जर्मन भाषा आणि जर्मनी

'जागतिक मातृभाषा दिना'निमित्त 

कर्तव्य साधना

21 फेब्रुवारी हा दिवस जगभर आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने जपान, जर्मनी आणि फ्रान्स या तीन देशांतील अनुक्रमे जपानी, जर्मन आणि फ्रेंच या भाषांचे त्या त्या देशातील स्थान या विषयी तीन लेख प्रसिद्ध करत आहोत. त्यापैकी जर्मन भाषेचा विकास आणि त्यामागील लोकप्रेरणा यावर भाष्य करणारा हा लेख. 

महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रात मराठीचा वापर दिवसेंदिवस कमी कमी होत चालला आहे. साधारण दोन दशकांपूर्वी पहिलीपासून इंग्रजीची सुरवात झाली आणि त्यानंतर इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या सातत्यानं वाढत गेली. इंग्रजी हे शिक्षणाचं माध्यम असावं असा लोकमताचा प्रवाह अलिकडे बळावत चाललेला दिसतो. शहरांसोबतच लहान गावांतही इंग्रजी माध्यमाच्या शाळा हव्यात, असा आग्रहही आता धरला जातोय.

महाविद्यालयीन आणि व्यवसायिक शिक्षणासाठी किंवा कोणत्याही क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी इंग्रजीचा वापर आता अनिवार्य झालाय. आपल्या मातृभाषेतून उच्च शिक्षण घेण्यासाठी उपलब्ध असलेल्या साधनांची संख्या कमी असल्यामुळे इंग्रजी भाषेवरील अवलंबित्व अपरिहार्यपणे वाढतंय. या संदर्भात इतर देशांमध्ये मातृभाषेचे काय स्थान आहे, तिचा विकास आणि वापर कसा होतो, हे जाणून घेणं उद्बोधक ठरेल. यासाठी जर्मनीचं आणि जर्मन भाषेचंच उदाहरण बघू या.

गेल्या दोन-तीन दशकांपासून इंग्रजीचा प्रभाव वाढत असल्याची जाणीव जर्मनीला नक्कीच आहे. हा प्रभाव रोखण्यासाठी काय काय उपाययोजना करता येऊ शकतात यावर जर्मनीमध्ये चर्चा होताना दिसते. पण शालेय शिक्षणाचं किंवा एकूणच शिक्षणाचं माध्यम काय असावं याविषयीची चर्चा मात्र ऐकिवात नाही किंवा कधी वाचण्यातही आली नाही. 

जर्मन ही भाषा म्हणून कशी विकसित होत गेली याची कहाणी मोठी रंजक आहे. मार्टीन लूथरने केलेल्या बायबलच्या जर्मन भाषांतरापासून म्हणजे सोळाव्या शतकाच्या मध्यापासून आधुनिक जर्मन भाषेचे युग सुरु होतो. त्यावेळी जर्मनीमध्ये छोटी छोटी जर्मन भाषिक राज्यं अस्तित्वात होती. त्यातील सरदार-दरकदार फ्रेंच बोलत असत. फक्त गरीब, कामगार, शेतकरी जर्मन बोलायचे. त्यामुळे जर्मन ही निम्न दर्जाची भाषा समजली जायची. त्याकाळी  इतर युरोपीय भाषांच्या तुलनेत जर्मन भाषेला पत किंवा प्रतिष्ठा नव्हती. भाषा म्हणूनही जर्मन तेव्हा अविकसितच होती आणि तिचा शब्दसंचयही मर्यादित होता. 

लूथरनं लॅटीनमधून जर्मनमध्ये बायबलचं भाषांतर केल्यामुळे जर्मन भाषेच्या सामर्थ्याची कल्पना त्यावेळी पहिल्यांदाच आली. पुढे सतराव्या शतकात लूथरचं बायबल भाषांतर मानणारी प्रोटेस्टंट राज्यं आणि ते न मानणारी कॅथॉलिक राज्यं यांमध्ये महाभयंकर युद्ध झालं. ते तब्बल तीस वर्षे (1618-1648) चाललं. या गदारोळात लोकांमध्ये जर्मन भाषेविषयी जागृती निर्माण व्हायला लागली. लॅटीन, फ्रेंच आणि पुढे समृध्द झालेली इंग्रजी, या भाषांना तोंड देऊ शकेल अशी एक नियमबद्ध सामाईक जर्मन भाषा असली पाहिजे या मागणीनेही मग जोर धरला. 

तत्पूर्वी प्रबोधन काळात, इटलीमध्ये दांते (1265-1321), पेत्रार्क (1304-1374), जिओव्हानी बोकास्सिओ (1313-1375) आणि फ्रान्समध्ये फ्रांस्वा रेबेले (1494-1553), रने देकार्त (1596-1650) तर इंग्लंडमध्ये शेक्सपियर (1564-1616) असे विचारवंत, लेखक, कवी, मानवतावादी प्रज्ञावंत, तत्त्ववेत्ते होऊन गेले होते. त्यांनी आधुनिक इटालिअन आणि फ्रेंच भाषेचा पाया घातला तर शेक्सपियरमुळे इंग्रजी भाषा समृद्ध झाली. सतराव्या शतकात इटलीत आणि नंतर फ्रान्समध्ये शासकीय पुढाकारातून केंद्रीय भाषा अकादमींची स्थापना करण्यात आली. त्यांनी या लेखकांची भाषा प्रमाण मानली. शिवाय वसाहतींच्या साम्राज्यातून इंग्रजी, फ्रेंच, स्पेनिश या भाषांचा प्रसार झाला आणि त्यांचा प्रभावही वाढत गेला.   

अभिजन व शिक्षित वर्ग फ्रेंच बोलत असल्यामुळे कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात याच भाषेची मक्तेदारी होती. त्यामुळे या काळात जर्मन भाषेत कोणतीही मोठी वाङ्मयीन निर्मिती झाली नव्हती. धर्माची आणि कायद्याची भाषाही लॅटीन होती. धर्माची आणि राज्यकर्त्यांची भाषा सर्वांना कळणारी असावी अशी गरज आता निर्माण झाली होती. त्यामुळे सतराव्या व अठराव्या शतकात जर्मन भाषेच्या शुद्धीकरण आणि विकासासाठी लोकप्रेरणेतून अनेक ‘भाषामंडळं’ स्थापन झाली.

जर्मन भाषिक राज्यात त्याकाळी वेगवेगळ्या बोलीभाषा अस्तित्वात होत्या. सामाईक जर्मन भाषेच्या विकासासाठी जनतेने पुढाकार घेतला. लॅटीन व फ्रेंच शब्दांना प्रतिशब्द निर्माण करून, या भाषांतील उत्कृष्ट साहित्य जर्मनमध्ये भाषांतरित करण्यात आले. लॅटीन व फ्रेंचच्या वरचष्म्यातून जर्मन भाषेला मुक्त करण्यासाठी नवनवीन शब्दसंपत्ती जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आली.  

सांस्कृतिक आणि वैज्ञानिक क्षेत्रांत जर्मन भाषेला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी भाषेचे नियम बनवले गेले. हेर्डर, फिश्ट, लेसिंग यांसारख्या विचारवंतांनी व लेखकांनी आपल्या प्रखर भाषणांतून व लिखणामधून जर्मन भाषेविषयी अभिमान आणि प्रेम निर्माण केलं. एकेका शब्दावर, संकल्पनेवर विचारवंतांचा पत्रव्यवहार आणि त्यांच्यात झालेल्या चर्चा आन्या श्टुकन्ब्रोक यांच्या संशोधन ग्रंथात वाचायला मिळतात.
 
नवं वाङ्मय छोट्या-मोठ्या जर्मन भाषिक राज्यांच्या सीमा ओलांडून सर्व दूर पोचत होतं. त्यामुळे वाङ्मयाचं महत्त्व आणि लेखकांची जबाबदारी वाढली. नुसते निकष ठरवणं नाही, तर ह्या नव्या सुधारित समृध्द भाषेत साहित्य निर्माण करण्याची महत्वाची मोहीमच सतराव्या आणि अठराव्या शतकांत सुरु झाली. याच काळात ग्योटं (1749-1832), शिलर (1759-1805), क्लाईस्ट (1777-1811) यांनी उत्कुष्ट साहित्यनिर्मिती केली. हाच काळ जर्मन अभिजात साहित्याचा काळ मानला जातो.

आजचे प्रज्ञावंत जर्मन पत्रकार आणि लेखक थोमस ष्टाईनफेल्ड आपल्या पुस्तकात म्हणतात, ‘जर्मन भाषेचं शुद्धीकरण आणि विकास हे अठराव्या शतकातील सुशिक्षित माणसांचं आणि कवी-लेखक मंडळींचं कामच होऊन बसलं होतं. लवकरच त्याला एका चळवळीचं स्वरूप प्राप्त झालं. साहित्यातून, पत्रांमधून, चर्चांमधून आणि संवादातून त्यांनी नवीन शब्दसंपदा निर्माण करायला सुरवात केली. त्यामुळे एकोणिसाव्या शतकाच्या सुरवातीला जर्मन शब्दसंग्रह जवळपास दुप्पट झाला होता.’ 

जर्मन भाषेच्या विकासाच्या दृष्टीने 1838 मध्ये सुरु झालेला महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे ग्रिम बंधूंचा ‘जर्मन शब्दकोश’. त्यात शब्दांचा इतिहास दिलेला आहे. हा जर्मन भाषेतला सर्वात मोठा कोश आहे. त्याचा पहिला खंड 1854 मध्ये प्रसिद्ध झाला. मात्र आजही नवीन शब्दांच्या पुरवण्या जोडून तो अद्ययावत केला जातो.

अठराव्या-एकोणिसाव्या शतकात युरोपमध्ये राष्ट्रवादाचा उदय आणि प्रसार झाला. त्याचं ब्रीदवाक्य होतं ‘एक भाषा, एक संस्कृती, एक समाज’. एक सामाईक राष्ट्रभाषा हाच लहान लहान जर्मन भाषिक राज्यांच्या एकीकरणाचा पाया होता. याविषयी आन्या श्टुकन्ब्रोक म्हणतात, ‘एका समाईक भाषेतून आधी ‘भाषा-राष्ट्र’ निर्माण झालं आणि नंतर जर्मन भाषिक राज्यांचं एकत्रीकरण होऊन 1871 मध्ये जर्मनीची स्थापना झाली.’

अठराव्या शतकामध्ये जर्मन भाषा प्रगत व सुसंस्कृत भाषा म्हणून ओळखली जाऊ लागली तेव्हा जर्मन भाषेच्या नव-निर्मितीमागे कोणतीही राजकीय सत्ता किंवा राजकीय हेतू नव्हता; हेतू होता फक्त सांस्कृतिक आणि भाषिक. तोवर प्रबळ राजकीय सत्ताकेंद्र निर्माण झालेलं नव्हतं. त्यामुळे जर्मन भाषेचं संस्करण, संगोपन आणि विकास लोकप्रेरणेतूनच झाला. 

पुढे जर्मन विद्वानांनी आणि वैज्ञानिकांनी मानव्य शास्त्रांच्या आणि विज्ञानाच्या जवळपास सर्व क्षेत्रांमध्ये संशोधन केलं आणि मूलभूत विचारही मांडले. या सगळ्यातून जर्मन भाषा समृद्ध होत गेली आणि तिला प्रतिष्ठा प्राप्त झाली. विसाव्या शतकात काही मराठी भाषक भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्राच्या उच्च अभ्यासासाठी आणि संशोधनासाठी, इतकंच काय, पण संस्कृत भाषेच्या अभ्यासासाठी आणि संशोधनासाठीसुद्धा जर्मनीला गेल्याचा इतिहास आहे. मूळ जर्मनमध्ये निर्माण झालेल्या ज्ञानामुळे ही भाषा अधिकाधिक समृद्ध झाली आहे.

जाणीवपूर्वक शब्दनिर्मिती, शब्दकोश निर्मिती, भाषाभिमान आणि लोकसहभाग यातून जर्मन भाषा सक्षम झाली. उच्चशिक्षण, आधुनिक तंत्रज्ञान, विज्ञान, विधी, औषधनिर्मिती, वैद्यकशास्त्र, पॅरामेडिकल सायन्सेस अशा कोणत्याही शाखेचा आणि कोणत्याही विषयाचा अभ्यास आज जर्मन भाषेतून करता येतो. आजही जर्मनमध्ये नवी शब्दनिर्मिती होत असते. संगीताच्या भाषेपासून पर्यावरणक्षेत्र, अंतराळविज्ञान, युद्धशास्त्र अशा सर्व क्षेत्रात अद्ययावत शब्दांचा खजिना जर्मन भाषेत आहे. ती काळाबरोबर चालणारी भाषा आहे.

इंग्रजीमध्ये लिहिलेल्या भारतीय कादंब-या जर्मनमध्ये तत्काळ भाषांतरित होतात आणि त्या पुस्तकांच्या दुकानांमध्ये सहज उपलब्ध असतात. आपल्याकडे बरेचदा इंग्रजी कादंब-यांची विचारणा झाल्यावर दुकानदार त्या मागवून घेतात. त्यामुळे मला सुकेतू मेहता, विक्रम चंद्र, विकास स्वरूप, किरण नगरकर, अरुंधती राय यांच्या कादंब-या आधी जर्मनमध्ये सहज वाचायला मिळाल्या.

वैश्विकरणाच्या रेट्यामुळे पंधरा-वीस वर्षांपासून जर्मन लोक थोडं फार इंग्रजी बोलू लागलीत. आंतरराष्ट्रीय समुदायापुढे क्वचित एखादं भाषण इंग्रजीतही होतं. काहीजण आपला शोधनिबंध इंग्रजीत वाचतात. पण ही उदाहरणं अगदी अपवादात्मक आहेत. पूर्वी व्यावसायिक पत्रव्यवहार सुद्धा फक्त जर्मनमध्ये होत असे. अगदी दोन-दोन ओळींची पत्रंसुद्धा लोक जर्मनमधून इंग्रजीत भाषांतर करण्यासाठी घेऊन यायचे. आता हे प्रमाण कमी झालं आहे. पण जर्मन लोक अजूनही सर्व व्यवहार शक्यतो फक्त जर्मन मध्येच करतात.

गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून उच्च शिक्षणातले काही अभ्यासक्रम विद्यापीठांमध्ये जर्मन बरोबर इंग्रजीतूनही शिकवले जातात. त्याला दोन कारणं आहेत. एक म्हणजे युरोपियन युनियनमध्ये सामाईक शिक्षण पद्धत असावी अशा हेतूनं बी.ए. आणि एम.ए. पदवीसाठी अभ्यासक्रम सुरु करण्यात आले; जेणे करून एका देशातले विद्यार्थी दुस-या देशात जाऊन शिकू किंवा नोकरीही करू शकतील. हे इंग्रजीतले अभ्यासक्रम सुरू करण्यामागचे त्याहूनही महत्त्वाचं कारण म्हणजे भारतीय, आशियाई किंवा चीनी अशा परदेशी विद्यार्थ्यांना आकर्षित करणे.

काही मोजक्याच अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी जर्मन भाषेची परीक्षा द्यावी लागत नाही. मात्र विधी, औषधनिर्मिती, वैद्यकशास्त्र, पॅरा मेडिकल सायन्सेस, अंतराळ विज्ञान इत्यादी अभ्यासक्रम फक्त जर्मन भाषेतच शिकवले जातात. शिवाय जर्मनीत नोकरी करण्यासाठी जर्मन भाषेचं ज्ञान असणं अनिवार्य आहे.  गेल्या तीन-चार वर्षांपासून जर्मनीसमोर निर्वासितांचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे या मंडळींना जर्मन भाषा शिकवण्यासाठी अनेक केंद्रं ठिकठिकाणी उघडण्यात आली आहेत. जर्मन समाजात स्वीकारलं जाण्यासाठी जर्मन भाषा येणं ही प्रथम अट आहे याचं हे प्रातिनिधिक उदाहरण म्हणता येईल.

आता परत आपल्या मराठीकडे वळू या. आपल्याकडे प्राथमिक शिक्षणही आता इंग्रजीतून घेण्याचा प्रघात पडतोय. आपल्याकडे विविध क्षेत्रातलं ज्ञान मातृभाषेतून देण्याची परंपराच खुंटली आहे. अर्थशास्त्र, भौतिकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, अंतराळ विज्ञान अशा विषयात जे चिंतन-मनन होतं, ते बहुतांशी इंग्रजीत आणि क्वचितच मराठीमध्ये होतं. गेल्या कित्येक दशकात प्रभाव पडावा असे नवे विचार, सिद्धांत असं मूलभूत ज्ञान मराठीमध्ये फार थोड्या प्रमाणात निर्माण झालं आहे. 

‘आपल्याला इंग्रजी येतं’ अशा समजुतीमुळे दुस-या भाषांमध्ये मांडले गेलेले नवे विचार किंवा ज्ञान मराठीत भाषांतर करण्याची निकड कोणाला वाटत नाही. आपल्याकडे कोशवाङ्मयही फार मर्यादित आहे. परिकोशातले शब्दही फारसे रूळलेले दिसत नाहीत. त्यामुळे भाषा विकसनाचे मुख्य मार्गच खुंटले आहेत. मराठी भाषा टिकण्यासाठी, ती वृद्धिंगत होण्यासाठी विविध क्षेत्रांमधला तिचा वापर अनेक पटीने वाढवणे हे आज आपल्यासमोरचं मोठं आव्हान आहे.  

एकेकाळी वसाहती असणाऱ्या बऱ्याच देशांमध्ये थोड्याफार फरकानं मूळ स्थानिक भाषांचं जवळपास उच्चाटन झालेलं दिसतं. आपले शेजारी देश, दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका खंडातील देश बघितले तर वसाहती करणा-या देशांचीच भाषा सर्वत्र फैलावलेली दिसते. इंग्रजी, फ्रेंच किंवा स्पॅनिश भाषांचा प्रभाव आणि सर्रास वापर अशीच परिस्थिती आहे. आपल्या भाषा आणि आपली संस्कृती खूपच जुन्या आणि प्रगत असल्यामुळे त्याचं संपूर्ण उच्चाटन झालेलं नाही. मात्र आपल्या मातृभाषेच्या विकासासाठी नितांत प्रयत्नांची आवश्यकता आहे. 

- नीती बडवे 
neetibadwe@gmail.com

(लेखिका सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून जर्मन भाषेच्या  प्राध्यापक म्हणून निवृत्त झाल्या आहेत. त्यांनी , प्रसिद्ध जर्मन लेखक फ्रान्त्झ काफ्का याच्या निवडक कथां थेट जर्मनमधून मराठीत  अनुवादित केल्या आहेत. ते पुस्तक 'निवडक काफ्का' या शीर्षकाखाली साहित्य अकादमीकडून प्रकाशित झाले आहे.)

Tags: जर्मनी मातृभाषा दिन नीती बडवे Neeti Badwe German Germany Load More Tags

Comments:

Kalyani Madan

Very interesting and informative article on the development of German language.

l. s. khamkar

मातृभाषेतून शिक्षण किती महत्वाचं आहे हे अतिशय सुंदर प्रकारे आपण या लेखाद्वारे पटवून दिले आहे. त्याबद्दल धन्यवाद.

Manoj Barve

फारच छान व माहितीपूर्ण लेख. धन्यवाद! बरीच वर्ष जर्मनी मध्ये राहूनसुद्धा ती भाषा कशी विकसित झाली हे आज कळले.

SHIVAJI V PITALEWAD

नवीन माहिती मिळाली. भाषा ज्ञान विज्ञानाच्या संदर्भात भर पडली.

Add Comment