अनुभव मोठा; मी केवळ वाहक!

उद्या प्रकाशित होणाऱ्या ‘बोलिले जे... संवाद एलकुंचवारांशी’ या पुस्तकातील काही अंश... 

ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांची प्रदीर्घ मुलाखत पर्यावरण विषयाचे अभ्यासक, अतुल देऊळगावकर यांनी टाळेबंदीच्या काळात घेतली होती. फेसबुक लाइव्हवरील या मुलाखतीचं ‘बोलिले जे... संवाद एलकुंचवारांशी’ हे पुस्तक मनोविकास प्रकाशनातर्फे येत आहे. १६ ऑक्टोबर २०२० रोजी मनोविकास लाइव्ह उपक्रमातंर्गत ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांच्या हस्ते या पुस्तकाचं ऑनलाईन प्रकाशन होत आहे. त्यानिमित्ताने या पुस्तकातील हा काही संवादरुपी अंश...

दोन प्रकारचे लेखक असतात. जे अवतीभोवतीचं पाहून त्याच्यावर लिहितात, त्याच्याबद्दल लिहितात. त्याच्यावर त्यांचं भाष्य असतं, कधी कधी भाष्यही नसतं. अतिशय वस्तुनिष्ठपणाने ते पाहतात आणि लिहितात. आणि लेखनाचा तो एक प्रकार तितकाच सन्मान्य आहे. कदाचित जास्त सन्मान्य असेल, मला माहीत नाही. पण मी तसं लिहीत नाही. मी फार आत्मपर लिहितो. मला आलेले माझे स्वत:चे जे अनुभव आहेत, त्यांचीच पुनर्घटना करण्याचा मी प्रयत्न करतो. माझी सुरुवात नेहमी स्वतःपासून होते व स्वतःजवळ संपते, कारण मी स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न केल्यावर माझं जग बदलतं तसंच अवतीभोवतीचं जग मला समजणार. हे करत असताना मी जे लेखन केलं तेव्हा... माझ्या सुरुवातीच्या लेखनात तुला दिसेल की पुष्कळदा माझा तोल गेलेला आहे. ‘मला अनुभव आला’ म्हणजे मी कुणीतरी मोठा आहे आणि मला अनुभव आला असा त्याच्यात आव आहे का? त्याच्यामध्ये मी करुणेची भीक मागितलीय का? किंवा त्याच्यात लोकांनी मला समजून घ्यावं असं आर्जव केलंय का? अशा शंका लेखक म्हणून मी वाढत गेलो तसतशा मला येऊ लागल्या. मग एकेकाळी मला हे फार जाणवू लागलं. म्हणजे याचा धागा कसा जुळवायचा ते तू मला सांग. 

असाच एकदा शिरपूरला गेलो असताना उन्हाळ्यात गच्चीवर झोपलो होतो. वर आकाशात तेव्हा असं पोल्युशन नव्हतं. असं खच्चून आकाश भरलं होतं. म्हणजे आकाशातले तारे असे खाली आलेले की आपण तोडू शकतो असं आकाश दिसायचं. तो अथांग पाहून तर मला असं वाटलं की आपण कशाला स्वतःला असं मोठं समजतो? लिहितो म्हणून मोठं समजतो का स्वत:ला? एरवी तर आपण फालतू आहोत एकदम. विचारतं कोण मला बाहेर गेलो तर. आणि स्वतःजवळ काहीच नाहीये थोडसं मराठीत चांगलं लिहितोय याच्यापलीकडे. सर्वसामान्य माणसापेक्षा दुर्गुण माझ्यात जास्त आहेत. म्हणजे घटना घडते कशी? आपण लिहून जातो काहीतरी अन् काही लोकांना आवडतं. पण मग हे घडतं कसं? बरं याच्यामध्ये मेटॅफिजिकल म्हणजे आध्यात्मिक असं काही नाही. पण मग मला असं वाटलं की मी फक्त माध्यम आहे. 

तो अनुभव येतो आणि म्हणतो, की मी आता तुझ्या माध्यमातून जरा व्यक्त होतोय. हे भान मला नेहमी आलेलं आहे. कारण लिहिताना ज्या पातळीवर मी असतो त्या पातळीवर मी नेहमी राहत नाही. नेहमी तर मी सामान्य पातळीवरच असतो. असं जर आहे तर तो अनुभव मोठाच आहे, आणि जेव्हा मी अनुभव व्यक्त करतो तेव्हा क्षणभर मीही मोठा होतो; तरी मी सर्व पातळ्यांवर तो अनुभव व्यक्त करू शकतच नाही. हे माझ्या लक्षात आलेलं आहे. अनुभव अनेकपदरी असतो. त्या अनुभवाचे किती पदर मी देऊ शकतो? तुमच्यासमोर दाखवू शकतो? फार थोडे. चांगला लेखक असेन तर दहा पदर दाखवीन, सामान्य असेन तर दोन दाखवीन अन्‌ अगदीच वाईट असलो तर दाखवणारच नाही, फक्त अनुभव सांगेन. 

तर माझ्या लक्षात आलं, की कुठल्याही अनुभवाचा आकार हा कॉस्मिकच असतो. एका छोट्याशा अनुभवाचा आकार कॉस्मिक होऊ शकतो. Iternity condensed in a moment. दंवबिंदूमध्ये आकाश दिसावं तसं ते आहे. जो अनुभव आपल्याला संपूर्णपणे कळतच नाही तो व्यक्त करायचा. माझ्याजवळ जे काय बळ मिळालेलं आहे लेखक म्हणून त्या शक्तीनिशी. पण ही तर त्या अनुभवाची किमया. तेव्हा अनुभव एवढा भव्य जर असेल तर त्याच्यासमोर मी कोण आहे? मी अत्यंत सामान्य, अत्यंत मिडिऑकर आयुष्य जगणारा माणूस. तेव्हा मी फक्त माध्यम आहे. आणि आपण स्वतःला धन्य समजलं पाहिजे की आपल्याला कुठल्यातरी त्या अनुभवानं निवडलंय वाहक म्हणून! मी वाहक आहे. डॉक्टर (लागू) ‘लमाण’ शब्द वापरतात. मी ‘वाहक’ शब्द वापरतो. होतं काय की काही लेखकांना मोह आवरत नाही की जो अनुभव असतो त्याच्या आणि वाचकाच्यामध्ये ते सारखे लुडबुडत येतात. (हसत) ‘हा अनुभव मला आला बरं का’ असं. इथे तो लेखक फसतो लेखक म्हणून. आपण अदृश्यच व्हावं शक्यतो. पूर्णपणे अदृश्य व्हावं. कारण आम्ही नॉन-एंटिटि आहोत. अनुभव हा जीवनाचा एक आविष्कार आहे. आणि जीवन आपल्यापेक्षा फार मोठं असतं. त्याच्यासमोर आपण नम्रच झालं पाहिजे.

ही जी पात्रं मी निर्माण करतो, त्यांच्यावर माझं अतिशय प्रेम आहे. म्हणजे पात्र चांगलं का वाईट हे ठरवून मग मी त्यांच्यावर प्रेम करीत नाही. एखादा अत्यंत वाईट प्रवृत्तीचा माणूस आहे आणि ते पात्र आहे मी निर्माण केलेलं. त्याच्यावर माझं प्रेम असतं. त्यालाही समजून घेण्याचा मी प्रयत्न करतो. माझं तर मतच असं आहे की जी अत्यंत वाया गेलेली, ज्यांचं स्खलन झालेलं आहे, जी अध:पतित माणसं आहेत, चारचौघांच्या चौकटीत न बसणारी माणसं आहेत, त्यांना जास्त समजून घेण्यासाठी आपल्याजवळ सहसंवेदनेचा गुण पाहिजे. कारण जी बिनसलेली माणसं असतात ती काही फार सुखी नसतात. ती अजिबात सुखी नसतात. ती जळत असतात आतल्याआत. आणि त्याच्याशी त्यांना जमवून घेता येत नाही म्हणून ती आणखीनच बिनसल्यासारखी वागतात. तर अशा माणसांबद्दल आपण निदान सहानुकंपा ठेवून त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करावा असं मला नेहमीच वाटतं. आणि माझ्या इतर सामान्य पात्रांबद्दल तर प्रेमच वाटतं. ते प्रेम करतो म्हणून मग मी त्यांना जितकं शक्य आहे तितकं समजून घेतो. मात्र मला ती समजली आहेत असं मला अजिबात वाटत नाही. आणि सगळी माणसं सारखी आहेत. राजा, रंक, पंतप्रधान, रिक्षावाला सगळे सारखे. हा चांगला, हा वाईट असे मूल्यनिर्णय करणारा मी कोण? सर्व जीवनांची महत्ता एकच. 

आता नाटकाच्या बाबतीत खरं तर असं होतं अतुल की, मी पात्रं निर्माण केली. आता ‘सोनाटा’मधल्या तीन मुली मी निर्माण केल्या आहेत. तशा प्रकारच्या मुली मी पाहिलेल्या आहेत. माझ्या मैत्रिणीच आहेत त्या. परंतु ह्या प्रकारच्या स्त्रिया मला समजून समजून किती समजणार? त्यामुळे त्या मला जितक्या समजल्या तितक्या मी नाटकात आणल्या. पण ते नाटक जेव्हा जेव्हा सगळ्यांनी केलं, अपर्णानं (सेन) सिनेमा केला, शबाना, अपर्णा आणि लिलियेत. मी त्यांना तसं विचारलं. तर त्या म्हणाल्या, “ह्या काय विलक्षण आहेत महेश.. तुला कशी कळतात इतकी आमची मनं?” तर मी म्हटलं, “मला अजिबात इतकी कळत नाहीत. मला स्वतःला जेवढं कळलं तेवढंच फक्त मी व्यक्त केलेलं आहे. तुम्ही तुमच्याबाजूने त्यात भर घातलेली आहे. तुम्ही जी भर घातलेली आहे ती माझ्या मनात होती की नाही हेसुद्धा मला माहिती नाही. तुम्ही आणि मी मिळून आपण ती पात्रं निर्माण केलीयत असं समजू.” 

तेव्हा नाटकाच्या बाबतीतली पात्रं आम्ही लेखकांनी निर्माण केली असतात, त्यात मोकळ्या जागा खूप असतात, त्या जागा नट भरून काढतो. आणि एक वेगळंच पात्र तुम्हांला दिसतं. ते माझ्या नजरेत, मनात असेल किंवा नसेल हा मुद्दा वेगळा. पण दुसरी लेखकांची एक तर्‍हा बघ. ते पात्रांवर प्रेमच करत नाहीत. अजिबात प्रेम करत नाहीत. ते बघतात की हा असा असा आणि तो तसा तसा. त्याला पूर्णपणे उघडा-नागडा करून, विवस्त्र करून तुमच्यासमोर मांडतात. एकप्रकारची त्यांच्यामध्ये खुन्नस म्हणतो ना आपण, तसं काही. एकप्रकारचा निर्मम सॅडिझम. ह्या माणसाचं दाखवूनच देतो सगळं असा काहीसा पवित्रा. ह्याला वस्तुनिष्ठता म्हटलं जातं, पण एरवी हीच माणसं ‘बांधिलकी बांधिलकी’ करत असतात.

मला नेहमी असंच वाटत आलंय की माणसं... घसरतातंच हो माणसं... माणसं चुकतात. त्यांच्या आयुष्याची अन् मनाची नासधूस झालेली असते.. मनं छिन्नविछिन्न झालेली असतात. तर त्यांना एवढं कठोरपणानी बघायची काही गरज नसते... त्यांना तसं बघण्यापेक्षा समजून घेऊन आपल्याला जेवढं समजतं तेवढं घ्यावं. 

- महेश एलकुंचवार

महेश एलकुंचवार यांची अतुल देऊळगावकर यांनी घेतलेली ही मुलाखत युट्यूबवर दोन भागांमध्ये उपलब्ध आहे. पुढील लिंकवर क्लिक करून ही मुलाखत पाहता येईल- 

भाग 1
भाग 2

Tags: महेश एलकुंचवार अतुल देऊळगावकर संवाद नवे पुस्तक साहित्य नाटक लेखक New Book Mahesh Elkunchwar Atul Deulgaonkar Marathi Writer Play Literature Load More Tags

Comments:

अरुण कोळेकर , शरदचंद्रजी पवार महाविद्यालय जेजुरी.

मोठा लेखक ,सच्चा लेखक. माणंस वाचणारा आणि सहसंवेदनेनं ती समजून घेणारा अवलिया लेखक.

दीपक पाटील

माणूस समजून घेताना..असं काहीसं एलकुंचवारांचं अनुभव कथन ! दुस-यातील गुण दोष समजून घेताना आपले टवके उडतात..पैलू पडतात..असे वाटते.

Atul Teware

अप्रतिम

Dr.Shyam pawar

लेखक म्हणून माणसं समजून घेणं आवश्यक आहे. पण ते अवघड आहे. त्यासाठी माणसं वाचता आली पाहिजे.

नागेश अंकुश,औरंगाबाद.

खूप छान उद्बोधक मुलाखत असेल, काही भाग आता वाचला,पुस्तकं वाचायला नक्की आवडेल...अभिनंदन ,एलकुंचवार सर आणि देऊळगावकर सर यांचे

Add Comment