नव्या आर्थिक धोरणांचा पहिला राजकीय बळी!

'माकप'चे ज्येष्ठ नेते आणि प. बंगालचे भूतपूर्व मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचे 8 ऑगस्ट रोजी निधन झाले, त्यानिमित्ताने लिहिलेला लेख..

‘लेफ्ट फ्रंट’ सरकारमध्येही भ्रष्टाचार आहे हे लक्षात आल्यावर 1993 मध्ये त्यांनी राजीनामा दिला. पण तत्कालीन मुख्यमंत्री ज्योती बसू यांनी समजूत घातल्यानंतर ते पुन्हा मंत्रिमंडळात सामील झाले. ज्योती बसू मुख्यमंत्री असताना ते गृहमंत्री व उपमुख्यमंत्री होते. 2000 साली वयोमानानुसार ज्योती बसू पायउतार आले तेव्हा त्यांनीच बुद्धदेव भट्टाचार्यांची मुख्यमंत्रीपदासाठी शिफारस केली. पुढे 11 वर्षे ते प. बंगाल राज्याचे मुख्यमंत्री राहिले. 

पश्चिम बंगालच्या राजकारणातील सुसंस्कृत, अभ्यासू व प्रामाणिक नेते श्री. बुद्धदेव भट्टाचार्य हे भारतातील असे पहिले कम्युनिस्ट नेते होते, ज्यांनी उदारीकरण व जागतिकीकरणाच्या प्रक्रियेला बंगाल राज्यात राबवण्याचा प्रयत्न केला. आणि त्याचमुळे त्यांच्या व त्यांच्या पक्षाच्या, बंगाल राज्यातील जवळपास 35 वर्षांच्या राजवटीचा अंत झाला. तसे पाहिले तर व्यक्तिगत जीवनात ते अतिशय प्रामाणिक होते. सुरुवातीच्या काळात मंत्री व शेवटची 11 वर्षे मुख्यमंत्री असा त्यांचा 1977 नंतरचा कार्यकाळ होता. पाम एवेन्यू, बालीगंज या दोन खोल्यांच्या घरात राहूनच त्यांनी काम केले. त्या घरातच 8 ऑगस्टला सकाळी त्यांचे निधन झाले.

त्यांना वाटत होते की, बंगाल राज्यातील बेरोजगारीला तोंड देण्यासाठी आणि विकासासाठी कृषीक्षेत्र अपुरे आहे. त्यामुळे औद्योगिकीकरणाची आणि त्यासाठी मोठय़ा प्रमाणावर गुंतवणुकीची आवश्यकता आहे. त्यासाठी चीनच्या धर्तीवर, ‘एसईझेड’साठी (स्पेशल इकॉनॉमिक झोन) त्यांनी जमिनींचे अधिग्रहण करायला सुरुवात केली. आणि हेच त्यांच्या व 'लेफ्ट फ्रंट' सरकारच्या 35 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागायला निमित्त झाले.

नंदीग्राम व सिंगूर येथे औद्योगिक कारखान्यांसाठी, मोठ्या प्रमाणावर जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले. त्याविरोधात झालेल्या शेतकरी आंदोलनामुळे, 1977 पासूनची बंगालमधली ‘सीपीएम’ची राजवट 2011 मध्ये संपुष्टात आली.

वास्तविक, बुद्धदेव भट्टाचार्यांची राजकीय कारकीर्द 1966 पासूनच सुरु झाली. तेव्हा काँग्रेस सरकारचे राज्य होते आणि बंगालमध्ये दुष्काळ पडला होता. ‘सीपीएम’तर्फे अन्न सत्याग्रह आंदोलन सुरू होते. तेव्हा 22 वर्षांच्या बुद्धदेव भट्टाचार्यांनी प्रथमच त्या आंदोलनात सहभाग घेतला व त्यानंतर ते ‘सीपीएम’च्या युवा व विद्यार्थी आघाडीचे सचिव झाले. कॉम्रेड प्रमोद दासगुप्तांच्या मार्गदर्शनाखाली तयार होत, 1977 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत, ‘सीपीएम’तर्फे पहिल्यांदाच ते आमदार म्हणून निवडून आले. ज्योती बसूंच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या पहिल्या ‘लेफ्ट फ्रंट’ सरकारमध्ये त्यांना सामील करण्यात आले होते. 

बहुसंख्य राजकारणी लोकांना राजकीय काम सोडून वाचन-लेखन करायला सवड नसते किंवा त्यांना ते आवडत नाही. पण बुद्धदेव भट्टाचार्यांना साहित्य, तत्त्वज्ञान आणि कला इत्यादींमध्ये जास्त रस होता. प्रसिद्ध कोलंबियन लेखक गॅब्रियल गार्सिया मार्केज़ची कादंबरी ‘द स्टोरी ऑफ अ शीपवर्कर’चे भाषांतर त्यांनी केले आहे. तसेच, बाबरी मशिद पतनानंतर, सांप्रदायिकतेच्या मुद्द्यावर ‘मृत्युंजय’ नावाचे एक नाटकही त्यांनी लिहिले. बंगालमध्ये आणि बांगलादेशमध्ये त्याचे प्रयोग झाले.

‘लेफ्ट फ्रंट’ सरकारमध्येही भ्रष्टाचार आहे हे लक्षात आल्यावर 1993 मध्ये त्यांनी राजीनामा दिला. पण तत्कालीन मुख्यमंत्री ज्योती बसू यांनी समजूत घातल्यानंतर ते पुन्हा मंत्रिमंडळात सामील झाले. ज्योती बसू मुख्यमंत्री असताना ते गृहमंत्री व उपमुख्यमंत्री होते. 2000 साली वयोमानानुसार ज्योती बसू पायउतार आले तेव्हा त्यांनीच बुद्धदेव भट्टाचार्यांची मुख्यमंत्रीपदासाठी शिफारस केली. पुढे 11 वर्षे ते प. बंगाल राज्याचे मुख्यमंत्री राहिले. 

साहित्य आणि कलांत रस असल्यामुळे ते आपल्या धकाधकीच्या राजकीय कामातून वेळ काढून ‘कॉलेज स्ट्रीट’ येथील ‘कॉफी हाऊस’मध्ये आपल्या साहित्यिक-कलाकार मित्रांसमवेत अड्डा करायला आलेलेही मी पाहिले आहे. कॉफी हाऊसमधील मॅनेजमेंट व कामगारांच्या वादात त्यांनी हस्तक्षेप केला आणि त्यामुळे कामगारांच्या को-ऑपरेटिव्ह सोसायटीकडे कॉफी हाऊसचा कारभार सोपवण्यात आला. तो आजतागायत शाबूत आहे!

‘कॉफी हाउस’सारख्या जागेत समाजवादी तत्त्वज्ञानाचा एवढा आदर्श प्रयोग भट्टाचार्यांना करता आला, पण मुख्यमंत्री म्हणून संपूर्ण राज्यात हा प्रयोग त्यांना का नाही करता आला? प्रत्यक्षात घडले ते विपरीतच! ‘नंदीग्राम-सिंगूर’सारखे अवाढव्य औद्योगिक प्रकल्प उभे करण्यासाठी सुपीक शेतजमिनी सरकारने ताब्यात घेतल्या. वास्तविक त्यांच्या पक्षाचे विधानसभेचे व लोकसभेचे उमेदवार त्या भागातून निवडून आलेले होते. ‘एसईझेड’ प्रकल्पासाठी जमिनी ताब्यात घेण्याच्या या कारवाईनंतर नंदीग्राम-सिंगूरच्या शेतकऱ्यांनी सरकारसोबत सर्व संबंध तोडण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला. त्याचबरोबर उर्वरीत जगासोबत दळणवळण तोडण्याच्या हेतूने आपल्या परिसराच्या चारही बाजूंना खंदक खोदून रस्ते बंद केले. ‘यापुढे आमचा प. बंगाल सरकारशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही’ असे त्यांनी घोषित केले! 9 ऑगस्ट 1942च्या ‘भारत छोडो आंदोलना’त, याच भागातील लोकांनी, जवळपास असेच, तत्कालीन ब्रिटिश सरकारला नाकारुन आपले सरकार घोषित केले होते. महाराष्ट्राच्या सातारा वा महाड भागात अशा प्रकारची आंदोलने झाली आहेत. 

या आंदोलनाचे स्पिरीट समजून घेण्यात बुद्धदेव भट्टाचार्य कमी पडले. सनदी अधिकाऱ्यांकडून आणि पक्षातील काही चुकीच्या लोकांकडून चुकीचे सल्ले मिळाल्याने बुद्धदेव भट्टाचार्यांची दिशाभूल झाली. अतिरेकी नक्क्षलवादी या आंदोलनात प्रभावी आहेत असे कारण देत, विनाकारण पॅरामिलिटरी व राज्य पोलिसांकडून गोळीबार आणि अतिबळाचा वापर करून स्थानिक शेतकऱ्यांना मारहाण करण्यात आली. अनेकांना अटकेत टाकले. या परिसरातील लोकच नव्हे, तर बंगाल राज्यातील इतरही लोकांना सरकारची ही कारवाई आवडली नाही. म्हणून आमच्यासारख्या लोकांना तेथील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुद्दाम बोलवण्यात आले. 1 ते 6 डिसेंबर 2007 या काळात आम्ही या परिसरातील बहुसंख्य गावांना भेटी दिल्या. 

योगायोगाने, 6 डिसेंबर 2007 रोजी बाबरी मशीद पाडल्याच्या घटनेला 15 वर्षे पूर्ण होत होती. त्यानिमित्ताने ‘सीपीएम’तर्फे कोलकाता येथील मौलाली युवा केंद्रात सायंकाळी पाच वाजता सभा आयोजित करण्यात आली होती. त्या सभेत एक वक्ता म्हणून मलाही निमंत्रण होते. त्याकरता आम्ही नंदीग्रामहून सकाळीच निघून कोलकात्याला निघालो होतो. नंदीग्राम परिसरातील वीटभट्टी भागात काही पुरलेले मृतदेह सापडले म्हणून कोलकाता येथून अनेक टीव्ही वाहिन्यांच्या ओबी व्हॅन आलेल्या होत्या. त्यामुळे नंदीग्राम-सिंगूर रस्ता जाम झाला होता. आम्ही अडकून पडलो. 

ज्योती बसूंसमवेत

काही काळानंतर महत्प्रयासाने आम्ही कोलकात्याच्या रस्त्याला लागलो पण केंद्रात पोहोचेपर्यंत बऱ्याच लोकांची भाषणे होऊन गेली होती. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या कार्यक्रमात प. बंगाल सरकारचे सहा मंत्री व्यासपीठावर उपस्थित होते. सगळे वक्ते पाणी पिऊन-पिऊन संघ परिवारावर जहाल टिका करत होते. बर्‍याच उशीरा माझ्या नावाची घोषणा करण्यात आली. तोवर मला बरीच भाषणे ऐकायला मिळाली. माईकसमोर आल्यावर सर्वात आधी मी सभागृहाची व आयोजकांची माफी मागितली. ‘बाबरी मशीद पाडून आज 15 वर्षे झाली व यापुढेही 20, 25, 50 व 100 वर्षे होणार आहेत. आपण दरवर्षी या दिवशी आपला आक्रोश करत राहू. पण प्रत्यक्षात नंदीग्राम-सिंगूर भागात 60 टक्के मुस्लीम समाज आहे व तो आपल्या अस्तित्वाची लढाई लढतो आहे. त्याची योग्य ती दखल न घेता उलट त्यांना नक्षलवादी, दहशतवादी अशा शिव्यांची लाखोली वाहत, पोलीस व पॅरामिलिटरीच्या टाचेखाली दडपण्यात आले. ते आम्ही पाहून आलो आहोत.’ आंघोळीसाठी वेळ व योग्य सोय न मिळाल्यामुळे कपड्यांवरील धूळ झटकतच मी बोलत होतो. ‘डोळ्यात पाणी आणून तेथील रहिवासी आम्हाला सांगत होते, की, दादा आमी तो सीपीएमेर सपोर्टर आछे. किंतु की कोरबो? आमादेर किछू चाकरी नोय. शुदू ऐ जोमिन आछे तो किछू दालचाल होए जात. छे यदि जोमिन चोले जाबे तो आमि कि कोरबो? आमी सबाय ऐमनी मारा जाबो ताई आमि येतो लडाई कोरे जात छी.’ मी त्यांना म्हणालो की, एवढ्या मोठ्या मुस्लीमबहुल लोकसंख्या असलेल्या समाजासोबत आपल्या सरकारने जे युद्ध सुरू केले आहे ते कितपत योग्य आहे? इथे आपण बाबरी मशीद पाडल्याबद्दल दुःख जाहीर करण्यासाठी सभा बोलावली आहे. आणि याच राज्यातील जे सर्वात मोठे आंदोलन सुरु आहे, त्यातली मुसलमानांची संख्य दखल घेण्याएवढी असताना फक्त बाबरी मशिद पाडली म्हणून छाती बडवून काय उपयोग? या परिसरातील बहुसंख्य लोकांना तुम्ही करत असलेले औद्योगिकीकरण नको असेल तर जोर-जबरदस्ती का करत आहात? पुढील निवडणुकीला अद्याप वेळ आहे. ही जोर-जबरदस्ती थांबवा/ असे भाषण मी केले. पण बुद्धदेव भट्टाचार्य यांनी लोकांना जुमानले नाही. त्यामुळे 2011 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जवळपास सर्वच जागा गमावून बसले 2006 मध्ये एकूण 294 विधानसभा जागांमधून ‘सीपीएम’च्या 235 जागा निवडून आलेल्या होत्या. पाच वर्षांत त्या शून्यावर आल्या. आजही प. बंगाल विधानसभेत ‘लेफ्ट फ्रंट’ व ‘काँग्रेस’चा एकही सदस्य नाही!

व्यक्तिगत जीवनात बुद्धदेव भट्टाचार्य खूप साधनशुचिता पाळत होते. पण चुकीच्या पद्धतीने राज्य चालवण्यातून त्यांच्या पक्षाची 35 वर्षांची सत्ता संपुष्टात आली. या सगळ्याचा अंतर्मुख होऊन विचार करणे हीच बुद्धदेव भट्टाचार्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. 

- डॉ. सुरेश खैरनार, नागपूर
sureshkhairnar59@gmail.com 
(लेखक, राष्ट्र सेवा दलाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.)

Tags: Communist Party of India (Marxist) Buddhadeb Bhattacharjee Former Chief Minister of West Bengal Indian Politics Suresh Khairnar Obituary Sadhana Digital Load More Tags

Add Comment