अंधाऱ्या वस्तीतला उजेड...

फोटो सौजन्य: Minal Dusane | behance.net

मुख्य रस्त्यावरची ती वेश्या वस्ती... काही बायका बाजेवर बसल्या होत्या... अगदी रिकाम्या... काहीच काम नसल्यासारख्या...
अशीही ही वस्ती दिवसभर गडद मेकअप उतरलेल्या चेहऱ्यासारखी... झगमग लायटिंग बंद केलेल्या बल्बसारखी...
लॉकडाऊन मध्ये थोडा भकासपणा वाढल्यासारखा...
बाजेवर बसलेल्या बायकांशी स्थानिक कार्यकर्ते व आम्ही बोलायला गेलो. एक बाई थोडं बोलू लागली. पत्रकाराने कॅमेरा काढताच लाईट बंद व्हावी तशा mute झाली.
चट्कन म्हणाली,
"कॅमेऱ्यासमोर बोलणार नाही, वस्तीत एकत्र हवं तर बोलू.पण वस्तीत पण पुढे-पुढे बोलणार नाही उगाच बाकीच्या बायका वैतागतात..."
थोडा अंतर्गत राजकारणाचा विषय होता.

आम्ही चिंचोळ्या गल्लीत शिरलो. चढ उंच होता. दोन्ही बाजूने दाटीवाटीच्या खोल्या.
पत्रकार आणि तीन चार जणं एका खोलीजवळ थांबली. तिथं पाच सहा बायका जमा झाल्या.
सध्याची परिस्थिती अन्नदान कसं सुरू आहे इतर प्रश्न ह्यावर त्या हळूहळू बोलत होत्या...
सध्या लॉकडाऊन मध्ये परिस्थिती बिकट होत चालली होती...
स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते मदत पोहोचवत होते पण घरं भरपूर असल्याने जे पुढे-पुढे करतात त्यांनाच मदत मिळते असंही काहींचं म्हणणं होतं. 

कॅमेरा आणि माईक समोर सगळंच कळतं असं नाही. मी तिथून काढता पाय घेतला. गल्लीतून पुढे चालत राहिले... सगळ्यांचं लक्ष माईककडे होतं.
मी एका खोलीसमोर थांबले.. आत पस्तिशीची बाई होती.. 
"अंदर आऊ क्या?"
काही क्षण ती बावचळली. जिन्याखाली असते तेवढीच खोली होती ती.
दाराला लागून एका बाजूला मोरी. समोर दोन फूट जागा सोडून एक पडदा.
अजून एक दिवाण...

"आओ ना..!!"
मी आत गेले... 
ती रंगाने गोरी होती.. त्यामुळे दंडाजवळचे डाग स्पष्ट दिसत होते..
मी विचारलं 
" हे काय झालं ग बाई..!!"
तर म्हणे इथे आली तेव्हा ती जाड होती.. आता वजन अचानक कमी झाल्याने ते डाग पडलेत...

आमच्या गप्पा सूरु झाल्या... 
खोलीचं भाडं दहा हजार, सध्या लॉकडाऊनमुळे सगळं बंद आहे. बाकी कुटुंब गावी असल्याने तिथं सध्या पैसे पाठवायला जमत नाही. 
धंदा बंद आहे पण तरीही रात्री अपरात्री लोक वस्तीत येतात. हट्टाने मागणी करता.. राडे घालतात.. झवायला दिलं नाही तर अगदी दगड डोक्यात घालेपर्यंत प्रकरणं जातात.. 
आम्हाला विचारतात,
"तुम्ही रांडा 'नाही' म्हणायला लागलात तर काय आता रस्त्यावरच्या पोरी उचलून बलात्कार करू का?"

"अशा वेळेस काय करायचं समजत नाही.. मी नाही म्हणाले तर तो पुढे जातोच.. कुणी ना कुणी त्याच्यासाठी उलपब्ध होतंच.. मग मीच का नको करू धंदा? ती तर पैसे कमावते मग मी पण कमावते...!!
संकट जीवावरच असलं तरी जीवाला पोट पण आहेच ना..?"

तिच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं... गावी आंधळे आई-बाप  आहेत. मुलाचाही खर्च आहेच.
तिच्या डोळ्यात संघर्ष, हतबलता सगळं एकत्र झालं होतं.
मी आले तेव्हा तिने वेगळं नाव सांगितलं होतं. निघताना तिने खरं नाव सांगितलं. शरीर मेलं असलं तरी मन हळवं असतं. अनेकदा अनेकांनी फसवूनही ह्या विश्वास ठेवतात. 
मी वाकून दारातून बाहेर आले. एव्हाना कॅमेरा खूप पुढे निघून गेला होता.

मी वस्तीतून फिरत राहिले.. ही वस्ती म्हणजे सर्व अर्थाने भुलभुलैयाच आहे.. जागो जागी बायकांचे गुच्छ बसले होते.. गप्पा सुरु होत्या..
"काय गं तिला दुसरी मुलगीच झाली ना..!"
ओझरतं वाक्य कानी पडलं..

एका दारात वयस्कर काकू आणि बाजूला खुर्चीत काका बसले होते.. काकू सांगत होत्या,
"लोक अन्नदान करून जात आहेत मात्र बाकीचाही खर्च आहेच ना..
औषधे कुठून आणायची? नवऱ्याला दम्याचा त्रास आहे..!!"
ते एका खुर्चीवर शांत बसलेले होते.. श्वास फुललेला.. शरीरयष्टी किरकोळ.. 

मी पुढे चालत राहते..
निमुळत्या गल्ल्या वाढत होत्या.. सळसळत्या सापासारख्या.. त्यातच रंगा नावाचा मुलगा भेटला.. सात आठ वर्षाचा असेल.. 
तोच मला इकडे-तिकडे गल्ल्या दाखवत होता..
इतक्यात एका खोलीतल्या उंबऱ्यातून पाणी वाहत होतं..
मी आत डोकावलं. खाटेवर तीन-चार वर्षाचं नागडं मुल झोपलं होतं. घरात चांगलीच वाफ मारत होती. मे महिन्यामुळे पत्रे तापले होते. थोडा थंडावा हवा म्हणून तिने फरशीवर पाणी ओतलं होतं.
दिवसभर घरात बसवत नाही, त्यामुळे बाहेरच बसतात सगळ्या. अस्वच्छतेचाही मोठा प्रश्न आहे तिथं. स्थानिक मदत आहे, पण स्थानिक नगरसेवक मात्र उदासीन. धंदा बंद असल्याचंच तीही सांगते. 
पण बाहेरच दारू पिऊन बसलेल्या पुरुषाची नजर मात्र काहीतरी वेगळंच सांगू पाहते. ह्या वस्तीतले प्रश्न नेहमीचे आहेतच. लॉकडाऊनच्या काळात ही वस्ती बेशुद्ध झाल्यासारखी दिसते. तरीही पोटाची व पोटाखालची आग मधूनच ह्यात धुगधुगी भरू पाहते...
रंगा मध्येच दृष्टीआड होत होता.. मी त्याच्या मागे पळत होते.. 

आज लॉकडाऊनच्या काळात बऱ्याच वेश्या विस्थापित झाल्या आहेत. वेश्यांच्या प्रश्नांवर काम करणारे. समीर गायकवाड सांगतात. लॉकडाऊनच्या काळात वाढणाऱ्या गरिबीमुळे वेश्यांची अवस्था आणखीन बिकट होणार आहे. झारखंड व इतरही भागांतून ह्यूमन ट्रॅफिकिंगला सुरुवात झाली असेल.. पण सध्या  कुणीच त्या आकड्यांकडे पाहत नाहीये..

ज्या वेश्या विस्थापित झाल्यात यांच्या जागेवर आता नवीन आणि तरुण मुलींचा भरणा होईल.. परतून आलेल्याना धंद्यात त्रास होईल..
कमी किमतीत बायका पुरवल्या व मिळवल्या जातील.. वाढलेली स्पर्धा जिवावरची जोखमी घ्यायलाही तयार होईल.. ह्यातून हा मोठा गट रोगांचा वाहक होण्याची शक्यता बळावू शकतेय...

किन्नरांची अवस्थाही ह्याहून वेगळी नाहीये. पैशाचा प्रश्न आहे. सगळे व्यवसाय बंद असल्याने रोजगार नाही. किन्नरांत तीन-चार जणांपासून ते बारा-पंधरा जणांपर्यंत सगळे एकाच लहानश्या खोलीत राहतात.
आहे त्यात ते सगळे एकत्र राहताहेत.

ही सगळी माणसं आहेत... ही माणसं भेटतात.. बोलतात.. त्यांचे संघर्ष सांगतात.. आणि अभूतपूर्व प्रेम देतात... 
ही माणसंच आहेत हे मात्र आपण विसरतो.. 
ते तुम्हाला घरात घेतात.. 
जेवू घालतात.. 
आपण का अंतर राखतो त्यांच्यापासून??

बऱ्याचदा त्यांना मदतही नको असते.. 
समोरचं माणूस आपल्यासारखंच एक माणूस आहे ही भावना त्यांची पोकळी भरून काढू शकते... 
इथे मुद्दाम ठिकाणांचा आणि व्यक्तिरेखांचा उल्लेख टाळला आहे. 
ह्या वस्त्या आपल्या आजूबाजूच्याच आहेत... त्या आपल्याला कधीच नाकारत नाहीत. आपल्या दोघांच्या मध्ये येत असेल ते आपल्याच मनाचं कंडीशनिंग...

त्यांचं-त्यांचं जगणं आहे... त्यांचे त्यांचे संघर्ष आहेत...
ह्यातून कुणीतरी त्यांना बाहेर काढेल अशी त्यांची अपेक्षाच नाही...
पण कुठल्याही पूर्वग्रहाशिवाय त्यांच्याकडे नुसतं पाहायला तरी काय हरकत आहे ना??
प्रेमभुकेली माणसं सर्वत्र असतात... ह्या अंधाऱ्या वस्त्यांतही...!!

- स्वाती पाटील, मुंबई
swatipatil.cacr@gmail.com
(लेखिका, सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून 'मासिक पाळी व्यवस्थापन' या विषयाच्या तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत. विविध सामाजिक प्रश्नांवर त्या लेखनही करतात.) 

Tags: स्वाती पाटील वेश्या वेश्याव्यवसाय वेश्या वस्ती किन्नर तृतीयपंथी Swati Patil Prostitutes Prostitution Load More Tags

Comments: Show All Comments

नितीन शिंदे

हे एवढं सगळं करतेस कधी ?...कौतुक वाटतं खरंतर. काळजी घेत रहा.... आणि हो...काळजी घे

Suraj Janrav

वाचताना त्या गल्लीत फिरून आलो असं वाटलं. सेक्स वर्कर, किन्नर यांच्या समस्या सोडविण्यासाठी दुर्देवाने कुठलेही नेते पुढाकार घेत नाहीत. कारण यापैकी बऱ्याच जणांकडे voting card नसतं! त्यामुळे आधीच मागासलेल्या या वर्गाकडे राजकीय ताकद नाही. आर्थिक बाजू तर आधीच कमकुवत! पण सर्वात कमकुवत बाजू आहे ती म्हणजे सामाजिक बाजू! म्हणजे सर्वसामान्य जनता ही या वर्गाला समाजाचा एक हिस्सा मानायला तयारच नसते. आणि कुणीही कुठल्या सेक्स वर्करकडे एक माणूस म्हणून पाहत नाही. मग त्यांच्या समस्यांवर बोलण्याचा प्रश्र्न येतोच कुठे!? लोकांचा एक (गैर)समज असतो की माणसे मुळातच वाईट आहेत आणि ते जे काही भोगत आहे त्याला तीच जबाबदार आहेत. PRच्या मागे लागलेल्या या काळात यावर आपल्या सर्वांना अधिकाधिक बोलावं लागेल.

किरण येले

पोटतिडिकीने लिहिलंय

भारती

दुर्लक्षित विषय

यशराज

छान मांडला आहे तुम्ही तुमचा अनुभव. त्यांचं दुःख समजून घेऊन त्यांना मदत करण्याची भावना सामान्यजनात रुजणे गरजेचे आहे.

विभा

छान मांडलय शब्दात... आपल्या समाजाचा हाच प्रॉब्लेम आहे की माणूस माणसाला माणूस म्हणुन बघतच नाही... कोणीही अश्या व्यवसायांमध्ये स्वेच्छेने नसतोच मुळी हेच सामान्य लोक विसरतात आणि त्यांच्याकडे बघण्याचा माणसाचा दृष्टिकोन आपसूक बदलतो...दृष्टिकोनातील बदल अपेक्षित आहे.

स्वरा

चांगला लेख..

Sachin shinde

खूप छान विषयावर लेख लिहिलाय गरीब माणसांच्या पण काही व्यथा असतात त्या समोर येणे गरजेचे आहेत.म्हणजे त्याच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल

प्रशांत सगरे

खरच या वेश्या व्ययवसायात असलेल्या बायका स्वखुशीने येत नसतातच. त्यांचीही काही मजबूरी असते. पण या वर्गाकडे लाेकांचा पाहण्याचा दृष्टीकाेन मुळात बदलला पाहीजे. त्यादेखील जे काही करतात ते त्यांच्या कुटूंबाखातरच करतात. शेवटी पैसा कुणाला नकाे असताे पण त्याना या मार्गाने पैसा कमवावा लागताे हे दुर्दैवच आहे. सध्याच्या लाॅकडाऊनमध्ये खरच या स्यत्रीयांवर आसमानी संकटच ओढवलय जे लवकर भरून नीघणे अशक्य आहे. स्वाती मॅडम लेखात तुमच्या निरीक्षणाची बारकाई दीसून येते. लेख वाचतानाच या स्त्रीयाना जगण्यासाठी किती झगडावं लागतय याचा अंदाज येताे.

Nitin shirsat

खूप वास्तविक वर्णन आहे

Priyesh Pramod Ruia

It gave me goosebumps.. Its difficult to write facts n that too without hurting anyone's feeling. Proud of u Swati..

Supriya Athalye

Really gave me goosebumps! Such a sensitive topic very nicely handled ...

Mugdha

Khoop dole ughdnara lekh aahe.,Gr8 Job Swati...so.proud of you

Add Comment