विचार कसा करावा हे तत्त्वज्ञान शिकवते

दिवाळी 2024 निमित्त मुलाखत 3/5

दिवाळीनिमित्त कर्तव्य साधना वरून पाच विशेष मुलाखती घेऊन येत आहोत. 

1. टीव्ही या माध्यमाचा सखोल अभ्यास असलेली अभिनेत्री-लेखिका मुग्धा गोडबोले
2. भाषांवर आणि अभिनयावर प्रेम करणारा अभिनेता-अभिवाचक नचिकेत देवस्थळी
3. 'जेन झी'साठी भूगोल, पर्यावरण, तत्त्वज्ञान असे जड विषय रंजक कथा-कादंबऱ्यांतून मांडणारी लेखिका मृणालिनी वनारसे
4. कथ्थकची परंपरा आणि आजच्या काळाला सुसंगत कथनं यांचा मेळ घालणारी नृत्यांगना मानसी गदो 
5. नवोदित लेखक-कवी-नाटककार-दिग्दर्शक-बालसाहित्यिक मुक्ता बाम

या पाच विचारशील, प्रयोगशील कलाकारांना आजपासून सलग पाच दिवस त्यांच्या मुलाखतींतून आपण भेटणार आहोत. 

त्यातील आजची ही तिसरी मुलाखत.


आपल्या आजूबाजूच्या जगात सूक्ष्मजीवांपासून ते अंतराळातल्या ग्रहगोलांपर्यंत सर्वत्र सतत काहीतरी घडत असतं. ते कसं घडतं? का घडतं? ते आपल्याला कसं समजतं? आपण त्याचा कसा विचार करतो? या आणि अशा काही मूलभूत प्रश्नांची सोपेपणाने उकल करणारी लेखिका – मृणालिनी वनारसे. निसर्ग, पर्यावरण, संस्कृत, संस्कृती, भूगोल, पुरातत्त्वशस्त्र, तत्त्वज्ञान अशा अनेक विषयांचा तिचा अभ्यास आहे. सध्या कुमार ते तरुण वयात असलेल्यांसाठी, म्हणजेच जेन झी साठी, ती ज्ञानरंजन (infotainment) प्रकारात मोडणाऱ्या कथा-कादंबऱ्या लिहिते. विषय शिकायची गोडी लागेल अशी पाठ्यपुस्तकं लिहिते. लहान मुलांपासून ते विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांसाठी वेगवेगळ्या टप्प्यावर उपयोगी पडतील असे वेगवेगळ्या विषयांचा एकमेकांशी संबंध जोडून सर्वंकष विचार करायला शिकवणारे (interdisciplinary) अभ्यासक्रम तिने आखले आहेत. तिचं हे विशेष काम जाणून घेण्यासाठी तिच्याशी संवाद साधला.

मृणाल, तुझं शिक्षण, कौटुंबिक जडणघडण, यांत कोणते असे टप्पे आले, ज्यामुळे तू या वेगळ्या धाटणीच्या कामाकडे वळलीस?
सुरुवात खरंतर फार मजेशीर झाली. मला दहावीला चांगले गुण मिळाले होते, त्यामुळे घरच्यांना मी विज्ञान शाखेत प्रवेश घ्यावा असं वाटत होतं, माझ्या आजोबांची अशी इच्छा होती की, मी वकिलीचे शिक्षण घ्यावं वगैरे. पण माझ्या डोक्यात वेगळेच प्रश्न होते. शाळेत शिकतो ते वेगवेगळे विषय येतात कुठून? आणि कोणी ठरवलं की ज्ञानाच्या अशा काही शाखा असतात? इत्यादी. माझ्या शिक्षकांकडे त्याची नेमकी उत्तरं तयार नव्हती, पण मी स्वतःच याचा शोध घ्यावा यासाठी त्यांनी मला उद्युक्त केलं. कॉलेजच्या प्रवेशाच्या वेळी वेगवेगळ्या विषयांचे अभ्यासक्रम चाळताना तत्त्वज्ञानाच्या अभ्यासक्रमात ‘ज्ञानाविषयीचं ज्ञान’ असा विषय सापडला, म्हणून मी ते शिकायचं ठरवलं. हे शिकून पुढे काय, याची मला तर तेव्हा कल्पना नव्हतीच, आणि आईबाबांनाही फार अंदाज नव्हता. पण त्यांनी मला अडवलं नाही. पुढे याच विषयात एम ए केलं, तेव्हा ‘एन्व्हायर्नमेंटल फिलॉसॉफी’ (पर्यावरण-तत्त्वज्ञान) असा एक विषय मी निवडला, कारण हा विषय मला आजच्या जगाशी जोडून ठेवेल असं वाटलं. माणूस आणि निसर्ग यांच्या नात्याची चिकित्सा, इतिहास, धर्म, संस्कृती यांच्यात दिसणारं त्या नात्याचं स्वरूप, अशा वेगवेगळ्या गोष्टी त्यात मी शिकले, पण तरी प्रॅक्टिकल जगातल्या गोष्टींची जाण मला फार आली नव्हती. ते कुतूहल घेऊन इकॉलॉजीचं पुढचं शिक्षण घेण्यासाठी पुण्याच्या इकॉलॉजिकल सोसायटीमध्ये गेले. तिथे प्रकाश गोळे सरांनी मला खात्री दिली की हा विषय नैसर्गिक विज्ञानाचा असला तरी माझं आधीचं शिक्षण मानव्यविद्या शाखेतलं असल्याचा मला फायदाच होईल. वेगवेगळ्या दृष्टीकोनांतून विषय समजून घेणं सोपं जाईल. त्याप्रमाणे मी एक वर्षाचा नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंटचा (नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन) डिप्लोमा केला. आणि मधल्या काळात टिळक महाराष्ट्र विद्यापीठात संस्कृतमध्ये बी ए आणि एम ए पण पूर्ण झालं. त्यानंतर मी अगदी अलीकडे 12-13 साली इंडॉलॉजीमध्ये पण एम ए केलं.

मी जे काही शिकले ते बरंचसं इंटर-डिसिप्लिनरीच (वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करणारं) आहे. आणि मला उत्तम मार्गदर्शनही मिळत गेलं, त्यामुळे आपल्याला मिळणारी प्रत्येक नवी माहिती, येणारे सर्व अनुभव एकमेकांना जोडून बघण्याची, त्यांची संगती लावण्याची सवय लागली. त्या ट्रेनिंगचा पुढे 15 वर्षांच्या फील्डवर्कमध्ये खूप उपयोग झाला.

फील्डवर्कचं नेमकं स्वरूप काय होतं?
वेगवेगळ्या ठिकाणची भूमी, पाणी, परिसंस्था, निसर्ग आणि माणूस यांचा संकलित अभ्यास केला. वेगवेगळ्या ठिकाणी कशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या नैसर्गिक प्रक्रिया घडतात, परिसंस्था काम कशा करतात, तिथलं मानवी अस्तित्व कसं विकसित होत गेलं, त्याचा परिसंस्थेवर कसा प्रभाव पडला, हे प्रत्यक्ष त्या त्या ठिकाणी जाऊन पाहिलं. तिथले आजचे प्रश्न पहिले. विशेषतः ओढे, तलाव, नद्या अशा वेगवेगळ्या जलाशयांच्या परिसरात मानवी हस्तक्षेपामुळे निर्माण होणारे प्रश्न सोडवून, जलाशयांची परिसंस्था सुधारण्यासाठी प्रत्यक्षात स्थानिक लोकांना काय करता येईल याचा अभ्यास करून त्यांना योग्य त्या सूचना केल्या. आणि तेव्हाच परिसरशिक्षणाच्या संदर्भात स्थानिक शाळा आणि मुलं यांच्यासोबतसुद्धा अनेक प्रकारे काम केलं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत आणि भारताच्या अनेक दुर्गम भागांत मी अशा कामासाठी फिरले. त्या काळात सतत अनुभवातून शिकणं आणि शिकवणं सुरू होतं.

या प्रदीर्घ फील्डवर्कच्या काळातले काही विशेष अनुभव सांगू शकशील?
मी सातपुड्याच्या आदिवासी भागामध्ये बाएफ या संस्थेतर्फे शिक्षणमित्र नावाच्या उपक्रमात काम करत होते. तिथल्या एका शाळेत परिसंस्था हा विषय शिकवायचा होता. शाळेतल्या शिक्षकांनी बहुधा खास मला दाखवण्यासाठी म्हणून खूप उत्साहाने एका मुलाकडून शास्त्रीय परिभाषेतल्या व्याख्या पाठ करून घेतल्या होत्या, त्याने त्या घडघडा म्हणूनही दाखवल्या. मला आश्चर्य वाटलं, पण काहीतरी वेगळं आहे असंही जाणवत होतं. मी त्या मुलाचं कौतुक केलं आणि मग प्रश्न विचारला, “तुमच्या आजूबाजूला आहे का एखादी परिसंस्था?” या शाळेच्या मागे डोंगर होता, बाजूने ओढा होता, झाडी होती, समोर मोकळं आभाळ होतं, तो काय सांगतो याबद्दल मला उत्सुकता होती. त्याने जरा गोंधळून शिक्षकाकडे पाहिलं, तर सर दुसरीकडेच बघायला लागले. थोडा वेळ विचार करून तो मुलगा म्हणाला ‘आमच्याकडे नाहीये परिसंस्था.’ मग मी त्यांना ओढ्यावरती घेऊन गेले आणि परिसंस्था म्हणून त्याची ओळख करून दिली. जे शाळेच्या पुस्तकातून त्यांना शिकवलं जातं ते त्यांच्या रोजच्या अनुभवाचा भाग आहे असा सांधा त्यांना जुळवून दिला परिसरशिक्षण त्यांना अधिक आवडू लागलं.

सातपुड्यातला चांदसैली घाट चढून गेल्यावर अत्यंत दुर्गम भागातली एक शाळा होती. त्या शाळेमध्ये मला कचरा म्हणजे काय हे समजावून सांगायचं होतं. मला या विषयाचा उद्देश आधी कळला नव्हता. पण तिथे गेल्यावर मला कळलं की या विषयाचं तिथे महत्त्व काय आहे. त्या गावात कचराच नाही. परिसर अभ्यासात कचरा, त्याचे ढीग साठणं, तो उघड्या नाल्यातून वाहत दूरवर जाणं, त्यामुळे निर्माण होणारे प्रदूषणाचे आणि आरोग्याचे प्रश्न वगैरे अभ्यासक्रमातला भाग त्यांना समजतच नसे. कारण त्यांच्यासाठी सर्व वस्तूंचा पुनर्वापर आणि नैसर्गिक कचरा आहे त्या मातीत मिसळणं हे रोजचं जगणं अहेम अगदी प्लास्टिक जरी असलं तरी त्यांच्याच मातीचा भाग होणार आहे, कुठेतरी जाणार नाहीये. ही माझ्यासाठी शिकण्याची वेळ होती.

एकदा मी एका शाळेतल्या मुलांना घेऊन बाहेर गेले होते आणि पाऊस पडायला लागला. माझ्याकडे छत्री होती ती छत्री मुलांनी पहिली आणि त्या तेवढ्या वेळामध्ये आपापली छत्री बनवली. सागवानाची पानं घेतली त्याला काठी लावली आणि त्यांनी फार सुंदर छत्र्या बनवल्या माझ्यासमोर ऐटीत छत्री घेऊन ती चालत होती. खूप गोड दृश्य होतं ते. आणि पुन्हा एकदा मला असं वाटलं की इथे मीच शिकायला आले आहे. त्यावेळी अजून माझ्याकडे स्मार्टफोन नव्हता त्यामुळे तो क्षण मी त्या अर्थाने पकडून ठेवू शकले नाही, पण मी बघत होते की शहरातल्या किंवा गावातल्या मुलांसारख्या वस्तू यांच्याकडे नसल्या तरी कुठेही त्यांचं अडत नाही. ही मुलं वर्गात गप्प बसायची पण परिसरात जाऊन त्यांच्याशी त्याविषयी बोलताना आपणच चार गोष्टी नव्या शिकतोय, त्यांच्या परिसंस्थेची त्यांना जाण आहे, हेच दिसायचं.

आता तू शाळा महाविद्यालयाच्या व्यवस्थेतूनही आणि त्याच्याबाहेर स्वतंत्रपणेही मुलांबरोबर काम करते आहेस. त्याचं स्वरूप थोडं वेगळं आहे. त्यात पर्यावरणापेक्षा तत्त्वज्ञानाचा भाग अधिक असतो. या विषयाला धरून अगदी लहान मुलांपासून ते कॉलेजच्या वयाच्या युवकांपर्यंत तू वेगवेगळ्या पद्धतीने काम करतेस. त्या कामाचं उद्दिष्ट आणि स्वरूप काय आहे?

खरंतर काळ नेहमीच पुढे सरकत असतो आणि आपल्या आजूबाजूची परिस्थिती कायम बदलत असते. पण गेल्या दोन-तीन दशकांमध्ये बदलाचा वेग प्रचंड वाढलेला आहे आणि त्यातले दोन बदल खूप व्यापक आणि प्रभावी आहेत. एक म्हणजे कम्प्युटर सायन्स, माहिती तंत्रज्ञान, आणि ए आय चा उदय – ही गोष्ट आपल्या आधीच्या पिढ्यांना माहितीच नव्हती. आणि दुसरा आहे हवामान, ऋतुचक्र आणि वातावरण यातले आकस्मिक बदल. या पार्श्वभूमीवर ह्या जेन झी च्या मुलांकडे बघताना जाणवतं की एका बाजूला ही माणसाची नैसर्गिक अपत्यं आहेत आणि अजूनही त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये सारखेपणा आहे. आपल्याप्रमाणेच त्यांचं शरीर, मेंदू यांचा विकास होतो, भाषा शिकणं, विचार करणं, वस्तू हाताळणं, सजीव-निर्जीव फरक लक्षात येणं वगैरे क्षमता आणि बुद्धिमत्ता उपजत जशी आपल्यात होती तशीच त्यांच्यात आहे. पण त्यांच्या आसमंतात खूपच वेगळी परिस्थिती आणि आव्हानं आहेत.

उदाहरण द्यायचं तर माणूस बोलायला शिकायच्या आधी ऐकायला आणि पाहायला शिकतो, हलत्या किंवा वेगळ्या वस्तूंकडे आपलं लक्ष सहज जातं. हा सर्व पिढ्यांतल्या सर्व माणसांच्या बौद्धिक प्रक्रियेचा भाग आहे. पण आजच्या पिढीच्या डोळ्यापुढे हलती-बोलती-रंगीबेरंगी चित्रं सहजपणे कुठे दिसतात? तर डिजिटल स्क्रीनवर. मग ते फोन पासून सिनेमापर्यंत काहीही असेल. त्यांचा तिकडे नैसर्गिकपणे आणि परिस्थितीजन्य ओढा आहेच. मग काय करायचं? तर जिथे त्यांचं लक्ष जातंय तिथे आपला चांगला आणि रंजक कंटेंट असायला पाहिजे. मनोरंजनाकडून भवतालाचं भान देण्यापर्यंत आणि त्याही पुढे जाऊन मुलांना सजग विचार करायला अनुकूल परिस्थिती निर्माण करणं, हे फॅसिलिटेटर म्हणून माझं काम आहे. उदाहरणार्थ तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये बघत रस्ता क्रॉस करत असाल तर खऱ्या धोक्याचा सामना करायचा असताना त्या स्क्रीनचा उपयोग नाही, हे समजणं, ही पहिली पायरी झाली. तिथे वास्तवाचं भान पाहिजे. ते वास्तव काय आहे, त्याचे नियम काय आहेत, इथपर्यंतचा विचार त्यांनी करायला लागणं, मग आणखी पुढच्या टप्प्यावर शास्त्रातले ऊर्जेच्या अक्षय्यतेचे, उत्क्रांतीचे नियम, प्रत्यक्ष सृष्टीत कसे दिसतात, सृष्टी कशी चालते याचा विचार करावा हे मला हवं असतं. या सगळ्या नियमांचा माणसावर काय परिणाम होतो, त्या त्या नियमांशी जुळतं घेऊन आपल्याला जगणं अधिक सुकर करता येतं, नसती संकटं ओढवून घ्यावी लागत नाहीत अशी फिलॉसॉफी मी फॅसिलिटेटर म्हणून स्वतःजवळ बाळगते आणि मुलांनाही द्यायचा प्रयत्न करते.

रोजच्या व्यवहारात विचार कसा करावा, तो अधिक सखोल कसा करत न्यावा हे तत्त्वज्ञानातून मी शिकले. रोजच्या अनुभवातल्या वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करत, गोष्टी सांगत, खेळ खेळत ते मुलांना शिकवणं हे माझं काम आहे असं मला वाटतं. 

प्रक्रिया कोलर्निंग स्पेस या शाळेत, माझ्याकडे कार्यशाळेला येणाऱ्या वेगवेगळ्या वयातल्या लोकांसाठी, कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी आणि विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मी असे interdisciplinary अभ्यासक्रम तयार केले आहेत, जे रोजच्या जगण्याचा, विचारप्रक्रियेचा आणि तत्त्वज्ञानाचा, संबंध उलगडून दाखवतात.

अकरावी बारावीच्या पातळीसाठी तत्त्वज्ञानाचं एक पाठ्यपुस्तकसुद्धा तू तयार केलं आहेस. त्याची प्रक्रिया काय होती?
अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी फिलॉसॉफी हा विषय उपलब्ध आहे अशीसुद्धा मुलांना कल्पना नसते. आणि हे शिकून पुढे काय होणार, पैसे कसे कमावणार वगैरे हेही माहीत नसतं. असं पाठ्यपुस्तक हवं की जे मुलांना वाचायला आवडेल, ते त्यांना आपल्याशी जोडलेलं आहे असं वाटेल आणि त्याच्यातून या विषयात उच्चशिक्षणाचा विचार करावासा वाटेल किंवा अगदी त्यांनी पुढचं शिक्षण नाही घेतलं तरी एकूण विचार कसा करावा याची तत्त्वज्ञानामध्ये जी बैठक तयार होते त्याचा उपयोग अन्य कामातही होऊ शकेल. त्या समितीची प्रमुख म्हणून बालभारतीबरोबर मी दोन वर्ष काम केलं. माझ्याबरोबर अनेक चांगले शिक्षक होते.

तत्त्वज्ञान हे तत्त्वज्ञानाचा इतिहास, आणि तत्त्वज्ञांचा इतिहास अशा अंगाने शिकवायची पद्धत होती. पण 'मला काय वाटतं, माझी विचारचक्रं कशी फिरतात? हे समजण्यासाठी काही साधनं मला कशी मिळतील?', अशा अंगाने तत्त्वज्ञानाचा विचार आम्ही पुस्तकातून मांडला. हे काम सोपं नव्हतं. पण ते पुस्तक तत्त्वज्ञानाच्या विद्यार्थ्यांनी तर वाचलंच पण इतर विषयाच्या विद्यार्थ्यांनीही ते वाचलं. काहींनी ते पुस्तक वाचून फिलॉसॉफी शिकत राहायचं ठरवलं. खूप समाधान वाटलं.

एखादं असं उदाहरण सांगशील का ज्यात तू एखादा तत्त्वज्ञानाचा प्रश्न आपल्याशी जोडून दाखवून अधिक रस निर्माण केलास?

संपूर्ण फिलॉसॉफीचा जो पसारा आहे त्यात मोठे महत्त्वाचे तीन प्रश्न आहेत आणि तीनच आहेत - “काय आहे?”, “ते कळतं कसं”, आणि “आपण करायचं काय?” ते आपल्या जगण्यातल्या कोणत्याही अनुभवाशी जोडून घेत येतात. एक उदाहरण घेऊ. समजा कोणी म्हणालं की वादळ येणार आहे. तर “काय आहे” चं उत्तर मिळालं – वादळ. पुढचा प्रश्न असा येतो की हे कळलं कसं?-तर सोसाट्याचा वारा सुटला आहे, आभाळ भरले आहे, हवामान खात्याचा अंदाज आहे, त्यावरून कळलं. आणि या दोन प्रश्नांवरती आधारित तुम्ही तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर हळूहळू मिळवता की मी करणार काय आहे? तर, घरात राहणार आहे. थोडा अन्न-पाणीसाठा, टॉर्च वगैरे तयारी ठेवणार आहे.

दुसरं उदाहरण सोशल मीडियाचं पाहू. हे काय आहे, या प्रश्नाच्या उत्तरादाखल त्याची सगळी तांत्रिक माहिती, लोकांना एकमेकांशी जोडण्याचं उद्दिष्ट वगैरे मला माहीत करून घेता येतं. ते मला कसं कळतं? तर माझा अनुभव, वाचन, जाणकारांशी चर्चा, यांतून माझं ज्ञान तयार होतं. आणि मग त्याचा मी योग्य त्या पद्धतीने स्वतःसाठी वापर करण्यासाठी काय करीन किंवा काय टाळीन हे मला त्याच्यामधून कळतं. समजा मी पहिल्या दोन्ही प्रश्नांकडे फारसं लक्ष दिलेलं नसेल तर माझी कृती आंधळी होईल. तो विवेकाने घेतलेला निर्णय नसेल.

या प्रकारच्या वैचारिक प्रक्रियेला ‘फिलॉसफायजिंग’ म्हणतात. आपल्या आयुष्यातल्या विषयांचा असा विचार करायला शिकणं हे माझं उद्दिष्ट असतं.

शाळा महाविद्यालयांच्या परिघाबाहेर कशा पद्धतीने तू मुलांबरोबर काम करतेस?

मला आणि माझ्या नवऱ्याला (प्रसाद वनारसे) लहान मुलांबरोबर काम करण्याची आवड आहे. गेली 25-30 वर्षे आम्ही ते करतो आहोत. आनंदरंग या आमच्या उपक्रमात सुट्टीची कला शिक्षण शिबिरं असायची. गेल्या सहा वर्षांपासून आम्ही त्यात माझ्या विषयांची भर घातली आहे. मी मुलांना घेऊन टेकडीवर फिरायला जाते, पेरीपेटॅटिक शाळेच्या पद्धतीने काम करते. म्हणजेच फिरत फिरत, समोर जे दिसत असेल, अनुभवाला येत असेल, त्याचा संदर्भ घेऊन बोलत बोलत अभ्यासविषयाचा विचार विद्यार्थ्यांपर्यंत थेट पोहोचवते. परिसंस्था-पर्यावरण याविषयी आणि तत्त्वज्ञानातल्या गोष्टींविषयी मुलांशी बोलते. समोर येतील त्या गोष्टींचा विचार करणे, कधी चर्चा विवाद करणे, कधी नुसते पाहणे, स्वतःशी विचार करणे, अशा सर्व पद्धतींनी आम्ही दिसेल ते नीट पाहतो. आणि फिलॉसॉफीचे मूलभूत विचार आकाराला येतात.

'कूल्फि' नावाचा उपक्रमही आम्ही मुलांसाठी सुरू केला 'कूल फिलॉसॉफी' या दोन शब्दांपासून बनलेलं हे नाव आहे. खेळ, गप्पा या माध्यमातून मुलांच्या डोक्यातील विचारचक्र सुरू करणं हा उद्देश आहे. त्याचं एक उदाहरण सांगते. “मी कोण आहे?” हा एक गंभीर प्रश्न आहे. फिलॉसॉफी मध्ये दोन-दोन हजार वर्षा त्यावर चर्चा झाली आहे. पण मुलांना आत्मविश्वास होता की आपल्याला उत्तर सापडेल. त्यांनी स्वतःची ओळख करून दिली होती, त्यांच्याच ओळखीमधून या आपल्या आयडेंटिटीकडे आपण कसे बघू शकतो हे आम्ही पहिले. एक आपली जैविक ओळख असते - माणूस.  एक सांस्कृतिक ओळख असते - ज्यात आपण भारतीय, अमुक रंगाचे, तमुक भाषा बोलणारे, विशिष्ट ठिकाणी राहणारे, विशिष्ट धर्म पाळणारे वगैरे गोष्टी येतात. आणि तिसरी ओळख म्हणजे माझी वैयक्तिक जडणघडण - माझी मतं. मग असं लक्षात आलं की जी जैविक ओळख आहे ही जगभरात जिथे जिथे माणूस आहे तिथे तिथे ती सारखी आहे. मग सगळया माणसांत काय सारखं असेल? तर असे 90-95 मुद्दे मुलांनी शोधले, त्यात खाणे-पिणे-झोपणे यापासून लग्न करणे, फजिती करणे, मस्करी करणे, विचार करणे असे मानसिक मुद्देही होते. नाच किंवा भाषा यासारख्या गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाच्या असतील, पण तरी ते नाच आणि भाषा असतील, त्या दृष्टीने ते सारखेच असतील. सांस्कृतिक ओळखीत अशाच गोष्टी येतील ज्या विशिष्ट समूहासाठी सारख्या आणि संपूर्ण जगाचा विचार केलं तर वेगवेगळ्या दिसतील. इतर प्राणी आणि आपण यांच्यात काय साम्यस्थळं आहेत त्याची मुलांनी यादी केली, 50 टक्क्याहून जास्त साम्य आहे असं लक्षात आलं. मग मनुष्य-प्राणी ही संकल्पना त्यांना पटली.

सर्व प्राण्यांना खाणं आणि अनावश्यक अन्न बाहेर टाकणं या क्रिया अनिवार्य असतात. अन्न निर्माण करणाऱ्या वनस्पतींवर आपण खाण्यासाठी अवलंबून असतो आणि बाहेर पडलेल्या गोष्टींची विल्हेवाट सूक्ष्मजीव लावतात. पूर्ण सृष्टीच्या अन्नसाखळीचा विचार केला तर निर्माण झालेलं अन्न खाणे आणि खाल्लेल्या अन्नाचे अवशेष बाहेर टाकणे एवढंच प्राणी म्हणून आपलं काम असतं. आणि जोवर वनस्पती आणि सूक्ष्मजीव या दोन्ही गोष्टींचा समतोल असतो, तोवर प्राण्यांची मजा असते. हा दृष्टिकोन समजून घ्यायला मुलांना मजा येते, मग सूक्ष्मजीव काम कसं करतात हे बघायला त्यांना आवडते. एखादी गोष्ट का शिकायची याचा हेतू सापडला की त्यांना ते शिकणं त्यांना आवडतं. त्यांना अधिक माहितीसाठी स्रोत उपलब्ध आहेत पण तिथपर्यंत घेऊन जाण्याचा जो प्रवास आहे आहे त्यात मी त्यांच्याबरोबर दोन पावलं टाकते. हा माझ्यासाठी खूप आनंदाचा भाग असतो.

वेगवेगळे गहन विषय रंजक आणि सोपे करत तू वेगवेगळ्या वयोगटांसाठी लेखनही करतेस. कोणत्या वयोगटासाठी काय काय लेखन तू केलेलं आहेस?
वर्तमानपत्रांतून, नियतकालिकांतून मी लेखन केलं आहे. प्रतीक आणि घाटमाथा या दोन कादंबऱ्या आहेत - आपली भूमी आणि आपण या इकॉलॉजीतल्या विषयाला धरून त्या लिहिल्या आहेत. प्रतीकची गोष्ट कोकणातली आहे, घाटमाथा नावाप्रमाणेच घाटमाथ्याच्या भूमीतली आहे आणि आता मी त्याच मालिकेतली गवताळ प्रदेशातली कादंबरी इंग्लिशमध्ये लिहिते आहे. कुमारवयातला वाचक डोळ्यासमोर ठेवून हे लिहिलं आहे.

‘आपले अभयारण्य’ ही रानव्याशी संबंधित गोष्ट आहे. 'प्रश्नांचा दिवस' हे पुस्तक मुलांना प्रश्न पडण्याच्या प्रक्रियेकडे घेऊन जाणारं आहे. त्याला 2020 चा राज्य पुरस्कार मिळाला होता. त्याच्यानंतर ‘गोष्टीमागच्या गोष्टी’ ‘भूगोलगोष्टी’ अशी काही पुस्तकं आहेत. भूगोलगोष्टीमध्ये वेगवेगळ्या भौगोलिक संकल्पनांचा उदय कसा झाला, त्या त्या शास्त्रज्ञांना त्या कल्पना कशामुळे सुचल्या याच्या रंजक गोष्टी आहेत. किशोर मासिकातून माझ्या गोष्टी प्रसिद्ध होतात.

आणि मी स्टोरीटेल या प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या विज्ञान-विषयांत काम करणाऱ्या माणसांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. त्या कुमार ते कॉलेजचा वयोगट यांच्यासाठी उपयोगी आहेत. अकरावी-बारावीसाठी पाठ्यपुस्तकं आहेत. लहान मुलांसाठी एक गोष्टीचं पुस्तक समकालीन प्रकाशनाकडून लवकरच प्रसिद्ध होईल. आणि मला आता मुलांसाठी ऑडिओ-विज्युअल या माध्यमातून काम करण्याची इच्छा आहे.

याशिवाय मी डार्विन नावाचं नाटक लिहिलं आहे ते मराठीत रंगभूमीवर आलेलं आहे, आता हिंदीतही येणार आहे. आणखी दोन एकांक लिहिले आहेत. रंजकता राखून अभ्यासविषय मांडणे हे सूत्र त्यातही आहे. ते युवक प्रौढ वयोगटाला केंद्रस्थानी ठेवून लिहिलं आहे.

पर्यावरणविषयक कार्यशाळांतून तुझा कोणता विशेष विषय असतो? 
पर्यावरणविषयक जागरूकता जागवणारे, झाडे वाचवा, टेकडी वाचवा, नदी, वाचवा, कचरा कमीत कमी करा, किंवा स्वच्छता अभियान यांसारखे विशेष फोकस ठेवून काम करणारे खूप लोक आहेत. ते आपापल्या क्षेत्रात उत्तम काम करत आहेत, त्यांच्यापेक्षा थोडी वेगळी मांडणी मी करते. ‘पर्यावरणासाठी काय चांगले’ यापेक्षा ‘माझ्यासाठी काय चांगले’ याकडे मी मुलांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करते.

“मी काहीही केलं तरी ते ecofriendly नसतं त्यामुळे मला परिसर अभ्यास आवडत नाही.” “आधीच्या पिढ्यांनी विचार ना करता मजा केली आणि पर्यावरणाची वाट लावली आणि आम्ही का सगळी काळजी घ्यायची?” अशी मतं असतात मुलांची. मी त्यांना सांगते की, "आजही मजा करायची आहे, आणि उद्याही मजा करायची आहे. आज बेधुंदपणे मजा कराल तर उद्याची मजा तुम्हाला दिसणारच नाही. हे सूत्र सगळ्या गोष्टींना लावून बघा. असं करत गेलात की परिसराशी तुमचं नातं चांगलंच राहील. आणि आधुनिक सोयीसुविधांवरचं अवलंबित्व कमी होईल. निसर्गाशी सुसंवाद राहील." मन मानेल तसं न वागता स्वतःला मानवेल तसं वागण्याकडे त्यांची दृष्टी मी वळवते.

लेखक म्हणून तुला सर्वाधिक समाधान देणारी गोष्ट कोणती?
आपल्या आजूबाजूला माहितीचा आणि मनोरंजनाचा भडिमार आहे, त्याच्यामध्ये मी ज्या पद्धतीचे लिखाण करू इच्छिते त्याचा वाचक हा कसा असू शकतो हे मला माहीत आहे. किंवा मी जे काही मुलांबरोबर प्रत्यक्ष काम करते, फिरते, बोलते, लिहिते त्यातून एकूणातच मी काय म्हणू इच्छिते हे हळूहळू पचनी पडणारं आहे. त्यामुळे वाचकांचा प्रतिसाद हा माझे काम जसजसे वाढते आहे, तसतसा हळूहळू वाढतो आहे.

नाही नाही म्हणता पुष्कळ वर्ष या तऱ्हेचं लिखाण माझ्या हातून झालं आहे. खूप गावांमध्ये माझं लेखन लोकांना माहीत आहे, आवडतं. आता माझा असा वाचक आहे, जो माझ्या पुढच्या गोष्टीची वाट बघतो. माझ्या कामाकडे अपेक्षेने बघतो. 
कधीतरी एखादा फोन येतो, “मी बारावीत आहे आत्ता, आणि मी तुझ्या किशोरमधल्या गोष्टी खूप लहानणापासून वाचतो आहे आणि मला तुझा नंबर मिळाला म्हणून मी फोन केला. मी आता मोठा झालोय पण मी तरीसुद्धा किशोर वाचतो.” किंवा “मी ओढ्यावर बसलेय आणि तुझी ती ‘चंदेरी माशाची उडी’ गोष्ट वाचतेय. आणि आमच्यकडे पण असेच मासे वर जातात. तू कधी येशील बघायला?” आणि अशा क्षणी मी भारावून जाते, सद्गदित होते. जिथे कदाचित मी स्वतः नसते पोहोचू शकले तिथे पण माझ्या गोष्टी पोहोचतात याचं समाधान वाटतं आणि एखाद्या लेखकासाठी याहून चांगली गोष्ट काय असणार?

खरं आहे. हे समाधान तुला कायम जास्तीत जास्त मिळत राहो, तुझं काम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत राहो, त्यांना अशा अभ्यासाची, अशा वाचनाची गोडी लावणारं ठरो हीच सदिच्छा.

संवाद आणि शब्दांकन - ऋचा मुळे
kartavyasadhana@gmail.com

Tags: sadhana digital kartavya sadhana mrunalini vanarase coolphi kids activist environmental philosophy Load More Tags

Comments:

Prajwal kamble

Khub Chand

Add Comment