धर्माच्या ध्रुवीकरणातून उठलेली वेदनेची कळ

पुढील आठवड्यात दर्या प्रकाशनाकडून येत असलेल्या, सफरअली इसफ यांच्या ‘अल्लाह ईश्वर’ या कवितासंग्रहाची प्रस्तावना.

कवीने वेदना भोगली, अन्याय अत्याचाराला तो सामोरा गेला, दु:ख, दारिद्रयाचे त्याने चटके सोसले, पदोपदी देशभक्ती सिद्ध करण्याच्या यातना सहन केल्या तरीही त्याचा चांगुलपणावरचा त्यांचा विश्वास अबाधित आहे. घृणा, तिरस्कार, उपेक्षा, राग, द्वेषच त्याच्या वाट्याला आली असतानादेखील त्याने प्रेमाची कास सोडली नाही. निराश झाला नाही. उलट पुरेपूर आशावादाने लबालब कवी म्हणतो,

‘पण कधीतरी परिवर्तनासाठी एकत्र येऊच आम्ही
कधी तरी धर्मांधतेच्या भिंती पाडूच आम्ही.’

कविता लिहिणे ही जबाबदारीची गोष्ट असते. कविता लिहिण्यासाठी कवीकडे समकाळाचे भान लागते. उघड्या डोळ्यांनी जग बघण्याची इच्छा असेल तरच हे भान येत जाते. अर्थात कोणत्याही भाषेतील अपवादात्मक कवीकडे हे भान असते हे आजवर सिद्ध झाले आहे. पण ज्या कवींची दृष्टी अशी विकसित झाली आहे, त्यांनी अनिष्ट राजकीय सत्ताधारी व्यवस्थेवर आणि समाजाच्या ढोंगीपणावर आसूडच ओढलेले आहेत. शोषित समाजाचं चित्र मांडताना कवी व्यवस्थेविरुद्धचा आवाज झालेला पाहायला मिळतो. सोशल मीडियामुळे मराठी कविता उथळ होत गेली असा आरोप केला जात असतानाच्या या काळात आपला आतला आवाज जागृत ठेवत अतिशय गंभीरपणे कविता लिहिणाऱ्यांमध्ये आज आपल्याला कोकणातील सफरअली इसफ या अपंग कवीचं नाव घ्यावं लागतं. ही एकूणच मराठी कवितेबाबतची आजची आश्वासक घटना आहे; असं आपण जबाबदारीने म्हणून शकतो! कवी सफरअली आजच्या, आताच्या काळाविषयी बोलत आहेत. ज्या समाजाचा आवाज दाबला जात आहे, त्या समाजाचा हा कवी नायक झालेला आहे. आज विशिष्ट समाजाचं अस्तित्वच संपवून टाकण्याची भाषा बोलली जात आहे आणि तशी कृतीही केली जात आहे. अशा काळात ‘अल्लाह ईश्वर’मधील कविता नेमकं चित्र मांडताना दिसते. आपल्यातलं माणूसपण शाबूत ठेवण्याचं आवाहन ही कविता करते, हे या कवितेचं महत्त्वाचं मोल आहे. अखंड मानवतेचं गीत गाणारी ही कविता वाचकाला आतून ढवळून काढते व त्याच्या डोळ्यात अंजन घालते, हेही या कवितेचं सर्वात मोठं यश आहे.

‘अल्लाह ईश्वर’ या कवितासंग्रहातील कवी सफरअली इसफ यांची एकेक कविता प्रस्तावना लिहिण्याच्या निमित्ताने वाचायला लागलो, तेव्हा अधिकाधिक गंभीर व्हायला लागलो. त्या कवितेतील वेदनेने मीच थरथरायला लागलो.

आज मुस्लिमांसह अल्पसंख्याक गटाला आपली देशभक्ती पदोपदी सिद्ध करावी लागते आहे. मात्र ही वेदना आपल्याला - म्हणजे इतर बहुसंख्येने असलेल्या धर्मीयांना - कळण्यासाठी कवी सफरअली यांची ‘अल्लाह ईश्वर’ या संग्रहातील कविता वाचावी लागेल. मुस्लीम अल्पसंख्याक गटाची या देशातील आजची स्थिती बेचैन करण्यासारखीच आहे. पण ही वेदना आपल्याला कळली असं समजणाऱ्यांना ती खऱ्या अर्थाने कळलेलीच नाही, हेही या संग्रहामधील कवितांवरून माझ्या लक्षात आलं. ती वेदना माझ्या हृदयापर्यंत तर अजिबात पोहोचली नव्हती, ‘अल्लाह ईश्वर’ या कवितासंग्रहातील सफरअली इसफ या कवीमुळे ती कळली, थेट हृदयापर्यंत पोहोचली. याबद्दल कवीचे प्रथम आभार मानतो. हा कवितासंग्रह माझ्यापर्यंत पोहोचविण्याला कारणीभूत ठरलेल्या कवी अजय कांडर यांचेही आभार.

‘मी ही माणूस आहे’ या कवितेत कवी सफरअली इसफ म्हणतो,

‘शेवटी मीही तुमचाच माणूस आहे
मेल्यावर सुखाने दफन होण्याआधी
धर्माच्या पलीकडे जाऊन
माणसांच्या गर्दीत सच्च्या माणसांना शोधणारा.’

वरील कवितेच्या ओळी वाचून मला तुकडोजी महाराजांच्या भजनाच्या ‘माणूस द्या मज माणूस द्या | ही भीक मागता प्रभू दिसला.’ या ओळी आठवल्या आणि त्यातील शेवटच्या ओळीत, ‘प्रभू दिसला’ ऐवजी ‘कवी दिसला’ एवढाच बदल मला करावासा वाटला.

बहुतांश कवितांमधील कवीची हृदयद्रावक आर्तता वाचकांचं काळीज चिरत जाते तर कवीची रक्तबंबाळ वेदनाही आपल्या आत शिरत जाते आणि कालांतराने ती झिरपत जाते. ‘रस्ताच गेलाय भिजून रक्ताने’ या कवितेत कवी इशारा देत म्हणतो,

‘म्हणून तुम्हाला राजरोस सांगतोय की
राजमार्गावरून जाणार आहे
इथली दंडेलशाही
लोकशाही उध्वस्त करायला!’

गेल्या दहा वर्षांपासून माझ्यासारखा माणूस जे अनुभवतो आहे त्याची अनुभूती कवी चार ओळींत देतो; तीही बेधडकपणे, तेही भयाच्या वातावरणात, तेही मुस्लिमांच्या बाबतीत मॉब लिचिंगसारख्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असतानाच्या काळात... मग कधीतरी पुस्तकात वाचलेलं असतं, ‘कवी हा निर्भयच असतो’ याची प्रचिती येते आणि मग भीमराव पांचाळेंनी गायलेली गझल आठवते, ‘पुस्तकात वाचलेली माणसे गेली कुठे?’ तेव्हा “युरेका, युरेका” म्हणत भीमराव पांचाळेंना सांगावंसं वाटतं, “मला तो माणूस सापडला. ‘अल्लाह ईश्वर’ या कवितासंग्रहात कवीच्या रुपात असलेल्या त्या कवीचं नाव सफरअली इसफ हे आहे.”

कवी सफरअली इसफ यांच्या ‘अल्लाह ईश्वर’ या कवितासंग्रहात एकूण 51 कविता आहेत. त्या कवितांच्या बहुतांश शीर्षकांवरूनही कवितेची दिशा, रोख आणि सूर काय असावा याची कल्पना येते. उदाहरणार्थ, ‘देशद्रोहाचा आळ सोसत असताना’, ‘देशभक्तीचे जोखड खांद्यावर घेत वंशावळ शोधतोय’, ‘दंगलीचे दिवस’, ‘ही शांतता वादळापूर्वीचीच’, ‘अगतिक क्षितिजावर’, ‘देशभक्तीचे पुरावे देताना’, ‘न्यायाच्या प्रतिक्षेत’, ‘असहिष्णू भूमीत’, ‘झुंडशाहीत नेस्तनाबूत होत जाताना’, ‘निघालाय आदेश आम्हाला हाकलायचा’, ‘माणसे मरतात बुलडोझरखाली’, ‘बेभरवशाच्या जिंदगीत’. या शीर्षकांवरूनच त्या शीर्षकांखाली काय असेल याची कल्पना येते. आज मुस्लीम समुदाय प्रचंड दहशतीखाली/ दडपणाखाली जगतो आहे. त्याला दंगलीसाठी उचकावण्याचे प्रयत्न रेशीमबाग विद्यापीठात शिकलेले विद्यार्थी करताहेत. त्यातील काही विद्यार्थी आज सत्तेतही आहेत. म्हणजे, ‘आधीच मर्कट, त्यात मद्य प्याले’ अशी अवस्था. हिंदू-मुस्लीम दंगली घडवून आणल्या, की ध्रुवीकरण होतं आणि त्या ध्रुवीकरणातून सत्ताप्राप्ती सहजसुलभ होते. हा अनुभव बाबरी मशीद पाडून ह्यांनी घेतला आहे. दंगली, त्यातून रक्त-मांसाचा चिखल आणि या रक्त-मांसाच्या चिखलात येणारं कमळाचं उत्पादन, आणि त्याची अंतिम परिणती सत्तेत याला सत्ताधारी चटावलेले आहेत. त्यामुळे ‘अल्पसंख्याकांचा’ बळी देऊन सत्ताप्राप्ती हे गुजरातमध्ये गवसलेलं सूत्र आज देशभर लावण्याचा प्रयत्न गुजरातचेच ‘हीरो’ करताहेत. कारण केंद्राचे ही तख्त सध्या हेच हीरो सांभाळताहेत. अशा अवस्थेतील मुस्लिमांच्या मानसिक अवस्थेचं चित्रण प्रभावीपणे ‘अल्लाह ईश्वर’ या कवितासंग्रहात कवी सफरअली इसफ या कवीने केलं आहे.

कवितासंग्रहाचं नाव ‘अल्लाह ईश्वर’ याच नावाची पहिली कविता. कवी म्हणतो,

‘तू आहेस की नाही
हे माहीत नाही
तरी तुझे अस्तित्व मानून
जे करताहेत दुजाभाव
तुझ्या नावाने
त्यांच्यासाठी आधी मी
दुवा मागू पाहतोय सद्भावनेची! 

सफरअली इसफ

पहिल्या कवितेच्या या पहिल्याच ओळी तुम्हाला कडकडून मिठीत घेतात. आणि कवी संवाद सुरू करतो ज्ञानेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे, ‘या हृदयीचे त्या हृदयी’ याच कवितेत कवी पुढे अगतिकपणे मिठी घट्ट करीत आपल्यालाच विचारतो,

‘आता तूच सांग
यांच्यासाठी मी
कोणती देऊ अजान
आणि कोणती प्रार्थना?’

तेव्हा आपणही त्याला काय सांगणार? आपणही त्रस्त आहोत ना, सध्या याच प्रश्नाने! मग आपणही अगतिकपणे निरुत्तर होत गहिवरतो आणि कवितेच्या शेवटी कवी ज्ञानदेवाप्रमाणे ‘पसायदान’ मागतो. म्हणतो,

‘अशांच्याही मुखात सदैव एकत्र नांदू दे
अल्लाह आणि ईश्वराचे नाव
धर्माच्या सीमेचे कुंपण ओलांडून
सर्व मंगल कल्याणासाठी!’

आणि आपसूकच तुम्ही हिंदू असाल तर तुमच्या तोंडून निघेल ‘तथास्तु’ वा मुस्लीम असाल तर ‘आमेन’. शब्दाने काय फरक पडतो? आशय महत्त्वाचा. मग धर्माने तरी काय फरक पडतो?

खरं तर ‘हिंदू’ आणि ‘हिंदुत्ववादी’ एक असत नाही, हिंदू हा शोषित आणि हिंदुत्ववादी हा शोषक असा हा संबंध आहे. गाय आणि गायीच्या अंगावरील गोचीड या दोघांच्या शरीरातील रक्त सारखे आहे म्हणून गोचीड गाय होऊ शकत नाही, तद्वतच हिंदुत्ववाद्यांमध्ये हिंदूंचं रक्त आहे म्हणून हिंदुत्ववादी हिंदू होऊ शकत नाही हे समजून घेणं गरजेचं आहे.

कवीला अनेक प्रश्न पडतात. या प्रश्नांनीच तो बेजार आहे. तो एके ठिकाणी विचारतो,

‘कशाला घडविल्या दंगली?
जाती आणि धर्माचे
ध्रुवीकरण करून
माणूस संपून जाण्याच्या
आनंदासाठी?’

या प्रश्नाने कवीच नाही तर आपणही बेजार, हैराण आणि तितकंच अस्वस्थ होतो. कवी याच कवितेत म्हणतो,

‘भाकरीसाठी संसदेवर
गेलो नाही
नोकरीसाठी रस्त्यावरती
उतरलो नाही
मुलींना गर्भात मारणाऱ्यांसाठी नाही
दुष्काळाने होरपळणाऱ्यांसाठी नाही
दवापाण्यासाठी तडफडणाऱ्यांसाठी
तर मुळीच नाही
जीवसृष्टीचा सारा पसारा’

प्रजनन, पोषण आणि संरक्षण या तीन मुख्य प्रेरणा भोवती फिरत असतो. आपली वंशवृद्धी व्हावी, तिचं व्यवस्थित पोषण व्हावं, संरक्षण व्हावं यासाठीच सृष्टीचा खटाटोप सुरू असतो. यातही पोषण आणि संरक्षणाचा मुद्दा परिस्थितीनुसार वरखाली होत असतो. परिस्थिती सामान्य असेल तर शोषणाचा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. पण परिस्थिती सर्वसामान्य नसेल, वातावरण असुरक्षित असेल, भयग्रस्त असेल तर शोषणाचा मुद्दा गौण ठरुन संरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. समजा, मी तीन-चार दिवसांपासून उपाशी आहे. पोटात अन्नाचा कण नाही. चौथ्या दिवशी माझ्या समोर अन्नाचं ताट आहे आणि पोटात भूक आहे. मी ताटावर बसतो, तेवढ्यात शेजारी आग आग म्हणून गलका ऐकू येतो. मी भरल्या ताटावरून तहान-भूक विसरून उठतो. येथे भुकेपेक्षा भयाचा मुद्दा महत्त्वाचा बनतो. म्हणजेच पोषणापेक्षा संरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. 


हेही वाचा : मुस्लीम मराठी साहित्याच्या दालनातील नव्या अभिव्यक्तीची कविता - हरिश नवले


सध्या पोषणाचे मुद्दे साईडट्रॅक करण्यासाठी भयाचे मुद्दे ‘हिंदुत्ववादी’ सरकार उपस्थित करताना दिसत आहे. मुसलमानांची भीती, ‘हिंदू खतरे में है’चा उद्घोष, मुस्लिमांवर आरोपित केल्या जाणाऱ्या लव्ह जिहादची भिती, हिंदूंची लोकसंख्या कमी होत आहे त्यांची भिती. शेजारच्या मुस्लीम राष्ट्राची भीती. घरात मुस्लीम घुसून आपल्या मुली-बाळींवर अत्याचार करतील त्यांची भीती. भयाची व त्याहीपेक्षा, भीतीच्या भ्रमाची निर्मिती केली की लोक भूकच विसरतात. म्हणून मग कवी म्हणतो त्याप्रमाणे कोणी भाकरीसाठी, नोकरीसाठी, भुकेसाठी संसदेवर जात नाही. कारण भुकेपेक्षाही भयाच्या भ्रमामुळे संरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा ठरतो आणि तहानभूक आपसूकच विस्मरणात जाते. कवी कविताभर आपल्या कैफियतचा पसारा मांडतोय. तो म्हणतोय,

‘मोर्चातील लोक घोषणा देतात
“जिंदाबाद” किंवा “मुर्दाबाद”च्या
सरतेशेवटी हिंस्त्र होऊन “चालते व्हा” म्हणतात.’

हा आदेश असतो धर्मांध झुंडीचा. या झुंडींना का? कशासाठी? कोठे? या प्रश्नांची उत्तरे देण्याची गरज नाही. देशभक्तीचा चेहरा धारण करून देशभर या झुंडी थैमान घालत आहेत. दुर्दैवाने यांचा ‘राष्ट्रवाद’ थोडा खरडला, की ‘हिंदुत्ववाद’ दिसतो आणि हिंदुत्ववाद खरडला, की त्या खाली ‘ब्राह्मणी हितसंबंध’ स्पष्टपणे दिसू लागतात. मुस्लिमांचं भय उभं करून यांनी आपला स्वार्थ साधण्याचाच निरंतर धंदा केला आहे. आपल्या जन्मजात वर्णश्रेष्ठत्वाच्या नावाखाली समस्त हिंदूंनाच छळलं. त्यांचं शोषण केलं. याकडे हिंदुंचं लक्ष जाऊ नये म्हणून आपल्या पापाचं खापर ते मुस्लिमांच्या डोक्यावर फोडत आलेले आहेत. मुस्लिमांची भीती दाखवत यांनी कायम हिंदूंनाच छळलं आहे. ज्ञानेश्वरांच्या आई-वडिलांना आत्महत्या करायला लावणारे व ज्ञानेश्वर भावंडांना त्रास देणारे मुस्लीम नव्हते, ते आपलेच होते. तुकारामांचा छळ करणारे व त्यांच्या गाथा इंद्रायणीमध्ये बुडविणारा औरंगजेब नव्हता ते हिंदू वर्णश्रेष्ठीच होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारे तेही वर्णश्रेष्ठीच होते. छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करणारे पण औरंगजेबासाठी दुवा मागणारे, शिवाजी हरावा व औरंगजेब जिंकावा यासाठी चंडीकोट यज्ञ करणारे हेच ‘हिंदू वर्णश्रेष्ठी’च नव्हते का? सर्व हिंदूंवर जिझिया कर औरंगजेबाने लावला होता. पण तो या तथाकथित वर्णश्रेष्ठींवर नव्हता. कारण ते औरंगजेबाचे पाय चाटण्यात धन्यता मानत होते, हा इतिहास आहे. त्याचं विस्मरण व्हावं यासाठी त्यांनी हिंदूंच्या मनात मुस्लीमविरोधी भयगंड निर्माण करण्याचं काम मोठ्या प्रमाणावर केलं आहे.

कवीने वेदना भोगली, अन्याय अत्याचाराला तो सामोरा गेला, दु:ख, दारिद्रयाचे त्याने चटके सोसले, पदोपदी देशभक्ती सिद्ध करण्याच्या यातना सहन केल्या तरीही त्याचा चांगुलपणावरचा त्यांचा विश्वास अबाधित आहे. घृणा, तिरस्कार, उपेक्षा, राग, द्वेषच त्याच्या वाट्याला आली असतानादेखील त्याने प्रेमाची कास सोडली नाही. निराश झाला नाही. उलट पुरेपूर आशावादाने लबालब कवी म्हणतो,

‘पण कधीतरी परिवर्तनासाठी एकत्र येऊच आम्ही
कधी तरी धर्मांधतेच्या भिंती पाडूच आम्ही.’

हा दुर्दम्य आशावाद हे या कवितासंग्रहाचे व खुद्द कवीचे बलस्थान आहे. त्याला माझा सलाम. अवतीभवतीच्या द्वेषपूर्ण वातावरणात ‘अल्लाह ईश्वर’ या कवितासंग्रहाच्या सफरअली इसफ या कवीच्या प्रेमाची झुळूक मला अनुभवता आली.

वाचकांनासुध्दा ती अनुभवता येईल याची मला खात्री आहे. ती त्यांनी निश्चित अनुभवावी.

प्रेम व शुभेच्छा!

- चंद्रकांत वानखेडे, नागपूर


हेही वाचा : जमिला जावद (कथासंग्रह) – 1952 ते 1966 या काळात प्रतिष्ठित नियतकालिकांमधून प्रसिद्ध झालेल्या, मुस्लीम समाजजीवनाचे अंतरंग दाखवणाऱ्या 11 कथा.

 

Tags: marathi poetry literature allah ishwar hindu muslim मराठी साहित्य कविता Load More Tags

Add Comment