जगातील दुसरी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा : स्पॅनिश 

21 फेब्रुवारी : आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनानिमित्त...

फोटो सौजन्य: worldbyisa.com

21 फेब्रुवारी हा दिवस जगभर आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने स्पेन आणि इराण  या दोन देशांतील अनुक्रमे स्पॅनिश आणि फारसी या भाषा आणि या भाषांचे त्या-त्या देशातील स्थान या विषयी दोन लेख प्रसिद्ध करत आहोत. त्यापैकी स्पॅनिश भाषेची ओळख करून देणारा हा लेख. तर फारसी भाषेवरील लेख उद्या प्रसिद्ध होईल.

युरोप खंडाच्या नैऋत्येला असलेला आणि फुटबॉल, बुल फायटिंग, सिएस्ता म्हणजेच वामकुक्षी यांसाठी प्रसिद्ध देश म्हणजे स्पेन. सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असलेल्या या देशाची भाषा... स्पॅनिश....  

स्पॅनिश भाषेला स्पॅनिशमध्ये ‘एस्पान्योल’ किंवा ‘कास्तेयानो’ असे म्हणतात... परंतु जरी संपूर्ण स्पेनमध्ये स्पॅनिश बोलली जात असली आणि समजत असली तरी ती तेथील ‘एकमेव’ अधिकृत भाषा आहे हा समज चुकीचा आहे. भारताप्रमाणेच काही प्रांतांमध्ये तेथील स्थानिक भाषेला स्पॅनिशच्या जोडीला अधिकृत भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. उदाहरणार्थ, कातालुन्या प्रांतात ‘कातालान’ आणि ‘स्पॅनिश’ या दोन्ही भाषा अधिकृत आहेत. 

स्पॅनिशप्रमाणे पोर्तुगीज, इटालिअन, फ्रेंच या भाषासुद्धा लॅटिन मूळ असलेल्या भाषा आहेत... त्यामुळे या भाषांमध्ये कमीजास्त प्रमाणात साधर्म्य आढळते. तसेच यांपैकी एक भाषा बऱ्यापैकी चांगली अवगत असल्यास उरलेल्यांपैकी कोणतीही दुसरी भाषा अवगत करणे सोपे जाते.  

स्पॅनिशचा उगम लॅटिन भाषेतून झाला आहे. रोमन काळात लॅटिन ही इबेरिअन द्वीपकल्पातील अधिकृत भाषा होती. कालांतराने तिथे राहणाऱ्या वेगवेगळ्या (सेल्ट्स, व्हिसिगॉथस इत्यादी) लोकांच्या वापरातून स्पॅनिश भाषा घडत गेली. तसेच अरबी भाषेचादेखील प्रभाव या भाषेवर आहे. 

जवळपास 4000 स्पॅनिश शब्दांचे मूळ अरबीत असल्याचे म्हटले जाते... त्यामुळेच काही शब्द हिंदी शब्दांसारखे वाटतात. उदाहरणार्थ, मेसा  - मेज (टेबल), आरमारिओ-आलमारी (कपाट). अरबी भाषेचा प्रभाव असण्याचे मुख्य कारण म्हणजे जवळपास 700 वर्षे अरबांचे स्पेनमधील वास्तव्य. साधारण सातव्या शतकापासून चौदाव्या शतकापर्यंत स्पेनच्या दक्षिणेला असलेल्या अफ्रिका खंडातून अरब स्पेनमध्ये आले आणि साहजिकच इतकी वर्षे राज्य केल्याचा प्रभाव भाषेतून दिसला नसता तर ते नवलच ठरले असते.   

स्थानिक भाषकांच्या संख्येनुसार क्रम लावल्यास स्पॅनिश आता जगात दुसरी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. स्पॅनिश ही केवळ स्पेनमधली अधिकृत भाषा नसून स्पेनव्यतिरिक्त 20 देशांमधील अधिकृत भाषा आहे... जी युनायटेड नेशन्समधील सहा अधिकृत भाषांपैकी एक आहे. एवढेच नव्हे... तर युनायटेड स्टेट्समध्ये इंग्लीशनंतर सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा स्पॅनिश आहे. अमेरिकेतील बऱ्याच जागांची नावेदेखील स्पॅनिशच आहेत. उदाहरणार्थ, लॉस अँजेलिस (स्पॅनिश उच्चार - लोस आंखेलेस), सॅन होजे (स्पॅनिश उच्चार - सान खोसे). या घडीला जवळपास  अठ्ठावन्न कोटी स्पॅनिश भाषक आहेत आणि मेक्सिको हा सर्वाधिक स्पॅनिश भाषक असणारा देश आहे.   

स्पेनमध्ये बोलली जाणारी भाषा अमेरिका खंडापर्यंत एवढ्या प्रमाणात पोहोचली कशी? स्पेनबाहेर या भाषेचा प्रसार होण्याचे मुख्य कारण स्पॅनिश लोकांनी केलेले वसाहतीकरण आहे. चौदाव्या शतकात ख्रिस्तोफर कोलंबस हा खलाशी भारताच्या शोधार्थ निघाला आणि दक्षिण अमेरिकेत पोहोचला. त्यानंतर या खंडाच्या बहुतांश भागात स्पॅनिश वसाहती वसवल्या गेल्या. आज दक्षिण अमेरिकेत ब्राझील आणि काही छोटे देश वगळता सर्वत्र स्पॅनिश बोलली जाते... परंतु काही देशांत तेथील मूळ रहिवाशांच्या (रेड इंडिअन्सच्या) काही भाषादेखील (उदाहरणार्थ, केचुआ) जिवंत आहेत हे विशेष नमूद करण्यासारखे.

स्पेनचे भारताशी असलेले एक जुने नाते म्हणजे तिथले जिप्सीज्‌. (त्यांना रोमानी किंवा रोमा असेदेखील संबोधले जाते.) त्यांच्या भाषा आणि आनुवंशिकतेवर झालेले अभ्यास असे दर्शवतात की, हे लोक मूलतः भारतातील वायव्य भागातले आहेत. स्पेनमध्ये स्थायिक झालेले जवळपास 50 टक्के जिप्सीज्‌ हे दक्षिण स्पेनमधील आंदालुसिया प्रांतात राहतात आणि त्यामुळेच या प्रांतात उगम पावलेल्या ‘फ्लामेंको’ या जगप्रसिद्ध नृत्यप्रकारात आणि संगीतप्रकारात आपण भारतातील नृत्यप्रकार आणि संगीत यांच्याशी साधर्म्य असणाऱ्या गोष्टी अनुभवू शकतो.

दर बारा कोसांवर भाषा बदलते असे आपण म्हणतो... त्यामुळे आपण कल्पना करू शकतो की, या सर्व देशांत स्पॅनिश बोलली जात असली तरी प्रत्येक जागी तिच्यात काहीतरी वेगळेपण आहे... म्हणूनच अनेक देशांमध्ये बोलल्या जाणाऱ्या या भाषेच्या प्रमाणीकरणाचे काम करण्यासाठी 1713मध्ये ‘रेआल आकादेमिया ऍस्पान्योला’ची (रॉयल स्पॅनिश अकादमीची) स्थापना करण्यात आली. अकादमीचे मुख्यालय जरी स्पेनच्या राजधानीत माद्रिदमध्ये असले तरी ती सर्व स्पॅनिश भाषक देशांशी जोडली गेलेली आहे. 

आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून इंग्लीशचे ज्ञान सध्या गरजेचेच झाले आहे... त्यामुळे इतर लोकांप्रमाणे अधिकाधिक स्पॅनिश भाषकही ही भाषा आत्मसात करू पाहत आहेत. त्याचप्रमाणे नवनवीन इंग्लीश शब्ददेखील या भाषेत समाविष्ट होत आहेत... परंतु इतर युरोपीय देशांप्रमाणे त्यांना त्यांच्या भाषेविषयी प्रेम, आदर, अभिमान आहे आणि प्राधान्यदेखील स्पॅनिश भाषा अथवा स्थानिक भाषा बोलण्यालाच दिले  जाते.  

भारतीय माणसे आणि स्पॅनिश माणसे यांच्यात निश्चितच काही सारखी वैशिष्ट्ये आहेत. उदाहरणार्थ, मैत्रिपूर्ण आणि मोकळा स्वभाव... सण उत्सव जोमाने साजरे करायची आवड इत्यादी. भारताप्रमाणेच कुटुंब आणि मित्रमैत्रिणी हे समाजजीवनाचे खूप महत्त्वाचे घटक आहेत... त्यामुळेच सगळे उत्सव आणि विशेषतः नाताळ एकत्र मिळून साजरा केला जातो. 

मराठी भाषेत आणि स्पॅनिशमध्ये अनेक गोष्टी सारख्या आहेत जसे समोरच्या व्यक्तीला आदराने ‘तुम्ही’सारखे संबोधन वापरणे. काही म्हणी, वाक्‌प्रचार हेसुद्धा सारखेच आहेत. उदाहरणार्थ, आगीत तेल ओतणे, (एखाद्या ठिकाणी) चार टाळकी असणे इत्यादी. काही काही वाक्यरचना तर इंग्लीशपेक्षा मराठीशी साधर्म्य दाखवणाऱ्या आहेत. स्पॅनिश लिहायला आणि वाचायला सोपी भाषा आहे. आपण जे लिहितो तेच वाचतो... म्हणजेच तुम्हाला उच्चार माहीत असल्यास स्पेलिंग लक्षात ठेवायची फारशी गरज पडत नाही.   

स्पॅनिशमध्ये अक्षरे इंग्लीश अक्षरांसारखी असली तरी दोनतीन अक्षरे वेगळी आहेत. त्यातील ‘ñ’ (उच्चार-न्य) हे आवर्जून सांगण्यासारखे... कारण बऱ्याच वेळा ते अक्षर या भाषेची ओळख अथवा प्रतीक म्हणून वापरले जाते. या भाषेतील आणखी एक वेगळेपण म्हणजे दोन उद्गारवाचक आणि  दोन प्रश्नार्थक चिन्हे; एक उलट आणि एक सुलट (¿...?, ¡......!). जसे इतर भाषांमध्ये ही चिन्हे एखाद्या वाक्याच्या अथवा शब्दाच्या नेहमी शेवटी दिली जातात...  तसे स्पॅनिशमध्ये सुरुवातीला एक (उलट चिन्ह) आणि शेवटी एक (सुलट चिन्ह) असे दिले जाते. ¿ आहे की नाही मजेदार?

स्पॅनिश लोक कलाप्रेमी आहेत. मिगेल दे सेरवानतेसने लिहिलेल्या दोन भागांत प्रसिद्ध झालेल्या ‘दोन  किखोते’ (Don Quixote) या कादंबरीला जगातील प्रथम आधुनिक कादंबरी मानले जाते. गॅब्रिएल गार्सिया मार्केझ, पाब्लो नेरुदा, खुआन रामोन खिमेनेस यांसारख्या नोबेल पारितोषिकाने सन्मानित प्रसिद्ध साहित्यिकांनी या भाषेतील साहित्य समृद्ध केले आहे. 

यांपैकी बरीचशी पुस्तके व कादंबऱ्या अनेक भाषांत भाषांतरित केल्या गेल्या आहेत आणि जगभरात आवडीने वाचल्या जात आहेत. केवळ साहित्यच नाही तर संगीत, चित्रकला, सिनेमा इत्यादी सर्वच कलाक्षेत्रांत स्पॅनिश भाषकांनी निश्चितच महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. 

- मृणालिनी साठे

(लेखिकेने सावित्रीबाई फुले विद्यापीठातून स्पॅनिश भाषेचा अडवान्स डिप्लोमा पूर्ण केला असून त्या स्पॅनिश भाषेचा अभ्यासवर्ग घेतात.)

mrunalinis.fld@gmail.com

Tags: मराठी मातुभाषा दिन स्पॅनिश स्पेन मृणालिनी साठे Marathi Mrunalini Sathe Mother Language Day Spanish Spain Load More Tags

Comments:

राजीव जोशी

भाषा ही संस्कृतीचे प्रतीक आणि प्रतिबिंब असते. ह्या लेखात ते जाणवते. प्रदेश आणि भाषिक अस्मिता यांचा संबंध कधी घातक तर कधी समावेशक असतो. खूप छान आणि अभ्यासपूर्ण लेख आहे. अभिनंदन.

Jayant Ghate

स्पॅनिश भाषेसंबंधी फार छान माहिती! जगात बोलली जाणारी दुसऱ्या नंबरची ही भाषा हे माहीत नव्हते!

प्रगती पाटील

उत्तम माहिती. स्पॅनिशप्रमाणेच फ्रेंच आणि इटालियन भाषेतील काही शब्दांचे मराठी शब्दांशी साधर्म्य आहे. मराठीत जसे आपण समोरच्या व्यक्तीला 'तू' म्हणतो तसेच फ्रेंच आणि इटालियनमध्येही म्हणतात. फरक इतकाच की फ्रेंचमध्ये tu चा उच्चार 'च्यू' असा आहे, परंतु इटालियनमध्ये tu चा उच्चार मराठीप्रमाणेच 'तू' असा आहे.

Anant Phatak

Sufficient information

Add Comment