‘श्यामची आई’ची पटकथा लिहिताना...

सुनील सुकथनकर यांची विनोद शिरसाठ यांनी घेतलेली मुलाखत

साने गुरुजींच्या 'श्यामची आई' या पुस्तकावर आधारित आणि सुजय डहाके दिग्दर्शित श्यामची आई हा नवा मराठी चित्रपट 10 नोव्हेंबरला प्रदर्शित झाला. त्यानिमित्ताने, साधना प्रकाशनाने या चित्रपटातील 35 छायाचित्रे पुस्तकातील त्या त्या प्रसंगांच्या ठिकाणी वापरून 'श्यामची आई'ची विशेष आवृत्ती प्रकाशित केली. त्या आवृत्तीचे प्रकाशन आणि नव्या चित्रपटातील कलाकारांची संवाद असा कार्यक्रमदेखील टिळक स्मारक मंदिर, पुणे येथे 3 नोव्हेंबरला पार पडला.

त्याचप्रमाणे, 'साधना'च्या युवा दिवाळी अंकात, श्यामच्या आईची भूमिका करणाऱ्या गौरी देशपांडे या अभिनेत्रीची दीर्घ मुलाखत प्रसिध्द झाली आहे. आणि साधनाच्या मुख्य दिवाळी अंकामध्ये या चित्रपटाशी संबंधित तिघांच्या तीन स्वतंत्र मुलाखतींचा एक विभाग केलेला आहे. त्यामध्ये आहेत, या चित्रपटाचे दिग्दर्शक सुजय डहाके, पटकथा लेखक सुनील सुकथनकर आणि चित्रपटामध्ये छोट्या श्यामची भूमिका करणारा शर्व गाडगीळ. या तिन्ही मुलाखती मुळात व्हिडिओ स्वरूपात घेतल्या गेल्या आणि नंतर त्यांचे शब्दांकन करून त्या यंदाच्या दिवाळी अंकामध्ये प्रसिद्ध झाल्या. 'कर्तव्य साधना'वरून या तीनही मुलाखतींचे व्हिडिओज् प्रसिद्ध करत आहोत. गौरीची मुलाखत मात्र ऑडिओ स्वरुपात घेतली गेली आहे, यथावकाश तो ऑडिओसुद्धा कर्तव्यवरून प्रसिद्ध करणार आहोत.

आज सादर करीत आहोत, सुनील सुकथनकर यांची मुलाखत. ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’चे माजी विद्यार्थी असलेले सुकथनकर हे मागील तीन दशके चित्रपट क्षेत्रात पटकथा लेखन व दिग्दर्शन या क्षेत्रांत कार्यरत आहेत. त्यांनी सुमित्रा भावे यांच्यासह आणि स्वतंत्रपणेही केलेल्या पूर्ण लांबीच्या (फिचर फिल्म) चित्रपटांची संख्या डझनभराहून अधिक आहे. शिवाय त्यांनी जवळपास चार डझन लघुपट (शॉर्ट फिल्म) केलेले आहेत. या कामासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारांसह इतरही अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. सामाजिक जीवनातील विशिष्ट प्रश्न वा समस्या घेऊन तयार केलेले चित्रपट हे त्यांच्या कारकिर्दीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. त्यांच्याकडून 'श्यामची आई' या चित्रपटाच्या पटकथा लेखनाचा प्रवास आणि साने गुरुजी व श्यामची आई याविषयीचं त्यांचं आकलन जाणून घेण्याचा हा प्रयत्न आहे.

Tags: sane guruji sunil sukathankar marathi film sujay dahake script writting मराठी चित्रपट साधना डिजिटल मुलाखत sadhana digital Load More Tags

Add Comment