स्वामी रामानन्द तीर्थ यांचा जन्म कर्नाटकातला, बरेचसे शैक्षणिक कार्य व राजकीय कार्य मराठवाड्यातले, त्यांचे राजकीय नेतृत्व तेलंगणात पूर्णपणे विकास तेलंगणातला. अशा रीतीने हैदराबाद संस्थानातल्या सर्व प्रदेशांचे म्हणजे साऱ्या संस्थानचे असे जे अगदी थोडे पुढारी होते त्यांपैकी स्वामीजी एक होते. त्यांचे आत्मचरित्र म्हणजे हैद्राबाद मुक्तिसंग्रामाच्या आणि स्वामीजींच्या कार्यकर्तृत्वाच्या संदर्भातील आद्य आणि सर्वांत महत्त्वाचा दस्तऐवज आहे. मूळ इंग्रजी आत्मचरित्र 1967 मध्ये आले, वि. पां. देऊळगावकर यांनी केलेला मराठी अनुवाद 1976 मध्ये प्रसिद्ध झाला. (दोन्ही भाषांत पॉप्युलर प्रकाशनाकडून पुस्तक आले). गेली काही वर्षे हे पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध नव्हते. या पुस्तकाच्या प्रकाशनाला लवकरच पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत, तर त्याची नवी आवृत्ती साधना प्रकाशनाकडून यावी. असा प्रस्ताव अतुल देऊळगावकर यांनी शिरीष खेडगीकर व किशोर देऊळगावकर यांच्या संमतीने दिला. साने गुरुजींनी सुरू केलेल्या साधना प्रकाशनाकडून स्वामीजींचे आत्मकथन येणे औचित्यपूर्ण होईल, या विचाराने हा प्रस्ताव आम्ही स्वीकारला. येत्या 14 सप्टेंबर 2025 ला या नव्या आवृत्तीचे प्रकाशन छत्रपती संभाजी नगर येथे होणार आहे. या आगामी पुस्तकातील हे एक प्रकरण -
विद्यार्थ्यांचा सहवास अगदी अव्याज अंतर्बाह्य पावन असा होता. ते माझा आत्मा संपन्न करीत होते. त्यांच्या सेवेत मला परमावधीचा दिव्य अनुभव प्राप्त होई. 'याहून निराळे ईश्वरसदृश असे काय असू शकते?' असा प्रश्न मी स्वतःलाच विचारीत असे. ईश्वर म्हणजे पावित्र्य असे म्हणतात. लहान लहान विद्यार्थ्यांच्या स्वरूपात इथे परमेश्वरच वास करीत होता. तो प्रेममय आहे आणि मी निरंतर त्या प्रेमाचा सुखास्वाद घेतला. अव्यक्तपणे व नकळत माझ्या मनात आध्यात्मिक वृत्तीचा विकास होत होता. तेथील वातावरण भक्तिभावाने व निर्मलतेने भारावून गेले होते. त्या भक्तिभावाचा व निर्मलतेचा मी मनमुराद अनुभव घेतला. निवांत अशा ग्रामीण परिसराने माझ्यामधील आध्यात्मिक प्रवृत्ती अधिक बळावत चालली. काळोख्या रात्रीतील एकान्तवासाचा आनंद मी भरपूर लुटला. माझ्यामध्ये अंतर्मनात काहीतरी पालवत होते आणि तेही अति वेगाने. मी तासन् तास गूढ अशा आत्मशोधनात घालवीत असे. काम हे मला काम असे वाटलेच नाही. उलट मला काम म्हणजे सारा आनंद, सारी सेवा, सारा नियोजित असा ईश्वरी प्रसाद वाटे.
दिवसभराचे काम संपल्यावर दूर असलेल्या ओढ्याकाठी मी जाऊन बसे आणि ओढ्याच्या वाहत्या पाण्याबरोबर मी काही गुणगुणे. आंबराईतील आम्रवृक्षांच्या फांद्यांवर असलेल्या असंख्य पक्ष्यांच्या गायनात दंग होऊन मी देहभान विसरून जाई. अंतःस्थ आत्मतत्त्वात मी अधिकाधिक गढून जाऊ लागलो. अंतर्यामीचा ग्रंथ अंतःस्फूर्तीने स्पष्ट होऊ लागला. मी त्या ग्रंथाचे पान अन् पान उघडू लागलो अन् आध्यात्मिक अनुभवाची मला प्राप्ती होऊ लागली. डी नदीवरील चक्कीवाल्याप्रमाणे मीही गुणगुणू लागे -
I envy nobody, no, not I
And nobody envies me!
हेवा कुणाचाही नसे माझ्या मनी ।
माझा हेवा करी असा नाही कुणी ।।
लगेच आतला आवाज सांगू लागे की, हा सारा 'त्याचा' खेळ आहे. दैवी स्पर्श होईपर्यंत मी तसाच ध्यानस्थ राही. एखाद्या पक्ष्याचे कूजन मला सर्व बंध तोडून सर्व पाशांपासून मुक्त होण्यास सांगे. त्यामुळे मी ऊर्ध्वगामी होऊन उदात्त पातळीवर जाऊन पोहोचत असे. तेथे मी एकटाच असे. त्या स्थितीत 'तू देवत्वासाठी वेडा झाला आहेस का?' असा प्रश्न आतला आवाज विचारी. मी बुचकळ्यात पडे. पण पुन्हा धैर्य धरून सांगे, 'मी देवांश बनेन.' संत मीराबाई ज्याप्रमाणे स्वतःला गोपी कल्पून कृष्णभक्तीने भारावून जात असे, बोट भाजतेय याचेही तिला भान राहात नसे, तशी माझी अवस्था झाली; सूरदासाची पदे म्हणत मी रडत असे आणि रामकृष्ण परमहंसांच्या सहवासात मला तंद्री लागे. विवेकानंदांच्या प्रखरतेने मला शुद्ध बनविले. मी अंगाला राख फासून बैरागी बने. मी धुनी पेटवून त्या धुनीच्या ज्वालांत स्वतःचे व्यक्तित्व नष्ट करून टाकीत असे. ती धुनी सारे किरण भस्मसात करून टाकी. तो काल प्रखर अशा आध्यात्मिक प्रशिक्षणाचा होता.
काही मित्रांचा सहवास मला चांगला अनुभव मिळण्याच्या दृष्टीने साहाय्यक ठरला. सुदैवाने त्या ठिकाणी आधीच भक्त सेवकांचा एक संघ उदयाला येत होता. 'मानवसेवा ही ईशसेवा' असे त्या मित्रांचे ब्रीदवाक्य होते. ईशसेवेने आत्मसाक्षात्काराकडे ते जात होते. मी त्यांना जाऊन मिळावे का? ते मला आपल्या संघात दाखल करून घेतील का? संघाची आवश्यकता आहेच का? संघात राहून आत्मसाक्षात्कार साध्य होऊ शकेल का? कधी कधी मला वाटू लागे की आत्मसाक्षात्काराचा मार्ग हा एकाकी आहे. 'जीवनपथावरील शेवटच्या टप्प्याचा प्रवास एकट्याएकट्यानेच करावयाचा असतो' असे आज भारताचे राष्ट्रपती असलेल्या डॉ. राधाकृष्णनसारख्या श्रेष्ठ तत्त्ववेत्त्यांनी सांगिलले आहे. या सयुक्तिक उपदेशाचे पालन का करू नये? पण ईश्वरवेड्या लोकांचा सहवासही तितकाच स्फूर्तिप्रद असतो. आमच्या येथील एका झोपडीत चालत असलेल्या सत्संगाबद्दल काही महिन्यांपर्यंत तर मला काहीच माहिती नव्हती. मला तेथे प्रवेश नव्हता. त्यांच्यापैकी एक होण्याइतकी योग्यता माझ्या ठिकाणी नाही, असे कदाचित ते समजत असावेत. संघाचे सदस्य आध्यात्मिक अनुभवांनी संपन्न होत होते असे मी ऐकले होते.
काही काळ मी असाच एकाकी मार्ग आक्रमिला, पण दैवयोगाने एके दिवशी रात्री त्या संघात येण्याचे मला निमंत्रण आले. मला विलक्षण आनंद झाला. तेथे अगदी दिव्य वातावरण पसरले होते, 'परमेश्वरासाठी मी सर्वस्वाचा त्याग करण्यास सिद्ध आहे का?' असा मला प्रश्न विचारण्यात आला. 'हो' असे म्हणण्याची मला कुणीतरी प्रेरणा दिली. मला भिक्षेवर राहावे लागेल असे सांगण्यात आले. मी लगेच तेथेच शपथ घेतली. पुढील संक्रांतीचा दिवस निश्चित झाला. त्या दिवसापासून मी भिक्षावृत्तीच्या जीवनाला आरंभ करायचे ठरविले. त्यामुळे संन्यास दीक्षेची मी पूर्वसिद्धताच करीत होतो.
त्यानंतर संन्यासमार्गाने जीवन व्यतीत करण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करू लागलो. मी विवेकानंदांचे ग्रंथ वाचून काढले. माझ्यासमोर ते उभे आहेत असे मला वाटू लागले. त्यांची भेदक दृष्टी माझ्या अंतर्यामाचा छेद करून जाऊ लागली. मला कटिवस्त्रधारी रामतीर्थ दिसू लागले. माझ्या हृदयमंदिरात मी त्यांची स्थापना केली. आपणास अजूनही स्फूर्ती देणाऱ्या भारताच्या नग्न फकिराचे मला स्मरण होई. मी अपरिग्रहाची सवय लावून घेऊ लागलो.
माझ्या कामातून सवड मिळाली म्हणजे व कामात निमग्न असतानाही मी पुढील मराठी गीत म्हणत असे. त्या गीतानुसार स्वतःला घडविण्याचा प्रयत्न करीत असे. ते गीत नेहमीच माझ्या ओठांवर असे.
अशाश्वत संग्रह कोण करी?
चिरगुटचिंध्या जोडुनि कथा गोधडी हीच बरी
कोण करी घर सोपे माझ्या झोपडी हेचि बरी;
नित्य नवे जे देइल माधव, भक्षु तेचि घरी
अमृत म्हणे मज भिक्षा डोहळे, येति अशा लहरी.
माझ्याजवळ असलेल्या सर्व वस्तूंचा मला त्याग करावयाचा होता. तसे पाहिले तर माझ्याजवळ माझे असे म्हणण्यासारखे, काहीच नव्हते. फार दिवसांपासून एका फाटक्या ओव्हरकोटाखेरीज माझ्याजवळ मी काहीच ठेवले नव्हते. तोच काय तो माझा पोशाख होता. एका विद्यार्थ्याने मला एक घोंगडी दिली होती. 14 जानेवारी 1930 मकरसंक्रांतीच्या दिवशी शाळेतील हिशोबवहीत माझ्या नावावर जी रक्कम शिल्लक होती ती मी गरीब विद्यार्थी साहाय्यक फंडाकडे वळती केली. अशा रितीने मी निष्कांचन झालो. माझी शिल्लक शून्य आहे, असे माझ्या एका विद्यार्थी मित्राला मी कळविले.
त्या मंगल दिवशी मी पहाटे तीनलाच उठलो व ध्यान केले. जीवनाचा जो नवा मार्ग मी अवलंबीत होतो, त्या मार्गाविषयी माझ्या ठिकाणी खरोखरीच निष्ठा होती का? असा मी स्वतःलाच प्रश्न विचारला. मी प्रामाणिक आहे, याची मला जाणीव झाली. मित्रमंडळी सकाळी सातच्या सुमारास जमा झाली. आम्ही भक्तिपर पदे म्हटली. कुणीतरी तो फाटका ओव्हरकोट घेतला आणि मला खादीचे कापड दिले. अमृत कवीचे वरील पद सर्वांनी एकसुरात गायिले. मी भिक्षापात्र घेऊन त्या गावातील काही घरी जाऊन आलो. (माझ्याबरोबर सर्व मित्रमंडळी होती) त्या वेळी मला दैवी अंशाच्या दृष्टीने माझी खूपच उन्नती झाल्यासारखे वाटले. हा क्रम काही वर्षे चालला; आणि माझी आध्यात्मिक स्वानुभूती वाढत चालली.
हिप्परग्याचे आध्यात्मिक वातावरण मला अगदी पोषक होते आणि त्या वातावरणात माझा खूपच विकास झाला. आजपर्यंत जे मी कधी अनुभवले नव्हते ते मला हळूहळू स्पष्ट होऊ लागले. सकाळचे वर्ग संपताच मी हातात झोळी घेऊन गावात भिक्षेला निघे. तळ्याकाठी एका मंदिरापाशी बसून त्या वेळी तेथे जो कोणी असेल त्यालाही बरोबर घेऊन भिक्षेतील अन्न मी सेवन करीत असे. ते झाल्यानंतर पुन्हा मी माझ्या कामात गर्क होऊन जाई. मी गाणी म्हणे. ध्यानमग्न होत असे. सूक्ष्म असा आत्मशोध मी सुरू केला. मला योग व प्राणायामाची काहीच माहिती नव्हती. खरे पाहता त्या बाबतीत मी अज्ञानीच होतो. तसेच वेदान्तावरील मोठे ग्रंथ वाचण्याचे मी कधी कष्ट घेतले नाहीत.
मी अभ्यास केला, असे ज्याबद्दल सांगता येईल असा एकच ग्रंथ होता, तो म्हणजे 'भगवद्गीता'. 1941 मध्ये निजामाबाद तुरुंगात राजबंदी असताना मी उपनिषदे वाचली. मला जे आध्यात्मिक पाठ मिळाले, ते त्या लहानशा प्रशांत निर्झराच्या प्रशांततेत व इवल्याशा पक्ष्यांच्या किलबिलीत व काळोख्या रात्रीच्या एकान्तात. इतर कोणापेक्षाही निसर्गच माझा श्रेष्ठ गुरू बनलेला आहे.
त्या काळात काही साधू सत्पुरुष त्या ठिकाणी येऊन गेले. ते फारसे प्रसिद्ध नाहीत. शरीराने ते आज आपल्यात नाहीत. एका संन्याशाने मात्र माझ्या मनावर न मिटण्यासारखा खोल असा ठसा उमटविला. त्याने आपले नाव मला कधीच सांगितले नाही. 'नावात काहीच नाही. सर्वच आत्मस्वरूप आहे' असे ते सारखे म्हणत. त्यांचे वय पाऊणशे वर्षांचे होते. वयाच्या 12 व्या वर्षी त्यांनी संन्यास दीक्षा घेतली होती. ते कोणतेही वाहन वापरीत नसत किंवा राहायला त्यांना झोपडीही नव्हती. ते निसर्गाच्या सान्निध्यात नैसर्गिकपणेच जीवन व्यतीत करीत असत. ते फार थोडे बोलत. माझ्यावर त्यांचा नितांत लोभ होता. त्यांच्या सहवासातील अधिक काळ त्यांचे मौनच असे. पण त्या मौनातसुद्धा मला असे वाटे की, ते माझ्या आत्म्यात काहीतरी ओतीत आहेत. प्रक्षेपण करीत आहेत. ते काय याचे पृथक्करण मी कधीच करू शकलो नव्हतो किंवा त्याची शहानिशा करण्याची इच्छाही मला कधीच झाली नाही. त्या संन्याशांचा सहवास लाभण्याइतका मी भाग्यवान होतो याचाच मला आनंद वाटतो. माझ्यापासून जाण्यापूर्वी त्यांनी मला एक कफनी दिली होती. माझ्या भावी प्रगतीच्या दृष्टीने त्या कफनीचा मला फारच उपयोग झाला. अत्यंत महत्त्वाची वस्तू या दृष्टीने ती मी माझ्याबरोबर बाळगीत असे. निसर्गक्रमाप्रमाणे ती जीर्ण होऊन फाटून गेल्यामुळे आज ती कफनी माझ्याजवळ नाही.
दुसरे एक साधू मला दर संक्रांतीच्या दिवशी भेटत असत. त्यांचे नाव 'बाळ्या' असे होते. ते एक निरक्षर भटक्या जातीचे साधू होते. पण अपूर्व अशी काव्यरचना ते करीत. त्यांची कवने अगदी आत्म्यातून स्फुरत असत. त्यांना दम्याचा विकार होता. जेव्हा दम्याची उबळ येई, त्या वेळी त्यांचे केव्हा प्राणोत्क्रमण होईल, याचा नेम नसे. इतके असूनही एका ठिकाणी ते कधीच स्थिर झाले नाहीत. जर पुन्हा जन्माला आलो, तर त्या अनुभवाचा पुढील जन्मी जनसेवेसाठी उपयोग व्हावा, या इच्छेने मी या जन्मी अनुभव संपादन करीत आहे, असे ते आम्हाला सांगत. पुनर्जन्माचे भाग्य जर लाभलेच, तर हिप्परगे येथे चाललेल्या संस्थेसारख्या संस्थेचा मी संचालक होईन, सध्याचा अभ्यास हा पूर्वतयारीच्या स्वरूपाचा आहे, असे ते म्हणत. माझ्यावर त्यांचा भारी स्नेह व लोभ जडला होता. त्या स्नेहातिशयाने त्यांनी मला एक काठी भेट म्हणून दिली. त्यांच्याबद्दलच्या आदराचे प्रतीक म्हणून मी त्या काठीची पूजा करीत असे.
आध्यात्मिक साधनेच्या बाबतीत गुरू अथवा आचार्यांचे स्थान काय यासंबंधी मला येथे काही सांगितले पाहिजे. स्वभावतः साधकावस्थेत गुरूच्या मार्गदर्शनावर, मध्यस्थीवर माझी श्रद्धा होती. योग्य गुरू लाभल्यास त्याच्याइतकी प्रेरणा व साहाय्य इतर कोणाकडूनही मिळणार नाही. पण एक धोका आहे तो म्हणजे गुरूंनी आपला पूर्ण ताबा घेऊ नये. गुरू म्हणजे केवळ मार्गदर्शक होय. तो वाट दाखवितो आणि तुम्हाला मोकळे सोडून देतो. गुरूची भूमिकाही तात्कालिक आहे. शेवटी तुम्हालाच तुमचे गुरू बनले पाहिजे. गुरूपण असे काही असू नये. एकदा का त्याला स्थिर स्वरूप प्राप्त झाले की, त्याला निरनिराळ्या मर्यादा पडतात. मानवी व इतरही. मानवी स्वरूपातच गुरू भेटायला हवा असे नव्हे. ज्या वेळी तुमची ग्रहणशक्ती खूप वाढलेली असते, त्या वेळी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तुम्हाला गुरू भेटेल. तो निसर्गातील एखाद्या वस्तूच्या रूपात असेल किंवा अंतरातील आवाज असेल. तेवढे दिल्यानंतर तुम्हाला न चुकता मार्गदर्शन लाभत राहील. एका क्षणी गुरूवरील निष्ठा आणि गुरूचे स्पष्ट दोष यामध्ये माझ्या मनात तीव्र संघर्ष निर्माण झाला होता. गुरूबद्दलची माझी कल्पना अगदी पूर्वपरंपरेला अनुसरून होती. पण प्रत्यक्षात अगदी विपरीत असे काही आढळले. मला अगदी अंधारात चाचपडत असल्यासारखे वाटू लागले. बदलत असलेल्या व्यक्तीच्या गळ्यात गुरू म्हणून मिठी मारावी काय? त्यामुळे आध्यात्मिक भ्रष्टाचार तर होणार नाही ना? माझे काही महिने या मानसिक व्यथेत गेले. मी इतका चिंतातुर झालो की, चिंतेने माझे केस कायमचे पांढरे झाले. सरतेशेवटी मी आनंदाश्रमाच्या स्वामी रामदासांना पत्र लिहिले. त्यांनी मला सांगितले की, प्रत्येकाच्या अंतर्यामीच श्रेष्ठ गुरू वास करीत असतो. तोच आपल्याला अगदी जवळचा असल्यामुळे त्याच्या प्रेरणेनुसार आपण वागले पाहिजे व कोणत्या बाहेरच्या साधनावर अवलंबून राहू नये. त्या वेळेपासून मी कोणत्याही आध्यात्मिक गुरूच्या आश्रयाला गेलो नाही. साधू सत्पुरुषांविषयी नितांत आदर बाळगूनही अंतर्यामातूनच प्राप्त झालेल्या प्रेरणेनुसारच वागत गेलो. मला शेवटी अंतर्यामातूनच प्रेरणा प्राप्त होत गेली आणि त्यामुळे आध्यात्मिक धक्क्यांचा मला कधी अनुभव आला नाही.
स्वामी रामकृष्ण परमहंसांचे पुढील शब्द किती सार्थ आहेत ते पाहा!
"साधूला त्याने हा शरीररूपी पिंजरा टाकून दिल्यानंतरच साधू ही संज्ञा प्राप्त व्हावी."
"गुरूच्या बंधनात आत्म्याचा मुक्त विकास होऊ शकत नाही."
या देशाच्या कित्येक भागांत आध्यात्मिक बुवाबाजीचे जे हिडीस दृश्य दिसते, त्यामुळे माझे अंतःकरण शतशः विदीर्ण होते. धर्माचे इतके अधःपतन व्हावे काय ? अध्यात्माचा बाजार व्हावा काय? या अनिष्ट प्रकाराला कोण आळा घालू शकणार? आपल्या अज्ञानामुळे भोळेभाबडे हजारो लोक उत्साहातिरेकांत अशा असंख्य गुरूंच्या जाळ्यात फसत आहेत. भक्तांचा विनाश होऊन गुरूंची मात्र चंगळ चालते. 'गुरु'त्वाच्या नावाखाली, काही ठिकाणी भ्रष्टाचार, व्यभिचार आणि अर्थसाधन या गोष्टी चालतात. भारत जितक्या लवकर अशा सामाजिक बांडगुळापासून मुक्त होईल तितके आत्मशोधकांचे भले होईल.
हिप्परगे येथील आध्यात्मिक भ्रातृसंघाला भारताच्या कविसंत स्वामी रामतीर्थांच्या शिकवणीतून प्रेरणा लाभली होती. त्या भ्रातृसंघाचे प्रमुख स्वतःला 'रामा'चे भक्त समजत असत. रामतीर्थांच्या हयातीत त्यांच्या दर्शनाचा लाभ त्यांना झाला नव्हता. फार वर्षांपूर्वी मी स्वामी रामांची भाषणे व त्यांचे लेख वाचले होते. ते सर्व लेख 'ईश्वरी साक्षात्काराच्या वनात' या नावाने चार खंडांतून प्रसिद्ध झाले होते. या अधिकारी व्यक्तींशी मी आधीच थोडासा संपर्क साधला होता. हिप्परगे येथील वास्तव्यात तो अधिक दृढ झाला. त्यामुळे स्वामी रामांच्या साक्षात सहवासात असलेल्यांपैकी कुणाकडून तरी संन्यासाश्रमाची दीक्षा घ्यावी, अशी माझ्या मनात इच्छा निर्माण झाली. भाषणे वाचत असताना मला असा सुगावा लागला की, स्वामी रामांचे प्रमुख शिष्य स्वामी नारायण अद्यापि जिवंत असावेत; पण त्यांचा पत्ता कसा शोधून काढावा हे कळेना. म्हणून लखनौ येथील रामतीर्थ पब्लिकेशनच्या व्यवस्थापकांना पत्र लिहिले व स्वामी नारायणांचा पत्ता कळविण्याची विनंती केली. हे पत्र स्वामी नारायणांनी स्वतःच उघडले. मी त्यांना भेटायला केव्हाही जाऊ शकतो, असे त्यांनी मला कळविले. मी लगेच लखनौला गेलो व त्यांच्या चरणापाशी दहा दिवस वास्तव्य केले. तेथून निघण्यापूर्वी मला ते संन्यास घेण्यास योग्य समजत असतील तर त्यांनी मला संन्यासदीक्षा द्यावी अशी मी त्यांना विनंती केली. त्यांनी मला आणखी एका आठवड्यानंतर हरिद्वार येथे पुन्हा एकदा भेटण्यास सांगितले.
हेही ऐका - ऑडिओ - हुर्मुजी रंगाचा उंच मोती-दाणा
(स्वामी अग्निवेश हे आर्य समाजातील नेते आणि वेठबिगार कामगारांचे नेते होते. त्यांनी अनेक सामाजिक चळवळींत सहभाग घेतला. त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि कार्यकर्तृत्व यांचा वेध घेणारा दीर्घलेख Storytel वरील ऑडिओबुक स्वरूपात. लेखक आणि अभिवाचक - विनय हर्डीकर)
मध्यंतरीच्या काळात मी काशी, प्रयाग, अयोध्या या ठिकाणी व स्वामी रामांना ज्या ठिकाणी आत्मसाक्षात्कार झाला त्या हृषीकेशपलीकडे असलेल्या ब्रह्मपुरीला जाऊन यावे असे ठरले. त्यांच्या आज्ञेनुसार मी वागलो व हरिद्वार येथे स्वामींची वाट पाहात बसलो. त्यांनी मला पाहिल्याबरोबर मला संन्यासदीक्षा देण्याचे मान्य केले. मला ते ऐकून अतिशय आनंद झाला. थोड्या वाटाघाटीनंतर स्वामींनी हिप्परग्यास येऊन पुढील संक्रांतीच्या दिवशी संन्यासदीक्षा देण्याचे ठरलेनी.
स्वामी नारायणांच्या सहवासात घालविलेल्या दहा दिवसांमध्ये खरा संन्यासी कसा असू शकतो, याची मला कल्पना आली. स्वामी नारायण इतके मोकळे, इतके अलिप्त असूनही नेहमी कामात मग्न असत. दररोज अठरा तास ते काम करीत असत. 'हे शरीर घोड्यासारखे आहे. त्याने पूर्ण दिवसभर काम केल्यावर त्याच्या पाठीवर थाप मारा. रात्री फार वेळपर्यंत काम करायला मिळाले की त्यांना अधिक आनंद होई. मला ते खरे कर्मयोगी वाटले. स्वामी नारायण म्हणजे निरनिराळ्या सामाजिक व शैक्षणिक संस्था चालविणारे एक प्रभावी कार्यकर्ते होते. ते उंचेपुरे, सशक्त व सुदृढ होते. लोकांकडून काम करवून घेण्याच्या बाबतीत ते फार कडक होते. कुणी आळस किवा हलगर्जीपणा केला तर त्यांना अगदी खपत नसे. त्यांची टापटीप, त्यांचा व्यवस्थितपणा, त्यांची स्वच्छता या साऱ्या गोष्टी अगदी वाखाणण्याजोग्या होत्या. 'जेव्हा तुम्ही काम करिता तेव्हा अंतःकरणपूर्वक करा. त्यात आत्मा ओता. हीच खरी देवपूजा.' त्यांच्याशी आलेला आध्यात्मिक संपर्क म्हणजे खरोखरच विशेष भाग्याची व अभिमानास्पद घटना होती.
एक आठवडा अगोदरच स्वामी नारायणांचे हिप्परगे येथे आगमन झाले. निरनिराळ्या विषयांवर आम्ही चर्चा करीत असू. ते आपल्या गुरूंच्या आठवणी सांगत. आमच्या आध्यात्मिक भ्रातृसंघाने स्वामी रामांची आध्यात्मिक शिकवण समजून घ्यावी व त्याप्रमाणे वागावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
संन्यासदीक्षेचा दिवस अगदी जवळ येत चालला. ज्या ओढ्याकाठी बसून मी साधना करीत होतो, त्या ओढ्यापाशी स्वामीजी गेले. एका औदुंबर वृक्षाखालील स्थळ त्यांनी मला संन्यासदीक्षा देण्यासाठी निवडले. कोणत्याही धार्मिक विधींची आवश्यकता नाही, असे त्यांनी मला सांगितले. यज्ञाची आवश्यकता नव्हती. माझ्यासाठी जो संन्यासप्रकार योजिला होता, तो सामान्य प्रकार नव्हता. स्वामी रामांच्या परंपरेत 'विद्वत् संन्यास' नावाचा एक प्रकार प्रचारात आहे. पूर्वतयारीची अवस्था आधीच संपली होती. स्वामींनी माझे मुंडन करविले. मी परमेश्वराचा आहे व सारे विश्व हे माझे कुटुंब आहे, असे मला त्यांनी सांगितले. त्यांनी मला ओढ्याच्या अगदी मध्यात नेले. ॐ मंत्रोच्चार सुरू केला. मला व सभोवती जमलेल्यांना त्यांच्या बरोबरच ॐ मंत्र म्हणण्यास सांगितले. माझा हात आपल्या हातात घेऊन त्यांनी पाण्यात डुबक्या मारल्या. त्यांनी लखनौहून स्वतःच आणलेली भगवी वस्त्रे मला दिली. मला ती परिधान करायला सांगून, त्या क्षणापासून मी 'स्वामी रामानंदतीर्थ' या नावाने ओळखला जाईन असे घोषित केले.
आज संन्यस्त जीवन स्वीकारून चाळीस वर्षांहून अधिक काळ लोटला; पण मी अगदी व्यावहारिक जगात राहात आलो आहे. रामांनी माझ्यासाठी काही काम नियुक्त केले आहे. काम समर्पित भावनेने सतत केलेले काम हेच काय ते माझे तप. तेवढेच मी जाणतो. मी अरण्याचा आश्रय केला नाही. मी तीर्थयात्रा केल्या नाहीत. तत्त्वज्ञानावरील ग्रंथही मी फारसे वाचले नाहीत. अफाट मानवजात हीच मला पूजनीय वाटत आली. मानवी स्वरूपात मला ईश्वराचा स्पर्श जाणवला.
मी सेवेने व कामानेच त्या जगन्नियंत्याची पूजा करीत आलो आहे. न मागता, न सांगता माझ्या वाट्याला जे काम आले ते करण्याचा मी प्रयत्न केला आहे. मी कशाबद्दलच कधी कुरकुर केली नाही. मी सुखी आहे. पराकाष्ठेचा सुखी आहे.
हे प्रकरण संपविण्यापूर्वी माझ्या कठोर अनुभवांतून मला जी अमूल्य अशी शिकवण मिळाली त्याविषयी काही निवेदन करणे योग्य होईल. ती शिकवण आयुष्यभरातील माझ्या साऱ्या व्यवहारांत मार्गदर्शक ठरली.
कोणत्याही मानवी दौर्बल्याचा उपहास करण्याचे मी सोडून दिले. तथाकथित कर्तव्यपराङ्गुखाविषयी एक प्रकारच्या सहानुभूतीचीच वृत्ती जोपासण्याचा मी प्रयत्न केला. त्याचा त्या दोषी असलेल्या व्यक्तींवर काय परिणाम झाला, हे मला माहीत नाही. पण मला मात्र त्यामुळे अधिक सामर्थ्य प्राप्त झाले.
आध्यात्मिक बाबतीत किंवा कदाचित इतर बाबतींतही साधनांची अनेकता ही एक नैसर्गिक गोष्ट दिसते. माझ्या प्रवृत्ती या इतरांच्या प्रवृत्तींहून भिन्न असण्याची शक्यता आहे. म्हणूनच मला पूर्णपणे असे वाटू लागले आहे की, इतरांच्या मार्गाच्या शृंखलांनी स्वतःला जखडून न घेता प्रत्येकाला आपापल्या मार्गाने जाण्याचे स्वातंत्र्य असावे.
आणखी एक गोष्ट अशी की, मी अद्यापि साधक आहे, एक मुमुक्षू आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे. ज्या क्षणी आपण अगदी परिपूर्ण आहोत, असे एखाद्याला वाटू लागते त्या क्षणीच त्याचे एकदम पतन होण्याचा धोका निर्माण होतो. मला माझ्या लघुत्वाची जाणीव दिल्याबद्दल परमेश्वराचा मी ऋणी आहे. आपल्या 'सत्याचे प्रयोग' या ग्रंथातील एका प्रकरणात महात्माजींनी जे लिहिले ते येथे उद्धृत केल्याखेरीज मला राहवत नाही. ते म्हणतात, "पण याहून कठीण मार्ग पुढे मला आक्रमण करावयाचा आहे हे मी जाणतो. मला शून्य स्वरूप बनले पाहिजे. जोपर्यंत मनुष्य स्वेच्छेने आपल्या बरोबरींच्यामध्ये स्वतः शेवटच्या स्थानी जाऊन बसत नाही, तोपर्यंत त्याला मुक्ती नाही. हिंसाही नम्रतेची परमावधी आहे." हेच मुख्यतः माझ्या जीवनात मार्गदर्शक तत्त्व बनून राहिले आहे.
ही तत्त्वे माझ्या जीवनात मी पूर्णपणे आचरू शकलो, असे मात्र वाचकांनी समजू नये. या क्षणीसुद्धा माझ्यात कितीतरी दोष आहेत. वेळप्रसंगी मी लटपटतो, बुचकळ्यात पडतो. पण लगेच धैर्याने स्वतःला सावरून घेतो. नव्या श्रद्धेची कास धरतो व आपण त्या जगच्चालकाच्या हातातील एक सामान्य खेळणे आहोत ही जाणीव मनात सतत बाळगून मला मार्गदर्शन करण्यासाठी, मला योग्य मार्गावर नेण्यासाठी 'त्याच्यावरच' मी सर्वस्वी भार टाकतो.
पुढील गोष्टींचा विचार करून काही वर्षे तरी हिप्परगे न सोडण्याचे मी ठरविले होते. विद्यार्थ्यांचे मी माझे स्वतःचे असे एक विश्व निमाण केले होते. त्यांची सेवा करण्याइतके सुख मला इतर कोणत्याही गोष्टीत मिळण्यासारखे नव्हते. मी संस्थानभर फिरावे आणि आपल्या मानेवर असलेले हे सरंजामदारी जू झुगारून देऊ इच्छिणाऱ्या लोकांची एक संघटना निर्माण करावी, असा आग्रह मला भेटायला येणारी मंडळी करू लागली. तरीही हिप्परगे सोडण्याच्या सूचनेस मी मान्यता दिली नाही, मला आतून तशी प्रेरणा झाली नाही. माझ्या सहकाऱ्यांच्या लहानशा वर्तुळाच्या आवारात राहण्यामध्ये मला समाधान वाटत होते व परत त्या धकाधकीच्या जीवनात जाण्याची माझी इच्छा नव्हती. 'स्वातंत्र्याच्या कार्यासाठी ईश्वर आपलीच काही योजना आखेल. मला त्याची चिंता करायचे कारण नाही. आम्हाला आमच्या मार्गाने जाऊ द्या.' अशा त-हेची माझी भूमिका मी माझ्या स्नेह्यांपुढे मांडीत असे. ते ऐकून मनातल्या मनात दुःखीकष्टी होऊन ते परत जात. अशीच चार वर्षे लोटली. मी आध्यात्मिक सोपान चढत होतो. परमेश्वराने माझ्यासाठी काही निराळेच योजिले असावे असे दिसते.
ज्या आध्यात्मिक भ्रातृसंघामुळे मी त्या स्थळाशी निगडित झालो होतो, त्या संघाच्या प्रमुखामध्ये निर्माण झालेल्या मानसिक विकृतीमुळे तो भ्रातृसंघ गडगडला. त्या संघप्रमुखाचे पतन झाले असे मी म्हणत नाही. कारण एखाद्याने जर मुमुक्षूची भूमिका ठेवून प्रामाणिकपणे तो मार्ग आचरण्याचा प्रयत्न केला, तर आध्यात्मिक उत्क्रांतीत पतन असे काही नसतेच. ती पथच्युती म्हणजे अधिक बळ देण्याकरता मिळालेला एक धक्का, एक हिसकाच समजायला हवा. ते काहीही असो; पण त्या स्थळाची आध्यात्मिक मोहिनी नष्ट झाली, तीव्रता ओसरली. आणि माझ्या सहकाऱ्यांपैकी बहुतेकांनी व अनेक विद्यार्थ्यांनी हिप्परगे सोडून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचे ठरविले. पुढील वर्षात प्रत्यक्षपणे पुष्कळ जण सोडूनही गेले. मी आणखी एक वर्ष तेथेच राहिलो. पण मलासुद्धा तेथून जावे असे वाटत होते. पुन्हा एकदा मी तेथेच राहावे असा आग्रह करण्यात आला. मला त्यांचे मन मोडवेना. पण सरतेशेवटी एके दिवशी पहाटे मी माझा कमंडलू व भिक्षापात्र हाती घेतले. साऱ्या विश्वाला अभिवादन केले व ज्या शांतिस्थळाने मला आपल्या आध्यात्मिक क्षेत्रात इतके संपन्न बनविले, त्या शांतिस्थळाचा शांत मनाने मी निरोप घेतला. स्थित्यंतराचा काळ आला होता. माझ्यासाठी दुसरे कार्यक्षेत्र निर्माण होत होते.
हिप्परग्याचे रूपांतर शेतात झाले आहे. इतर शेतांप्रमाणे तेथेही मशागत होत आहे. तेथील छोट्याशा इमारती, झोपड्या इत्यादी आता जमीनदोस्त झालेल्या आहेत. मी हिप्परगे सोडून गेल्यानंतर दोनदा त्या ठिकाणी जाऊन आलो. केवळ तेथील आरोग्यवर्धक हवा पुन्हा घेण्यासाठी. तो औदुंबर वृक्ष अद्यापि तसाच तेथे उभा आहे. जवळूनच तो ओढा वाहतो आहे. आंबराईतील वृक्षांच्या फांद्या आध्यात्मिक ऐश्वर्याने डुलत आहेत. पक्षी दिव्य गीते गात आहेत. शरीराने मी त्यांच्या सान्निध्यात नसलो, तरी त्या सुखावह मंजुळ ध्वनीचा आस्वाद मी आजही घेऊ शकतो.
- स्वामी रामानंद तीर्थ

Tags: हैदराबाद मुक्तीसंग्राम हैदराबाद संस्थान मराठवाडा तेलंगणा कर्नाटक संन्यासी संन्यास आत्मचरित्र अनुवाद वि. पां. देऊळगावकर साधना डिजिटल साधना प्रकाशन नवे पुस्तक आगामी पुस्तक Load More Tags
Add Comment