‘प्रपंच’ ही मालिका अल्फा मराठीवर नोव्हेंबर 1999 मध्ये सुरु झाली. एका कुटुंबातील तीन पिढ्यांतील 13 सदस्यांच्या भोवती फिरणारी तब्बल 78 भागांची ही मालिका वर्षभरात संपली. या मालिकेला नुकतीच 20 वर्षं पूर्ण झाली. 'प्रपंच' वैशिष्ट्यपूर्ण ठरली ती तिच्या मांडणीमुळे. त्यामुळे आजच्या मालिकांच्या कोलाहलात वीस वर्पूषांपूर्वीची मालिका अनेकांच्या आठवणीत राहिली आहे. या निमित्ताने ‘प्रपंच’चे लेखन, दिग्दर्शन व निर्मिती अशा तिहेरी भूमिकेत वावरलेल्या प्रतिमा कुलकर्णी आणि प्रपंचमधला मंग्या म्हणजे आनंद इंगळे या दोघांशी संवाद साधला. त्यापैकी प्रतिमा कुलकर्णी यांची ही मुलाखत. तर आनंद इंगळे यांची मुलाखत उद्या प्रसिद्ध होईल .
प्रपंच ही गोष्ट आहे एका घराची. या घराचं नाव ‘आश्रय’. आश्रयमध्ये एक मध्यमवर्गीय एकत्र कुटुंब राहतं. अण्णा (सुधीर जोशी) आणि माई (प्रेमा साखरदांडे) हे आजी-आजोबा; प्रभाकर (संजय मोने) आणि बाळ (बाळ कर्वे) हे त्यांचे मुलगे; प्रमिला (सुहास जोशी) आणि शालिनी (अमिता खोपकर) या सुना; नंदू (भरत जाधव), प्रशांत (सुनील बर्वे), अलका (रसिका जोशी), लतिका (सोनाली पंडित) आणि कलिका (शर्वरी पाटणकर) ही नातवंडं. अक्का (रेखा कामत) म्हणजे अण्णांची बहीण. मंग्या (आनंद इंगळे) हा अलकाचा मित्र आणि जानकी (भार्गवी चिरमुले) ही अलकाची मैत्रीण. उपेंद्र लिमये, मच्छिंद्र कांबळी, विद्याधर जोशी, आसावरी जोशी यांनीही तुलनेनं छोटी पण ताकदीनं मोठी पात्रं रंगवलेली आहेत. सौमित्र (किशोर कदम) यांनी या मालिकेचं शीर्षक गीत लिहिलेलं आहे आणि रवींद्र साठे यांनी ते गायलेलं आहे.
अलकाला नाटकात काम करायचं आहे. नंदूनं मधूनच शिक्षण सोडून दिलेलं आहे आणि त्याला गाड्यांमध्ये रस आहे. त्याला स्वतःचं गॅरेज सुरू करायचं आहे. लतिकाला लग्नासाठी अमेरिकेमध्ये राहणाऱ्या मुलाचं स्थळ येतं. प्रशांत आजकालच्या वर्क कल्चरमध्ये गुरफटलेला आहे. माई समाजसेवा करण्यात व्यग्र आहेत. प्रभाकरला पेटी वाजवायला आवडते. प्रमिला स्वयंपाकघरात खपतीय आणि अण्णा या प्रपंचात अखंड गुंतलेले आहेत.
अण्वस्त्रापासून ते आपली लग्नसंस्था, शिक्षणव्यवस्था, भ्रष्टाचार, स्त्री-पुरुष समानता, सामाजिक संवेदनशीलता, नाटक-कला, शोषण, करिअर चॉइसेस अशा अनेक गोष्टींचा उहापोह या मालिकेत केला गेलाय. प्रेम येतं, खोड्या येतात आणि महत्त्वाचं म्हणजे कुठलाही बडेजाव न करता अगदी सहजपणे येतात. प्रपंचची कथा आपल्याला विचार करायला लावते... तशीच ती उत्कंठासुद्धा वाढवते. उत्कंठेसोबत हास्य, हुरहूर, राग, दया, आनंद, माया-प्रपंचमधले वेगवेगळे प्रसंग बघताना अशा वेगवेगळ्या भावना आपल्या मनात येतात.
टेलिव्हिजन आणि त्यात प्राईम टाईम यांमध्ये प्रेक्षकांना प्रभावित करण्याची प्रचंड ताकद असते. याचं गांभीर्य लक्षात घेऊन ज्या काही मालिका तयार होत असतात त्यात प्रपंचचं नाव अग्रक्रमानं घ्यावं लागेल.
मोठं, समुद्राकाठचं, समृद्ध असं वाडवडलांनी बांधलेलं घर आहे... पण ते आता जुनं झालंय. मग हे जुनं झालेलं घर पाडून तिथं नवी इमारत बांधायची का या प्रश्नावर कथा सुरू होते आणि त्या प्रश्नाच्या निर्णयावर कथा संपते. तो निर्णय काय आणि तो क्रमाक्रमानं कसा घेतला जातो हे पाहण्यासारखं आहे, अनुभवण्यासारखं आहे. 78 भागांची ही मालिका यूट्युबवर उपलब्ध आहे.
प्रश्न - प्रपंच कशी सुरू झाली?
- ‘दामिनी’ मालिका सुरू व्हायच्या आधीची गोष्ट आहे. दूरदर्शननं एक दैनंदिन मराठी मालिका करायचं ठरवलं... तेव्हा त्यांनी अनेक प्रॉडक्शन हाउसेसकडे विचारणा केली. त्यांपैकी एक होतं यूटीव्ही. मी यूटीव्हीसाठी ‘लाईफ लाईन’ नावाची मालिका करत होतेच. यूटीव्हीकडे मराठी लोक नव्हते म्हणून त्यांनी मला विचारलं. म्हटलं, ‘बापरे! हे रोज रोज करणं कठीण आहे... कारण ‘लाईफ लाईन’ साप्ताहिक मालिका होती. महिन्यातून चार एपिसोड करायचे... त्यामुळे विचार करायला वेळ मिळायचा... पण दैनंदिन मालिका म्हणजे महिन्याला 22 एपिसोड. ते कसे करायचे आणि कुठून, काय कथा आणायची? मला ओढूनताणून फार नाट्यमयता आणायला आवडत नाही. दैनंदिन जगण्यामध्ये एक आपसूक नाट्य असतं. मुद्दाम कुणीतरी, काहीतरी घडवून आणण्याची गरज नसते. मुद्दाम असा तयार केलेला व्हिलन मला कधीच पटला नाही. परिस्थितीच व्हिलन असते किंवा ती आपल्याला तसं वागायला भाग पाडते.
...पण दैनंदिन मालिका करायची तर सतत काहीतरी घडणारं ठिकाण हवं. ते कोणतं... तर घर. घरात बारशापासून मर्तिकापर्यंत सतत काहीतरी घडत असतं. मग त्या घरात जितकी जास्त माणसं असतील तितकं बरं. वेगवेगळ्या वयांची, वेगवेगळ्या पिढ्यांची माणसं आली की मग त्यांच्यामध्ये सहज संघर्ष होतोच... तरीही बिग ड्रामा नाही. साधासुधा संघर्ष... म्हणजे शिकायचं काय, लग्न कुणाशी करायचं, नाटकात काम करायचं की नाही, कशात करिअर करायचं... वगैरे.
...म्हणजे त्या घरात तीन पिढ्या पाहिजेत, भरपूर माणसं म्हटल्यावर घर मोठं पाहिजे. फक्त नवराबायको असण्यापेक्षा एखादी आत्यापण असू दे. मग तिची काहीतरी कथा.
बाई घरात बसून फक्त स्वयंपाक करतीये आणि पुरुषच कसा शहाणा आणि कर्तबगार आहे ही इमेज मला तोडायची होती... म्हणजे प्रपंचमध्ये स्वयंपाक करणारी बाई आहेच. ती मधल्या पिढीची आहे. मोठ्या पिढीतली सासू मात्र बाहेर जाऊन समाजसेवा करणारी आहे... म्हणून मग तिचा नवरा घरात बसणारा, घरात जास्त लक्ष घालणारा आहे. तेव्हा तो आजोबा सगळ्यांचा ‘भीष्म पितामह’ होईल असं ठरलं नव्हतं... पण तसं झालं.
सतत काहीतरी घडत राहील एवढंच हवं होतं. घरात सतत गडबड पाहिजे. गडबड असली की एनर्जी येते. पुन्हा त्यांचे परमिटेशन कॉम्बिनेशन खूप होतात. काका आणि छोटी कलिका, काकू आणि नंदू, लतिका आणि प्रशांत. इतक्या लोकांतही दोघा-दोघांचं एक काहीतरी हळवं बाँडिंग असतं.
‘लाईफ लाईन’च्या वेळी माझा एक प्रॉडक्शन मॅनेजर होता. त्यानं हे घर शोधलं. ‘कॉन्व्हेंट व्हिला’ असं या घराचं नाव आहे. प्रपंचमध्ये आम्ही त्याला ‘आश्रय’ म्हटलंय. त्या घरानं खूप कॉन्ट्रिब्यूट केलं. त्या घरामुळे प्रपंचला एक फिलोसॉफिकल टच आला. भारदस्तपणा आला.
यूटीव्हीची निर्मिती असताना कास्टिंग पूर्ण वेगळं होतं. तेव्हा उषा नाडकर्णी मोठी जाऊ होत्या, सुधीर जोशींचा म्हणजे अण्णांचा रोल राजा गोसावी करणार होते आणि संजय मोनेचा म्हणजे मोठ्या भावाचा रोल बापू कामेरकर करणार होते. बापू कामेरकर म्हणजे सुलभा देशपांडेंचा भाऊ. बाकी प्रेमाताई, बाळ कर्वे हे सगळे तेच होते. आम्ही तालीम केली. खूप खूश होतो सगळे... आणि दुसऱ्या दिवशी यूटीव्हीमधून फोन आला की मालिका होऊ शकत नाही. त्या वेळी दूरदर्शनवर दामिनी आली होती. मग ते म्हणाले की, याचे राईट्स आम्ही विकत घेतो. मी तेव्हा ते विकले नाहीत. ही पंचाण्णवची गोष्ट आहे. मराठी वाहिन्या अजून सुरू झाल्या नव्हत्या... त्यामुळे प्रपंच दोनतीन वर्षं तशीच पडून होती. मी नाद सोडून दिला होता.
15 ऑगस्ट 1999 रोजी अल्फा मराठी सुरू झाली... तेव्हा माझा मित्र पत्रकार भारतकुमार राऊत झी टीव्हीचं काम बघत होता. त्याला माहिती होतं की, माझ्याकडे एक चांगली कल्पना आहे. त्यानं भेटायला बोलावलं. गोष्ट ऐकली. त्यांना आवडली. अल्फा मराठी वाहिनी नवीन असल्यामुळे त्यांनी खूप सवलतीसुद्धा दिल्या. मालिकेच्या भागांची टेक्निकल तपासणी झाली की तीस दिवसांत पैसे... जे आता सहा महिन्यांनी मिळतात. मग मी विकली एपिसोड करायचं ठरवलं. तेव्हा एकच दैनंदिन मालिका होती ‘आभाळमाया’. बऱ्यापैकी कमी भांडवलामध्ये मीच प्रपंच प्रोड्यूस केली. मी प्रपंच सुरू केली. मीच निर्माती असल्यानं हे कर ते कर असं मला सांगणारं कुणी नव्हतं. मीच लेखक-दिग्दर्शक आणि निर्माती असल्यामुळे मला पूर्ण स्वातंत्र्य होतं. मी पैसे पैसेपण केलं नाही. माझी फी वगैरेपण बघितली नाही.
अल्फा मराठीवर प्रपंच करायचं ठरलं तोवर राजा गोसावी यांचं निधन झालं होतं... मग त्या भूमिकेसाठी सुधीर जोशी आले. बापू कामेरकर पहिल्या दिवशी शूटला आले आणि माझ्या लक्षात आलं की, ते खूपच म्हातारे झालेले आहेत. सुधीर जोशी हा बापू आणि बाळ कर्वे यांच्या वडलांचा रोल करणार होता आणि तो त्या दोघांपेक्षा लहान होता. मग बापूंच्या जागी संजय मोने आला. बापू खूप विसराळू होते... म्हणजे ऐतिहासिक नाटकात चश्माच घालून जातील, स्टेजवर चप्पलच विसरून येतील असे... आणि मी त्यांचा रोल तसाच लिहिलेला. माझ्या वडलांची आई -माझी आजी अशी होती की, ती कामधाम सोडून कधीही पेटी वाजवत बसायची. तर संजय मोनेचं पात्र तसं होतं पेटी वाजवणारं, बापूंसारखं विसराळू. मग सुहास जोशी आणि अमिता खोपकर या दोघी सुना झाल्या.
दरम्यान रसिका जोशी मला भेटायला घरी आली होती. तिनं टेबलवर प्रपंचचं स्क्रिप्ट पडलेलं पाहिलं.
तिनं विचारलं, “हे काय आहे?”
“प्रपंच नावाची मालिका आहे अल्फा मराठीसाठी.”
“मग यात मी नाही?”
“नाहीय तुला रोल.”
“मग लिही माझा रोल.”
रसिका माझ्यावर असा हक्क गाजवायची... कारण आमच्यात तेवढी घसट होतीच. मग मी अलकाचं पात्र त्यानंतर लिहिलं आणि अलका रसिकासारखीच ठेवली. मला नवीन काही सुचलं नाही.
आनंद इंगळेचं म्हणशील तर त्याचं पात्रच सुरुवातीला नव्हतं. त्या घराला समुद्राकडून एक दार होतं. ‘कहो ना प्यार है’मध्ये हे घर आहे. त्यात त्यांनी मागूनच मेन गेट दाखवलं होतं... आणि माझी एक सवय आहे की, नाटकात किंवा मालिकेत मी जागेचा कोपरा नि कोपरा वापरते. इथेही या घराच्या, अंगणाच्या सगळ्या जागा मी वापरलेल्या आहेत... तर मला मागून कुणीतरी एन्ट्री घ्यायला हवी होती. मग तोपर्यंत रसिकाच्या बोलण्यातून तिच्या नाटकातल्या मित्रांचा उल्लेख आलेला होता. मग मंग्याचं नाव ठेवलं मंगेश कदमवरून... कारण मंगेश माझा अगदी सख्खा मित्र आहे आणि तो प्रपंचमधल्या मंग्यासारखाच नाट्यवेडा आहे.
या घरातल्या सगळ्यांना मंग्या ‘अलकाचे अण्णा, अलकाची काकू वगैरे’ असं म्हणतो. आम्ही लहानपणी आमच्या मित्रांच्या घरच्यांना असंच संबोधायचो. ‘अमक्याची आजी, अमक्याचे बाबा वगैरे’. फनिश्वरनाथ रेणूंची एक कादंबरी आहे ‘मैला आचल’ नावाची. त्यात एक ‘नन्हे की माँ’ असं पात्र आहे. तो नन्हे गोष्टीत फार नाहीचये... पण ‘नन्हे की माँ’ असंच अख्खं गाव तिला म्हणतंय. सभेला कोण कोण आलेलं असा एक प्रसंग आहे. त्यात हजेरी घेताना असा उल्लेख आहे -‘नन्हे की माँ का बेटा नन्हे आया था।’ तर हे मला फार आवडलेलं. त्याचा इथे संदर्भ आहे. मंग्या ‘अलकाची आई, अलकाचे काका’ म्हणतो यातून मंग्याची निरागसतासुद्धा दिसते. त्याला नाटकातलं खूप काही कळत असेल पण मुलगा म्हणून तो निर्मळ आहे. मला निर्मळ माणसांचा खूप सोस आहे. मी निर्मळ माणसंच क्रिएट करते. मला कुणीकुणी सांगतात की, हे चूक आहे... पण मला आवडतं.
हे घर इतकं मोठं आहे, इथं इतकी माणसं आहेत की, हे घर सेल्फ सफिशियन्ट आहे असंही मला दाखवायचं होतं. बाहेरच्या माणसांची आपल्याला गरज नाही असं कुणाला वाटू शकतं तर फक्त धाकट्या कलिकाला. मोठ्यांना माहिती आहे की, असं चालत नाही. बाहेर पडावंच लागणार आहे. सुरक्षिततेमधून आलेली स्नॉबरी कलिकामध्ये आहे. हांऽऽ आत्ता मी तुला जितक्या अॅनलिटिकली सांगतेय तेवढा विचार मी तेव्हा केलेला नव्हता.
प्रश्न - मंग्याचं आणि अलकाचं नातं खूप सुंदर दाखवलंय.
- त्या दोघांमध्ये मैत्रीहून थोडं काहीतरी जास्त आहे एवढंच दाखवायचं होतं मला.
प्रश्न - ती ‘एनेसडी’ला जाणार असते तेव्हा तो तिला जे गिफ्ट देतो तो सीन मी तीनचार वेळा तरी पुन्हापुन्हा पाहिला.
- रसिका आणि आनंद ग्रिप्स थिएटर करायचे. सुदर्शन रंगमंचच्या शुभांगी दामले यांच्याकडे चौकशी करून त्या दोघांचा लहानपणीचा एकत्र फोटो मागवला. त्या एका फोटोनंपण खूप काही साधलं गेलं. त्या फोटोमुळे दोघं कुठून कुठपर्यंत आलेत हे दिसलं. ते आता प्रेमात आहेत आणि उद्या लग्नच करणार आहेत असं नाहीय ते.
त्यामागच्या खडकावरून येण्यासाठी आनंद इंगळेला घेतलं होतं... पण त्यानं ज्या तऱ्हेनं ते पात्र उभं केलं त्यामुळे मंग्या मालिकेत शेवटपर्यंत राहिला.
प्रत्येक पात्राला मी काहीतरी खोड दिली. धाकट्या कलिकाला चोरून ऐकायची सवय असते. ‘अय्याऽऽ असं म्हणत होते माहितीय अण्णा...’ अशा ती बातम्या इकडेतिकडे करत राहते. भरत जाधव म्हणजे नंदू एकदम गरीब स्वभावाचा. मला भरत हवाच होता. ‘अधांतर’ नाटकात मी त्याला पाहिलं होतं. त्यानं त्यातला रोल फार सुंदर केला होता. भरत त्या वेळी नवीन होता. ‘सही रे सही’ त्यानंतर आलेलं आहे. तो तेव्हा अजून स्टार झालेला नव्हता. या सगळ्या बरोबरच्या लोकांमध्ये मी कसा बोलू असं तेव्हा त्याला वाटत असावं... कारण त्याचा स्पीच पॅटर्न वेगळा होता. आता त्यानं खूप डेव्हलप केलंय. मग मी त्याला कमी बोलणाराच रोल दिला. कमी शिक्षण घेतलेला, गाड्यांची आवड असणारा. मला हा रोल खूप आवडला होता. आपल्या आवडीचं काम खूप मनापासून पॅशनेटली करणारी माणसं वेगळी असतात, सुंदर दिसतात. गॅरेजमध्ये काम करणारा माझा नंदू तसा होता. त्याला गाड्या माणसासारख्या वाटायच्या. गाड्यांचे आणि घरातल्या माणसांचे स्वभाव यांची तुलना करणारा एक डायलॉग नंदूच्या तोंडी आहे.
या सगळ्यांना बर्ड्स आय व्ह्यूनं बघणारा माणूस आहे अण्णा. घरात झोपाळा होता. त्या झोपाळ्याचं किंचित शांत हालणं, बाहेरचा समुद्र या सगळ्यामुळे सिन्सना तत्त्वचिंतक बैठक मिळायची.
सुधीरनं जो आवाज लावला, त्याचे जे लुक्स यायचे त्यामुळे त्याचं पात्र छान फिलोसॉफिकल होत गेलं. कुटुंबातल्या प्रत्येकाशी बोलताना तो वेगळ्या पद्धतीनं बोलायचा, वेगळा स्टान्स घ्यायचा.
आजोबा म्हणून आपला एक आब राखून तो सगळ्यांशी बोलायचा. मुलं आपले प्रश्न घेऊन त्याच्याकडे यायची. तरी आत्ताच्या पिढीचे सगळे प्रश्न अण्णाना समजायचे असं नाहीय.
प्रश्न - म्हणून सुनील बर्वे एका सीनमध्ये म्हणतो की, मी अण्णांचं ऐकायचं नाही असं ठरवलंय.
- बरोबरऽऽ पण तेव्हा सुधीर म्हणतो की, कसोटीच्या वेळी तुला हे आठवेल... आणि तसं होतंसुद्धा.
प्रश्न - मराठी मालिकांमध्ये एकाच समाजवर्गाचं चित्रण दिसतं. प्रपंचमध्येही तसं झालंच की...
- मी कुटुंबाचं नाव ‘देशमुख’ घेतलं... कारण हे कुटुंब ब्राह्मण आहे असं आडनावावरून वाटायला मला नको होतं... पण तरी मी लिहीत गेले तशी त्या घराची लाईफ स्टाईल ब्राह्मणी होतच गेली. जे मी जगले तेच मी तिथे लिहिलं.
मी इंग्लीश साहित्याची विद्यार्थिनी आहे. आम्हाला जेन ऑस्टीन होती शिकायला. आता तिच्या लिखाणाविषयी असं म्हणलं जातं की, ‘तिच्या कादंबऱ्या ग्रेट आहेत पण तिचं जग सीमित आहे’. ती जे जगली ते तिनं लिहिलं. खोलात जाऊन लिहिलं. मी ‘लाईफ लाईन’सारखी सिरिअल केली होती. स्लम एरिया, आदिवासी भाग, लीलावती हॉस्पिटल अशा अंत्यत वेगवेगळ्या ठिकाणी काम करणाऱ्या डॉक्टरांशी संवाद साधून, रिसर्च करून आम्ही ‘लाईफ लाईन’चे 22 एपिसोड केले. आता माझं सगळं आयुष्य हिंदू कॉलनीमध्ये गेलं. रुईया कॉलेज. नाटकामुळे मी थोडीतरी बाहेर पडले. नाहीतर माझं जगच मुळात सगळं पांढरपेशं होतं. माझं वाचन होतं चांगलं... पण कक्षा रुंदावलेल्या नव्हत्या. वाचणं आणि जगणं यांत फरक असतो... त्यामुळे वैचारिकदृष्ट्या सर्वसमावेशक प्रश्न असले तरी घरचं वातावरण ब्राह्मणी होत गेलं हे खरं आहे.
‘गँग्ज ऑफ वासेपूर’सारखे सिनेमे आणि ‘सॅक्रेड गेम्स’सारख्या वेबसिरीज यांच्याशी मी अजिबात कनेक्ट करू शकत नाही. मध्ये तर वेबसिरीजचं पीक आल्यावर मला कॉम्प्लेक्स आला. मला वाटलं की, आपण कसं काय तग धरणार या जगात. अशी हिंसा मला कधीच दाखवता येणार नाही. खूप दिवस घालमेल झाल्यावर मी मलाच म्हटलं की, तू कशाला दाखवायला पाहिजेस. जे ते करतायत ते ते जगलेले आहेत.
...त्यामुळे मी फिक्शन लिहिणार असेन तर मला हॉरिझन्टली फार वाढता आलं नाही तरी व्हर्टिकली खोल जाता येईल एवढं मी बघते. मी माझ्या पात्रांना प्रतिनिधी करून काही विचार मांडू शकते जे सर्वसमावेशक असतील.
प्रश्न - भरत जाधवला त्याच्या गॅरेजवरची पोरं मारतात तो प्रसंग विचार करायला लावणारा आहे. त्यामध्ये भरत जाधव आणि त्याची आजी म्हणजे माई यांची रिअॅक्शन माझ्या फार लक्षात राहिली.
- अरे बापरे! मला आठवतच नाहीयत गं त्यांच्या रिअॅक्शन्स...
प्रश्न - दोन प्रसंग आहेत. अण्णांना कळतं की, भरतला गॅरेजमधल्या पोरांनी मारलंय, ते त्याच्याशी बोलायला येतात.
अण्णा -अरेऽ पण तू मार का खाल्लास? तू बचावासाठी का उलटून मारलं नाहीस?
नंदू (भरत जाधव) -अहोऽ कारण ते माझे मित्र आहेत नाऽऽ
आण्णा -अरेऽ पण ते तुला मारत होतेच की.
नंदू -तेव्हा त्यांचा काहीतरी गैरसमज झालेला आणि मी त्यांना त्यांचा मित्र वाटत नव्हतो.
अण्णा -हा मग तूपण मारायचस नाऽऽ
नंदू -असं कसं? मला माहिती होतं नाऽ की, ते माझे मित्र आहेत.
अशा अर्थाचा तो संवाद आहे.
नंतर मग गॅरेजमधले दोघं जण नंदूला सॉरी म्हणायला येतात... तेव्हा कलिका आणि अलका त्यांना खूप बोलायला लागतात. पाऊस पडत असतो. माई तिथे येते. त्या मुलांना बसायला सांगते. चहा वगैरे विचारते. यावरून त्या दोघी मुली माईवर चिडतात... तेव्हा माई त्यांना समजावते की, ‘तुम्हाला सगळं कसं सहजासहजी मिळालेलं आहे. ती मुलं कुठल्या वातावरणात राहतात. आपण त्यांना कसं समजून घेतलं पाहिजे, सामावून घेतलं पाहिजे. तुम्ही क्षमा करायला शिका. तुम्ही चांगलं वागू शकता हेपण एक प्रिव्हिलेज आहे. अशा अर्थाचे काही संवाद तिथे आहेत. नंदू, अण्णा, माई, कलिका-अलका, गॅरेजवाला पास्कल, त्याच्याकडचा तो पोरगा अशा सर्वांच्या बाजू दाखवणारी ती घटना होती.
- अगंऽ माझ्या वेगळ्याच आठवणी आहेत या सीनच्या. त्या दिवशी आम्ही शूटवर गेलो. त्या सीनला लाइट्सचे पॅटर्नबिटर्न दिलेले. खिडकीची सावली भिंतीवर पडलीय वगैरे. नाहीतर फ्लॅट दिसतं सगळं. एका बाजूनं हा सीन झाला आणि नंतर अचानक खूप पाऊस यायला लागला. माणसं शूटला येऊ शकली नाहीत... पण माई, उपेंद्र आणि तो एक मुलगा असे तिघं आले होते. म्हणलं... काहीतरी तरी शूट करू या... पण त्याची आता मजा अशी झालीय की, एकाच सीनमध्ये एका बाजूला घरावर ऊन आहे आणि दुसऱ्या बाजूनं उपेंद्र येतोय तिथे पाऊस आहे. एकाच वेळी. मला स्वतःला टेक्निकली ते खूप खटकतं आणि त्या नादात मी त्या सीनचा कन्टेन्ट विसरले.
प्रश्न - फक्त तोच सीन असं नाही. उदाहरणार्थ, रसिकाचं पात्र बंडखोर आहे. लतिकाचं लग्न ठरल्यावर रसिका खूप भांडत असते.
- होऽ पण नंतर रसिका म्हणते की, मीच सगळ्यात जास्त पहिल्यापासून लतिकाच्या बाजूनं होते. घरच्या थोड्या पुढारलेल्या बंडखोर अशा व्यक्तीची बरीचशी ताकद मी कशी तुमच्याच बाजूची आहे हे पटवून देण्यात खर्ची पडते हे खरंच आहे. ज्याच्यासाठी उभं राहायचं तीच व्यक्ती आपल्या बाजूची नसते. मग काय करणार?
13 माणसांचे 13 ॲटिट्यूड यावेत असं मला वाटत होतं आणि नुसतीच काहीतरी कथा चालू आहे असं नाही. त्या पात्रांना त्यांचा-त्यांचा विचार पाहिजे. खरं सांगू का तुलाऽ मी काही फेमिनिस्ट वगैरे नाही. मी एकूणच कुणीही कुणाचंही शोषण करण्याच्या विरोधात आहे... त्यामुळे फक्त लतिकाच्या सासरचे तिच्या माहेरच्यांचं शोषण करतायत एवढं दाखवून मी थांबले नाही. सुनील बर्वेचा बॉस त्याचं शोषण करतोय. रसिकाचे नाटकवाले तिला काढून टाकतात, भरतला त्याचे गॅरेजवाले मारतात. असं अनेक प्रकारांचं शोषण आपल्या आजूबाजूला सुरू असतं.
आणखी एक माझं लाडकं म्हणणं आहे की, गोष्टी बोलल्यानं सुटतात... पण लोक बोलायला जात नाहीत किंवा त्यांना काय बोलायचं ते कळत नाही हा प्रॉब्लेम आहे. प्रपंचमध्ये खूप मोठे-मोठे सीन आहेत... खूप संवाद, खूप बडबड आहे. प्रपंचमधली पात्रं एकमेकांशी बोलत असतील तरी मला त्यांच्या माध्यमातून सगळ्या जगाला सांगायचं होतं की, बोला, चर्चा करा. त्यानं प्रश्न सुटतात.
घरची मुलं आईवडलांशी खोटं बोलून बाहेर नाटकात काम किंवा इतर गोष्टी का करतात? मुलांनी खरं सांगावं असं वातावरण आपण त्यांना घरात देऊ शकत नाही का यावर पालकांनी विचार करायला पाहिजे. मी लहानपणी डान्स शिकत होते. त्यात मला माझ्या आईनं खूप सपोर्ट केला. 1972मध्ये वगैरे 150 रुपये फी म्हणजे जास्त होती... पण माझी आईसुद्धा नोकरी करणारी होती त्या काळी... त्यामुळे ती म्हणाली, ‘जा तू. आम्ही देऊ फी.’ वेगळी वाट निवडताना कुणीतरी सपोर्ट करणारं लागतं.
कुटुंबामध्ये संवाद पाहिजे असं मला म्हणायचं होतं. आता मला हेही समजतं की, इतके प्रगल्भ नसतात लोक. तोसुद्धा प्रिव्हिलेजचा एक भाग आहे.
प्रश्न - आपण सगळे नकळत एकमेकांच्या आयुष्यात व्हिलन होत जातो कधीकधी. न ठरवता. प्रपंचमधला व्हिलन तसाच आहे. सगळेच कधी ना कधी कुणा ना कुणाच्या आयुष्यातल्या दुःखाला कारणीभूत ठरलेले आहेत.
- प्रपंच मी केलं नसतं तर मी वडलांच्या नजरेत स्वतःला सिद्ध करू शकले नसते. हे बघ त्या त्या वयात आपण कॅरीड अवे होतच असतो. कॉलेज संपलं की बॅग घरी टाकायची आणि छबिलदासला नाटकाच्या तालमींना जायचं. तीन मिनटांच्या रोलसाठी तीन महिने तालमी करायच्या. आता जेव्हा मुलंमुली म्हणतात की, मी नाटकाशिवाय जगू शकत नाही... तेव्हा मला ते पटत नाही. जगणं महत्त्वाचं आहे नाऽ पण हे मी आज म्हणते. तेव्हा मी अशीच होते आणि माझ्या वडलांना ते आवडायचं नाही.
...तर आपण एकमेकांच्या आयुष्यात व्हिलन होतच असतो. हितासाठी भांडतानासुद्धा आपण व्हिलन ठरू शकतो.
प्रश्न - अलकाच्या तोंडचं एक वाक्य आहे. ती कलिकाला म्हणते की, मला आत्ताच तुझ्यापेक्षा कितीतरी जास्त कळतंय... आणि आई जे म्हणते की, मोठी झालीस की कळेल त्याचा अर्थ मला हळूहळू कळायला लागलाय.
- बरोबर. खरंतर लिहिताना मी एवढा विचार करत नव्हते. ते आपसूक येत गेलं. आता पटकथा, संवाद, संकल्पना असे दैनंदिन मालिकेच्या लेखनाचे स्वतंत्र भाग झाले आहेत. तेव्हा ते नव्हते. गुढीपाडवा आला तेव्हा चॅनेलनं मला सांगितलं की, गुढीपाडवा दाखव. मग मी म्हटलं की, मी असा उगाच गोड गोड गुढीपाडवा दाखवणार नाही.
मला हे सण साजरे करायला फार आवडत नाहीत... कारण आपण नेमकं काय साजरं करतोय तेच मला कळत नाही. आता जे लोक नेहमी नोकरी करतात ते सणाच्या निमित्तानं एकमेकांना भेटतात, नटतात, गोडधोड खातात. त्या निमित्तानं एक बदल... पण मला वाटतं की, याची निमित्तं काळाबरोबर बदलायला हवी होती. तर मला कळेना की, गुढीपाडवा कसा दाखवावा. मग सुनीलच्या ऑफिसमध्ये अफरातफरी चाललेली असते. त्याचा त्याला फोन येतो. तो फक्त भरतला हे सांगून निघतो. तो जातो त्या दिशेला भरत बराच वेळ बघत उभा आहे आणि तो गुढीखाली उभा आहे... म्हणजे मला असं म्हणायचं होतं की, राम आला वगैरे त्याला आता युगं लोटली. वेगळेच प्रश्न घेऊन मुलं जगतायत आणि तुम्ही रामासाठी गुढ्यातोरणं कसली उभी करताय?
प्रश्न - खरं आहे. याच अफरातफरीमध्ये भरत आणि सुनील बर्वे यांचा एक सीन आहे.
- होऽ तो माझा आवडता सीन आहे. सुनील भरतला म्हणतो की, ‘मी अफरातफर केली तर कुणाला कळणारपण नाही.’
...तेव्हा भरत अत्यंत निरागसपणे म्हणतो की, ‘पण तुला स्वतःला कळेल नाऽ’
‘आपण आपल्यासाठी चांगल वागायचं असतं.’ हे तत्त्वज्ञान एकदम सोप्पं करून भरत सांगतो.
मला नेहमी वाटतं की, आपल्यामध्ये हे चांगलं वागण्याचं सॉफ्टवेअर मुळातच असतं. आपण तो आतला आवाज ऐकणं हळूहळू बंद करतो. मला आठवतंय की, माझ्या लहानपणी रस्त्यावर मोठ्या ब्रँडच्या स्मगल केलेल्या वस्तू स्वस्तात विकायला असायच्या. ‘सगळे घेतात मग आपण घेतलं तर काय होतं?’ असं साधारण म्हणणं असायचं. ‘सगळे घेतात’ हा मुद्दाच नाहीय. मी योग्य ते करायचं ठरवलं असेल तर मी नाही घेणार ती स्मगल केलेली वस्तू. बहुमत हे योग्य मत असेलच असं नाही. जे चूक आहे ते चूकच आहे. हाच विचार मला वाटतं अगदी मोदींपर्यंत लागू करता येईल. बहुसंख्याकांना पटते म्हणून ती विचारसरणी मला पटेलच असं नाही. जग काय म्हणतं हा निकषच असता कामा नये.
प्रश्न - प्रपंचमध्ये मोठी वैचारिक उलाढाल फार सोपी करून सांगितली आहे. सोपं लिहिण्याविषयी काय सांगाल?
- अवघड गोष्ट सोप्या पद्धतीनंच सांगितली पाहिजे असं माझं ठाम मत आहे. आता मी तुला प्रामाणिकपणे सांगते की, आता मी स्वतःला बुद्धिमान समजते... पण आपण बुद्धिवान आहोत हे कळायला मला अनेक वर्षं लागली... कारण शैक्षणिक काळात वर्गात काय चाललंय हे मला कळायचंच नाही. मी त्याच्याशी रिलेटचं करू शकायचे नाही... पण आम्हाला शेक्सपिअर शिकवणारे प्रोफेसर नेहमी माझं मत घ्यायचे. धोंडो विठ्ठल देशपांडे आणि ज्येष्ठ चित्रकार दत्ता गोडसे यांच्यासारख्या मोठ्या विद्वान अशा लोकांनी वेगवेगळ्या टप्प्यांवर माझ्यावर विश्वास दाखवला. धोंडो विठ्ठल देशपांडे तर म्हणायचे की, विजयाबाईंना एक बुद्धिमान गाढव मिळालेलं आहे... ज्या गाढवाला माहितीच नाही की, आपण बुद्धिमान आहोत.
...त्यामुळे मला वाटतं की, मी शब्दांना बिचकते. मोठेमोठे अवघड शब्द, लांबलचक वाक्यं, क्लिष्ट शब्दरचना. हुशार लोकांनी अवघड बोलायचं अशी एक आपल्याकडे पद्धत आहे. तो एक स्टान्स, तो एक आव असतो. मी हुशार आहे असा, त्याचा मला प्रचंड तिटकारा आहे. मला प्रामाणिकपणे असं वाटतं की, एखादी संकल्पना तुम्हाला मुळापासून समजली असेल तर ती तुम्हाला सोप्या भाषेत सांगता आलीच पाहिजे.
दिग्दर्शनाच्या बाबतीतही मला असं वाटतं की, मला सोप्या भाषेत नटाला सांगता यायला हवं की, मला काय हवंय... आणि म्हणूनच मला अनेक जण असं म्हणतात की, हे नटनटी तुमच्याकडे काम करताना वेगळे वाटतात.
प्रश्न - प्रपंचसाठी मिळालेल्या प्रतिक्रिया...
- एक मला प्रतिक्रिया आठवते. प्रपंच संपल्यावर अनेक वर्षांनी मी एक नाटक बघायला गेले होते. तिथे मला एक जण भेटले. त्यांनी मला प्रपंचमधला त्यांना आवडलेला एक सीन सांगितला. त्यात लतिका अलकाला म्हणते की, तू जेव्हा लग्न करशील तेव्हा त्या मुलाचं घर, पगार, दिसणं बघू नको. तो आपल्या अण्णांसमोर कसा बसतो, टॅक्सीवाल्याशी कसा वागतो, वेटरशी कसा बोलतो ते बघ. तर लोक भेटून एकेक अख्खा सीन सांगतात तेव्हा छान वाटतं... आणि अगंऽ प्रपंचला संपून आता 20 वर्षं झाली. आज प्रपंच बघून तू आलीस भेटायला हीच केवढी मोठी प्रतिक्रिया आहे.
(मुलाखत आणि शब्दांकन - मृद्गंधा दीक्षित)
'प्रपंच' या मालिकेचे सर्व भाग येथे पाहता येथील
Tags: मुलाखत प्रतिमा कुलकर्णी प्रपंच मालिका मृदगंधा दीक्षित Interview Prapancha Pratima Kulkarni Mrudgandha Dixit Load More Tags
Add Comment