16 मार्च 2026 रोजी कर्तव्य साधना पोर्टलवर शेतकरी नवरा नको गं बाई!? या लेखातून सृजन नावाच्या लेखक व्यक्तीने गावात राहणाऱ्या, अर्थार्जनासाठी दुसरे काहीही करता आले नाही म्हणून शेती करणाऱ्या मुलग्यांना लग्नासाठी मुली नकार देतायत याला जबाबदार कोण? या प्रश्नावर मुलीच्या दृष्टिकोनातून भाष्य केले आहे. खूप शतके दुय्यम स्थान निभावल्यानंतर मुलींना नकाराधिकार मिळाला आहे, आणि आता पुरुषसत्ताक व्यवस्थेला सरावलेल्या पण स्वतःचे कर्तृत्व नसलेल्या तरुणांना तो जाचक वाटतो आहे. तेव्हा, आता थोडे दिवस का होईना, नकार पचवायला मुलांनी शिकून घ्यावं! बाकी ही दुनिया पुरुषांची आहे आणि अजून दीर्घकाळ पुरुषांचीच राहणार आहे… असा सल्ला या लेखातून तरुणांना दिलेला आहे. हाच धागा पकडून गावात राहून शेती करणाऱ्या तसेच लग्न व्हावे म्हणून पुण्या-मुंबईत कंपनीत काम करणाऱ्या तरुणांच्या दृष्टीकोनातून हा लेख प्रपंच.
प्रत्येक गावात लग्नाळू मुलांची संख्या वाढत आहे. विवाह व्हावा यासाठी तरुणांचे आई-वडील शक्य ते सर्व प्रयत्न करत असले तरी बऱ्याचदा त्यात यश येत नाही. याचाच गैरफायदा काही संघटित टोळ्या घेतायत. बनावट वधू दाखवून रीतसर लग्न लावले जाते. नंतर दोन-चार दिवसांत पैसे-दागिने घेऊन ती पळून जाते. अशा काही घटना प्रकाशझोतात आल्या असल्या तरी बरेचजण बदनामीच्या भीतीने तक्रार देत नाहीत. वयाची पस्तिशी उलटून गेली तरी लग्न होत नसेल तर त्या तरुणाला जगणे निरर्थक वाटणे स्वाभाविक आहे. जाणीवपूर्वक अविवाहित राहणे आणि मुलगी भेटत नसल्यामुळे विवाह न होणे यात प्रचंड फरक आहे.
काही दशकांपूर्वी मुला-मुलींचे प्रमाण पूरक होते. कितीही नकोशा वाटत असल्या तरी वंशाला दिवा भेटेपर्यंत पणत्या जन्माला येत होत्या. मुलीला शिकवून स्वावलंबी करावे असा विचार तोवर सामान्यांच्या जगण्याचा भाग झालेला नसल्यामुळे घराण्याची अब्रू राखणारी मुलगी अन सासरच्या कुळाचा उद्धार करणारी सून घडवण्याचे प्रशिक्षण नकळत्या वयापासून दिले जायचे. मासिक पाळी सुरु झाली की, दोनाचे चार हात करून मुलीच्या जबाबदारीचे ओझे उतरवून टाकायचे. आपल्या जातीतला, घराण्याला शोभेल असा मुलगा भेटला की झालं! बाकी तिच्या नशिबावर सोडून मोकळं व्हायचं. आपल्याला सांगितलेलंच असतं ना, लग्नाच्या गाठी स्वर्गातच जोडलेल्या असतात, म्हणून! पण एकीकडे गेल्या दोन-तीन दशकांत स्त्रीभ्रूणहत्या मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे मुलींची संख्या कमी झाली आणि दुसरीकडे शिक्षणामुळे लोकांच्या मानसिकतेतही हळूहळू बदल व्हायला लागला. वडिलधाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करून पितृसत्ताक समाज व्यवस्थेत आज्ञाधारक सून, कानाखालची बायको, स्वतः उपाशी राहून लेकराला घास भरवणारी आई, आदी गृहिणी असण्याच्या समजुतींना शिक्षित मुली काही प्रमाणात छेद देतायत. त्यांच्या चॉईसचा विचार केला जातोय. गावात राहून शेतीतील कष्टप्राय जीवन अनुभवलेल्या मुलींना सासरी कष्ट नकोयत, याची दाखल घेतली जातेय.
मात्र आजची ही परिस्थिती मर्यादित काळापुरती आहे. समाजातील पुरुषी मानसिकतेत बदल झाला नसून लग्नाळू मुलांना मुली भेटत नसल्यामुळे मुलींच्या जोडीदार निवडीच्या अपेक्षा विचारात घेतल्या जात आहेत, वरचढसुद्धा ठरत आहेत. लिंगगुणोत्तरातील तफावत दूर झाल्यावर मुलींच्या वाट्याला पूर्वीचेच दिवस येतील अशी शक्यता वर्तवली जाते.
खेड्यातील जीवनाबद्दल मुली व त्यांच्या पालकांचा समज विचारात घेऊन गावातील कुशल-अर्धकुशल तरुण लग्न व्हावे या आशेने घरची शेती सोडून रोजगारासाठी शहराची वाट धरतायत, तर शेतीतील ज्यांचे उत्पन्न समाधानकारक आहे असे तरुण कधीतरी आपल्याही लग्नाचा योग जुळून येईल या आशेवर मित्रांच्या लग्नात नाचतायत. म्हणून खेड्यातील लग्नाळू तरुणांच्या समस्येचा विचार करणेही महत्त्वाचे वाटते.
शोषणाचे मूळ विवाहसंस्थेत दडलेले आहे. आपल्या समाजरचनेत लग्नसंस्था केंद्रस्थानी असल्यामुळे एकट्याने जगणे फार कमी स्त्री-पुरुषांना शक्य होते. लिव्ह इन रिलेशनशिप हा एक सहजीवनाचा त्यातल्या त्यात चांगला पर्याय असला, तरी त्याची निवड करण्यास आवश्यक मनोबल, आर्थिक स्थैर्य, भवतालचे सामाजिक पर्यावरण फार अनुकूल नसल्यामुळे अद्याप विवाहसंस्थेचे मूळ घट्ट रुजलेले आहे. शोषणमुक्त सहजीवन मानवी समाजाचा आदर्श टप्पा नजीकच्या भविष्यात गाठता येईल अशी चिन्हे दिसत नाहीत. म्हणून लग्न व्यवस्थेवर भाष्य करावे लागते.
वि. का. राजवाडे लिखित भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास पाहिला तर काळाच्या प्रत्येक टप्प्यावर विवाहसंस्थेत बदल होत असल्याचे आपल्या लक्षात येईल. हा त्याच शृंखलेतील एक टप्पा म्हणावा लागेल. अद्याप बालविवाह थांबलेले नाहीत, मुलींविषयीच्या समजुतीत आमूलाग्र बदल घडून आलेला नसला तरी कासवगतीने सुधारणा होत आहे.
मुलीला परक्याचे धन समजले जात असे तेव्हा त्यांना शिकवत नव्हते. आता लग्नापर्यंतचा थांबा म्हणून शाळा-महाविद्यालयात पाठवले जाते; तिच्या शिक्षणापेक्षा लग्नावर अधिक खर्च केला जातो. मुलीचे लग्न करून देण्यात जबाबदारी पार पडल्याचा आनंद असतो. या जबाबदारीच्या धारणेतून मुलाची निवड केली जाते. मुलीदेखील यात स्वतःला सामावून घेण्यासाठी झटत असतात. मुलांना सुंदर मुली आवडतात तर मुली पण हॅण्डसम मुले पसन्त करतात.
लग्न हा शुद्ध सामाजिक व्यवहार आहे. यात एका परिवारातील मुलगी दुसऱ्या परिवारात दिल्या जाते, त्यामुळे शेतकरी मुलगा नाकारणे ही मुलींची चॉईस नसून व्यावहारिक अपरिहार्यता आहे. हा व्यवहार अनेक गृहीतकांवर आधारित आहे. मुला-मुलीचे घराणे, त्यांची जात, पगाराचे आकडे, गावातील शेती, स्वतःचे/भाड्याचे घर यापैकी काही कमी असले तरी स्थळ नाकारले जाते. मुलगा चांगला कमावता असावा आणि मुलीला सासुरवास होऊ नये, कष्टात जीवन काढावे लागू नये हाच मुलींचा आणि पालकांचा मुख्य हेतू असतो.
शेती करणाऱ्या अथवा बिगरशेती व्यवसाय / नोकरी करणाऱ्या मुलाची जावई म्हणून निवड करताना जातीच्या-घराण्याच्या चाळण्या लावल्या जातात. कारण लग्न ठरवताना उच्चशिक्षित मुली घरचे मान्यता देणार नाहीत असे कारण सांगून सजातीय मुलांबरोबरच लग्न करतात. म्हणजेच पसंतीच्या जोडीदाराशी लग्न करण्याचे स्वातंत्र्य समाजाने नाकारले आहे. प्रेमातदेखील जात आडवी येत असेल तर यश-कर्तृत्व-कर्तबगारी अशा संकल्पनांचा पुनर्विचार व्हायला हवा. वैचारिक खुजेपणामुळे ही परिस्थिती ओढवलेली आहे. महानगरातील वरवर सुखी वाटणाऱ्या, पालकांच्या संमतीने जातीत लग्न झालेल्या डॉ. गौरी पालवे हिने आत्महत्या का केली? तिचा नवरा एका मंत्र्यांचा पी. ए. असल्यामुळे प्रसिद्धी माध्यमांनी प्रकरण उचलून धरले. पण आजवर अनेकींनी असा टोकाचा निर्णय घेतला असेल किंवा त्यांच्या मनात आत्महत्येचा विचार आला असेल. अशा घटनेतून उच्चशिक्षित मुली व त्यांचे पालक कोणता धडा शिकतात?
गावातील प्रशस्त घरापेक्षा शहरातील छोटी खोली मुलींना हवीहवीशी वाटत असेल तर त्यात त्यांचा भ्रमनिरास होण्याची शक्यता अधिक असते. खेड्यात सुख-सोयींचा अभाव, शिक्षण-आरोग्याच्या अपुऱ्या सुविधा, नोकरी-व्यवसायाच्या अपुऱ्या संधी, तसेच भावकीचा त्रास हे सगळे असतेच पण हीच परिस्थिती महानगरादेखील वेगळ्या स्वरूपात आहे. गावातील जातिव्यवस्था उघड-उघड दिसते तर शहरात ढेकणांप्रमाणे चावे घेते. माझ्या जवळच्या एका दाम्पत्याला पुण्यात आंतरजातीय लग्न केले असल्यामुळे राहण्यासाठी जागा शोधताना 2025 मध्ये अनेक अडथळ्यांना तोंड द्यावे लागले.
शहरात भावकीचा त्रास नसला तरी गावातील भावबंध कायम असल्यामुळे त्यातून सुटका होत नाही. शहरातदेखील संधीचा अभाव आहे. व्यक्तीच्या शिक्षणाला, कौशल्याला साजेशी नोकरी भेटत नाही. उपजीविकेचा खर्च वाढतो यामुळे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची बनते त्याचा सहजीवनावर नकारात्मक परिणाम होतो. पुण्यात सहा-सात लक्ष रुपयांचे पॅकेज असलेला तरुण व शेतीसह पूरक व्यवसाय करणारा तरुण दोघांची बचत जवळ-जवळ सारखीच असते. गावातील तरुणावर कामाचा तणाव कमी असतो. त्यामुळे कुटुंबाला क्वालिटी टाइम देणे शक्य आहे. तरीही लग्न व्हावे म्हणून अर्धकुशल तरुण पुण्याची वाट धरतात. पुण्यात उच्चशिक्षण घेऊन काही महिन्यांत जॉब स्विच करणाऱ्या तरुणाला “गावाला जाऊन काम-धंदा का करत नाही?” असे विचारल्यावर “गावाले गेलो तं पोरगी कोन देईन? तशाच तं पोरी भेटून नाई रायल्या” असे उत्तर मिळते. वेगवेगळ्या महाविद्यालयांत घड्याळी तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या साहाय्यक प्राध्यापकांना त्यांची परिस्थिती विचारली तरी सारे चित्र स्पष्ट होईल. थोडक्यात काय, तर, कायमस्वरूपी नोकरी व स्थिर उत्पन्न असलेल्यांचे शहरी जीवन जगण्यालायक आहे. नशीब अजमावण्यासाठी शहरात आलेल्या, इथे राहून काहीतरी करून घर-संसार करू अशा आशेवर टिकून राहणाऱ्या तरुणांना एकट्याच्या कमाईवर आव्हान पेलणे शक्य नाही. पत्नीचा दृष्टिकोन सकारात्मक असेल, तिची घराबाहेर पडून कष्ट करण्याची तयारी असेल तेव्हा शहरात तग धरता येते. अन्यथा गावात परतणे, अथवा आहे त्या परिस्थितीत आला दिवस पुढे ढकलणे, एवढेच पर्याय उरतात.
व्यसनी, मवाली, नालायक, बेरोजगार या कॅटेगरीतील मुलगे गावाप्रमाणे शहरातदेखील असतात. अशा पुरुषांसह संसार करणे कोणत्याही स्त्रीसाठी जोखमीचेच असते. गावात अशा व्यसनी व्यक्तीला टोकणारे, हक्काने चार शब्द सुनावणारे लोक असतात. शहरात असा आधार मिळण्याची शक्यता फार कमी असते. गावातील तसेच शहरातीलही महिलांना कौटुंबिक हिंसाचाराला सामोरे जावे लागते. याचा शहर वा गावाशी संबंध नसून माणसांच्या विकृत मानसिकतेतून हे सगळे घडते. कोविडनंतरचे आयुष्य अधिक अस्थिर झाले असल्यामुळे मानसिक स्वास्थ्याचा विचार प्राधान्याने करायला पाहिजे. अर्थार्जनासाठी जगायचंय की अर्थपूर्ण जगायचंय? त्याचे मार्ग कोणते? अशा प्रश्नांची उत्तरे पती-पत्नी दोघांनी मिळून शोधावी. खर्चापेक्षा उत्पन्न कमी असलेली तोट्यातील शेती, महिन्याचा खर्च भागवून गाडी-घराचे हप्ते भरल्यावर बँक खाते रिकामे होत असलेली शहरातील अस्थिर नोकरी की, दोघांच्या कष्टातून उभा राहिलेला गावातील / छोट्या शहरातील संसार? शहरात केवळ प्रतिष्ठेसाठी राहायचंय की, दोघांच्या उन्नतीसाठी? शहरात राहणे मुलांच्या भविष्यासाठी जरुरीचे आहे का? यासारख्या अनेक मुद्यांवर दोघांनी संवाद साधणे गरजेचे आहे.
गावात शिक्षणाच्या-आरोग्याच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध नाहीत, हे वास्तव आहे. अनेक गावे शहरांना चांगल्या रस्त्याने जोडलेली असल्यामुळे त्यावर मार्ग काढता येतो. माझ्या परिचयातील एका तरुणाने जिल्ह्याच्या ठिकाणी नोकरीत 25,000 रुपये महिना पगार मिळत असल्यामुळे, लग्न झाल्यावर 30 कि.मी. अंतरावरील गावची वडिलोपार्जित शेती विकून अकोल्याला घर घेतले. दररोज गावाहून येणे-जाणे त्याला शक्य असले तरी त्याने तो पर्याय निवडला नाही.
असा विचार करणाऱ्यांची दिवसागणिक संख्या वाढत आहे. शहरात राहणे प्रतिष्ठेचे वाटते तसेच आपण वडिलांच्या छत्रछायेतून बाहेर पडून स्वतःच्या हिमतीवर काहीतरी मिळवल्याचे समाधान मिळते. लग्न ठरावे म्हणून शहरात गेलेल्यांना झालेले लग्न टिकवण्यासाठी बरीच किंमत मोजावी लागते. पुण्यात कंपनीत काम करणाऱ्यांना लग्नानंतर वाढलेला खर्च भागवण्यासाठी ओव्हरटाईम करावा लागतो. या सर्वांची एकत्रित बेरीज-वजाबाकी केल्यावर येणारे उत्तर आपण प्रवाहासह जगतोय एवढेच असेल.
हेही वाचा - कोरोनाकाळ आणि ग्रामीण महिला - स्नेहलता जाधव
ज्या मुलींना कष्ट करण्यात कमीपणा वाटत नाही, त्यांनी लोकांच्या निरर्थक टोमण्यांचे भय बाळगायचे नाही, स्वतःचे व मुलांचे “सर्वप्रकारच्या त्रास सहन करून“ रक्षण करणाऱ्या नवऱ्यापेक्षा समानतेने वागणारा, चारित्र्यावर संशय न घेणारा, घरकामाची जबाबदारी वाटून घेणारा सहचर हवा असेल तर सामाजिक समजुतींच्या चौकटी ओलांडून विचार करणे क्रमप्राप्त आहे. एकाच वेळी सरकारी नोकरी अन् घरी शेती असे दोन्ही असेलच असे नाही. ज्याच्याकडे कायमस्वरूपी नोकरी अन गावी शेती आहे, असा मुलगा निर्व्यसनी, चारित्र्यसंपन्न, सुधारणावादी विचारांचा असेल याची खात्री देता येत नाही. त्यामुळे मुली व त्यांच्या पालकांनी कशाला किती महत्त्व द्यायचे हे ठरवायला हवे.
नोकरी असेल तर शेती घेता येते किंवा नोकरीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून भविष्यासाठी आवश्यक तरतूद करता येते. शेतीच्या जोरावर नंदनवन फुलवणे शक्य आहे. म्हणून ज्याच्याशी लग्न करायचे आहे तो माणूस म्हणून कसा आहे? याला अधिक महत्त्व द्यावे. खेड्यात राहायचे कि, शहरात हा निर्णय परिस्थितीनुरूप घेता येईल. एवढे दिवस पुरुषांनी स्त्रियांना छळले म्हणून आता मुलींची संख्या कमी असल्यामुळे बदला घ्यावा हा दृष्टीकोन सर्वांसाठी घातक ठरेल.
एकविसाव्या शतकाची 25 वर्षं संपली असली तरी स्त्रीकडे पाहण्याचा पारंपरिक दृष्टिकोन कायम आहे. अल्पशिक्षित मुली लग्नानंतर सर्वार्थाने नवऱ्यावर अवलंबून असतात त्यांची जडण-घडण देखील तशीच होते. उच्चशिक्षित कमावत्या मुली देखील याच पितृसत्ताक व्यवस्थेचे जोखड खांद्यावर घेतात तेव्हा उच्चशिक्षण घेऊन काय साध्य केलं? असा प्रश्न निर्माण होतो. जोडीदाराची निवड करताना आई-वडिलांनी सल्लागाराच्या भूमिकेत असावे पण ते निर्णयकर्त्याची भूमिका बजावतात; त्यांनी देखील स्वतःला आपण मुलीला कशासाठी शिकवले? हा प्रश्न पुन्हा-पुन्हा विचारायला हवा.
लग्नानंतर गळ्यात मंगळसूत्र बांधले अन त्याचे नाव आडनाव लावले की मुली स्वातंत्र्याच्या नाड्या त्याच्या हाती सुपूर्त करतात. त्याची मर्जी सांभाळत सासरच्या लोकांच्या आज्ञेत तिला राहावे लागते. माहेरची अब्रू राखायची, सासरची प्रतिष्ठा सांभाळायची यात तिची उमेदीची वर्ष निघून जातात. तिचं असं काही राहत नाही. हे शोषण गाव-शहरात, अशिक्षित-सुशिक्षित सर्व पातळ्यांवर होत असते. परंपरेच्या वरवंट्याखाली सगळ्याजणी भरडल्या जातात. गावात वडाच्या झाडाची आनंदाने भावभक्तीने पूजा करणाऱ्या बाईपेक्षा वेळेअभावी वडाच्या फांदीचे पूजन करून सोपस्कार पूर्ण करणाऱ्या बाईचे दुःख अधिक मोठे आहे.
शहरात नवरा-बायको आणि त्यांचे एक-दोन लेकरं असे लहान कुटुंब राहत असले तरी गावातील सासवा, नणंदा तिच्यावर नियंत्रण ठेवत असतात. शहरात स्वतःचे किंवा वडिलोपार्जित घर नसेल तर आजच्या काळात प्रामाणिकपणे जगणाऱ्यांसाठी व्यावहारिक दृष्ट्या शहरात संयुक्त कुटुंब असणे अवघड आहे. प्रत्येकाचे नोकरी-व्यवसायाचे ठिकाण वेगवेगळे असल्यामुळे बायकापोरांसह तिकडे राहायला जावे लागते. अशा विस्तारित कुटुंबाचा स्वभाव महत्त्वाचा आहे.
शहरात राहणाऱ्या विभक्त कुटुंबातील स्त्रियांवर झालेल्या अत्याचाराच्या घटना तपासल्या तर, त्यांच्यासोबत एक घरातही न राहणाऱ्या सासरच्या व्यक्तींनी पीडितेला छळले आहे, अशी अनेक उदाहरणे सापडतात. तर दुसरीकडे घरात सासू-सासरे असतील तर मुलांचा सांभाळ ते करतात, आईला नोकरी करताना मुलांची चिंता करावी लागत नाही, आजी-आजोबांच्या सहवासात मुलावर चांगले संस्कार होतात, असेही चित्र आहे. कुटुंब बहुरंगी असते एकाच व्यक्तीच्या मनासारखे कधीच सर्वजण वागत नसतात.
शोषणाला वाव न देणारे, समानतेच्या मार्गाने वाटचाल करणारे घर घडवूया. मन मारून संसार करण्यापेक्षा काहीजणी अविवाहित राहणे पसन्त करतात, त्यांनी विचारपूर्वक तो पर्याय निवडावा. हा एकटीने जगण्याचा मार्ग ब्राम्हणी पितृसत्ताक समाजात अत्यंत खडतर आणि जोखमीचा आहे.
माझ्या मते ‘कोणाशी, केव्हा, कसे, का, लग्न करायचे’ हे स्वतः ठरवा. घरचे वातावरण विचारात घेऊन त्यांचा सल्ला घ्या पण अंतिम निर्णय तुमचा असावा.
- प्रतीक राऊत
rautpratikpr9622394@gmail.com
(संशोधक विद्यार्थी, मराठी विभाग, एल्फिन्स्टन महाविद्यालय मुंबई)
Tags: विवाहसंस्था मुलींना नकाराधिकार शेतकरी नवरा शहरी नवरा कष्ट दुहेरी मिळकत जोडीदार निवड जोडीदार निवडण्याचे निकष Load More Tags
Add Comment