काँग्रेसचे पुनरुज्जीवन करण्यासाठी नम्र विनंती

कॉंग्रेस पक्षाच्या 23 नेत्यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना लिहिलेले पत्र

फोटो सौजन्य: Bloomberg News

24 ऑगस्ट 2020 रोजी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली आणि तिच्यात सोनिया गांधी यांची पुन्हा एकदा हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.त्या बैठकीपूर्वी काँग्रेसच्या 23 नेत्यांनी अध्यक्ष सोनिया गांधी यांना पाठवलेले पत्र बाहेर आले. त्या पत्राबद्दल मनमोहन सिंग, राहुल गांधी व अन्य काँगेस नेत्यांनी त्या बैठकीत नाराजी व्यक्त केली, त्यामुळे छोटेसे वादळ उठले व लगेच शमले. लवकरच काँगेसचे अधिवेशन भरवले जाईल आणि नव्या अध्यक्षाची निवड केली जाईल, असे त्या बैठकीनंतर सोनियांनी जाहीर केले आहे. तसे खरोखरच घडून आले तर, काँग्रेसची पुढील काळात दमदार पावले पडतीलही कदाचित. त्यासाठी या पत्रातील विवेचन व विश्लेषण विशेष उपयुक्त ठरणार आहे. या पत्रातील काही मुद्दे बरेच चर्चिले गेले आहेत, इंग्रजी मध्ये काही ठिकाणी हे संपूर्ण पत्र प्रसिद्ध झालेले आहे. मात्र या संपूर्ण पत्राचा मराठी अनुवाद कुठेही आलेला नाही, म्हणून इथे देत आहोत..

आदरणीय काँग्रेस अध्यक्ष,

काँग्रेस पक्षात दीर्घकाळ कार्यरत असणारे आणि खाली स्वाक्षरी करणारे आम्ही सर्व जण... देशातील सार्वत्रिक राजकीय वातावरणाबद्दल आणि पक्षाच्या संघटनात्मक घडामोडींबद्दल आम्हाला वाटणारी चिंता पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त करू इच्छितो.

स्वतंत्र भारताच्या आजवरील इतिहासातील सर्वाधिक गंभीर अशी राजकीय, सामाजिक आणि आर्थिक आव्हाने आज देशासमोर आहेत. आपल्या संविधानातील मूलभूत मूल्यांवर घाला घातला जात आहे. भाजप आणि त्याच्या सहयोगी पक्षांच्या विषयपत्रिकेवरील जातीयवादी आणि विभाजक मुद्दे राजकीय पटलावर प्रभुत्व गाजवत आहेत. महात्मा गांधींकडून आणि आपल्या देशाच्या संविधानकर्त्यांकडून सर्वसमावेशकतेचा जो वारसा देशाला मिळाला आहे त्याच्याशी विसंगत अशी भाजपची विषयपत्रिका आहे.

भयाच्या आणि असुरक्षिततेच्या वातावरणाने देशाला ग्रासले आहे. या आव्हानांचा सामना करण्याची जबाबदारी काँग्रेसवर आहे. काँगेसने नागरिकांना हे पटवून द्यायला हवे की, ते त्यांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करतील. प्रागतिक आणि लोकशाहीवादी शक्तींच्या एकत्रीकरणातून खंबीरता आणि नवचैतन्य प्राप्त झालेला काँग्रेस पक्षच हे कार्य करू शकतो.

देश गंभीर सामाजिक आणि आर्थिक संकटांचा सामना करत आहे. तरुणांमधील वाढती बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या वाढत्या समस्या यांनी आणि आर्थिक मंदीने आपल्या बहुसंख्य नागरिकांना दारिद्रयरेषेकडे ढकलले आहे. कोरोना महामारीमुळे अर्थव्यवस्था ठप्प झाल्याने अनेक क्षेत्रांतील लाखो कामगारांना त्यांच्या नोकऱ्या आणि ओघाने त्यांच्या वेतनाचे आणि उत्पन्नाचे स्रोत गमवावे लागले आहेत आणि त्यामुळे देशापुढील आव्हाने अधिकच तीव्र झाली आहेत. गरीब आणि असुरक्षित नागरिकांच्या, प्रामुख्याने स्थलांतरित मजुरांच्या समस्यांचे निराकरण त्वरित करणे गरजेचे आहे.

काँग्रेस पक्षाने या सर्व आव्हानांबद्दल मनन करून त्यांना प्रत्युत्तर देताना आपल्या दृष्टीकोनाची रूपरेषा विशद करणारा सर्वसमावेशक तोडगा प्रस्तुत करायला हवा.

भारताच्या शेजारील राष्ट्रांच्या सीमांवरील परिस्थिती, चीनसोबतचा लष्करी पेच हे सारे मुद्दे अतीव चिंताजनक आहेत. भारताच्या परराष्ट्रधोरणात झालेला बदल, ऐतिहासिकदृष्ट्या ज्या शेजारी राष्ट्रांशी आपले सद्भावनापूर्ण आणि सौहार्दपूर्ण संबंध होते त्या संबंधांत निर्माण झालेला तणाव या सर्व बाबींवर सखोल चिंतन करायला हवे आणि त्यांत सुधारणा करायला हवी.

ज्याने देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व केले, विकासाची आणि आधुनिक राष्ट्राच्या उभारणीची मुहूर्तमेढ रोवली... त्या देशातील सर्वाधिक अनुभवी पक्षाने - काँग्रेसने परराष्ट्रधोरण, संरक्षण आणि राष्ट्रीय सुरक्षितता या मुद्द्यांवर ठोस भूमिका घ्यायला हवी.

2014च्या आणि 2019च्या सार्वत्रिक आणि राज्य पातळीवरील निवडणुकांच्या निकालांतून प्रतिबिंबित झालेल्या काँग्रेस पक्षाच्या सातत्यपूर्ण ऱ्हासाचे आपण सर्व जण साक्षीदार आहोत. या पराभवाची अनेक कारणे त्वरित ओळखायला हवीत. अन्यथा प्रादेशिक आणि राष्ट्रीय स्तरावर काँग्रेस पक्षाची उपेक्षा होईल... किंबहुना प्रादेशिक स्तरावर ती उपेक्षा उघडपणे दिसत आहे.

पक्षाचा घसरत चाललेला जनाधार आणि  प्रामुख्याने देशातील तरुणाईचा गमावलेला विश्वास हे मुद्दे गंभीर चिंताजनक आहेत. मागील दोन सार्वत्रिक निवडणुकांमध्ये देशात 18.7 कोटी नवीन (2014मध्ये 10.15 कोटी आणि 2019मध्ये 8.55 कोटी) मतदारांनी मतदानाचा हक्क पहिल्यांदाच बजावला. या युवा मतदारांनी पूर्णतः मोदींच्या आणि भाजपच्या बाजूने मतदान केले. 2009मध्ये भाजपचा एकूण मतांमधील हिस्सा 7.84 कोटी इतका होता. तो 2014मध्ये 17.6 कोटी आणि 2019मध्ये 22.9 कोटी इतक्या तीव्रतेने वाढला. याउलट 2009च्या तुलनेत 2014मध्ये काँग्रेसच्या 1.23 कोटी मतदात्यांची घट झाली आणि 2019मध्ये 2009चा आकडा किरकोळ फरकाने काँग्रेसने पार केला.

2019च्या निवडणुकीच्या निकालास 14 महिने उलटून गेल्यानंतरही काँग्रेस पक्षाने आपल्या सातत्यपूर्ण ऱ्हासाच्या कारणांच्या विश्लेषणासाठी प्रामाणिक आत्मपरीक्षण केले नाही.

हा ऱ्हास थांबवण्यासाठी आम्ही स्पष्टपणे आणि प्रामाणिकपणे आमची भूमिका मांडणार आहोत... जेणेकरून काँग्रेसचे जे भवितव्य आज पणास लागले आहे त्यास अधिक धोका निर्माण होणार नाही.

नेतृत्वाबाबतच्या अनिश्चिततेमुळे आणि अस्थिरतेमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनोधैर्याचे खच्चीकरण झाले आहे... ज्यामुळे पक्ष अधिकच कमकुवत झाला आहे. पक्षाच्या समर्थन फळीचा ऱ्हास झाला आहे आणि अनेक राज्यांतील नेते आणि कार्यकर्ते पक्ष सोडून जात आहेत.

भाजप सरकारच्या विद्वेषी आणि विभाजक विषयपत्रिकेबद्दल जनमतास कसे सचेतन करावे याबद्दल काँग्रेस कार्यकारिणी पक्षास योग्य मार्गदर्शन करत नाही. सध्या पक्षाच्या बैठका मर्यादित स्वरूपाच्याच असतात ज्यांत राष्ट्रीय विषयपत्रिकेवर चर्चा करण्यात आणि धोरण बनवण्यात पुढाकार घेण्यापेक्षा फक्त ताज्या घडामोडींवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या जातात.

गेल्या काही वर्षांत काँग्रेस पक्षाच्या बैठका या केवळ अध्यक्षांचे औपचारिक भाषण आणि दिवंगत नेत्यांना श्रद्धांजली इतक्याच गोष्टींपुरत्या मर्यादित झाल्या आहेत. महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्याची जुनी पद्धत आता बंद झाली आहे. विरोधी पक्ष म्हणून कार्यरत असताना ही चर्चासत्रे अधिकच आवश्यक वाटतात.

गेल्या काही वर्षांत हेही दिसून येत आहे की, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्ष यांच्या नियुक्त्यांमध्ये अनावश्यक विलंब होत आहे. राज्यपातळीवर जे नेते जनमानसात स्वीकारार्ह आणि आदरणीय आहेत त्यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून वेळेत नियुक्ती होत नाही आणि जेव्हा नियुक्ती होते तेव्हा त्यांना संस्थात्मक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले जात नाही.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष हे स्थानिक लोकसंख्येचे सर्वसमावेशक प्रतिनिधित्व करत नाहीत. प्रदेशाध्यक्षांना कार्यरत राहण्यासाठी कुठलीही स्वायत्तता दिली जात नाही. आपल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारण्याची इच्छाशक्तीही नेतृत्वश्रेष्ठींकडून दाखवली जात नाही.

युवा आणि विद्यार्थी नेतृत्वास वाव देण्याची आणि तरुण रक्तास प्रोत्साहन देण्याची काँग्रेस पक्षाची ऐतिहासिक परंपरा आहे. नॅशनल स्टुडंट्‌स युनिअन ऑफ इंडियामधून (एनएसयूआयमधून) आणि युवक काँग्रेसमधून अनेक युवा नेतृत्वांचा उदय झाला होता. या नेत्यांजवळ वैचारिक सुस्पष्टता आणि कर्तव्याप्रति बांधिलकी होती. ज्येष्ठांचा अनुभव आणि तरुणांची ऊर्जा यांच्या सुरेख संगमामुळे काँग्रेस पक्ष बळकट झाला होता.

पूर्वी नेत्यांची निवड गुणवत्तेवर आधारित होत होती आणि ती एकमताने व्हायची. गेल्या काही वर्षांत ती पद्धत बंद झाली आहे. एनएसयूआय आणि युवक काँग्रेस यांच्यातील युवा कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये निवडणुका सुरू केल्यानंतर भेदभावास आणि संघर्षास सुरुवात झाली आहे. पैसा, संसाधने अथवा प्रबळ आश्रयदाते यांचे पाठबळ ज्यांना आहे अशा व्यक्तींनी या संघटना काबीज केल्या आहेत. सामान्य पार्श्वभूमीच्या, पक्षाशी वैचारिक बांधिलकी ठेवून कार्यरत असणाऱ्या युवा नेतृत्वाची प्रगती त्यामुळे खुंटली आहे आणि परिणामतः मुख्य संस्थाही कमकुवत झाली आहे. 

पूर्वीप्रमाणे आता काँग्रेस पक्ष राष्ट्रीय पातळीवर आणि राज्यपातळीवर नवीन नेतृत्वाला प्रोत्साहन देत नाही. अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या आणि प्रदेश काँग्रेस समितीच्या बैठकांमध्ये, विविधतेने समृद्ध असलेल्या आपल्या देशाच्या सामाजिक समस्यांबद्दल धोरणे आणि कार्यक्रम आखण्यासाठी नियमित चर्चासत्रे होत नाहीत.
 
पक्षाला नवचैतन्य प्राप्त व्हावे आणि लाखो कार्यकर्त्यांसमोर विधायक उद्दिष्ट असावे यासाठी आम्ही पुढील मुद्दे सुचवत आहोत...

•    सर्वांच्या दृष्टिक्षेपात असणारे, अखिल भारतीय आणि प्रदेश काँग्रेस समितीच्या मुख्यालयात उपलब्ध असणारे असे पूर्ण वेळ, कार्यक्षम, प्रभावी नेतृत्व पक्षास असावे. 

•    प्रदेश काँग्रेस समिती आणि जिल्हास्तरीय समित्या या सर्वसमावेशक आणि प्रातिनिधिक असाव्यात. प्रदेश काँग्रेस समित्यांना संस्थात्मक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी कार्यात्मक स्वायत्तता द्यावी.

•    भारताचा भौगोलिक विस्तार आणि वैविध्य ध्यानात घेता संघटनेची अतिकेंद्रीयता आणि सूक्ष्म व्यवस्थापन हे नेहमीच अनुत्पादक ठरले आहे... त्यामुळे अखिल भारतीय काँग्रेस समितीने काँग्रेस जिल्हाध्यक्ष, विभागीय पदाधिकारी यांच्या नियुक्त्या करण्याची पद्धत बंद करावी. प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष आणि प्रभारी सरचिटणीस यांच्या समन्वयाने काँग्रेस जिल्हाध्यक्षांची निवड करण्यात यावी.

•    संस्थात्मक बाबी, धोरणे आणि कार्यक्रम यांबद्दल एकत्रित विचारविनिमय करून निर्णय घेण्यासाठी मध्यवर्ती संसदीय मंडळाची त्वरित स्थापना करण्यात यावी.

•    पक्षसदस्यत्वासाठी राष्ट्रीय स्तरावर अभियान राबवले जावे आणि प्राधान्यक्रमाने सभासद नोंदणी करण्यात यावी. मंडळांच्या, प्रदेश काँग्रेस समितीच्या प्रतिनिधींच्या, अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सदस्यांच्या निवडणुकांत पारदर्शकता असावी. काँग्रेस कार्यकारिणीच्या सदस्यांची निवड काँग्रेस पक्षाच्या संविधानानुसार व्हावी.

•    केंद्रीय निवडणूक समितीचे पुनर्गठन केले जावे... ज्यात संघटनात्मक पार्श्वभूमी असलेल्या आणि प्रत्यक्ष कार्यक्षेत्रावरील कामाचे ज्ञान आणि अनुभव असलेल्या नेत्यांचा समावेश असावा.

•    संसदीय आणि विधानसभा उमेदवारांची यादी तयार करण्यासाठी छाननी (स्क्रिनिंग) समितीची स्थापना करण्यात यावी... ज्यात संस्थात्मक आणि निवडणुकांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या नेत्यांचा समावेश असावा.

•    निवडणुका मुक्त, योग्य आणि लोकशाही मार्गाने पार पाडण्यासाठी एक स्वतंत्र निवडणूक समिती स्थापन करावी... जिच्यात सद्यःस्थितीतील ज्येष्ठ आणि विश्वासार्ह नेत्यांचा समावेश असावा.

•    पक्षासमोरील आव्हानांचे गांभीर्य लक्षात घेता आता एका अशा संस्थात्मक नेतृत्वयंत्रणेची त्वरित उभारणी करणे अत्यावश्यक आहे... जिचे सदस्य पक्षाच्या पुनरुज्जीवनासाठी एकत्रितपणे मार्गदर्शन करतील.

कठीण परिस्थितीत काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद सांभाळून आमचे नेतृत्व केल्याबद्दल आम्ही तुमचे मनःपूर्वक आभार मानतो. भूतपूर्व काँग्रेसअध्यक्ष श्रीयुत राहुल गांधींनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या स्तुत्य प्रयत्नांचीही आम्ही सन्मानपूर्वक दखल घेतो.

श्रीमती इंदिरा गांधी आणि श्री. राजीव गांधी यांनी देशासाठी केलेल्या कार्याचे आणि बलिदानाचे स्मरण काँग्रेस नेहमीच अभिमानाने आणि कृतज्ञतापूर्वक करत राहील.

पंडित जवाहरलाल नेहरूंच्या करारी संघर्षाचे, द्रष्ट्या नेतृत्वाचे आणि उल्लेखनीय योगदानाचे स्मरण आम्ही सन्मानपूर्वक करतो. त्यांचा शाश्वत वारसा आमच्यासाठी सदैव मार्गदर्शक प्रेरणास्रोत राहील. गांधी-नेहरू परिवार सदैव काँग्रेसच्या सामूहिक नेतृत्वाचा अविभाज्य घटक राहतील.

काँग्रेसला पुन्हा लढ्याचे नेतृत्व करायचे असेल तर त्यांनी आपल्यासमोरील आव्हानांचे रूपांतर सुसंधीत करायला हवे. आता वेळ आली आहे की, या देशातील तरुण, महिला, विद्यार्थी, शेतकरी, अल्पसंख्याक, दलित, कामगार यांच्या आवाजाला प्रतिसाद देणारे नवीन आख्यान आपल्याला निर्माण करावे लागेल.

भाजपच्या अजेंड्याचा सामना आणि पराजय करायचा असल्यास काँग्रेसला निधर्मी आणि लोकशाहीवादी शक्तींची आघाडी राष्ट्रीय स्तरावर निर्माण करण्यात पुढाकार घ्यावा लागेल. जे नेते एके काळी काँग्रेसचे सदस्य होते त्या सर्वांना एका मंचावर आणण्याचे प्रामाणिक प्रयत्न करावे लागतील.

भविष्यातील अभूतपूर्व आव्हाने लक्षात घेता काँग्रेस पक्षाचे पुनरुज्जीवन हे देशासाठी अत्यावश्यक आहे. काँग्रेस पक्षाच्या आणि भारतीय लोकशाहीच्या भवितव्यासाठी आम्ही सर्व जण तुम्हांला अशी विनंती करतो की, वरील सर्व प्रस्ताव ध्यानात घेऊन त्यांची अंमलबजावणी करण्यात यावी.

अनेक सदिच्छांसह!

आपले विश्वासू,

गुलाम नबी आजाद, आनंद शर्मा, कपिल सिब्बल, मनीष तिवारी, शशि थरूर, विवेक तन्खा, मुकुल वासनिक, जितिन प्रसाद, भूपेंद्र सिंह हुड्डा, राजेंदर कौर भट्टल,एम वीरप्पा मोइली, पृथ्वीराज चव्हाण, पी जे कुरियन, अजय सिंह, रेणुका चौधरी, मिलिंद देवरा, राज बब्बर, अरविंदर सिंह लवली, कौल सिंह ठाकुर, अखिलेश प्रसाद सिंह, कुलदीप शर्मा, योगानंद शास्त्री, संदीप दीक्षित.

(अनुवाद- प्रगती पाटील)

विनोद शिरसाठ यांची ही मुलाखतही वाचा: काँग्रेसचे असे का झाले, पुढे काय होईल?

Tags: पत्र सोनिया गांधी कॉंग्रेस कॉंग्रेस पक्ष राहुल गांधी अनुवाद Politics Letter Sonia Gandhi Congress Congress Party Rahul Gandhi Load More Tags

Add Comment