सिद्दी समाजावरील रिपोर्ताजची पार्श्वभूमी...

उत्तर कर्नाटकातील सिद्दी समाज : प्रास्ताविक

फोटोमध्ये डावीकडून - प्रविण खुंटे, चंदन सिंग, प्रविण राठोड, ज्योती भालेराव-बनकर

सातशे वर्षांपूर्वी आफ्रिकेतून गुलाम म्हणून आणलेले हबशी किंवा सिद्दी समाजातील लोक भारताच्या पूर्व व पश्चिम समुद्र किनाऱ्यावरील काही ठिकाणी उतरवले गेले. त्यातील काही लोक महाराष्ट्र-गोवा-कर्नाटक या राज्यांच्या सीमावर्ती भागांत स्थायिक झाले. त्यांचा इतिहास, त्यांचे वर्तमान आणि त्यांची स्थिती-गती यांचा अभ्यास करण्याची इच्छा प्रवीण खुंटे, प्रवीण राठोड, ज्योती भालेराव - बनकर, सूरज निर्मळे, चंदनसिंग या पाच तरुणांनी व्यक्त केली. त्यासाठी साधना ट्रस्टने त्यांना फेलोशिप दिली. मग त्यांनी अभ्यास केला आणि प्रत्यक्ष त्या भागात दोन वेळा भेट देऊन तिथल्या लोकांशी संवाद साधला. त्यातून आकाराला आलेले लेख आणि ऑडिओ-व्हिडिओ असा हा दीर्घ रिपोर्ताज सादर करीत आहोत, 1 ते 15 मे 2022 या काळात. याविषयीची पार्श्वभूमी सांगणारा हा लेख. 

सिद्दी समाजावर अभ्यास करण्यापूर्वी या समाजाबद्दल कोणतीही माहिती आम्हाला नव्हती. सहकारी मित्र प्रवीण खुंटे याने नोव्हेंबर 2019 मध्ये ‘लोकमत दीपोत्सव’चा दिवाळी अंक आणला होता. या अंकात मुक्ता चैतन्य यांनी सिद्दी समाजावर एक लेख लिहिला होता. या लेखामुळे सिद्दी समाजाविषयी कुतूहल जागे झाले. विषय इंट्रेस्टींग वाटला. यानंतर आम्ही सिद्दींबद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करू लागलो. इंटरनेटवर माहिती मिळत होती, परंतु अगदी वरवरची! त्यात सुसंघटितपणा नव्हता. पण त्यातून आम्हाला एक समजले की या विषयाला अनेक कंगोरे आहेत.त्यामुळे त्याचा खोलवर अभ्यास व्हायला हवा. 

यानंतर आम्ही कामाला लागलो. सिद्दींवर याआधी जो काही अभ्यास किंवा संशोधन केले गेले आहे, ते सर्व साहित्य गोळा करण्याचा प्रयत्न सुरु झाला. परंतु, त्यातून पुरेशी व सुसंगत माहिती मिळत नव्हती. मराठी भाषेत तर अगदी जुजबी माहिती उपलब्ध होती. विषयाचा आवाका बघता स्वखर्चाने हा अभ्यास करणे शक्य नव्हते. त्यामुळे एखाद्या संस्थेच्या मदतीची गरज होती. यासाठी आम्ही अनेक संस्थांना भेटी दिल्या, त्यांच्याशी संवाद साधला. परंतु त्यांनी या विषयात विशेष रुची दाखवली नाही. या संदर्भात पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाचे प्राध्यापक डॉ. संजय तांबट यांना भेटलो. त्यांनी साधना साप्ताहिकचे संपादक विनोद शिरसाठ यांच्याशी बोलण्याचा सल्ला दिला. शिरसाठ सरांची चार-पाच वर्षांपूर्वी एकदा भेट झाली होती. त्यानंतर कधीही भेटण्याचा योग आला नव्हता.

डिसेंबर 2019 च्या पहिल्या आठवड्यात आम्ही त्यांची भेट घेतली. सिद्दी समाज याविषयावर आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. आम्ही करू इच्छित असलेला अभ्यास प्रकल्प, त्या अभ्यासातून साध्य होणाऱ्या गोष्टी यांविषयी बोलणे झाले. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद आला, तो आमच्यासाठी खूप महत्त्वाचा होता. ते म्हणाले "मागील काही वर्षांपासून आदिवासी समाजजीवन, मुस्लीम समाजसुधारणा आणि आफ्रिकेतील कृष्णवर्णीय समाज यांच्यावर जाणीवपूर्वक लेखन मिळवण्याचा व ते प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न साधना करत आहे. तुम्ही सिद्दी समाजावरील अभ्यासाचा प्रस्ताव आणि त्यासाठी लागणाऱ्या खर्चाचा तपशील मला पाठवून द्या." त्यांच्या या सकारात्मक प्रतिसादामुळे आम्ही सुखावलो.

या अभ्यासासाठी साधारण दोन लाख रुपयांचा खर्च अपेक्षित होता. दोन दिवसांत खर्चासहीत पूर्ण प्रोजेक्ट प्रपोजल तयार करून त्यांना पाठवले. परंतु, मनात एक शंका होती. हा प्रोजेक्ट त्यांच्या मिटिंगमध्ये स्वीकारला जाईल का? पण दोन दिवसानंतर त्यांचा फोन आला. "साधनाकडून या कामासाठी तुम्हाला फेलोशीप देण्यात येत आहे. तुम्ही कामाला लागा." 

पत्रकारितेची पार्श्वभूमी असणारे आम्ही काही तरुण. यातील प्रवीण खुंटे आणि ज्योती भालेराव-बनकर या दोघांना सकाळ, पुढारी, लोकमत इत्यादी वर्तमानपत्रांमध्ये काम करण्याचा अनुभव होता. यासोबतच आम्ही काही मित्र Decode India या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून (मुख्य प्रवाहाकडून दुर्लक्षित राहिलेल्या) विविध समाजिक विषयांवर छोटे छोटे व्हिडिओ रिपोर्ताज बनवत होतो. त्यामुळे आम्हाला लिखित आणि व्हिडिओ अशा दोन्ही स्वरुपाच्या कामाचा अनुभव होता. त्यामुळे या विषयावर आम्ही दोन प्रकारे काम करणार होतो. व्हिडिओची जबाबदारी माझ्याकडे होती. डिसेंबर 2019च्या शेवटी प्रवीण खुंटे आणि मी उत्तर कर्नाटकातील सिद्दी समाज राहतो त्या भागात पूर्वपाहणीसाठी जाण्याचे ठरवले. यासाठी साधनाकडून आम्हाला 50 हजार रुपयांचा ऍडव्हान्स देण्यात आला. 

दरम्यान आम्हाला इंटरनेटवरून काही नावं मिळाली होती, त्यांच्याशी संपर्क केला. त्यातील पहिले नाव फादर सुजय डॅनियल यांचे मिळाले. ते कारवार जिल्ह्यातील मुंडगोड या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या ‘लॉयला स्कुल’ या शैक्षणिक संस्थेतील एका शाळेचे मुख्याध्यापक होते. या संस्थेमध्ये अनेक सिद्दी मुले शिकत होती. फादर सुजय डॅनियल यांची शाळेमध्ये भेट घेतली. ती शाळा कशाप्रकारे सिद्दी समाजावर काम करते हे त्यांनी सांगितले. नंतर त्यांनी आसपासच्या काही गावांमध्ये भेटी देण्यासाठी संपर्क नंबर दिले, आम्हाला मार्ग दाखवण्यासाठी एका तरुण सोबतीला दिला. हा सिद्दी समाजामधीलच मुलगा होता. त्याचे नाव सुनील सिद्दी. आयुष्यात पहिल्यांदाचा आम्ही एका सिद्दीला भेटलो होतो. त्याच्या सोबत बोलताना एक गोष्ट लक्षात आली की, शिक्षणामध्ये कितीही हुशार असले तरी पोटाच्या भुकेपायी या समाजातील मुलांना शिक्षण अर्धवट सोडून उपजीविकेसाठी काम करावे लागते.

महाराष्ट्र राज्याच्या दक्षिणेला लागून असलेल्या बेळगाव, कारवार व धारवाड या जिल्ह्यांत सिद्दी समाज मोठ्या प्रमाणात राहतो. हा भाग जंगलाने वेढलेला आहे. वाहतूकीच्या सुविधा अपुऱ्या आहेत. त्यामुळे या भागात भटकायचे असल्यास, एकतर चालत जाणे किंवा स्वतःचे वाहन असले पाहिजे. 

सुनील आम्हाला मुंडगोडपासून साधारण 55-60 किमीवर असलेल्या हलियाल या तालुक्याच्या ठिकाणी घेऊन गेला. या तालुक्यामध्ये सिद्दी समुदाय मोठया प्रमाणात राहतो. येथील काही गावांतील सिद्दी लोकांना आम्ही भेटलो. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यावेळी या लोकांकडूनच आम्हाला सिद्दींच्या अस्तित्वासाठी कराव्या लागणाऱ्या लढ्याबद्दल कळले.  “आमच्या समाजाबद्दल आम्हाला काही माहीत नाही. पण दियोग तुम्हाला योग्य माहिती देतील. त्यांनाच सर्व माहीत आहे.”, असे लोक म्हणत होते. त्यामुळे दियोग सिद्दींना भेटण्याचा निर्णय घेतला. त्यांना फोन केला. तेव्हा त्यांनी आमची थोडी माहिती विचारली आणि  भेटण्यासाठी रात्री आठची वेळ दिली. 

तो संपूर्ण दिवस आम्ही हलीयाल या गावामध्ये भटकलो. पण सिद्दी समाजाबद्दल हवी तशी माहिती मिळत नव्हती. सर्व लोक आपला दिनक्रम सांगत होते. पण सिद्दींच्या इतिहासाबद्दल कोणालाच माहीत नव्हते. दिवसभर फिरल्यामुळे आम्हीही खूप थकलो होतो. एकच आशेचा किरण आम्हाला दिसत होता. तो म्हणजे दियोग सिद्दी. 

संध्याकाळचे सात वाजले आणि आम्ही दियोग सिद्दींना फोन केला. ते घरीच होते. लगेच निघालो. दियोग सर हलियाल या तालुक्याच्या ठिकाणी रहात होते. गल्ली बोळांमधून जावे लागते होते. पण घर काही सापडत नव्हते. शेवटी लोकांना विचारत विचारत पोहचलो. दियोग सिद्दी दारातच उभे होते. त्यांना बघताच आम्हाला आश्चर्य वाटले. एकदम साधे कपडे, साधे घर आणि साधे राहणीमान (कारण आपल्या येथील नेते हे पांढऱ्या कडक इस्त्रीच्या कपड्यातच असतात ना.. पण इथे आम्ही वेगळंच पहात होतो. हा सिद्दी समाजाचा नेता साधा सरळ.)

घरात जाताच त्यांनी आम्हाला पहिला प्रश्न विचारला “तुम्ही कोठून आला आणि माझ्याबद्दल कोणी सांगितलं?” आम्ही त्यांना संपूर्ण माहिती दिली. तेव्हा ते एकदम भडकले. आम्हाला काहीच कळेना. अशी कोणती चुकीची गोष्ट आम्ही बोललो? त्यांच्या पुढील बोलण्यातून आम्हाला कळले की त्यांचा रोख हा लॉयला संस्थेकडे होता. कारण आम्ही लॉयला संस्थेचे नाव घेतले होते. सोबत आलेल्या सुनीलला त्यांनी विचारले, "हे कोण आहेत? काय करायला आले आहेत? काय पाहिजे यांना?" सुनील सुद्धा गप्प बसला. त्यालाही माहीत नव्हते, आम्ही का आलो आहोत. लॉयला संस्थेचे नाव घेतल्यामुळे त्यांचा गैरसमज झाला होता. 

मग दियोग सिद्दी सांगू लागले. “वेगवेगळ्या संस्थांनी स्वतःच्या फायद्यासाठी सिद्दी समाजाचा उपयोग करून घेतला. स्वतःची पोटं भरली. आणि आमचा समाज मात्र आजही मागासलेला आहे. हे आमच्या लोकांनाच समजत नाही. त्यांची दिशाभूल करून काही संस्था स्वतःचा फायदा करून घेत आहेत.” यावेळी सुनील व आम्ही दोघेही गप्प बसून ऐकत होतो. पुढे दियोग सिद्दींनी आम्हाला सर्व माहिती तर दिलीच पण इतर बाबतीतही मदत केली. 

त्यांनी सिद्दी समाजाचा इतिहास आणि चळवळी यांविषयी बरीच माहिती दिली. अशी माहिती ज्याविषयी या आधी कोणी लिहिले नव्हते. दियोग सिद्दी यांच्या कुटुंबाचे सिद्दींच्या अस्तित्वाच्या लढ्यात खूप मोठे योगदान आहे. दियोग यांचे वडील बस्त्याव सिद्दी यांनी या लढ्याचे नेतृत्व केले होते. आजही तो लढा त्याच जिद्दीने दियोग सिद्दीसुद्धा लढताना दिसतात. त्यांच्याकडून आम्हाला या लढ्यातील इतर नेत्यांचे संपर्क मिळाले. 

यावेळी आम्हालाही वाटले, ज्यांना आम्ही आधी भेटलो, ते लोक फक्त स्वतःची कामे दाखवण्याचे प्रयत्न करत होते. नाण्याची दुसरी बाजू ते आम्हाला दाखवत नव्हते. पण दियोग सिद्दी जी बाजू दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत,ती बाजू कोणीच आजपर्यंत पाहिली नाही. शिवाय, चळवळीचा जो गट आहे तो फक्त प्रादेशिक भाषाच जाणतो. त्यामुळे त्यांची मते त्यांना वरच्या स्तरावर मांडता आली नाहीत. यामुळेच हे लोक पुढे आले नाही. किंवा जाणून बुजून त्यांना दडपून टाकण्यात आले.यामुळे आम्ही दुसऱ्या दिवसापासून स्वतंत्र फिरण्याचा निर्णय घेतला. दियोग सिद्दींनी सांगितलेल्या यल्लापूरमधील इमाम सिद्दींना भेटलो. त्यांच्याकडूनसुद्धा आम्हाला चळवळी आणि चळवळीमुळे मिळालेल्या आरक्षणाच्या लढ्याची माहिती मिळाली. त्यांनी आम्हाला खूप मदत केली. 

मुंडगोड मधील एका गावात फिरत असताना प्रिन्सिटा सिद्दी या 14 वर्षांच्या मुलीची माहिती मिळाली. ती हर्डल्स या खेळातील अव्वल खेळाडू आहे. एवढ्या लहान वयातच प्रिन्सिटाने 200 पेक्षा अधिक पदके मिळवली आहेत. तिचे आई - वडील, काका काकी तेथे होते. त्यांनी प्रिन्सिटा सध्या कारवारमध्ये स्पर्धेची तयारी करत असल्याचे सांगितले. पुढच्यावेळी आल्यावर आम्हाला प्रिन्सिटावर स्टोरी करायची होती. परंतु, स्पर्धेला गेल्यामुळे शक्य झाले नाही. प्रिन्सिटा विषयी बोलताना तीची आई म्हणाली “मी तिला म्हणाले, जो पर्यंत शिक्षण आहे तो पर्यंत खेळ. नंतर यांची त्यांची कामेच करावी लागतात." त्यांच्या बोलण्याचा सूर निराशेचा होता. हे ऐकून आम्हालाही वाईट वाटले. ढीगभर मेडल मिळूनसुद्धा गावात, पेपरात कुठेही दखल घेतली जात नाही हे दुर्दैव आहे.

याच गावात आम्हाला जुलियाना फर्नांडिस भेटल्या. त्या सांस्कृतिक कार्यक्रम करतात. त्यांनी सिद्दींच्या दम्माम या लोककलेच्या सादरीकरणासाठी गावागावात गट तयार केले आहेत. त्या माध्यमातून लग्न किंवा शासकीय कार्यक्रमात सिद्दी संस्कृतीची ओळख करून दिली जाते. येथे दम्मामच्या ठेक्यावर नृत्य करतात. दररोजच्या जीवनात येणाऱ्या सुख दुःखाच्या गोष्टी दम्मामच्या माध्यमातून त्या सांगतात. सिद्दींचे लोप पावत चाललेले दम्माम वाद्य आणि त्यावरील नृत्य ही लोककला पुढच्या पिढीपर्यंत घेऊन जाण्याचे काम त्या करत आहेत.

या पाच दिवसांत मुंडगोड, हलियाल, एल्लापूर या तीन तालुक्यांमधील सिद्दींच्या दोडकोप्पा, भगवती, बीटकुंबरी, यलगोंडा आदी गावांना आम्ही भेटी दिल्या. अनेक लोकांशी बोललो. यातून सिद्दी समाज खूप जवळून समजून घेता येत होता. त्यांचे प्रश्न, समस्या, संस्कृती, राहणीमान, खेळांमधील योगदान अशा सर्व गोष्टींचा उलगडा होत होता. यातूनच आम्हाला कुठल्या विषयांवर काम करायचे आहे याचा अंदाज आला. परंतु, यासाठी अंदाजे ठरवण्यात आलेल्या दोन लाख रुपयांच्या बजेटमध्ये हे काम होईल असे वाटले नाही. पाच दिवसांच्या दौऱ्यानंतर आम्ही पुण्यात आलो.

पुण्यात आल्यावर विनोद शिरसाठ यांची भेट घेतली. आमची निरिक्षणे त्यांच्यासमोर मांडली. कोणत्या विषयावर काम करण्याची आवश्यकता आहे, याचे तपशील दिले. यासोबतच कामासाठीचे बजेट वाढवण्याचीही विनंती केली. त्यांनी ही विनंतीही मान्य करून आणखी 50 हजार रुपये वाढवले. विषय निवडीचे पूर्ण स्वातंत्र्य आम्हाला दिले. त्यानंतर पूर्व पाहणीतुन समोर आलेल्या व आवश्यक त्या सर्व गोष्टींची जुळवाजुळव सुरु झाली. 

आम्हाला हा रिपोर्ताज लिखीत आणि व्हिडिओच्या माध्यमातून करायचा होता. या कामासाठी आवश्यक असणाऱ्या संशोधनाचा बराचसा भार प्रवीण खुंटे याने उचलला होता. लेखनाची जबाबदारी प्रवीण खुंटे आणि ज्योती भालेराव-बनकर या दोघांनी घेतली. माझ्याकडे व्हिडिओची जबाबदारी होती. आम्हाला एक व्हिडिओग्राफर व एका फोटोग्राफरची आवश्यकता होती. यासाठी चंदन सिंग आणि सूरज निर्मळे यांची निवड आम्ही केली. आमचे हे काम नॉनफिक्शनल पद्धतीचे होते. यामध्ये सतत सतर्क राहावे लागते. कारण एखादे फुटेज कॅमेऱ्यातून सुटले तर ते पुन्हा घेता येत नाही. त्यामुळे नजर चहूबाजूकडे व कॅमेरा हातात ठेवावा लागणार होता. आमचे काम चांगल्या दर्जाचे व्हावे यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन मिळावे म्हणून विनोद शिरसाठ यांनी, संशोधनाचा व लेखनाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या डॉ. मिलिंद बोकील यांना मार्गदर्शनासाठी आमंत्रित केले. बोकील सरांनी केलेल्या मार्गदर्शनाचा फायदा आम्हाला कसा होत आहे याची जाणीव प्रत्यक्ष तिथे गेल्यावर झाली.

सगळी तयारी झाल्यानंतर अखेर 1 ते 15 फेब्रुवारी 2020 या काळात प्रत्यक्ष तिथे जाऊन काम करण्याचे नियोजन आम्ही केले. एक चारचाकी वाहन भाडेतत्त्वावर घेतले आणि 31 जानेवारीच्या रात्री 10 वाजता आमचा कर्नाटकच्या दिशेने प्रवास सुरु झाला. 1 फेब्रुवारीला सकाळी 7 ला पोहचलो. लगेच दियोग सिद्दी यांच्याकडे निघालो. या दिवशी आम्हाला सिद्दीची संस्कृती, राहणीमान व दम्माम नृत्य यांद्दल काही भाग शूट करायचा होता. दियोग सिद्दींशी चर्चा करून त्यांच्यासोबतच आम्ही हालियाल पासून 25 किमी अंतरावर असणाऱ्या भागवती गावाला गेलो. दम्माम नृत्य करणाऱ्या काही महिला घरी नसल्याने त्यादिवशी सायंकाळी दम्माम नृत्य शूट करावे लागले. तलावाच्या काठावर आम्ही हे दम्माम नृत्य शूट केले. प्रत्यक्ष दम्माम पाहण्याचा आमचा तो पहिलाच अनुभव होता. दिवसभरात काही मुलाखती आणि दम्मामचे शूट करून आम्ही रुमवर आलो. रात्री दियोग सरांनी त्यांच्याकडील चळवळीची जुनी कागदपत्रे, फोटो व काही व्हिडिओ आम्हाला दाखवले.

आमची सर्वांत जास्त दमछाक मुलाखत घेतल्यावर व्हायची. कारण मुलाखतीमध्ये सांगितलेल्या गोष्टींशी संबंधीत फुटेज गोळा करणे हे खूप जिकिरीचे काम होते. फुटेजशिवाय प्रश्न योग्य पद्धतीने मांडता आले नसते. चुका होत होत्या, पण आम्ही शिकत होतो. रात्री रुमवर आल्यावर इलेक्ट्रॉनिक्स साहित्याची तपासणी करायची, दिवसभर केलेल्या कामाचे फुटेज पाहायचे, मुलाखती ऐकायच्या. पंधरा दिवस आमचे हेच सुरु होते. कॅमेऱ्याची सवय नसल्याने मुलाखती देताना अनेक लोक अस्वस्थ व्हायचे. त्यामुळे त्यांच्याकडून योग्य माहिती मिळत नव्हती. त्यांना विश्वासात घेऊन बोलते करणे हे मोठे आव्हानात्मक काम. त्यामुळे मुलाखतीच्या आधी प्रवीण खुंटे आणि ज्योती भालेराव-बनकर हे दोघे त्यांच्याशी अनौपचारिक चर्चा करायचे. त्यांच्या बोलण्यात आलेले प्रमुख मुद्दे लिहून मुलाखतीच्या वेळी तेच प्रश्न त्यांना विचारायचे. यामुळे आमच्या तीन गोष्टी सोप्या झाल्या. मुलाखत झटपट होऊ लागली, समोरच्याला काय विचारायचे हे निश्चित झाले, त्यांची भीती कमी झाली. 

हे काम करताना अडचणी खूप आल्या. लोकांच्या भेटीचे दिवस आणि वेळा आधीच ठरवल्या होत्या. आम्ही त्यांच्या संपर्कात राहायचो, पण ऐनवेळी अनेकांची भेट व्हायची नाही. मग अडचणी वाढायच्या. प्रिन्सिटाची भेट अचानक रद्द झाल्याने, ऐनवेळी कोणत्या खेळाडूला भेटायचे हे समजेना. मायकल सिद्दी या कार्यकर्त्याच्या मदतीने आम्ही कुस्तीपटू लीना सिद्दीच्या वडिलांशी संपर्क केला. लीनाविषयी मुक्ता चैतन्य यांच्या लेखात आम्ही वाचले होते. पण गावाची यात्रा असल्याने लिनाचे वडील अंथॉन सिद्दी आम्हाला वेळ द्यायला तयार नव्हते. त्यामुळे 70 किमीचा अधिक प्रवास करून रात्री साडेअकरा वाजता त्यांच्या घरी गेलो, त्यांना वेळ देण्याची विनंती केली. त्यांनी ती मान्य केली. लीनाच्या प्रॅक्टिसचे शूट घ्यायचे असल्यास पहाटे 5.30 वाजता यावे लागेल असे त्यांनी आम्हाला सांगितले. त्यादिवशी मध्यरात्री पावणेएक वाजता रूमवर पोहोचलो. दोन तासांची झोप घेऊन पहाटे 4 वाजता उठून प्रचंड थंडी, सगळीकडे धुकं असताना 5.30 वाजता त्यांच्या घरी पोचलो. पण घाईगडबडीमध्ये एक कॅमेरा हॉटेलवरच विसरून आलो. आधीच झोप झालेली नव्हती, त्यात जाऊन येऊन पुन्हा 80 किमी प्रवास करावा लागल्याने आमचे ड्रायव्हर जाम चिडले होते. पण पर्याय नव्हता. परत जाऊन कॅमेरा आणावा लागला. त्यानंतर पुढील काम पूर्ण झाले. असे अनेक लहानमोठे अनुभव आहेत. उदाहरणार्थ, सकाळी एकदा तालुक्याचे ठिकाण सोडून गावांमध्ये गेल्यास जेवण मिळायचे नाही. भेळीचे मुरमुरे, चिवडा, बिस्कीट यावरच दिवस काढावा लागायचा. 

या पंधरा दिवसांमध्ये शरीराचे नियोजन खूप गडबडले होते. कारण मुलाखती घेणे, फुटेजेस पाहणे, फुटेजेस शोधणे, सर्व गोष्टीचे नियोजन करणे यांमध्ये सकाळची संध्याकाळ कधी होत होती, तेही समजत नव्हते. त्यामुळे जेवणाचा आणि झोपण्याचा पत्ताच नव्हता. रात्री खूप थकवा यायचा. पण आम्ही तिथे आराम करण्यासाठी गेलो नव्हतो याची जाणीव सगळ्यांना होती. पंधरा दिवसांमध्ये आम्ही ते शूट संपवले.  

काम संपवून परत आलो. आता उरलेली लढाई करायची होती. प्रवीण खुंटे आणि ज्योती यांनी लेखांचे विषय वाटून घेतले, विषयांसंदर्भातील मुद्दे काढून लिखाणाचे काम सुरू केले. दुसऱ्या बाजूला डॉक्युमेंटरीचे काम सुरू झाले. याकाळात शिरसाठ सरांची पुन्हा भेट घेतली. कामाचा आढावा दिला. मात्र, त्यानंतर काही दिवसांनी म्हणजे 22 मार्चला  कोरोनामुळे सरकारने लॉकडाऊन जाहीर केले आणि आमच्या कामाला खीळ बसली. ऑफिसला जाता येईना आणि फोनवर समन्वय साधण्यात अडचणी येऊ लागल्या. लेखांचे काम सुरू होते, पण डॉक्युमेंटरीचा सेटअप ऑफिसमध्ये होता. तिथे जाता येत नव्हते. त्यामुळे व्हिडिओचे काम जवळपास सात महिने थांबले.तरीही सात महिने ऑफिसचे भाडे भरावे लागले. त्यामुळे खर्च वाढला, अखेर ऑफिस बंद करण्याचा निर्णय आम्ही घेतला. संपूर्ण सेटअप माझ्या रूमवर हलवावा लागला. सगळ्याच कामाचा खर्च वाढला. अशात अतुल आहेर हा ज्योतीचा मित्र मदतीला धावून आला. त्याने व्हिडिओ एडिट करून देण्याची जबाबदारी घेतली. पण व्हिडिओ अधिक प्रभावी होण्यासाठी व्हिज्युअल्स आणखी हवेत असे त्याने सांगितले. तुम्हाला परत तिथे जावे लागेल अशी सूचना त्याने केली. हे काम आम्हाला अधिक चांगले करायचे होते, म्हणून आम्ही पुन्हा कर्नाटकला जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी मी, ज्योती आणि अतुलच्या ऑफिसमधील दोन व्हिडीओग्राफर असे चौघेजण व्हिज्युअल्स मिळविण्यासाठी पुन्हा तिकडे गेलो. परत आल्यावर व्हिडिओ अंतिम केले. या भेटीत सिद्दी समाजासाठी सरकार दरबारी विशेष प्रयत्न करणाऱ्या माजी खासदार मार्गारेट अल्वा यांची आम्ही मुलाखत घेतली. मुलाखतीसाठी त्यांची वेळ मिळावी यासाठी विनोद शिरसाठ यांनी कुमार केतकर यांना विनंती केली होती, केतकर सरांनी मार्गारेट अल्वा यांच्याशी तातडीने संपर्क केल्यामुळे आम्ही त्यांची मुलाखत अल्प वेळात घेऊ शकलो.      

दुसरीकडे कोरोनाच्या सुरुवातीच्या आठ-नऊ महिन्यांच्या काळात काळात विनोद शिरसाठ पुण्यात नव्हते. त्यामुळे प्रत्यक्ष त्यांच्यासोबत बसून काम करण्यात किंवा लेखांमध्ये सुधारणा करण्यात अडचणी येत होत्या. प्रवीण खुंटे यांचा पहिला लेख त्यांनी वाचला, त्यांना तो आवडला. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत उरलेले सर्व लेख लिहून त्यांना पाठवले. त्यामध्ये त्यांनी काही सुधारणा सुचवल्या. या सगळ्यात एक वर्षाचा काळ लोटला. अखेर एप्रिल 2021 मध्ये या लेखांवर पुन्हा काम सुरु झाले. साधनेतील कर्तव्यच्या सर्व सहकाऱ्यांसोबत (हीना, सुहास, मृदगंधा, सुदाम, समीर) डॉक्युमेंटरीचे/व्हिडिओंचे स्क्रिनिंग केले. सर्वांना ते आवडले. 

मध्ये वर्षभराचा काळ गेल्याने आम्ही प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त झालो होतो. त्यामुळे यावेळी आम्हाला या कामासाठी आवश्यक तेवढा वेळ देणे शक्य होत नव्हते. त्यामुळे हे काम आणखी लांबले. हा कंटेम्पररी विषय नसल्याने हा रिपोर्ताज कधी प्रसिद्ध करायचा याबाबत आम्ही काही निमित्त शोधत होतो. दरम्यान 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 14 एप्रिल अशी काही निमित्तं आली आणि गेली. अखेर 1 मे 2022 पासून लेख आणि व्हिडिओची मालिका असा रिपोर्ताज कर्तव्य साधना वरून प्रसिद्ध करण्याचे निश्चित झाले. मग कर्तव्यचा उपसंपादक सुहास पाटील याच्याशी चर्चा/ संपर्क करीत आम्ही हे काम अंतिम केले. 

साधारणत: चार-पाच महिन्यांत हे काम पूर्ण होईल असा आमचा अंदाज होता. पण दोन वर्षांचा काळ लागला. अचानक आलेल्या कोरोना संकटामुळे काही गोष्टी कोणाच्याच हातात नव्हत्या. पण पुरेसा वेळ मिळाल्यामुळे लेखनाच्या ड्राफ्टवर अधिक काम करता आले. आमच्या संपूर्ण टीमने पूर्ण क्षमतेने हे काम केले आहे. या अभ्यासामधून आम्ही खूप काही शिकलो. स्वतःच्या क्षमता आणि उणीवा यांची जाणीव नव्याने झाली. हे काम परिपूर्ण आहे असा दावा आम्ही करणार नाही. पण ते जीव ओतून केले आहे. आजवर दुर्लक्षित राहिलेल्या सिद्दी समाजावरील हा दीर्घ रिपोर्ताज वाचकांना आवडेल अशी आशा बाळगतो. आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया यांची आम्ही वाट पाहात आहोत.

- प्रवीण राठोड
rpravin502@gmail.com


प्रिय वाचकहो,
साधनाचे भूतपूर्व संपादक यदुनाथ थत्ते, वसंत बापट, ग. प्र. प्रधान या तिघांचे जन्मशताब्दी वर्ष चालू आहे. हा रिपोर्ताज त्या तिघांच्या स्मृतिला अर्पण करीत आहोत. या अभ्यासासाठी दिलेली फेलोशिप 'थत्ते बापट  प्रधान फेलोशिप' या नावाने ओळखली जाईल! आणि एक आवाहन ...

1. या रिपोर्ताजसाठी दिलेल्या फेलोशीप रकमेतून, या पाच तरुणांना पुरेसे मानधन राहिले नाही. त्यांना ते देता यावे असा प्रयत्न आहे.
2. शिक्षण घेणाऱ्या सिद्दी समाजातील मुलामुलींना आणि काही गावांना मदतीची गरज आहे.
3. अशा प्रकारच्या अन्य विषयांवरील अभ्यासासाठी साधनाकडे फेलोशिप मागणारे सात आठ चांगले प्रस्ताव आलेले आहेत. 

वरील तीनपैकी कोणत्याही कारणासाठी कोणी आर्थिक मदत करू इच्छित असेल तर कृपया आमच्याशी संपर्क साधा. साधना ट्रस्ट च्या बँक खात्यावर देणगी स्वीकारता येईल ( साधनाकडे 80 G आहे ),  नंतर तिची योग्य प्रकारे कार्यवाही होईल, त्याचे सर्व तपशील संबंधितांना  कळवले जातील. धन्यवाद! 

विनोद शिरसाठ, संपादक, साधना 
weeklysadhana@gmail.com

Mob 9850257724

प्रवीण खुंटे (सिद्दी समाज रिपोर्ताजचा समन्वयक)
kpravin1720@gmail.com

Mob : 97302 62119

Tags: आदिवासी डॉक्युमेंटरी कर्नाटक दुर्लक्षित समाज अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आरक्षण संशोधन लेखमाला उत्तर कर्नाटकातील सिद्दी समाज प्रवीण राठोड Load More Tags

Comments:

Shivaji shinde

प्रवीण तू आणि तुझ्या टीमने केले काम खरोखरच अवर्णनीय आहे. असेच चागले काम करीत रहा टीमला शुभेच्छा

SHIVAJI PITALEWAD

खूप छान काम आणि अनुभव!! साधनाच्या या चांगल्या कामासाठी खूप खूप शुभेच्छा!!

Add Comment

संबंधित लेख