निळू फुले आणि श्रीराम लागू हे महाराष्ट्राने भारतीय नाट्य-चित्र सृष्टीला दिलेले दोन अतुलनीय कलावंत. दोघेही श्रेष्ठ दर्जाचे अभिनेते तसेच अत्यंत संवेदनशील, विचारी मनाचे आणि झुंजार वृत्तीचे मित्रही. पुरोगामी चळवळीचे हे दोघेही खंबीर पाठीराखे होते. डॉ नरेंद्र दाभोलकर यांचे त्या दोघांशीही घनिष्ठ नाते होते, अर्थातच सामाजिक चळवळीच्या निमित्ताने ! अशा पार्श्वभूमीवर, 1 मे 1998 रोजी डॉ दाभोलकर साधना साप्ताहिकाचे संपादक झाले, तेव्हा साधनाच्या पहिल्याच दिवाळी अंकात त्यांनी डॉ लागू यांच्यावर दोन लेख प्रसिद्ध केले होते. एक वि. वा. शिरवाडकर यांचा आणि दुसरा निळू फुले यांचा. तर त्या अंकात निळूभाऊंनी आपल्या थोरल्या मित्राचे जे लहानसे शब्दचित्र रेखाटले, ते हेच....!
डॉ. श्रीराम लागूंना रंगमंचावर मी पहिल्यांदा पाहिले, ते ‘वेड्याचं घर उन्हात’ ह्या कानेटकरांच्या नाटकात. आमच्या सेवादलाच्या कलापथकाचा ग्रुप होता. चांगले चित्रपट, मृणाल सेन, ऋत्विक घटक, सत्यजित रे, तपनदा, डीसीका इंगमार बर्गमन यांचे अभिजात बंगाली, इंग्रजी चित्रपट आम्ही त्या वेळी आवर्जून बघत होतो. सेवादलातल्या आमीर शेख ह्या मित्राने आम्हा सर्व मंडळींना असले चित्रपट बघण्याची दृष्टी दिली होती. आणि मग मराठी नाटके, चित्रपट ह्यांची तुलना साहजिकच आम्ही पाहिलेल्या चित्रपटांशी व्हायची. काही अपवाद सोडले तर मराठी नाटक आणि चित्रपट, खूप बटबटीत वाटायचे. अभिनयाचा दर्जाही सुमार वाटायचा. अशा त्या काळात डॉक्टरांचे ‘वेड्याचं घर उन्हात’ मधले दादासाहेबांचे काम पाहिले आणि थरारून गेलो. आमच्या सगळ्या ग्रुपने मनापासून त्यांच्या अभिनयाला आणि त्या नाटकालाही दाद दिली. आम्ही सगळेच डॉक्टरांचे पंखे झालो. उध्वस्त धर्मशाळा, हिमालयाची सावली, नटसम्राट ह्या नाटकांतील डॉक्टरांच्या अभिनयावर आम्ही सारेच एकदम लट्टू होऊन गेलो होतो.
नंतर कधीतरी कानांवर आले की, डॉक्टर कधीकधी पंतगोटाच्या राष्ट्रसेवादल शाखेवर जात असत. झाले! आम्ही सारे कलापथकवाले अगदी त्यांचे भक्त झालो.
पुढे चित्रपटाच्या निमित्ताने संबंध आला. डॉक्टर तसे गर्दीत राहणारे गृहस्थ नव्हते. फारच मोजक्या मित्रमंडळीत रमणारे होते. शक्यतो माणसे लांब कशी राहतील; फार जवळ येणार नाहीत ह्याची पूर्ण जबाबदारी घेणारे. कामाव्यतिरिक्त सारा वेळ त्यांचा वाचनातच जातो. प्रवासात असो, शूटिंगच्या फावल्या वेळात असो, डॉक्टर आपले एक निवांत कोपरा पकडून वाचत बसलेले दिसायचे. ‘पिंजरा’च्या शूटिंगमध्ये शांतारामबापू एकदा म्हणालेसुद्धा, "अरे, हा आमचा हिरो फारच अबोल आहे बाबा!" पण त्यांचे डॉक्टरांवर खूप प्रेम होते. खरं तर शांतारामबापूंच्या सेटवर कांदा-लसूण वर्ज्य असायचे, सिगरेट तर मुळीच नाही. पण डॉक्टर असे एकुलते कलाकार की, अण्णाच त्यांना म्हणाले, " बघा डॉक्टर, मी काहीच व्यसन न करणारा माणूस आहे. पण तुम्ही जर सिगरेट पिणार असाल तर खुशाल प्या!" आणि त्यांनी सेटच्या बाहेर डॉक्टरांकरिता खास व्यवस्था करून दिली. अण्णा खरं म्हणजे डॉक्टरांच्या प्रेमातच पडले होते. इतर नटांना अण्णा अभिनय करून दाखवायचे, संवाद शिकवायचे. पण डॉक्टर अपवाद. फक्त सीन त्यांच्या हातात यायचे, फार चर्चासुद्धा नाही. ‘नटसम्राट’मधले डॉक्टरांचे काम बघून अण्णा फार प्रभावित झाले होते.
डॉक्टरांचा सर्वात मोठा गुण म्हणजे वक्तशीरपणा. सामाजिक कृतज्ञता निधीकरिता आम्ही 70 ते 80 नाट्यप्रयोग केले. महाराष्ट्रात केले, कॅनडा-अमेरिकेत केले. पण हे सारे प्रयोग इतके सुरळीतपणे पार पडले त्याला कारण डॉक्टरांची शिस्त. प्रवासात एका ठिकाणाहून दुसरीकडे निघायची जी काही ठरलेले वेळ असेल, त्या वेळेअगोदर पाच मिनिटे डॉक्टर आपल्या सामानासह गाडीत आपल्या जागी वाचत बसलेले दिसायचे. आपले सामान कोणी दुसऱ्यांनी उचललेले त्यांना आवडायचे नाही. त्याचा परिणाम असा व्हायचा की, चित्रपटांत वा नाटकांत लाडावलेल्या आम्हा सर्व हिरो-हिरॉईन्सनाही स्वतःचे सामान स्वतः उचलावे लागायचे.
तनुजा ही पत्त्यांचे प्रचंड वेड असलेली कलाकार. नाटकाच्या प्रयोगातही तिचे पत्ते खेळणे चालूच असायचे. डॉक्टरांना ते आवडत नसे. त्यामुळे अनेक वेळा त्यांनी नापसंतीही दाखवलेली. पण ती दाद देत नसे. मग डॉक्टरांनी एकदा तिला सांगितले, " नाटकातील माझ्या प्रवेशावेेेळी तू जर विंगेमध्ये दिसली नाहीस तर मी एंट्री घेणार नाही." त्यानंतर खूप चरफडत, पण निमुटपणे तनुजा प्रवेशांआधी विंगेमध्ये हजर असायची. बोटे मोडत, हात-पाय आपटत उभी असायची. डॉक्टरांचा दरारा असा होता.
कलकत्त्यात नाटकाचा प्रयोग करताना बंगाली रसिकांचे डॉ. श्रीराम लागू या कलाकारावर किती प्रेम आहे ते समजले. बंगाली तरुण रंगकर्मीं भक्तिभावाने डॉक्टरांच्या पायावर डोके ठेवत होते, ते मी पाहिले. अशा वेळी आपलाही ऊर अभिमानाने भरून येतो. डॉक्टरांचे शब्दोच्चार, आवाज व संवादाची लय ऐकल्यावर शंभू मित्रा हा ज्येष्ठ रंगकर्मी म्हणाला होता, "काय खणखणीत उच्चार आहेत. डोळे मिटून शब्द नुसते ऐकत राहावे असे वाटते." अशा वेळी आपणही मोहरून जातो.
-निळू फुले
(साप्ताहिक साधना, दिवाळी अंक 1998)
हे ही वाचा:
निळू फुले: अभिजात कलावंत, लोभस व्यक्तिमत्व - डॉ. श्रीराम लागू
Add Comment