तांबे-रायमाने युवा संशोधक पाठ्यवृत्ती - प्रस्ताव पाठवण्याची अंतिम तारीख 10 मे 2023


प्रिय वाचकहो,

औरंगाबाद येथील प्रा. श्रीकांत तांबे आणि प्रा. ल. बा. रायमाने यांच्या स्मृतिप्रित्यर्थ तरुण संशोधकांसाठी ही पाठ्यवृत्ती सुरू करण्यात आली आहे. त्यांचा थोडक्यात परिचय असा :

प्रा. श्रीकांत तांबे

(31 डिसेंबर 1934-28 डिसेंबर 2019) हे इंग्रजीचे प्राध्यापक, लेखक, कवी होते. प्रागतिक चळवळींशी त्यांचा सक्रिय संबंध होता. अध्यापन करत असताना आणि निवृत्तीनंतरही अनेक शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना त्यांनी शिक्षणासाठी साह्य आणि मार्गदर्शन केले. प्रगतीशील चळवळीतील संस्था आणि व्यक्ती यांना वेळोवेळी मार्गदर्शन आणि व्यक्तिगत पातळीवर मदत केली.

‘इंग्लिश म्यूज ऑन इंडियन सॉईल’ (अंग्लो-इंडियन कवितांवरील संशोधनावर आधारित ग्रंथ), म्यूजिंग्ज, वन हंड्रेड ॲन्ड वन पोएम्स, ताजा कलम (कविता संग्रह), अ टेल विथ सेवन आन्सर्स (ग. प्र. प्रधान यांच्या ‘साता उत्तराची कहाणी’ या कादंबरीचे इंग्रजी भाषांतर) तसेच अनेक मराठी कृतींची इंग्रजीत भाषांतरे आणि विविध नियतकालिकांतून लेखन. महाराष्ट्राचा सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक इतिहास, भारतीय संविधान आणि भारतीय तसेच जागतिक साहित्य हे त्यांच्या आस्थेचे विषय होते.

प्रा. ल. बा. रायमाने

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या मिलिंद कला महाविद्यालयात प्राचार्य ल. बा. रायमाने 1963ते 1994 पर्यंत मराठीचे विद्यार्थीप्रिय प्राध्यापक होते. या काळात एकीकडे दलित चळवळ पूर्ण जोमात होती तसेच दलित साहित्याची चळवळही जोरात उभी राहत होती. या दलित साहित्य चळवळीचे प्रा. रायमाने एक महत्त्वाचे शिल्पकार होते. मिलिंदमध्ये येणाऱ्या अनेक दलित विद्यार्थ्यांना त्यांनी लिहिते केले. ‘प्रा. रायमाने यांच्या जीवनाचा एक काठ साने गुरूजींचा तर दुसरा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा होता,’ असे प्रा. रा.ग.जाधव यांनी त्यांचे केलेले वर्णन अतिशय रास्त आहे.

प्रा. रायमाने यांनी बाबासाहेबांच्या अनेक सहकाऱ्यांच्या मुलाखती घेऊन आंबेडकरी चळवळीच्या इतिहास लेखनाच्या दृष्टीने महत्वपूर्ण संदर्भाच्या नोंदी निर्माण केल्या आणि संदर्भ साधनांचे संग्राहक म्हणून हा दुर्मिळ इतिहास जतन करण्याचे काम त्यांनी हयातभर केले.