कोयना ही महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी. तिच्यावरच्या धरणामुळं वीजनिर्मिती झाली. सारा आसमंत विजेच्या लखलखाटानं उजळला. शेतीत पाणी खेळायला लागलं. उद्योगधंद्यांना बरकत आली. गावं, शहरं समृद्ध झाली. याउलट चित्र धरण-परिसरात प्रत्ययाला येतं. पावसाळ्यात धो धो पाऊस, किर्र जंगल, श्वापदांचा संचार, अपुरं दळणवळण, उपजीविकेच्या साधनांचा अभाव अशा गोष्टींमुळं शिवसागराभोवतालचं लोकजीवन समस्यांच्या गाळात रुतलेलं आहे. सध्याच्या कोरोनाजन्य परिस्थितीत मुलांच्या शिक्षणाचाही विषय ऐरणीवर आला आहे. अर्थात अशा प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाच्या वेगळ्या वाटा चोखाळणारे, समस्यांना संधी मानणारे, लाखो रुपयांचा शैक्षणिक निधी उभा करणारे सरकारी शाळांमधले शिक्षक खरेखुरे ज्ञानदूत झाले आहेत. त्याच्याविषयी...
सातारा सोडलं आणि पश्चिमेला तोंड करून् निघालं की अर्ध्या तासावर कासचं पठार. अलीकडच्या काळात कासचा समावेश जागतिक वारसास्थळांत झाला आहे... त्यामुळं पावसाळा उलटला की इथलं पठार माणसांनी भरून जातं.कासपासून डांबरी घाटवळणं ओलांडत खाली आलं की बामणोली हे गाव. डांबरी रस्ता इथपर्यंतच आहे... हे शेवटचं गाव. मग समोर दिसतो तो अथांग पसरलेला निळाशार शिवसागर, कोयना अभयारण्य... हिरवंगर्द जंगल....
1967मध्ये कोयना प्रकल्पाची निर्मिती झाली. या धरणाची पाणीसाठा करण्याची क्षमता शंभर टीएमसीच्या आसपास आहे. हे पाणी धरणाच्या भिंतीपासून थेट कोयनेच्या उगमापर्यंत साठत गेलं आहे. त्यालाच ‘शिवसागर’ म्हणतात. धरणाची भिंत ते उगम हे साधारण सत्तरहून अधिक किलोमीटरचं अंतर. बामणोली जावळी तालुक्यात येतं. अर्थात अलीकडंच याच परिसरातली गावं महाबळेश्वर तालुक्याला जोडण्यात आली आहेत. शिवसागराभोवती जवळजवळ शंभर गावं वसलेली आहेत. बहुतेक गावांचं दळणवळण लाँचसेवेवर अवलंबून आहे. सरकारी लाँचसेवा आहे. बामणोलीत स्थानिकांनी एकत्र येऊन सहकारी तत्त्वावर बोट क्लब स्थापन केला आहे.
बामणोलीतून सतत लाँचची, बोटींची ये-जा चाललेली असते. तिथून समोर पाहिलं की दूरवर जंगलात वासोटा किल्ला दिसतो. बामणोलीतून शेवटचं टोक असलेल्या उचाट, वाघावळे किंवा सिंधी या गावांत लाँचनं जायचं तर निदान तीन तासांचा प्रवास. इथं कोयना, कांदाटी आणि सोळशी या नद्या आहेत. बामणोलीसमोर कोयनेचा आणि कांदाटीचा संगम आहे. या खोऱ्यात दरे, पिंपरी, सालोशी, आडोशी, माडोशी, निवळी, मोरणी, लामज, वाघावळे, उचाट, कुसापूर अशी गावं आहेत. लाँचसेवा हा इथल्या सगळ्या लोकजीवनाचा आधार.
बामणोलीपासून काही अंतरावरच तापोळा... इथल्या नयनरम्य निसर्गामुळं 'मिनी काश्मीर' म्हणूनही तापोळा ओळखलं जातं. तापोळ्यातल्या लाँचची संख्या चारशेच्या घरात आहे. एरवी दिवाळीनंतर तापोळा पर्यटकांनी फुललेला दिसतो. अलीकडच्या काळात मोठमोठी हॉटेल्स इथं उभी राहिली आहेत. तापोळ्यानजीक कोयना आणि सोळशी नद्यांचा संगम आहे. इथला जलविहार ही पर्यटकांसाठी पर्वणी ठरते. या खोऱ्यात गाढवली, आहिर, वानवली, वाळणे, वाकी, आवळण, वेळापूर, गावढोशी, हरचंदी, रुळे, आमशी, कोट्रोशी, रेणोशी, खरोशी, कळमगाव, शिरणार, देवळी, दाभे अशी गावं आहेत. तापोळ्यातून शेवटच्या दाभे या गावी लाँचनं जायचं म्हटलं तरी कमीत कमी दोन तास लागतात. अलीकडंच तापोळ्यानजीक जिल्हा परिषदेनं तराफ्याची सुविधा करून दिली आहे... त्यामुळं अवजड वाहनंसुद्धा शिवसागरापलीकडं पोहोचू लागली आहेत. रघुवीर घाटातून कोकणात उतरणारा मार्गही सुरू झाला आहे.
पावसाळ्यात धो धो कोसळणारा पाऊस तर उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष अशी विषम परिस्थिती इथं दिसते. भोवतालच्या निबिड जंगलामुळं हिंस्र श्वापदांचा वावर असतो. या परिसरात उपजीविकेचं कोणतंही साधन नसल्यामुळं गावोगावचे लोक मुंबईची वाट धरतात. प्रत्येक गावात सरकारी शाळा आहे... मात्र तापोळा, तळदेव, वाघावळे या गावांचा अपवाद वगळला तर विद्यालयीन शिक्षणाची सुविधा कुठंही नाही.
सध्याच्या कोरोनाजन्य संकटानं सर्वच क्षेत्रांवर जोराचा घाव घातला आहे. अशाश्वततेची टांगती तलवार जागोजागी दिसत आहे. माणसाचं जगणं हे अनिश्चिततेच्या गर्तेत ढकललं गेलं आहे. या परिस्थितीत खेडोपाडी शिक्षणाचे प्रश्न पालकांचं काळीज कुरडतायत. शहरी, सुगम भागात 'ऑनलाईन' शिक्षणाचे प्रयोग सुरू झाले आहेत. अर्थात त्यांनाही मर्यादा आहेत. स्वाभाविकच जिथं अजून विकासाचा उजेड पोहोचतो आहे अशा शिवसागरापलीकडं असलेल्या सरकारी शाळांमधलं शिक्षण कसं असेल, शिक्षक काय करत असतील, मुलांचं काय चाललं असेल, पालकांच्या मनात काय प्रश्न असतील याविषयी मनात कुतूहल दाटलं होतं.
या सर्व प्रश्नांची उत्तरं देणारं नाव म्हणजे डॉ. विजय सावंत. खरंतर डॉक्टर म्हटलं की आपल्या भुवया उंचावतील... पण ते आहेत प्राथमिक शिक्षक. शिक्षणशास्त्र विषयात त्यांनी डॉक्टरेट संपादन केली आहे. एरवी डी.एड., बी.एड. करून नोकरीला लागणारे; मग अध्यापनाच्या आणि स्वतःच्या संसारचक्रात अडकणारे कितीतरी शिक्षक आवतीभोवती दिसतात. सावंत सर मात्र त्याला अपवाद ठरावेत. नोकरीनंतरच्या वेळात ते कधीही स्वस्थ बसले नाहीत. शिक्षणाच्या नवनव्या वाटा ते सतत धुंडाळत राहिले. मग सेट-नेटसारख्या आव्हानात्मक परीक्षा ते उत्तीर्ण झाले. त्यापुढं जात त्यांनी 'एम.फिल.'ही पूर्ण केलं आहे. डॉक्टरेट मिळवली आहे.
विजय सावंत यांचा प्रवास स्तिमित करणारा आहे. ते मूळचे बीड जिल्ह्यातले. आष्टी तालुक्यातलं ‘सांगवी’ हे त्यांचं गाव. ऊसतोडणी मजुराचा हा मुलगा... मात्र प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी जिल्ह्याच्या शिक्षणक्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवला आहे. 2004मध्ये सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यात ते प्राथमिक शिक्षक म्हणून रुजू झाले. प्राथमिक शाळेत सेमी इंग्लीशचा प्रयोग यशस्वीपणे राबवणारे ते पहिले शिक्षक. मुळात इंग्लीश विषयात त्यांचा हातखंडा. त्याच सामर्थ्यावर त्यांनी जिल्ह्यातल्या शिक्षकांसाठी इंग्लीश संभाषण कौशल्य विकसनशील प्रकल्प अत्यंत प्रभावीपणे राबवला. तत्कालीन (प्राथमिक) शिक्षणाधिकारी महेश पालकर यांचं पाठबळ या प्रकल्पाला लाभलं. त्यातून जिल्ह्यातल्या सर्व माध्यमांतल्या एकोणीस हजार शिक्षकांना त्याचा लाभ झाला.
तीन वर्षांपूर्वी विजय सावंत यांची बदली महाबळेश्वर तालुक्यात झाली. शिवसागराच्या टोकावर असलेली वलवण ही त्यांना मिळालेली शाळा. तापोळ्यातून सरकारी लाँचनं वलवणला पोहोचायचं तर पाच तासांचा प्रवास. दुपारी लाँच सुटली तर वलवणचा काठ येईपर्यंत अंधार होतो. गावात पोहोचेपर्यंत समस्यांचे कितीतरी डोंगर.
वलवणमध्ये पटसंख्येची मोठी अडचण. मुळात परिसरातल्या बहुतेक गावांमधल्या लोकांनी उदरनिर्वाहासाठी मुंबईची वाट धरलेली. गावात वयोवृद्ध माणसं आणि मोजकीच कुटुंबं... त्यामुळं सरकारी शाळा ओस पडण्याच्या मार्गावर. अर्थात ही केवळ वलवण गावातली स्थिती होती असंही नाही. जवळपास सर्वच गावांमध्ये हेच चित्र. त्यालाच छेद देणारी एक कल्पना सावंतांच्या मनात आकाराला आली. तिचं नाव... संकल्पशाळा.
परिसरातल्या अन्य गावांमधल्या शिक्षकांना आणि मुलांना एकत्र सामावून घेणं. त्यातून मुलांना गुणवत्तापूर्ण, दर्जेदार शिक्षण देणं हा या संकल्पशाळेचा मूळ हेतू. तो सर्वार्थानं साध्य झाला आहे. त्यापलीकडं जात सध्याच्या कोरोनाजन्य काळात या संकल्पशाळेला वेगळं महत्त्वही प्राप्त झालं आहे. 'शाळा बंद शिक्षण सुरू' या मोहिमेला चांगलीच गती आली आहे. या संकल्पशाळेत सिंदी, वलवण, चकदेव, आरव, मोरणी, मोरणी पुनर्वसित, म्हाळुंगे या गावांमधल्या मुलांचा समावेश आहे. वाघावळे इथंही असाच प्रयोग सुरू आहे. त्यात सालोशी, पर्वत, उचाट, कांदाटबन, लामज मुरा, आकल्पे मुरा या गावांमधल्या मुलांचा समावेश आहे.
या संकल्पशाळेच्या पूर्वतयारीसाठी विजय सावंत यांनी खूप परिश्रम घेतले. ते सांगतात...‘मुळात इथल्या ग्रामस्थांना, पालकांना ही संकल्पना पटवून देताना त्यांचा विश्वास संपादन करणं आवश्यक होतं. त्यांना आपल्या मुलांच्या शिक्षणाची काळजी अधिक होती. आपलं गाव सोडून मुलं दुसऱ्या ठिकाणी जाणार. मग मुलांमध्ये तशी प्रगतीही त्यांना अपेक्षित होती.’ पालकांच्या अपेक्षांचं हे शिवधनुष्य सावंत सरांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लीलया पेललं.
ग्रामस्थांच्या बैठका, चर्चा, संवाद या घडामोडी सुरू झाल्या. त्यातून या संकल्पशाळेला गेल्या वर्षी पाच एकर जागा मिळाली. अविश्वसनीय भासावा असा प्रवास तिथून सुरू झाला. ग्रामस्थांनी जेसीबी आणला. पन्नास हजार रुपये खर्चून परिसराचं सपाटीकरण केलं. त्यापुढं जात ग्रामस्थांनी तब्बल सतरा लाख रुपये लोकसहभागातून उभे केले. एलसीडी टीव्ही, लॅपटॉप, टॅब अशा सोयी त्यातून झाल्या... त्यामुळं मुलं शिक्षणाच्या प्रवाहात आली. जिल्हा परिषदेचे तत्कालीन 'सीईओ' कैलास शिंदे आणि संजय भागवत, शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, गट शिक्षणाधिकारी आनंद पळसे यांनी वेळोवेळी प्रोत्साहन दिलं. जिल्हा परिषदेच्या, पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पाठीवर कौतुकाची थाप दिली.
सध्या लॉकडाउनच्या काळात शिकण्याची हीच वाट पुढं सुरू आहे. एकूण अडुसष्ट मुलं या संकल्पशाळेत दाखल झाली आहेत. या मुलांची ने-आण करण्यासाठी सतीश मोरे यांच्यासारख्या मुंबईस्थित उद्योजकानं स्कूल बस भेट दिली आहे. या बसच्या चालकाच्या पगाराचा भार ग्रामस्थ उचलतात.
कोरोनाचा कहर जगभर होत राहिला. इथं मात्र कोरोनाला येऊच द्यायचं नाही असा निर्धार इथल्या ग्रामस्थांनी केला. त्यात शाळेची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. परस्परांमधलं सुरक्षित अंतर, मास्कचा वापर, वैयक्तिक स्वच्छता ही त्रिसूत्री महत्त्वाची ठरली. मुळात इथल्या लोकांचं आयुष्य हे काबाडकष्टाशी बांधलेलं. लोक काटक, कणखर... परिस्थितीशी दोन हात करणारे. शिक्षकांनी मुलांना कोरोनाची भयावहता सांगितली. मग मुलांनी आपल्या पालकांना. एरवी कोरोनाजन्य परिस्थितीत सरकारी आदेशांचं उल्लंघन, लोकांची गर्दी, मास्कला कोलदांडा असे कित्येक प्रकार शहरांत, उपनगरांत घडले. इथं लोकांचं प्रमाणच विरळ... त्यामुळं ते घडणं शक्यच नव्हतं... मात्र या साऱ्यांतून मुलांच्या मनात स्वयंशिस्त रुजवण्यात शिक्षक यशस्वी ठरले.
शिवसागरापलीकडं मुख्यत्वे अडचण आहे ती मोबाईल रेंजची. 'बीएसएनएल'ची रेंज सोडली तर बाकी सारा ठणठणाट. जी रेंज आहे... ती शोधतानाही मोठी पायपीट करावी लागते. एखादं झाड शोध, टेकडीवर जा, निश्चित जागा लक्षात ठेव असं करायला लागतं. 'थ्रीजी'चा मागमूसही नाही... त्यामुळं मोबाईल स्क्रीन पाहण्यापेक्षा केवळ ऐकणंच घडतं. त्यातून 'झूम क्लास', 'झूम मिटिंग' हे शब्द केवळ ऐकण्यापुरतेच मर्यादित. या समस्येवर पर्याय शोधताना केलेल्या उपायांची माहिती सावंत सर देतात. विशेषतः कोरोनाच्या काळात ऑफलाईन शिक्षणाची प्रक्रिया इथे प्रभावीपणे राबवली गेली. 'शिक्षक मुलांच्या दारात' हा उपक्रम परिणामकारकपणे अमलात आणला गेला. त्यासाठी शिक्षकांचे गट तयार करण्यात आले. प्रत्येकाला वार ठरवून देण्यात आले. मुलांचंही नियोजन करण्यात आलं. 'इच वन टीच वन'सारखी संकल्पना राबवली गेली. छोट्या मुलांच्या मदतीला मोठी मुलं नेमण्यात आली... त्यामुळं शिक्षणाच्या प्रवाहात कुठंही खंड पडला नाही. कोरोना काळात मुंबईतल्या मंडळांनी, दानशूर व्यक्तींनी सॅनिटायझर, मास्क यांच्यासह मुलांना शालोपयोगी साहित्य पुरवलं.
या साऱ्या वाटचालीत मुलांच्या पालकांचं विशेषतः महिलावर्गाचं जितकं कौतुक करावं तितकं थोडंच. मुलांच्या शिकण्याला हातभार लागावा, निधी उभा राहावा यासाठी 'पे बॅक टू सोसायटी' या कल्पनेनं आकार घेतला. एका बॉक्समध्ये पालकांनी स्वेच्छेनं पैसे टाकायचे. त्याचा विनियोग मुलांच्या खर्चासाठी करायचा हे या संकल्पनेचं स्वरूप. त्यातून तब्बल चोपन्न हजार सातशे वीस रुपये उभे राहिले. त्यातून शिपाई म्हणून काम करणाऱ्या किसन जाधव यांच्या पगाराची रक्कम भागवणं शक्य झालं. पालकांची 'गुणवत्ता निर्धारण व संवर्धन समिती' स्थापन करण्यात आली आहे. त्यातही महिला हिरीरीनं सहभागी झाल्या... होतायत....
खरंतर या यशस्वी प्रवासातला ज्ञानदूत आपल्या घरापासून शेकडो किलोमीटर दूर अंतरावर असणाऱ्या गावांतला. कुणी धुळे जिल्ह्यातला, कुणी नंदूरबारचा. कुणाचा जिल्हा अकोला, तर कुणाचा पुणे. बहुतेकांच्या नोकरीचा श्रीगणेशाच शिवसागरापलीकडं झालेला. कुटुंबापासून महिनोन्महिने दूर असणारी ही मंडळी शाळेच्या गावातच रमतात. जणू शाळा म्हणजेच त्यांचा संसार आणि मुलं म्हणजे त्यांचं कुटुंब. या शिक्षकांमध्ये प्रदीप दाभाडे, विनोद कुमठेकर, संतोष गायकवाड, खाशाबा कर्णे, आप्पासाहेब मोरकाणे, जयेश ठाकरे, नरेश भोये, संदीप आवारी, दशरथ भांगरे, नितीन घोरपडे, दिलीप चौधरी या शिक्षकांचा समावेश आहे. यांच्यापैकी किती जणांना भविष्यात पुरस्कार मिळतील, चांगल्या कामाबद्दल वेतनवाढ मिळेल, किती जणांचे सत्कार होतील हे काळ ठरवेल... मात्र आजच्या घडीला या दुर्गम भागातल्या पालकांच्या आणि मुलांच्या मनात त्यांनी निर्माण केलेलं अढळ स्थान या सगळ्याहून खूप मोठं आहे... नक्कीच...!
- सुनील शेडगे, सातारा
sunilshedage123@gmail.com
(दैनिक 'सकाळ'मध्ये लेखक गेली वीस वर्षं लेखन करतात. 'साताऱ्याच्या सहवासात', 'उपक्रमशील शिक्षक' या पुस्तकांचं लेखन त्यांनी केलेलं आहे.)
Tags: सातारा शिक्षण कोरोना शिक्षक ओंनलाईन शिक्षण सुनील शेडगे Shivsagar Satara Education Corona Teachers online education Sunil Shedge Load More Tags
Add Comment