आयुष्यातील बेरीज-वजाबाकी करून प्रस्थापित अंध व्यक्तीसोबत विवाह गाठ बांधणाऱ्या प्रॅक्टिकल व्यक्तींपेक्षा महाविद्यालयात निर्माण होणाऱ्या तारुण्यसुलभ प्रेमभावनेतून डोळे असलेले / नसलेले तरुण-तरुणी एकमेकांच्या प्रेमात पडतील आणि अंध व्यक्तीला केवळ दिसत नसल्यामुळे आवडत्या व्यक्तीने नकार दिला अशी खंत वाटणार नाही. समाजात ही प्रगल्भता निर्माण होईल तो दिवस देवनागरी व ब्रेल लिपीत स्वर्णअक्षरात नोंदवला जाईल!
व्हॅलेंटाईन डे; नव्हे; व्हॅलेंटाईन वीक म्हणजेच प्रेम उत्सवाच्या या आठवड्यात तरुणाई बेधुंद होऊन आपल्या प्रिय व्यक्तीवर प्रीतीचा वर्षाव करत असल्यास त्यांच्या आनंदात सर्वांनी सहभागी व्हायला हवे. माणसा-माणसांतील सर्व प्रकारचे भेदाभेद संपवून सर्वांना एकत्र आणण्याची ताकद केवळ प्रेमात आहे. प्रेमदिनाच्या औचित्याने ‘समाजातील अंधत्वासह जगणाऱ्या व्यक्तींच्या प्रेमभावना डोळसपणे समजून घेतल्या जातात का?’ याचा विचार करूया.
महाभारतातील धृतराष्ट्र आंधळा होता म्हणून त्याच्या डोळे असलेल्या राणीने - गांधारीने शेवटपर्यंत डोळ्यावर बांधलेली पट्टी काढली नाही. महासत्ता होऊ पाहणाऱ्या आजच्या भारतातील किमान संवेदनशील समाज तरी अंधत्वासह जगणाऱ्या व्यक्तींच्या नैसर्गिक प्रेमभावना मेंदू-मनावरचे जुनाट आवरण झटकून समजू शकेल का?
आजवर अंध व्यक्तीत अनेकांना विश्वासू मित्र गवसला असला तरी अपवादानेच प्रेयसी अथवा प्रियकर भेटला आहे.
शंकर पाटील यांच्या कथेतील अंध असलेल्या शारीप्रमाणे एखाद्या नेत्रहीन स्त्रीने पुरुषावर विश्वास ठेवला तर तिचा फक्त उपभोग घेऊन विश्वासघात करणाऱ्या पुरुषांची संख्या कमी नाही. दुसरीकडे नेत्रहीन पुरुषांच्या संपत्ती/नोकरीवर डोळा ठेवून बसलेल्या स्त्रियादेखील पुष्कळ आहेत. पुण्यातील एका महाविद्यालयात तासिकातत्वावर शिकवणाऱ्या अंध व्यक्तीला कायमस्वरूपी नोकरी नसल्यामुळे त्यांच्या पत्नीने घटस्फोट मागितला आहे. मुळातच अंधांना नोकरीत आरक्षण असल्यामुळे त्यांना लवकर नोकरी लागते या समजातूनच भावी आयुष्य चैनीत जगण्यासाठी त्या महिलेने लग्न केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दृष्टिबाधित असलेल्या विशेष शिक्षक डॉ. निकेश मदारे यांच्या मते अंध व्यक्तीला डोळस व्यक्तीबरोबर अरेंज मॅरेज करायचे असल्यास ती व्यक्ती नात्यातील असायला पाहिजे; आधीपासून परिचय असतो आणि नाते टिकवण्याचे दोघांवरदेखील एकप्रकारे कौटुंबिक दडपण असते. मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात कार्यरत असलेल्या डॉ. अनिल साबळे यांनी अंध व्यक्तीबरोबर संसार थाटण्याइतपत समाजमन प्रगल्भ झाले नसल्याचे कटू वास्तव मांडले. तसेच केवळ डोळस मुलीबरोबर लग्न करण्याच्या अट्टाहासापायी नोकरी करणाऱ्या नेत्रहीन तरुणांनी अल्पशिक्षित मुलीबरोबर संसार थाटल्याची उदाहरणेही दिली.
पुण्यातील एका कनिष्ठ महाविद्यालयात कायमस्वरूपी अध्यापक असलेल्या डोळस व्यक्तीने बेरोजगार असलेल्या अंध प्रेयसीसोबत लग्न केले असून ते आता उत्तमरीत्या संसार करत आहेत. नोकरी/व्यवसाय करणाऱ्या अंध तरुणांसोबत डोळस तरुणींनी लग्न केल्याची बरीच उदाहरणे ऐकली/बघितली असली तरी त्यापैकी किती मुलींनी स्वतः लग्नाचा निर्णय घेतला आणि किती मुलींनी वडीलधाऱ्यांच्या आदेशाने वरमाला घातली याचा आपल्या सामाजिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर विचार करायला हवा. कारण अद्याप समाजात लग्न ठरवताना मुलीच्या चॉईसचा विचार केला जातोच असे नाही. उलटपक्षी आंधळी असली तरी बायको कमावणारी असल्यामुळे आपल्याला चिंता नाही असा विचार करणाऱ्या तरुणांनी अंध तरुणींबरोबर लग्न केले आहे. यात अल्पदृष्टी असलेल्या जोडीदाराची निवड करण्याकडे डोळस व्यक्तींचा कल असल्याचे जाणवते. शिवाय अंध असलेले पती-पत्नी एकमेकांच्या साथीने जीवनात येणाऱ्या आव्हानांना सामोरे जात वर्षानुवर्षे संसार करत आहेतच.
आज परिस्थिती अशी आहे की, अर्थार्जन करणाऱ्या अंध मुलीला लग्नासाठी सुयोग्य मुलगा भेटत नाही. मग ज्यांच्याकडे अर्थार्जनाचे साधन नाही; घराबाहेर पडून आव्हानांना सामोरे जाण्याचे धाडस नाही; अशा मुली कोणत्या प्रकारचे जीवन जगत असतील? अशा वातावरणात राहणाऱ्या मुलांच्या वाट्यालादेखील यापेक्षा फार वेगळे जीवन येत नाही.
वर नमूद केल्याप्रमाणे संसार थाटलेल्या नेत्रहीन दाम्पत्यांपैकी एकमेकांवरील प्रेमामुळे लग्न करणाऱ्यांची संख्या कमी आहे. सर्वसामान्य व्यक्ती जोडीदार म्हणून आपला स्वीकार करणार नाही हे वास्तव स्वीकारून बहुतांशी अंध तरुण-तरुणी एकमेकाला समजून घेऊ; या भावनेतून लग्न गाठ बांधतात. सर्वसामान्य शरीररचना असलेल्या व्यक्ती नेत्रहीन जोडीदाराची निवड करताना प्रेमापेक्षा भावी आयुष्यातील हिशेब मांडून निर्णय घेतात. काहींसाठी अंध व्यक्तीकडे असलेला अर्थार्जनाचा स्रोत, तर कुणाला सर्वसामान्य शरीररचना असलेल्या लोकांकडून वारंवार मिळणारा नकार आदी बाबी महत्त्वाच्या ठरतात.
अंध व्यक्तींनादेखील जोडीदार डोळस असावा असे वाटत असते. पस्तिशी ओलांडलेल्या, महिना ६०००० रु. पगार असलेल्या पुण्यातील एका सुपरिचित दृष्टिहीन व्यक्तीने कोविड काळात अंध मुलीसोबत लग्न केले; लग्न एवढे उशिरा का केले असे विचारल्यावर ते म्हणाले, “मला अंध मुलीसोबत लग्न करायचे नव्हते; पण सर्वत्र कोविड पसरतोय हे लक्षात आल्यावर आपण असेच मरून जाऊ; अशी मनात भीती असल्यामुळे मी हा निर्णय घेतला.” थोडक्यात काय, जोडीदाराविषयी अंध व डोळस व्यक्तींच्या थोड्याफार फरकाने सारख्याच अपेक्षा असतात. अंध व्यक्तीला डोळस जीवनसाथी भेटावा /भेटावी असे वाटत असले तरी डोळ्याअभावी येणाऱ्या मर्यादांमुळे अंध व्यक्तीचा आयुष्यातील जोडीदार म्हणून विचार करावा असे स्वाभाविकरीत्या सर्वसामान्य व्यक्तीला वाटत नाही. अर्थात, प्रत्येक नियम अपवादानेच सिद्ध होतो; त्यामुळे असा साचेबद्ध विचार न करणाऱ्यांची संख्या काही प्रमाणात असेलच.
स्त्री-पुरुषांतील प्रेयसी-प्रियकर, पती-पत्नी या भूमिकेसाठी निवड करताना जात, वर्ग, पितृसत्ताक व्यवस्था यांसह शारिरीक सौंदर्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. नात्यातील भूमिकेला क्काही कर्तव्य/जबाबदाऱ्या चिटकलेल्या असल्यामुळे त्यासाठी अधिक योग्य व्यक्तीच्या सर्वजन शोधात असतात. वरील निकषात अंध व्यक्ती बसू शकेल असा सामान्यतः कोणी विचार करत नाही. म्हणून एकमेकांच्या डोळ्यात आपली प्रतिमा पाहणारे; डोळे नसणाऱ्यांच्या हृदयात स्वतःला शोधण्याचे कष्ट घेत नाहीत. त्यामुळे भिन्न लिंगी अंध व्यक्तीबरोबरच्या मैत्रीचे प्रेमात अपवादानेच परिवर्तन होते.
ज्या भिन्नलिंगी नेत्रहीन व सर्वसामान्य व्यक्तीच्या नात्याचा मैत्री, प्रेम, विवाह असा प्रवास झालाय त्यांच्या नात्यातील एकमेकांवरील दृढ विश्वास आणि अंधत्वासह येणाऱ्या मर्यादांचा स्वीकार करण्याची तयारी हे महत्त्वाचे पैलू असल्याचे जाणवते. अशा प्रेमी युगुलांच्या जीवनातील अनुभवातून अंध असलेल्या प्रेयसी/प्रियकराच्या सर्वसामान्य शरीर रचना असलेल्या व्यक्तींनी त्यांच्याशी मैत्री/ओळख करून असलेल्या शंकांचे निरसन करावे. व्यक्तीचे डोळे बोलके असतात; पण डोळ्याचे बोलणे नेत्रहीन व्यक्तीला ऐकता येत नसल्यामुळे अशावेळी कोणते सम्वादाचे पर्याय असू शकतात हे डोळस जोडीदार असलेल्या अंध व्यक्तीकडून समजून घेणे आवश्यक आहे.
प्रत्येकाने आपले जीवन कोणाच्या साथीने कसे जगायचे? आयुष्यात काय मिळवायचे? हे ठरवत असताना शरीर रचनेला किती महत्त्व द्यावे हे एकदा निश्चित केले की, माणूस म्हणून व्यक्तीकडे पाहणे सोपे जाते. मग अधिक आकर्षक दिसणाऱ्या व्यक्तीकडे बघून मन विचलित होणार नाही; किंबहुना जोडीदाराच्या सौंदर्याचे नावीन्य संपल्यावर प्रेमातील ओलावा सुखणार नाही. माझ्यामते निसर्गानं प्रत्येक शरीराच्या बलस्थान व मर्यादा निश्चित केल्या आहेत. म्हणून शरीर रचनेपेक्षा त्या व्यक्तीचा स्वभाव, विचार, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, आयुष्यात येणाऱ्या आव्हानांचा सामना करण्याचे सामर्थ्य, आपल्यासोबत असलेली भावनिक जवळीक आदी बाबी प्राधान्याने विचारात घ्याव्या. यामुळे स्वप्नातील आदर्शप्रेमी कदाचित अंध व्यक्तीत भेटू शकेल. सर्वसामान्य शरीर रचना असलेल्या व्यक्तींनी अंध व्यक्तीबरोबर सम्वाद साधताना छुपी लक्षिमनरेषा आखू नये. मुक्त सम्वादानेच गैरसमजाच्या भिंती कोसळू शकतात. अर्थातच अंध व्यक्तींनी देखील डोळस व्यक्ती संदर्भातील पूर्वग्रह झटकून व्यक्त होणे गरजेचे आहे.
अंध व्यक्तींविषयी काही ठाम समजुती आणि अनुत्तरित प्रश्नांचे गाठोडे डोक्यावर ठेवून मुख्य प्रवाहातील समाज वावरत असतो. जर आपण अंध व्यक्तीच्या प्रेमात पडलो तर समाज कोणत्या नजरेने पाहील? याची चिंता अन् अंध व्यक्तीच्या सहवासात जीवनातील सर्वप्रकारचे सुख/आनंद अनुभवताना ही व्यक्ती साथ देईल का? अशा काही शंकांसह वावरणारे लोक सहानुभूतीच्या पलीकडे माणूस म्हणून अंध व्यक्तींना समजून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत.
अपंगत्व हे सामाजिक असते. म्हणून समाजातील या घटकाचे अस्तित्व मान्य करताना डोळ्याअभावी येणाऱ्या मर्यादांचा संवेदनशीलपणे विचार करावा. नजरेची भाषा समजत नसली तरी श्वाशोश्वासातील उष्णता, स्पर्शाचे अर्थ, आवाजाच्या चढउतारातून व्यक्त होणारे भावार्थहे सगळं डोळे नसले तरी यहृदयीचे त्यहृदयी पोहचत असतंच म्हणून नेत्रहीन व्यक्तींकडे पाहण्याचा दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. अपंगत्व मानसिक नसून शारिरीक आहे. त्यामुळे डोळ्याने दिसत नाही म्हणून मनापासून प्रेम करण्यात आणि ते नाते जपण्यात अडचणी येत नाहीत. एकमेकाला समजून घेऊन डोळे असलेल्या व्यक्तीप्रमाणे डोळे नसलेल्या व्यक्ती सुद्धा आयुष्यात येणाऱ्या सुख-दुःखात, चडउताराच्या प्रसंगी तेवढ्याच विश्वासाने साथ देऊ शकतात.
दैनंदिन आयुष्यातील छोट्या-मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळत असताना वैयक्तिक करियर घडवणे त्यांना शक्य आहे. म्हणून सर्वसामान्य शरीररचना असलेल्या जोडीदाराप्रमाणे अंध व्यक्ती देखील त्यांच्या क्षमतेनुसार प्रगती करतात. याचा अर्थएखादी व्यक्ती अंध आहे; त्याच्या/तिच्या मनात तुमच्या विषयी प्रेमभावना आहेत म्हणून तुम्ही तात्काळ संमती द्यावी असे नाही; तुम्हाला हितसेच वाटत असेल आणि आवडी-निवडी विचार आदी बाबी जुळत असतील तर नक्कीच त्यांच्याबद्दल विचार करावा. एखादी व्यक्ती अंध आहे म्हणून अयोग्य समजून नकार किंबहुना अंधत्वामुळे वाट्याला आलेल्या संघर्षाकडे सहानुभूतीने पाहून भावनिक होऊन होकार देऊ नये. त्याच्या/तिच्या डोळ्यात तुम्हाला काही दिसणार नसले तरी अंतकरणात डोकावून पहा.
प्रेम आंधळे असते असे मानणारा समाज अंध व्यक्तींच्या प्रेमभावनेचा डोळसपणे विचार करेल अशी प्रेम उत्सव साजरा करत असताना अपेक्षा आहे. शेवटी आयुष्यातील बेरीज-वजाबाकी करून प्रस्थापित अंध व्यक्तीसोबत विवाह गाठ बांधणाऱ्या प्रॅक्टिकल व्यक्तींपेक्षा महाविद्यालयात निर्माण होणाऱ्या तारुण्यसुलभ प्रेमभावनेतून डोळे असलेले/ नसलेले तरुण-तरुणी एकमेकांच्या प्रेमात पडतील आणि अंध व्यक्तीला केवळ दिसत नसल्यामुळे आवडत्या व्यक्तीने नकार दिला अशी खंत वाटणार नाही. समाजात ही प्रगल्भता निर्माण होईल तो दिवस देवनागरी व ब्रेल लिपीत स्वर्णअक्षरात नोंदवला जाईल!
- प्रतीक राऊत
rautpratikpr9622394@gmail.com
(लेखक एल्फिन्स्टन महाविद्यालय मुंबई येथे संशोधक विद्यार्थी म्हणून कार्यरत आहे.)
Tags: प्रेम व्हॅलेंटाईन डे अंध लोकांच्या प्रेमभावना Load More Tags
Add Comment