व्यवस्थेची चिरफाड करणाऱ्या कविता

उमेश घेवरीकर लिखित 'शिक्षणाच्या कविता' या कवितासंग्रहाचा परिचय..

कवी उमेश घेवरीकर यांनी शिक्षणव्यवस्थेकडे केवळ विद्यार्थी, शिक्षक आणि पालक ह्या तीन अंगांनीच पाहिले आहे. शासन, प्रशासन आणि व्यवस्थापन ह्या तीन अंगांनी पाहिले असते, तर कदाचित त्यांना आणखी काही अंधारे कोपरे आढळले असते. म्हणून काही ही कविता एकांगी ठरत नाही. संग्रहातील कवितांची संख्या कमी असली, तरी ह्या कवितेचा आवाका दांडगा आहे.

‘शिक्षण व्हावा पाया
अवघ्या समाजमंदिराचा
घडावा सुजाण नागरिक
शाळांनी देश घडवावा’

असे शीतल स्वप्न पाहणाऱ्या संवेदनशील शिक्षकांपैकी उमेश घेवरीकर हे एक उपक्रमशील शिक्षक आहेत. ते जसे मातृह्रदयी शिक्षक आहेत, तसेच ते एक उत्तम कवीही आहेत. त्यांचा ‘शिक्षणाच्या कविता’ हा संग्रह ग्रंथालीने नुकताच प्रकाशित केला आहे.

ह्या संग्रहात केवळ 36 कविता असल्या, तरी ह्या कवितेने अवघे शिक्षणविश्व आपल्या कवेत घेतले आहे. हल्ली आपला समाज शिक्षणाकडे अतिशय तटस्थपणे, त्रयस्थपणे आणि अलिप्तपणे पाहतो आहे. बिघडत चाललेल्या शिक्षणव्यवस्थेकडे समाजाचे लक्ष वेधण्यासाठीच कवीने हा कवितालेखनाचा खटाटोप केला आहे.

कवीने झाड आणि शाळा ह्या दोन गोष्टींची फारच छान तुलना केली आहे. ते म्हणतात :

‘झाड आणि शाळा यांचं
मातीशी इमान असतं
मुळं खोलवर जातात आणि
आकाशाशी नातं असतं.’

हे नातं जेव्हा विस्कळीत होतं, तेव्हा कविमन अस्वस्थ होतं. त्या अस्वस्थतेतूनच यातील बव्हंशी कवितांचा जन्म झाला आहे.

‘सुगी झालीये सोंगांची
भरला इथे बाजार आहे
राखणी करावी कुणी?
पावलोपावली व्यापार आहे.’

हल्ली शिक्षणाचा भरलेला बाजार हे कवीच्या अस्वस्थतेचे प्रमुख कारण आहे.

आजच्या आमच्या शाळांना कोंडवाड्याचे किंवा तुरुंगाचे रूप आले आहे. विद्यार्थी हे कैदी बनले आहेत आणि शिक्षक हे जेलर. विद्यार्थ्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आम्ही हिरावून घेतले आहे.

‘शाळांच्या वर्गखोल्यांतून
भारताचे भवितव्य घडत आहे’

ह्या विधानाची कवीने अक्षरशः खिल्ली उडवली आहे. शाळांच्या वर्गखोल्यांतून ह्या कवितेत कवीने तत्त्वज्ञांचे आदर्श स्वप्नरंजन आणि आजचे कठोर वास्तव यातील कमालीची विसंगती अधोरेखित केली आहे.

आजच्या शिक्षणप्रक्रियेत शिक्षक हा एक यंत्र बनला आहे. तो सराईतपणे वर्गात जातो. प्रथेप्रमाणे तास संपवतो. सत्यनारायणाच्या कथेची निरर्थक बडबड प्रसादाच्या अपेक्षेने ऐकून घेत राहावी, तसे विद्यार्थी वर्षाअखेर ‘उत्तीर्ण’ नावाचा प्रसाद हातावर पडावा या अपेक्षेने शिक्षकांची निरर्थक बडबड ऐकून घेत राहतात. शिक्षणप्रक्रिया इतकी गतिमान झाली, की गडबडीत विद्यार्थी कधी याचक बनले आणि आपण कधी पुरोहित बनलो हे समजलेच नाही, अशी प्रांजळ कबुली हा कवी देतो. विद्यार्थ्यांमध्ये सवयीने निरर्थक बडबडीचा प्रतिकार करण्याची क्षमता तयार झाली आहे. तरीही शिक्षक पाट्या टाकण्याचे काम करतोच आहे, कारण ‘सवाल माझ्या रोजीरोटीचा आहे’ हे त्याला त्याच्यापुरते सापडलेले उत्तर आहे.

ज्यावेळी शिक्षकाचे विद्यार्थ्यांशी मित्रत्वाचे नाते जुळते, तो क्षण सुंदरच असतो. खरेतर शाळेतील प्रत्येक क्षण आनंददायी असतो, पण फाजील कर्मकांडात गुंतल्यामुळे आम्ही ह्या आनंदाच्या क्षणांना मुकलो आहोत. अशा सुंदर क्षणांची भलीमोठी यादीच कवीने तयार केली आहे.

एकेकाळी अ- आई, ब - बदक, क - कमळ, अशी अक्षरांना आणि अंकांना ओळख होती. तो काळ सोज्वळ होता. आता अक्षरांनी आणि अंकांनी आपली जुनी ओळख गमावली आहे.

आता तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगात स्क्रीन आणि प्रोजेक्टर वापरून मुले यंत्रमानव बनतील की काय अशी भीती कवीला वाटते.

आपला एखादा विद्यार्थी गैरमार्गाला लागलेला दिसतो, तेव्हा कवी म्हणतो :

‘सप्तरंगात माखलेला माझाच चेहरा
मलाच भेसूर दिसू लागला’.

असे पराभवाचे प्रसंग कबूल करण्यासाठी जो प्रामाणिकपणा लागतो, तो कवीच्या ठायी निश्चितच आहे.

मोबाईलमधील क्रूर खेळांमुळे मुलांमधील हिंस्रता वाढत चालली आहे, हे या भ्रमयुगातील कटु वास्तव आहे. ऑनलाईन नावाच्या संकटाने निरागस मनांची एलओसी पार केली आहे. अशा परिस्थितीत शिक्षकांच्या वाढलेल्या जबाबदारीची कवीला रास्त जाणीव आहे.

म्हणून कवी म्हणतो :

‘मला शिकवायला हवे त्यांना
अधिक जबाबदारीने, नेटाने आणि निष्ठेने
मला जागे राहायलाच हवे’

ह्या ओळींतून कवीची आपल्या पेशाप्रति असलेली बांधिलकी अधोरेखित झाली आहे.


हेही वाचा : शब्दांची नवलाई : विद्यार्थ्यांना मराठीचा लळा लावणारा कवितासंग्रह - उमेश घेवरीकर


खरेतर शाळेची इमारत म्हणजे सिमेंट, गिट्टी आणि वाळूचा पद्धतशीरपणे रचलेला निर्जीव ढिगारा. पण कवीच्या संवेदनशील मनाला हे मान्यच होत नाही. ही शाळा कवीला सजीव आणि सचेतन परिवारच वाटते. कोरोना काळात घेवरीकरांच्या कवितेतील शाळा उदास झाली आहे. कोरोनाच्या कहरात एकाकी पडलेली शाळा आपल्या विद्यार्थ्यांना म्हणते, ‘मिस यू बाळा!’

शाळा माणसाच्या जीवनाला कशी व्यापून उरते हे खालील ओळींतून व्यक्त झाले आहे.

‘सुटते जरी ही शाळा
मनामनांत पुन्हा भरते
जीवननौका वादळातही
या शाळेमुळेच तरते’.

केवढा मोठा हा विश्वास!

कोरोनाच्या काळात कवीने आर्त मनोभावे प्रार्थना केली आहे :

‘पुन्हा उघडावी मंदिरे
देव बंधमुक्त व्हावा
पुन्हा उघडाव्यात शाळा
देश शिक्षणरंगी रंगावा!’

कवीला अपेक्षित असलेला देव हा दगडाधोंड्यात नसून चालताबोलता विद्यार्थी हाच त्यांचा देव आहे. हा देव आणि देश शिक्षणरंगी रंगावा, हे कवीने मागितलेले कालोचित पसायदान आहे!

शिक्षणक्षेत्रात दरवर्षी नवनवीन घोषणा जन्माला येतात. कधी सर्वशिक्षा अभियान तर कधी समग्र शिक्षा अभियान, कधी ज्ञानरचनावाद तर कधी अध्ययनक्षमता. हे सगळे शब्दांचे बुडबुडे आहेत, याची कवीला यथार्थ जाणीव आहे. औषधांची केवळ नावे बदलून मूळ आजार दूर होत नाही, हे कडवट वास्तव नाकारण्यात काहीच अर्थ नाही. अंतर्गत गुणांचा टेकू लावून आम्ही निकालाची टक्केवारी वाढवत असलो, तरी शाळाबाह्य मुलांचे प्रमाण कमी होताना दिसत नाही.

‘सावित्रीबाई आणि सानेगुरुजींचा वसा
वेतन आयोगाच्या पुरात वाहून गेला’

हा आमच्या शिक्षणव्यवस्थेचा दैवदुर्विलास आहे!

ह्या व्यवस्थेत भोवंडून गेलेला एक भोळाभाबडा विद्यार्थी प्रश्न विचारतो आहे :

‘मातृह्रदयी, सेवाभावी, हाडाचे शिक्षक
नेमक्या कितव्या वेतन आयोगानंतर
लाभणार आहेत ह्या निरागस लेकरांना
प्लीज, सांगा ना गुरुजी!’

वरकरणी सरळ साधा सोपा दिसणारा, तरीही सगळ्यांनाच निरुत्तर करणारा हा यक्षप्रश्न संवेदनशील माणसाचे काळीज आरपार चिरत जातो.

हे असे का झाले? याचे उत्तरही दिले आहे.

शिक्षण नावाच्या सरस्वतीच्या ह्या पवित्र मंदिरात दलालांची टक्केवारी वाढली आहे. सरस्वतीच्या दरबारात नको ती भुतावळ जमली आहे. प्रगतीच्या नावाखाली सगळीकडे नुसती धूळफेक चालू आहे. खिरापतीच्या अंतर्गत गुणांनी आम्ही शालेय शिक्षणाचा अक्षरशः ‘निक्काल’ लावला आहे. समाजाची दिशाभूल करणारा फसवा निकाल शंभरीपार गेल्यामुळे सगळेच आपापली पाठ थोपटून घेण्यात धन्यता मानत आहेत.

यातील वस्तुस्थिती उजागर करताना कवी लिहितो:

‘अवघा महाराष्ट्र प्रगत
केवढा गलबला झाला!
शाळाबाह्य निरक्षर
मला पेढा देऊन गेला!’

हा टोकाचा उपहास आणि उपरोध असला, तरी ह्या विसंगतीच्या माध्यमातून कवीने शिक्षणव्यवस्थेच्या मुस्कटात सणसणीत चपराक हाणली आहे.

शाळेत शिकत असताना राम आणि रहीम, मेरी आणि मीरा, किसन आणि हसन, गौतम आणि कृष्ण, संता आणि संतोष, लीला आणि लीली एकदिलाने राहतात, गुण्यागोविंदाने शिकतात. नंतर,

‘शाळा सुटते पाटी फुटते
राम आणि रहीम यांच्यात
भिंत का उभी राहते?’

असा रोकडा सवाल कवीने उपस्थित केला आहे. खरे म्हणजे राम आणि रहीम यांच्यात अकारण जातीयतेची, धार्मिकतेची भिंत उभी राहते, हाच आमच्या शिक्षणव्यवस्थेचा पराभव आहे. ह्या कविता म्हणजे जसे व्यवस्थेतील दोषदिग्दर्शन आहे, तसेच कवीने एक शिक्षक म्हणून अंतर्मुख होऊन केलेले आत्मपरीक्षणही आहे.

छिद्रान्वेषी वृत्तीने केवळ व्यवस्थेतील दोष दाखविणे एवढाच कवीचा मर्यादित हेतू नाही. जोवर दोष समजत नाहीत, तोवर त्यात सुधारणा होण्याची शक्यताच नसते. देवदूत बनण्यापेक्षा शिक्षक बनणे हे जास्त मेहनतीचे काम आहे, ह्या सुवचनावर कवीचा दृढ विश्वास आहे. ह्या विश्वासापोटीच हाडाचा शिक्षक असलेला हा कवी आपल्या खांद्यावर वर्ग नावाची पवित्र पालखी घेऊन निघाला आहे.

‘वाट शाळेची चालता
मला ती वाटावी पंढरीची
मी या कोवळ्या निरागस
लेकरांमध्ये पाहावी विठूमाऊली!’

प्रत्येक शिक्षकाला जर शाळेची वाट ही पंढरीची वाट वाटायला लागली आणि निरागस लेकरांमध्ये विठूमाऊली पाहायची दिव्य दृष्टी लाभली, तर शिक्षणाच्या क्षेत्रातील सगळे प्रश्न चुटकीसरशी सुटतील. तो दिवस लवकर उगवावा, हीच तर आपली सगळ्यांची प्रार्थना आहे!

‘मजुरी आणि वेठबिगारीचा
मुळीच नसावा शाप
प्रत्येकाच्या पदरात पडावं
ज्ञानपोईचं माप’

असे कवीला प्रामाणिकपणे वाटते. हीच तळमळ ह्या कवितालेखनाच्या मुळाशी आहे. एकीकडे झोपडीत भरणाऱ्या सरकारी शाळा आणि दुसरीकडे धनदांडग्यांचे चकचकीत एज्युकेशन मॉल यातील विषमता आणि विसंगती कवीने ‘ॲंटीव्हायरस’ ह्या कवितेत टिपली आहे. तरीसुद्धा खेड्यापाड्यातील मुलामुलींना हतबल न होता शिक्षणाची कास धरण्याचा सल्ला कवीने दिला आहे.

प्रतिकूल परिस्थितीत शिकत असलेल्या मुलीला:

‘एवढे सगळे सोसूनही
म्हणतील करू पिवळे हात
तेव्हा मात्र दुर्गा बन
सोडू नको शाळेची साथ’

असे सांगत ‘तुझी तूच सावित्री होशील’, असा विश्वास ह्या कवीने दिला आहे. तो खरोखरच मौलिक आहे.

कवीने लिहिलेले शाळा, फळा, पुस्तक, लेखणी ह्या शीर्षकाचे हायकूही वाचनीय आहेत.

गायक-वादक जसे नियमित रियाज करतात, तसा शिक्षकानेही वर्ग नावाची आपली मैफल सजविण्यासाठी नियमित अभ्यासाचा रियाज करावा, हे सांगायला कवी विसरत नाही. याचा अर्थ इतरांकडून अपेक्षा ठेवणाऱ्या शिक्षकाला कवीने कंसात ठेवलेले नाही. त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव करून दिली आहे.

कवी उमेश घेवरीकर यांनी शिक्षणव्यवस्थेकडे केवळ विद्यार्थी, शिक्षक आणि पालक ह्या तीन अंगांनीच पाहिले आहे. शासन, प्रशासन आणि व्यवस्थापन ह्या तीन अंगांनी पाहिले असते, तर कदाचित त्यांना आणखी काही अंधारे कोपरे आढळले असते. म्हणून काही ही कविता एकांगी ठरत नाही. संग्रहातील कवितांची संख्या कमी असली, तरी ह्या कवितेचा आवाका दांडगा आहे.

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे ह्या कवितेतून शिक्षकांच्या मनाच्या स्पंदनांचा, विद्यार्थ्यांच्या मनातील भावकल्लोळाचा व शिक्षणप्रक्रियेतील जिवंतपणाचा प्रत्यय वाचकांना येत राहतो. नरेंद्र लांजेवार यांनी अभिप्रायात म्हटल्याप्रमाणे वाढलेला निकाल म्हणजे खरीखुरी गुणवत्ता नसून गुणवत्तेची सूज आहे, हे कवीने ठामपणे नमूद केले आहे. ह्या व्यवस्थेत संवेदनशील माणसाची होणारी घुसमट कवितेच्या शब्दाशब्दांतून जाणवते. ह्या कवितांमधून आलेला उपहास आणि उपरोध अतिशय टोकदार आहे. उमेश घेवरीकर यांची ही कविता म्हणजे सडत आणि साचत चाललेल्या शिक्षणव्यवस्थेला दाखविलेला लख्ख लख्ख असा आरसा आहे. ह्या आरशात बघून कोणी आपले रूप सुधारण्याचा प्रयत्न केला, तर आनंदच आहे. अन्यथा कोळसा कितीही उगाळला तरी अंतिमतः काळाच असतो.

‘शिक्षणाच्या कविता’ (कवितासंग्रह)
कवी : उमेश घेवरीकर
प्रकाशक : ग्रंथाली, मुंबई.
मुखपृष्ठ : संतोष घोंगडे
पृष्ठे : 56.  मूल्य रु. : 80

- डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
sureshsawant2011@yahoo.com 

Tags: मराठी कविता कवितासंग्रह मराठी लेखक कवी शिक्षण साहित्य संस्कृती Load More Tags

Comments:

दत्ताराम जाधव.

उदाहरणादाखल पेरलेल्या कविता वाचून उमेश घवरीकर यांचा हा संपूर्ण काव्यसंग्रह वाचायला हवा असं वाटतं. ं

Shivaji pitalewad

मग व्यवस्था बदलण्यासाठी काय करावे? ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ? हेरंब कुलकर्णी?

Add Comment