हैद्राबाद येथे चट्टनपल्ली गावात, कामावरून घरी परतणाऱ्या महिलेवर सामुहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. निर्जन स्थळी तिचा मृतदेह अर्धवट जळलेल्या अवस्थेत सापडला. याविषयीची चर्चा सुरु असतानाच, 2 डिसेंबरला छत्तीसगढमधील मुरका या गावातही अशीच घटना घडली. या दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया उमटल्या. त्या अनुषंगाने बलात्कारासारख्या घटनेविषयीच्या सामाजिक मानसिकतेवर मेघना भुस्कुटे यांनी टाकलेला दृष्टीक्षेप.
हैद्राबाद आणि पाठोपाठ राजपूरमध्ये नोंदल्या गेलेल्या बलात्काराच्या निर्घृण गुन्ह्यांची पार्श्वभूमी या टिपणाला आहे. दोन्ही घटनांनंतर देशभरात संतापाची लाट उसळली. त्यामध्ये झालेल्या ऊहापोहात असं निष्पन्न झालं की दिल्लीत घडलेल्या निर्भया-बलात्कारनंतर, अशा प्रकारच्या घटनांना आळा बसावा म्हणून राज्यांकरता केंद्राकडून देऊ करण्यात येणारा विशेष निधी अनेक राज्यांनी वापरलेलाच नाही. यावरही निरनिराळ्या संतप्त, दुःखी, भयभीत, हतबल प्रतिक्रियांची नोंद झाली. खासदार जया बच्चन यांच्यासारख्या जबाबदार पदावर कार्यरत असणार्या व्यक्तीनं 'या गुन्हेगारांना सार्वजनिकरीत्या ठार करावं' अशा आशयाचं भारतीय कायद्यामागची मानवी चौकट धाब्यावर बसवणारं वक्तव्य केलं. 'या गुन्हेगारांना फाशी दिलं पाहिजे, त्यांना ठेचून मारलं पाहिजे, त्यांचं लिंग छाटलं पाहिजे...' अशा प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या. पण त्याहूनही अधिक, 'काय करणार, जोवर स्त्री सुरक्षित नाही, तोवर काळजी घेणं भाग आहे. सोबत चाकू, तिखटाची पुडी बाळगा, आत्मसंरक्षणासाठी कराटे शिका, शक्यतोवर सुनसान ठिकाणी एकट्यानं जाऊ नका...' अशाही सल्ल्यांची भाऊगर्दी उसळली.
लोकांचं दु:ख, भीती, हतबलता, संताप वगैरे सगळं मान्य करूनही अशा प्रकारच्या घटनांनंतरचा, भीतीनं थरथर कापणाऱ्या, दुःखानं हतबल झालेल्या, संतापानं लिंगं कापायला निघालेल्या लोकांचा उद्रेक मला अविचारी वाटला; चिंताग्रस्त करून गेला. त्या उद्रेकाचीच भीती वाटली थोडी! कारण फक्त आत्ताच नव्हे, तर कायमच लोकांच्या अशा प्रतिक्रियांतून मला खालील गृहीतकं दिसतात.
१) 'बलात्कार हा जगातला नीचतम गुन्हा आहे. कारण जगात सर्वांत मौल्यवान आहे, ते बाईचं शील - त्याची सुरक्षितता, काच, भांडं, कांदा, लसूण...' हे गृहीतक मानणारे लोक वैवाहिक बलात्कारावर मात्र ज्या कोलांट्या मारमारून बोलतात, त्या बघून करमणूक होते, सत्यदर्शनही होतं. विवाहसंस्था टिकली पाहिजे, त्यामुळे अशा प्रकारच्या बलात्काराबद्दल काय करणार, अशा आशयाचं अजब तर्कशास्त्र हे लोक वापरतात. तिथे स्त्रीच्या सुरक्षिततेचा प्रश्न त्यांना सतावत नाही. कारण शीलाचा बंदोबस्त लग्नामुळे झालेला असतो.
२) 'बायांना सुरक्षितता मिळायला हवी, नाहीतर त्यांनी मरायला तरी तयार राहायला हवं.' या गृहीतकाचा आविष्कार करणार्या प्रतिक्रिया आणि / किंवा सल्ले पुढीलप्रमाणे : रात्री उशिरा येऊ नये, अपुरे कपडे घालू नयेत, अंग पूर्ण झाकावे, छचोरपणे वागू नये, पोटी मुलगी आली तर भीती वाटते, बाई गं, गर्भातच का मेली नाहीस या विटंबनेऐवजी, इत्यादी. म्हणजे मुलगी बलात्कारापासून सुरक्षित असेल तरच ती सुरक्षित आहे. एरवी जगली काय, मेली काय! मुलगी म्हणून तिला कामाच्या ठिकाणी भेदभावाला सामोरं जावं लागलं, तर त्याचं काय इतकं! तो कमी महत्त्वाचा गुन्हा आहे, पण बलात्कार? अहं. बलात्कार नव्हे, हाहाकार!
३) 'बलात्कार हा रानटी (किंवा पाशवी किंवा निर्घृण किंवा जे काही विशेषण योग्य वाटत असेल ते...) गुन्हा आहे.' होय, बलात्कार हा अतिशय वाईट गुन्हा आहेच. पण त्यामुळे आपल्यालाही आपोआपच गुन्हेगाराशी त्याच पातळीवर वागण्याचा अधिकार मिळतो; असं हे गृहीतक मानणार्या लोकांना वाटतं. कारण स्त्रीच्या शीलाची उर्फ योनीची परपुरुषांपासून सुरक्षितता, हाच तेवढा समाजाचा मुख्य हक्कबिक्क असतो; कायद्याची, मानवी हक्क जपणारी, सुसंस्कृततेचा दंडक घालून देणारी सत्ता हा जणू समाजाचा हक्क नाहीच. असलाच, तर तो शीलाच्या नंतर. आधी शील.
ही गृहीतकं अतिशय चिंताजनक आहेत. त्याखेरीजही काही प्रकारचे भेदभाव बलात्काराला दिल्या जाणार्या प्रतिक्रियांमध्ये दिसतात. कितीतरी दलित खुनांमध्ये वा बलात्कारांमध्ये हाल-हाल करून मारण्यातल्या क्रौर्याची परिसीमा झालेली दिसते. त्याबद्दलची आकडेवारी शोधली तर अवाक व्हायला होतं. पण त्याबद्दल इतक्या आणि इतक्या तीव्र भावनिक प्रतिक्रिया येत नाहीत, फार काय, अनेकदा बातम्याही येत नाहीत वा लावून धरल्या जात नाहीत. पण मध्यमवर्गीय वा उच्चवर्णीय बाईचा बलात्कार आणि/वा खून असेल, तर आधी माध्यमं आणि मग लोक, नुसते कासावीस होतात. कधीकधी तर मेणबत्ती मोर्चेही काढण्याइतके अस्वस्थ होतात!
होय, मी उपरोध वापरते आहे. पण त्यातून 'बलात्कार हा कमी दर्जाचा गुन्हा आहे' असं मी सुचवते आहे का? तर तसं अजिबात नाही. तो घृणास्पद, हिणकस आणि विकृत गुन्हाच आहे. शारीरिक हल्ल्याची भयानकता त्याला आहेच, खेरीज लैंगिक परिमाणही आहे - ज्यातून पीडित व्यक्तीच्या उत्तरायुष्यात प्रचंड मानसिक आणि सामाजिक गुंतागुंती उद्भवू शकतात. पण त्याखेरीज बलात्काराला जे असाधारण भावनिक, सामाजिक, राजकीय स्थानही आहे, ते जाणीवपूर्वक कमी करण्याची गरज आहे. कारण, बलात्कार लैंगिक गुन्हा असला तरीही त्याची कारणं बहुतेकदा वर्चस्व गाजवण्याच्या गरजेत दडलेली असतात; वासनेत नव्हे. अतिशय जवळच्या नात्यातल्या माणसांकडून वा परिचितांकडून मुलींवर आणि स्त्रियांवर होणारे लैंगिक अत्याचारही असतातच; पण सामाजिक असमतोलातून वा आर्थिक असमाधानातून आलेला राग, स्त्री-पुरुषसमता न पचल्यामुळे बळानं सिद्ध करावं वाटणारं वर्चस्व, इतर व्यक्तिगत वैमनस्यांतून आलेला राग काढायची बिनतोड आणि स्त्रीला हमखास गप्प बसवण्याची संधी... या कारणांनी होणारे बलात्कार अधिक असतात, असं अनेक अभ्यासांनी दाखवून दिलं आहे.
दोन्ही प्रकारांमध्ये या प्रकारच्या गुन्ह्याबद्दल एक असाधारण सामाजिक धास्ती दिसून येते. इतकी, की मुदलात गुन्हा घडल्याची नोंद वा पोलिसात तक्रार करणं या बाबीही टाळण्याकडे लोकांचा प्राथमिक कल असतो. तो हळूहळू बदलायला लागला आहे. पण तरीही 'बलात्कार झाला, म्हणजे सर्वस्वावर हल्ला झाला' अशा प्रकारची प्रतिक्रिया आधुनिक विचारांच्या लोकांकडूनही अजूनही दिली जाते. या अवास्तव सामाजिक धास्तीचे परिणाम मला अधिक भयावह वाटतात त्याची कारणं पुढीलप्रमाणे -
१) कडक वा हिंस्र वा सार्वजनिक क्रौर्याची शिक्षा ठरवल्यामुळे गुन्हेगाराला शिक्षा होण्याची शक्यता अधिकाधिक कमी होते. कारण शिक्षा जितकी मोठी, तितकी अंमलबजावणी कमी असं निरीक्षण सांगतं.
२) बलात्काराविषयीच्या धास्तीची परिणती फार सहज आणि चटकन 'आपल्याला काळजी घ्यावीच लागते हो...' ("कपडे पूर्ण घालून अंग झाक, अंधाराच्या वेळेआधी परत, सोबत एक पुरुष बाळग...काय करणार? नाही ना परिस्थिती आदर्श? आपल्याला जपलं पायजे..." इत्यादी.) या दटावणीत होते. स्त्रीच्या सार्वजनिक वावरावर वेळेची बंधनं येतात. ती बळी जाऊ नये, ही तिचीच जबाबदारी असल्याचं भासवलं जातं. तिच्याच वर्तणुकीकडून अधिकच्या अपेक्षा करायला सुरुवात होते. कारण गुन्ह्याचं स्वरूप इतकं भयानक 'भासतं' की त्याला बळी पडण्याहून मरण पत्करणं बरं, असा समज समाजाने कळत-नकळत आपल्या सगळ्यांच्याच नेणिवेत रुजवलेला असतो. त्यापुढे स्वातंत्र्य गमावण्याची किंमत क्षुद्र असल्याचं भासतं. यामुळे स्त्री-पुरुषसमतेचं पाऊल मागे जातं.
आणि म्हणूनच, बाईच्या स्वातंत्र्याची जपणूक आणि वाढ करू पाहणारी व्यक्ती म्हणून, ते मला अधिक धोक्याचं नि अन्यायकारक वाटतं.
मेघना भुस्कुटे
meghana.bhuskute@gmail.com
(मेघना भुस्कुटे या भाषांतरकार आणि ब्लॉगर आहेत.)
हेही वाचा : काळ कठीण आहे, जागतं राहायला हवं!
Tags: मेघना भुस्कुटे स्त्री स्त्री-पुरुष समानता rape Load More Tags
Add Comment