कोरोनाकाळ आणि ग्रामीण भागातील मुलींची आबाळ

मुलींची सद्यःस्थिती आणि त्यांचे भविष्य यांवरील परिणामांविषयी...  

मुलींच्या शाळेचे प्रातिनिधिक चित्र | फोटो सौजन्य : मानसी थपलीयाल | Reuters

15 ऑक्टोबर हा दिवस जगभर ‘आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिवस’ म्हणून साजरा केला जातो. या वर्षी संयुक्त राष्ट्र संघाकडून या दिवसासाठी निवडण्यात आलेली थीम (विषय) होती - 'कोरोनाकाळात ग्रामीण महिलांनी दाखवलेला लवचीकपणा'. या निमित्तानं 'कोरोनाकाळ आणि ग्रामीण महिला' या विषयाभोवती फिरणारे दोन लेख कर्तव्य साधनाच्या वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत. त्यांपैकी 'कोरोनाकाळ आणि ग्रामीण महिला' हा लेख काल प्रसिद्ध झाला. तर, ग्रामीण मुलींच्या जीवनावर लॉकडाऊनचे परिणाम आणि लॉकडाऊननंतर त्यांचं जीवन कसं असेल हे सांगणारा हा दुसरा लेख.

नाशिकमधल्या त्र्यंबक तालुक्यातल्या बोरीपाडा या एका छोट्या दुर्गम आदिवासी पाड्यातली पूजा नावाची मुलगी म्हणते की, ‘मी ड्रेस मेकिंगमध्ये आयटीआय करते. माझ्याकडे घरी शिवणमशीन नाही म्हणून मी आयटीआयमध्ये जास्त वेळ थांबून शिवणाचा सराव करायचे. आता लॉकडाऊनमुळे आमचे वर्ग ऑनलाईन सुरू झालेत. एकतर रेंज नसल्यामुळे मला तिथे रोज हजर राहायला जमत नाही. मित्र मैत्रिणींकडून मी थोडंफार समजून घेते... पण असंही ऑनलाईन कुठे शिवता येतं?” 

पूजानं विचारलेला हा प्रश्न म्हणजे फक्त तिच्या एकटीचा अनुभव नाही, तर कोरोनाच्या काळात सुरू झालेल्या ऑनलाईन शिक्षणपद्धतीवर एका आदिवासी पाड्यातल्या तरुण, गरीब आणि ऑनलाईन जगाशी संपर्क नसलेल्या गटाची एक प्रतिनिधी म्हणून तिनं विचारलेला हा प्रश्न आहे. 

कोरोना महामारीमुळे ग्रामीण भागातील मुलींच्या सद्यःस्थितीवर आणि भविष्यावर काय काय परिणाम होणार आहे यावर ‘अभिव्यक्ती मीडिया फॉर डेव्हलपमेंट’ या सामाजिक संस्थेच्या ‘शोधिनीं’मार्फत केल्या जाणाऱ्या अभ्यासात पूजा बोलत होती. 

आपल्या आयुष्याच्या प्रत्येकच घटकावर कोरोनामुळं एक नकारात्मकतेची अनिश्चित सावली पसरली असली तरीसुद्धा अनेक अर्थांनी वंचित असलेल्या या मुलींच्या आयुष्यावर आणि त्यांचं शिक्षण, लग्न, त्यांचा रोजगार, त्यांचे अधिकार यांवर काय परिणाम होईल हे समजून घेण्यासाठी अभिव्यक्ती या नाशीकमध्ये असलेल्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून शोधिनींनी हा अभ्यास केला.

या शोधिनी म्हणजे नाशीक जिल्ह्यातल्या गावांमधल्या 10 ते 25 वयोगटातल्या तरुण मुली. या तरुणी गेल्या साडेचार वर्षांपासून आपल्या गावातल्या मुलींच्या आयुष्याचा, त्यांच्या प्रश्नांचा अभ्यास करून त्यावर आधारित कृती करून आपलं वास्तव बदलण्याचा प्रयत्न करत असतात. या मुलींकडे रूढार्थानं संशोधन-अभ्यासाची पदवी नसते, पण आपल्या आसपासची परिस्थिती बदलण्यासाठी आवश्यक अभ्यास, निरीक्षणं आणि कृती कशी करता येईल यासाठीचं ज्ञान मात्र असतं. 

उपजत असलेलं हे ज्ञान अनुभवांतून वाढत जातं. फक्त अभ्यासच नाही तर अभ्यासासोबतच त्या कृतीसुद्धा करतात. प्रश्न माहीत झाल्यानंतर त्यावरचे उपाय करतात. ते करताना वस्तुस्थितीतले खाचखळगे भरून काढण्यासाठी त्या आपापल्या समुदायात छोट्यामोठ्या कृती घडवून आणतात.

याचाच एक भाग म्हणून कोरोनाच्या काळात त्यांनी नाशीक जिल्ह्यातल्या त्र्यंबक तालुक्यातल्या हिरडी, रोहिले, बोरीपाडा या आणि दिंडोरी तालुक्यातल्या दहेगाव अशा चार गावांमध्ये एकूण 40 मुलींशी चर्चा करून अभ्यास केला. या अभ्यासात शोधिनी या फक्त अभ्यास करणाऱ्या नव्हत्या, तर त्या स्वतःदेखील अभ्यासाचा विषय होत्या... त्यामुळं त्यांचे अनुभवही या अभ्यासात समाविष्ट आहेत. चार गावांमधल्या 15 ते 30 वयोगटातल्या गरीब, आदिवासी, दलित, शेतकरी आणि मजूर कुटुंबांतल्या या 40 मुली होत्या. कोरोनाच्या महासाथीमुळं त्यांच्या घरातल्यांचे रोजगार गेले आहेत, गरिबी ओढवली आहे, स्वतःचं वाहन नसल्यामुळे दळणवळणाची गैरसोय झाली आहे.

त्यांच्या शिक्षणावर, आरोग्यावर, रोजगाराच्या संधींवर, लग्न या आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटनेवर आणि त्यांनी पाहिलेल्या भविष्यातल्या स्वप्नांवर काय परिणाम होईल हे शोधिनींनी या मुलींशी बोलून जाणून घेतलं. त्यातून झालेल्या अभ्यासातून, आलेल्या अनुभवांमधून आणि या मुलींशी झालेल्या गप्पांमधून मला समजलेलं त्यांचं आयुष्य या मांडणीतून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतेय.  

लॉकडाऊनची सुरुवातच शाळा-महाविद्यालयं बंद होण्यापासून झाली. शाळेत किंवा औपचारिक शिक्षणात टिकून राहण्यासाठी घरच्यांशी भांडून शाळेत जाणाऱ्या, पैसे मजुरी करून शिक्षणाचे मिळवणाऱ्या आणि संघर्ष करणाऱ्या या मुलींना घरात बसण्याशिवाय पर्याय उरला नाही. दिवाळीनंतर कदाचित शाळा सुरू होतील... मात्र एकदा शाळा सुटलेल्या मुलींची शाळा कायमची बंद होण्याची शक्यता जास्त आहे. या अभ्यासानुसार 33 टक्के  मुलींनी टाळेबंदीनंतर त्यांचं शिक्षण बंद होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. आणि हा आकडा चिंताजनक आहे. जरी फक्त 33 टक्के मुली हे प्रत्यक्ष मान्य करत असल्या तरी बहुतांश मुलींच्या शिक्षणाची अवस्था हीच असू शकते, असं या शोधिनींचं आणि या विषयातली एक अभ्यासक म्हणून माझंही निरीक्षण आहे. 

इतर वेळी सगळं सुरळीत सुरू असतानासुद्धा मुलींचं शिक्षण आपल्याला महत्त्वाचं नसतंच की कधी! आई आजारी पडली की शाळा बंद, वडील वारले की शाळा बंद, गरिबी असेल तर शाळा बंद, यंदा पाऊस जास्त पडला म्हणून शाळा बंद, पाऊस कमी पडला तरी शाळा बंद आणि या वेळी तर शाळेच्या म्हणजे औपचारिक शिक्षणाच्या कक्षेतून मुलींना बाहेर पडायला कोरोनाचं एक निमित्त पुरून उरेल. 

ऑनलाईन शिक्षण सुरू आहे असा युक्तिवाद यावर सहज होऊ शकतो... पण तो पर्याय सर्वसमावेशक नाही. पूजा म्हणते तसं या मुलींकडे स्वतःचा फोन नसतो, इंटरनेट नसतं. घरातही स्मार्टफोनची सोय नसते. असली तरी रेंजच्या शोधात गावाबाहेर डोंगरावर चढून जावं लागतं आणि इतकं सगळं असूनसुद्धा इथे प्रश्न फक्त डिजिटल डिव्हाईसचा नसतो, तर त्यावर पितृसत्तेचाही पगडा आहे. स्मार्ट फोन वापरला म्हणजे मुली मुलांशी मैत्री करून प्रेमात पडतील आणि पळून जातील असा युक्तिवाद असतो... त्यामुळं सर्वांना शक्य असेल हे गृहीतक धरून सुरू केलेला ऑनलाईनचा प्रयोग या ग्रामीण मुलींसाठी फायदेशीर ठरला नाही आणि या प्रवाहांमधून त्या ऑफलाईन झाल्या. औपचारिक शिक्षणातून बाहेर पडणं म्हणजे या मुलींसाठी पुढच्या अनेक संधींची दारं बंद होण्यासारखं आहे आणि या एका घटनेमुळं त्या पुढच्या अनेक प्रवाहांमधून बाहेर पडतील. यांतला मोठा प्रवाह म्हणजे रोजगार.
  
आपल्याकडे आधीच मुलींसाठी आणि त्यातही ग्रामीण भागातल्या मुलींसाठी रोजगाराच्या संधींची वानवा आहे. ज्या संधी उपलब्ध आहेत त्या मिळवणंसुद्धा त्यांच्यासाठी तितकं सोपं नाही. फक्त शिक्षण घेऊन त्या रोजगारासाठी पात्र ठरणं पुरेसं नाही. मुलींचा शिक्षणातून रोजगारापर्यंतच्या संक्रमणाचा प्रवास फार खडतर असतो. कोरोनामुळं आता सगळ्यांसाठीच रोजगाराच्या संधींचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशा वेळी आधीच कमी संधी असलेल्या मुलींपुढे रोजगाराचा मोठा प्रश्न आहे. 

भरीस भर म्हणजे आता कोरोनानंतरच्या काळात उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या गरजांबरोबरच अपेक्षासुद्धा बदलल्या आहेत. नव्या रोजगारासाठी हवी असलेली नवी कौशल्यं, नवं शिक्षण, नवं तंत्रज्ञान या गोष्टी गावांतल्या, आदिवासी पाड्यांतल्या मुलींकडं नाहीत. ते शिकणं आणि त्यासाठी पात्र होणं जरी गरजेचं असलं तरी तसं वातावरण आता त्यांच्याभोवती नाही... त्यामुळं मुली आणि विशेषतः ग्रामीण भागातल्या मुली रोजगाराच्या या नव्या प्रवाहातून बाहेर फेकल्या जातील.

शोधिनीच्या अभ्यासातून आलेल्या आकडेवारीनुसार 33 टक्के मुलींना आपली रोजगाराची संधी जाण्याची शक्यता वाटते. अतिशय नगण्य प्रमाणात कार्यरत असणाऱ्या मुलींमुळं कदाचित देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात फारसा फरक पडत नसेल, पण त्या मुलींच्या आयुष्यात रोजगाराची एक संधी खूप गोष्टी बदलते आणि बदलू शकते. 

मुलगी चार पैसे कमावत असेल तर तिची घरातली पत वाढते, निर्णयप्रक्रियेतला तिचा सहभाग वाढतो, तिला तिच्या अधिकारांविषयी जाण तर येतेच... शिवाय त्यासाठी लढण्याची हिंमतसुद्धा मिळते. कुटुंबात-वस्तीत-गावात तिची वेगळी ओळख तयार होते म्हणून रोजगाराची संधी मुलींच्या सक्षमीकरणात मोठी भूमिका बजावते... पण येत्या काळात कदाचित हे चित्र असं असणार नाही. आपल्या आईवडलांशी भांडून जिद्दीनं गावांतल्या ज्या मुली नाशीक शहरात किंवा आजूबाजूच्या जवळच्या शहरांत नोकरी आणि काम करत होत्या त्या सगळ्या आता या लॉकडाऊनमध्ये आपापल्या गावी परतल्या आहेत. 

दिंडोरी तालुक्यातल्या कोचरगावातली ताई नावाची मुलगी. हॉटेल मॅनेजमेंटचा छोटासा कोर्स करून आता लातूरमध्ये एका हॉटेलात काम करते. स्वतःच्या आयुष्याचं नियंत्रण स्वतःकडं घेण्याची संधी तिला नोकरीनं दिली. ताई म्हणते, ‘लॉकडाऊनमध्ये घरी आल्यापासून आईवडील लग्नासाठी मागं लागले आहेत. त्यांची परवानगी नसतानासुद्धा मी ही नोकरी करण्यासाठी हट्टानं गेले होते. मोठ्या शहरात राहणं अवघड होतं. जिद्दीनं सगळं केलं पण त्या सगळ्यावर आता पाणी फिरेल की काय अशी भीती मला वाटतेय. लॉकडाऊन कधी एकदा संपेल आणि मी माझ्या नोकरीच्या ठिकाणी परत जाईल असं होतंय.’

नोकरीच्या एका संधीमुळं मुलींना स्वातंत्र्य मिळतं, स्वतःचा मोकळा श्वास घेण्याची संधी मिळते आणि आता येत्या काळात जर त्या संधी जाणार असतील तर त्यानं ताई म्हणते तसं मुलींना गुदमरल्यासारखं होईल आणि सौदाशक्ती कमी झाल्यामुळं त्यांना नाइलाजानं बोहल्यावर चढावं लागेल. 

या लॉकडाऊनमुळं घराबाहेर पडायचं नाही असे दंडक जरी सगळ्यांनाच होते आणि अजूनही आहेत... तरी इतर सगळ्यांचं काही काळ घरात थांबणं आणि या तरुण मुलींचं घरात थांबणं या दोन्हींत मोठा फरक आहे. टाळेबंदीचे नियम संपताच इतर सगळे घराबाहेर पडून आपापल्या कामांमध्ये रमतील... पण मुलींनी घराबाहेर पडण्यासाठी काही काळापासून केलेला संघर्ष आता पुन्हा शून्यावर आलाय. 

शोधिनी प्रकल्पामार्फत मागंच आम्ही काही गावांमध्ये शोधिनी वाचनालयं सुरू केली. ही वाचनालयं म्हणजे गावात मुलींनी एकत्र येऊन वाचण्याची, भेटण्याची, गप्पा मारण्याची जागा झाली होती. त्या वाचनालयांमध्ये मुलींना आणणं सोपं नव्हतं. त्यांच्यावर असलेली बंधनं आणि त्यामुळंच घरात राहण्याची लागलेली सवय तोडून त्यांना सार्वजनिक वर्तुळात पुन्हा आणण्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागले होते. अजूनही ते पूर्णपणानं शक्य झालं नव्हतं. आता पुन्हा कोषात गेलेल्या या मुलींना सार्वजनिक वर्तुळात आणणं अवघड असणार आहे. सार्वजनिक जीवनात त्यांना मिळालेलं स्थान यानं कमी होणार हे नक्की!

या सगळ्या काळात या मुलींच्या आयुष्याला एक वेगळं वळण देणारी एक मोठी घटना घडली... ती म्हणजे लॉकडाऊनच्या काळात ग्रामीण भागात वाढलेलं बालविवाहांचं आणि मुलीच्या इच्छेविरुद्ध लग्नाचं प्रमाण. सरकारनं 50 लोकांच्या उपस्थितीत दिलेली लग्नाची परवानगी ही गोष्ट मुलींच्या लग्नाचं ओझं डोक्यावर असणार्‍या पालकांसाठी संधीच ठरली. लग्नाचा खर्च अचानक कमी झाल्यानं अक्षरशः तीनचार दिवसांत लग्न ठरून मुलींची पाठवणीसुद्धा झाली. वय, मुलींची इच्छा, शिक्षण, कायदा हे सगळं मागं पडून रात्रीतून गावाच्या मागच्या मळ्यात कित्येक लग्नं पार पडली.  

काहीही चांगलवाईट घडलं किंवा घडण्याची शक्यता दिसली की मुलीचं लग्न करून देणं हा पर्याय जसा नेहमी वापरला जातो... तसाच याही आपत्तीच्या काळात तो वापरला गेला. संशोधनानुसार... या काळात आमचंही लग्न होण्याची शक्यता आहे अशी भीती 25 टक्के मुलींनी व्यक्त केली. शोधिनी म्हणून आपल्या गावात काम करणाऱ्या आणि आयुष्यात नेमकं काय करायचं आहे याची स्पष्टता असणाऱ्या कितीतरी शोधिनींचीसुद्धा या काळात लग्नं झाली. हा विषय एखाद्या गावापुरता मर्यादित नाही. त्याची व्याप्ती आणि खोलीसुद्धा मोठी आहे हे समजून घेण्याची गरज आहे.  

अनेक वर्षांपासून अनेक पातळ्यांवर सुरू असलेली मुलींचं, बायकांचं संघटन बांधण्याची, त्यांच्या सक्षमीकरणाची प्रक्रिया या आपत्तीच्या काळानंतर बरीच बदलणार आहे. हवा असलेला बदल घडवून आणण्यासाठी केलेल्या आराखड्याची पुनर्रचना आता या काळाची परिमाणं नजरेसमोर ठेवून करावी लागणार आहे. जिथून कामाला सुरुवात व्हायची तो बिंदू आणखी दूर गेल्यानं कामाची गती आणि दिशा दोन्हींचा पुनर्विचार करावा लागणार आहे. त्याचा आवाका लक्षात यावा म्हणून हा लेखप्रपंच! 

- काजल बोरस्ते 
kjlbrst165@gmail.com

(अभिव्यक्ती मिडिया फॉर डेव्हलपमेंट या सामाजिक संस्थेत लेखिका कार्यरत आहेत. स्त्रियांचे प्रश्न, लिंगभाव हे त्यांच्या अभ्यासाचे आणि संशोधनाचे विषय आहेत.)

Tags: काजल बोरस्ते ग्रामीण महिला ग्रामीण मुली लॉकडाऊन कोरोना कोरोनाकाळ शाळा ऑनलाईन शिक्षण अभ्यास सर्वेक्षण शोधिनी विवाह Kajal Boraste Rural Women Rural Girls Lockdown Corona Schools Online Education शिक्षण Study Survey Shodhini Marriages Load More Tags

Comments:

D T Barde.

या लेखाने ग्रामीण मुलींच्या आयुष्यात लॉक डाऊन मुळे निर्माण झालेल्या अडचणी व प्रश्न यांची जाण आली. या मुलींच भविष्य उज्ज्वल करण्याकरीता वेगाने हालचाली करणे, संघटन करणे , समाजाला जाण करुन देणे , या कामाकरीता धन मिळविणे , समविचारी व्यक्ति/ संघटना/ कार्पोरेटस यांचे सहकार्य मिळविणे गरजेचे आहे . शोधिनी संस्थने हे कार्य हाती घ्यावे . सर्वानी त्यांचे मागे खंबीर पणे उभे राहवे . याने ग्रामीण स्त्रियांच्या व ग्रामीण जीवनात आमूलाग्र बदल घडेल .

Add Comment