एका चित्रकाराच्या नजरेतून दिसणारा गोवा..

‘गोवन डिलाईटस्’ या पुस्तकाचे लेखक, चित्रकार तुषार शेट्टी यांची मुलाखत

प्रास्ताविक : चित्रकार तुषार शेट्टी यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. तुषार मुंबईला असतात. ते बाय प्रोफेशन आर्किटेक्ट आणि बाय पॅशन चित्रकार आहेत. ‘गोवन डिलाइट्स’ नावाचं त्यांचं पुस्तक नुकतंच आलं आहे. प्रामुख्याने जलरंग आणि अ‍ॅक्रेलिक्सच्या माध्यमातून चितारलेली गोव्याची विविध रूपं, भारतीय आणि पोर्तुगीज संस्कृतीच्या मिलाफातून घडलेल्या मिश्र शैलीतील वास्तु, तिथलं लोकजीवन, खाद्य संस्कृती असे अनेक घटक​​​​​​ या पुस्तकात दिसतात. त्यानिमित्ताने, या पुस्तकाच्या अवतीभवती आपण गप्पा मारणार आहोत.

साधारण 20-25 वर्षांपूर्वी राम पराडकर नावाच्या आर्किटेक्टने लिहिलेली ‘अ‍ॅन आर्किटेक्ट’ नावाची कविता मी वाचली. त्या कवितेने मी फार प्रभावीत झालो. आर्किटेक्ट काय काय असतो आणि त्याने कसं असायला हवं असं बरंच त्या कवितेत होतं. त्यातील शेवटच्या दोन ओळी मला विशेष महत्त्वाच्या वाटतात. ‘अ‍ॅन आर्किटेक्ट मस्ट बी रिबेल’ आणि ‘इन शॉर्ट, अ‍ॅन आर्किटेक्ट मस्ट बी अ व्हर्सटाईल पर्सन’ तर तुम्हीदेखील व्हर्सटाईल आहात हे नव्याने सांगण्याची गरज नाही. प्रत्येक आर्किटेक्ट व्हर्सटाईल असतोच असं नाही, पण आर्किटेक्टने व्हर्सटाईल असायला हवं..

प्रश्न : हे पुस्तक पाहत असताना प्रथमदर्शनी लक्षात येतं की, अनेकांनी गोवा पाहिलेला आहे, तसा तो तुम्हीही पाहिलेला आहे. इतरांनी पाहिलेला गोवा वेगळ्या दृष्टिकोनातून तुम्ही पाहिला. तर तुम्ही गोवा पाहायला केव्हा सुरुवात केली? गोव्याच्या प्रेमात कसे पडलात? आणि एकंदरीत पेंटिंग्जपर्यंतचा तुमचा प्रवास कसा झाला?

- माझं नाव तुषार शेट्टी. म्हणजे मी साउथ इंडियन आहे. कर्नाटक राज्यातील अंकोला हे माझं मूळ गाव. गोव्यात मडगावला आमचे नातेवाईक राहत असल्यामुळे लहानपणापासूनच नेहमी तिकडे जाणं व्हायचं. जाताना कायम मनात कुतूहल असायचं. कारण मुंबईपासून गोव्यापर्यंतचा प्रवास म्हणजे एक छान लँडस्केप स्पेक्ट्रम आहे. मुंबईतील गर्दी, पुण्याचा घाट, कोकणात उतरल्यावर छान नारळाची झाडी असा हा गोव्यापर्यंतच्या प्रवासाचा अनुभव निराळा असतो. महाराष्ट्रात गावांच्या नावाच्या शेवटी ‘पूर’ असणाऱ्या पाट्या तिकडे ‘एम’मध्ये बदलत जातात. बिचोलिम, कोयलेम, इत्यादी. याचं कुतूहल होतं. गोवा इज सिम्पल प्लेस! इट हॅज लॉट ऑफ कलर्स. तिथे सुंदर निरभ्र आकाश दिसतं, त्यामुळे लहानपणापासूनच गोव्याविषयी कुतूहल वाटायचं. ‘आर्किटेक्चर’ला प्रवेश घेतल्यानंतर पहिल्याच वर्षी कॉलेजमधून गोव्याला गेलो होतो. तेव्हा गोवन आर्किटेक्चर कन्स्ट्रक्शन मटेरियल, कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी हे सगळं पाहायचं होतं. एक लोड बेयरिंगचं घर काँक्रीटचा वापर न करता चिऱ्याच्या दगडाने कसं बांधतात, आणि त्याचं सौंदर्य काय असतं, त्या घराचं ऑर्डरिंग ऑफ स्पेस किंवा प्लॅनिंग कसं असतं याचा अभ्यास करायला आम्ही गेलो होतो. तेव्हा गोव्याचं वेगळं असं आर्किटेक्चर आहे, याकडे माझं लक्ष वेधलं गेलं. कारण गोव्यातलं पोर्तुगीज इन्वेन्शन, इंडियन वे ऑफ कन्स्ट्रक्शन... त्यामुळे हे कसं असेल याचं कुतूहल होतं. स्वाभाविकच माझ्यातल्या चित्रकाराला व्यक्त होण्याची संधी मिळाली. म्हणतात ना, “व्हॉटएव्हर यू हॅव द बेस्ट यु हॅव टू युज इट अ‍ॅट युवर बेस्ट” मी उत्तम चित्रं काढू शकतो, कविता करू शकतो, चांगल्या पद्धतीने मांडू शकतो. या सगळ्यातून हे पुस्तक साकार झालं. प्रत्येक सामान्य माणूस गोव्याला जातो, इकडे तिकडे फिरतो, पार्ट्या करतो, बीचेस पाहतो, फुलाफुलांचे टी-शर्टस् घालतो आणि परत येतो.. पण गोवा त्यापलीकडे आहे. खरा गोवा तिथल्या ग्रामीण जीवनात सामावलेला आहे. तो गोव्याचा ‘नेटिव्हनेस’ मी या पुस्तकात उतरवण्याचा प्रयत्न केला आहे. 

प्रश्न : गोवा हे राज्य महाराष्ट्रातल्या एका जिल्ह्याएवढे आहे. बहुतेक लोक तिथे पर्यटक म्हणून जातात. आपण एक-दोन दिवसच तिथे राहणार असू तर गाईड बसमधून फिरवतात; चर्चेस्, मंदिरं, समुद्रकिनारे हे सर्व दाखवतात. हे सगळं महत्त्वाचं असलं तरीही नेटिव्हनेस त्यात येत नाही. त्यासाठी अधिक काळ राहावं लागतं. समाजजीवनाशी समरस व्हावं लागतं. तुम्ही नेटिव्हनेस येण्यासाठी काय केलं? आणि चित्र काढण्याकडे कसे आलात?

- कुठलंही हॉटेल बुक न करता केवळ इंटरनेटवर उपलब्ध माहितीचा अभ्यास करून गोव्यातल्या अशा काही गावांमध्ये मी गेलो, जिथे अनेक परंपरांचा जन्म झाला आहे. ‘फर्गॉटन हॅम्लेटस्’ म्हणावीत अशा अनेक छोट्या-छोट्या गावांत राहिलो. त्यामुळे तेथील वातावरणाशी एकरूप होता आलं. महत्त्वाचं म्हणजे, तिथली हवा अनुभवता आली. माझ्या डोक्यात असलेली चित्रं काढण्यासाठी त्या हवेने मदत केली, अन्यथा जिवंतपणा आला नसता. गाईड ठराविक ठिकाणी घेऊन जातात. ती ठिकाणं तर मी पाहिलीच पण त्या शिवाय अजूनही अनेक ठिकाणं अनुभवली. गोवन सीफूड खायला तुमचा गाईड एखाद्या हॉटेलमध्ये तुम्हाला घेऊन जाईल, पण मधोशीची आमटी किंवा सागुती आणि कोळंबीचं हुमण हे खास गोव्यातले पदार्थ आहेत. ते सर्व वाचकांपर्यंत पोहचवण्याचा माझा हेतू होता. गोव्यात ओला-उबेर नाही. स्थानिक पायलेटस् असतात, ते तुम्हाला जिथे जायचं तिथे घेऊन जातात. त्यांच्याकडूनदेखील मी समजून घेण्याचा प्रयत्न केला. या सगळ्यातून मला तिथला ‘नेटिव्हनेस’ उमगत गेला.

प्रश्न : देशविदेशातील पर्यटक प्रामुख्याने ऑक्टोबर ते फेब्रुवारी दरम्यान गोव्याला येतात, त्याचं प्रमुख कारण हवा हे आहेच; पण तुमच्या पुस्तकात तुम्ही उल्लेख केला तसं तिथलं पाणीही वेगळं आहे; अगदी समुद्राचं देखील. तिथले पाम ट्रीज, टेकड्या आणि अर्थात माणसंही तुमच्यासोबत बोलतात.. तर याकडे तुम्ही कसे आकर्षित झालात? त्यामागे, लहानपणापासून असलेली ओढ आणि नंतर आर्किटेक्ट असताना मिळालेल्या प्रशिक्षणातून आलेली वेगळी दृष्टी या दोन्ही गोष्टींचं प्रमाण काय आहे?

- मी पुस्तकात देखील लिहिलं आहे की, प्रत्येक पान आपल्याशी बोलत असतं; फक्त त्याचं बोलणं ऐकण्यासाठी कान जागृत असायला हवा. गोवा आणि कोकण अनेक नैसर्गिक घटकांनी समृद्ध आहे. सर्वत्र नारळाची झाडं, भात शेती, अथांग पसरलेला समुद्र या घटकांनी त्या लोकांच्या पोटा-पाण्याचे प्रश्न सुटले आहेत म्हणूनही त्यांच्याबद्दल आत्मीयता वाटते. मला आवर्जून सांगायला आवडेल की, निसर्गाचं संवर्धन केलं तर तो आपल्याला भरभरून देतो. त्याचं सुंदर उदाहरण म्हणून गोव्याकडे पाहता येईल. आता मुंबईसारख्या महानगरांमध्ये तशी कृषिपयोगी जमीन जागांच्या महागड्या किमतींमुळे शक्य नाही. दुर्दैवानं गोव्यातदेखील काही ठिकाणी अशीच परिस्थिती निर्माण होत आहे.

प्रश्न : गोव्याच्या एकूण आर्किटेक्चरवर तसेच समाजमनावर पोर्तुगीज प्रभावाप्रमाणे भारतीय आणि (पोर्तुगीज वगळता अन्य) युरोपीय प्रभाव किती प्रमाणात जाणवतात?

- जेव्हा दोन शैली मिळून एखादी वास्तू निर्माण होते तेव्हा त्याला ‘आर्किटेक्चर’मध्ये ‘एक्लिक्टीझम’ म्हणतात. उदाहरणादाखल चर्चगेटचे रेल्वे मुख्यालय पाहता येईल. ते ‘इंडो-इस्लामिक’ पद्धतीने बांधलं आहे. गोव्यातील घरे कोकणातील घरांसारखी, इंडो-पोर्तुगीज पद्धतीने बांधलेली असतात. त्याची खात्री पटवून घेण्यासाठी काही बेसिक लिटमस वापरले जातात.. उदाहरणार्थ, घराला कोर्टयार्ड आहे का, घराची ठेवण कशी आहे, दारे-खिडक्या कशा आहेत इत्यादी. इकडच्या घरांना ओसरी असते, ती पोर्तुगीज वास्तुशैलीमध्ये नसते. हे घरांचं स्वरूप स्पष्ट व्हावं म्हणून पुस्तकात शेजारी शेजारी दोन चित्रं दिलेली आहेत.  

प्रश्न : गोव्यातील घरं, हॉटेलं, प्रशासकीय इमारती या सर्वांमध्ये इंडो-पोर्तुगीज स्टाईल दिसते तर तिथल्या मंदिरांमध्येही ती दिसते का?

- नक्कीच. गोव्यातल्या शांतादुर्गा मंदिराचं बांधकाम यादृष्टीने पाहण्यासारखं आहे. भारतीय शैलीतील मंदिरांवर भरपूर कोरीवकाम केलेलं असतं, पण गोव्यात तसं नसतं. तिथे मंदिरांवर घुमट असतो, तो भारतीय शैलीमध्ये नाही. तसंच तो घुमट विशिष्ट उंचीवर बसवण्याकरता अष्टकोनी कॉलर असते, तीही पोर्तुगीज शैलीतली आहे. पण तिथे प्रत्यक्षात बांधकाम करणारे लोक भारतीयच असल्यामुळे, त्यात ‘भारतीयत्त्व’ आहेच.

प्रश्न : तुम्ही या पुस्तकातली चित्रं काढायला नेमकी सुरुवात केव्हा केली आणि सुरुवातीला कोणते सेक्शन्स तुम्हाला खुणावत होते याबद्दल काही सांगू शकाल का?

- सामान्यतः चित्रकार सुरुवातीला निसर्गचित्रं काढतो कारण ती छान दिसतात. मीही साधारण आठ वर्षांपूर्वी चित्रं काढायला सुरुवात केली तेव्हा सुरुवातीला निसर्गचित्रंच काढायचो. ज्यात एखादं लँडस्केप, एखादी झोपडी आणि इतरत्र हिरवळ असे. गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांची चित्रं मी आधी काढली, मग नंतर तिथली मंदिरं, चर्चेस्, माणसं अशी चित्रं काढत गेलो. गोव्यात मासेमारी मोठ्या प्रमाणावर चालते. त्यासंदर्भात बरीच चित्रं आहेत. पुस्तकाची मांडणीही मी तशीच केली आहे. पेंटिंग्ज डेव्हलप करायला साधारण दोन-तीन महिने लागले. काही चित्रं मी जागेवर बसून काढली तर काही स्टुडिओमध्ये. विशेषतः अमूर्त शैलीतली काही चित्रं मी स्टुडिओमध्ये काढली. चित्र त्या जागेवर बसून काढा, नाही तर स्टुडिओमध्ये काढा; ती हवा अनुभवता आली पाहिजे.

प्रश्न : यापलीकडे गोव्यातली आणखी कोणकोणती लहान-मोठी ठिकाणं होती ज्यांनी तुम्हाला खुणावलं? आणि ती तुम्ही का निवडलीत?

- प्रत्येक ठिकाणचं एक वैशिष्ट्य असतं. मी एकदा ‘आरपोरा’ला गेलो होतो. तिथे एका गल्लीत एकच रिक्षा जाईल एवढीच जागा होती. त्या रिक्षाचं चाक वाळूत फसलं होत तरी तो रिक्षावाला काढण्याचा प्रयत्न करत होता. धिस इज गोवा! बोटीत गाड्या भरून बोट नदी पार करते आहे, असं एक चित्र मी काढलं आहे. बेतिंगला हा प्रकार मी पाहिला. गोव्यात कार, बाईक अशा बोटीतून नेल्या जातात. गोव्यात नजर जावी तिकडे वाळूच वाळू पसरलेली दिसते. त्या दृश्यावर, 'मी समुद्रात उभा आहे की वाळवंटात' अशा आशयाची एक कविताही पुस्तकात दिली आहे.. 

प्रश्न : या पुस्तकात प्रामुख्याने जलरंगांतील आणि अन्य माध्यमांतील 50 ते 60 चित्रं आहेत. या पुस्तकाला ‘गोवन डिलाइट्स’ हे नाव का दिलं?

- देयर आर मेनी टाईप्स ऑफ डिलाइट्स, सम आर डिलाइट्स ऑफ फूड, सम आर ऑडिबल डिलाइट्स, सम आर व्हिजिबल डिलाइट्स.. मला असे ‘गोवन डिलाइट्स’ मांडायचे होते. डिलाइट्स विच कूड बी सीन, रेड, पर्सिव्हड. आणि पेंटिंग्ज का? तर मला नेहमी असं वाटतं की, ‘दॅट व्हॉट स्ट्रोक ऑफ ब्रश कॅन डू, बुक ऑफ वर्ड्स कान्ट’. त्यामुळे एका पुस्तकापेक्षा चित्र अधिक जास्त सांगून जातं.

प्रश्न : हे पुस्तक उत्तम झालं आहेच, पण तुमची या पूर्वीही दोन पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. त्याविषयी थोडं सांगा?

- ‘व्हील्स अँड चेक्स’ हे माझं पहिलं पुस्तक. मला लहानपणापासूनच रेल्वे इंजिनबद्दल प्रचंड आकर्षण आहे. या पुस्तकात विविध रेल्वे इंजिनांबद्दल सांगितलेलं आहे. सामान्य माणसांसाठी ‘इंजिन एके इंजिन’ असंच असतं, पण या पुस्तकात इलेक्ट्रॉनिक तसेच डिझेल इंजिनांचे 30 ते 40 प्रकार दाखवलेले आहेत. दुसरं पुस्तक ‘मुंबई मेटॅफर’. पुणे म्हटलं की, जसा शनिवारवाडा आठवतो तशी मुंबई शहरात अनेक मेटॅफर्स आहेत. सीएसटी, गेट वे ऑफ इंडिया ही प्रमुख उदाहरणं आहेतच, पण वांद्रे स्थानकासारखी अनेक ठिकाणंही तेवढीच महत्त्वाची आहेत. अशा मुंबईतील 60 ते 65 चित्रांचा समावेश या पुस्तकात आहे. आर्किटेक्ट असल्यामुळे या ठिकाणांचं वेगळेपण लक्षात येतंच, पण सामान्य माणसाच्या नजरेने पाहिलं तरी काही वेगळ्या गोष्टी लक्षात येतात.

प्रश्न : तीन वेगळ्या क्षेत्रांतली चित्रं तुम्ही काढलीत, आता आणखी कोणती क्षेत्रं तुम्हाला खुणावतायत?

- गोव्यानंतर केरळ मला खुणावतं आहे. बहुतांश वेळा लोकांनी तेथील बॅकवाटर आणि घरांच्या पलीकडे फार काही पाहिलेलं नसतं. त्यानंतर अर्थातच, राजस्थान. राजस्थान इज प्युअरली आर्किटेक्चर. तिथले फॉर्म्स, त्यांचं स्पेसिंग अँड त्यांची ऑर्डर हे आर्किटेक्चरमध्ये महत्वाचे असणारे घटक, तिथले ब्राईट कलर्स आणि प्ले ऑफ लाईटस हे सगळं इतरत्र बघायला मिळत नाही. तसंच ‘देन सिटीज्’ (then cities) अशी एक कल्पना माझ्या डोक्यात आहे. 50 वर्षांपूर्वीची मुंबई, कोलकाता ही शहरं कशी असतील हे सगळं मला जसं वाटतं तसं चित्रांमधून दाखवण्याचा प्रयत्न असेल.

प्रश्न : कलेशी थेट संबंध नसलेले सामान्य वाचक, कलाकार आणि आर्किटेक्ट अशा सगळ्या प्रकारच्या वाचकांना तुम्ही काय सांगाल?

- हा एक सातत्यानं सुरु असलेला प्रवास आहे, ज्याला मुक्काम नाही. म्हणून तो तसाच सुरु राहावा. मी हे पुस्तक अशाच चांगल्या अर्थांने ‘रेस्टलेस’ चित्रकारांना समर्पित केले आहे. मला एक हिंदी शेर आठवतो.
‘खोज और तलाश कि लज्जत कि तलफ जो लग गयी है,
दुवा बस एक हि करता हू कि मंजिल कभी न आये..’

प्रश्न : पुस्तकाच्या शेवटी तुम्ही जे वाक्य लिहिलं आहे ते मला महत्त्वाचं वाटतं. ते वाचून तुम्ही मुलाखतीचा समारोप करावा.

- पेंटिंग इज स्पॉंन्टिनिटी ऑफ द माईंड, अ‍ॅप्लिकेबिलिटी ऑफ द स्किल, ऑब्जर्वेशन ऑफ आय, व्हॉईस ऑफ द सोल.

संवादक : विनोद शिरसाठ
शब्दांकन : प्रतीक राऊत

-  तुषार शेट्टी
artbytushar2019@gmail.com 
संपर्क : 99754 94749


या मुलाखतीचा व्हिडिओ : 

 

Tags: Tushar Shetty Goan Delights Vinod Shirsath Painting Goa Tourism Load More Tags

Comments:

प्रतिमा कुलकर्णी

सुंदर article... घरात बसून गोव्यातील पर्यटनाचा सुखद अनुभव घेता आला... मस्त.

Add Comment