'चले जाव' चा ठराव मंजूर झाल्यावर गांधीजींनी केलेले समारोपाचे भाषण

महात्मा गांधींनी 'चले जाव' ठरावावर केलेले ऐतिहासिक भाषण : 3

भारतीय स्वातंत्र्यासाठी झालेला अखेरचा लढा 'चले जाव' या नावाने प्रसिद्ध आहे. 9 ऑगस्ट 2021 रोजी हा लढा ऐंशीव्या वर्षात पदार्पण करत आहे. ब्रिटिशांनी तत्काळ हा देश भारतीयांच्या हाती सोपवून चालते व्हावे असा निर्वाणीचा इशारा देण्यासाठी 8 ऑगस्ट 1942 रोजी लाखोंच्या उपस्थितीत कॉंग्रेसच्या वतीने 'चले जाव'ची घोषणा देण्यात आली. या ऐतिहासिक सभेत मौलाना आझाद, पंडित नेहरू, सरदार पटेल आणि महात्मा गांधी अशी चौघांची भाषणे झाली. या घटनेला 75 वर्षे पूर्ण झाली तेव्हा, म्हणजे 9 ऑगस्ट 2017 रोजी साधना प्रकाशनाने ही सातही भाषणे पुस्तिकेच्या रूपाने प्रसिद्ध केली. आज 9 ऑगस्टच्या निमित्ताने 'चले जाव' आंदोलनातील गांधीजींची तीन भाषणे कर्तव्यवरून प्रसिद्ध करत आहोत. त्यातील हे एक भाषण... 

ज्यांची सेवा करण्याचा हक्क मला नुकताच प्राप्त झाला, त्यांच्यापुढे माझ्या मनातील खळबळ व्यक्त करण्यात मी फार वेळ खर्ची घातला. त्यांनी मला आपला पुढारी (लष्करी भाषेत बोलायचे म्हणजे सेनापती) नेमले आहे. परंतु या नेमणुकीकडे मी लष्करी दृष्टीने पाहत नाही. कारण दुसऱ्यावर सत्ता गाजविण्यास ममत्वबुद्धीशिवाय माझ्याजवळ दुसरे शस्त्र नाही. माझी शक्ती एवढी दांडगी आहे की, मी फक्त एखाद्या सहज मोडता येण्यासारख्या काटकीशीच झटापट करू शकतो. काठीचा आधार घेतल्याशिवाय मला चालता येत नाही. अशा माझ्यासारख्या पंगू माणसाला आपण मोठ्या जबाबदारीचे ओझे वाहण्याला पात्र ठरलो, याबद्दल आनंद वाटणे साहजिकच आहे. तुम्ही माझ्याकडे आपला नेता या दृष्टीने न पाहता, आपला सेवक या दृष्टीने पाहा;  म्हणजे तुम्हाला या जबाबदारीत सहभागी होता येईल. सारख्या गुणवत्तेच्या माणसामध्ये जो सेवाधर्माचे पालन अधिक चांगल्या तऱ्हेने करतो, तोच नेतृत्व स्वीकारण्यास योग्य ठरतो.

माझ्यावर पडलेल्या जबाबदारीत तुम्हाला सहभागी व्हावयाचे असल्याने, माझ्या मनात चाललेली विचारांची खळबळ तुमच्यापुढे व्यक्त करणे आणि आता पुढे काय करावयाचे हे तुम्हाला थोडक्यात सांगणे, मला प्राप्तच होते.

मी तुम्हाला आरंभीच सांगतो की, प्रत्यक्ष लढ्याला आजच सुरुवात होणार नाही. नेहमीप्रमाणे मला बऱ्याच औपचारिक गोष्टी अजून करावयाच्या आहेत. असह्य होईल इतकी मोठी जबाबदारी माझ्यावर येऊन पडली आहे. ज्या गटांचा माझ्यावर सध्या तरी विश्वास नाही, त्यांच्याशी मला चर्चा केली पाहिजे. मला हे माहीत आहे की- गेल्या काही दिवसांत माझ्या अनेक मित्रांचा माझ्यावरचा विश्वास इतका उडाला आहे की, माझ्या शहाणपणाबद्दल आणि सचोटीबद्दलही त्यांना संशय वाटू लागला आहे. माझ्या दृष्टीने माझे शहाणपण ही फारशी अमूल्य वस्तू नाही, त्यामुळे ती गमावल्यामुळे मला फारसे दु:ख होणार नाही; परंतु माझी सचोटी हे माझे वैभव आहे आणि ते गमवावयास मी तयार होणार नाही.

जो सत्यनिष्ठ आहे आणि ढोंगीपणा व भित्रेपणा यांना यत्किंचितही थारा न देता जो आपल्या शक्यतेनुसार स्वराष्ट्राच्या व मानवजातीच्या कल्याणार्थ झटतो, अशा माझ्यासारख्या माणसाच्या जीवितातही असे प्रसंग येतात. गेल्या पन्नास वर्षांत मी दुसरे काहीही केले नाही. मी मानवजातीचा नम्र सेवकच राहिलो. अनेक प्रसंगी मी ब्रिटिश साम्राज्याचीही सेवा केली आहे आणि कोणाच्याही आक्षेपाची भीती न बाळगता मी स्पष्टपणाने सांगतो की, उभ्या सार्वजनिक जीवितात मी कधी माझ्या स्वार्थाकडे लक्ष दिले नाही. लॉर्ड लिनलिथगो यांचा मी मित्र होतो आणि आजही आहे. त्यांची-माझी मैत्री ही कामकाजासाठी झालेल्या गाठीभेटींतून आणि नात्यातून निर्माण झाली. लॉर्डसाहेबांना काय वाटते, मला ठाऊक नाही; पण आम्हा दोघांत एकमेकांविषयी जिव्हाळा उत्पन्न झालेला आहे, असे मला वाटते. त्यांनी स्वत:ची कन्या, जावई आणि ए.डी.सी. यांच्याशी एकदा माझी ओळख करून दिली. माझ्यापेक्षा महादेववर (देसाई) त्यांची एकदम मर्जी बसली. लेडी अॅन या सुस्वभावी आणि शालीन आहेत. त्यांचे चांगले व्हावे, असे मला नेहमीच वाटते. लॉर्डसाहेब आणि मी यांच्यातील संबंध किती जिव्हाळ्याचे आहेत, याची तुम्हाला कल्पना यावी म्हणून या बारीकसारीक गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे.

मी खात्रीपूर्वक सांगतो की, साम्राज्यशाहीचे प्रतिनिधी या नात्याने लॉर्ड लिनलिथगो यांच्याविरुद्ध मला जो लढा सुरू करावा लागेल, त्या लढ्याला आमच्यामधील जिव्हाळ्याचे संबंध कोणत्याही प्रकारे बाधा आणणार नाहीत. देशातील लाखो लोकांची शक्ती साह्याला घेऊन आणि अहिंसेच्या शस्त्राशी एकनिष्ठ राहून मला साम्राज्यशाहीचा प्रतिकार करावयाचा आहे. लॉर्डसाहेब माझे मित्र असल्याने त्यांच्याविरुद्ध लढणे मला थोडे कठीण जाणार आहे. मी माझ्या देशबांधवांची त्यांच्याजवळ जी तरफदारी करी, त्यावर ते विश्वास ठेवीत, हे मी मोठ्या आनंदाने आणि अभिमानाने सांगतो. मी हे अशासाठी सांगत आहे की, ब्रिटन आणि साम्राज्यशाही यांच्याशी विश्वासाने वागण्याच्या माझ्या इच्छेचा विसार तुम्हाला द्यावा आणि ज्या गोष्टीवर साम्राज्यशाहीने विश्वास ठेवला नाही, ती गोष्ट त्या साम्राज्यशाहीचा प्रतिनिधी असलेल्या गृहस्थाने मान्य केली याची साक्ष तुम्हाला पटवावी.

या क्षणी, ख्रिस्तवासी चार्ली अँड्र्यूज यांच्या पवित्र आठवणीने माझे मन भरून येत आहे. त्यांचे चैतन्य माझ्याभोवती घिरट्या घालीत आहे, असे मला वाटते. इंग्रजी संस्कृतीचा आदर्श नमुना म्हणून मी त्यांच्याकडे पाहत असे. माझ्या कित्येक हिंदी मित्रांपेक्षाही ते माझे अधिक जवळचे मित्र होते. त्यांचा माझ्यावर फार विश्वास होता. आम्ही नि:संकोचपणे एकमेकांजवळ मन मोकळे करीत असू. विचारांचा आणि भावनांचा नित्य विनिमय आम्हा दोघांत चाले. आपल्या मनातले सर्व विचार ते मला कसलाही आडपडदा न ठेवता मोकळेपणाने सांगत. ते गुरुदेवांचे (टागोर) मित्र असून त्यांना गुरुदेवांबद्दल पराकाष्ठेचा आदर असे आणि त्यामुळे गुरुदेवांचा दराराही त्यांच्याजवळ फार! अर्थात, मैत्रीशी विसंगवादी दिसणाऱ्या या दराऱ्याचा धाक अँड्र्यूजसाहेबांनी आपल्याबद्दल बाळगावा, हे गुरुदेवांना आवडत नसेच. पण अँड्र्यूजसाहेबांच्या स्वभावाचे वळणच तसे होते. माझ्याशी मात्र त्यांची अगदी जिवलग मैत्री होती. काही वर्षांपूर्वी नामदार गोखल्यांकडून परिचयवजा चिठ्ठी घेऊन ते माझ्याकडे आले. ती आमची पहिली भेट! पीअर्सन आणि अँड्र्यूज यांना दुर्दैवाने आपण अंतरलो आहोत. ते दोघे आदर्श इंग्रज गृहस्थ होते. अँड्र्यूजचा आत्मा माझे बोलणे ऐकत असेल, असा माझा विश्वास आहे.

कलकत्ता येथील मुख्य धर्माधिकारी माझ्या चळवळीविरुद्ध आहेत, तरी त्यांनी आज मला शुभाशीर्वादपर तार पाठवली आहे. त्यांना मी ईश्वराचे प्रतिनिधी मानतो. त्यांचे मनोगत मी जाणतो आणि ते माझ्याबद्दल सहानुभूती बाळगतात, हेही मला माहीत आहे.

या सर्व गोष्टी लक्षात घेऊन मी जाहीर करतो की- जरी मला कितीही विरोधकांना तोंड द्यावे लागले, जरी माझ्या अनेक पाश्चात्त्य मित्रांचा माझ्यावरील विश्वास व माझ्याबद्दलचा आदर नाहीसा झालेला असला आणि जरी मी अजूनही त्यांच्या मैत्रीला व प्रेमाला मान देत असलो; तरी तेवढ्यासाठी मी माझ्या विवेकबुद्धीची गळचेपी करणार नाही- मग तिला तुम्ही काहीही नाव द्या. सदसद्विवेकबुद्धी म्हणा किंवा आतला आवाज म्हणा; परंतु माझ्या दु:खाला मी वाचा फोडावी, अशी प्रेरणा मला आतून कोणी तरी करीत आहे खास! मला मनुष्यस्वभावाचे ज्ञान आहे आणि मी मानसशास्त्राचाही अभ्यास केला आहे. तेव्हा ह्या प्रेरणेचा कर्ता कोण, हे मला निश्चित कळते. हा विश्वासू प्रेरक मला सांगत आहे की, ‘तुला धैर्याने जगाच्या डोळ्याला डोळा भिडवला पाहिजे- जरी तू एकाकी असलास ती! सारे जग तुझ्याकडे तांबडे-लाल डोळे करून क्रुद्ध मुद्रेने पाहील. पण भिऊ नकोस. तुझ्या विवेकबुद्धीवर विश्वास ठेव. मित्र, पत्नी सर्वांचा त्याग कर; पण ज्या कार्यासाठी तू जगलास आणि तुला प्राणार्पणही करावे लागेल, ते कार्य सिद्ध करून दाखव!’

मित्रांनो, मी मरावयास उत्सुक नाही. जगता येईल तेवढे जगण्याची माझी इच्छा आहे. मी एकशेवीस वर्षे तरी जगेन, असे मला वाटते. एवढ्या अवधीत हिंदुस्थान स्वतंत्र झालेला असेल. इंग्लंड किंवा अमेरिका हे देश स्वतंत्र आहेत, असे मी स्वत: मानीत नाही. त्यांच्या कल्पनेप्रमाणे ते स्वतंत्र आहेत. जगातील काळ्या आदमींना त्यांनी गुलामगिरीत जखडले असले, तरी त्यांना जाब विचारणारे कोणी नाही. इंग्लंड आणि अमेरिका हे आज कृष्णवर्णीयांच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहेत काय? माझी स्वतंत्रतेची कल्पना व्यापक व विशाल आहे. या कल्पनेला धरून मला असे म्हणावे लागत आहे की, इंग्रज व अमेरिकन कवींनी आणि तत्त्वेवत्त्या गुरूंनी स्वातंत्र्याच्या ज्या कल्पनेचा पुरस्कार केला आहे, तिच्या स्वरूपाची पुरती ओळख अजून इंग्रज व अमेरिकन लोकांना पटलेली नाही. या लोकांचे तत्त्ववेत्ते, त्यांचा इतिहास, त्यांचे वैभवशाली काव्य या सर्वांनी त्यांना असे मुळीच सांगितलेले नाही की, तुमची स्वातंत्र्याची कल्पना तुम्ही विशाल व व्यापक करू नका. इंग्रज आणि अमेरिकन लोकांना जर स्वातंत्र्याच्या खऱ्याखुऱ्या अर्थाची ओळख करून घ्यावयाची असेल, तर त्यांना हिंदुस्थानात आले पाहिजे; मात्र त्यांनी ताठ्याने आणि आपल्याच तोऱ्यात येता उपयोगाचे नाही. कळकळीच्या सत्यशोधकाचीच भूमिका त्यांनी पत्करावयास हवी.

गेली बावीस वर्षे काँग्रेस ज्याचे प्रयोग करत आहे, ते एक मूलभूत सत्य आहे. सनदशीर मार्गांचाच अवलंब करण्याचे ठरवून काँग्रेसने अगदी पहिल्यापासून सहजासहजी आणि निर्हेतुकपणे का होईना, पण अहिंसेच्या व्रताचे पालनच केले. दादाभाई आणि फिरोजशहा हे काँग्रेसचे जणू धनीच होते. काँग्रेसवर त्यांची निस्सीम भक्ती होती आणि त्यांनी तिला तळहाताच्या फोडाप्रमाणे वागवले. विशेष म्हणजे, सेवाधर्माचे पालन त्यांनी मनोभावाने केले. त्या दोघांनीही इंग्रज सरकारविरुद्ध बंडच पुकारले होते; ते बंडखोरच होते. पण खून, रक्तपात, गुप्त कारवाया अशांसारख्या गोष्टींना त्यांनी कधीच मान्यता दिली नाही. आम्हा काँग्रेसवाल्यांमध्येही कुप्रवृत्त लोक नसतीलच, असे मी म्हणत नाही. परंतु एकंदर सर्व हिंदी लोक येत्या चळवळीचे रूप अहिंसक ठेवतील, असा मला विश्वास वाटतो. मला असा विश्वास वाटण्याचे कारण, माणसाच्या अंगी सत्यशोधक सद्बुद्धी उपजतच असते आणि संकटप्रसंगीही ती नैसर्गिकरित्याच टिकून राहते; यावर विसंबून राहण्याचा माझा स्वभावधर्मच बनला आहे. परंतु, जरी माझी ही समजूत तुम्ही खोटी ठरवली, तरी मी लवमात्रही विचलित होणार नाही; माघार घेणार नाही. काँग्रेसवाल्यांच्या पहिल्या पिढीने आरंभापासून सनदशीर मार्गाने स्वराज्य मिळवण्याचे प्रयत्न चालू केले आणि नंतरच्या पिढीने त्या प्रयत्नांना अहिंसा तत्त्वाची जोड दिली. दादाभाई जेव्हा ब्रिटिश पार्लमेंटच्या निवडणुकीला उभे राहिले, तेव्हा सॅलिसबरींनी त्यांना ‘काला आदमी’ अशी पदवी देऊन हिणवले. पण इंग्रज मतदारांनी दादाभाईंनाच मते दिली आणि दादाभाई निवडून येऊन सॅलिसबरी पराभूत झाले. आज जरी हिंदुस्थानात अशा गोष्टींचे कोणाला काहीच विशेष वाटत नसले, तरी दादाभाईंच्या यशामुळे त्या वेळी हिंदी लोकांना हर्षाने वेड लागण्याची वेळ आली होती.

इंग्रज लोक, इतर युरोपियन लोक व दोस्त राष्ट्रे यांनी ह्या सर्व गोष्टी लक्षात घ्याव्यात आणि आपल्या विवेकबुद्धीला विचारावे की, स्वातंत्र्याची मागणी करण्यात हिंदुस्थानने कोणता गुन्हा केला आहे? या सर्व लोकांना मी असे विचारतो की, तुम्ही आमच्यावर अविश्वास ठेवता हे बरोबर आहे काय? अर्धशतकाची थोर परंपरा जिच्या पाठीशी आहे, त्या काँग्रेसवरही तुम्ही विश्वास ठेवत नाही आणि साधेल त्या मार्गाने काँग्रेसच्या प्रयत्नांचा जगभर विपर्यास करू पाहता, हे तुम्हाला शोभते काय? आपल्या वृत्तपत्रांच्या मदतीने, येनकेन प्रकारेण, तुम्ही इंग्रजांनी आमच्या लढ्याला विकृत स्वरूप देण्याचा प्रयत्न करावा; हे उचित आहे काय? या कामी तुम्हाला अमेरिकेच्या अध्यक्षांनी आणि स्वत:चेच आसन स्थिर नसलेल्या चीनच्या जनरॅलिस्मोने हातभार लावला नसेल, अशी मला आशा आहे.

मी जनरॅलिस्मो चँग कै शेकना भेटलो आहे. भेटीच्या वेळी मॅडम चँग शेकनी दुभाष्याचे काम पत्करले होते. जनरॅलिस्मोचा स्वभाव मला नीट कळला नाही, पण मॅडम मात्र मनमोकळ्या आहेत. जनरॅलिस्मोच्या बोलण्याच्या कामातला बराचसा वाटा त्याच उचलत होत्या. स्वातंत्र्याची मागणी करण्यात आमची चूक होत आहे, असे जनरॅलिस्मोने अजूनही म्हटलेले नाही. जगभर आमच्याबद्दल नापसंती व्यक्त केली जात आहे व आमचा निषेध होत आहे आणि ‘काळ-वेळ न पाहता लढा सुरू करण्यात आमची चूक होत आहे,’ असे मत प्रदर्शित केले जात आहे. मला ब्रिटिशांबद्दल मोठाच आदर होता, पण आता ब्रिटिश कौटिल्याची दुर्गंधी मला असह्य होत आहे. अजूनही इतर जगाला त्याची पुरी ओळख व्हायची आहे. वाटेल ते डावपेच लढवून ब्रिटिशांनी जगाचे मत आपल्या बाजूस वळवून घेतले, तरी या सर्व संघटित प्रचाराला हिंदुस्थान जोरदार उत्तर दिल्याशिवाय राहाणार नाही. मी त्या प्रचाराला उत्तर देईन. जगाने मला झिडकारले, तरी मी गर्जून सांगेन, ‘तुम्ही चुकता आहात. सत्तादान करायला जे नाखूश आहेत, त्यांच्या हातातून हिंदी लोक अहिंसेच्या बळावर सत्ता हिसकावून घेतल्याशिवाय राहणार नाहीत.’

माझ्या हयातीत जरी हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाले नाही, तरी त्यामुळे अहिंसा तत्त्वाला कोणत्याही प्रकारे बाधा येणार नाही. अहिंसाव्रत स्वीकारणाऱ्या आणि ब्रिटनपुढे गुडघे टेकून ‘आमची फार दिवसांची बाकी चुकती करा’ असे म्हणणाऱ्या हिंदुस्थानला जर ब्रिटिशांनी स्वातंत्र्य दिले नाही; तर चीन आणि रशिया यांच्यावर मोठेच संकट ओढवेल. आजपर्यंत धनकोने ऋणकोपुढे कधी गुडघे टेकले आहेत काय? कितीही जोराचा विरोध झाला, तरी आम्ही चांगुलपणा सोडत नाही. अंगी पुरेशी सभ्यता बाणवावयास आम्ही शिकलो आहोत. अहिंसाव्रताचे पालन करण्याची आम्ही प्रतिज्ञा केली आहे. मीच काँग्रेसला शांतताप्रिय धोरण पत्करायला लावले आणि तरीसुद्धा आज मीच अशी कडक भाषा बोलतो आहे. जोपर्यंत आमचा मान आणि आमची सुरक्षितता याला बाधा येणार नाही, तोपर्यंत या धोरणाचा आम्ही अवलंब करू; अशी शर्त घालून हे धोरण आम्ही नेहमीच मर्यादित केलेले होते.

जर एखादा मनुष्य माझा गळा धरून मला पाण्यात बुडवावयास निघाला, तर स्वत:च्या सुटकेसाठी मी त्याच्याशी प्रत्यक्ष झटापट करू नये की काय? आज आम्ही पत्करलेले धोरण आणि आमचे मागील धोरण यात कसलाच विसंवाद नाही. आज येथे परदेशांतील वृत्तपत्रांचे प्रतिनिधीही उपस्थित आहेत. त्यांच्या द्वारा मी जगाला सांगू इच्छितो की, जी दोस्त राष्ट्रे ‘हिंदुस्थानच्या साह्याची आम्हाला गरज आहे’ असे म्हणतात, त्यांना हिंदुस्थानला स्वातंत्र्य देण्याची आणि आपली सद्बुद्धी प्रगट करण्याची सुसंधी आज प्राप्त झालेली आहे. या संधीचा त्यांनी फायदा घेतला नाही, तर अशी संधी त्यांना पुन्हा मिळणार नाही. आणि इतिहास असेच नमूद करेल की, हिंदुस्थानने केलेल्या उपकारांची परतफेड दोस्त राष्ट्रांनी वेळेवर केली नाही, म्हणून त्यांना युद्ध गमवावे लागले. मला यश मिळावे, म्हणून जगाने मला शुभाशीर्वाद द्यावेत. दोस्त राष्ट्रांनी आपल्या मर्यादा सोडाव्यात, असे मी म्हणत नाही. त्यांनी अहिंसाव्रत स्वीकारून नि:शस्त्र व्हावे, असेही मला म्हणावयाचे नाही. फॅसिझम आणि जिच्याविरुद्ध आम्ही लढत आहोत ती साम्राज्यशाही- यांच्यामध्ये काही मूलभूत फरक आहेत. हिंदुस्थानकडून ब्रिटिशांना जी-जी मदत हवी, ती-ती सर्व त्यांना मिळत आहे काय? हिंदुस्थानकडून त्यांना आज जी मदत मिळत आहे, ती पारतंत्र्यात राबवत असलेल्या हिंदुस्थानकडून मिळत आहे. परतंत्र हिंदुस्थानही जर आपल्याला इतकी मदत करू शकतो, तर स्वतंत्र हिंदुस्थान आपला दोस्त बनल्याने आपला किती फायदा होईल, याचा दोस्त राष्ट्रांनी विचार करावा. आम्हाला स्वातंत्र्य हवे- ते आजच हवे. आम्हाला स्वातंत्र्य देणे न देणे ज्यांच्यावर अवलंबून आहे, त्यांनी जर आज आपल्या सामर्थ्याचा आमच्या मदतीसाठी उपयोग केला नाही, तर ते स्वातंत्र्य बेचव होईल. तुम्ही जर आज आपल्या सत्तेचा आमच्या कल्याणार्थ उपयोग केलात; तर आज जे घडून येणे अशक्य वाटत आहे, ते उद्या स्वातंत्र्याच्या प्रकाशात खात्रीने घडून येईल. स्वतंत्र हिंदुस्थान चीनचे आणि रशियाचे स्वातंत्र्य टिकवून धरण्याला मदत करील. स्वतंत्र हिंदुस्थान साह्याला आल्यावर इंग्रजांवर मलाया आणि बर्मा येथे जीव गमावण्याची वेळ येणार नाही.

सध्याची परिस्थिती आम्हाला कशाने सुधारता येईल? मी चाळीस कोटी हिंदी लोकांना कुठल्या मार्गाने जायला सांगू? हुकूमशाहीच्या पकडीतून जगाची मुक्तता करण्याला हा चाळीस कोटी लोकांचा विशाल जनसमुदाय कशामुळे सिद्ध होईल? या सर्व प्रश्नांचे उत्तर स्वातंत्र्य हेच आहे. आज हिंदी लोकांच्या चित्तात उल्हासाचे चैतन्य सळसळताना दिसत नाही. त्यांच्या आशा-आकांक्षांचा चुराडा होत आहे. त्यांचे नेत्र जर नव्या तेजाने चमकावयास हवे असतील, तर त्यांना आजच्या आज स्वातंत्र्य मिळालेच पाहिजे. आणि म्हणून ‘करू किंवा मरू’ या दृढ निश्चयाने लढावे, असा मी काँग्रेसला आदेश दिला आहे आणि त्या आदेशाप्रमाणे वागण्याची काँग्रेसची प्रतिज्ञा आहे!

वंदे मातरम्

- महात्मा गांधी


वाचा 'चले जाव' च्या सभेत महात्मा गांधी यांनी केलेली इतर दोन भाषणे :  

'चले जाव'चा ठराव मंजुरीला टाकण्यापूर्वी गांधीजींनी केलेले प्रास्ताविक

'चले जाव'चा ठराव मंजूर झाल्यावर गांधीजींनी केलेले मुख्य भाषण 


8 ऑगस्ट 1942 च्या 'चले जाव' आंदोलनातील  ऐतिहासिक व दुर्मिळ भाषणे प्रथमच पुस्तकरुपात - 'चले जाव - 1942च्या ठरावातील भाषणे'. हे पुस्तक खरेदी करण्यासाठी इथे क्लिक करा.

 

Tags: चले जाव ठराव चले जाव क्रांती दिन 9 ऑगस्ट मराठी भाषण चले जाव महात्मा गांधी मौलाना आझाद सरदार पटेल पंडित जवाहरलाल नेहरू इंग्रज ऑगस्ट क्रांती हिंदू- मुस्लीम Chale Jao Mahatma Gandhi Maulana Azad Pandit Jawaharlal Nehru British August Kranti Hindu-Muslim Sardar Patel Load More Tags

Add Comment