डॉ. आंबेडकर : समतामूलक विकासाची चिरंतन वैश्विक प्रेरणा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने.. 

सर्वोच्च न्यायालयाच्या प्रांगणातील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करताना सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड | 06 डिसेंबर 2023

अमेरिकेतील मेरिलँड येथील डॉ आंबेडकरांचा पुतळा हा भारतवगळता इतर जगातील त्यांचा सर्वाधिक उंची (19 फूट) असलेला पुतळा आहे. ‘स्टॅचू ऑफ लिबर्टी’ नंतर ‘स्टॅचू ऑफ इक्वालिटी’ असं नाव देऊन अमेरिकेतील जनतेने डॉ. आंबेडकरांच्या समतामूलक राष्ट्रनिर्माणकार्याची ओळख वैश्विक स्तरावर पुनश्च करून दिली. सर्वात जुनी लोकशाही म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका’ या राष्ट्रामध्ये बाबासाहेबांचा पुतळा उभारून त्यांच्या विचार आणि कार्याचा अशा स्वरुपात गौरव होणे ही बाब खरोखरच वैश्विक स्तरावर आंबेडकरवादी विचारसरणीची स्वीकारार्हता दिवसेंदिवस कशी वाढत आहे याचा संकेत देते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आज 67 वा महापरिनिर्वाण दिन. त्यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करून, त्यांचा विचारांना स्मरून संकल्प करण्याचा दिवस. त्यांनी केवळ शोषितांचेच कल्याण केले नाही, तर शोषक वर्गालाही इतर माणसांशी माणसाप्रमाणे वागले पाहिजे याचे भान दिले. आजच्या सामाजिक-आर्थिक क्षेत्रातील वाढती विषमता, अन्याय, मानवी अधिकारांचे हनन, वाढती असहिष्णुता आणि हिंसक प्रवृत्ती या सगळ्याशी सामना करण्यासाठी त्यांचे प्रज्ञावंत व्यक्तिमत्त्व आजही प्रेरणादायी आहे. वाढते जटील सामाजिक-आर्थिक प्रश्न, लोकशाही शासन प्रणालीत एकाधिकारशाहीकडे वाहणारा राजकीय प्रवाह, धार्मिक/सांस्कृतिक बहुलवाद, मूलतत्त्ववाद आणि त्यातून फोफावत असलेली हिंसक प्रवृत्ती यांना आळा घालण्यासाठी, विषमतावादी मानसिकतेला तिलांजली देण्यासाठी त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आजही अनेकांना स्फूर्तिदायी आहे. समतामूलक मानवतावादी विचारांशी बांधील असणारी हरएक व्यक्ती त्यांच्या विचारांनी प्रभावित होते. त्याला देश, प्रांत, भाषा, भौगोलिक क्षेत्र यांची कोणतीच मर्यादा नाही.

मार्क्सवादी समाजवादाची संकल्पना अपयशी ठरल्यानंतर आंबेडकरवादी विचारधारेने प्रसृत केलेली समता, न्याय आणि मानवाधिकार यांवर आधारित विकासाची संकल्पना आता जगभर स्वीकारली जात आहे. डॉ. आंबेडकरांनी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठ व लंडन येथील लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या दोन नामांकित विद्यापीठांतून विविध क्षेत्रांत प्राप्त प्राप्त केलेली प्रज्ञा शोषित-वंचित समूहाच्या उन्नयनासाठी अर्पित केली. त्यामुळेच बाबासाहेब वैश्विक स्तरावर महाकारुणिक ठरतात. लाखोंचा जनसागर त्यांना अभिवादन करण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीवर दाखल होतो. त्यांच्या विचारांसमोर नतमस्तक होतो.

भारतात आणि वैश्विक स्तरावरच्या डॉ. आंबेडकरांच्या वाढत्या लोकप्रियतेसंदर्भात दोन महत्त्वपूर्ण घटना या वर्षामध्ये घडल्या. एक म्हणजे, अमेरिकेतील मेरीलँड या शहरात त्यांच्या 19 फुट उंचीच्या पुतळ्याचे अनावरण धम्मचक्र प्रवर्तन दिनी (14 ऑक्टोबर) करण्यात आले. दुसरी महत्त्वपूर्ण घटना म्हणजे भारतीय संविधान दिनाचे (26 नोव्हेंबर) निमित्त साधून मा. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रांगणात डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण भारताच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते केले. सर्वोच्च न्यायालयाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या या पुतळ्याचा विशेष म्हणजे, डॉ. आंबेडकरांचा वकिली पोशाखात असणारा हा पहिलाच पुतळा आहे. डॉ. आंबेडकरांना विधी आणि कायदाचे सखोल ज्ञान होते. भारताचे संविधान लिहिण्यासाठी विधी आणि कायदाच्या क्षेत्रातील ही प्रज्ञा पुढे बाबासाहेबांच्या कामी आली. त्यांच्या पुतळ्याचे या दोन महत्त्वाच्या ठिकाणी झालेले अनावरण केवळ प्रतिकात्मक नसून, बाबासाहेबांच्या विचारांचे सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय संदर्भातील विशेष महत्त्व यानिमित्ताने अधोरेखित झाले. मा. मुख्य न्यायाधीश आणि महामहीम राष्ट्रपती यांनी संविधान दिनाच्या भाषणातून डॉ. आंबेडकरांच्या कार्याचा उल्लेख केला. समतामूलक प्रबुद्ध भारताचे निर्माण लोकशाही शासनप्रणालीशी बांधील राहून, कायदा आणि विधीच्या चौकटीतच केले जाऊ शकते, अशा स्वरूपाचा संदेश त्यांनी भाषणातून दिला. डॉ. आंबेडकरांनी शोषित, वंचित समूहाच्या न्याय्य हक्कांसाठी, त्यांच्या उन्नयनासाठी, मुक्तीसाठी केलेला संघर्ष अनेक राष्ट्रांमध्ये समता प्रस्थापित करण्यासाठी आजही प्रेरणादायी ठरतो आहे. भारतासह वैश्विक स्तरावर अनेकांना डॉ. आंबेडकरांचे व्यक्तिमत्त्व विषमता, अन्याय यांच्या विरोधात आणि न्याय्य हक्कांकरता लढण्यासाठी प्रेरणादायी ठरते आहे. समतामूलक राष्ट्र बांधणीच्या त्यांच्या सिद्धांतातून मानवाचे व्यक्तिगत आणि सामूहिक कल्याण साधले जाऊ शकते. तसेच स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या मूल्यांच्या आधारावरच एकविसाव्या शतकातील नवा भारत घडवला जाऊ शकतो. उत्तर आधुनिक युगात वैश्विक स्तरावर शांती, न्याय, मानवाधिकार या मूल्यांच्या आधारावर सर्वसमावेशक शाश्वत विकासाचे ध्येय गाठण्यासाठी आंबेडकरवादी विचारधारेकडे उत्तम पर्याय म्हणून पाहिले जात आहे.  

डॉ. आंबेडकर : समतामूलक राष्ट्र निर्माणाची प्रेरणा

अमेरिकेतील मेरिलँड येथील डॉ आंबेडकरांचा पुतळा हा भारतवगळता इतर जगातील त्यांचा सर्वाधिक उंची (19 फूट) असलेला पुतळा आहे. ‘स्टॅचू ऑफ लिबर्टी’ नंतर ‘स्टॅचू ऑफ इक्वॅलिटी’ असं नाव देऊन अमेरिकेतील जनतेने डॉ. आंबेडकरांच्या समतामूलक राष्ट्रनिर्माणकार्याची ओळख वैश्विक स्तरावर पुनश्च करून दिली. सर्वात जुनी लोकशाही म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका’ या राष्ट्रामध्ये बाबासाहेबांचा पुतळा उभारून त्यांच्या विचार आणि कार्याचा अशा स्वरुपात गौरव होणे ही बाब खरोखरच वैश्विक स्तरावर आंबेडकरवादी विचारसरणीची स्वीकारार्हता दिवसेंदिवस कशी वाढत आहे याचा संकेत देते. 

मेरिलँड येथील ‘स्टॅचू ऑफ इक्वॅलिटी’

भारतातील जातीवर आधारित सामाजिक संरचना ही मानवी भेद आणि विषमतेवर आधारित असल्याचा समाजशास्त्रीय सिद्धांत डॉ. आंबेडकरांनी सर्वप्रथम मांडला. ब्राह्मणवर्गाने आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी जातीय उतरंडीची व्यवस्था निर्माण केली व येथील दलित-बहुजन वर्गाला त्याच्या मुलभूत हक्कांपासून हजारो वर्षे वंचित ठेवले. त्यामुळे डॉ. आंबेडकर ‘क्रांती आणि प्रतिक्रांती’ या पुस्तकात लिहितात की, भारताचा इतिहास हा ‘बुद्धिझम विरुद्ध ब्राह्मिनिझम’ असाच राहिला आहे. भारतात सर्वप्रथम तथागत गौतम बुद्धाने ब्राह्मणी वर्चस्वाला आव्हान दिले. मानवी उन्नयनासाठी प्रत्येक व्यक्ती आणि समूहाला ज्ञान अर्जित करण्याचा समान हक्क असला पाहिजे हा विचार मांडला. सम्यक ज्ञानातून मुक्तीचा मार्ग मिळू शकतो, सम्यक कर्मातून सामूहिक कल्याण साधले जाऊ शकते अशा क्रांतिकारी धम्माची शिकवण बुद्धाने मांडली. डॉ. आंबेडकरांच्या विचारांना तथागत बुद्धाच्या विचारांचे भक्कम अधिष्ठान आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात जगाच्या पाठीवर ख्रिस्ती धर्माचा दबदबा असणाऱ्या राष्ट्रांमध्ये डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यासह बुद्धाच्या प्रतिमा आणि मूर्तींची स्थापना झाली तर त्यात नवल वाटण्याचे कारण नाही.

एकविसाव्या शतकातील नव्याने निर्माण होत असलेल्या जटील प्रश्नांना भिडण्यासाठी आधुनिक विचाराला समर्पक असे ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ हे संशोधनात्मक पुस्तक डॉ. आंबेडकरांनी 1956 मध्ये लिहिले. बुद्धाचे गाडले गेलेले विचार आणि तत्त्वज्ञान त्यांनी पुनर्जीवित केले. बुद्ध सांगतात, ‘जगात दुःख आहे! या दुःखाची निर्मिती मानवाच्या ठायी असलेल्या लोभ आणि तृष्णेतून होते.’ तृष्णेचे मूळ मानवी विचार आणि आचार यांत आहे. आपला लोभ साध्य करण्यासाठी मनुष्य अधिकाधिक भोगवादी होत जातो, गरजेपेक्षा अधिक संपत्ती, संसाधने आपल्या नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करतो यातूनच सामाजिक-आर्थिक विषमता जन्माला येते. विश्वातील दुःख आणि विषमतेचा परस्परांतील सहसंबंध याचा सिद्धांत तथागत बुद्धांनी सहाव्या शतकात मांडला. बुद्धांचा ‘भवतु सब्ब मंगलम!’ ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हा विचार डॉ. आंबेडकरांनी विसाव्या शतकात पुनर्जीवित करून प्रबुद्ध भारताच्या निर्माणासाठी भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय यांवर आधारित प्रजासत्ताक राष्ट्राची परिकल्पना केली. कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेतूनच सामाजिक न्यायाच्या सिद्धांतावर आधारित समतामूलक राष्ट्राचे निर्माण केले जाऊ शकते ही भूमिका मांडली. डॉ. आंबेडकर हे समतामूलक राष्ट्रनिर्माणाच्या कार्यासाठीचा चालता-बोलता विचार, आचार आणि प्रेरणा आहेत, हा विचार भविष्यातील अनेक पिढ्यांना असाच प्रेरणादायी ठरणार आहे.


हेही वाचा : अभिवादन : बहिष्कृत भारताच्या नायकाला - संपादक


डॉ. आंबेडकर : आधुनिक लोकशाही व मानवाधिकाराचे प्रणेते

आधुनिक लोकशाही आणि मानवाधिकार संकल्पनेचे प्रणेतेही डॉ. आंबेडकरच आहेत. 20 मार्च 1927 मध्ये महाड सत्याग्रहातून पिण्याच्या पाण्यासाठी उभारलेला लढा हे मानवी हक्काच्या संघर्षाचे सर्वप्रथम उदाहरण आहे. त्यावेळी जगाला मुलभूत नैसर्गिक हक्क, मानवाधिकार या गोष्टींची फारशी जाणीव नव्हती. माणसा-माणसातील भेद ही समाजाच्या सर्वांगीण विकासातील बाधा आहे हे जाणून बाबासाहेबांनी समता प्रस्थापित करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. त्यांची लोकशाहीची व्याख्या व्यापक आहे. लोकशाही या संकल्पनेत, ती फक्त राजकीय शासनप्रणाली स्वरूपात मर्यादित नसून लोकांनी दैनंदिन जीवनात एकत्रितपणे अनुभवण्याची प्रक्रिया त्यांना अभिप्रेत होती. परंतु, आज भारतीय लोकशाहीसमोर अनेक आव्हाने असल्याचे पाहायला मिळते. मागील दशकभरात भारतीय लोकशाहीचा निर्देशांक झपाट्याने खालावत असल्याची बाब व्ही-डेम (व्हरायटीज् ऑफ डेमोक्रसी) या संस्थेच्या 2023 च्या अहवालातून स्पष्ट होते. 2012 ते 2022 या दरम्यान भारताचा उदारमतवादी लोकशाहीचा निर्देशांक (लिबरल डेमोक्रसी इंडेक्स) 0.54 वरून 0.31 वर घसरला आहे. मतदार लोकशाहीचा निर्देशांक (इलेक्ट्रॉल डेमोक्रसी इंडेक्स) 0.67 वरून 0.45 वर आला आहे. सहभागिता लोकशाहीचा निर्देशांक (पार्टिसिपेटरी डेमोक्रसी इंडेक्स) 0.45 वरून 0.2 पर्यंत खाली आल्याचे पाहायला मिळते आहे. भारतीय लोकशाहीच्या निर्देशांकामध्ये अशा स्वरुपाची घसरण होणे हे लोकशाहीच्या आरोग्याच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. वाढती सामाजिक-आर्थिक असमानता हेदेखील भारतीय लोकशाहीसमोरील महत्त्वपूर्ण आव्हान आहे. डॉ. आंबेडकरांच्या आणि भारतीय संविधानाच्या विचारांशी बांधील राहूनच ही आव्हाने पेलता येणे शक्य आहे.

डॉ. आंबेडकर आणि भारतीय संविधान यांचे नैसर्गिक नाते आहे. आंबेडकरवाद आणि राज्यघटना एकमेकांना पूरक आहेत. आंबेडकरवादाचे प्रतिबिंब म्हणजेच राज्यघटना आहे. राज्यघटनेचे नैतिक अधिष्ठान हे स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, मानवाधिकार या पंचसूत्रीवर आधारलेले आहे. कायदा आणि विधीच्या अधीन राहूनच लोकशाही व्यवस्था अधिकाधिक लोकाभिमुख करणे आवश्यक आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, मानवाधिकार या आधुनिक मूल्यांच्या आधारावरच उद्याच्या प्रगतीशील, विकसित भारताचे स्वप्न साकारले जाऊ शकते हे विसरून चालणार नाही. डॉ. आंबेडकरांचा हा आधुनिक लोकशाहीचा विचार आत्मसात करून नवभारताचे स्वप्न साकार करण्यासाठी समर्पितपणे कार्य करत राहणे हेच त्यांच्या प्रति खरे अभिवादन ठरू शकते.

- डॉ. सुधीर मस्के
sudhir.maske@gmail.com 
(लेखक, दिल्ली स्कूल ऑफ सोशल वर्क येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)


हेही पाहा : दलित पँथरच्या स्थापनेला 50 वर्षे पूर्ण झाली , त्या निमित्ताने 16 सप्टेंबर 2022 रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित केलेल्या एक दिवसीय चर्चासत्राचा व्हिडिओ

 

Tags: Dr. Babasaheb Ambedkar Democracy India B. R. Ambedkar Constitution Dhananjay Chandrachud Draupadi Murmu Babasaheb Ambedkar Statue Mahaparinirvan Din बाबासाहेब आंबेडकर लोकशाही Load More Tags

Comments:

manojsahare

उत्कृष्ट विश्लेषण!

Vandana Sabale

समतेचा विचार फार सावकाशपणे का होईना झिरपतोय हे लेखातील आढाव्यामुळं समजतंय. त्याचा सार्वत्रिक स्वीकार मात्र, अजून बरीच दूरची गोष्ट आहे.

विकास कांबळे

सुधीर मस्के सरांचा वैचारिक लेख वाचला, डॉ, बाबासाहेब आंबेडकर आणि राज्य घटना चे नैसर्गिक नात्याबाबत पुन्हा एखादा सखोल मार्गदर्शन मिळाले, धन्यवाद .

Add Comment