विलास वाघ : समतावादी व परमतसहिष्णू

त्यांचे काम पुढे नेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे

25 मार्च 2021 रोजी विलास वाघ यांचे निधन झाले. त्यांचे वय 83 वर्षे होते. धुळे जिल्ह्यातील ‘मोराणे’ गावातून सुरू झालेला त्यांचा प्रवास कात्रजच्या हॉस्पिटलमध्ये थांबला. त्यांच्या मृत्यूने अनेकांना आपल्या कुटुंबातील व्यक्ती गेल्यानंतर होते तसे  दुःख झाले. आम्हीही आमचा सच्चा ज्येष्ठ मित्र गमावला.

‘सुगावा’ प्रकाशनाच्या पुस्तकांच्या स्टॉलवर साधारण चाळीस वर्षांपूर्वी उषाताईंची आणि वाघ सरांची पहिली भेट झाली. चळवळीतील अनेक कार्यक्रम, विषमता निर्मूलन शिबिर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महापरिनिर्वाणदिन अशा विविध निमित्तांनी आणि साहित्य संमेलनांतून आम्ही भेटत राहिलो.सहज मैत्री झाली. एकमेकांविषयी जिव्हाळा निर्माण झाला.

विलास वाघ म्हटले की आठवतो त्यांचा प्रेमळ, हसरा चेहरा आणि दिलखुलास गप्पा. त्यांच्या सहवासात आलेली व्यक्तीही मग सहज खुलून बोलायला लागते. त्यांच्याकडे समोरच्या माणसाचे ‘ऐकून घेण्याची क्षमता’ मोठी होती. त्यांना माणसांमध्ये रस होता... त्यामुळे प्रत्येकाचे बोलणे ते शांतपणे ऐकत. चेहऱ्यावर त्या बोलण्याला प्रतिसाद असे. अशी खूप माणसे त्यांनी आयुष्यभर जोडली. ‘माणसाने माणसाशी माणसासम वागणे’ याचे ते चालतेबोलते उदाहरण होते. समता, स्वातंत्र्य, न्याय, लोकशाही व परमतसहिष्णूता या मूल्यांची जोपासना त्यांनी आयुष्यभर केली.

सुगावा प्रकाशनाचे  काम करत असतानाच त्यांनी पुणे विद्यापीठातील प्रौढ शिक्षण विभागाची तर उषाताईंनी प्राध्यापकाची नोकरी सोडली. पूर्ण वेळ सामाजिक कार्याला वाहून घेतले. ते नेहमी समाजातील वंचित आणि उपेक्षित समूहांचा विचार करत. समाजातील तळातल्या माणसाच्या भोवती त्यांचे काम उभे राहिले. देवदासी आणि वेश्या असलेल्या स्त्रियांच्या मुलामुलींना शाळेत घालणे, वसतिगृहात ठेवणे या कामातून पुण्यात त्यांनी समाजकार्याला सुरुवात केली. त्यातूनच पुढे समता शिक्षण संस्था संचालित विविध शाळा, वसतिगृह, समाजकार्य महाविद्यालय उभे राहिले.

‘सुगावा प्रकाशन’ ही निवळ प्रकाशन संस्था नाही... तर परिवर्तनवादी चळवळीचे केंद्र बनले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विचार व त्यांचे कार्य समाजाच्या सर्व स्तरांमध्ये पोहोचवण्याचे काम या प्रकाशनाने केले आहे. त्याचबरोबर परिवर्तनवादी चळवळींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवरची शेकडो पुस्तके त्यांनी प्रकाशित केली. ‘सुगावा’ हे मासिक त्यांनी अनेक वर्षे जाहिरातीविना चालवले. त्यात महाराष्ट्रातील अनेक कार्यकर्त्यांना लिहायला लावले. त्यांचे काम केवळ पुस्तके प्रकाशित करण्यापर्यंतच सीमित नव्हते. ही पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वाघ सर आणि उषाताई महाराष्ट्रभर फिरत. चळवळीतील विविध कार्यक्रमांत ‘सुगावा’च्या पुस्तकांचा स्टॉल लागलेला असे. कार्यकर्त्यांना भेटण्याचे ते हक्काचे ठिकाण होते. या दाम्पत्याने फार निष्ठेने, आत्मीयतेने पुस्तके घरोघरी पोहोचवली.

Narak - Safaechi Goshtaसाथी महमद खडस आणि अरुण ठाकूर यांनी महाराष्ट्रातील सफाई कामगारांच्या जीवनाविषयी समता आंदोलनाच्या वतीने पाहणी केली. त्यातून दोघांनी ‘नरक-सफाईची गोष्ट’ हे पुस्तक लिहिले. पुस्तकाची पहिली आवृत्ती 1989मध्ये मॅजेस्टीक प्रकाशनाने प्रकाशित केली. दुसरी आवृत्ती 5 नोव्हेंबर 2007 रोजी सुगावा प्रकाशनाकडून आली. या प्रकाशनाचा अतिशय नेटका कार्यक्रम आम्ही सरांच्याच मदतीने पुण्यात केला. अशा अनेक महत्त्वाच्या पण दुर्लक्षित विषयांवरील पुस्तके सुगावाने निष्ठेने प्रकाशित केली आहेत.

विलास वाघ हे प्रखर आंबेडकरवादी होते. बाबासाहेबांच्या विचारांसाठी व त्या विचारांच्या प्रसारासाठी त्यांनी आयुष्य वेचले, पण  प्रस्थापित दलित पक्षाच्या राजकारणात ते सहभागी झाले नाहीत. आंबेडकरी म्हणवणाऱ्या या पक्षाकडून डॉ. बाबासाहेबांचे जातिनिर्मूलनाचे ध्येय पूर्ण होणार नाही याची त्यांना खातरी होती. काँग्रेस ते भाजप या प्रस्थापित पक्षांच्या दावणीला बांधल्या गेलेल्या पुढाऱ्यांपासून त्यांनी सतत अंतर राखले. आपला प्रकाशनाचा व्यवसाय आणि सामाजिक कार्य वैचारिक निष्ठेने व नैतिकतेने केले. प्रज्ञा, शील, करुणा हाच त्यांच्या कामाचा आधार होता.

लोकशाही समाजवादी चळवळीशी आणि राष्ट्र सेवा दलाशी ते तरुण वयापासून जोडले गेलेले होते. डॉ.  बाबासाहेब आंबेडकरांचा राजकीय विचार ‘लोकशाही समाजवाद’ हा आहे याची जाणीव त्यांना होती. 1993मध्ये लोकशाही समाजवादावर आधारित राजकीय पक्ष निर्माण करण्यासाठी युक्रांद, समता आंदोलन, रचनात्मक संघर्ष समिती इत्यादी संघटनांनी ‘सोशालिस्ट फ्रंट’ ही आघाडी स्थापन केली. साथी भाई वैद्य आणि पन्नालाल सुराणा हे जनता दलातून आलेले ज्येष्ठ साथी सोबत होते. या प्रक्रियेत वाघ सर आणि उषाताई सहजतेने सहभागी झाले. खरेतर दोघेही पूर्वी कुठल्याही समाजवादी संघटनेत नव्हते. तरीही त्यांनी सगळ्यांशी जुळवून घेतले. पक्षस्थापनेच्या चर्चेत उत्साहाने सहभागी झाले.

30 डिसेंबर 1994 रोजी ठाणे इथे आम्ही समाजवादी जन परिषदेची स्थापना केली. महाराष्ट्राच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी आमच्या सगळ्यांच्या आग्रहाखातर घेतली. यशस्वीपणे पार पाडली. समाजवादी जन परिषदेत त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. संघटना पक्षांमध्ये कधी मतभेदाचे प्रसंग येतात. तसे समाजवादी जन परिषदेतही येत. अशा वेळी त्यांची भूमिका मतभेद असणाऱ्यांमध्ये समन्वय घडवून आणण्याची असे. ते नेहमी त्यांच्या सदसद्विवेक बुद्धीला पटेल त्या बाजूने उभे राहत असत. खरेतर त्यांचा पिंड राजकीय पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पेलण्याचा नव्हता... तरीही त्यांनी त्यांच्या अध्यक्षीय कार्यकाळात पक्षाला क्रियाशील ठेवण्याचा प्रयत्न केला. या काळात पक्षाच्या देशभरातील कार्यक्रमांमध्ये, आंदोलनांमध्ये उषाताई आणि विलास वाघ सहभागी झाले. आम्ही अनेक वेळा एकत्र प्रवास केला. त्या वेळी झालेल्या गप्पा कायम स्मरणात राहतील. ते अतिशय मिश्कीलपणे एखाद्या विषयावर टिप्पणी करत. देशातील कार्यकर्त्यांशी त्यांचा स्नेह जुळला. पुढे जबाबदाऱ्यांमुळे त्यांनी पक्षात पद घेतले नाही... परंतु जमेल तिथे सहभाग दिला. अन्य राज्यांमधील कार्यकर्त्यांशी संवाद कायम ठेवला. त्यांच्या भेटीने नेहमीच सगळ्यांना आनंद दिला.

2009मध्ये महाराष्ट्रातील काँग्रेस, भाजप, शिवसेना यांव्यतिरिक्त डाव्या, लोकशाहीवादी पक्षांनी ‘रिपब्लिकन डावी लोकशाही समिती’ स्थापन केली. ‘रिडालोस’च्या वतीने महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढवली. समाजवादी जनपरिषद ‘रिडालोस’चा घटक पक्ष होता. संगमनेर विधानसभा मतदार संघातून समाजवादी जनपरिषदेची उमेदवार म्हणून मला संधी मिळाली. निवडणुकीला उभे राहण्याच्या माझ्या निर्णयाचे त्यांना कौतुक वाटले. उषाताईंसह ते जबाबदारीने निवडणूक प्रचारासाठी आले. निवडणूक निधी म्हणून पाच हजार रुपये दिले. सभांमध्ये भाषणे केली.

जातिप्रथेचे विध्वंसनत्यांच्या कामातील सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे ‘परिवर्तनवादी मिश्र विवाहसंस्था’. संस्थेने अनेक आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहितांना आधार दिला. त्यांनी आयुष्यभर जाती निर्मूलनाचे स्वप्न पाहिले. ‘ॲनिहिलेशन ऑफ कास्ट’ या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या निबंधाचे भाषांतर सुगावाने ‘जातिप्रथेचे विध्वंसन’ या नावाने मराठीत प्रकाशित केले. आजच्या काळात जातिनिर्मूलनाऐवजी जातीच्या आधारावर संघटित होण्याकडे कल वाढलेला आहे. जाती-जातींमधील द्वेष वाढवण्याचे षड्‌यंत्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणीत संघटनांनी उभे केले आहे... त्यामुळे जाती निर्मूलनाचा कार्यक्रम मागे पडला आहे. जातीबाहेर व धर्माबाहेर लग्न केले म्हणून तरुण-तरुणींच्या हत्या होत आहेत. शाहू, फुले, आंबेडकर यांचा गौरव करणाऱ्या महाराष्ट्रातही अशा हत्या घडतात. तेव्हा जाती निर्मूलनाचे काम किती बिकट झाले आहे याची तीव्र जाणीव होते.

उत्तरप्रदेश, हरियाणा, उत्तराखंड, मध्यप्रदेश, कर्नाटक आदी राज्यांमध्ये ‘लव्ह जिहाद’च्या नावाने हिंदू-मुस्लीम समूहांमध्ये द्वेष पसरवला जात आहे. याच राज्यांमधील भाजपच्या सरकारांनी ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदे सन 2020मध्ये संमत केले. व्यक्तीच्या संविधानात्मक अधिकारांवर हा मोठाच आघात आहे. विवाहाचा जोडीदार निवडण्याचा अधिकार प्रौढ स्त्री-पुरुषांना संविधानाने दिला आहे. तो ‘स्टेट’कडून हिरावला जातो आहे. भिन्नधर्मीय व्यक्तींवर प्रेम करणाऱ्या, विवाह करू इच्छिणाऱ्या तरुण-तरुणींमध्ये दहशत पसरवली जात आहे. विलास वाघ आणि उषाताईंनी परिवर्तनवादी मिश्र विवाह संस्थेमार्फत असे अनेक आंतरधर्मीय विवाह लावण्यात पुढाकार घेतला. प्रसंगी अशा दाम्पत्यांच्या पालकांकडून त्रासही सहन केला. या तरुण जोडप्यांचे संसार उभे करण्यात मदत केली. त्यांच्यावर माया केली. त्यांना आधार दिला. आज या कामाची गरज वाढलेली आहे. विलास वाघ यांना आदरांजली वाहत असताना... हे काम पुढे नेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे याची खूणगाठ मनाशी बांधायला हवी. 

विलास वाघ यांच्या मृत्यूनंतर सोशल मिडियावर विविध जातिधर्मांच्या परिवर्तनवादी विचारांच्या आणि निरनिराळ्या वयोगटांतील व्यक्तींनी त्यांच्याविषयी लिहिले. सगळ्यांनाच आपल्या परिवारातील ज्येष्ठ व्यक्ती गेल्याचे दुःख झाले. ते माझे आणि शिवाजी गायकवाडांचे मित्र होते. आमचा मुलगा नदीम याच्याशीही त्यांचा स्नेह जुळला होता. नदीम पुण्यात कृषी महाविद्यालयात शिकत असताना सुगावाच्या पुस्तकांच्या दुकानात नेहमीच जायचा. सरांना त्याच्या वाचनाच्या आवडीचे कौतुक होते. सरांच्या मृत्यूनंतर नदीमने त्याच्या फेसबुकच्या भिंतीवर लिहिले...

‘आज वाघ सर गेले. त्यांच्या सामाजिक कार्यासोबतच मला ते कायम आठवतील त्यांच्या प्रेमळ स्वभावासाठी आणि आजूबाजूच्या लोकांबद्दल असलेल्या जेन्युइन इंटरेस्टसाठी. कॉलेजला असताना एकदा साहित्य संमेलनामध्ये सुगावाच्या स्टॉलवर गेलो तेव्हा सर भेटले. आईबाबांचे ते सुहृद असल्यामुळे ओळख होतीच. त्यांनी लगेचच माझा ताबा घेतला. मी त्यांना मदत करायला थांबलो. तिथे असलेल्या प्रत्येकाला वेळच्या वेळी खाणे, चहा, पाणी मिळते की नाही याची आईच्या मायेने सर आणि उषाताई काळजी घेत होते. नंतर त्याच वर्षी मी त्यांच्यासोबत पुस्तके विकण्यासाठी नागपूरला गेलो... सहा डिसेंबरला. तिथे पुस्तके घेणारे लोक पाहून मला सर आणि उषाताई केवढे काम करत याची समज आली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत लोक पुस्तके खरेदी करतात आणि ती वाचतात. हे माझ्यासाठी फार मोठे शिक्षण होते....’

त्यांच्याविषयी अशीच भावना अनेकांच्या मनामध्ये आहे... त्यामुळेच सर्वांना त्यांच्या मृत्यूने धक्का बसला. दुःख झाले. ते बौद्ध धर्माचे पाईक होते. बुद्ध विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या कामातून केला. बुद्धाची करुणा हीच त्यांची जीवनदृष्टी होती. आम्हाला त्यांनी बुद्ध मूर्ती भेट दिली आहे. खरेतर ते ‘ढाई अक्षर प्रेम के’ म्हणणाऱ्या संत कबिरांच्या आणि ‘खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे’ हा मंत्र देणाऱ्या साने गुरुजींच्या विचारांचा धागा घेऊन आयुष्यभर कार्यरत राहिले. शाहीर वामनदादा कर्डक यांनी तथागत गौतम बुद्धांवर रचलेल्या एका काव्यात म्हटले आहे ‘ज्याने प्रेमाने जिंकले जगा, वीर असा गौतम आहे.’ विलास वाघ याच मार्गाने प्रेमाचा विचार समाजात रुजवत होते. त्यांना आदरांजली वाहताना त्यांचा हा वारसा आपण पुढे नेऊ यात.

- अ‍ॅड. निशा शिवूरकर
advnishashiurkar@gmail.com

Tags: लेख अ‍ॅड. निशा शिवूरकर विलास वाघ सुगावा प्रकाशन चळवळ Nisha Shivurkar Vilas Wagh Sugava Prakashan Load More Tags

Comments:

तारा नागोराव जाधव

अलिकडच्या दहा वर्षांपासून साहित्य संमेलनाला हजेरी लावली नाही. त्यापूर्वी चे प्रत्येक अ.भा.सा.सं.ला हजेरी लावत असे खूप खूप आनंद होत असे, त्यातल्या त्यात उषाताई आणि विलास वाघ सर यांची भेट होणार याचा आनंद ही तितकाच महत्त्वाचा आहेे . त्यांच्या सहवासात राहण्याची संधी मिळाली आहे. हे परमभाग्यच म्हणावे लागेल. उषाताई आणि सहकारी दुःखातून सावरले जातील अशी प्रार्थना करते.

संजय मेश्राम

वाघ सरांना अगदी समर्पक शब्दांत वाहिलेली आदरांजली. त्यांचे कार्य नवीन पिढीला नक्कीच मार्गदर्शक ठरेल.

Pramod Wagdarikar

अतिशय समर्पक विलास वाघ सरांवर हा लेख आहे. वैचारिक , सामाजिक बांधिलकी जपणारा , अत्यंत साधेपणा व निगर्वी हे व्यक्तिमत्त्व.

Add Comment