कोरोनाचे संक्रमण आणि लॉकडाऊन यांमुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी शिक्षण आणि अध्यापन या क्षेत्रांना नवतंत्रज्ञानाचा आधार घ्यावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर मराठी भाषेचे प्राध्यापक, विद्यार्थी आणि नवतंत्रज्ञान यांविषयीची मांडणी करणारा निबंध पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालय, पुणे यांनी आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये सादर करण्यात आला होता. सदर निबंध लेखाच्या स्वरुपात प्रकाशित करत आहोत. - संपादक
डॉ. सुधाकर शेलार यांनी दहा बारा वर्षांपूर्वी त्यांच्या अहमदनगर महाविद्यालयात ‘मराठीचे अभ्यासक्रम’ या विषयावरील महाचर्चा आयोजित केली होती. प्रकाशक, विद्यापीठांचे मराठी विभाग प्रमुख, अभ्यास मंडळांचे अध्यक्ष त्या चर्चेत सहभागी झाले होते. त्यावेळी डॉ. अविनाश अवलगावकर हे पुणे विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख होते. कोल्हापूरला डॉ. कृष्णा किरवले होते, औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात डॉ. प्रल्हाद लुलेकर होते, जळगावचे डॉ. म. सु. पगारे, कोल्हापूरचे डॉ. डी. ए. देसाई, पुण्याचे प्रकाशक अरुण जाखडे असे अभ्यासक, प्राध्यापक, प्रकाशक तिथे एकत्र आले होते. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा मराठी विभागप्रमुख म्हणून मीही सहभागी झालो होतो. भाषांतर, भाषेचे प्रत्यक्ष उपयोजन, संस्कृती अभ्यास, महाराष्ट्राबाहेरील मराठीचा अभ्यास, संगणकावरील मराठी असे काही मुद्दे मी तिथे मांडले होते. त्या चर्चेचं पुढं काय झालं? हे माहित नाही.
मात्र मला त्या चर्चेतील एक वाक्य चांगले स्मरणात राहिले, ते असे होते की, ‘ज्याला उत्तम मराठी लिहिता बोलता येते तो एम. ए. मराठी झालेला असावाच असे काही नाही. पण जर तुम्ही एम. ए. मराठी झालेला असाल, तर मात्र तुम्हाला उत्तम मराठी लिहिता वाचता बोलता आली पाहिजे.’
मास्टर्स डिग्री घेतल्यानंतर ही अपेक्षा करणे गैर आहे काय? आता आपण इथे असणारे प्राध्यापक, शिक्षक स्वत:पुरता विचार करू की खरेच असे होतेय का? आपल्या विद्यार्थ्यांना, जे पदवी आणि पदव्युत्तर स्तरावर शिकत आहेत किंवा शिकून बाहेर पडले आहेत त्यांना उत्तम मराठी येते, असे आपण ठामपणे म्हणू शकतो का?
अशावेळी आपण इतरांकडे बोट दाखवण्याची, इतरांना जबाबदार ठरवण्याची शक्यता जास्त आहे. अभ्यास मंडळ, कॉलेज प्रशासन, शासकीय धोरणे, विद्यार्थ्यांचा अनुत्साह अशी कितीतरी कारणे दिली जातील. पण कारणांमुळे प्रश्न सुटणार आहेत काय?
काही दिवसांपूर्वी औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील डॉ. कैलास अंभुरे यांनी ‘कॅम्पस क्लब’ या फेसबुक पेजवर एक व्याख्यान दिले, त्यात त्यांनी एक निरीक्षण नोंदवले आहे की लाखावर खप असणारी दहापेक्षा अधिक मराठी वर्तमानपत्रे औरंगाबाद शहरातून प्रकाशित होत आहेत. त्यांना मुद्रितशोधकांची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असते. त्या शहरात किमान पाच-सहा महाविद्यालयात एम. ए. मराठीचे अध्यापन केले जाते, मात्र वास्तव असे आहे की ज्या शहरात दरवर्षी एम. ए. मराठीचे चारशे विद्यार्थी तयार होतात, त्यातील चौघांनासुद्धा मुद्रितशोधन करता येत नाही. हे चित्र सार्वत्रिक आहे आणि हे दु:खद आहे. हा दोष कुणाचा?
एक शिक्षक म्हणून मी खरोखर विचारात पडलो आहे, आमच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे भविष्य काय आहे? असा प्रश्न मला सतत पडतो. आमची काही हुशार मुले अभ्यास करतात, सगळ्या परीक्षा पास होतात आणि ती प्राध्यापक होण्याच्या आशेने दारोदार भटकत आहेत. आमच्या या गुणी विद्यार्थ्यांचा व्यवस्थेवरचा विश्वास उडून जात आहे. अगोदर त्यांना आशा वाटली, नंतरच्या काळात त्यांना राग येऊ लागला, पुढे ते निराश होत गेले, आता असे विद्यार्थी भेटले तर नोकरी या विषयावर ते बोलत देखील नाहीत, शिक्षक म्हणून ही बाब मला विषण्ण करते.
ज्या काही जागा अधूनमधून निघतात, त्या धनदांडग्यांच्या ताब्यात आहेत. जागा एखादी आहे आणि खरोखर हुशार अभ्यासू असणाऱ्या मुलांची संख्याही मोठी आहे, अशावेळी ज्या एकाची निवड होतेय त्याला अनेकांच्या शिफारसी, अनेक तडजोडी करून व्यवस्थेत शिरकाव करावा लागत आहे. ज्यांच्याकडे खूप उर्जा होती, ज्यांच्याकडून खूप शक्यता होत्या, त्यांचा कणा या तडजोडीत व्यवस्थेने काढून घेतला आहे. बाहेर जे आहेत ते निराश झाले आहेत.
खूप खेदाने मी हे मी नोंदवत आहे की, यावेळी मला ‘केसावर फुगे’ हे गाणे आठवत आहे. डी. एड. झालं, बी. एड. झालं, बी. ए. झालं, एम. ए. झालं शेवटी बबल्याला नोकरी मिळाली नाही, तो दारोदार भटकला आणि केसावर फुगे विकू लागला. सतीश कुमावत आणि अण्णा सुरवाडे यांनी चार मिनिटांच्या गाण्यातून आपल्या देशातील सगळ्या शिक्षणव्यवस्थेचे वाभाडे काढले आहेत.
कालीचरण खरतडे आयएएस झाला, तुम्ही त्याच्यासारखा युपीएससीचा अभ्यास करा. नागराज मंजुळे चित्रपट दिग्दर्शक झालाय नं, तुम्ही त्याच्याप्रमाणे चित्रपटात जा. अरविंद जगतापसारखे संवाद लिहा. राजकुमार तांगडेप्रमाणे नाटक आणि पटकथा लिहा. विनायक येवले करतात नं तुम्ही त्यांच्याप्रमाणे मुद्रितशोधन करा. सुशील धसकटे करत आहेत नं त्यांच्याप्रमाणे प्रकाशन संस्था काढा. बाळासाहेब घोंगडेप्रमाणे गावोगावी जाऊन पुस्तक वितरण करा. नामदेव कोळी प्रमाणे भाषांतरे करा. वर्तमानपत्रे काढा, मासिके काढा, डीटीपी करा हे विद्यार्थ्यांना सांगणे खूप सोपे आहे. कारण यातील काहीएक शिक्षक प्राध्यापक म्हणून आम्हाला शिकवायचे नाही. कारण यातील काहीही आमच्या अभ्यासक्रमाचा भाग नाही. हे असे कसे? मला तर समजत नाही.
आता प्रश्न हा आहे की आमचा विद्यार्थी, आमच्या महाविद्यालयाचे प्रोडक्ट ‘आत्मनिर्भर’ होईल असे आमच्या अभ्यासक्रमात काय आहे? शिक्षक म्हणून आमच्यात काय आहे? जर या प्रश्नाचे उत्तर आपल्याला सकारात्मक मिळत असेल तर मला काहीच म्हणायचे नाही, पण जर ते तसे नसेल तर मग मात्र आपल्याला आपल्यात बदल करावे लागतील हे मला सांगायचे आहे. आपले प्रश्न कोरोनाने निर्माण केलेले नाहीत, ते पूर्वीपासूनच अस्तित्वात आहेत. कोरोना काळाने आपला भ्रमाचा भोपळा मात्र फोडला आहे. केवळ आपलाच नाही तर जगाचा भ्रम दूर केला आहे. महासत्ता होऊ पाहणाऱ्या भल्याभल्यांचा भ्रम धुळीस मिळवला आहे.
‘मला मराठी नीट बोलता येत नाही बरं का?’ असं लोकं आपल्याला मराठी दिनाच्या कार्यक्रमात ऐकवू लागलेले आहेत. हे कोण लोक आहेत जे महाराष्ट्रात राहून, वर तोंड करून सांगतात की आम्हाला मराठी बोलता येत नाही. ते गुजरात – युपी – बिहार येथून आलेले नाहीत, त्यांचा जन्म युरोप-अमेरिकेत झालेला नाही, तर ते वाडी बुद्रुक मध्ये जन्मलेले आणि दहावी-बारावीपर्यंत ढोरामागे जात शिकलेले, गावाशी- शेतीशी- मातीशी संबंधीत आमच्यातलेच हुशार लोक आहेत. त्यांना पदे मिळाली, बऱ्या जागा मिळाल्या, कृषीकेन्द्री अर्थव्यवस्था दूर करून ते औद्योगिक अर्थव्यवस्थेचा भाग झाले आणि त्यांनी बाजाराच्या दबावात आपली मातृभाषा दूर लोटली (ही मातृभाषा दूर करण्यापूर्वी त्यांनी अनेक बाबी दूर केल्या होत्या, त्यांची चर्चा इथे संयुक्तिक नाही.)
‘मला मराठी बोलता येत नाही बरं का?’, असं सांगताना त्यांना जराही लाज वाटत नाही आणि आम्हीही ते निमूट ऐकून घेतो. आम्ही त्यांना विचारायला पाहिजे ‘मराठीचे सोडून द्या तुम्ही तुमच्या विषयात काय योगदान दिले आहे? ते तरी एकदा सांगा. तुम्ही जे भौतिकशास्त्र, गणित, तंत्रज्ञान, व्यवस्थापन, वाणिज्य शिकवता त्या तुमच्या विषयात तुमचे राज्य पातळीवर, देशपातळीवर स्थान कुठे आहे? ते तरी आम्हाला कळू द्या. की फक्त तुम्हाला इंग्रजी बोलता येते म्हणून तुम्ही प्रशासन करत राहाणार आहात?’
आपण आपल्यातल्या जेष्ठ प्राध्यापकांना आणि विविध शासकीय समित्यांवर सतत मिरवणाऱ्या ‘मराठी’ लोकांनाही प्रश्न विचारायला पाहिजे की तुम्ही समितीत बसून ‘मराठी’साठी काय केले आहे? जेव्हा शासकीय आणि शैक्षणिक धोरणे दिल्ली मुंबईत ठरवली जात होती आणि मराठी भाषेचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही आमचे प्रतिनिधित्व करत होता तेव्हा तुम्ही तिथे बसून काय केले? केवळ मराठीच नव्हे तर सगळ्याच भारतीय भाषांना तुमच्या बैठकीत दुय्यमत्व दिले जात होते तेव्हा तुम्ही काय करत होतात?
आम्ही स्वत:लाही हा प्रश्न एकदातरी विचारला पाहिजे, की मी माझ्या भाषेसाठी काय केले आहे? मराठीसाठी माझे योगदान काय आहे? माझी भाषा ज्ञानभाषा व्हावी यासाठी मी धडपडलो आहे काय? विश्वकोशात, विकिपिडीया या मुक्त ज्ञानकोशात मी एखादी नोंद लिहिली आहे काय? इंग्रजी कशी आली माझ्या गावात- घरात याकडे कधी डोळसपणे पाहिले काय? अभ्यासक्रमाच्या बाहेर जाऊन विद्यार्थ्यांसाठी मी कोणते प्रकल्प राबवले? आपण कधी विद्यार्थ्यांना आपल्याशी जोडून घेतले काय आणि त्याच्या पंखात बळ देण्यासाठी त्याला आधार दिला काय ? मला अधिकृतपणे सांगितले नव्हते, तरीही मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी, माझ्या भाषेसाठी, माझ्या विषयासाठी नवे प्रारूप आकाराला आणले काय? असे झाले आहे काय?
माझा अनुभव सांगतो. मला माझ्या बाळांना शिकवण्यासाठी अनेकवेळा मराठीत शब्दच सापडले नाहीत. उदाहरणार्थ मी बाळांना शिकवत होतो प्राणी आणि त्यांची पिल्ले... गायीच्या पिल्लाला वासरू म्हणतात, म्हशीच्या पिल्लाला वघार किंवा रेडकू म्हणतात, शेळीच्या पिल्लाला कोकरू म्हणतात, सिंहाच्या पिल्लाला छावा म्हणतात तर या मालिकेत अनेक पशू पक्षी असे आले की त्यांच्या पिलांना काय म्हणतात हे मला सांगता आले नाही, बेडकाच्या खूप छोट्या पिल्लाला, ज्याला शेपूट असते, त्याला काय म्हणतात? हे मला सापडले नाही.
तीच अवस्था प्राणी पक्षी यांचे घर, गायीचा गोठा, घोड्याचा तबेला, वाघाची गुहा तसे इतर प्राणी कुठे रहातात? कोण खुराड्यात रहाते? कोण घळीत रहातो? कोण खोप्यात आणि कोण घरट्यात रहाते? मला सापडले नाही. पक्ष्यांचे प्राण्यांचे आवाज नेमके कसे आहेत याबद्दलच्या नोंदी मराठीत नेमकेपणाने उपलब्ध नाहीत. विकिपीडियावर मराठीच्या नोंदी नाहीत यासाठी हळहळत राहायचे की आपण नव्या नोंदी लिहायच्या? मला वाटते, आहेत त्या नोंदी बिघडवण्याचे काम करण्यापेक्षा आपण चांगल्या नोंदी का लिहू नयेत. यासाठी आपण विद्यार्थ्यांना का सहभागी करून घेऊ नये?
मराठीच्या शिक्षकांची शिकवण्याशिवायची एक जबाबदारी अधिक आहे, आपल्या भाषेला ज्ञानभाषा करण्यासाठी मदत करण्याची आपली जबाबदारी आहे, त्यासाठी प्रसंगी ज्यांना आपण हुशार, विद्वान समजतो त्या अन्य ज्ञानशाखेतील, विषयातील अभ्यासकाला ‘मराठीतही लिहा’ असा आग्रह धरण्याची जबाबदारी आपण विसरून गेलो आहोत. यासाठी मला जयंत नारळीकर, शेतकरी नेते शरद जोशी, अच्युत गोडबोले हे थोरच लोक वाटतात. मला हीसुद्धा खात्री आहे की आपल्यापैकी काहींनी नक्कीच खूप चांगले काम केले आहे. करत आहेत. इतरांचे काय? ही सामुहिक जबाबदारी आहे.
आपण बारा कोटी लोकांचा प्रदेश आहोत आणि मराठी विषयाची विद्यार्थी संख्या झपाट्याने कमी होत जात आहे हे मागील दशकाचे चिंताजनक वास्तव आहे. आमच्याकडे येणारा विद्यार्थी केवळ गरीबच नाही तर तो शैक्षणिक दृष्टीनेही तळाचा विद्यार्थी आहे (अपवाद सोडून). त्याच्या खिशात पैसे नाहीत, त्याप्रमाणे खुपदा त्याच्याकडे पाच पाच मार्कमेमो आहेत हेही चित्र आहे. विद्यार्थ्यांची वर्गातील उपस्थिती दिवसेंदिवस कमी होत आहे हे आमचे संकट जुनेच आहे, मला वाटते की कोरोनाने आम्हाला आमच्यात बदल करण्याची एक संधी दिली आहे. आम्ही जो भ्रम घेऊन जगात होतो की आमचं बरं चाललं आहे तर ते तसं चित्र यापुढे असणार नाही. जर चित्र बदलले नाही तर जे आज तिशीत आहेत आणि शिक्षक प्राध्यापक म्हणून सेवेत आले आहेत, त्यांच्यासमोर नोकरीचा जो अजून तीस वर्षांचा काळ आहे तो सुखावह असणार नाही.
कोरोनामुळे जे संकट आले आहे, आणि त्यावर ज्या उपाय योजना करण्यात येत आहेत त्यावरून येत्या काळात ‘ऑनलाईन शिक्षण’ हे सर्वत्र उपयोजिले जाईल असे दृश्य आहे. शैक्षणिक साधन म्हणून मोठ्या प्रमाणात नवतंत्रज्ञान म्हणून आमच्या सहाय्याला येणार आहे. त्याची सुरुवात झाली आहे. अण्णासाहेब मगर महाविद्यालय पुणे यांनी आयोजित केलेला मराठी भाषा, साहित्य, अध्यापन याविषयी आयोजित केलेला वेबिनार त्याचे उदाहरण आहे. ठिकठीकाणी गुगल क्लासरूम, झूम मिटिंग, इन्स्टाग्राम टिचींग, गुगल फॉर्म, ऑनलाईन एक्झाम, फेसबुक लाइव्ह, युट्यूब चॅनल सुरु झाले आहेत. लोक इबुक जतन करून ठेऊ लागले आहेत, त्यांची मागणी करू लागले आहेत. ‘स्पीच टू टेक्स्ट’चा वापर वाढला आहे. मराठीचे विद्यार्थी आणि प्राध्यापक ‘ब्लॉग’ लिहू लागले आहेत.
अर्थात हे अगदी सुरुवातीचे दृश्य आहे. जसे जसे दिवस बदलत जातील तसतसा त्यात नेमकेपणा, वापरातील काटेकोरपणा येत जाईल. काही महिन्यांनी आपण सगळेच तंत्रज्ञान वापरात पारंगत झालेलो असू, घरातील लाईटचे बटन सुरु करण्यासारखे हे आहे असे आपणच नंतर म्हणू. कोणती अभ्यासपत्रिका शिकवण्यासाठी कोणते ऍप वापरायचे याबाबत विविध पर्याय आपल्या हाती असतील, यातील अनेक ऍप आपणच निर्माण केलेले असतील. मराठी भाषा शिकवण्याचा ऍप कुण्या युरोपातील व्यक्तीने तयार करण्यापेक्षा तो आम्हीच निर्माण करणे उत्तम.कदाचित काही दिवसांनी घराबाहेरची परिस्थिती पूर्णत: निवळेल, भय संपेल, पूर्ववत जीवन सुरु होईल, कोरोन पूर्ण नष्ट होईल, मात्र आपण आत्मसात केलेले तंत्रज्ञान आपल्याला पुढेही कामी येत राहील.
नवतंत्रज्ञानाचा आमच्या अध्यापनात समावेश करताना आपण हे सुद्धा पाहायला हवे की आमचे विद्यमान अभ्यासक्रम हे त्यायोग्य आहेत काय? कोरोनानंतरच्या काळात शिक्षण व्यवस्था बदलणार आहे, असे जर म्हटले तर अध्यापन, अभ्यासक्रम आणि मूल्यमापन अशा सगळ्याच पातळीवर ही व्यवस्था बदलत जाणार आहे. म्हणजे नजीकच्या काळात आम्हाला आमचे अभ्यासक्रमही बदलावे लागणारच आहेत.
मराठीच्या पारंपारिक अभ्यासक्रमाविषयी मला वाटते की आपल्याला साहित्याकडून भाषेकडे केंद्र हलवावे लागेल. भाषेचा विचार आणि तोही सामाजिक भाषेचा, लोकभाषेचा विचार अग्रक्रमाने करावा लागणार आहे. भाषेचे सांस्कृतिक संचित आम्हाला अभ्यासक्रमात मांडावे लागेल. मराठीचे साहित्याचे अभ्यासक्रम ऑनलाईनसाठी फारसे उपयुक्त नाहीत. त्यांचा सर्व भर हा व्याख्यान पद्धतीवर आहे. ते पुस्तककेन्द्री आहेतच. शिवाय त्याला आमच्या वाङ्मयीन गटातटांचा घाणेरडा वास आहे.
तुच्छतावादी मानसिकतेत अडकलेल्या आपल्या मित्रांना, एक दोन ओळींची शेरेबाजी करून सगळ्या महत्वाच्या बाबींवर बोळा फिरवणाऱ्या आमच्या सहकाऱ्यांना आपण समजून सांगायला हवे. आमची मराठी विषयीची अस्मिता प्रत्यक्ष वर्तनातून दिसायला हवी. ती पुढे संक्रमित व्हायला हवी.
प्राध्यापक आणि शिक्षकांच्या नोकऱ्या जेव्हा कमी होत आहेत तेव्हा आम्हाला विद्यार्थ्यांना त्यांच्या पायावर उभे करायचे आहे. आम्हाला आमची सामाजिक उपयोगिता सिद्ध करणारे अभ्यासक्रम निर्मावे लागतील. अभ्यासक्रम निखळ ‘विद्यार्थीकेन्द्री’ असायला हवेत. विद्यार्थ्यांना भाकरी मिळवून देणारे अभ्यासक्रम आम्ही देणे गरजेचे आहे. अध्यापन पद्धतीतील नवतंत्रज्ञानाचा वापर कशासाठी, तर तो विद्यार्थ्यांसाठी, आणि त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ही खुणगाठ आपण मनाशी बांधली पाहिजे. सहाजिकच आम्हाला अन्य व्यवसाय क्षेत्रांकडे वळावे लागेल. आमच्या विद्यार्थ्यांच्या अंगी निरनिराळी कौशल्ये कशी येतील यासाठी आम्हाला कौशल्य विकासाच्या अभ्यासपत्रिका वाढवणे अत्यंत गरजेचे आहे.
‘उपयोजित मराठी’ आणि ‘भाषिक कौशल्यां’कडे होणारे आमचे दुर्लक्ष यापुढे हितावह असणार नाही. अध्यापनाच्या स्तरावर या विषयांचे आम्ही जे काही दयनीय वर्तमान स्वरूप करून ठेवले आहे त्यात बदल अपेक्षित आहे. समाजमाध्यम आणि त्यात वावरण्याची नैतिकता आमच्या अभ्यासक्रमात यायला हवी आहे. समाजमाध्यमांनी भाषा व साहित्याच्या घडणीत दिलेले योगदान आपण अभ्यासले पाहिजे. आमचे अभ्यासक्रम जीवनाला समांतर असण्यावर भर दिला पाहिजे. तो अधिकाधिक अंतरविद्याशाखीय करावा लागेल.
कोरोनामुळे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होऊन लोक आपापल्या गावी परतले आहेत. पुण्या-मुंबईकडे जाण्याचा ओघ पुढे काही वर्ष मंदावलेला असेल असे वाटतेय तेव्हा गावोगावच्या आणि महाराष्ट्रात सर्वदूर विखुरलेल्या शिक्षण संस्थांना ही संधी आहे. आपल्या परिसरातील हुशार विद्यार्थी उच्चशिक्षणासाठी आपल्या महाविद्यालयात कसा येईल, या दृष्टीने नियोजन करता येऊ शकेल.
- डॉ. पृथ्वीराज तौर
drprithvirajtaur@gmail.com
(लेखक, नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात मागील सोळा वर्षांपासून मराठीचे अध्यापन करतात.)
Tags: मराठी भाषा शिक्षण तंत्रज्ञान पृथ्वीराज तौर Marathi Marathi Language Corona Technology Load More Tags
Add Comment