सिद्दी संस्कृती

उत्तर कर्नाटकातील सिद्दी समाजाविषयीची लेखमाला : 6

प्रत्येक समाजाची विशिष्ट अशी संस्कृती असते. ती त्यांच्या जगण्याचा महत्त्वाचा भाग असते. तिला अनेक आयाम असतात. त्यात मुख्यतः भौगोलिक स्थान, राहणीमान, धर्म, सण-समारंभ, भाषा, प्रथा-परंपरा, उपासना, खाण्यापिण्याची पद्धत, दंतकथा इत्यादींचा समावेश होतो. केवळ वंशाने आफ्रिकन असलेल्या सिद्दींचा आता आफ्रिकन संस्कृतीशी संबंध राहिलेला नाही. त्यांनी पूर्णत: भारतीय संस्कृती स्वीकारली आहे. आणि ते आपल्या देशातील हिंदू, मुस्लीम आणि ख्रिश्चन या प्रमुख तीन धर्मांमध्ये विभागले आहेत. इतर लेखांमध्ये सिद्दींची चळवळ, दम्माम, सिद्दींचा भारतीय इतिहास यांविषयीची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या लेखात सिद्दींच्या सांस्कृतिक जीवनाचा आढावा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

खरे तर आदिवासी म्हटले की, त्यांना कुठलाही धर्म नसतो. कुठल्याही एका धर्माचा त्यांनी अंगीकार केलेला नसतो. एखाद्या विशिष्ट धर्माप्रमाणे ते स्वतःच्या वेगळ्या जगण्याच्या पद्धती, परंपरा पाळतात. पिढ्यान्‌पिढ्या जंगलात राहत असल्याने जंगलाला अनुसरून त्यांची जीवनपद्धती तयार झालेली असते. त्यामुळेच त्यांना आदिवासी जमाती म्हटले जाते. त्यांच्या परंपरा त्यांच्या जगण्याविषयी सांगत असतात. पण सिद्दी समाजाचा आदिवासी म्हणून अंतर्भाव होत असला तरी इतर भागांतील आदिवासींप्रमाणे ते निधर्मी नाहीत. आफ्रिकन देशांमधून भारतात आणल्यानंतर निरनिराळ्या काळांत ते ज्या ज्या धर्मातील लोकांच्या संपर्कात आले किंवा गुलाम म्हणून ज्यांच्याकडे राहिले त्यांचा धर्म त्यांनी स्वीकारला, त्याप्रमाणे त्यांची संस्कृती, जीवनमान घडत गेले आहे.

सातशे ते आठशे वर्षांपासून आतापर्यंत त्यांच्या जीवनमानात हळूहळू का होईना बदल झालेले आहेत. खानपान, पेहेराव यांत बदल घडत गेले आहेत. त्यांनी इतर समाजांतील काही गोष्टींचा स्वीकार केला असला तरी इतर समाजांनी मात्र त्यांना अजून स्वीकारलेले नाही. जसे हे लोक त्यांच्या वांशिक गुणांमुळे, वेगळ्या शारिरिक ठेवणीमुळे आपल्यापेक्षा वेगळे ठरतात तशीच त्यांची जीवनशैलीही बरीच वेगळी आहे. ती जाणून घेणे औत्सुक्याचे आहे.  

उत्तर कर्नाटकातील सिद्दी हे आफ्रिकेतील बंटू या आदिवासी जमातीचे आहेत, हे आता संशोधनाच्या आधारे सिद्ध करण्यात आले आहे. हे लोक संख्येने जरी कमी असले तरी तीनही धर्मांत विखुरलेले आहेत. उत्तर कर्नाटकात राहणाऱ्या सिद्दींमध्ये ख्रिश्चनांची संख्या अधिक असून, त्यानंतर मुस्लीम आणि हिंदू येतात. धर्म हा त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक असला तरी त्याही आधी आपण सर्व सिद्दी आहोत याची जाणीव त्यांच्यात आहे. ही जाणीव अधिक तीव्र करण्यात सिद्दींनी केलेल्या चळवळीचा हातभार मोठा आहे.

तीनही धर्मांतील रीती-रिवाज, रूढी, परंपरा, सण-समारंभ येथे साजरे केले जातात. ज्या गावांमध्ये सिद्दींची संख्या अधिक आहे, अशा प्रत्येक गावात चर्च, मशीद बांधण्यात आल्या आहेत. नावांवरूनच त्यांच्या धर्माची माहिती होते. घरातल्या भिंतींवर देवीदेवता, चर्च, मशीद, धर्मगुरूंचे फोटो लावलेले असतात. त्यावरून हे कुटुंब कुठल्या धर्माचे आहे याची जाणीव होते. पूर्वी तीनही धर्मांतील लोकांमध्ये एवढा सलोखा नव्हता. ते एकमेकांपासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करायचे. इतर धर्मांतील लोक आपले धर्मांतर करून त्यांच्या धर्मात घेतील असा संशय त्यांना एकमेकांविषयी वाटायचा.

त्यामुळे इतर धर्मीयांसोबत कुठल्याही स्वरूपाचा अधिक व्यवहार करत नव्हते. काही प्रमाणात रोटी व्यवहार झाला तरी सिद्दी असूनही बेटी व्यवहार होत नव्हते. परंतु आता चळवळींमुळे परिस्थिती बदलली आहे. धर्म कुठलाही असो- आपण प्रथम सिद्दी आहोत या भावनेने एकमेकांमधील बेटी व्यवहार सुरू झाले आहेत. धर्म कुठलाही असो, मुलगा-मुलगी सिद्दी असली पाहिजे. यातून प्रेमविवाहांनादेखील संमती मिळण्यास सुरुवात झाली. असे असले तरी दुसऱ्या बाजूला, सामान्य भारतीय लोक अजूनही त्यांच्या धर्मातील सिद्दींसोबत बेटी व्यवहार करण्यास तयार नाहीत. ही परिस्थिती हिंदू, मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्मांत सारखीच आहे. सामान्य हिंदू, मुस्लीम किंवा ख्रिश्चनधर्मीय केवळ धर्मानेच सिद्दींना आपले मानतात; परंतु बेटी व्यवहार त्यांच्या सोबत करत नाहीत हेदेखील जळजळीत सत्य आहे. याचे कारण सिद्दी लोक आपल्या धर्माचे असले तरी आपल्यापेक्षा खालचे किंवा सामाजिकदृष्ट्या मागासलेले असल्याची भावना त्यांच्यामध्ये ठासून भरली आहे. अशाही परिस्थितीत सामान्य भारतीयांसोबत काही प्रमाणात का होईना आंतरजातीय विवाह होण्यास आता सुरुवात झाली आहे, ही त्यातील आश्वासक बाब. असे विवाह प्रामुख्याने प्रेमविवाहातून होत आहेत.

सिद्दींसोबत होणाऱ्या सामाजिक भेदभावाचा संदर्भ (Construction of Siddis in cast structure – TC Palakshppa) यांच्या पुस्तकात देण्यात आला आहे.

“उत्तर कर्नाटकातील ब्राह्मण, लिंगायत या वरिष्ठ जातींच्या घरात तीनही धर्मांतील सिद्दींना प्रवेश असायचा. शंकर, विष्णू, गणपती अशा हिंदूंच्या देवळातदेखील प्रवेश मिळायचा. परंतु त्यांना या देवांची पूजा करण्याचा अधिकार नव्हता. ब्राह्मण, लिंगायत या वरच्या जाती. त्यांच्या खालोखाल कारेवोक्कल्स, कुणबी, मराठा, हलाक्काली वोक्कल्स या जाती येतात. सिद्दींना यामध्ये सर्वांत खालचे स्थान देण्यात आले होते. या वरिष्ठ जातींचे लोक सिद्दींना घरात जेवायला, पाणी देत नसतं. एवढा भेदभाव होऊनही अनेक सिद्दींनी हिंदू धर्म स्वीकारला आहे. मंदिरात पूजा करायला मिळत नसली तरी आपापल्या घरांत ते हिंदू देवतांची पूजा करत असतात.” 

पूर्वी हिंदू धर्मातील सिद्दींसोबत अशा स्वरूपाचा व्यवहार केला जात होता. परंतु परिस्थिती आता बदलली आहे. मंदिरांमध्ये जाऊन पूजा करण्याचादेखील अधिकार हिंदू सिद्दी बजावत आहेत.

दोन शतकांच्याही आधी सिद्दींसोबत झालेल्या आंतरजातीय विवाहाचे संदर्भदेखील एका संशोधनात देण्यात आले आहेत. आज काही प्रमाणात सिद्दींचे इतर भारतीयांसोबत विवाह होत आहेत. त्याचप्रमाणे पूर्वीच्या काळी सिद्दींचे भारतीय लोकांसोबत झालेल्या आंतरजातीय विवाहाची उदाहरणे सापडली आहेत.

डॉ. सुरेंद्र कुमार यांनी सिद्दींवर केलेल्या संशोधनपर निबंधात याची उदाहरणे देण्यात आली आहेत. त्यात दिलेल्या माहितीअनुसार 1851च्या जनगणनेअनुसार गोव्यातील सिद्दींची संख्या 696 एवढी होती. तर संपूर्ण युरोपिअन लोकांची संख्या 1 हजार 851 एवढी होती. (सुरेंद्र कुमार – प्रकरण 2 पृष्ठ क्र. 41) त्या वेळी  सिद्दींनी इतर भारतीयांसोबत लग्न केल्याची उदाहरणे इतिहासात आहेत. मॉरिशिअस देशाच्या नागरी दस्तऐवजांमध्ये याचे संदर्भ सापडतात. या दस्तऐवजाअनुसार 1729 ते 1810 या काळात भारतात आफ्रिकेतल्या मोझंबिकमधील सिद्दी गुलाम आणि भारतीय गुलाम यांच्या अंतरजातीय विवाहाची नऊ उदाहरणे सापडतात. सिद्दी गुलाम संख्येने कमी असल्याने लग्नासाठी पर्याय कमी असायचे. तशीच परिस्थिती भारतीय गुलामांमधील काही समाजांची होती. त्या वेळी हे विवाह होत होते.  (सुरेंद्र कुमार – प्रकरण 2 पृष्ठ क्र. 42) असे असले तरी यावरून एक बाब लक्षात येते की, हे विवाह आर्थिकदृष्ट्या व सामाजिकदृष्ट्या समृद्ध किंवा पुढारलेल्या कुटुंबांतील व्यक्तींसोबत झाले नाहीत. आफ्रिकी गुलाम व भारतीय गुलामांमध्ये अपरिहार्य परिस्थितीत झाले होते.

सिद्दींनी येथील धर्म स्वीकारले, त्याप्रमाणेच त्या धर्मांमधील रूढी-परंपरेने घालून दिलेली बंधनेदेखील त्यांना स्वीकारणे अपरिहार्य झाले. यातही सर्वाधिक बंधने ही स्त्रियांच्या वाट्याला आली. उदा., मुस्लीम कुटुंबात एखादी मुलगी विवाह करून आल्यानंतर तीन वर्षे तिने कुटुंबातील व्यक्तींव्यतिरिक्त इतरांशी बोलायचे नाही. बुरख्याशिवाय घराबाहेर पडायचे नाही. इतर पुरुषांना तोंड दिसू द्यायचे नाही. इतरांच्या घरी जाऊन बसायचे नाही. आदी प्रकारची बंधने पाळली जातात. तिला जे काही लागते ते आणून दिले जाते. बाहेरील व्यक्ती आपल्या सुनेला काही शिकवेल, सांगेल आणि त्यामुळे आपल्या कुटुंबात वाद होतीत अशी भावना त्यामागे असते.

बुधवंत – बुधवंत म्हणजे समाजाचा प्रमुख. ज्या गावांमध्ये सिद्दी लोक राहतात त्या प्रत्येक गावात एका बुधवंत निवडला जातो. समाजाचे अंतर्गत प्रश्न सोडविण्यासाठी समाजातील काहींची निवड केली जाते. निवड केलेल्या व्यक्ती स्वतःमधून एक बुधवंत निवडतात. समाजाची कुठलीही समस्या सोडविण्यासाठी बुधवंताला प्रमुख मानले जाते. बाकीचे सगळे लोक त्याचे ऐकतात. सरकारच्या कुठल्याही योजना या त्यांच्यापर्यंत येणार, मग बुधवंत लोक लोकांपर्यंत त्या योजना घेऊन जाणार. लोकांना ते पटले तर ठीक. अन्यथा त्या योजना परत पाठवल्या जातात. लोकांनी नाही स्वीकारले तर बुधवंतसुद्धा त्या स्वीकारत नाही.

हिरियारू – पूजेचा प्रकार. धर्म कोणताही असो- आपल्या पूर्वजांची आठवण आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रत्येक सिद्दी कुटुंब ही पूजा करते.

नाव, आडनाव लावण्याच्या पद्धती – दियोक, अंतून, जूजो, झुझ, मिंगेल अशी वेगळी भासणारी नावे जास्त प्रमाणात असतात. तर  मायकेल, मेरी, फ्रान्सीस, फिलीप, ल्युइस अशी ख्रिश्चन समाजातील नेहमीची नावेही दिसून येतात. याशिवाय अनिल, लीना, अर्पणा, रूपा, रामनाथ, माला, इमाम, इब्राहीम अशी नेहमीच्या पठडीतील काहींची नावे असतात.

स्वतःची सामान्य ओळख सिद्दी अशी सांगणाऱ्या लोकांची आडनावे विविध प्रकारची आहेत. यातील काही आडनावे अगदी महाराष्ट्रीय वाटावीत अशी आहेत. नाईक, काब्रेकर, कांबरेकर, हवालदार, पटेल, हरनोडकर, ख्रिश्चन, शेख, खान अशी काही आडनावे आहेत. व्यवहार किंवा कागदोपत्री याच आडनावांचा वापर केला जातो.

सिद्दींचा पेहराव 

सिद्दींचा पेहराव कर्नाटकातील सर्वसामान्य लोकांपेक्षा वेगळा नाही. केवळ धर्माअनुसार त्यामध्ये थोडे वेगळेपण आहे. हिंदू स्त्रिया साडी नेसतात. कपाळावर टिकली, नाक टोचलेले असते. मुस्लीमसुद्धा काही प्रमाणात साडी नेसतात तर इतर स्त्रिया पंजाबी सलवार-कुर्ता नेसतात. तरुण मुली, महिला बुरखा वापरतात. सर्व धर्मांतील सिद्दी पुरुष पॅन्ट-शर्ट वापरतात. तरुण मुलांच्या अंगावर नवीन पद्धतीचा पेहराव असतो. टी शर्ट, जीन्स, जॅकेट, पायात बूट असतात. मुस्लिमांमधील काही पुरुष पायजमा-शर्ट, डोक्यावर टोपी घालतात, दाढी वाढवतात. यातील एक विशेष म्हणजे सिद्दींमधील व्यक्ती सधन असो वा गरीब, तिचे राहणीमान अत्यंत साधे असते. इतर समाजांपासून थोडे अलिप्त जंगलांमध्ये निसर्गाच्या सान्निध्यात राहत असल्याने उपभोक्तावाद कमी प्रमाणात दिसून येतो.

सिद्दींची खाद्यसंस्कृती

दैनंदिन खाण्यामध्ये तांदळाचे पदार्थ अधिक खाल्ले जातात. तांदळाची, जोंधळ्याची भाकरी, भाजी, भाताचे प्रमाण अधिक असते. त्या सोबत विविध प्रकारच्या चटण्या, कडधान्ये, भाज्यादेखील खाल्ल्या जातात. यात सर्व प्रकारच्या भाज्यांचा समावेश आहे. इतर समाजांत जसा बटाट्याचा मुबलक प्रमाणात वापर केला जातो तसाच येथेही होतो. त्याशिवाय पालक, मेथी अशा पालेभाज्यांचा समावेश आहारात करण्यात येतो. या ठिकाणच्या जंगलात कढीपत्त्यांची झाडे मुबलक प्रमाणात आहेत. पायवाटेच्या बाजूने ठिकठिकाणी ही झाडे उगवलेली आढळतात. याशिवाय इतरही काही पालेभाज्या जंगलातून उपलब्ध होतात. हलियाल, यल्लापूर तालुक्यांतल्या गावांमधील सिद्दी महिलांशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, चार-पाच वर्षांपूर्वी आम्ही रोज गव्हाची पोळीही खात होतो. शासनाकडून आम्हांला रेशनवर गहू मिळत होता. मात्र गेल्या दोन वर्षांपासून रेशनवरील गहू मिळणे बंद झाल्याने गव्हाची पोळी खाणे बंद झाले. अधूनमधून मात्र गव्हाची पोळी खाल्ली जाते. याशिवाय इडली, डोसे हे प्रसिद्ध दाक्षिणात्य पदार्थ केले जातात.

असाच एक तांदळाचा पदार्थ म्हणजे ‘कडम’. तांदूळ भिजत घालून वाटून त्यात फणसाचे गरे घालून केळीच्या पानात ते शिजवले जातात. हा पदार्थ येथील सिद्दी लोक नेहमी बनवतात. तांदूळ तर प्रत्येकाच्या घरात असतोच. या सोबतच फणस आणि केळी प्रत्येकाच्या अंगणात मुबलक असल्यामुळे हे करणे सहज शक्य होते. सणासुदीला येथे इतरांप्रमाणेच तिखट, गोड असे विविध चवींचे पदार्थ केले जातात. उदाहरणार्थ, ख्रिश्चन ख्रिसमसला पुरी-भाजी, करंजी, चकली, लाडू, चिवडा असे पारंपरिक फराळाचे पदार्थ करून सण साजरा करतात. तर हिंदूंचे सणसुद्धा परंपरेप्रमाणे साजरे होतात.

आपण शहरातील लोक येता जाता विकत घेऊन जंक फूड खातो. येथे मात्र ते प्रमाण बरेच कमी असल्याचे महिला सांगतात. त्या सांगतात की, आमच्या आजूबाजूला अंगणात अनेक झाडे, फळझाडे आहेत. त्यामुळे आम्ही त्यातूनच आमची खाण्याची गरज भागवू शकतो. उदा., केळीचे चिप्स घरीच तयार केले जातात. विलायची केळीची झाडे दिसून येतात. मुळातच सिद्दी लोक साधे, सहज जीवन जगणारे आहेत. हे त्यांच्या खानपानातूनही दिसून येते. पावसाळ्यात जंगलातून मिळणाऱ्या भाज्या, मासे, कुर्ले (खेकडे ) यावर त्यांची अन्नाची गरज भागते. काही भागांत ऊस लावला जातो. त्यापासून बनवण्यात येणारी ‘काकवी’ म्हणजे पातळ गूळ ही येथील खासियत म्हणता येईल. येथील बायका लिंबाच्या सरबतात ही काकवी घालतात. काकवीमुळे त्याला अप्रतिम चव येते. शहरात आपण जास्त साखर वापरतो. येथील लोकांचा गूळ वापरण्याचा पर्याय शहरवासीयांनी शिकायला हवा.

जेवणात शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही पर्याय आहेत. मांसाहारात बरेच वैविध्य दिसून येते. शाकाहारी पदार्थांमध्ये भाताबरोबर बनवण्यात येणारे सांभार येथील खास म्हणता येईल. तूरडाळीपासून बनवण्यात येणारे हे सांभार खूपच चविष्ट असते. सर्व भाज्या घालून करण्यात येणारे हे सांभार एक परिपूर्ण अन्न आहे. यात बटाटा, टोमॅटो, वांगी, भोपळा अशा भाज्या वापरल्या जातात. भरपूर मोकळा भात, डाळ आणि मिश्र फळभाज्या वापरून केलेली भाजी असे शाकाहारी जेवण करण्यात येते. शाकाहारी पदार्थांत दाक्षिणात्य पदार्थांचा समावेश करता येतो. जसे की इडली, डोसा, सांभार आदी. शाकाहारासोबतच मांसाहारदेखील केला जातो. घरामध्येच शेळ्या पाळल्या जातात. चिकन, मटण यांसोबतच मासेही असतात.

वैशिष्ट्यपूर्ण ‘मुंग्यांची चटणी’

जंगलातील लाल मुंग्यांची चटणी हादेखील येथील आवडता मांसाहारी पदार्थ आहे. मुंग्यांनी झाडावर बनवलेल्या घरातून मुंग्या आणि त्यांची अंडी काढून त्याची चटणी करून ती ताटात वाढेपर्यंतची पद्धत या ठिकाणी बघायला मिळाली. नजर तेज राहण्यासाठी मुंग्यांची चटणी खूप उपयोगाची असल्याचे येथील जुने जाणते लोक सांगतात.

या चटणीची साग्रसंगीत रेसिपी अशी - जंगलातील अनेक झाडांच्या पानांना गोळा करून मुंग्या घर बनवतात. हे तयार होत आलेले घर फोडून एका सुपात त्यातील सगळ्या मुंग्या घ्यायच्या. मुग्यांसोबत त्यांची अंडीही सुपात पडतात. त्यांना सुपात गोळा करून तव्यावर भाजून घेतात. यासाठी कांदा, लसूण आणि चिटी मिरची या वेगळ्या अत्यंत तिखट प्रकारच्या मिरचीचा वापर केला जातो. हे पदार्थही तव्यावर भाजून घेऊन त्यात ओले खोबरे किसून घातले जाते. भाजलेले सर्व पदार्थ, मुंग्या आणि अंडी एका दगडी उखळात घालून वाटले जातात. त्यात मीठ आणि थोडे लिंबू पिळून चटणी खाण्यासाठी तयार होते. ही आगळीवेगळी मुंग्यांची चटणी तांदूळ अथवा जोंधळ्याची भाकरी किंवा साधा भात यांबरोबर खाल्ली जाते.

सिद्दींची घरे

सिद्दींची घरे बरीच वैशिष्ट्यपूर्ण आहेत. सगळ्या सिद्दींची घरे बऱ्यापैकी ऐसपैस आहेत. कौलारू, मातीची पण मोठी. घरे मोठी आणि घरात सामान कमी, जागा भरपूर. घरांच्या पुढे आणि मागे मोठे अंगण. भरपूर झाडे. फळझाडे, फुलझाडे. यामध्ये अननस, पपई, केळी, काजू, फणस, नारळ, सुपारी ही फळझाडे आणि गुलाब, काटेकोरांटी, अबोली अशी अनेक फुलझाडे मुबलक प्रमाणात दिसतात. जंगलात राहणाऱ्या लोकांच्या घरांना विशेष रंगरंगोटी केलेली दिसून आली नाही. मात्र गावात राहणाऱ्या लोकांच्या घराला आकर्षक रंग देण्याची पद्धत येथे दिसून येते. मागील तीन वर्षांपूर्वी या ठिकाणी ही पक्की घरे बांधण्यात आली आहेत. यापूर्वी साधी बांबूची घरे असायची.

जंगलात राहणारे, शरीराने काटक असूनही शांतताप्रिय असणारे, साधे राहणीमान अंगीकारलेले असे हे सिद्दी स्वभावाने थोडे लाजरेबुजरे असले तरीही आदरातिथ्यशील आहेत. तिन्ही धर्मांचे लोक एकाच ठिकाणी गुण्यागोविंदाने राहतात. त्यांचा संघर्ष मोठा आहे. ‘आपली काळी त्वचा, कुरळे केस या शारीरिक ठेवणीसह समाजाने आम्हाला भारतीय म्हणून स्वीकारावे, आमच्या समाजाचा, संस्कृतीचा विकास व्हावा हेच,’ त्यांच्यातील प्रत्येकाचे ध्येय आहे.

- प्रवीण खुंटे, ज्योती भालेराव - बनकर
kpravin1720@gmail.com
bhaleraoj20@gmail.com


लेखातील छायाचित्रे सूरज निर्मळे यांनी काढलेली आहेत.


मुंग्यांनी झाडावर बनवलेल्या घरांतून मुंग्या आणि त्यांची अंडी काढून त्याची चटणी करून ती ताटात वाढेपर्यंतची सगळी प्रक्रिया दाखवणारा हा तीन मिनिटांचा व्हिडिओ :

प्रिय वाचकहो,
साधनाचे भूतपूर्व संपादक यदुनाथ थत्ते, वसंत बापट, ग. प्र. प्रधान या तिघांचे जन्मशताब्दी वर्ष चालू आहे. हा रिपोर्ताज त्या तिघांच्या स्मृतिला अर्पण करीत आहोत. या अभ्यासासाठी दिलेली फेलोशिप 'थत्ते बापट प्रधान फेलोशिप' या नावाने ओळखली जाईल! आणि एक आवाहन ...

1. या रिपोर्ताजसाठी दिलेल्या फेलोशिपच्या रकमेतून, या पाच तरुणांना पुरेसे मानधन राहिले नाही. त्यांना ते देता यावे असा प्रयत्न आहे.
2. शिक्षण घेणाऱ्या सिद्दी समाजातील मुलामुलींना आणि काही गावांना मदतीची गरज आहे.
3. अशा प्रकारच्या अन्य विषयांवरील अभ्यासासाठी साधनाकडे फेलोशिप मागणारे सात-आठ चांगले प्रस्ताव आलेले आहेत. 

वरील तीनपैकी कोणत्याही कारणासाठी कोणी आर्थिक मदत करू इच्छित असेल तर कृपया आमच्याशी संपर्क साधा. 'साधना ट्रस्ट'च्या बँक खात्यावर देणगी स्वीकारता येईल. (साधनाकडे 80 G आहे), नंतर तिची योग्य प्रकारे कार्यवाही होईल, त्याचे सर्व तपशील संबंधितांना कळवले जातील.
धन्यवाद! 

विनोद शिरसाठ, संपादक, साधना 
weeklysadhana@gmail.com
Mob : 9850257724

प्रवीण खुंटे (सिद्दी समाज रिपोर्ताजचा समन्वयक)
kpravin1720@gmail.com
Mob : 9730262119

Tags: सिद्दी समाज आदिवासी डॉक्युमेंटरी कर्नाटक दुर्लक्षित समाज अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आरक्षण संशोधन लेखमाला उत्तर कर्नाटकातील सिद्दी समाज Load More Tags

Add Comment