनाचे, तसेच बौद्धिक व सामाजिक विकासाचे प्रतिबिंब उमटले आहे. या दोन्ही महान व्यक्तींनी पाश्चात्त्य सभ्यतेच्या आक्रमणाला सामोऱ्या जाणाऱ्या राष्ट्राची निद्रावस्थेत गेलेली सद्सद्विवेकबुद्धी जागृत करण्यासाठी, नैतिक व सामाजिक कुंठितावस्था संपुष्टात आणण्यासाठी, धर्मोपदेशकांच्या व अंधश्रद्धांच्या बंधनांमधून मुक्त होण्यासाठी अथकपणे कार्य करणे हेच स्वतःचे जीवितकार्य मानले.
न्यायमूर्ती रानडे हे निःसंशयपणे त्यांच्या काळातील सर्वांत महान व सर्वांत प्रातिनिधिक भारतीयांपैकी एक होते. ते प्रतिष्ठित विद्वान होते, मर्मग्राही विचारवंत होते, तात्त्विक लेखक होते, इतिहासकार होते, अग्रगण्य अर्थशास्त्रज्ञ होते आणि कधीही न थकणारे कार्यकर्ता होते. परंतु, देशाच्या सार्वजनिक जीवनात त्यांचे मुख्य स्थान सुधारक आणि सुधारकांचा नेता हे राहिले. त्यांचे समकालीन लोक त्यांना प्रेमाने 'प्रिन्स ऑफ ग्रॅज्युएट्स' आणि 'सर्वज्ञ' असे संबोधत असत. रानड्यांच्या जीवनचरित्राचा सर्वांना परिचय असेल, त्यामुळे त्याची पुनरावृत्ती इथे करण्याची गरज नाही. अनेक बाबतीत त्यांच्याकडे अग्रक्रमाचा मान जातो ते पहिल्या चार - कला पदवीधरांपैकी एक होते; तसेच नव्याने स्थापन झालेल्या मुंबई विद्यापीठातील ते पहिले पदव्युत्तर पदवीधर होते. त्यांच्या संपूर्ण सक्रिय जीवनकाळातील उपलब्धी पाहिल्या तर त्यांच्या साकल्यपूर्ण मनोविश्वाची कल्पना येते. रानड्यांनी 1862 सालापासून 'इंदुप्रकाश' या प्रसिद्ध नियतकालिकासाठी स्तंभलेखन सुरू केले. 'महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र विद्यासागर' म्हणून ओळखले जाणारे विख्यात सुधारक विष्णुशास्त्री परशुराम पंडित यांनी या नियतकालिकाची स्थापना केली होती. याच कालखंडात रानड्यांनी ज्ञान प्रसारक सभेच्या मासिकामध्ये लेख लिहायला सुरुवात केली, आणि नोव्हेंबर 1862 ते मार्च 1863 असा थोडा काळ ते 'इंदुप्रकाशा'चे संपादकही होते. त्यानंतर ते प्रार्थना समाजाचे मुखपत्र असणाऱ्या 'सुबोधपत्रिके'मध्ये लिहू लागले. या लेखांमधून त्यांनी विधवा पुनर्विवाह, बालविवाह, सक्तीचे वैधव्य आणि स्त्रीशिक्षण यांसारख्या त्यांच्यासाठी अत्यंत आस्थेच्या असणाऱ्या प्रश्नांवर लेखन केले.
त्यांनी 1865 साली कायद्याची पदवी मिळवली आणि लवकरच न्यायपालिकेमध्ये रुजू झाले. त्यांची 1871 साली पुण्याला बदली करण्यात आली. ते दंडाधिकारी होते त्याच काळात दख्खनमध्ये शेतकऱ्यांचा क्षोभ उसळून आला; या वेळी त्यांनी गरीब शेतकऱ्यांची दयनीय अवस्था पाहिली. शेतकऱ्यांच्या रोषावर उपाय करण्यासाठी रचनात्मक सूचना करण्याकरता त्यांनी 1878 साली पुणे सार्वजनिक सभेची स्थापना केली आणि या संस्थेच्या नियतकालिकातून या प्रश्नावर लेखन केले. त्यांना 1879 साली दख्खन कृषी साहाय्य अधिनियमाखाली स्थापन झालेल्या न्यायाधिकरणाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आले. इथे त्यांना भारतीय शेतीमधील समस्यांची प्रत्यक्ष माहिती मिळाली. रानड्यांच्या सांगण्यावरून व्ही. एम. महाजनी यांनी बंगालमधील जमाबंदीच्या कायमधारा पद्धतीवर पुस्तक लिहिले. तसेच रानड्यांनी रामचंद्र सखाराम गुप्ते व रामचंद्र आबाजी राजे यांना 'कृषिकर्मविद्ये'वर विस्तृत पुस्तक लिहिण्यासाठी मदत केली अशा प्रकारचे हे पहिलेच पुस्तक होते; त्यात मातीमधील घटकांची व शेतकी उत्पादनांची माहिती होती. मराठी भाषांतरकार रानड्यांची कारकिर्द सुरू झाली तेव्हाच त्यांच्यावर मराठी वाङ्गयाविषयी एक लेख लिहिण्याची अधिकृत जबाबदारी टाकण्यात आली. हे त्यांच्या कार्याचे काही मोजके दाखले आहेत. रानड्यांनी भारताच्या सामाजिक, राजकीय, वाङ्गयीन, सांस्कृतिक जीवनाच्या सर्व अवकाशांमध्ये संस्थांची उभारणी केली. त्यांनी स्थापन केलेल्या संस्थांमध्ये ग्रंथोत्तेजक मंडळी, ज्ञान सभा, इंडियन नॅशनल काँग्रेस, इंडियन सोशल कॉन्फरन्स, आदींचा समावेश होतो. ए. ओ. ह्यूम रानड्यांना आदरभावाने 'महादेव' असे संबोधत असत.
न्यायमूर्ती रानड्यांना गुरूस्थानी मानणारे प्राध्यापक गोपाळ कृष्ण गोखले यांनी असे नमूद केले आहे की, 'रानड्यांच्या संपर्कात येणाऱ्या कोणालाही पहिल्यांदा त्यांची निखळ, उत्कट व मूलगामी देशभक्ती लख्खपणे जाणवते.' आपण परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये जगतो आहोत, असे रानड्यांना कायम वाटत असल्याचे दिसते. आपल्याला नेमून दिलेले कार्य आपण नम्र सेवकाप्रमाणे सर्वतोपरीने पार पाडावे आणि आपल्यावर असलेल्या श्रद्धेच्या कृपाछत्राखाली मार्गक्रमणा करावी, अशी त्यांची धारणा होती. ते निसर्गात, मानवी जीवनात आणि मानवी इतिहासात ईश्वराला पाहत होते. जगातील जीवनव्यवहाराच्या महानाट्यात होणाऱ्या प्रत्येक घडामोडीत ईश्वरी हात असतो, आणि ईश्वरी उद्देशाची पूर्तता करण्यासाठीच प्रत्येक घटनाक्रम उलगडत जातो, असे ते मानत असत. भारत ही 'वाग्दत्त भूमी' (प्रॉमिस्ड लँड) आहे आणि भारतीय लोकांना ईश्वराने खास निवडलेले आहे (चोझन पीपल), त्यांच्यावर विशेष दैवी वरदहस्त आहे, अशी रानड्यांची ठाम धार्मिक धारणा होती. या धारणेला त्यांनी केलेल्या इतिहासाच्या चिकित्सक अभ्यासाचाही आधार होता. परंतु, ब्रिटिश राजवट हा 'ईश्वरी योजने'चा (डिव्हाइन डिस्पेन्सेशन) भाग आहे असे मात्र ते अजिबातच मानत नव्हते.
प्रार्थना समाजाची अधिकृत स्थापना 31 मार्च 1867 रोजी झाली, पण अशा प्रकारच्या संस्थेची कल्पना 1864 पासूनच चर्चेमध्ये होती. केशवचंद्र सेन मुंबई दौऱ्यावर आले होते, तेव्हाच्या वादचर्चेमधून हे अनुमान बांधता येते. शिवाय, मेरी कार्पेन्टर यांनी युनिटेरियन सोसायटीची स्थापना करण्याचा सल्ला दिल्यावर प्रार्थना समाजाच्या स्थापनेला आणखी गती मिळाली असावी. रानडे व डॉ.रा.गो. भांडारकर 1871 साली पुण्याला परतल्यानंतर या संस्थेच्या तत्त्वव्यवहाराची चौकट निश्चित करण्यात आली. "आम्हाला एकाच विचाराने कार्य करायचे नसून सर्व विचारांनुसार कार्य करायचे आहे, आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आम्हाला गतकाळापासून फारकत घ्यायची नाही आणि आमच्या समाजाशी असलेले सर्व दुवे तोडायचे नाहीत. आम्ही बंगालप्रमाणे केवळ धार्मिक आधारावर मार्गक्रमणा करत नाही... आम्हाला जुन्या प्रस्थापित संस्थांवरील आमचा ताबा सोडण्याची इच्छा नाही." रानड्यांना प्रार्थना समाजाची चळवळ बंगालमधील धर्मसुधारणेच्या चळवळीप्रमाणे सार्वत्रिक स्वरूपाची व्हायला नको होती, तर व्यक्तिगत पातळीवर परिणाम करणारी हवी होती. ते म्हणाले, "राजा राममोहन रॉय ब्राह्मो समाजाला नवविधान किंवा ईश्वरी कार्याचा नवीन आदेश मानत नव्हते. माणसांनी स्वीकारलेली श्रद्धा आणि त्यांचे व्यवहारातील आचरण यांच्यात सुसंगती निर्माण करावी, एवढीच त्यांची महत्त्वाकांक्षा होती. त्यासाठी त्यांनी परमात्म्याची मूर्तिपूजेविना काटेकोर आराधना करण्याचा पुरस्कार केला. ही आराधना मनाने करायची होती, हाताने नव्हे; त्यात स्वत्वार्पण होते, स्वतः कडील मालमत्ता अर्पण करणे त्यात अभिप्रेत नव्हते." ब्राह्मो समाज हा सुरुवातीला केवळ वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन करत होता, भ्रष्टाचाराचा व अनैसर्गिक वाढीचा विरोध करत होते, पण कालांतराने या चळवळीने नवीन धर्मश्रद्धेचे रूप घेतले, याकडे रानडे निर्देश करतात. किंबहुना हा नवीन पंथ खूप जास्त आत्मचिंतनात्मक व आध्यात्मिक स्वरूपाच्या प्रार्थनेमध्ये गुंतत गेला आणि त्याला 'प्रेरित उगमाची गरज भासू लागली', त्यामुळे शेवटी हा पंथ भारतीयांची सहानुभूती गमावून बसला.
रानड्यांनी दिलेल्या 'श्रद्धाविषयक कबुली'ला वैशिष्ट्यपूर्ण मूल्य आहे, कारण त्यातून आपल्याला त्यांच्या धार्मिक धारणांची स्पष्ट कल्पना मिळते. मूर्तिपूजेमुळे आपल्या ईश्वरविषयक संकल्पनेचे मानवीकरण किंबहुना अमानुषीकरण होते, असे रानडे म्हणतात. मूर्ती परमेश्वराचे प्रतिनिधित्व करत नसल्याचे सांगून मूर्तिपूजेचा धिक्कार करण्यात आल्याचा दाखलाही त्यांनी नोंदवला. तेराव्या शतकातील ज्ञानदेवापासून ते अठराव्या शतकाअखेरीपर्यंत चाललेल्या मराठी संतकवींच्या काव्यपरंपरेचे समर्थन करताना रानड्यांना स्वतःची चळवळ भूतकाळाशी जोडायची किती उत्कट इच्छा होती ते दिसते. सार्वत्रिक आदर लाभलेल्या मराठी संतांचे कामच आपण केवळ पुढे नेतो आहोत, हे हिंदू समाजाला पटवून देण्याचा त्यांचा प्रयत्न होता. भूतकाळातील चांगल्या गोष्टी आणि वर्तमानातील चांगल्या गोष्टी यांची अशा रितीने अविभाज्य सांगड घातली गेली. त्यामुळे त्यांनी संतांच्या भागवत धर्माचे वर्णन 'हिंदू प्रोटेस्टंटवाद' असे केले. संतांचे कार्य राष्ट्राला 'विचार व कृती' या दोन्ही बाबतीत कार्यक्षमतेच्या उच्च पातळीवर घेऊन जाणारे होते, तसेच परकीय अंमलाच्या जागी एकजूट झालेली देशी सत्ता पुनर्स्थापित करण्यासाठी पुढाकार घेण्याच्या दृष्टीनेही या परंपरेने लोकांना उद्युक्त केले. रानड्यांना सातत्याची परंपरा मोडायची नव्हती, तसेच त्यांना नवीन मार्गाचा आरंभ करायचा नव्हता; त्यांनी त्यांच्या सहदेशवासीयांना केवळ मध्ययुगीन संतांचे कार्य पुढे नेण्याचे आवाहन केले या कार्याने हितकारक परिणाम घडवल्याचे लोकांच्या निदर्शनास आणून दिले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे 'व्यक्तिगत अंतरात्मा आणि वैश्विक परमात्मा यांच्यातील थेट सख्याच्या बळकट पायावर भारतीय ईश्वरवाद उभा आहे. श्रद्धा, आशा व प्रेम यांच्या दुव्याने हे सख्य निर्माण होते', हे रानड्यांनी स्पष्ट केले. 'भारतीय ईश्वरवाद आपल्याला सर्वांविषयी सहिष्णू राहायला, आत्मत्याग करायला आणि प्रेमाचे कर्तव्य निभावायला शिकवतो... केवळ माणसा-माणसांपुरते नव्हे, तर सजीवांशी असे वागणे इथे अपेक्षित आहे.'
केशवचंद्र सेन यांनी केलेल्या उपदेशाला उत्तर देताना 1860 च्या दशकात 'इंदुप्रकाश'मध्ये (बहुधा रानड्यांनी) असे प्रतिपादन केले की, 'जॉन वायक्लिफचे (1320-1384) प्रयत्न फसले, आणि मार्टिन ल्यूथरच्या प्रयत्नांना यश मिळाले, यामागचे कारण काय? कारण, बदलासाठी चौदावे शतक सोळाव्या शतकाइतके तयार नव्हते. त्यातील तत्त्वे कितीही चांगली असली तरी लोक ती स्वीकारायला तयार नसतील, तर त्यांची अवस्था 'चकाकी येण्याआधीच्या मोत्यां' सारखी असते.' याचा दाखला न्यायमूर्ती रानड्यांनी 'ल्यूथरचा काळ व सध्याचा काळ यांची तुलना' या व्याख्यानामध्ये उद्धृत केला. हे व्याख्यान 20 मे 1892 रोजी पुण्यात प्रार्थना समाजामध्ये झाले आणि त्याचा सारांश 'सुधारक' नियतकालिकात प्रकाशित झाला. या लेखात रानड्यांनी सुधारणांचे प्रयत्न ठरायला हवेत तितके सफल का ठरत नाहीत आणि त्यातून भारतातील आपले सुधारक सहकारी हताश का होतात, याचे विश्लेषण केले. तीनशे चारशे वर्षांपूर्वी युरोपात झालेल्या सुधारणांच्या युगामध्ये प्रचलित असलेल्या परिस्थितीची तुलनात भारतात तत्कालीन पन्नास-साठ वर्षांमध्ये सुरू झालेल्या प्रयत्नांशी करण्यातून याचे उत्तर सापडेल, असे बहुधा त्यांना वाटले असावे. भरीव सामाजिक बदल घडवण्यामधील मध्ययुगीन संतांची भूमिका अधोरेखित करताना रानड्यांच्या मनात आणखी एक वेगळा उद्देश होता - सुधारणा काळात युरोपात झाले तसेच बदल भारतातही झाले असल्याचे रानडे ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देऊ पाहत होते.
न्यायमूर्ती रानडे धार्मिक अर्थाने अज्ञेयवादी वा आस्तिक असण्याच्या कल्पनेबाबत मात्र प्रतिकूल मत बाळगून होते, एवढे निश्चित. महाविद्यालयीन काळात त्यांच्यावर बिशप डरहमसारख्या अंतःस्फूर्तीवाद्यांचा (इट्यूशनिस्ट) व त्यांच्या 'अॅथलॉजीज अँड सर्मन्स'चा, त्याचप्रमाणे नैतिक तत्त्वज्ञानाचा भाग असणारे रिचर्ड व्हॉटली व विल्यम पाले यांचाही त्यांच्यावर प्रभाव होता. जॉन स्टुअर्ट मिल व हर्बर्ट स्पेन्सर यांच्या लेखनाचा समावेश 1870 च्या दशका अखेरीला झाला. या संदर्भात, स्वतः अज्ञेयवादी असणारे डेक्कन कॉलेजचे प्राध्यापक फ्रान्सिस गाय सेल्बी यांनी उपरोक्त अंतःस्फूर्तीवाद्यांचे दावे खोडून काढणारी एक पुस्तिका प्रकाशित केली. न्यायमूर्ती रानडे यांनी 'जर्नल ऑफ पूना सार्वजनिक सभा क्वार्टर्ली मध्ये (1882) लिहिलेल्या 'बटलर्स मेथड ऑफ एथिक्स' या लेखातून प्राध्यापक सेल्बींचे युक्तिवाद खोडून काढले. 'डेक्कन कॉलेजाच्या तरुण विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनातील जडणघडणीच्या काळात अशा प्रकारचे साशंकतावादी खाद्य पुरवले जाते आहे' याबद्दल रानड्यांनी खंत व्यक्त केली. ईश्वरामध्ये चांगुलपणाचा वा बळाचा अभाव असतो हा संभ्रम, त्याचप्रमाणे असत् व पाप यांच्या उगमाचे स्पष्टीकरण करताना मांडला जाणारा मानवी स्वातंत्र्य व दैवी चांगुलपणा यांच्यातील संघर्ष, या गोष्टी अनुत्तरित असल्याच्या सेल्बी यांच्या प्रतिपादनावरही रानड्यांनी प्रश्नचिन्ह उमटवले. 'अशा प्रकारची शिकवण राष्ट्रीय विचारावर पगडा राखू शकत नाही, याचा इशारा बौद्ध धर्माच्या पराभवामधून मिळतो... तरुणांच्या जडणघडणीच्या काळात तरी अज्ञेयवादी व निरीश्वरवादी शिकवण निश्चितपणे कालसुसंगत नाही, आणि अशा शिकवणीतून विपर्यस्त समजूत निपजू शकते आणि आपल्या सर्व नैतिक कळकळीचा ऱ्हास होऊ शकतो', असे रानड्यांचे म्हणणे होते. रानड्यांनी प्राध्यापक सेल्बींच्या 'ईश्वरहीन शिक्षणा'वर आक्षेप घेतल्यामुळे सदर प्राध्यापकांची इंदूरला बदली करण्यात आली, आणि कालांतराने त्यांना पुण्याला परत नेमणूक मिळाली तेव्हा त्यांनी नैतिक तत्त्वज्ञान हा विषय शिकवायचा नाही अशी अट घालण्यात आली.
मग रानड्यांना सामाजिक सुधारणा म्हणजे काय अपेक्षित होते? त्यांच्या मते, देशाच्या राष्ट्रजीवनातील प्रत्येक विभागामध्ये पुनरुत्थान व बदल आवश्यक होते. राजकीय, सामाजिक, धार्मिक, औद्योगिक सुधारणा, या आणि अशा इतर घडामोडी व्यापक घटनाक्रमाच्या अनेक आवश्यक बाजू दर्शवणाऱ्या होत्या. या प्रक्रिया मूलतः परस्परावलंबी असल्यामुळे त्यांना पुढे नेण्यासाठी परस्परांना जोडणाऱ्या मार्गांची गरज होती. आपल्याला पुनरुज्जीवनाची नव्हे तर सुधारणेची गरज आहे, असे त्यांना वाटत होते. त्यांनी 1892 साली अलाहाबादमध्ये झालेल्या सामाजिक परिषदेच्या उद्घाटनावेळी केलेल्या भाषणात ब्रिटिश राजवट व पाश्चात्त्य शिक्षण यांमुळे बदललेल्या परिस्थितीत प्रगतिशील रितीने नवीन सामाजिक साचा कसा उभारायचा याचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे केलेः
'आपण सर्वांनी दडपणातून स्वातंत्र्याकडे, भोळेपणातून श्रद्धेकडे, स्थानाकडून कराराकडे, अधिसत्तेकडून विवेकाकडे, असंघटित जीवनाकडून संघटित जीवनाकडे, असहिष्णुतेकडून सहिष्णुतेकडे, अंध प्रारब्धवादाकडून मानवी प्रतिष्ठेच्या जाणिवेकडे जाणारा बदल घडवायला हवा.'
व्यक्तीची अधिक मुक्तपणे होणारी वाढ, आणि राष्ट्राचा अधिक परिपूर्ण विकास व विस्तार, हे उद्दिष्ट असायला हवे. व्यक्तिगत पातळीवर नागरिकाची वाढ खुरटवणारी आणि राष्ट्रीय सद्सद्विवेकबुद्धीमधील जोम काढून घेणारी सामाजिक व्यवस्था विध्वंसक ठरते. अशा परिस्थितीत कोणत्याही राष्ट्राला कधीच जीवनाच्या उच्चतम पातळीपर्यंत जाता येणार नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले. सामाजिक सुधारणांबाबत न्यायमूर्ती रानड्यांची वृत्ती कायमच सामाजिक संबंध धार्मिक अनुज्ञांच्या बंधनांमधून मुक्त करण्याच्या दिशेने राहिली. 'पुनरुज्जीवन की सुधारणा' या विषयावर रानड्यांनी स्पष्ट केले कीः
'नवीन धार्मिक पंथ आपल्यावर खूप जास्त सनातनी असल्याचा आरोप करतात, तर टोकाचे सनातनी घटक आपल्या पद्धती खूप जास्त क्रांतिकारक असल्याचे सांगत आपला धिक्कार करतात. आपले प्रयत्न पुनरुज्जीवनाच्या दिशेने असायला हवेत, सुधारणेच्या नव्हे, असे सनातनी घटकांचे म्हणणे असते. या आत्यंतिक सनातनी छावणीमध्ये माझे अनेक मित्र आहेत, आणि सुधारणा नव्हे तर पुनरुज्जीवन हे आपले ब्रीदवाक्य असायला हवे, हा त्यांचा परवलीचा शब्द असतो. आपण पुरातन मार्गांकडे परत जायला हवे, आणि पुरातन अनुज्ञा व पुरातन मान्यता परत आणायला हव्यात, असे ते म्हणतात... आपल्या पुरातन प्रथा व रूढी पुनरुज्जीवित करायला हव्यात, असे सांगितले जाते तेव्हा नक्की कशाचे पुनरुज्जीवन करायचे याबद्दल लोक संभ्रमात असल्याचे दिसते... वृद्धीच्या आणि काही वेळा हासाच्या व भ्रष्टाचाराच्या संथ गतीद्वारे आपल्या चालीरिती वेळोवेळी बदलत आल्या आहेत, आणि आपण कोणत्याही विशिष्ट कालखंडामध्ये थांबलो, तर त्यातून अखंड रचनेचे सातत्य खंडित होते.'
न्यायमूर्ती रानडे सामाजिक बदलाच्या कोणत्या पद्धतीचे समर्थन करत होते? सुरुवातीच्या काळात सुधारक सनातन्यांसोबतच शास्त्री वर्गाचेही मन वळवण्याचा प्रयत्न करत होते. त्यासाठी सनातन्यांनी वापरलेल्याच धार्मिक संहितांचा वेगळ्या अर्थनिर्णयनासह वापर करत त्यातून सुधारकांच्या दाव्यांची वैधता सिद्ध केली जात होती. बाळशास्त्री जांभेकरांच्या काळापासून सामाजिक बदलाची ही पद्धत अनुसरली जात होती. याच प्रेरणेतून रानड्यांनी 'हिंदू विवाहाच्या वयाबाबत सूत्रे व स्मृतिसंहिता काय म्हणतात?' हा लेख लिहिला. सुधारकांनी सुचवल्याप्रमाणे हिंदू विवाहयोग्य वय वाढवणे समर्थनीय असल्याचे या लेखातून रानड्यांनी दाखवून दिले. पण 1870 साली झालेला विधवा पुनर्विवाहासंबंधीचा प्रसिद्ध वाद व्यूहरचनांना वेगळे वळण देणारा ठरला. पांडुरंग करमरकर (वय 25 वर्षे) आणि प्रभाकर परांजपे यांची (आठव्या वर्षी वैधव्य आलेली) मुलगी वेणू यांचे लग्न झाले, तेव्हा सनातन्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे मोठा जनक्षोभ उसळला. विष्णुशास्त्री परशुराम पंडित यांच्या नेतृत्वाखाली 1869 साली सुधारकांनी जाहीरपणे हा विवाह घडवला.
हे प्रकरण करवीर पीठाच्या शंकराचार्यांकडे गेले तेव्हा त्यांनी सनातनी पक्षाचे चार शास्त्री व सुधारक पक्षाला अनुकूल असणारे चार शास्त्री यांचे मंडळ नेमले, आणि प्राचीन धर्मशास्त्रांनुसार विधवा पुनर्विवाहाची वैधता सिद्ध होते का या विषयावर वादचर्चा घडवली. ही चर्चा आठ दिवस संस्कृतमध्ये चालली. रानड्यांच्या साहाय्याने विष्णुशास्त्री पंडितांनी सुधारकांची बाजू मांडली, तर विठोबा अण्णा दफ्तरदार विरोधी मताचे प्रतिनिधित्व करत होते. शेवटी, सुधारक पक्षाच्या एका मध्यस्थाने सनातनी पक्षाची बाजू घेतली, त्यामुळे सुधारकांचा या वादात पराभव झाला. यातून सुधारकांनी घेतलेला धडा अधिक महत्त्वाचा होता. धार्मिक अधिकाऱ्यांसमोर वाद-युक्तिवाद करण्याचा खटाटोप निष्फळ असल्याचे यातून उघड झाले. त्यामुळे रानड्यांनी व प्रार्थना समाजातील इतर लोकांनी कधीही धार्मिक अधिकारी मंडळींसमोर युक्तिवाद केले नाहीत. याला केवळ 1893 सालच्या पंच हौद मिशनमधील चहापानावरून निर्माण झालेल्या ग्रामाण्य प्रकरणाचा अपवाद होता. सर्वसाधारणपणे हे सुधारक वृत्तपत्रांमधून व नियतकालिकांमधून एतद्देशीय लोकांना आवाहन करून सामाजिक जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत. या प्रक्रियेत ते पूरक धर्मसंहितांचा आपल्या भूमिकेच्या समर्थनार्थ वापर करत आणि प्रतिकूल शास्त्रे बाजूला सारत. छापखान्याच्या आगमनानंतर कीर्तन व प्रवचन अशा धार्मिक नैतिक उपदेशांची जागा वाचनाने घेतली. कीर्तन- प्रवचन यांमध्ये प्रतिप्रश्न विचारण्याला काहीच वाव नव्हता. शिवाय, वाचनाच्या मार्गामुळे सरकार व लोक यांच्या धार्मिक मध्यस्थीविना थेट संवाद शक्य झाला. यातून हळूहळू राज्यसंस्था व पुरोहित-शास्त्र्यांचा वर्ग यांच्यात फारकत झाली. धार्मिक अवकाशातही एक बदल तत्काळ दिसून आला. देशी भाषांमध्ये मजकूर प्रकाशित करणे म्हणजे हिंदू धर्माच्या व समाजाच्या भवितव्यासंदर्भातील वादचर्चेचे लोकशाहीकरण करण्यासारखे होते, कारण अशा प्रकाशनामुळे पारंपरिकरीत्या परिघावर असणारे घटकही या वादचर्चेचा भाग होणार होते. छपाई तंत्रामुळे हळूहळू शास्त्रीवर्गाचे वर्चस्व खालावू लागले, ते अपरिणामकारक ठरले आणि केवळ पूरक साहाय्यापुरते त्यांचे अस्तित्व उरले. हिंदू धर्मशास्त्रे सामाजिक बदलांचा अव्हेर करत नसल्याचे दाखवून देत सुधारकांनी सामाजिक बाबींमधील सरकारी हस्तक्षेपाकरता ब्रिटिश अधिकाऱ्यांना आवाहन केले. याच संदर्भात न्यायमूर्ती रानड्यांनी 'विधवा विवाहासंदर्भातील वैदिक अनुज्ञा' हा लेख लिहिला.
न्या. रानडे यांचा पहिला पुतळा (1913, मुंबई) शिल्पकार गणपतराव म्हात्रे
न्यायमूर्ती रानडे कोणत्याही मूलगामी बदलासाठी अनुकूल नव्हते; त्यांना आधुनिकता व परंपरा यांनी परस्परांसह पुढे जावे असे वाटत होते. मन वळवणे, सद्सद्विवेकबुद्धीला आवाहन करणे, तसेच जनसामान्यांमध्ये जागृती निर्माण करणे, ही त्यांना पसंत असणारी बदलाची पद्धती होती. त्यांच्या मते, सरकारी कायदे करून सामाजिक बदल घडवणे हा शेवटचा उपाय होता, मग ते सरकार परदेशी असो वा देशी असो. विवाह संमतीवयासंदर्भातील वादावेळी त्यांनी 'सामाजिक प्रश्नांबाबतचे सरकारी कायदे' या लेखात सामाजिक कायद्यांची गरज सविस्तरपणे मांडली.
न्यायमूर्ती रानड्यांनी 1886 साली सामाजिक परिषदेचे उद्घाटन करताना चर्चेचा मंच स्थानिक संघटनांपासून राष्ट्रीय पातळीपर्यंत उंचावला आणि या वेगळ्या राहिलेल्या गटांनाही एका छत्राखाली आणले. तसे करत असताना त्यांना विविध सामाजिक व धार्मिक समस्यांसंदर्भात एकाच मंचावर चर्चा घडवून राष्ट्रीय ऐक्य साधायचे होते. ते म्हणाले, 'सदर परिषदेचे स्वतंत्रपणे एक अतिशय महत्त्वाचे कार्य आहे. स्थानिक संघटनांवर वर्चस्व न गाजवता त्यांच्या स्थानिक प्रयत्नांना बळकटी देणे हा यामागचा हेतू आहे. त्यासाठी अनेक समुदायांमध्ये, प्रांतांमध्ये व जातींमध्ये याबाबतीत काय केले जाते आहे या संदर्भातील माहितीवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे; त्यातून सहानुभूती व सहकार्य यांचा विस्तार होऊन परस्परांना मदत करण्याची प्रेरणा होईल.'
रानड्यांनी प्रार्थना समाजाच्या मंचांवरून केलेला उपदेश आणि त्यांचे सामाजिक सुधारणेचे अथक कार्य, यांमुळे सनातनी पक्षाचा त्यांच्यावर प्रचंड रोष होता. परंतु, रानड्यांनी कधीही स्वतःचा मानसिक तोल ढळू दिला नाही आणि त्यांच्यावर असभ्य भाषेत टीका झाली तरी त्यांनी कधीही असभ्य भाषेत प्रत्युत्तर दिले नाही. एकोणिसाव्या शतकाअखेरीला बहुतांश समाजसुधारकांना सामोरे जावे लागणारे पेचप्रसंग, उपहास, जिव्हाळ्याच्या निकटवर्तीयांसाठी कराव्या लागणाऱ्या तडजोडी, विचार व आचार यांमधील द्वैत, आणि सामाजिक तुटलेपणा, यांबद्दलचे मार्मिक विधान न्यायमूर्ती रानड्यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'मध्ये लिहिलेल्या पत्रात केले होते. मलबारी यांच्या 24 ऑगस्ट 1884 रोजी टाइम्स ऑफ इंडियाच्या अंकात 'नोट्स ऑन इन्फन्ट मॅरेज अँड एन्फोर्ड विडोहूड' असा लेख लिहिला, त्या अनुषंगाने रानड्यांनी सदर पत्र लिहिले. रानड्यांचे हे विधान सविस्तरपणे उद्धृत करणे आवश्यक आहेः
'गेली पंचवीस वर्षे आपण या सामाजिक समस्यांवर बराच विचारविनिमय केला आहे आणि त्यांच्या सर्व तात्त्विक व व्यावहारिक बाजूंवर चर्चा केली आहे... परंतु, आपण लक्ष देण्याची गरज असणाऱ्या गुंतागुंतीच्या सामाजिक समस्या सोडवण्यासाठी पुरेसे नैतिक सामर्थ्य केवळ धार्मिक पुनरुज्जीवनामधूनच प्राप्त होऊ शकते, अशी ठाम धारणा प्रत्येक प्रयत्नावेळी आपल्यामध्ये निर्माण होत आली आहे. केवळ स्व-उपयुक्तता किंवा फायद्या-तोट्याची आर्थिक समीकरणे यांमुळे एखादा समुदाय सामाजिक सुधारणा घडवेल, हे कधीच शक्य नाही. विशेषतः रूढी व धार्मिक अनुज्ञा यांनी इतका वेढलेला आपल्यासारखा समाज तर असे कधीही करणार नाही. आपल्या काही सामाजिक रूढी अनिष्ट आहेत असे आपल्या लोकांना वाटते, आणि अगदी कळकळीने वाटते; परंतु, ही अनिष्टता तात्कालिक स्वरूपाची आहे, त्यामुळे त्या कारणावरून दैवी आदेशाचा भंग करता येणार नाही असेही त्यांना वाटते. असा भंग केला तर त्याची मोठी शिक्षा होते. वास्तविक, सनातनी समाजामधील जगण्याचे बळ संपुष्टात आलेले असते, त्यामुळे तिथे कोणत्याही सुधारणेचा आरंभ होऊ शकत नाही, तसेच सुधारणांविषयी सहानुभूतीही निर्माण होऊ शकत नाही. केवळ धार्मिक पुनुरुज्जीवनातून, रूपाच्या पातळीवरील पुनरुज्जीवन नव्हे तर खरोखरच्या धर्माशी निगडित प्रामाणिक कळीकळीचे पुनरुज्जीवन झाले तर त्यातून इष्ट परिणाम घडून येईल... लोक आमच्या चुका शोधतात, आम्ही पुरेशा उमेदीने प्रयत्न करत नसल्याबद्दल आमची निंदा करतात, आमच्यात जाज्वल्यता व उत्साह यांचा अभाव असल्याची टीका करतात. परंतु, आमच्या घरांमध्ये आम्ही सतत आमच्या जिव्हाळ्याच्या माणसांशी झगडत असतो, आम्ही आमच्या दृष्टीने सर्वोत्तम कामगिरी करण्याकरता खटपट करत असतो, आणि आपल्या कामाचा ताण बेबनाव निर्माण करेल अशी भीती वाटली की अनेकदा आम्हाला थांबणे भाग पडते, हे ईश्वराला मात्र ठाऊक आहे... हा अतिशय नाजूक विषय आहे. क्रौर्याने पीडित असणारी व्यक्ती लांच्छनाचे व नजरेआड जाण्याचे स्वागत करते, तेव्हा त्यातून काही लक्षणीय निष्पन्न होईल अशी अपेक्षा ठेवता येत नाही. आम्ही संथपणे लोकांच्या सद्सद्विवेकबुद्धीला स्पर्श करतो आहोत, विरोधकांकडील बहिष्काराच्या दहशतीचे अस्त्र काढून घेतो आहोत आणि स्त्रियांना बंड करण्यास वा विरोध करण्यास शिकवतो आहोत. त्यांच्या उच्चशिक्षणाला चालना देण्याच्या आमच्या प्रयत्नांतून हे प्रभाव बळकट होतील. अशा नाजूक बाबींमध्ये पोलिसांनी वा दंडाधिकाऱ्याने हस्तक्षेप करणे आमच्या लोकांना आवडणार नाही, आणि सरकार अशा व्यवहारांमध्ये कधीही पुरेसे सावध राहू शकत नाही."
1894 साली न्यायमूर्ती के. टी. तेलंग यांच्या स्मृतिदिनानिमित्त केलेल्या भाषणात रानड्यांनी समाजसुधारक म्हणून तेलंग यांचे वर्तन दुटप्पीपणाचे राहिल्याच्या आरोपावर भाष्य केले. त्यांच्या म्हणण्याचे सार ना. ग. चंदावरकर यांच्या शब्दांत देता येईल. रानड्यांना उद्धृत करत चंदावरकर म्हणाले, 'दोन सभ्यतांच्या दरम्यान आपल्याला विभागलेले व परस्परविरोधी जीवन जगावे लागते, त्यातच श्री. तेलंग यांच्या चढ-उतार असणाऱ्या कारकिर्दीमधील नैतिक अक्ष सापडतो."
भारतीय राष्ट्रीय सामाजिक परिषदेच्या 1899 साली लखनीला भरलेल्या अधिवेशनात न्यायमूर्ती रानडे यांनी मुस्लीम राजवट या वादग्रस्त प्रश्नाची निष्पक्षपाती मांडणी केली. या राजवटीच्या काळात भारतीय स्वभाववृत्तीचा ऱ्हास झाला, त्यात भ्रष्टता आली; तसेच हा कालखंड मानखंडनेचा व दुःखाचा होता, असा दृष्टीकोन या कालखंडातील विचारांच्या व कल्पनांच्या संयोगाचे चिकित्सक मूल्यमापन करणारा नसतो, असे रानड्यांना वाटत होते. औरंगजेबाच्या काळात धर्मांधतेची वाढ झाल्यामुळे हे संयोगाचे कार्य अपूर्ण राहिले. परिणामी, दोन्ही समुदायांमध्ये स्वातंत्र्याविषयीच्या प्रेमाचा अभाव निर्माण झाला, तसेच नागरी जीवनासाठी आवश्यक गुणही त्यांच्यात विकसित झाले नाहीत. हे गुण पाश्चात्त्य युरोपीयनांच्या तुल्यबळ प्रमाणात निर्माण करण्याची ताकद जुन्या हिंदू वा जुन्या मुस्लीम सभ्यतेमध्ये नव्हती, असे ते नमूद करतात.
न्यायमूर्ती रानडे यांनी श्रद्धा व अंधश्रद्धा यांमध्ये भेद केला. 'विवेक कळकळीने मांडला जातो, तेव्हा त्याची श्रद्धा होते, तर अविवेकी धारणा ही अंधश्रद्धा असते', असे प्रतिपादन त्यांनी केले. गांधींनी त्यांचे गुरू गोपाळ कृष्ण गोखले यांच्या सांगण्यावरून 1896 साली रानड्यांची भेट घेतली, तेव्हा त्यांची 'सत्या'वरील ही कळकळीची श्रद्धाच गांधींना सर्वाधिक भावली.
आत्तापर्यंत केलेल्या विश्लेषणावरून न्यायमूर्ती यांचा प्रस्तुत खंड भविष्यातील पिढ्यांसाठीही उपदेशपर मूल्य राखून असल्याचे स्पष्ट होते. मराठी बुद्धिजीवी वर्गाने या खंडाची दखल घेतली, तर न्यायमूर्ती रानडे यांचे लेखन मराठीत भाषांतरित करण्यामागचा उद्देश सफल होईल.
- अरविंद गणाचारी, मुंबई
(लेखक मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे माजी विभागप्रमुख असून भारताच्या 19 व्या शतकातील इतिहासाचे तज्ञ आहेत.)
Tags: अरविंद गणाचारी न्यायमूर्ती रानडे महादेव गोविंद रानडे न्या. रानडे प्रार्थन समाज धार्मिक व सामाजिक सुधारणा मराठी अनुवाद न्या. रानडे ३ खंड मराठी Load More Tags
Add Comment