फ्रेंच भाषा आणि फ्रान्स

'जागतिक मातृभाषा दिना'निमित्त 

कर्तव्य साधना

21 फेब्रुवारी हा दिवस जगभर आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने जपान, जर्मनी आणि फ्रान्स या तीन देशांतील  अनुक्रमे जपानी, जर्मन आणि फ्रेंच या भाषांचे त्या त्या देशातील स्थान या विषयी तीन लेख प्रसिद्ध करत आहोत. त्यापैकी फ्रेंच भाषेचा प्रवास मांडणारा हा लेख.  

पश्चिम युरोपातील एक महत्वाचा देश म्हणजे फ्रान्स. या देशाची लोकसंख्या 8.7 कोटी इतकी आहे. या फ्रान्सच्या उत्तरेकडील भाग एकेकाळी ‘गोल’ या नावाने ओळखला जायचा. पण रोमन साम्राज्याच्या विस्तारावेळी जर्मन भाषक फ्रांक जमातीच्या आक्रमणाने हा प्रदेश नेस्तनाबूत केला. त्या सोबतच ‘गॉलिक’ या स्थानिक भाषेच्या बहुतेक खुणाही पुसल्या गेल्या. त्यामुळे भाषेचे मरण ही म्हटली तर खूप सोपी गोष्ट आहे; दोन तीन पिढ्यांत एखादी भाषा कशी गारद होऊ शकते याचा अनुभव फ्रेंच भाषकांना फार पूर्वीच आला होता. 

सोळाव्या शतकात चर्चमधील प्रवचने स्थानिक भाषेतच होत. व्यवहाराची भाषाही एकसंध नव्हती. भौगोलिकदृष्ट्या फ्रान्सचा आकार महाराष्ट्राच्या साधारण दुप्पट आहे. त्यामुळे तेथे निरनिराळ्या बोली असणे स्वाभाविक होते. इतके की फ्रान्समधील मासिफ साँत्राल या पर्वताच्या उत्तरेला साध्या ‘हो’ साठी oil (ओय) तर दक्षिणेला oc (ऑक) म्हणत. दक्षिणेकडच्या एका बोलीचे नावच langue d’oc (ऑकवाली भाषा) आहे. मात्र राजकीय कामकाजाची भाषा फ्रेंच असेल असा आदेश फ्रांस्वा प्रमिए म्हणजे फ्रांस्वा राजा - पहिला याने 1539 मध्ये काढला. ही घटना फ्रेंचच्या राजकीय प्रतिष्ठेची नांदी ठरली. त्यानंतर दहा वर्षांनी म्हणजे 1549 मध्ये जोआकिम द्यु बले या कवीने ‘La defense et illustration de la langue française’ म्हणजे ‘फ्रेंच भाषेचा पुरस्कार’ या शीर्षकाचा लेख लिहिला. फ्रेंच भाषा सक्षम असून लॅटिन भाषेऐवजी फ्रेंचमधूनच लिखाण केले पाहिजे अशी भूमिका त्याने त्या लेखातून मांडली. सोळाव्या शतकातील या दोन महत्वाच्या घटना फ्रेंच भाषेला नवचैतन्य देणाऱ्या ठरल्या. फ्रेंच भाषेला फ्रान्समधे ‘फ्रांसे’ म्हणतात. तर ही फ्रांसे ज्ञानभाषा होऊ शकते हा महत्त्वाचा आशावादही फ्रेंच जनतेला मिळाला तो याच काळात.

पण केवळ आशावाद पुरेसा नसतो. कोणतीही भाषा सुलभतेने व प्रमाण पद्धतीने वापरण्यासाठी त्या भाषेचे अधिकृत व्याकरण आणि शब्दकोश हे दोन महत्त्वाचे घटक आवश्यक असतात. ही बाब लक्षात घेऊन 1635 मध्ये ‘Académie Française’ या समितीची स्थापना करण्यात आली. या समितीने भाषाशुद्धी व प्रमाणीकरण यासाठी बरेच प्रयत्न केले. 1694 मध्ये त्यांनी फ्रेंच भाषेतील पहिला शब्दकोश प्रसिद्ध केला. आजवर त्याच्या आठ आवृत्त्या निघाल्या आहेत. सतराव्या शतकातील प्रसिद्ध गणितज्ञ आणि तत्ववेत्ता रने देकार्त याने आपले लिखाण प्रारंभी लॅटिन व फ्रेंच अशा दोन्ही भाषेत केले. पुढे आपले साहित्य केवळ फ्रेंचमध्ये भाषांतरित करून त्याने आपल्या कीर्तीचा उपयोग फ्रेंच भाषेला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी केला.

त्याकाळी श्रीमंत सरदार घराण्यांतील स्त्रिया त्यांच्या salon म्हणजे दिवाणखान्यात साहित्यिक आणि तत्त्ववेत्ते यांच्या काव्य-शास्त्र-विनोदावर मैफली भरवत. फ्रेंच बोलणे म्हणजे सुसंस्कृत असणे असा दबदबा  सतराव्या आणि अठराव्या शतकातील युरोपात नक्कीच निर्माण झाला होता.    

अठराव्या शतकाच्या शेवटी झालेल्या राज्यक्रांतीनंतर फ्रेंच ही अधिकृत राष्ट्रभाषा झाली. प्रथमच राज्यघटना लिहिली गेली व शासनव्यवहार फक्त फ्रेंचमधे होईल यावर शिक्कामोर्तब झाले. देशाला एकसंधता प्राप्त व्हावी म्हणून चलनाबरोबरच भाषाही एकच असण्याचा दंडक तडकाफडकी राबवण्यात आला. प्रत्येक गावात एकतरी शासकीय शाळा निघाली आणि सर्वत्र फ्रेंचमधूनच शिकवले जाऊ लागले. 

सतराव्या शतकातच व्याकरण लिहिले गेल्यामुळे फ्रेंच भाषेचे प्रमाणीकरण झालेले होते. इतर स्थानिक भाषांबाबत हे झाले नव्हते आणि त्या बोलींना सामाजिक, राजकीय प्रतिष्ठाही नव्हती. अठराव्या शतकाच्या शेवटी नेपोलिअनचा उदय झाला आणि त्याने फ्रेंच भाषेशी संबंधित अनेक कायदे केले. त्याच्याच काळात पिनल कोड (दंडविधान) फ्रेंचमधे लिहिला गेला. प्रत्येक टप्प्यावर फ्रेंच भाषेबाबत शासनकर्त्यांची भूमिका महत्त्वाची होती हे लक्षात येते. या सर्व धोरणांमुळे ब्रतों, नॉर्मां, पिकार, प्रोव्हाँसाल, गास्कॉं व बास्क या स्थानिक भाषा मात्र नामशेष झाल्यात जमा झाल्या.

सामान्य जनतेने फ्रेंचचा वापर अधिकाधिक केल्यानेच त्या भाषेला बळ आले हेही खरे. सतराव्या शतकात जीवशास्त्र तर अठराव्या शतकात भौतिक व रसायनशास्त्र या ज्ञानशाखांचा विस्तार झाला. यावेळी शास्त्रीय परिभाषेसाठी ग्रीक व लॅटिन शब्द उपयोगात आले तरी त्या संकल्पनांचे विश्लेषण व प्रसार फ्रेंचमधूनच झाला. सॉर्बोन  हे फ्रान्समधील सर्वांत प्राचीन विद्यापीठ. त्याची स्थापना बाराव्या शतकातील. सुरुवातीला ते चर्चच्या अधिपत्याखाली होते. त्यामुळे तेथे लॅटिन व ग्रीक भाषांमधून शिक्षण दिले जात होते. मात्र राज्यक्रांतीनंतर सुमारे 100 वर्षे ते बंद होते. ते पुन्हा सुरु झाले तेव्हा त्याला फ्रान्सचे राष्ट्रीय कायदे लागू झाले व फ्रेंच हीच ज्ञानभाषा बनली. मानवी हक्कांची पहिली सनदही फ्रेंचमधूनच लिहिली गेली.

विसाव्या शतकात फ्रान्सचे व फ्रेंच भाषेचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्व कमी झाले. ब्रिटनच्या वसाहती तसेच उत्तर अमेरिका खंडांतील देशात इंग्लिशच्या वापराने ती अधिक महत्त्वाची ठरली. तरीही शाळांमध्ये फ्रेंचखेरीज दुसरी भाषा शिकवणे तितकेसे प्रचलित नव्हते. अगदी अलीकडे 1980च्या दशकापर्यंत मर्यादित स्वरुपात द्विभाषा, बहुभाषा धोरण राबवण्याबाबतही शिक्षणक्षेत्रात दुमत होते. युरोपियन युनियनच्या (युरोप खंडातील 28 देशांची संघटना) निर्मितीमुळे  फ्रान्सला आपले भाषिक धोरण पुन्हा एकदा तपासावे लागले. दुसऱ्या महायुद्धानंतर अस्तित्वात आलेल्या पाचव्या राज्यघटनेमध्ये फ्रेंच ही फ्रान्सची भाषा हे अधिकृतपणे कुठेच म्हटले नव्हते. 1992 मध्ये घटनादुरुस्तीद्वारे तसे नोंदवले गेले. 

व्यवहार करताना जिथे इंग्रजी किंवा इतर भाषांचा वापर होईल तेथे बरोबरीने फ्रेंच असली पाहिजे असा नियम फ्रान्समध्ये करण्यात आला आहे. या कायद्याच्या विविध कलमान्वये सार्वजनिक जीवनात फ्रेंचच्या वापराबाबत पुष्कळ दंडक घालण्यात आले आहेत. ग्राहकांना वस्तू व सेवा देणाऱ्यांनी फ्रेंचचा वापर करावा; करारमदार, सेवाशर्ती फ्रेंचमध्ये लिहिलेल्या असाव्यात; शिक्षणाचे माध्यम फ्रेंच असावे; नभोवाणी व दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम तसेच जाहिराती फ्रेंचमधून असाव्यात; कोणत्याही कंपनी वा संस्थेच्या चिन्हामध्ये परकीय भाषेतील वाक्प्रचार वा शब्द असू नयेत आणि या सर्व बाबींच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलीस यंत्रणेला पुरेसे अधिकार बहाल केलेले आहेत.

1989 मध्येच 'Délégation générale à la langue française' (DGLF) ही शिखर समिती स्थापन झाली होती. सरकारी व खाजगी संस्थांच्या व्यवस्थापनांत फ्रेंच भाषेचा योग्य वापर तसेच प्रसार यासाठी प्रोत्साहन देणे व समन्वय साधणे यासाठी ती कार्यरत होती. मात्र ‘प्रादेशिक व अल्पसंख्याकांच्या भाषेची युरोपिअन सनद’ या संहितेवर फ्रान्सने सही केल्यामुळे (संहिता स्वीकारली असे नाही – signed but not ratified) या संस्थेला अधिक व्यापक रूप देण्यात आले. ही संस्था 'DGLFL'-'Délégation générale à la langue française et aux langues de France' म्हणजे फ्रेंच व फ्रान्सच्या इतर भाषांची शिखर समिती बनली. ‘राष्ट्रीय स्तरावर फ्रेंच भाषेचा प्रसार करणे, आंतरराष्ट्रीय स्तरावर संपर्क भाषा म्हणून तिचा वापर करण्याचा प्रयत्न करणे आणि सांस्कृतिक वैविध्य जपण्यासाठी बहुभाषकत्वाचे संवर्धन करणे’ हे या संस्थेचे उद्दिष्ट बनले. पद्धतशीरपणे खच्चीकरण केलेल्या प्रादेशिक भाषांना यामुळे थोडे बरे दिवस आले. ब्रतों, नॉर्मां इ स्थानिक फ्रेंचेतर भाषांची तीन चार शतके गळचेपी झाली. त्याचे थोडेफार परिमार्जनही या बदलामुळे झाले.

पण आता पालकच मुलांनी निवडलेली दुसरी भाषा ही आंतरराष्ट्रीयच असावी असा आग्रह धरतात. त्यातही त्यांचा कल इंग्रजीकडेच आहे. त्या खालोखाल स्पॅनिश, जर्मन यासारख्या शेजारी देशांच्या भाषाही येतात. 2008 मधील एका अहवालानुसार वीसपेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या आस्थापनांतील 26 टक्के लोकांना कामाच्या ठिकाणी फ्रेंचखेरीज इतर भाषा वापरावी लागते व त्यातील 89 टक्के वापर हा इंग्रजीचा असतो. 

सरकारचे फ्रेंच भाषेला भक्कम पाठबळ आहेच. पण फ्रेंच लोकही आपल्या भाषेच्या वापराबाबत जागरूक आहेत. अनेक स्वयंसेवी संस्था निरनिराळ्या प्रकारे फ्रेंचच्या वापराबाबत जनजागृतीचे काम करतात. उदा. युरोपियन युनियन अस्तित्वात आल्यापासून कोणत्याही वेष्टनावर युरोपातील किमान चार भाषांत मजकूर असणे बंधनकारक असते. दुकानातील वस्तूवर फ्रेंचमध्ये माहिती नसल्यास त्या वस्तूचा अख्खा साठा दुकानातून काढून वितरकाला परत करायला या स्वयंसेवी संस्थेचे स्वयंसेवक भाग पाडतात. आणखी एक मजेशीर गोष्ट.  'Académie de la Carpette anglaise’ नावाची खाजगी संघटना 1999 पासून दरवर्षी, सार्वजनिक जीवनात अधिकारपद भूषवणाऱ्या पण इंग्रजीची भलामण करणाऱ्या व्यक्तीला एक उपरोधिक पुरस्कार जाहीर करते, त्याचे नाव prix d'indignité civique म्हणजे ‘नागरी अपमान पुरस्कार’.

विविध प्रकारचे आणि सतत अद्ययावत होणारे शब्दकोश, ज्ञानकोश फ्रेंच भाषेच्या वापरास व प्रसारास मदत करतात. केवळ शब्दकोश निर्मितीला वाहिलेल्या दोन प्रमुख प्रकाशनांचा या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे. त्यापैकी Larousse (लारूस) ही प्रकाशन संस्था 1882 मध्ये तर Le Robert (ल रोबेर)  1951 मध्ये स्थापन झाली. 

शिक्षणाचे माध्यम फ्रेंचच असल्यामुळे फ्रान्समध्ये स्थलांतरित होऊन आलेल्या परदेशी मुलांना तर फ्रेंच भाषा येतेच, पण त्यांच्यातील प्रौढांनाही फ्रेंच समाजात सामावून घेण्यासाठी भाषा शिक्षणाचे सरकारी व निमसरकारी असे अनेक उपक्रम असतात. अ-फ्रेंचभाषकांसाठी फ्रेंच भाषा शिकवणारी नवनवीन पुस्तके नियमित प्रसिद्ध करणाऱ्या चार-पाच मातब्बर प्रकाशन संस्थाही तेथे कार्यरत आहेत. थोडक्यात काय तर, आपल्या भाषेबाबत सजग राहिलेला फ्रेंच समाज मातृभाषा दिन दररोजच आनंदाने साजरा करतो असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही.

- उज्ज्वला जोगळेकर 
ujoglekar@gmail.com

(लेखिका फ्रेंच भाषेच्या प्राध्यापक असून त्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परकीय भाषा विभागाच्या प्रमुख आहेत.)

Tags: फ्रेंच भाषा उज्ज्वला जोगळेकर French Language जागतिक मातृभाषा दिवस Load More Tags

Comments:

प्रदीप पाटील,वसई

खूपच मौलिक व प्रेरणादायी लेख.धन्यवाद, उज्ज्वला मॅडम !

Add Comment