आज कामाचं गांभीर्य जाऊन टीआरपीचं गांभीर्य आलंय...

वीस वर्षांपूर्वीच्या एका मालिकेच्या आठवणी जागवताना आनंद इंगळे यांच्याशी साधलेला संवाद 

‘प्रपंच’ ही मालिका अल्फा मराठीवर नोव्हेंबर 1999 मध्ये सुरु झाली. एका कुटुंबातील तीन पिढ्यांतील 13 सदस्यांच्या भोवती फिरणारी तब्बल 78 भागांची ही मालिका वर्षभरात संपली. या मालिकेला नुकतीच 20 वर्षं पूर्ण झाली. 'प्रपंच' वैशिष्ट्यपूर्ण ठरली ती तिच्या मांडणीमुळे. त्यामुळे आजच्या मालिकांच्या कोलाहलात  वीस वर्पूषांपूर्वीची मालिका अनेकांच्या आठवणीत राहिली आहे. या निमित्ताने ‘प्रपंच’चे लेखन, दिग्दर्शन व निर्मिती अशा तिहेरी भूमिकेत वावरलेल्या प्रतिमा कुलकर्णी आणि प्रपंचमधला मंग्या म्हणजे आनंद इंगळे या दोघांशी संवाद साधला. त्यापैकी प्रतिमा कुलकर्णी यांची मुलाखत काल प्रसिद्ध झाली. तर आज आनंद इंगळे यांची मुलाखत प्रसिद्ध होत आहे .

प्रश्न - ‘मंग्या’ची भूमिका तुमच्याकडे कशी आली?
- प्रपंच जेव्हा सुरु झाली तेव्हा मी त्यामध्ये नव्हतो. माझ्या एन्ट्रीची कथा प्रतिमा तुला जास्त चांगली सांगेल. प्रपंचचं खूप मोठं बलस्थान प्रपंचचं घर होतं आणि ते घर म्हणजे समुद्राकाठचा वर्सोव्याचा बंगला. या बंगल्याला मागच्या बाजूनं छोटंसं दार होतं. सिरिअल सुरू झाल्यानंतरही प्रतिमाला कायम वाटायचं की, बंगल्याच्या मागच्या दारातून कुणालातरी एन्ट्री द्यायला पाहिजे.. तिकडून कोण येणार मग? तर कुणीतरी वेडा माणूस यायला पाहिजे. एखाददुसरी एन्ट्री असेल... पण कुणीतरी एकदम भिडू यायला पाहिजे. 

आता बघ माझ्या भूमिकेचं नावसुद्धा मंग्या आहे. ते आमच्या मंगेश कदमवरून ठेवलेलं नाव आहे. मंगेशची आणि प्रतिमाची छान मैत्री आहे. तिनं मला फोन केला. दोन एपिसोडचं फार तर फार एका दिवसाचं काम असेल म्हणाली. याआधी मी तिच्यासोबत नाटकात काम केलेलं होतं आणि अशी माझी प्रपंचमध्ये एन्ट्री झाली आणि तो मंग्या मग त्यांच्या घरातलंच एक पात्र झाला. 

त्या काळात मालिकेत मधली कुठली पात्रं कशी येणार, कसे ट्रॅक वाढवायचे हे पूर्णतः लेखक-दिग्दर्शक ठरवत असे. चॅनेलची माणसं फार इंटरफेअर करायची नाहीत... त्यामुळे बुद्धिमान माणसांना आपली बुद्धी आणि क्षमता वापरायची सवय होती. सगळेच जण सगळ्याविषयी बोलतायत असं नव्हतं... म्हणून मी म्हणतो की, प्रपंच हे पूर्णतः प्रतिमा कुलकर्णीचं बाळ होतं. 

...तर थोडक्यात माझी एन्ट्री मागच्या दरवाजानं कुणीतरी यायला हवं म्हणून झाली. 

प्रश्न - मग ती कल्पना यशस्वी झाली असं सांगणारी एक पावती माझ्याकडे आहे. आज जेव्हा मी घरी सांगितलं की, प्रपंचसाठी आनंद इंगळे यांची मुलाखत घ्यायला चालली आहे तेव्हा माझी आई म्हणाली की, ‘म्हणजे तो मंग्या काय? मागच्या दारानं हाका मारणारा?’ 
- अगंऽ ती प्रतिमाची कल्पना होती... म्हणजे माझी एन्ट्री मी चांगलं काम करतो किंवा प्रपंचमधलं एक पात्र म्हणून झाली नाही... मागच्या दरवाजानं एक वेडा यायला पाहिजे म्हणून झाली. 

प्रश्न - प्रपंचच्या संहितेविषयी काय सांगाल... प्रपंचची संहिताच फार तगडी आहे असं मला जाणवतं. 
- मुळात संहिता ही लेखिकेनं गुंफत नेली आहे. तिला माणसांची गोष्ट सांगायची होती, नात्यांची गोष्ट सांगायची होती. मालिकेचं नावच प्रपंच होतं नाऽ ‘गोतावळा’ हीच मुळात आयडिया होती. अत्यंत साध्या शब्दांत, तुझ्यामाझ्या घरात बोलतात त्या पद्धतीनं प्रतिमा संवाद लिहिते... त्यामुळे मालिकेत कलाकारही तसेच होते. सगळी साधं, सरळ बोलणारी माणसं. कुणी फार अभिनय करायला जात नव्हता. किचन पॉलिटिक्स नव्हतं. कुणी वाकडी तोंडं करून बोलत नव्हतं, कुणी कुणावर सूड उगवत नव्हतं. ते घर हीच संहिता होती. 

यात एपिटोम होता सुधीर जोशी. ते अण्णा हे पात्र प्रतिमाला जमलं होतं. आजही तुझ्यासारख्या मुलांना ते रिलेव्हन्ट (जवळचं) वाटत असेल तर तेच त्याचं यश आहे. अनेक वेळा आम्हाला वाटतं की, बरं झालं आपण त्याच वेळी प्रपंच केली... कारण आज ती तशी होऊ शकली नसती. आम्ही काहीतरी इतिहास निर्माण केला असं मी म्हणत नाहीये... पण ते करण्याची मुभा आम्हाला मिळाली. इतिहास घडताना कळत नसतोच. त्याची पावती अशी अनेक वर्षांनी मिळत असते... पण आम्ही ती प्रोसेस प्रचंड एन्जॉय केली. 

आमच्या सगळ्यांचा प्रतिमावर खूप विश्वास होता. ती ओरडायची, रागवायची. त्यात मजा होती... म्हणून बघ सगळे जण त्यांना फार अक्कल असल्यासारखे नाहीत बोलत तिच्या मालिकेमध्ये. ते ते पात्र त्याची त्याची वाक्यं बोलतं हे फार मोठं बलस्थान होतं... म्हणजे मंग्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी अतिशय सोप्या पद्धतीनं सांगतो. 

या सगळ्यांमधली नाती कशी होती? तर कुणीतरी चिडलंय, रुसलंय, कुणीतरी काहीतरी वेड्यासारखं वागतंय... पण ते घर सगळं सांभाळून घेतंय. 

प्रश्न - प्रपंचनं तुम्हाला काय दिलं?
- नाव दिलं. ओळख दिली. त्या काळी अल्फा मराठी या नावानं चॅनेल होतं. तोपर्यंत मी नाटकांमध्ये कामं करत होतो. चांगली चालू होती नाटकं. त्याच वेळेला ई टीव्हीवर स्मिता तळवलकरची ‘घरकुल’ नावाची सिरिअलही मी करत होतो. छोटीमोठी कामं चालू होती... पण प्रपंचमुळं लोक मला मंग्या म्हणून ओळखायला लागले. अशी ओळख मिळालेलं प्रपंच हे माझं पहिलं काम आहे... यासाठी मी प्रपंचचा आणि प्रतिमाचा कायमच ऋणी राहीन. 

हे काम करताना मी नाटकाच्या प्रयोगाला जायचो नाऽ तेव्हा नाटक संपल्यावर प्रेक्षकांपैकी कुणीतरी मला ‘एऽ मंग्या’ अशी हाक मारायचे. तेव्हा सोशल मिडियाचा मूर्खपणा नव्हता. माणसं साधी, सरळ बोलू शकायची. काम आवडलं तर कौतुक करायची, नाही आवडलं तर तसं सांगायची... आणि तेच सगळं प्रपंचमध्ये प्रतीत होतं.  

प्रश्न - प्रपंचमधली माणसं साधं, सरळ बोलायची हे खरं असलं तरी प्रपंचच्या संहितेमध्ये बऱ्याच गोष्टी बिटवीन द लाइन्स आहेत. 
- अगदी खरंय. प्रपंच हा मला संपूर्ण ॲप्रिसिएशन कोर्स वाटतो. तू जे आत्ता म्हणालीस नाऽ बिटवीन द लाइन्स. प्रपंचचं बलस्थानचं होतं बिटवीन द लाइन्स. शब्दांपेक्षा शब्दांच्या मधल्या जागा, प्रतिक्रिया प्रपंचमध्ये बोलक्या होत्या. 

आजच्या मालिकांचा, सिनेमांचा स्पीड खूप आहे. प्रपंचमध्ये एक ठहराव होता. सावकाश प्रतिक्रिया दिली, अभिनय केला तरी लोकांना आवडतं हे तेव्हा कळत होतं आणि प्रपंचच्या वेळी अभिनेताच अभिनय करायचा, कॅमेरा नाही. आज कसं अर्धं काम कॅमेराच करतो. ज्या क्षणाला तुम्ही बनचुके होऊन काम करायला सुरवात करता नाऽ त्या क्षणी खरेपणा संपतो. 

प्रपंचमध्ये बरेच मोठेमोठे सिन्स होते. प्रपंच टेक्निकली फार सुपर फाईन मालिका होती असं मी म्हणत नाहीय... पण संहितेची आणि अभिनयाची सगळ्याची ताकद इतकी होती की, त्याकडे लक्ष गेलं नाही. अर्थात म्हणजे टेक्निकल गोष्टींकडे लक्ष देऊ नये असा माझा मुद्दा नाही. आजच्या टेक्निकने प्रपंच जास्त पोहोचली असती. 

प्रश्न - सुधीर जोशी, रसिका जोशी आज नाहीयेत. त्यांच्याविषयी काय सांगाल?
- आधी रसिकाबद्दल सांगतो. रसिका ही माझी अशी कलाकार मैत्रिण होती की, आम्हाला एकमेकांचं काम जमायचं. इतकी केमिस्ट्री होती. मी असा एक लुक दिल्यानंतर त्यावर ती काय करणार आहे किंवा तिनं एक काहीतरी केल्यानंतर अंड्या (मी) काय रिॲक्ट होणारये हे आम्हाला एकमेकांना कळायचं. प्रपंचमध्ये एक सीन आहे. तो तू नक्की जाऊन बघ. 

प्रश्न - कोणता? ती दिल्लीला जायचं ठरवते तेव्हा मंग्या तिच्यासाठी गिफ्ट आणतो. तो का?
- बरोबर तोच सीन. मी तिला म्हणतो की, ‘आपल्या दोघांत आहे का काहीतरी? लग्न करायला पाहिजे का आपण?’ ती म्हणते, ‘छेऽ छेऽऽ’

यावर मी म्हणतो, ‘मंजूर आहे! पण माझ्या घरी दुसरीच कुणीतरी मुलगी वावरतीय असं बघितल्यावर तू काय करशील?’

रसिका म्हणते, ‘तिला येऊन मी ओचकारेन.’

सच अ ब्रिलिअंट सीन... इतका सुंदर प्रेमप्रसंग प्रतिमानं लिहिला होता... आणि आम्ही तो सहज सलग केला. हजारो वेळा रसिकाची आठवण येते. प्रतिमा जे लिहितीये ते अभिनयात रूपांतरित करण्याची ताकद रसिकामध्ये होती. आपल्या दिग्दर्शकाला काय म्हणायचं आहे ते मांडायची ताकद तिच्यात होती. तथाकथित सौंदर्याच्या व्याख्येत बसणारी ती नव्हती... पण अभिनय करायला लागली की ती देखणी दिसायची. तिची देहबोली सुंदर होती. आम्ही एकत्र नाटकंसुद्धा केलेली होती. इनिबिशन नसलेली नटी होती ती. आता तशी मुक्ता बर्वे आहे बघ. 

...आणि सुधीर काका. तो आदर्श आहे माझा. सुधीर काका नेहमी असं म्हणायचा की, नटानं बुद्धिवान असून चालत नाही तर तीव्र बुद्धिमान असावं लागतं. आज या सगळ्याचा रेफरन्स मातीत गेलाय ही गोष्ट वेगळी... पण वाचन, भाषा, समज या सगळ्यात सुधीरकाका आमचा आदर्श होता. त्याला जे यायचं, त्याला जे कळायचं म्हणजे आम्ही त्याच्या प्रेमात पडायचो त्याचं काम बघताना. साधं, सरळ आणि तरी महत्त्वपूर्ण असं काम करण्याची क्षमता असणारा तो एक कमालीचा नट होता. त्याची रोज आठवण येते. अजून काय सांगू? नट म्हणून आणि माणूस म्हणूनही मी त्याला ओळखत होतो. नाटक, सिनेमा, मालिका अशा सर्व ठिकाणी आम्ही एकत्र कामं केली. त्याचे विचार प्रवाही होते. का आणि कशाबद्दल आपण हे करतोय याची त्याला जाण असायची. 

प्रश्न - टेलिव्हिजनचा इन्फ्लुएन्स खूप असतो. हे जाणून अधिक गांभीर्यानं मालिका केल्या पाहिजेत असं वाटतं तुम्हाला?
- गांभीर्यानं सगळेच जण काम करतात गं. आज कामाचं गांभीर्य जाऊन टीआरपीचं गांभीर्य आलंय. हा मोठा बदल आहे. आज एखाद्या मालिकेचा एखादा ट्रॅक आठवडाभर जरी चालला नाही तरी लगेच बदलायला सांगतात. हा सगळ्यात घाणेरडा भाग झालाय आणि घाणेरडा म्हणजे अपरिहार्य भाग झालाय. आता मालिकांचं दळण झालंय. मालिकांची क्वांटिटी वाढून क्वालिटी घटलेली आहे. 

दोन्हींचा ताळमेळ बसवून काम करणारे लोक आजही आहेत, संख्येनं कमी आहेत... पण आहेत. ‘शेजारी शेजारी’ मालिकेपर्यंतसुद्धा सरळ, साधा विनोद होता. आज स्कीटच्या नावाखाली सगळ्याची माती झालीय. ठहराव नसतो. ओव्हर रिॲक्शन हा सगळ्यात मोठा बदल मालिकांत आलेला आहे. हा फरक समाजात आला तसा मालिकांत आला. आता मला सांग... तुझ्या आयुष्यात तुझ्या घरात कुणी कुणाला विष घातलंय? कुणी चोऱ्या केल्यात? तुझ्या घरातल्या चारेक जणांची कायम एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स आहेत? काय आहे हे? कुणाच्या घरात असं असतं? पण आता मालिका त्याशिवाय होतच नाहीत... आणि कुणी ठरवलं... की, हेच मनोरंजन आहे? एक अतिशय महत्वाचं वाक्य आहे - ‘पिपल गेट व्हॉट दे डिझर्व्ह...’ 

सगळं पटपट बघा, पटपट सोडवा असं झालंय. सगळ्यात मोठा बदल म्हणजे अलीकडे लोकांना ‘विनोद म्हणजेच मनोरंजन’ असं वाटायला लागलंय. एखादी वेगळी भावनासुद्धा तुझं मनोरंजन करते हे आपल्या लक्षातच येत नाहीय. 

...आणि असं होणारही... कारण आपल्या आजूबाजूला इतके प्रश्न आहेत, वातावरण इतकं त्रासिक झालेलं आहे की, मग माणसाला दोन घटका हसायलाच आवडतं. कुणाची दुःखं दाखवून अजून ताप देऊ नका बाबा असा लोकांचा सूर असतो. त्यांचं चूक नाहीय... पण मग त्यामुळे मनोरंजनाचा एक मोठा सेक्शन आपण गमावलेला आहे. 

लोकांना मनोरंजन म्हणून फक्त आणि फक्त विनोद किंवा देशभक्तीच हवी आहे आणि देशभक्तीसुद्धा कोणती? जी मला वाटते ती आणि तशीच देशभक्ती. माझ्या विरोधात कुणी बोलला की तो देशाच्या विरोधात. 

प्रश्न - मंग्या लोकांना एवढा जवळचा का वाटला असावा?
- कारण तो समोरच्याला समजून घ्यायचा. साधं-सोपं बोलायचा. 

मंग्या असं म्हणतो की, ‘का नाही सरळ, साधं जगायचं?’

‘ज्यांना बिटवीन द लाइन्स कळतात त्याच्याच तुम्ही प्रेमात पडता.’ 

लोक जेव्हा मला म्हणतात की, ‘तुम्ही किती सहज काम करता... किती नॅचरल ॲक्टिंग करता’ तेव्हा मी असा विचार करतो की, अभिनय आहे तर तो नैसर्गिक कसा? 

माणूस, कलाकार आणि त्याचं पात्र याचं गणित जमतं तेव्हा लोकांना तो जवळचा वाटतो. अशी कुठलीही भूमिका जवळची, घरची करून दाखवण्याची क्षमता ज्या कलाकारांमध्ये असते त्याचा अभिनय सहज वाटतो, नैसर्गिक वाटतो.  

प्रश्न - प्रपंचसाठी तुम्हाला मिळालेल्या प्रतिक्रिया... 

- खूप आहेत. अजूनही मिळतात. आज 20 वर्षांनी तुझ्यासारख्या सत्तावीस-अठ्ठावीस वर्षं वयाच्या मुलीला ती मालिका बघावीशी वाटली, रिलेव्हन्ट वाटली, रिलेट झाली... अजून काय पाहिजे? 

...तेव्हा रिक्षात, प्रवासात, थिएटरमध्ये, रस्त्यावर लोक मंग्या म्हणून हाक मारायचे. एका कुटुंबानं मला सांगितलं होतं की, या मंग्यासारखा मुलगा किंवा भाऊ आमच्या घरात असायला हवा होता. ‘काम आवडलं...’ अशा प्रतिक्रिया खूप येतात... पण ‘तू आमच्या घरचा वाटतोस...’ ही प्रतिक्रिया मंग्यासारख्या एखाद्या भूमिकेनं मिळते. 

‘मला मंग्यासारखा बॉयफ्रेंड मिळायला हवा... ज्याला माझ्या मनातलं कळतंय.’ अशाही काही सुंदर प्रतिक्रिया मिळाल्या. 

प्रश्न - प्रपंच बघितली तशी अजून कोणती मालिका बघता येईल?  काय रेकमेन्ड कराल?

- आजकाल एका मालिकेसाठी चार-चार लेखक असतात, तीन-तीन, चार-चार दिग्दर्शक असतात. प्रत्येक जण येऊन आपलं काहीतरी करतो... त्यामुळे कलाकृतीची एकसंधता जाऊ शकते... पण जुन्या मालिकांमध्ये म्हणशील तर हिंदीत बुनियाद होतं, तमस होती, प्रतिमाचीच झोका नावाची मालिका होती. त्या आजही जरूर पाहाव्यात अशा आहेत.

(मुलाखत आणि शब्दांकन - मृद्‌गंधा दीक्षित)


हे ही वाचा : बाई घरात बसून फक्त स्वयंपाक करतीये आणि पुरुषच कसा शहाणा आणि कर्तबगार आहे ही इमेज मला तोडायची होती... -  प्रतिमा कुलकर्णी


'प्रपंच' या मालिकेचे सर्व भाग येथे पाहता येथील  

 

Tags: मुलाखत आनंद इंगळे प्रपंच मालिका मृदगंधा दीक्षित Interview Prapancha Anand Ingle Mrudgandha Dixit Load More Tags

Comments:

विष्णू दाते

छानच होती 'प्रपंच '! पुन्हा एकसंध बघायला खूप आवडेलं!!

Add Comment