मित्रहो,
माझ्याच विषयीची एक कैफियत या छोटेखानी लेखातून मी आपल्यापुढे मांडत आहे.
कुलविंदर कौर हिला मी एक लक्ष रुपयांची भाऊबीज पाठवली आहे. मला बहीण नाही. या कुलविंदरमध्ये मला हवी तशी बहीण सापडल्याचा आनंद व्यक्त करायला दिवाळी नसतानाही मी ही भाऊबीज केली.
कुलविंदर ही चंदीगडच्या विमानतळावर प्रवाशांच्या सुरक्षेची पाहणी करणाऱ्या पथकाची प्रमुख आहे. त्याच जबाबदारीमुळे तिने कंगना राणावत या पडेल नटीला व चढेल खासदाराला तिचा मोबाईल त्याच्या स्क्रीनटेस्टसाठी मागितला. त्यावर "मी खासदार असताना माझा मोबाईल तपासणीसाठी मागण्याची हिंमत तू कशी केलीस" असा कमालीचा बेकायदा व उर्मट प्रश्न या कंगनाने तिला विचारला. त्यावर "ते माझे कर्तव्य आहे" असे ती म्हणाली. मग या कंगनाने तिला तिचे नाव विचारले व तिच्या ड्रेसवर अडकवलेल्या पट्टीवरील तिचे नाव वाचलेही. त्यानंतर ही कंगना तिला म्हणाली, "म्हणजे तू खलिस्तानी आहेस तर!"
आपल्याला खलिस्तानी म्हटल्याचे ऐकताच कुलविंदरने कंगनाच्या गालावर एक जोरदार चपराक लगावली. त्यामुळे कंगनाच्या तांबड्या-लाल झालेल्या गालाची छायाचित्रे काही माध्यमांनी पडद्यावर दाखविलीही.
या चपराकीने कुलविंदरची मातृभक्ती व मातृभूमी या दोहोंवरचेही प्रेम अधोरेखित केले. पंजाबात झालेल्या शेतकरी आंदोलनात ज्या महिलांनी उन्हातान्हात बसून धरणे दिले, त्यांना उद्देशून "या शंभर रुपयांची रोजी देऊन आणलेल्या बाया आहेत" असे कमालीचे अपमानजनक वक्तव्य या कंगनाने केले होते. त्या धरण्यात बसणाऱ्या स्त्रियांमध्ये कुलविंदरची आईही होती. त्यामुळे हे वक्तव्य आपल्या आईचा उपमर्द करणारे असल्याचेही कुलविंदरच्या मनात होते.
त्याआधी "या देशाला स्वातंत्र्य मिळाले ते मोदींचे सरकार सत्तेवर आले त्या, 2014 या वर्षी" असे अत्यंत बेशरम उद्गार कंगनाने काढले होते. या देशाने 90 वर्षे केलेल्या स्वातंत्र्य संग्रामाच्या अखेरीस, 1947 मध्ये जे मिळाले ते स्वातंत्र्य नव्हते तर 'भिक्षा' होती असे म्हणून या कंगनाने टिळक, गांधी, नेहरू यांच्यासह स्वातंत्र्यासाठी लढलेल्या सगळ्याच देशभक्तांना भिकारी म्हटले होते. त्यामुळे तिला मिळालेली चपराक एकट्या कुलविंदरची नसून साऱ्या देशाची होती हे लक्षात घ्यायचे.
या चपराकीला हिंसाचार, खून आणि बलात्कारासारखा भयंकर गुन्हा ठरविण्याचे प्रतिभाशालीपण काही विद्वानांनी नंतरच्या काळात केले. त्यांच्या कल्पनाशक्तीचे मला कौतुकच तेवढे वाटले.
कंगना राणावतला तिच्या आरंभीच्या एक-दोन सिनेमांत लोकांनी डोक्यावर घेतले. नंतरचे तिचे सिनेमे व मालिका पडल्या. तरीही "मला या देशात अमिताभ बच्चनएवढा मान सर्वत्र मिळतो" असे जाहीरपणे सांगण्याचा मानभावीपणा तिने या थप्पड प्रकरणानंतर केला. काही माणसांचे अहंकार सनातन असतात, हे अशावेळी लक्षात घ्यायचे.
कुलविंदरला कायदानुसार तिच्या खात्याच्या कस्टडीत आता ठेवले आहे. जी गोष्ट कायद्याने व्हायची तशी ती झाली, पण कायद्याहूनही माणुसकी आणि आत्माभिमान श्रेष्ठ असतो. आपल्या आईचा व मातृभूमीचा अपमान होताना पाहूनही गप्प राहणाऱ्यांचे अकर्ते शहाणपणही अशावेळी मनात आणायचे असते.
याहून मोठी गोष्ट ही की, मी पाठविलेली भाऊबीज कुलविंदरला ती कस्टडीत असल्यामुळे मिळाली नाही. पंजाबच्या शेतकरी आंदोलनाचे एक नेते रणजीतसिंग मान यांच्याशी मी फोनवर बोललो, तेव्हा त्यांनी मला तिच्या भावाशी बोलायला सांगितले व त्याचा फोनही जोडून दिला. तिचे भाऊ शेरसिंगजी मला म्हणाले, "आम्हाला तुमच्या भावना समजल्या आहेत. तशा त्या आम्ही कुलविंदरलाही सांगितल्या आहेत. मात्र कुलविंदरने आणि आम्ही सर्व कुटुंबियांनी तिला आलेल्या सर्व मदती, भेटी व देणग्या न स्वीकारण्याचे ठरविले आहे. त्यामुळे आपली भावना लक्षात घेऊनही आमची विनंती ही की, आपण भाऊबीजेची ही रक्कम देशात सुरू असलेल्या कोणत्याही शेतकरी आंदोलनाला द्यावी. हा कुलविंदरचाही निरोप आहे. ती नंतर तुमच्याशी बोलेलही."
हा निरोप ऐकल्यानंतर माझ्या मनातला कुलविंदरविषयीचा अभिमान अनेक पटींनी वाढला. खऱ्या अर्थाने ती शेतकरी वर्गाची प्रतिनिधी आहे आणि तिच्या मनातील देशभक्तीही मोठी आहे हे ध्यानात आले. त्याचवेळी अशी लढाऊ महिला मला बहीण म्हणून मिळाली याचाही मला आनंद झाला. कुलविंदर या प्रकरणात अपराधी ठरली तर तिला पाठिंबा देणारा म्हणून तिच्यासोबत राहायला मलाही आवडेल.
आपली कोणी प्रशंसा करावी वा कोणी शिवीगाळ करून आपले नाव चर्चेत आणावे म्हणून मी ही भाऊबीज केली नाही. आत्माभिमानाची एक नवी व स्फुरणदायी बाब म्हणून मी हे केले आहे. या देशात अजून लोकशाही असल्याने माझे कृत्य ज्यांना टीकास्पद वाटेल त्यांना तशी टीका करण्याचा अधिकार आहे, हेही मला येथे नम्रपणे सांगायचे आहे.
कळावे,
नमस्कार.
- सुरेश द्वादशीवार
sdwadashiwar@gmail.com
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक आहेत.)
Tags: suresh dwadashiwar sadhana digital kangana ranaut kulvindar kaur Load More Tags
Add Comment