साने गुरुजींच्या 'श्यामची आई' या पुस्तकावर आधारित आणि सुजय डहाके दिग्दर्शित श्यामची आई हा नवा मराठी चित्रपट 10 नोव्हेंबरला प्रदर्शित झाला. त्यानिमित्ताने, साधना प्रकाशनाने या चित्रपटातील 35 छायाचित्रे पुस्तकातील त्या त्या प्रसंगांच्या ठिकाणी वापरून 'श्यामची आई'ची विशेष आवृत्ती प्रकाशित केली. त्या आवृत्तीचे प्रकाशन आणि नव्या चित्रपटातील कलाकारांची संवाद असा कार्यक्रमदेखील टिळक स्मारक मंदिर, पुणे येथे 3 नोव्हेंबरला पार पडला.
त्याचप्रमाणे, 'साधना'च्या युवा दिवाळी अंकात, श्यामच्या आईची भूमिका करणाऱ्या गौरी देशपांडे या अभिनेत्रीची दीर्घ मुलाखत प्रसिध्द झाली आहे. आणि साधनाच्या मुख्य दिवाळी अंकामध्ये या चित्रपटाशी संबंधित तिघांच्या तीन स्वतंत्र मुलाखतींचा एक विभाग केलेला आहे. त्यामध्ये आहेत, या चित्रपटाचे दिग्दर्शक सुजय डहाके, पटकथा लेखक सुनील सुकथनकर आणि चित्रपटामध्ये छोट्या श्यामची भूमिका करणारा शर्व गाडगीळ. या तिन्ही मुलाखती मुळात व्हिडिओ स्वरूपात घेतल्या गेल्या आणि नंतर त्यांचे शब्दांकन करून त्या यंदाच्या दिवाळी अंकामध्ये प्रसिद्ध झाल्या. 'कर्तव्य साधना'वरून या तीनही मुलाखतींचे व्हिडिओज् प्रसिद्ध करत आहोत. गौरीची मुलाखत मात्र ऑडिओ स्वरुपात घेतली गेली आहे, यथावकाश तो ऑडिओसुद्धा कर्तव्यवरून प्रसिद्ध करणार आहोत.
आज सादर करीत आहोत, सुजय डहाके यांची मुलाखत. 2012 मध्ये मिलिंद बोकील यांच्या 'शाळा' या कादंबरीवर आधारित मराठी चित्रपट आला. तो विशेष लोकप्रिय झाला, सिनेमा क्षेत्रांतील तज्ज्ञांकडूनही वाखाणला गेला आणि त्याला राष्ट्रपतींचे रौप्यपदकही मिळाले. तो चित्रपट केवळ 23 वर्षे वय असलेल्या सुजय डहाके या तरुण दिग्दर्शकाने केलेला आहे, हे लक्षात आले तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटले. त्यानंतरच्या दहा वर्षांत सुजयने 'आजोबा', 'केसरी' आणि 'फुंतरू' हे तीन वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. आणि आता त्याने दिग्दर्शित केलेला 'श्यामची आई' हा नवा चित्रपट ऐन दिवाळीत प्रदर्शित झाला. त्या निमित्ताने, त्या चित्रपटाच्या दिग्दर्शनाविषयी घेतलेली ही मुलाखत आहे.
Tags: sujay dahake marathi film marathi directors interview मराठी चित्रपट साधना डिजिटल मुलाखत sadhana digital Load More Tags
Add Comment