'चले जाव'चा ठराव मंजूर झाल्यावर गांधीजींनी केलेले मुख्य भाषण 

महात्मा गांधींनी 'चले जाव' ठरावावर केलेले ऐतिहासिक भाषण : 2

भारतीय स्वातंत्र्यासाठी झालेला अखेरचा लढा 'चले जाव' या नावाने प्रसिद्ध आहे. 9 ऑगस्ट 2021 रोजी हा लढा ऐंशीव्या वर्षात पदार्पण करत आहे. ब्रिटिशांनी तत्काळ हा देश भारतीयांच्या हाती सोपवून चालते व्हावे असा निर्वाणीचा इशारा देण्यासाठी 8 ऑगस्ट 1942 रोजी लाखोंच्या उपस्थितीत कॉंग्रेसच्या वतीने 'चले जाव'ची घोषणा देण्यात आली. या ऐतिहासिक सभेत मौलाना आझाद, पंडित नेहरू, सरदार पटेल आणि महात्मा गांधी अशी चौघांची भाषणे झाली. या घटनेला 75 वर्षे पूर्ण झाली तेव्हा, म्हणजे 9 ऑगस्ट 2017 रोजी साधना प्रकाशनाने ही सातही भाषणे पुस्तिकेच्या रूपाने प्रसिद्ध केली. आज 9 ऑगस्टच्या निमित्ताने 'चले जाव' आंदोलनातील गांधीजींची तीन भाषणे कर्तव्यवरून प्रसिद्ध करत आहोत. त्यातील हे एक भाषण... 

कम्युनिस्ट सभासदांशिवाय बाकीच्या सर्वांनी दणदणीत बहुमताने ‘चले जाव’ ठरावाला पाठिंबा दिल्यानंतर सरकारशी बोलणी करण्याच्या कामी नियुक्त केलेले काँग्रेसचे प्रतिनिधी आणि काँग्रेसदलाचे सेनापती महात्मा गांधी आपले मुख्य भाषण (हिंदीतून) करायला उठले. कम्युनिस्ट सभासदांनी ‘चले जाव’ ठरावाविरुद्ध मते दिली आणि मातृभूमीला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या आपण विरुद्ध आहोत, हे त्यांनी पुन्हा सिद्ध केले.

स्वतंत्र हिंदुस्थानचे एकमेव प्रतिनिधी महात्मा गांधी म्हणाले, ...‘चले जाव’चा ठराव तुम्ही मान्य केलात, त्याबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो. ‘चले जाव’ ठरावाला बहुमताचा पाठिंबा आहे, हे माहीत असूनही ज्या तीन कॉम्रेड्सनी विभागणीबद्दलची उपसूचना जोरदार रीतीने मांडण्याचे धैर्य दाखवले, त्यांचे आणि ज्या तेरा मित्रांनी ठरावाविरुद्ध मते दिली, त्यांचेही मी अभिनंदन करतो. त्यांनी असे केले, त्याबद्दल त्यांना शरम वाटण्याचे काहीच कारण नाही. आपल्या बाजूला बहुमताचा पाठिंबा मिळाला नाही  किंवा आपले हसे झाले तरीही धीर सोडू नये, ही गोष्ट शिकण्याचा प्रयत्न आम्ही गेली वीस वर्षे करत आलो आहोत. आपण जे करीत आहोत ते बरोबरच आहे, या आत्मविश्वासावर श्रद्धा ठेवावयास आम्ही शिकलो आहोत. निश्चयाचे बळ आपण आपल्या अंगी वाढवले पाहिजे, कारण त्यामुळे माणसाची नैतिक उंची वाढते आणि त्याला एक प्रकारचा उदात्तपणा प्राप्त होतो. गेली पन्नास वर्षे ज्या तत्त्वाला अनुसरण्याचा मी प्रयत्न केला, ते तत्त्व ठरावाला विरोध करणाऱ्या माझ्या मित्रांनी आत्मसात केलेले पाहून मला हर्ष होत आहे.

उपसूचना करणाऱ्यांचे अभिनंदन करूनही मी असे म्हणतो की- आपल्या उपसूचनांद्वारे काँग्रेसने जे स्वीकारावे असा त्यांचा आग्रह आहे, ते चालू परिस्थितीच्या स्वरूपाशी जुळणारे आणि सुसंगत नाही. मौलाना आझादांनी उपसूचना मागे घेण्याविषयी केलेल्या विनंतीचा उपसूचनाकार मित्रांनी विचार करावयास हवा होता आणि त्याबरोबरच जवाहरलालजींनी केलेले स्पष्टीकरणही त्यांनी काळजीपूर्वक लक्षात घ्यायला हवे होते. यांनी जर असे केले असते, तर त्यांना स्पष्टपणे समजून चुकले असते की- ज्या हक्काला काँग्रेसने मान्यता द्यावी असे आपणाला वाटते, तो हक्क काँग्रेसने केव्हाच मान्य केलेला आहे.

एक काळ असा होता की, ज्या वेळी प्रत्येक मुसलमान माणूस हिंदुस्थान हीच आपली मातृभूमी समजे. जितकी वर्षे अल्लीबंधू माझ्या संगतीत होते, तितक्या वर्षांत आम्ही त्यांच्याबरोबर जी बोलणी आणि चर्चा केली, त्या सर्वांच्या बुडाशी हिंदुस्थान जितका हिंदूंचा तितकाच मुसलमानांचाही आहे, ही कल्पना गृहीत धरलेली असे. मी असे प्रतिज्ञेवर सांगू शकतो की, ही कल्पना म्हणजे अल्लीबंधूंनी आणलेले उसने अवसान नव्हते, तर त्यांची तशी मनोमन खात्री पटली होती. मी अल्लीबंधूंच्या बरोबर पुष्कळ दिवस राहिलो. अनेक दिवस आणि रात्री त्यांच्या संगतीत घालवल्या. म्हणून मी छातीठोकपणे सांगू शकतो की, त्यांचे उद्गार हे त्यांच्या श्रद्धेतून निघालेले असत.

मला हे माहीत आहे की- काही लोकांच्या मते, मी वस्तूंचे वरवर दिसणारे स्वरूप जसेच्या तसे पत्करतो आणि त्यामुळे सहज फसविला जातो. मी इतका अर्धवट नि मूर्ख नाही आणि माझे मित्र समजतात इतका भोळा-भाबडाही नाही. पण माझ्या मित्रांनी मला भोळा-खुळा म्हटले, तरी ते मी मनाला लावून घेत नाही. कारण स्वत:ला दगलबाज म्हणवून घेण्यापेक्षा भोळा-भाबडा म्हणवून घेणे मला जास्त मानवते.

आपल्या कम्युनिस्ट मित्रांनी उपसूचनांच्या द्वारे जे सुचवले, ते काही आज आपण नव्यानेच ऐकत नाही. हजारो व्यासपीठांवरून तेच उद्गार आपण पुन:पुन्हा ऐकले आहेत. हजारो मुसलमानांनी मला सांगितले की, जर हिंदू-मुसलमानांचा प्रश्न समाधानकारक रीतीने सुटावयास हवा असेल, तर तो प्रश्न सोडवण्याचे यत्न तुमच्या हयातीतच झाले पाहिजेत. हे सांगणे माझी खुशामत करणारे आहे, हे खरे; पण जी सूचना माझ्या विवेकबुद्धीला पटत नाही, तिला मी कशी मान्यता देऊ? हिंदू-मुसलमानांच्या ऐक्याचा प्रश्न हा काही नवा नाही. लाखो हिंदू आणि मुसलमान हा प्रश्न सोडवण्याच्या विचारात गुंतले आहेत. हा प्रश्न समाधानकारक रीतीने सुटावा, म्हणून मी लहानपणापासूनच इमानाने निकराचे प्रयत्न केले. शाळेत असताना पारशी व मुसलमान वर्गबंधूंबरोबर मैत्री जोडण्याचा आणि ती वाढविण्याचा मी हेतुपूर्वक प्रयत्न करीत असे. त्या कोवळ्या वयातही माझी अशी श्रद्धा होती की, जर हिंदूंना शांततेने आणि इतर जातींतील लोकांशी स्नेहभाव जोडून राहायचे असेल, तर त्यांनी शेजारधर्म चांगुलपणाने पाळण्याचा गुण आपल्या अंगी दक्षतेने व प्रयत्नपूर्वक वाढवला पाहिजे. हिंदूंशी मैत्री जोडण्याचे विशेष प्रयत्न आपल्या हातून झाले नाहीत तरी चालतील; पण थोड्या मुसलमानांशी तरी आपण विशेष मैत्रीचे संबंध जोडले पाहिजेत, असे मला वाटत असे. मी दक्षिण आफ्रिकेत गेलो, तो एका मुसलमान व्यापाऱ्याचा वकील म्हणूनच. तिथेही मी अनेक मुसलमानांशी- त्यातील काही तर माझ्या पक्षकारांच्या विरुद्ध बाजूचेही असत- मैत्रीचे संबंध जोडले आणि एक सचोटीचा व श्रद्धाळू माणूस म्हणून लौकिक मिळवला. माझ्या मित्रांमध्ये आणि सहकाऱ्यांमध्ये जसे मुसलमान होते, तसेच पारशीही होते. मी त्यांची हृदये काबीज केली होती. मी जेव्हा हिंदुस्थानला परत यावयास निघालो, त्या वेळी वियोगाच्या जाणिवेने दु:खित होऊन त्यांनी अश्रू ढाळले.

हिंदुस्थानात परत आल्यावरही मी आपले प्रयत्न चालू ठेवले आणि हिंदू-मुस्लिम ऐक्य साधण्यासाठी काहीही करायचे बाकी ठेवले नाही. हिंदू-मुस्लिमांचे ऐक्य घडवून आणण्याची उत्कट इच्छा माझ्या मनात सर्व जीवितभर घर करून राहिल्यामुळेच मी खिलाफत चळवळीत मुसलमानांना सर्वतोपरी सहकार्य देऊ शकलो. अखिल भारतातील मुसलमान मला आपला खराखुरा मित्रच समजत आले होते.

मग आताच एकाएकी मी दुष्ट आणि तिरस्करणीय आहे, असे का ठरावे? खिलाफत चळवळीमध्ये मी काही माझा स्वार्थ साधला काय? साधला खरेच! आणि तो एवढाच की, या चळवळीमुळे आपण गोधनाचे संरक्षण करू शकू, असे मी मनातल्या मनात मांडे खाल्ले! मी गाईचा पूजक आहे. गाय आणि मी एकाच ईश्वराची लेकरे आहोत, असे मानतो आणि गोरक्षणासाठी माझे जीवितही खर्चावयास मी तयार आहे. माझ्या जीविताचे तत्त्वज्ञान आणि माझ्या अंतिम आशा काहीही असल्या, तरी मी खिलाफत चळवळीत प्रविष्ट झालो, तो कसल्याही प्रकारची देवाण-घेवाण करण्याच्या उद्देशाने नव्हे; तर संकटात सापडलेल्या माझ्या शेजाऱ्यांचे ऋण फेडावेत एवढ्याचसाठी. अल्लीबंधू जर आज हयात असते, तर माझ्या हेतूंचे खरेपण त्यांनी सिद्ध करून दाखवले असते. मौलाना अब्दुल बारीसाहेब जर आज असते, तर त्यांनी हेच केले असते. ख्वाजासाहेब आणि इतर काही जण आजही ग्वाही देतील की, गोरक्षणाचे काम पत्करण्यात मला कसलीही देवाण-घेवाण करायची नव्हती. एक सचोटीचा माणूस, सच्चा शेजारी आणि एक विश्वासू मित्र या नात्याने कसोटी पाहणाऱ्या आणीबाणीच्या संकटात सापडलेल्या मुसलमानांच्या साह्यार्थ उभे ठाकणे मला आवश्यकच होते.

काळाच्या ओघात मुसलमानांबरोबर जेवण्याची आज हिंदूंना सवय झालेली असली, तरी एके काळी मी मुसलमानांबरोबर जेवून हिंदूंना विस्मयाचा मोठाच धक्का दिला होता. मौलाना बारी जरी मला पाहुणा म्हणून आग्रहाने बोलवीत असत, तरी त्यांच्याबरोबर मी जेवावयास बसणे मात्र त्यांना मानवत नसे. मला आपल्या पंक्तीला घेण्यात आपला काही काळाबेरा हेतू आहे, असा आरोप लोक कदाचित करतील की काय, असे त्यांना वाटे. आणि म्हणून जेव्हा जेव्हा मला त्यांच्याबरोबर राहण्याचा प्रसंग येई, तेव्हा तेव्हा ते एक ब्राह्मण स्वयंपाकी बोलवत आणि वेगळ्या तऱ्हेच्या स्वयंपाकाची स्वतंत्र व्यवस्था करीत. बारीसाहेबांच्या राहत्या घराचे नाव ‘फिरंगी महाल’ असे होते. घर जुन्या तऱ्हेचे आणि त्यात सोईही बेताच्याच होत्या. तरीसुद्धा सर्व गैरसोई बारीसाहेबांनी आनंदाने सोसल्या आणि मला राहवून घेण्याचा हट्ट त्यांनी इतक्या अट्टहासाने चालू ठेवला की, मला त्यांना त्यापासून परावृत करता आले नाही. याप्रमाणे सभ्यता, खानदानीपणा आणि औदार्य या गुणांचेच वर्चस्व त्या काळात आमच्यावर विशेष असे. हे सर्व गुण आता कुठे लुप्त झाले? कायदेआझम जिना यांच्यासकट सर्व मुसलमानांना मी विनंती करतो की, त्यांनी त्या सोन्यासारख्या काळाची आठवण करावी आणि आजचा पेचप्रसंग कशामुळे निर्माण झाला असावा, याचा शोध घ्यावा. कायदेआझम एके काळी काँग्रेसवाले होते. पण जेव्हा त्यांच्या हृदयाला संशयाची वाळवी लागली, तेव्हा काँग्रेसला त्यांचा राग आपल्यावर ओढवून घ्यावा लागला. ईश्वरकृपेने कायदेआझम दीर्घायू होवोत! माझे अस्तित्व जेव्हा संपेल, तेव्हा तरी त्यांना हे खास कळून चुकेल आणि मान्य करावे लागेल की, मला मुसलमानांविरुद्ध कसलेच कट रचायचे नव्हते आणि त्यांच्या हितसंबंधांत त्यांचा विश्वासघातही करायचा नव्हता. मी जर त्यांच्या हितसंबंधांना दुखापत केली, तर मला सुटकेचा मार्ग उरतोच कुठे? माझ्या जीविताचा विनियोग सर्वस्वी त्यांनीच करावयाचा आहे. चाहेल तेव्हा त्यांनी त्याचा शेवट करावा. गतकालात मला ठार मारण्याचे जे प्रयत्न झाले, त्या सर्वांतून ईश्वरकृपेने मी आतापर्यंत बचावलो आहे आणि मारेकऱ्यांना आपल्या कृत्याबद्दल पश्चात्ताप झालेला आहे. मला ठार मारल्यामुळे आपण एका हलकट माणसाच्या संसर्गापासून मुक्त होणार आहोत, अशा समजुतीने जर कोणी गोळी घातली असती; तर मला- खऱ्या गांधीला मुळीच मृत्यू आला नसता... फक्त मारेकऱ्याला बदमाष वाटणाऱ्या गांधीचे मरण ओढवले असते, इतकेच!

मला शिव्या देण्याचा आणि माझी बदनामी करण्याचा ज्यांनी विडाच उचलला आहे, त्यांना मी एवढेच सांगतो की- ‘वैऱ्यालासुद्धा शिवीगाळ करू नये’, अशी खुद्द इस्लामी धर्माचीच आज्ञा आहे. त्या द्रष्ट्या महंमदानेही खुद्द आपल्या शत्रूंना भलेपणाने वागवले आणि आपल्या औदार्याने व चांगुलपणाने आपलेसे केले. तुम्ही इस्लामी धर्माचेच अनुयायी आहात, की दुसऱ्या कोणत्या धर्माचे? तुम्ही जर खऱ्या इस्लामी धर्माचे अनुयायी असाल, तर आपली श्रद्धा जाहीरपणे व्यक्त करणाऱ्यावर अविश्वास ठेवणे तुम्हाला शोभते काय? मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की, तुमच्याबद्दल मित्रभाव बाळगणाऱ्या माझ्यासारख्या एका माणसावर तुम्ही विश्वास ठेवला नाहीत, याचा तुम्हाला एक दिवस पश्चात्ताप झाल्यावाचून राहणार नाही. मी जो-जो मुसलमानांना आवाहन करतो, मौलाना जो-जो त्यांची विनवणी करतात; तो-तो त्यांची शिवीगाळीची मोहीम अधिकच जोरावते, हे पाहून माझे हृदय विद्ध होते. शिव्या-शाप मला बंदुकीच्या गोळ्यांसारखे वाटतात. बंदुकीची गोळी जितकी प्राणघातक, तितकेच हे शिव्या-शापही मला प्राणघातक वाटतात. तुम्ही मुसलमान मला ठार मारायला निघालात, तरी त्याचे दु:ख मला होणार नाही. पण मला शिव्या-शाप देण्यात जे गुंतलेले आहेत, त्यांच्याविषयी मला खेद वाटल्यावाचून राहत नाही. ते इस्लाम धर्माला कमीपणा आणत आहेत, असे मला वाटते. इस्लामचे नाव निष्कलंक राहावे, म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की- शिविगाळ आणि बदनामी यांची ही मोहीम बंद करण्यासाठी झटा.

मौलानासाहेबांना अनुलक्षून अतिशय घाणेरडी शिवीगाळ करण्यात येत आहे. का; म्हणाल तर, केवळ ते माझ्यावर आपल्या मैत्रीचे दडपण आणून मला एखादी गोष्ट पत्करावयास लावण्याचे नाकारतात, म्हणून! एखाद्याला जी गोष्ट खरी वाटत नसेल ती त्याला मैत्रीच्या जोरावर खरी मानावयास लावणे, म्हणजे त्या मैत्रीचा दुरुपयोग करण्यासारखे आहे, असे मौलानासाहेबांना वाटते.

मी जीनासाहेबांना सांगतो की, पाकिस्तानच्या मागणीत जे न्याय्य आणि साधार असेल, ते तुमच्या पदरात पडलेलेच आहे, असे समजा. पण त्यात जे चुकीचे आणि असमर्थनीय असेल, ते मात्र कोणालाच त्यांच्या हवाली करता येणार नाही. जे असत्य आहे, ते दुसऱ्यावर लादण्यात जरी कोणी एखादा यशस्वी झाला; तरी त्या जबरदस्तीची मधुर फळे त्याला फार काळ चाखावयास मिळणार नाहीत. परमेश्वराला अहंकार अप्रिय आहे. त्यापासून तो चार हात दूर राहतो. जबरदस्तीने असत्य लादण्याचे कृत्य परमेश्वराला सहन होणार नाही.

कायदेआझम म्हणतात की, माझे विचार आणि माझ्या भावना मला व्यक्त केल्याच पाहिजेत- मग त्यासाठी कितीही कडवट बोलावे लागो. मग मलाही असे विचारता येईल की- जरी मी मुसलमानांचा मित्र असलो, तरी मुसलमानांना अप्रिय असलेल्या, पण माझ्या जिव्हाळ्याच्या गोष्टी मी का बोलून दाखवू नयेत? ते आंतरिक विचार मी त्यांच्यापासून का लपवून ठेवू? आपले विचार आणि भावना- मग त्या श्रोत्यांना कितीही कडवट वाटोत- व्यक्त करण्याच्या कामी कायदेआझम जो स्पष्टपणा दाखवतात, त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. पण असे जरी असले, तरी इथे बसलेल्या मुसलमान सभासदांना जीनांनी काय म्हणून शिव्या द्याव्यात? केवळ ते जीनांशी सहमत नाहीत म्हणून? जीनासाहेब! जर लाखो मुसलमान तुमच्या पाठीशी आहेत; तर जे काही मूठभर मुसलमान चुकीच्या मार्गाने जात आहेत, असे तुम्हाला वाटते, त्यांच्याकडे तुम्ही का दुर्लक्ष करत नाही? ज्याच्या पाठीशी लाखो अनुयायी आहेत, त्याला एखाद्या बहुसंख्य पक्षाचे किंवा त्यात मिसळून गेलेल्या काही अल्पसंख्य लोकांचे इतके भय का वाटावे? त्या प्रेषिताने- महंमदाने- अरब आणि मुसलमान यांच्यात प्रचाराचे कार्य कसे केले? इस्लाम धर्माचा प्रसार त्याने कसा केला? ‘बहुसंख्य लोकांवर माझी सत्ता चालली, तरच मी इस्लाम धर्माचा प्रसार करीन’ असे तो म्हणाला काय? म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की, इस्लामच्या इज्जतीसाठी तरी मी काय म्हणतो, याचा विचार करा. ज्या गोष्टींवर काँग्रेसचा विश्वास नाही आणि ज्या गोष्टी काँग्रेसने श्रद्धेय मानलेल्या तत्त्वांच्या विरोधी आहेत; त्या गोष्टीही काँग्रेसने पत्कराव्यात, असे म्हणणे चांगुलपणाचे नाही आणि न्यायीपणाचेही नाही.

राजाजी मला म्हणाले, ‘माझा स्वत:चा पाकिस्तानवर विश्वास नाही; पण मुसलमानांना ते हवे आहे, जीनांना ते हवे आहे. त्यांनी तर पाकिस्तानचा पाठपुरावाच चालवला आहे. तेव्हा त्यांना आता तरी होकार द्यायला काय हरकत आहे? काही दिवसांनी जीनांनाच पाकिस्तानचे दुष्परिणाम उमजून येतील आणि ते आपला हट्ट सोडून दिल्याशिवाय राहणार नाहीत. शेवटचा निर्णय घेण्याची वेळ येईल, तेव्हा त्या मागणीचा फारसा हट्ट कोणी धरणार नाही.’ या समजुतीवर विसंबून राहून, ज्या गोष्टीच्या खरेपणावर माझा विश्वास नाही, ती गोष्ट मी स्वत: खरी मानणे आणि इतरांना खरी मानावयास लावणे, हे कृत्य चांगुलपणाचे ठरणार नाही. पाकिस्तानची मागणी न्याय्य आहे, असे मला वाटत असते; तर या घटकेला मी तिला मान्यता दिली असती. केवळ जीनासाहेब प्रसन्न व्हावेत, म्हणून मी तिला मान्यता देणार नाही. जीनासाहेबांच्या सर्व शंका-कुशंकांचा निरास होऊन ते प्रसन्न व्हावेत, म्हणून मी पाकिस्तानला तात्पुरती मान्यता द्यावी आणि त्याची प्रतिक्रिया काय होते ते पाहावे, असा मला माझ्या अनेक मित्रांनी आग्रह केला. परंतु, खोटी अभिवचने देऊन एखाद्या कार्यात सहभागी होणे मला जमणार नाही. ती माझी पद्धतीच नव्हे!

आपण केलेल्या निर्णयांची अंमलबाजावणी करण्यासाठी काँग्रेसजवळ कायद्याचे बळ नसले, तरी नैतिक बळ मात्र खास आहे. खरी लोकशाही फक्त अहिंसेच्या मार्गानेच अस्तित्वात येऊ शकेल, असा काँग्रेसला विश्वास आहे. जागतिक राष्ट्रसंघाची इमारत फक्त अहिंसेच्या पायावरच उभी राहू शकेल आणि त्यासाठी जागतिक व्यवहारातून हिंसेची सर्वस्वी हकालपट्टी झाली पाहिजे. हे जर खरे असेल, तर हिंदू आणि मुस्लिम यांच्या ऐक्याचा प्रश्न समाधानकारक रीतीने सोडवण्याचा उपायही हिंसेचा आश्रय घेतल्याने कदापि सापडायचा नाही. जर हिंदूंनी मुसलमानांवर जुलूम केला, तर जागतिक संयुक्त राज्यघटनेची मागणी करावयाला त्याला तोंड राहील काय? याच कारणासाठी इंग्लिश आणि अमेरिकन मुत्सद्द्यांच्या हिंसेच्या साह्याने जागतिक शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नाला यश येईल, असे मला वाटत नाही. एखाद्या नि:पक्षपाती आंतरराष्ट्रीय न्यायसभेपुढे काँग्रेस व जीनापक्षीय मुसलमान यांच्यातील मतभेद ठेवायला आणि त्या सभेने केलेले निर्णय मान्य करायला काँग्रेस तयार आहे. काँग्रेसची ही सर्वांत रास्त सूचनाही जर मुसलमानांनी स्वीकारली नाही, तर मग शेवटी दंडुकेशाहीचा आणि हिंसेचा मार्गच मोकळा आहे! जी गोष्ट अशक्य आहे, ती मान्य करण्याची सक्ती मी माझ्या मनावर कशी करू शकेन? जिवंत प्राण्याची चिरफाड करण्याची मागणी करणे, म्हणजे त्याचा जीव घेण्याची मागणी करण्यासारखेच आहे. आणि अशी मागणी करणे म्हणजे युद्धाला आव्हान देणेच आहे. पण काँग्रेस असल्या यादवी युद्धात कधीच सामील होणार नाही. डॉ. मुंजे आणि श्री. सावरकर यांच्यासारख्या काही हिंदुत्वनिष्ठांच्या मते, दंडुकेशाहीच्या जोरावर हिंदू समाज मुसलमानांना आपल्या काबूत ठेवू शकेल. पण हे मत मला मान्य नाही. हे मत बाळगणाऱ्या लोकांच्या गटाचा मी प्रतिनिधी नाही; मी काँग्रेसचा प्रतिनिधी आहे. जे लोक सोन्याची अंडी घालणाऱ्या काँग्रेसहंसीला ठार मारावयास उत्सुक आहेत, त्यांनी जर काँग्रेसचा धुव्वा उडविण्यात यश मिळवले; तर हिंदू-मुसलमानांत सतत झगडे सुरू होतील आणि युद्धाच्या रक्ताळलेल्या खातेऱ्यात अहर्निश लोळण्याचा दुर्धर प्रसंग भारतावर ओढवेल. असा दुर्धर प्रसंग जर आमच्यावर ओढवणार असेल, तर तो भोगण्याला मी जिवंतच राहणार नाही.

देशावर असा प्रसंग येऊ नये म्हणूनच मी जीनासाहेबांना सांगतो, ‘तुम्ही खात्रीपूर्वक समजा की, तुमच्या पाकिस्तानच्या मागणीत जे-जे न्याय असेल, ते-ते सारे तुमच्या पदरात पडलेलेच आहे; परंतु त्यात जे न्याय्य बुद्धीला धाब्यावर बसविणारे असेल, तेही तुम्हाला हवे हा हट्ट जर तुम्ही चालू ठेवलात, तर तो तुम्हाला तलवारीच्या जोरावरच पुरवून घ्यावा लागेल!’

माझ्या मनात विचारांची खळबळ माजलेली आहे आणि ते सारे विचार या सभेपुढे मन मोकळे करून बोलून दाखवावेत, असे मला वाटते. जी गोष्ट माझ्या मनात विशेष करून सलत आहे, तिचा विचार मी आतापर्यंत केलाच आहे. हिंदू-मुसलमानंच्या एकीच्या प्रश्नावर आपले जगणे आणि तरणे अवलंबून आहे. हिंदू-मुसलमान बांधवहो! जर मनात कसलीही अढी न ठेवता आपल्याला एक व्हायचे असेल, तर साम्राज्यशाहीचे जे साखळदंड आपल्याभोवती करकचून आवळलेले आहेत, ते तोडून टाकण्याच्या कामात आपण प्रथम एकत्र आले पाहिजे. पाकिस्तान हा जर हिंदुस्थानचाच एक तुकडा आहे, तर मग हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी करावयाच्या या लढ्यात सामील व्हायला मुसलमानांना काय हरकत आहे? म्हणून स्वातंत्र्याच्या लढ्यात हिंदू-मुसलमानांनी प्रथमत: एक व्हावे. जीनासाहेबांच्या मते, हे युद्ध दीर्घ काळपर्यंत संपणार नाही. मी त्यांच्याशी सहमत नाही. जर हे युद्ध अजून सहा महिने चालले, तर आपण चीनला कसे वाचवू शकणार?

म्हणून, मला स्वातंत्र्य हवे आहे- ते तातडीने हवे आहे. शक्य तर पहाट उजाडण्यापूर्वी, आज रात्रीच हवे आहे. जातीय ऐक्यासाठी स्वातंत्र्य अडून बसणार नाही. जातीय ऐक्य जर साधले नाही, तर ते ऐक्य घडवून आणावयास ज्या स्वार्थत्यागाची आवश्यकता आहे, तो स्वार्थत्याग आपण नेहमीपेक्षा जास्त प्रमाणावर केला पाहिजे. पण स्वातंत्र्याच्या लढ्यात काँग्रेसने एक स्वातंत्र्य तरी मिळवले पाहिजे, नाही तर प्राणार्पण तरी केले पाहिजे. आणि हेही ध्यानात ठेवा की- ज्या स्वातंत्र्यासाठी काँग्रेस झगडत आहे, ते स्वातंत्र्य केवळ काँग्रेसवाल्यांच्या मालकीचे होणार नाही; तर चाळीस कोटी हिंदी लोकांचा त्यावर सारखाच हक्क राहील. काँग्रेस ही शेवटपर्यंत हिंदी लोकांची विश्वासू सेवकच राहील.

कायदेआझम जीनांनी सांगितले की, ‘जर ब्रिटिश राज्यकर्ते कबूल होतील, तर सत्ताग्रहण करण्याची मुस्लिम लीगची तयारी आहे. कारण ब्रिटिशांनी साम्राज्य हिसकावून घेतले, ते मुसलमानांच्या हातातून! आणि म्हणून स्वराज्य म्हणजे मुस्लिम राज्यच!’ मी आणि मौलानासाहेबांनी जीनांना जे देऊ केले होते, त्यात मुस्लिम राज्याच्या किंवा मुस्लिम वर्चस्वाच्या कल्पनेला यत्किंचितही थारा नव्हता. कोणाही एका जमातीचे वा गटाचे वर्चस्व इतरांच्यावर राहावे, हे काँग्रेसला मान्य नाही. ज्या लोकशाहीच्या कक्षेत हिंदू, मुसलमान, खिस्ती, पारशी, ज्यू आदी विशाल हिंदुस्थानात राहणाऱ्या सर्व जमातींना जागा आहे; त्या लोकशाहीवर काँग्रेसची श्रद्धा आहे. मुस्लिम राज्य येणे जर अटळ असेल, तर ते येईलही; पण म्हणून आम्ही त्याला संमती द्यावी, असे कुठे आहे? कोणत्याही एका जमातीच्या हुकूमशाहीला आम्ही कशी मान्यता देऊ?

हिंदुस्थानातील लाखो मुसलमान असे आहेत की, ज्यांची मूळ घराणी हिंदूच होती. असे जर आहे, तर त्यांची मातृभूमी हिंदुस्थानशिवाय दुसरी कोणती असू शकेल? माझ्या थोरल्या चिरंजीवाने काही वर्षांपूर्वी इस्लाम धर्म स्वीकारला; मग आता त्याची मातृभूमी कोणती? पोरबंदर का पंजाब? मी मुसलमानांना विचारतो की, जर हिंदुस्थान तुमची मातृभूमी नाही, तर मग तुम्ही दुसऱ्या कोणत्या भूमीचे सुपुत्र आहात?

इस्लाम धर्माची दीक्षा घेतलेल्या माझ्या मुलाची मातृभूमी कोणती आहे, असे तुम्हाला वाटते? माझ्या मुलाने इस्लाम धर्माची दीक्षा घेतल्यानंतर त्याच्या आईने त्याला पत्र लिहून विचारले की, ‘तू इस्लाम धर्माची दीक्षा घेतली आहेस, पण त्या धर्माला मद्यपान संमत नाही; तेव्हा तू ते सोडून दिले आहेस की नाही?’ ज्यांनी त्याच्या धर्मांतराचा निषेध केला, त्यांना उत्तर दिले की, ‘त्याच्या दारू पिण्याने मला जितके दु:ख होते, तितके तो मुसलमान झाल्याने होत नाही. तुम्हाला जर त्याला माणसात आणावयाचे असेल, तर तुम्हाला त्याच्या धर्मांतराचा फायदाच होईल. सच्च्या मुसलमानाचे ब्रीद तो कायम राखेल आणि बाटली व बाई यांच्या नादाला लागणार नाही, एवढी काळजी तुम्ही घ्या म्हणजे झाले. हा त्याचा नाद सुटला नाही, तर त्याचे धर्मांतर व्यर्थ गेले असे होईल आणि आम्ही त्याच्याशी सख्यत्वाचे संबंध ठेवणार नाही.’

हिंदुस्थानांत राहणाऱ्या सर्व मुसलमानांची हिंदुस्थान हीच मातृभूमी आहे, यात कसलीही शंका नाही. म्हणून प्रत्येक मुसलमानाने हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी लढावयास तयार झाले पाहिजे. काँग्रेस ही एखाद्या जमातीची वा वर्गाची प्रतिनिधी नाही, ती सर्व राष्ट्राची प्रतिनिधी आहे. बहुसंख्य मुसलमानांनी खुशाल काँग्रेसमध्ये यावे आणि बहुमताच्या जोरावर तिचा ताबा घ्यावा. मुसलमानांना हवाच असेल, तर त्यांना अशा रीतीने काँग्रेसचा ताबा घेता येईल आणि तिचे सुकाणू हव्या त्या मार्गाने फिरवता येईल. काँग्रेस काही केवळ हिंदूंच्या वतीने लढत नाही, तर अखिल भारताच्या वतीने- अर्थात अल्पसंख्य लोक त्यात येतातच- लढते. एखाद्या काँग्रेसवाल्याने एखाद्या मुसलमानाला ठार मारल्याचे एखादे जरी उदाहरण माझ्या कानांवर आले, तरी ते माझ्या जिव्हारी लागेल. येत्या चळवळीत काँग्रेसनिष्ठ जसे मुसलमानांच्या हल्ल्यापासून हिंदूंचे रक्षण करण्यासाठी प्राणार्पण करतील, तसेच हिंदूंच्या हल्ल्यापासून मुसलमानांचे रक्षण करण्यासाठीही ते प्राण खर्ची घातल्याशिवाय राहणार नाहीत. असे करणे हा त्यांच्या कर्तव्याचाच एक भाग आहे आणि अहिंसेचेही ते एक प्राणभूत अंग आहे. प्रत्येक काँग्रेसवाला- मग तो हिंदू असो वा मुसलमान असो- हे कर्तव्य करण्याच्या कामी आपल्या संघटनेशी बांधलेला आहे. जे मुसलमान हे कर्तव्य करतील, त्यांना इस्लाम धर्माची सेवा केल्याचे श्रेय मिळाल्यावाचून राहणार नाही. या शेवटच्या देशव्यापी लढ्यात आपल्याला यश मिळवावयाचे असेल, तर परस्पर- विश्वासाची अत्यंत जरुरी आहे.

मुस्लिम लीग आणि इंग्रज यांचा आमच्या येत्या लढ्याला विरोध असल्याने येत्या लढ्यात आम्हाला नेहमीपेक्षा अधिक त्यागबुद्धी प्रगट करावी लागेल, असे मी म्हटले. सर फ्रेडरिक पकल यांनी जे गुप्तपत्रक काढले, ते तुम्हा सर्वांना माहीत आहेच. त्यांनी स्वीकारलेला मार्ग शुद्ध आत्मघातकीपणाचा आहे. आळिंब्यांप्रमाणे जलदीने रुजणाऱ्या संघटनांना काँग्रेसविरुद्ध लढण्यासाठी एकत्र येण्याची फूस त्या पत्रकात दिलेली आहे. याप्रमाणे, कुटील डावपेच करणाऱ्या साम्राज्यशाहीशी आपली गाठ आहे. आमचा मार्ग मात्र इतका सरळ आहे की, त्या मार्गावरून आम्ही खुशाल डोळे झाकूनही जाऊ शकू. सरळपणा हेच सत्याग्रहाचे सौंदर्य आहे!

सत्याग्रहात दगलबाजी, लबाडी किंवा कोणत्याही प्रकारचा खोटेपणा यांना स्थान नाही. लबाडी आणि खोटेपणा ही आज जगात चोरून-मारून चाललेलीच आहे, हे प्रकार स्थितप्रज्ञासारखे स्वस्थ बसून पाहणे माझ्याच्याने होत नाही. मी सर्व हिंदुस्थानभर जेवढे हिंडलो आहे, तेवढे आजकाल कोणीही हिंडला नसेल. माणसाला शक्य तेवढ्या ममत्वाने मी हिंदभूच्या लाखों हतबुद्ध आणि आपल्या दु:खाला वाचा फोडण्यास असमर्थ असलेल्या सुपुत्रांत मिसळलो. त्यांनी मला आपला मित्र आणि प्रतिनिधी मानले. त्यांच्या डोळ्यांत माझ्याविषयीचा जो विश्वास ओथंबलेला मला दिसला, तो विश्वास अहिंसा आणि असत्य यांच्या पायावर उभारलेल्या साम्राज्यशाहीशी लढण्याच्या कामी मला सत्कारणी लावावयाचा आहे. साम्राज्यशाहीने कितीही राक्षसी तयारी केलेली असो, आपण तिच्या पकडीतून बाहेर पडलेच पाहिजे. अशा आणीबाणीच्या वेळी मी स्वस्थ बसून माझे कर्तव्य जनतेपासून लपवून ठेवू, का ‘तुम्ही थोडा वेळ थांबा’ अशी जपान्यांची विनवणी करू? सर्व जगभर उसळलेला युद्धाचा डोंब ऐनभरात असताना मी जर शांतपणे स्वस्थ बसलो; तर ईश्वरदत्त संपदा मी यथाशक्ती कारणी लावली नाही, म्हणून ईश्वर मला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. असे जर नसते, तर मी तुम्हाला आतापर्यंत जसे थांबावयास सांगितले तसेच आताही सांगितले असते. परंतु, परिस्थिती आता अगदी असह्य बनत चालली आहे आणि काँग्रेसपुढे लढ्याखेरीज दुसरा-तिसरा कोणताच मार्ग उरलेला नाही.

तथापि, प्रत्यक्ष लढ्याला काही याच घटकेला सुरुवात होणार नाही. या घटकेला तुम्ही फक्त माझ्या हातात सर्वाधिकार दिलेले आहेत. यापुढे मी व्हाईसरॉयची भेट घेईन आणि काँग्रेसची मागणी स्वीकारण्याची त्यांना विनंती करीन. हे सर्व व्हायला दोन-तीन आठवडे तरी लागतील. मग या मध्यंतरीच्या काळात तुम्ही काय करावे? ज्यात सर्वांना सामील होता येईल, असा कोणता कार्यक्रम आहे? माझ्या मनात प्रथमत: चरख्याचाच विचार येतो. मौलानांच्या प्रश्नाला मी हेच उत्तर दिले होते. पहिल्याने जरी नाही, तरी त्याचे महत्त्व त्यांना नंतर पटले. तुमच्यापुढे असलेला चौदा कलमी विधायक कार्यक्रम तुम्हाला पार पाडावयाचा आहेच. त्याशिवाय तुम्ही काय करावे, हे सांगतो. तुमच्यापैकी प्रत्येकाने या क्षणापासून स्वत:ला स्वतंत्र समजावे. साम्राज्यशाहीची टाच झुगारून देऊन स्वतंत्रपणे वागावे. तुमचा विश्वास बसावा, म्हणून मी हे तुम्हाला सुचवीत नाही. हेच स्वातंत्र्याचे खरेखुरे लक्षण आहे. गुलाम ज्या क्षणाला स्वत:ला स्वतंत्र समजतो, त्या क्षणालाच त्याची सर्व बंधने गळून पडतात. तो मालकाला स्पष्टपणे सांगेल की, ‘या क्षणापर्यंत मी तुमचा बांधील गुलाम होतो खरा, पण यापुढे तुमचा बंदा नाही. तुम्हाला वाटेल तर माझा जीव घ्या; पण जर तुम्हाला मला जिवंत ठेवायचे असेल तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्ही स्वखुशीने मला मुक्त कराल, तर मी तुमच्याजवळ दुसरे काही मागणार नाही. माझ्या श्रमाच्या जोरावर मला जरूर ते अन्न-वस्त्र मी मिळवू शकलो असतो, पण तुम्हीच ते मला पुरवत होतात. आतापर्यंत ईश्वरानेच मला स्वातंत्र्याची तीव्र इच्छा बाळगण्याची प्रेरणा केली आहे. आता यापुढे मी तुमच्यावर अवलंबून राहणार नाही; कारण आज मी स्वतंत्र झालो आहे.’

तुम्ही हे खात्रीपूर्वक समजा की, मंत्रिमंडळाच्या आशेने मी व्हाईसरॉयशी तडजोड करणार नाही. संपूर्ण स्वातंत्र्याखेरीज कशानेही माझे समाधान होणार नाही. व्हाईसरॉय मिठावरील कर उठविण्याची लालुच दाखवो अगर दारूबंदीचे आमिष दाखवो, स्वातंत्र्याचा हट्ट मी सोडणार नाही.

मी तुम्हाला एक मंत्र सांगतो- तो तुम्ही आपल्या हृदयात ठसवा आणि तुमच्या प्रत्येक नि:श्वासाबरोबर तो व्यक्त होऊ द्या. ‘करेंगे या मरेंगे’ हाच तो मंत्र! आम्ही देशाला स्वतंत्र तरी करू, नाही तर त्या प्रयत्नात प्राणार्पण तरी करू; पण आजची गुलामगिरी कायम राहिलेली पाहावयाला आम्ही जिवंत राहणार नाही. प्रत्येक काँग्रेसवाल्याने- मग तो पुरुष असो वा स्त्री असो- मी माझा देश बंधनात वा गुलामगिरीत खितपत पडू देणार नाही, असा दृढनिश्चय करून येत्या लढ्यात सामील व्हावे.

स्वदेश स्वतंत्र करूच करू, अशी तुम्ही प्रतिज्ञा करा. केवळ तुरुंगभरतीचा विचार तुम्ही करूच नका. सरकारने जर मला मोकळे सोडले, तर मी तुमच्या पाठीमागचा तुरुंगभरती करण्याचा त्रास खास वाचवीन. सरकार संकटात सापडले असताना बहुसंख्य लोकांना पोसण्याचा ताण मी सरकारवर पडू देणार नाही. प्रत्येक स्त्री-पुरुषाने ही अहर्निश जाणीव बाळगावी की, आपण खात-पीत आणि जगत आहोत ते केवळ स्वातंत्र्य मिळवण्याकरताच; आणि प्रसंग पडला तर, स्वातंत्र्य मिळवण्याच्या कामात आपण प्राणार्पणही करू. ईश्वराला स्मरून अशी शपथ घ्या की, स्वातंत्र्य मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि त्या कामात आम्ही प्राणही खर्ची घालू. जो जीवावर उदार होतो, त्याला स्वातंत्र्य मिळतेच मिळते. पण ज्याला प्राणाची मातब्बरी अधिक वाटते, तो स्वातंत्र्याला दुरावतो. स्वातंत्र्य हे भेकड आणि कचदील माणसांसाठी नसते!

आता वर्तमानपत्रकर्त्यांना उद्देशून चार शब्द बोलतो. राष्ट्राच्या मागणीला तुम्ही आतापर्यंत जो पाठिंबा दिलात, त्याबद्दल तुमचे अभिनंदन करतो. जी बंधने आणि अडचणी यांच्या दडपणाखाली तुम्हाला काम करावयाचे होते, ती सर्व मी जाणून आहे. पण आता मी तुम्हाला सांगतो की, तुम्हाला जखडून टाकणाऱ्या बेड्या तुम्ही तोडून टाका. स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपल्या जीविताचा व्यय केला, त्यांचा गौरव करण्याच्या कामात पुढाकार घेऊन इतरांना उदाहरण घालून देण्याचा वर्तमानपत्रांना अभिमानास्पद हक्कच आहे. तुमची लेखणी सरकारला मोडता येणार नाही. मला हे माहीत आहे की, छापखाने इत्यादींच्या रूपाने तुम्ही बरीच मोठी मालमत्ता जवळ बाळगता आणि सरकार ही मालमत्ता जप्त करील की काय, ही भीती तरी तुमच्या मनात असतेच. तुम्ही आपण होऊन स्वखुशीने जप्ती ओढवून घ्या, असे मी म्हणत नाही. माझ्या बाबतीत बोलायचे तर, माझ्या छापखान्यावर जप्ती आली तरी मी लिहिणे थांबवले नाही. माझ्या छापखान्यावर जप्ती आली होती आणि नंतर ती उठलीही होती, हे तुम्हाला माहीत आहेच. पण स्वार्थत्यागाची ही पराकाष्ठा तुम्ही कराच, असे मी म्हणत नाही. मी तुम्हाला सुवर्णमध्य सुचवतो. तुम्ही आपल्या स्थायी समितीला धाब्यावर बसवा आणि असे जाहीर करा की, ‘सध्या आमच्यावर जी बंधने लादलेली आहेत, ती पाळून लिखाण करणे आमच्याने होणार नाही. हिंदुस्थान स्वतंत्र होईल, तेव्हाच लेखणी आम्ही हातात धरू. तुम्ही फ्रेडरिक पकलना खुशाल सांगा की, तुमचे हुकूम आम्ही सांगकाम्यासारखे पाळू, अशी समजूत करून घेऊ नका. तुमची वर्तमानपत्री टाचणे ही असत्याने लडबडलेली आहेत आणि आम्ही ती कदापिही प्रसिद्ध करणार नाही. तुम्ही स्पष्टपणे जाहीर करा की, आम्ही सर्वस्वी काँग्रेसच्या बाजूचे आहोत. तुम्ही जर असे आचरण ठेवाल, तर प्रत्यक्ष लढ्याला सुरुवात होण्यापूर्वी त्याला पोषक वातावरण तयार केल्याचे श्रेय तुम्हाला मिळेल.

संस्थानिकांबद्दल मनात पूर्ण आदर बाळगूनसुद्धा मी त्यांना फारच थोडे करावयास सांगणार आहे. मी त्यांचा एक हितचिंतक आहे. मी स्वत: एका संस्थानात जन्मलो आहे. माझ्या वडिलांनी एकंदर तीन संस्थानांत मुख्य दिवाणाचे काम पाहिलेले आहे. एकदा त्यांनी आपल्या राजेसाहेबांशिवाय इतर कोणालाही अभिवादन करण्याचे नाकारले. परंतु त्यांनी आपल्या राजेसाहेबांना असे कधीही बजावले नाही (त्यांनी असे बजावावयास हवे होते, असे मला वाटते) की, ‘मला स्वत:च्या विवेकबुद्धीविरुद्ध वर्तन करावयास लावण्याची सक्ती तुम्हाला माझ्यावर करता येणार नाही.’ मी संस्थानिकांच्या घरचे ‘नमक’ खाल्ले आहे, मी नमकहराम होणार नाही. एक विश्वासू सेवक या नात्याने मी संस्थानिकांना अशी सूचना करतो की, माझ्या जीवितावधीतच जर त्यांनी माझ्या म्हणण्याप्रमाणे कृती केली, तर स्वतंत्र हिंदुस्थानात त्यांचे स्थान मानाचेच राहील. स्वतंत्र हिंदुस्थानची जी योजना जवाहरलालनी आखली आहे, तीत कसल्याही प्रकारच्या सवलतींना किंवा कोणत्याही वर्गाच्या मिरासदारीला यत्किंचितही जागा नाही.

जवाहरलालच्या मते, सर्व मालमत्ता राष्ट्राच्या मालकीची असावी. त्याला देशाची आर्थिक व्यवस्था योजनाबद्ध करून टाकायची आहे. काही योजनांनुसार, हिंदुस्थानची पुनर्घटना करण्याची त्याची इच्छा आहे. कल्पनासृष्टीत स्वैरपणे झेपा घेणे त्याला आवडते, पण मला आवडत नाही. ज्या स्वतंत्र हिंदुस्थानचे मी ध्यान करतो, त्या हिंदुस्थानात संस्थानिक आणि जमीनदार यांना स्थान आहे. शक्य तेवढ्या लीनतेने मी संस्थानिकांना सांगतो की, त्यागातच आनंद माना. त्यांनी मनात आणले, तर त्यांना आपल्या मालमत्तेवरचा मालकी हक्क सोडून देता येईल आणि त्या मालमत्तेचे खऱ्याखुऱ्या अर्थाने विश्वस्त होता येईल. मी जनतेलाच जनार्दन मानतो. संस्थानिकांनी प्रजाजनांना सांगावे की, ‘तुम्हीच राज्याचे धनी आहात आणि आम्ही तुमचे सेवक आहोत.’ मी संस्थानिकांना सांगेन की, ‘त्यांनी लोकांचे सेवक बनावे आणि लोकांनी स्वत: केलेल्या सेवा-चाकरीची परतफेड करावी.’ सरकार संस्थानिकांच्याच हातात सत्ता ठेवीलही; पण संस्थानिकांनी प्रजाजनांनाच सत्ताधारी बनवावे. त्यांना जर काही शुद्ध आनंदाचा उपभोग घ्यावयाची इच्छा असेल, तर तो त्यांना लोकांची सेवा करण्यातच मिळेल. संस्थानिकांनी भिकाऱ्यासारखे आणि दीन राहावे, असे मी म्हणत नाही. मी त्यांना एवढेच विचारतो की, ‘तुम्ही परकीय सत्तेच्या गुलामगिरीत किती दिवस राहणार? परकी सत्तेपुढे मान वाकवण्याऐवजी तुम्ही आपल्याच प्रजेची सत्ता का मानत नाही?’ तुम्ही सरकारला असे कळवा की, ‘लोक आता जागृत झालेले आहेत. ज्या लोकमताच्या खडकावर आपटल्याने मोठमोठ्या साम्राज्यांचाही चक्काचूर होऊ शकतो, त्या खडकाला आमचे होडगे कसे टक्कर देऊ शकेल? म्हणून आजपासून आम्ही प्रजेशी एकरूप होत आहोत. प्रजेचे जे काय होईल, ते आमचेही होईल.’ मी हा जो मार्ग सुचवत आहे, त्यात असनदशीर असे काही नाही याची खात्री असू द्या. ज्यांच्या जोरावर सरकारला संस्थानिकांवर जबरदस्ती करता येईल, असे काही करारनामे अस्तित्वात असल्याचे निदान माझ्या तरी ऐकिवात नाही. संस्थानातील लोकही असे जाहीर करतील की, ‘आम्ही संस्थानिकांचे प्रजानन असलो, तरी हिंदी राष्ट्राचेही घटक आहोत आणि जर प्रजाजनांचे जे भवितव्य तेच आपलेही, असे मानण्याइतकी आपुलकी संस्थानिक दाखवतील; तर त्यांच्या पुढारीपणाशिवाय आम्ही दुसऱ्या कोणाचेही पुढारीपण मानणार नाही.’ प्रजाजनांच्या या बोलण्याने खवळून जाऊन जर संस्थानिक प्रजाजनांच्या जीवावर उठतील, तर  प्रजाजनही मोठ्या धैर्याने आणि बिलकुल न कचरता मृत्यूला कवटाळतील, पण आपले शब्द मागे घेणार नाहीत.

आपण चोरून-मारून काहीही करता कामा नये. आपण उघड-उघड बंड पुकारणार आहोत. या लढ्यात लपवाछपवी करणे हे पातक समजण्यात येईल. जो स्वतंत्र आहे, तो असल्या लपवाछपवीच्या भानगडीत पडणार नाही. माझ्या इच्छेविरुद्ध स्वतंत्र हिंदुस्थानला स्वत:चे गुप्त पोलीस खाते बाळगावे लागेलही. पण या लढ्यात आपल्याला उघड-उघड कार्य केले पाहिजे आणि भागूबाईसारखे पळून न जाता बंदुकीच्या गोळ्या छातीवर झेलल्या पाहिजेत. अशा लढ्यात लपवाछपवी हे पातक आहे आणि ते कटाक्षाने टाळले पाहिजे.

सरकारी नोकरांनाही मला काही सांगावयाचे आहे. त्यांनी इतक्यातच राजीनामे देण्याची आवश्यकता नाही. कै. न्यायमूर्ती रानड्यांनी आपल्या सरकारी नोकरीचा राजीनामा न देताही उघडपणे जाहीर केले की, ‘मी काँग्रेस पक्षाचा आहे.’ त्यांनी सरकारला सांगितले की, ‘मी जसा न्यायाधीश, तसा काँग्रेसवालाही आहे आणि मी उघडपणे काँग्रेसच्या बैठकींना हजर राहणार. परंतु त्याबरोबरच, न्यायाधीश या नात्याने जो नि:पक्षपातीपणा मी दाखवला पाहिजे, त्याला माझी राजकीय मते बाधा आणणार नाहीत, अशीही मी दक्षता घेईन.’ ज्या मंडपात काँग्रेसची बैठक झाली, त्याच मंडपात रानड्यांनी सामाजिक सुधारणा परिषद भरवली होती. सर फ्रेडरिक पकल यांनी जे गुप्त पत्रक काढले, त्याला उत्तर म्हणून सर्व सरकारी नोकरांनी रानड्यांच्या पावलावर पाऊल टाकावे आणि आपण काँग्रेसच्या बाजूचे आहोत, असे जाहीर करावे.

मला तुम्हाला जे काही करायला सांगायचे होते, ते एवढेच! मी आता व्हाईसरॉयला लिहिणार आहे. व्हाईसरॉयच्या संमतीने मी आपसांतील पत्रव्यवहार प्रसिद्ध करीन तेव्हा तो तुम्हाला वाचावयास मिळेल; आताच नाही. पण व्हाईसरॉयला लिहिलेल्या पत्रात मी जी मागणी केली आहे, तिला तुमचा पाठिंबा आहे, असे तुम्ही आताच सांगू शकता. एक न्यायाधीश माझ्याकडे येऊन म्हणाले, ‘वरच्या गोटातून आम्हाला एक गुप्त पत्रक आलेले आहे. त्याचे आम्ही काय करावे?’ मी उत्तरलो, ‘मी जर तुमच्या जागी असतो, तर मी त्या पत्रकाकडे दुर्लक्ष केले असते.’ तुम्ही सरकारला स्पष्टपणे  लिहा की, ‘गुप्त पत्रक मिळाले, परंतु मी काँग्रेसच्या बाजूचा आहे. मी जरी पोट भरण्यासाठी सरकारची सेवा केली असली, तरी असली गुप्त पत्रके मानावयास आणि असल्या गुप्त मसलती करावयास मी तयार नाही.’

आमच्या कार्यक्रमात सैनिकांनाही वाव आहे. त्यांना मी आताच राजीनामा देऊन सैन्याबाहेर पडावयास सांगणार नाही. जे सैनिक मला आणि जवाहरलाल व मौलाना यांना भेटून सांगतात की, ‘आम्ही सर्वस्वी तुमच्या बाजूचे आहोत, आम्ही सरकारच्या जुलूमाला विटलो आहोत.’ त्यांनी सरकारला सांगावे की, ‘आम्ही काँग्रेसच्या बाजूचे असलो, तरी आम्ही नोकरी सोडण्यास तयार नाही. आम्ही जोपर्यंत पगार खात आहोत, तोपर्यंत आम्ही चाकरी करूच. जे हुकूम न्याय्य असतील, ते आम्ही पाळू; पण आमच्याच बांधवांवर आम्ही गोळ्या झाडणार नाही.’

ज्यांच्या अंगी हे सारे करण्याचे धैर्य नाही, त्यांच्याबद्दल मला काहीच बोलायचे नाही. त्यांनी आपल्याला योग्य वाटेल तो मार्ग धरावा. पण मी सांगितले तेवढे जरी तुम्ही केलेत, तरी सारे वातावरण चैतन्याने सळसळू लागेल, अशी खात्री बाळगा. सरकारला खुशाल बॉम्बगोळ्यांचा वर्षाव करू द्या; पण जगात आता अशी कोणतीही शक्ती उरलेली नाही की, जी तुम्हाला गुलामगिरीत राहवयास भाग पाडेल.

काही काळापुरतेच लढ्यात सामील होऊन जर विद्यार्थी पुनश्च अभ्यासाकडे वळणार असतील, तर लढ्यात सामील व्हा, असे आमंत्रण मी त्यांना देणार नाही. मी लढ्याचा संपूर्ण कार्यक्रम ठरवेपर्यंतच्या काळात विद्यार्थ्यांनी काय कराव,े ते सांगतो. त्यांनी प्रोफेसरांना सांगावे, ‘आम्ही काँग्रेसच्या बाजूचे आहोत. तुम्ही जर काँग्रेसपक्षीय असलात, तर तुम्हाला नोकरीवर पाणी सोडण्याची गरज नाही. तुम्ही अध्यापन चालू ठेवा. पण स्वातंत्र्याला पोषक आणि स्वातंत्र्याकडे जाणाऱ्या मार्गाचे दिग्दर्शन करणारे असे काही शिकवा.’ जगामध्ये झालेल्या सर्व स्वातंत्र्ययुद्धांत विद्यार्थ्यांनी फारच मोठी कामगिरी बजावली आहे.

प्रत्यक्ष लढा सुरू होण्यापूर्वी जो वेळ आपल्याला मिळेल, त्या अवधीत तुम्ही जर मी केलेल्या सूचना अमलात आणल्या, तर सारे वातावरण बदलून जाईल आणि लढ्याला पोषक अशी भूमिका तयार होईल.

मला अजून पुष्कळ सांगायचेे आहे; पण अंत:करण भारावल्यामुळे सांगता येत नाही. आतापर्यंत मी तुमचा पुष्कळच वेळ घेतलेला आहे आणि अजून इंग्रजीमध्ये मला थोडे बोलायचे आहे. इतका उशीर झालेला असतानाही तुम्ही सर्व लोकांनी माझे भाषण शांतपणे, शिस्तीने आणि एकाग्रतेने ऐकून घेतलेत याबद्दल मी आभारी आहे. संयम आणि शिस्तपालन हे खऱ्या सैनिकाच्या अंगचे गुण होत. गेली वीस वर्षे मी माझ्या वक्तृत्वाला व लेखणीला संयमाचा लगाम घातला आणि माझी शक्ती वाटेल तशी खर्च केली नाही. जो आपली शक्ती वाया दवडत नाही, तोच खरा ब्रह्मचारी होय. तो आपल्या बोलण्यातही संयमाचे बंधन घालतो. गेली काही वर्षे अशा तऱ्हेचा संयम अंगी बाणविण्याचा मी प्रयत्न करीत आहे; परंतु आज वेळ पडली, म्हणून संयम टाकून माझे मन मी तुमच्यापुढे मोकळे केले. असे करण्यात मी तुमची सहनशक्ती अधिक ताणली खरी, पण त्याबद्दल मला खेद होत नाही. कारण तुम्हाला आणि तुमच्याद्वारे सर्व भारताला काहीएक संदेश दिल्याचे समाधान मला मिळाले आहे.

- महात्मा गांधी


वाचा 'चले जाव' च्या सभेत महात्मा गांधी यांनी केलेली इतर दोन भाषणे :  

'चले जाव'चा ठराव मंजुरीला टाकण्यापूर्वी गांधीजींनी केलेले प्रास्ताविक

'चले जाव' चा ठराव मंजूर झाल्यावर गांधीजींनी केलेले समारोपाचे भाषण


8 ऑगस्ट 1942 च्या 'चले जाव' आंदोलनातील  ऐतिहासिक व दुर्मिळ भाषणे प्रथमच पुस्तकरुपात - 'चले जाव - 1942च्या ठरावातील भाषणे'. हे पुस्तक खरेदी करण्यासाठी इथे क्लिक करा.

Tags: भाषण चले जाव महात्मा गांधी मौलाना आझाद पंडित जवाहरलाल नेहरू इंग्रज ऑगस्ट क्रांती हिंदू- मुस्लीम Chale Jao Mahatma Gandhi Maulana Azad Pandit Jawaharlal Nehru British August Kranti Hindu-Muslim सरदार पटेल Hindu-Muslim Sardar Patel Load More Tags

Add Comment