माझं कॉपीरायटिंग...

25 जुलै : वसंत बापट यांच्या जन्मशताब्दीनिमित्त...

वसंत बापट यांची मुख्य ओळख 'कवी' अशी आहे. मात्र त्यांनी तीस चाळीस वर्षे वेगवेगळ्या उत्पादनांच्या जाहिरातींसाठी कॉपीरायटिंग चालू ठेवले होते, त्याकडे ते सर्जनशीलतेचा अविष्कार म्हणूनच पाहात होते. त्यांची विविधता किती असावी? उदाहरणार्थ : आयुर्विमा, फिशिंग नेट (मासे पकडणारे जाळे), जम्बो आईस्क्रीम, फिनोलेक्स पाईप, केअर फ्री सॅनिटरी नॅपकिन, कॅमल पेन्सिल, गोकुळ दूध इत्यादी. अनेक दुकानांना नावे, अनेक नामवंतांसाठी मानपत्रे. अनेक संस्थांना ब्रीदवाक्ये. उदा. महाराष्ट्र टाइम्सचे घोषवाक्य 'पत्र नव्हे मित्र' आणि लोकसत्ताचे घोष वाक्य 'लोकमान्य लोकशक्ती' हे वसंत बापट यांनीच दिलेले. आणि हो, 'स्थापण्या समता शांती ठेवुनी शुद्ध साधनां। करिती साधना त्यांना ठेवो उत्स्फूर्त साधना।।', हे ब्रीदवाक्यही वसंत बापट यांचीच देण आहे. या संदर्भातील भूमिका व अनुभव मांडणारा त्यांचा हा छोटा लेख...  

जाहिरात ही पासष्टावी कला. तिचं आजचं स्वरूप त्या काळी नव्हतं. त्या काळी म्हणजे 1958-59 साली. तेव्हा मी जाहिरात क्षेत्रात माझ्याही नकळतपणे शिरलो. मैत्रीखातर. एस.बी. जोशी अँड कंपनी ही एक ब्रिज कन्स्ट्रक्शन कंपनी. आसाम ते गुजरातपर्यंत त्यांनी पूल बांधले होते. त्यांना जाहिरात करायची होती. त्या वेळी ते घनदाट जंगलात पूल बांधत होते. पूल बांधत असताना अनेक संकटं यायची. कधी अचानक अस्वलांचा हल्लाही व्हायचा.

माझा एक मित्र त्या वेळी माझ्याकडे आला; म्हणाला, “तू त्यांच्यासाठी मला एक बुकलेट करून दे. प्रेस अ‍ॅडसाठी कॉपी तयार करून दे.”

त्यानं मला त्यांचं व्हिज्युअल दाखवलं. त्यानं उभं अस्वल दाखवलं होतं आणि जाहिरात पुलाची करायची होती. पार्श्वभूमी लक्षात आल्यावर मी जाहिरात लिहून दिली, ‘संकटांना आम्ही भीत नाही, प्रत्येक पूल म्हणजे संकटांवर मात.’

जाहिरातीचं जग त्या वेळी आजच्यासारखं सजग नव्हतं. माझी पहिली जाहिरात मराठी होती. आज, अजूनही मूळ ‘कॉपी’ इंग्रजीमध्ये असते. नंतर त्याचे अनुवाद भारतीय भाषांमध्ये होतात पण माझी पहिली जाहिरात मराठीत असूनही संबंधित लोकांना ती त्या वेळी आवडली होती.

माझे साडू नारळकर यांची ‘प्रतिभा अ‍ॅडव्हर्टायझर्स’ ही जाहिरात कंपनी. तिचे ते प्रोप्रायटर, डायरेक्टर. त्यांच्यासाठी मी मग जाहिराती करू लागलो. एलआयसीसाठी मी जाहिरातींची एक मालिका तयार केली होती. जाहिराती लक्षवेधी व्हाव्यात म्हणून त्यांचे मथळे मी नकारात्मक केले होते.

पहिली जाहिरात अशी होती...

‘तुम्हाला आयुर्विम्याची जरुरी नाही!’

या मथळ्याचं स्पष्टीकरण करण्यासाठी मी पुढं लिहिलं - ‘तुम्ही जीवनास कंटाळलेले असाल, आजन्म ब्रह्मचारी राहणार असाल अथवा संसार करणार नसाल तर तुम्हाला आयुर्विम्याची आवश्यकता नाही.’ 

दुसरी जाहिरात ‘सप्तचिरंजीव’ अशी केली - ‘तुम्ही आठवे चिरंजीव होणार असलात तर तुम्हाला आयुर्विम्याची गरज नाही.’ 

तिसऱ्या जाहिरातीत म्हटलं होतं - ‘तुम्ही सहकुटुंब, सहपरिवार हिमालयात जाणार असाल तर तुम्हाला आयुर्विम्याची आवश्यकता नाही.’

या मालिकेतली माझी पहिली जाहिरात प्रकाशित झाली. त्यावर ‘ब्रह्मचारी हनुमानाचं’ चित्र. माझा उद्देश वेगळा होता पण तो वाचकांना कळला नाही. हनुमानाच्या चित्रानं हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या. जाहिरातीचा विपरीत परिणाम झाला. लोकांनी या जाहिरातीवर आक्षेप घेतला. परिणामी, माझ्या पुढच्या जाहिराती काही प्रकाशित झाल्याच नाहीत.

याच सुमारास ‘गरवारे’तर्फे बाजारात नायलॉन नेट्स आल्या होत्या. या ‘फिशिंग नेट्स’ बाजारात खपाव्यात, त्यांना मागणी राहावी म्हणून जाहिरात करणं आवश्यक होतं. जाहिरात लिहिण्यासाठी या वेळीही ‘प्रतिभा’कडून मला विचारणा झाली. मी गरवारेंच्या फिशिंग नेट्सच्या जाहिरातींचा मथळा लिहिला...

‘माशांनी संततिनियमन सोडून दिलं!’

‘माशांनी कुटुंबनियोजनास विरोध केला कारण गरवारेंच्या नायलॉनच्या जाळ्यांमुळे मासे फार मिळू लागले आणि समुद्रात मासे कमी होऊ लागले. त्यांची पैदास पुन्हा वाढावी म्हणून त्यांनी संततिनियमन सोडून दिलं.’ अशा अर्थाची कॉपी मी लिहून दिली. मला वाटलं होतं की, ही कल्पना ‘क्लीक’ होईल पण झालं भलतंच. या जाहिरातीसही प्रतिकूल प्रतिसाद मिळाला. खुद्द ‘फॅमिली प्लॅनिंगवाल्यां’नीच या जाहिरातीच्या मथळ्याबाबत आक्षेप घेतला.

आयुर्विम्याच्या जाहिरातीनंतर मला गरवारेंच्या जाहिरातीनं बरंच शिकवलं. त्यांपैकी दोन गोष्टी मी आवर्जून लक्षात ठेवल्या. त्यांचा मला आजवर उपयोग झाला आहे. एक अशी की, कल्पना कितीही चमत्कृतिपूर्ण असल्या तरी जाहिरात क्षेत्रात त्यांचा वापर करू नये आणि दुसरी अशी की, लोकांच्या भावना दुखावतील अशा कल्पना वापरू नयेत. नाहीतर त्याचा जाहिरातींवर, मालाच्या विक्रीवर विपरीत परिणाम होतो. माझ्या दृष्टीनं हे तसं अपयश नव्हतं. उलट मला जे अनुभव मिळाले ते मोलाचे होते. मी सुरुवातीला या रस्त्यावर ठेचाळलो होतो हे खरं; पण त्यामुळेच मी पुढचा रस्ता सावधानतेनं चाललो.

1961-62च्या सुमारास मला खऱ्या अर्थानं ‘लकी ब्रेक’ मिळाला. लक्ष्मीविष्णू मिल्ससाठी, अर्ध्या तासाच्या एका ‘फॅशन शो’साठी मी कॉमेंटरी लिहावी अशी विनंती मला करण्यात आली. हा फॅशन शो पंचतारांकित हॉटेलांमधून फॅशन शो करणाऱ्या मॉडेलसकट होता.

शहरात असे ‘फॅशन शो’ करणं सोयीस्कर. नाना तऱ्हेनं अनेक कल्पना त्यात राबवता येतात, प्रयोग करता येतात पण लक्ष्मीविष्णू मिल्सचा ‘फॅशन शो’ होता तो त्यांच्या सोलापूरच्या मिलमध्ये. तिथल्या कम्पाउंडमधल्या स्विमिंग पुलावर. मला हे आव्हान वाटलं. मी ते स्वीकारलं. मग या ‘फॅशन शो’साठी मी नाना तऱ्हेचे रचनाबंध वापरले. हा फॅशन शो लोकांना अपेक्षेपलीकडे आवडला. मुंबईच्या ‘सिस्टास’ या जाहिरात कंपनीचे मालक बॉकी सिस्टास यांनी तर आपल्या कंपनीसाठी हा फॅशन शो रेकॉर्ड करून घेतला. या ‘शो’च्या कॉमेंटरीनं एक क्रिएटिव्ह वर्क केल्याचं समाधान मला झालं.

नंतर माझे स्नेही श्री. आपटे यांच्या विनंतीमुळे मी जम्बो आईस्क्रीमची जाहिरात केली. त्या वेळी ‘लिंटास’ या जाहिरात कंपनीकडे ‘जम्बो’च्या जाहिरातीचं काम होतं. मी होर्डिंगसाठी लिहून दिलं. ‘मस्त मजेचे, मऊ मलईचे, शुद्ध दुधाचे, नवलाईचे - जम्बो आईस्क्रिम.’ ही जाहिरात लोकांना फार आवडली. आईस्क्रिमबरोबरच हा मथळा लोकांच्या पसंतीस उतरला होता.

मुंबईत मी प्राध्यापक असताना जाहिरातीच्या क्षेत्रातील लोकांचा संपर्क तसा कमी असायचा. 1974ला मी मुंबई विद्यापीठात शिकवायला लागलो. मुंबई शहरात, मुख्य कार्यक्षेत्रातच आल्यावर, महत्त्वाची माणसं मला कामानिमित्तानं भेटायला लागली. मराठीप्रमाणेच माझं संस्कृतही चांगलं. संस्कृत लिहिताबोलता येणारी माणसं फारच कमी. मी युनिव्हर्सिटीतच असल्यानं माझ्या या ज्ञानाचा वापर करून घ्यायला लोकांनी सुरुवात केली. मी संस्कृतमध्ये मानपत्रही लिहून दिलं. ‘लॉस प्रिव्हेशन’साठी संस्कृतात ‘सुरक्षैव समृद्धये’ असं बोधवाक्य लिहून दिलं.

नंतर माझ्याकडे आली ती ‘महाराष्ट्र टाइम्स’ची जाहिरात. ‘म.टा.’ची जाहिरात ‘कॉन्ट्रॅक्ट एजन्सी’ करत होती. या एजन्सीच्या अहमद खाननं मला बोलवलं. त्यांच्याकडे काही सुंदर फोटोग्राफ्स होते.

पहाटेचे. पहाट फुलतानाचे. कोवळ्या किरणात पक्षी विहरतानाचे. ते फोटो पाहून मी लिहून दिलं - 

‘नुकती नुकती उमलणारी पहाट 
नुकती नुकती उमलणारी फुलं’ 

त्यानंतर मी कॉपी लिहून दिली - 

‘पहिल्या चहाची गरम वाफ 
मनभर भरून राहणारा त्याचा स्वाद 
प्रसन्न दिवसाची, प्रसन्न सुरुवात 
आणि महाराष्ट्र टाइम्स’.

अशा जाहिराती मला खूप सुचत गेल्या आणि एकदा अचानक मला. ‘महाराष्ट्र टाइम्स - पत्र नव्हे मित्र’ असा मथळा सुचला. हा ‘कॅची’ झाला आणि आजतर ‘म.टा.’ची ओळख ‘पत्र नव्हे मित्र’ अशी झालीय.

मी जाहिराती दोन प्रकारच्या मानतो. एक सरळ जाहिरात. यात कोणतेही आढेवेढे, आडवळणं नसतात. ग्राहकाला ती थेट भिडत असते. त्यात लक्ष्यार्थ, व्यंजना नसते; तर अभिधा असते. उदाहरणार्थ, ‘फिनोलेक्स’ची मी एक जाहिरात केली. तिचा मथळा असा होता - 

‘अजोड पाईप, अमोल पाईप’.

यात कुठंही किचकटपणा नव्हता. साधे, सरळ, सोपे शब्द. जाहिरात थेट भिडणारी, पटणारी पण काही वेळेस जाहिरात फसवी असते, चमत्कृतिपूर्ण असते. त्याला मी ‘गुगली कॉपी’ म्हणतो. अशा ‘गुगली’ जाहिरातींमध्ये प्रॉडक्ट आणि जाहिरात यांचा प्रत्यक्ष संबंध नसतो. ‘चारमिनार रोस्टेड टोबॅको’ची जाहिरात या संदर्भात पाहता येईल. या जाहिरातीत मोटरसायकलवर बसलेलं एक जोडपं दाखवलेलं. मोटरसायकल वेगानं जाणारी. त्याची कॉपी अशी - 

‘आयुष्याचा वेग पाहिजे भन्नाट 
म्हणून तर मोटरसायकल हवी सुसाट
विसाव्याच्या वेळी एक मात्र पाहिजे बरं का
रोस्टेड तंबाखूचा झुरका’

‘महाराष्ट्र टाइम्स’ची जाहिरात तशी गुगली होती पण ती लोकांना आवडली. ‘म.टा.’नं जाहिरात एजन्सी बदलली तरीही दुसऱ्या जाहिरात एजन्सीनं कॉपी लिहिण्यासाठी मलाच बोलावलं. ‘कॉन्ट्रॅक्ट’नंतर आर.के. खन्नांसोबत म.टा.ची जाहिरात केली. खन्नांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलानं त्याच्या आत्याबाईला बाजूला केलं. तिनं नवीन एजन्सी काढली. या सर्व एजन्सीजनं माझ्याकडून आवर्जून लिहून घेतलं. ‘म.टा.’च्या माझ्या जाहिरातींना ‘कॅम’चं पारितोषिक मिळालं.

प्रेस अ‍ॅडपेक्षा माझं मन रमतं ते जिंगल्स करण्यात. ‘अपना बाजार’साठी मी जिंगल लिहिलं होतं :

‘अपना बाजारनं धडा शिकवलाय, मसाला मसाल्यात फरक काय?’ 

हे जिंगल त्या वेळी खूप गाजलं होतं. सहासात वर्षं ते सतत जाहिरातींमधून वाजवलं जायचं.

त्यानंतर मला जिंगल्स करण्याचा नादच लागला. मी जिंगल्स केली की आठनऊ भाषांत करतो. गाणारे, वाजवणारे कलाकार उपलब्ध असतात. त्यांचा फायदा मला मिळतो. बऱ्याच भाषांत गाणारे कलाकार, उदाहरणार्थ, उत्तरा केळकर, कविता कृष्णमूर्ती, अरुण इंगळे... यांसारखे गायक शब्द अचूक उच्चारतात.

जिंगल्स करताना माझ्या असं लक्षात आलं की, एक धून अनेक भाषांत डब करणं बरोबर नाही. प्रत्येक भाषेचं सांस्कृतिक संचित भिन्न आहे, भाषेचं लेणं वेगळं आहे. मग ते लक्षात घेऊन मी जिंगल्स रचायला लागलो. त्या वेळी ‘गोदरेज’करता केलेलं एक जिंगल गाजलं होतं -

‘विपुल फवारा शेतावर
पिक थरारे भराभर’

1982मध्ये मी निवृत्त झालो. मी ‘निवृत्तीचं वय’ ओलांडलं असलं तरी माझी एनर्जी संपलेली नव्हती. शब्दांच्या राज्यात मी काहीतरी करीन असं मला वाटायचं. ‘रायटिंग फॉर मनी’ हे मी वर्ज्य मानलेलं नव्हतं. जे-जे शब्दांच्या राज्यात आहे तिथं-तिथं माझा संबंध आहे या दृष्टीनं मी लिहीत गेलो... मग ते मानपत्र असो, कॉपी असो, फीचर असो!

“तुम्ही जाहिरात ही पैशांसाठी लिहिता...” असा माझ्यावर आरोप केला जातो पण पैशांसाठी कोण राबत नाही? मग कवी प्राध्यापकी का करतात? कवींनी दुसरा कोणताच व्यवसाय करू नये अशी त्यांची इच्छा असते पण जाहिरात हीसुद्धा एक कला आहे हे लक्षातच घेत नाहीत. जाहिरात करणं, कॉपी लिहिणं, मथळे सुचणं हे मी ‘क्रिएटिव्ह चॅलेंज’ समजतो, मानतो. ते वाटतं तितकं सोपं नाही. केवळ ‘ट’ला ‘ट’ जुळवून आणि ‘र’ला ‘र’ जोडून अनेक जाहिराती करता येतील पण त्यांची ‘हेडलाईन’ लिहिणं, ‘बेसलाईन’ लिहिणं कठीण असतं. व्हिज्युअल जोरदार असेल तर कॉपी कमी असावी आणि जर ते कमजोर असेल तर त्याची उणीव कॉपीनं भरून काढायला हवी हे मी अनुभवानं शिकलो.

मी जाहिरातीचा कोणताही अभ्यास केला नाही पण कुतूहल म्हणून जाहिरातीच्या संदर्भात एखादं चांगलं पुस्तक मिळालं तर जरूर वाचतो. अभ्यासापेक्षाही अनुभवानं मी शिकत गेलो शिवाय सभोवतालचं अवलोकन चालायचं. त्यातून नकळतपणे काही संस्कार होत गेले.

आमच्या तरुणपणी एक जाहिरात प्रसिद्ध होती. ‘नो स्मोकिंग’च्या खाली आणखी एक ओळ लिहिलेली असायची... ‘नॉट इव्हन अब्दुल्ला’. अब्दुल्ला हा ब्रँड. ती महागडी सिगरेट होती. ही जाहिरात माझ्या मनावर कायमची ठसलेली.

‘रोल्स रॉईस’च्या गाडीची जाहिरातही अशीच मनावर मोहून राहिली आहे. ‘100 किलोमीटरच्या वेगानं गाडी धावत असताना आवाज येतो तो फक्त गाडीत बसवलेल्या इलेक्ट्रॉनिक घड्याळाचा.’

आपल्याकडे एअर इंडियाचा पब्लिसिटी डायरेक्टर कुका हा चांगल्या जाहिराती करतो. त्यानं ‘फुलिशली युअर्स’ नावाचं बुकलेट लिहिलं होतं. त्यात एक व्यंग्यचित्र होतं. एका हवाईसुंदरीनं एका शेठजीला मिठीत घेतलंय आणि ती त्याच्या खिशातून त्यानं चोरलेले काटेचमचे बाहेर काढतेय. ‘महाराजा’ हे त्याचंच क्रिएशन.

कुकाने केलेली एक मजेदार जाहिरात आठवते. एअर इंडियाची लंडनला डायरेक्ट फ्लाईट सुरू होणार होती तेव्हाची ती जाहिरात. ‘गरोदर’ महाराजा, काहीतरी विणीत बसलाय आणि वर हेडलाईन होती - ‘समथिंग इज इन द ऑफिंग!’

या जाहिरातीला खुद्द ब्रिटिश काउन्सिलनंच आक्षेप घेतला कारण त्याच सुमारास राणी एलिझाबेथही गर्भवती होती.

जी जाहिरात दीपवते आणि चटकन समजते ती जाहिरात मला आवडते. कवितेनं दीपवलं नाही तरी चालेल कारण कविता ही एकान्तात वाचायची, अनुभवायची असते. जाहिरातीचं तसं नाही. तिनं दीपवलंच पाहिजे.

मी वारणानगरच्या दुधाची जाहिरात केली तेव्हा मी मथळा दिला होता - ‘गोकुळ आलंय मुंबईला!’

त्यांना वारणा तूपही मुंबईत आणायचं होतं पण त्या तुपानं कोल्हापूरला चांगली बाजारपेठ मिळवली. कोल्हापूरच्या एका माणसानं जाहिरात केली होती. एक कोल्हापुरी आडदांड, रांगडा माणूस आकडेबाज मिशीला पीळ देत म्हणतोय - ‘खाईन तर तुपाशी!’ ती जाहिरात मला दाखवल्यावर तिच्यात मी फक्त एक शब्द टाकला आणि जाहिरात बदलली -

‘खाईन तर वारणा तुपाशी!’ 

त्यातून मला त्या माणसाची मिजास आणि वारणाचं महत्त्व ठसवायचं होतं. ते साध्य झालं.

माझा मूळ पिंड कवीचा. मग जाहिरातबाजी ही कारागिरी नव्हे का असा प्रश्न काही रसिक मला विचारतात. खरंतर या दोन्हीमधला मूलभूत फरक लक्षात घ्यायला हवा. कविता ही अंतःस्फूर्तीने होते तर लेख, फीचर, जाहिराती वगैरे गोष्टी बाह्यस्फूर्तीने होतात. प्रतिभा अव्याख्येय आहे वगैरे हे सोडा! पण निर्माणक्षम कलावंत असेल तर या दोन्ही ठिकाणी प्रतिभेचा स्पर्श होतोच. जाहिरातीतही क्रिएटिव्हिटीचा भाग असतोच.

ऱ्हायमिंग हे इंग्रजीला प्रतिकूल पण यमकाशिवाय मराठी जाहिरात पटतच नाही म्हणूनच तिथं लोकगीतं येतात; म्हणी, वाक्प्रचार येतात. त्या-त्या ठिकाणी यमक आहे. उदाहरणार्थ, ‘कशात काय अन्‌ फाटक्यात पाय!’ यमक असल्याशिवाय ते जिभेवर खेळत नाही. तसा मथळा यमकासहित यावा.

मथळे ओढूनताणून करता येत नाहीत. मथळा सुचणं ही गोष्ट कविता सुचण्यासारखी. काही वेळेस मथळ्यासाठी बाह्यचालना उपयोगी पडते. काही वेळेस अंतःस्फूर्तीनं अचानकपणे तो सुचतो. काही घड्याळं चावीची तर काही अ‍ॅटोमॅटिक असतात. तसंच हे! म्हणूनच बॉडी - कॉपी लिहिताना जेवढा आनंद मला होत नाही त्यापेक्षा जास्त आनंद मला हेडलाईन/बेसलाईन लिहिताना होतो.

कॉपी लिहिताना मनासारखं उतरत नाही तोपर्यंत फार त्रास होतो पण एकदा का मनासारखं यायला लागलं की नवनिर्मितीचा आनंद होतो मात्र कवितेइतकं मन इथे रमत नाही. कवितेच्या निर्मितीचा आनंद काही औरच असतो. जाहिरातीचा उद्देश ‘कॅचिंग अ‍ॅट्रॅक्शन’ तर कवितेचा उद्देश ‘सेल्फ एक्स्प्रेशन’ असतो. कवितेच्या आनंदात आपण इतरांना सामील करून घेतो हा मोठा भाग.

ओगीलव्ही म्हणतो - ‘पुष्कळशा कॉपी अशा असतात की, त्या लिहिणाऱ्याला आणि त्याच्या टोळक्यालाच फक्त आनंद देतात पण त्यापासून विक्रेत्याला किंवा ग्राहकाला आनंद होत नाही.’

पण एखाद्या जाहिरातीचं विडंबन व्हायला लागलं की समजावं, ही जाहिरात रुरुजलीय. माझ्या ‘पत्र नव्हे मित्र’चं बाळासाहेब ठाकरेंनी ‘म.टा.’वर टीका करताना म्हटलं - ‘हे पत्र नव्हे कुत्र’. या प्रतिक्रियेवर माझी प्रतिक्रिया जेव्हा विचारण्यात आली तेव्हा मी म्हटलं - ‘तेवढं जरा ‘कुत्र’च्या ‘त्र’ वर अनुस्वार द्या.’

‘म.टा.’च्या माझ्या जाहिरातीवर अनुकूल-प्रतिकूल प्रतिक्रिया आल्या. हिचं विडंबन झालं कारण ती जनमानसात रुजली होती. विडंबन करतानाही भलत्याच गोष्टीचं विडंबन करून चालत नाही. मूळ गोष्ट जर ज्ञात नसेल तर त्या विडंबनाला अर्थच राहणार नाही.

जाहिरात क्षेत्रात मला पदोपदी वाईट अनुभव आले. येतातही. एजन्सीज्‌चेही येतात. ज्यांना माझी भाषा कळत नाही अशी माणसं एजन्सीज्‌मध्ये मोठमोठ्या हुद्द्यांवर असतात त्यामुळे तिथं माझा सुसंवाद होऊ शकत नाही. इंग्रजी कॉपी लिहिणाऱ्याकडेच क्रिएटिव्हिटी असते असा त्यांचा समज असतो. भाषांतराच्या क्षेत्रातही काही ‘चिपू जॉन’ शिरलेले आहेत. भाषांतरापेक्षा ‘मराठी अवतार’ अधिक महत्त्वाचा हे एजन्सीला कळतच नाही. माझ्याकडे अनुवाद करायला देण्यापेक्षा त्यांनी त्रोटक माहिती पुरवून मराठी ‘अवतार’ करायचं स्वातंत्र्य दिलं तर ते मनापासून, मन लावून करता येतं. त्यात आनंद वाटतो.

‘कॉपीरायटर’पेक्षा एजन्सीज्‌ना क्लायन्ट मोठा वाटतो हे खरं दुःख आहे. आम्ही या जाहिरात क्षेत्रातले जाणकार आहोत असं एकही एजन्सी कोणत्याही उद्योगपतीला, उद्योगसमूहाला सांगू शकत नाही कारण त्यांना मोठा लाभ देणारं गिऱ्हाईक तोडायचं नसतं. याउलट ज्यांना जाहिरातीची शक्ती, ताकद माहीत नसते ते मोबदलाही अल्प देतात. एकदा एका मोठ्या कॉपीचं जे मानधन मी घेतलं त्यापेक्षाही अधिक मानधन मी दोन ओळींसाठी घेतलं. त्या अशा - 

‘अस्सल लाकूड, भक्कम शिसे
कॅमल पेन्सिल फक्कड दिसे.’ 

यासाठी मी माझ्या एका कवितेचा बळी दिला. मी अधिक मोबदला मागताच मला एजन्सीनं स्पष्टीकरण विचारलं. मी म्हटलं - ‘त्या कॉपीनं जेवढं सांगता येणार नाही त्यापेक्षाही कितीतरी अधिक या दोन ओळींनी सांगितलंय. कमी शब्दांत अधिक आशय सांगितलाय.’

...पण कधी मनाविरुद्धही लिहावं लागतं तेव्हा आनंद होत नाही. जाहिरात करायच्या मालाशी आपला काडीमात्रही संबंध नसतो तरीही कॉपी लिहावी लागते. तशी कॉपी मी लिहिली, ती ‘केअरफ्री’ या सॅनिटरी नॅपकीनची. ही कॉपी लिहिणं हाही एक अनुभवच. जाहिरात करताना तिनं दीपवलं पाहिजे एवढं मात्र मी कटाक्षानं पाहतो. ग्राहक दीपून जातो की नाही ते मालाच्या विक्रीतून आणि जाहिरातीची लोकप्रियता विडंबनातून स्पष्ट होते. 

(शब्दांकन - अरुण घाडीगावकर)

- वसंत बापट 

(चिन्ह दिवाळी अंक 1988)


साधना साप्ताहिकाच्या तीन भूतपूर्व संपादकांचा जन्म 1922 चा. त्यांचे जन्मशताब्दी वर्ष आता सुरू होत आहे. वसंत बापट यांचे जन्मशताब्दी वर्ष 25 जुलै रोजी, ग.प्र. प्रधान यांचे 26 ऑगस्टला तर यदुनाथ थत्ते यांचे 5 ऑक्टोबरला. त्या संदर्भातील निवेदन करणारा साधनाचे विद्यमान संपादक विनोद शिरसाठ यांचा हा पाच मिनिटांचा व्हिडिओ...

 

Tags: वसंत बापट पुनर्भेट कॉपीरायटिंग जाहिरात Vasant Bapat Advertising Copywriting Load More Tags

Comments:

विष्णू दाते (कांदिवली)

साधना चा हा उपक्रम अत्यंत स्तुत्यच आहे! तिन्ही दिग्गज अतिशय थोर आहेत! वर्षभर त्यांच्या संबंधी ऐकायला खूप उत्सुक आहोत!

अरुण कोळेकर ,सासवड

वेगळा लेख , वसंत बापट यांच्यातील जाहिरात क्षेत्रातील अनोखा अनुभव वाचनात आला.

सुरेश पुंड

छान लेख .

Add Comment